अधिकार भाग 2

अधिकार भाग 2

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी कामावर जॉईन झालो हे कळताच CP नी फोन केला, “Heartiest Congratulations my Son, wish you happy marriage life. कशी काय झाली तुमची कश्मीर टूर? एंजॉय केलस ना? काय आहे, लग्न झालं की तिच्या कलाने घ्यावं लागतं, तिथे पोलीसगीरी चालत नाही, बाई म्हणेल ती पूर्व दिशा. निदान काही महिने तरी, नाही तर Full moon नाही आणि Half moon नाही.”

साहेब स्वतः च्या जोक वरती हसले. साहेबांच अस हसणं हे डेंजर असायचं, नेहमीच कोणत्या तरी नवी मोहिमेवर जाव लागणार याच ते सूचक असायचं. “Ok,now to the point, for the last few months Salim has been a headache for our department, please do something.”

साहेबांनी फोन ठेवला. काय करायच ते अर्थात मलाच ठरवायच होत. डोंगरी परिसरात सलिम डॉन होता. सर्व दुकानातून हप्ता वसूल करायचा. हप्ता वसुली हे नाटक होत. त्याच खर काम अफू,गांजा,चरस,एलडी, यांची निर्यात करणे . दोन तीन नायजेरियन सोबत होते.पण तो कधी मुद्देमाल सापडत नव्हता. शिवाय जुन्या चाळी, इमारतीचे प्लॉट बिल्डर लोकांना खाली करून द्यायची सुपारी घ्यायचा.त्याची दहशत होती. त्याच कोणी उघड नाव घेत नव्हतं. शेवटी एक दिवस रात्री उशीरा बारमधून बाहेर पडल्यावर गाठला, दोन तिन पंटर सोबत होते,सुरवातीला त्यांनीही प्रतिकार केला, एकाला टपकवला तसे भडवे पळून गेले. आमच्या टिमने सलीमला कुत्र्याची मौत दिली.आज पर्यंत अमंली पदार्थांची सवय लावून त्याने किती मुलं बरबाद केली ते त्यालाच माहिती.एकट्या सलीमला टपकवून अमंली पदार्थ रॅकेट संपणार नव्हतं. पण सलीमच्या मृत्यूने या लोकांवर थोडी दहशत बसणारं होती.

आमची व्यूहरचनाच अशी होती की कोणतीही हत्त्या ही गुन्हा ठरू नये तर तो स्व: संरक्षणासाठी केलेला बचाव वाटावा. पण गुन्हेगारांना संपवता संपवता मला हत्त्या करण्याची चटक कधी लागली ती मला कळलेच नाही. बरं ही कारवाई खरचं डिपार्टमेंटसाठी की आणखी कोणासाठी याचा सुरवातीला अंदाज आला नव्हता. जेव्हा असच एकदा पक्याला उलथवला तेव्हा साहेबांनी टिमला पार्टी दिली आणि जातांना प्रत्येकाला एक एक पाकीट. नको नको म्हणत असतांना जबरदस्तीने खिशात कोंबल आणि म्हणाले तुमचे बक्षीस, असच इमान राखून प्रामाणिकपणे काम करत रहा सरकारने कदर केली नाही तरी माझ्या शाबासकीची थाप सदैव तुमच्या पाठीवर असेल.

माझ्या टिमने त्यानंतर डझनावारी लोकांच्या हत्या केल्या. त्यातील खरे गुन्हेगार कोण आणि नजरेत आलेले किंवा आपल्या मालकाला फाट्यावर मारणारे आणि फुकाफुकी णरणार कोण? हे फक्त साहेबांनाच माहिती. आम्ही केलेल्या त्या प्रत्येक हत्त्येस आम्ही counter Attack, गोंडस नाव दिले. ज्यांना मी संपवले ते कधी काळी सरकार मधील धेंडासाठी पैसे पुरवणारे अल्लाउद्दीन होते पण जेव्हा हे अलाउद्दीन स्वतःला आक्का समजू लागले त्यांना आल्लाचा रस्ता दाखवावा लागला.

