अधिकार भाग 3
कथेचा भाग १ व भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
हे वर्ष तस तापदायक गेलं कारण रोज चार पाच तास एका ठिकाणी बसून आणि तिच तिच गुन्हांची उदाहरणे, त्याच्या तपासाची पध्दत, तेच Section, त्याची Examples त्याचे consequences हे ऐकून मेंदू खराब झाला होता. शिवाय केस स्टडी म्हणून जवळच्या तुरूंगाच्या भेटी असत. जेलर म्हणून कार्यरत असणाऱ्या अधिकारी वर्गाचे अनुभव कथन असे. तसेच दर आठवड्यात गुन्हेगारी जगतात घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगावर बेतलेली फिल्म दाखवून त्यावर प्रत्येकाचे मत घेतले जाई. जणू आपण या गून्हेगारी व्यवस्थेचा भाग आहोत असेच वाटू लागले होते. या वर्षभरात रोज इडली,अप्पम, डोसा, रस्सम, भात असच होत. ना चपाती ना पुरणपोळी, ना कांदाभजी ना बटाटे वडे, ना श्रीखंड पूरी ना चायनीज. कधी एकदा ट्रेनिंग संपते आणि मटणावर ताव मारतो असे व्हायचे. डिव्होशन शिकायच तर या साऊथच्या बुजुर्ग मंडळी कडून. एका विषयावर सतत दोन अडिच तास न कंटाळता जयराज कृष्णा गुन्हेगारांची मोड्स ऑपरेडी सांगयचे ते ही कोणत्या गुन्ह्यासाठी कोणते कलम तेव्हा त्यांच्या स्मरणशक्तीचे आश्चर्य वाटायचे.
सीमा सुरक्षा दलाच्या इंदोर येथील प्रशिक्षण शिबिरात विविध प्रकारची हत्यारे वापरणे, उघडणे, साफ सुफ करणे पुन्हा बंद करणे याचे चार आठवड्याचे प्रशिक्षण होते. साध्या बंदुकीपासून ते ऐ के फोर्टी सेवन पर्यंत प्रत्येक हत्यारांची रचना, त्याची शोधकथा, कधीपासून त्याचा व्यवसायिक वापर सुरू झाला? कोणती हत्यारे किती अंतरावरून सुरक्षित वापरता येतात? किती वर्षे हत्यार सुरक्षित वापरता येऊ शकते? अशा विविध प्रश्नांवर येथे खल चालत असे. फायरिंग ग्राउंडवर त्याचे प्रात्यक्षिक चाले.
इथे खुप मजा केली. कर्नल रावत ट्रेनिंग अधिकारी होते. पहिल्या दिवसाची गोष्ट, त्या दिवशी फक्त इंट्रोडक्शन आणि वेलकम फंक्शन होतं. एका अतिउत्साही मुलाने टेबलवर ठेवलेल्या हत्यारापैकी रिव्हॉल्व्हरला हात लावला,रावत भडकले, “You rascal how you dare to touch that? Do you know whether it’s loaded or not? गोली चल जाती तो जॉईन होने के पाहिले शाहिद हो जाते और हमे भी मरवाते. सुनो guys जब तक मै न बोलू आर्म्स को छुने का नही.” दोन दिवसांनी त्याच विद्यार्थ्याला जवळ बोलावून समजावले “देखो बेटा जब तक तुम यहा हो, हमारी जिम्मेदारी हो, अगर कुछ हुवा तो हम सस्पेंड हो जायेंगे और जान तुम्हारी जायेगी.हम सस्पेंण्ड हो गये तो एनक्वायरी होगी और शायद फिर से ड्युटी पर ले लेंगे मगर बेटा तेरी जान वापस नही आयेगी।” मुलाने Sorry म्हटलं मामला संपला.