ज्या हत्त्या मला कराव्या लागल्या त्यात पत्रकार होते, भूखंडाचे मालक होते, युनियन लीडर होते, समाज सेवक असल्याचा दावा करणारे होते. ते कोण आहेत? या पेक्षा ते किती उपद्रवी आहेत यावर त्यांचे मरण ठरायचे. कोणाला संपवायचे हे साहेब ठरवायचे. का? याच कारणही त्यांनाच ठाऊक, यामुळे कोणाला संपवायचे त्यानुसार साहेबांच्या किंमतीत फरक पडायचा. आम्ही हुकमाचे ताबेदार, तुमच्या भाषेत भडवे. या दरम्यान इतका पैसा माझ्या जवळ चालत आला की मी सवयी आणि साधने यांचा गुलाम कधी झालो मला कळलेच नाही.. गाड्या,उंची मद्य, हॉटेलमध्ये पार्टी आणि हे कमी की काय? म्हणून पबमध्ये चालणारे नाचगाणे. घरी पैशांची ददाद नव्हती जी वाटेल ती वस्तू घ्यायला पैसा होता आणि हे करू नको अस बायको किंवा मुलीला सांगण्याचा अधिकार मी कधीच गमावला होता.
ज्याचे स्वतःचे चारित्र्य संशयात सापडले असेल त्यांनी दुसऱ्याला चारित्र्याच्या गप्पा सांगू नये. चूक माझी होती आणि भविष्यात शिक्षा मात्र कुटुंबाला भोगावी लागणार होती.

ज्याला घामाचे मेहनतीचे पैसे मिळतात तो खर्च करतांना विचार करतो परंतु ज्याच्याकडे फारसी मेहनत न घेता पैसे येतात त्याच्या खर्चाला ताळमेळ नसतो. माझे माझ्या नकळत एक होतकरू, दक्ष अधिकारी ते सावज टीपणारा मारेकरी असे माझे Transformation कधी झाले ते मला कळलेच नाही.

पोलीस खात्यात मिळालेली संधी, ट्रेनिंग काळात वर्ष, दोन वर्षे केलेली कडी मेहनत, ट्रेनिंग संपताना शेकडो कॅडेटच्या
साक्षीने महासंचालकांकडून मिळालेलं गोल्ड मेडल आणि प्रशस्ती पत्र आणि घेतलेली शपथ, सगळं तर कालच घडलं असावं असं वाटत होतं. कुटुंबातून कोणीही पोलीस खात्यात नव्हतं. पण का कुणास ठाऊक? मला त्या वर्दीच भलतंच आकर्षण होत,कदाचित तो चित्रपटाचा परिणाम असावा. मोठं मोठ्या गुंडांशी एकटा टक्कर देणारा अमिताभ, ऋषी, आणि अलीकडे सलमानचा दबंग आणि अजय देवगणचा सिंघम असे चित्रपट पाहून त्याचा प्रभाव पडला असावा.

इनामदार, रिबेलो,वाय. सी.पवार, आंग्रे, नायक, कसाबला पकडणारे साळसकर अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या धाडसी कथा वाचून तस बनाव अस वाटलं होतं. पण या सन्माननीय व्यक्ती ज्यांची मनात मी पूजा करत होतो त्यांच्या कडून मी काहीच घेऊ शकलो नाही हे आज या कोठडीत मला कळले. आता पश्चाताप करून आणि केलेल्या पापाची कबुली करूनही काही फायदा नव्हता.

नियतीने माझ्या विषयी न्याय केला होता. साहेब म्हणाले तू तुझं तोंड बंद ठेव, मी तुला चांगला वकील देतो ,पण चांगला याचा अर्थ मी काय घ्यावा? कदाचित मी कधीच सुटू नये अशी तरतूद केली तर नसावी अशी शंका मला आता येऊ लागली आहे. मी पोलीस वर्दीतील अतिशय खतरनाक गुन्हेगार आहे आणि निर्दोष सुटण्याचा मला कोणताच नैतिक अधिकार नाही याची मला पुर्ण कल्पना आहे.

कदाचित न्यायालयाच्या निर्णया अगोदरच माझी हत्या होईल हीच शक्यता जास्त. वेळो वेळी ज्यांना ज्यांना मी चकमकीत मारले त्यांचे अतृप्त आत्मे मला शांतपणे जगू देणार नाही आणि ज्यांचा आदेश पाळत ह्या हत्त्या मी केल्या ते ही मला सहजा सहजी बाहेर येऊ देणार नाहीत. माझे नाव माझ्या जन्मदात्यांनी अभय ठेवले पण माझ्या कर्माने ना मी भयमुक्त जगलो ना कुणाला अभय देऊ शकलो.

लग्नानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. अर्थात पहिली काही वर्ष, मिरा आणि मी एक जबाबदार पती पत्नी म्हणूनच जगलो. तेव्हा सर्वच गोष्टी नव्या होत्या, उत्सुकता होती.उत्साह होता. शक्य तसा तीला वेळ ही देत होतो आणि तिला नसली तरी मला बाप म्हणवून घेण्याची घाई होती.

अस म्हणतात बाई आई झाली, की जास्त संमजस होते. संसारात सहज गुंतून जाते. दोन वर्षांच्या अंतरान दोन मुलं झाली. मुल झाल्यानंतर माझा कुटूंबातील सहभाग कमी झाला. कामाचा व्याप वाढला. मुलांची शाळा,त्यांचा अभ्यास यात माझं योगदान शून्य. त्यांचा बाप म्हणून मी खरेच नापास. जे काही केलं ते मिरेने आणि आईने केलं.आता आता मीरा माझ्याकडे संशयाने पाहते. माझ्यात तिला तिचा नवरा,तिच्या मुलांचा बाप कुठेच दिसत नाही.

ती इतक्या अलिप्तपणे ती माझ्याकडे पाहते. जणू मी पेईंग गेस्ट असावा. माझं अनियमित येणं. मुलांचे वाढदिवस लक्षात न ठेवण,तिच्या नातेवाईक मंडळींची चौकशी न करणं, त्यांच्या लग्नाला न जाणं. तिच्या मनातील असंतोषाची अनेक कारणे असावीत. तिच खरंच होतं, माझ्या अपराधाची अशी कितीतरी मोठी यादी होऊ शकते.

आताशा मी घरात आलो की तिच्या संतापाचा उद्रेक होई, ते नैसर्गिक होतं. एक तर मी कधीही वेळ पाळू शकलो नाही. कधी कधी मी लवकर मोकळा व्हायचो पण माझ्या संसारात माझ लक्षच नव्हते. तो संसार माझा वाटतच नव्हता. तिच्या संतापला उत्तर देण्यात माझा अर्धा तास वाया जात होता. तिचं चुकतं अस मी म्हणू शकत नाही. मी माझ्या पदाचा मी गुलाम झालो आहे. झोप येत नव्हती. चुकून आली तर स्वप्नात कुणी तरी माझा गेम करत आहे, असा भास होत होता.म्हणून दोन तीन पेग घेऊन निजाव लागत होत.

आमच्यात होणाऱ्या भांडणाचा परिणाम नकळत मुलांवर होत होता.आई बाबा दोन वर्षांपूर्वी दोन दिवसांच्या अंतराने गेले. ते असते तर त्यांना माझं जगणं पाहून कदाचित दुःख झालं असतं. कधीकाळी गोल्ड मेडल मिळवलं म्हणून घरी यांनी ताच वडिलांनी उचलून घेतलं होतं. मला जेल झाली ऐकून मुलगा हे नातं त्यांनी क्षणात तोडून टाकलं असत.

उघड शत्रू परवडला पण हे अस्तनीतले निखारे फुंकर मारली तरी, गरज असेल तेव्हा पेटणार नाही आणि त्यांना कुणी नको असे वाटले तर जाळून टाकायला मागे पुढे पहाणार नाही. त्यांच्या कृत्याला यश येईल असेही नाही पण समाजाच्या नजरेतून मी सुटू शकणार नाही हे नक्की.

माझ्या नजरेत मी गुन्हेगार आहे. मी स्वतः आणि नियती मला कधीही माफ करू शकणार नाही. गेले किती दिवस मी झोपलो नाही ते डोळ्यांनाच माहिती. दिवसा तपास अधिकारी शांत बसू देत नाही आणि रात्र तिच्या निरव शांततेत लपलेल्या संशयी सैतानाला जागे करते आणि मला झोपू देत नाही.मी आत्महत्या करून मरू नये म्हणून येथे काहीही ठेवलेले नाही.

साहेब वाचवतील अशी मनाशी खुणगाठ बांधून मी या यातना भोगत होतो.अर्थात ही माझी समजूत खरी की खोटी हे फक्त ईश्र्वरालाच माहिती.