पुढच्या सत्तावीस दिवसाचे आमचे शेड्युल अगदी दमछाक करणारे होते. पाच वाजता परेड ग्राउंडवर हजर व्हावे लागे. कारणाशिवाय उशीर झाल्यास दहा किलोमीटर न थांबता पळावे लागे. रात्री कधी झोप लागली ते कळत नसे आणि सकाळी उशीर झाला तर शिक्षा होईल या भितीपोटी वेळेत जाग येत असे.या तीन आठवड्यात वाहन चालवणे, पर्वत रोहण,घोडा फेक,रोप क्लायबींग इत्यादी शिकवले गेले. वाहन चालवणे परवडले पण अश्व रोहण तितकेसे सोप्पे नाही याची प्रचिती आली. दोन वेळा घोडा उधळला आणि आवरता आवरता रडकुंडीला आणले. प्रत्येक Activity नंतर टेस्ट ठरलेली असे त्यामुळे सतत अलर्ट रहावे लागे. मेहनत करणे म्हणजे काय असते ते तेव्हा कळाले.
ढोपरा,कोपरावर सरपटतांना अंदाज आला नाही तर ढोपरे सोलपटून निघत पण रडगाणे गायला वेळ नव्हता. एकदा सकाळची परेड संपली की भरपेट शाही नाश्ता. इंदोरला भुजिया, चाट मसाला, मिठाई,फरसाण अस काही तरी असायचं. साजूक तुपातली मिठाई नाश्त्याला असायची. खाना खिलाना मस्ती मे रेहना अस एकंदरीत इंदोर वातावरण होत.
मात्र ट्रेनिंग काळात मेसचे जेवण अगदी आदर्शवत होते. त्या नंतर माझी रवानगी सहाय्यक अधीक्षक म्हणून एक वर्षासाठी सोलापूर येथे झाली. मी दुसऱ्या शहरात राहायला जाणार म्हणून आई चिंतेत होती. माझी मोठी बहिण “माझी आक्का” मला भेटायला आली होती. ती माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती, मधली भावंड जगलीच नाहीत म्हणूनच तिचं माझ्यावर खुप प्रेम होत. तिने मला सांगितलं “अभि मी तुला पोलीस खात्यात जायला प्रोत्साहन दिल खरं, पण तुझ्या पोलीस खात्याबाबत फारस चांगलं कुणी बोलत नाही,पोलीस हप्ते खातात, गरीबावर अन्याय करतात आणि व्यसनी होतात अस मी ऐकल, तु स्वतःला या पासून दूर ठेव,आपला कुणीही God Father नाही,आई बाबा यांना दुःख होईल अस वागू नको.” मी तीच्या डोक्यावर हात ठेऊन तशी शपथ घेतली. “आक्के तू म्हणतेस तसच मी वागीन, आई-बाबा यांना वाईट वाटेल अस कधीही वागणार नाही.” तिने आईच्या मायेने मला जवळ घेतलं.
आमचे दाजी तिच्यावर रागावले, “मनिषा अग IPS झालाय तो, तुझ बाळ नाही, बर वाईट त्याला कळते. उगाचच वेड वाकड मनात आणू नको. दोन चार महिन्यानी त्याच वाजवून टाकू म्हणजे त्याची काळजी घेणारी येईल मग तुला विचार करत बसायला नको.” मी सोलापूरला सिध्देश्वर एक्सप्रेसने निघालो तर एखाद्या व्हिआयपी ला सोडायला जावे तशी मित्रांसह दहा माणसे सीएसटी ला सोडायला आली. काय म्हणावं यांच्या वेड्या वागण्याला? यालाच का प्रेम म्हणायचं? की जीव लावणं! ,
माझी आक्का तर रडली होती जणू मी बॉर्डर वर लढायला चाललो होतो. खरंच आता अस वाटत तिथं जाऊन शहिद झालो असतो तर नाव तरी झालं असतं. बदनामी झेलत या तुरूंगात पडण्यापेक्षा शतपटीने चांगले झाले असते.
आमचे हेडकॉन्स्टेबल कांबळे मला घ्यायला गाडीवर आले होते.
सुरवातीस हेड कॉन्स्टेबल, API माझ्याकडे कालच पोरगं अशा नजरेनं पहात, पण मी वेळेआधी जाऊन कामाची माहिती करून घेऊ लागलो. Sr. Inspector यांच्याशी चर्चा करू लागलो, त्यांच्या कामात त्यांना माझी मदत होते हे पाहून त्यांनी स्वतः बिटची माहिती द्यायला सुरवात केली. शहरातील वेग वेगळ्या भागातील लोकवस्ती,रेड एरीया तेथील पुढारी, गुंड, समाज कार्यकर्ते यांची माहिती करून दिली.हळू हळू कामात इंटरेस्ट येऊ लागला. कधी कधी बंदोबस्त पहायला निघालो तर हेडकॉन्स्टेबल म्हणायचे ,”सर, नास्ता करता का? आपलं बिट आहे, सर गुरुदेव मध्ये पास्ता छान मिळतो.” मी नकार द्यायचो.