हं, आता सांगूनही कुणाला खर वाटणार नाही, मी शाळेत बॅक बेंचर होतो. मौज, मस्ती यात काही तरी वेगळ वाटायचं.पण आमच्या गावडे सरांचं माझ्याकडे लक्ष गेलं. काय पाहिले माझ्यात त्यांनाच ठाऊक? म्हणाले तू उद्या पासून दुसऱ्या बाकावर बसायचं, गुंड बनण्यासाठी तुझं आयुष्य नाही. You are born to shape the Nation. मला घंटा कळल नाही, पण आठ पंधरा दिवसांनी वेगळ वाटू लागलं. आपण आलतू फालतू नाही. काहीतरी वेगळ करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. पहाता पहाता अभ्यासात गोडी वाटू लागली. जर माझी बातमी त्यांच्या वाचनात आली तर केवढं दुःख होईल. त्यांनाच कशाला, मिराला आणि माझ्या बारा वर्षाच्या तन्मयला किती दुःख दिल मी, बर झाल, आई बाबांनी अगोदरच डोळे मिटले पण माझी अक्का जी मला नेहमी प्रोत्साहन द्यायची तीचं काय? काय म्हणत असेल ती?
का मी जगतोय? पश्चातापाच्या अग्नीत मी मरत कसा नाही?

मी शाळेत NCC कॅडेट होतो, ग्रुप लीडर म्हणून मला गावडे सरांनी नेमले तेव्हा घरी येऊन कधी सांगतो असे मला झाले होते. मी सांगतो त्यावर क्षणभर आईचा विश्वास बसेना, कारण माझे कारनामे ती पहात होती, पण एकदा बाबा आईला सांगतांना मी ऐकलं, “अग हे वयच आहे त्याच,तो नाही तर काय तू खोड्या करणार पण एकदिवस तोच ह्या घरासाठी वैभव आणेल.”

पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनादिवशी आम्ही विद्यार्थ्यांनी शपथ घेतली होती. एकता आणि अनुशासन हे NCC चे ब्रीद होते.

दर शनिवारी आमची परेड होत असे मिलिटरी रीटायर मेजर वाघ आम्हाला ट्रेंनिग द्यायला यायचे. भव्य कपाळ पट्टी, अतिशय बारीक केस, झुपकेदार मिशा, पिळदार मनगटे आणि अगदी ताठ चालणे, जनपथ ला संचलन करावे तसे चालत. नजरेत वेध घेणारी जादू, अशा भारदस्त मेजरना पाहून आपले काही खरे नाही असे वाटे.

छातीवर ठोसा मारून ते कॅडेट किती तयारीचा आहे पहात. त्यामुळे व्यायाम कंपल्सरी. दंड बैठका, सूर्य नमस्कार, पूलअप्स, ग्राउंड रोलिंग असे अनेक प्रकार करून घेत,”हाय जोश” एवढ्या मोठयांनी ओरडायला लावत की आजू बाजूचे रहिवासी खिडकीतून डोकं काढून पहात बसत. हाय जोशचा अर्थ कळलाच नाही आणि पोलीसी वर्दीचा जोश मला अहंकाराच्या वाटेन दूर घेऊन गेला.

वाघ सरांच्या वागण्या बोलण्यात एक दरारा होता, जर काही चूक झाली तर पायाच्या पोटरीवर छडीचा प्रसाद मिळालाच म्हणून समजा, पण एकदा त्यांचा ट्रेनिंग तास संपला की त्यांच्यातला दिलदार सवंगडी जागा होई. प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्य दिन जवळ आले की रविवारी दुपारी ट्रेनिंग. आपले कसब इतर जनतेला दाखविण्यासाठी एकच दिवस असतो. या एक दिवसाची परेड आणि रायफल पासिंग नीट व्हावी म्हणून सारी धडपड. सर सगळ्या विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा आणायला सांगत, स्वतः डबा घेऊन येत आणि आमच्या सोबत बसून जेवत. जर वेळ असेल तर युद्धाच्या कथा सांगत,लडाख,सोपर येथे झालेल्या धुमश्चक्री बदंडात शिरलेल्या बुलेटची निशाणी दाखवत. ते ऐकतांना रक्त तापत असे. सैनिकी प्रशिक्षण किती कठोर असते? आणि प्रशिक्षण काळात घरची आठवण आली तरी काळजावर दगड ठेवून कसं जगाव लागत, चूक झाली तर तीन किलोमीटर तापलेल्या वाळूतून गुढघ्यावर जाण्याची शिक्षा किती भयानक असते याचे किस्से ऐकवत.

सैनिक बनण्याचा निर्धार करून आलेली मूल आठ पंधरा दिवस रात्रीची कशी रडतात आणि आमचे मेजर त्यांना कसं हँडल करतात ते ऐकवत. त्यांच बोलणं संपू नये असे वाटे आणि अचानक त्यांना कसली तरी आठवण झाली की म्हणत,”आज के लिये इतना काफी बाकी अगली बार.”त्यांनी थांबू नये म्हणून आम्ही गोंधळ घालत असू ,”सर आप पुरा बता के जाइये,सर प्लीज.” ,पण त्या प्लीजला अर्थ नसे. “अनुशासन”और क्या?

एस.एस.सी.पर्यंत दोन कॅम्प अटेंड करायला मिळाले, पुढे रुईया सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तोही NCC कोट्यातून, लास्ट इयरला असताना NCCची महाराष्ट्र राज्याच्या तुकडी दिल्ली येथे संचलनात भाग घेण्यासाठी गेली त्यात बेस्ट कॅडेट म्हणून समावेश झाला आणि पोलीस किंवा मिलिटरी सेवेत दाखल व्हायचं असा मनाचा निर्धार झाला. अर्थात बाबांचा सपोर्ट होता, त्यांनी कर्ज काढून माझी पुण्यात ट्रेनिंग आणि राहायची सोय केली म्हणून शक्य झालं. मला इतिहास आणि राज्यशास्त्र यात आवड होती.बाबासाहेब यांची राज्य घटना संदर्भ ग्रंथ तीन चार वेळा वाचून काढला होता.

देश चालवायचा तर राज्याराज्याचा इतिहास,तेथील धर्मस्थळे, संत, सामाजिक कार्यकर्ते,तेथील रीती रिवाज,समाजासाठी प्रेरणा देणाऱ्या संस्था,तेथील लोकप्रिय कलाकार,समाज सेवक यांची योग्य माहिती हवी. कितीतरी यशस्वी IAS, IPS, अधिकाऱ्यांच्या मुलाखती,त्यांची autobiography माहीत करून घेणे गरजेचे होते. मी तेच केले. अनेक मान्यवर लोकांच्या CD, interviews यांची मला मदत घेतली. अभ्यास कसा करू नये हे समजावून घेतले. दर पंधरा दिवसांनी सेवेत असणारा एकतरी अधिकारी संवाद साधण्यासाठी येत असे.वेग वेगळ्या विषयाची तयारी कशी करावी ते सांगत असे. या पूर्वी संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पाहिल्या त्यांची अभ्यास करण्याची पध्दत समजून घेतली. प्रकर्षाने एक लक्षात आले UPSC, MPSC, किंवा अन्य परीक्षेसाठी कोणताही Formula नसतो यश हे ज्याच त्याच असते.प्रत्येकाला एकच मेथड उपयोगी पडत नाही.

पुस्तकी ज्ञान मिळवण्यापेक्षा हा अनुभव सेल्फ कॉन्फिडन्स साठी उपयोगी पडला.या अधिकाऱ्यांना परिस्थिती हाताळताना आलेले अनुभव, त्यांनी घेतलेले निर्णय, त्याचे परिणाम, नैराश्य घालवण्यासाठी लागणारा खंबीरपणा , मेडिटेशन अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. परिपक्वता म्हणजे काय? ते कळाले,राजकरणी अधिकाऱ्याचा वापर कठपुतळी सारखा कसा करतात ते समजले. म्हणून पुस्तका पलीकडे पाहण्याची वृत्ती आणि जिद्द निर्माण झाली.

पुण्यात जाऊन चाणक्य मंडळ येथून सिव्हिल सर्व्हिस एन्ट्रन्सची तयारी केली. माझे दैव बलवत्तर माझी मेहनत आणि मोठ्यांचे आशिर्वाद की मी पहिल्या फेरीत आणि ते ही 593 गूण मिळवून बारावा आलो, आता selection होण नक्की झालं.सगळा प्रवास अगदी स्वप्नवत.दामलेंच नाटकातले गाणं आठवले, “मला सांगा सुख म्हणजे नक्क्की काय असते.” तोच मी एक भाग्यवान.

आता खऱ्या अर्थाने रस्ता बिकट होता.मुलाखत, फिजिकल आणि मेडिकल हे टप्पे अजूनही बाकी होते. पूण्यात असतांना कुणीतरी सिनियर म्हणाला होता,रनिंग, सुर्यनमस्कार, सिटअप्स, पुलअप्स काहीही सांगतील,कदाचित काही सांगणार नाहीत. प्रायव्हेट मेडिकल केली होती,सगळ व्यवस्थित होत.आता सिर्फ इंतजार ! कधी बोलवतात आणि ट्रेनिंगला कुठे पाठवतात त्याचा.दोन महिन्या नंतर मेल आला आणि प्रतीक्षा संपली.माझ्या बरोबर मुंबईतील तीन, पालघर येथील एक आणि रायगड मधली दोन मुलं होती.आम्हाला मसूरी उत्तराखंड येथे ट्रेनिंगला जायचे होते.लोक सेवा आयोग मुख्यालयात बोलावून आम्हाला कल्पना देण्यात आली.एवढ्या दूर जाण्याची माझी पहिली वेळ होती.

आई खूप काळजीत होती यापूर्वी कधी कधी म्हणून स्वतःचे कपडे धुतले नव्हते की जेवणानंतर ताट उचललं नव्हतं आता स्वतःचे सर्व स्वतःला करायचे होते. बाबा बरेच समजुतदार होते. मी कोणीतरी मोठ व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती म्हणूनच मी सिव्हील सर्व्हिसेस जॉईन करतो म्हणालो तर म्हणाले तुझी इच्छा आहे ना! जरूर जा.कुटुंबाचं नाव मोठे कर,”ती आई” तुला यश देईल.

मसूरी येथील वातावरण अतिशय आल्हाददायक, नद्या, टेकड्या यांनी सुशोभित असा आसमंत.थंडी तर नेहमीच असायची. तेथील चार महिन्याच्या प्रशिक्षणात भरपूर शारीरिक मेहनत करून घेतली. त्यानंतर एक वर्ष हैद्राबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी येथे दंड संहिता, पिनल कोड, अपराध शास्त्र, भारतीय संविधान यांची माहिती अधिकारी वर्गाने दिली. तिथे बाल सुब्रमण्यम आणि रवी असे दोन अधिकारी होते,शिस्तीला अतिशय कडक,इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व आणि IPC आणि CrPC आणि त्या अंतर्गत Law यांचा गाढा अभ्यास, Logical argument चे ज्ञान. त्यांनी गुन्हेगारी विश्वातील अनेक उदाहरणे इतक्या तपशिलात सांगितली आणि शंकाचे निरसन केले त्यामुळे डोक्याला खुराक मिळाला.तिथे एवढे संदर्भ ग्रंथ होते की काय वाचावे ते कळेना.

१८३४ साली इंग्रजांनी भारतावर राज्य करता यावे यासाठी कायद्याची रूपरेषा लॉर्ड मेकॉले याच्या नेतृत्वाखाली तयार केली १८६० रोजी तो अंमलात आला आजही बरीचशी तीच कलमे आपण वापरतो हे आश्चर्य नाही तर काय! गुन्हा म्हणजे काय ? Attempt with Intention is a Crime. लहान मुलांच्या Self defence साठी अस्तित्वात असलेले कायदे,आय.पी.सी. सेक्शन अमुक तमूक,गून्ह्याचे प्रकार अन शिक्षेची तरतूद.
फसवणूक, मारामारी, चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खुन,गुन्हा करतांना त्याची मानसिक स्थिती, गून्हेगाराच मानस शास्त्र,गून्हेगाराची वयोमर्यादा एक ना दोन असे अनेक सेक्शन, सब सेक्शन वाचून डोक आऊट व्हायच.

आणि कायदा म्हणतो, गुन्हेगारांना संपवू नका तर त्याच्या मनातील गुन्हेगारी मानसिकता संपवा. त्यांना पून्हा सामान्य माणूस बनवण्याचे तंत्र विकसित करा, समजून घ्या. कधीकधी ते सेक्शन वाचून डोक सुन्न व्हायच. भणभणायच. विधी,उपविधी, डोंबाल आणि म्हसण. हे एवढे section कधी पाठ होणार आणि कोणता कधी वापरायचा कसे कळणार ? याच टेन्शन वाटायचे .पण नंतर सरावाने रामरक्षा पाठांतर करावी तसे सर्व नियम आणि पीनलकोड मनात बसले.फौजदारी नसा नसात भिनली म्हटले तरी वावगे नव्हते.

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “अधिकार भाग 2

  1. influencersginewuld

    Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how can we communicate

  2. stufferdnb

    Hi my loved one I wish to say that this post is amazing nice written and include approximately all vital infos Id like to peer more posts like this

  3. अधिकार भाग 4 - प रि व र्त न

    […] १, भाग २ व भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक […]

Comments are closed.