गुरुदेवच नाव मात्र अनेकदा ऐकलं मग एका शिपायाने दबकत दबकत माहिती दिली, “सर, आपल्या ऑफिसमध्ये फ्रायडे नास्ता तिथून येतो.” पुन्हा चार आठ दिवसाने शिपाई टेबलवर नास्ता ठेवून गेला. मी बोलवलं, “कदम इकडे या.” ते आले “हे काय’ आज कुणाचा Birthday आहे का?” तो माझ्याकडे न बघताच म्हणाला, “सर,नक्षत्र, नक्षत्र मधून पाठवला,आज बुधवार आहे ना! .सर जाऊ ” “हो’जा पण नाश्ता घेऊन जा आज जरा पोट बिघडलय.” माझी प्रतिक्रिया ऐकून तो नाश्ता घेऊन गेला. थोड्या वेळाने आमचे हेडकॉन्स्टेबल कांबळे आले, “साहेब,काय बर नाही? डॉक्टर वैद्य बाईंकडे जायच का? गाडी काढू.”
“कांबळे, अहो काळजी करण्यासारखे काही नाही, जरा कुरबुर आहे इतकंच, होईल बर.” “सर, आपल्यासाठी येणारा नाश्ता,हा नेहमीच्या तेलातला नसतो, तुम्ही बिनधास्त खाऊ शकता.त्यांना आपला हिसका माहिती आहे. “
मी मनाशी विचार केला होता,येथे नवीन आहोत,काम समजून घेतल्या शिवाय स्टाफला काही बोलायचं नाही. त्यांनाही वाटू दे साहेब आपल्याच जातकुळीतला आहे, नाहीतर काही माहिती मिळणं अवघड. सहा महिन्यात हळू हळू रुळालो, पोलीस स्टेशनचे प्रताप लक्षात आले. कधी कधी ACP तर कधीकधी DCP पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी येत.थोडा वेळ थांबत आणि निघून जात. मी अद्याप तयारीचा नाही असं माझे वरिष्ठ ACP च्या कानावर घालत. मी ठरवलं आता खूप झाले माझा इंगा दाखवावाच लागेल.
झटका दिल्याशिवाय यांना कळणार नाही. एक दिवशी स्टेशन डायरीत नोंद करून गुरुदेव हॉटेलवर निघालो,सोबत अस्लम शिपाई होता.त्याने विचारले, “साहेब कुठे जायच?” मी म्हणालो “चल मग सांगतो.” तो पाठी बसला, मोटरसायकल निघाली तस मी म्हणालो “गुरुदेवला जाऊ.”, “सर, साहेब नसतांना? त्यांना आवडणार नाही.”, “बर ते नंतर पाहू साहेबांना काय सांगायच ते मी पाहीन.” मी तेथे पोचलो मला पाहून शेट्टी पुढे आला “साहेब या, आज अचानक कसं काय? काय घेणार? कॉफी सांगू?”
“मिस्टर.शेट्टी ,मी कॉफी घेण्यासाठी नाही आलो. तुमचं हॉटेल पाहायला आलो. पाहू ना?” मी AC रूमच्या दिशेने निघालो तस तो अस्वस्थ दिसला.”साहेब तिथे कपल बसतात तुम्हाला पाहून घाबरतील म्हणून–” “Don’t worry I will take care.” अस म्हणत मी आत शिरलो. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली.AC रूम मध्ये दुसरा दरवाजा असल्याचे माझ्या लक्षात आले. मला पाहताच काही कपल धास्तावले तर काही शांत आपल्या सोबत्याशी बोलत एन्जॉय करत होते. मी AC रूमच्या आत असणाऱ्या दुसऱ्या दरवाजाला हात धरून उघडणार तोच आत पळापळ झाल्याचा मला आवाज आला. मी झटक्यात दार उघडले, आत अंधुक प्रकाश होता. मी रिव्हॉल्व्हर वर हात ठेवत म्हणालो, “आहात तसेच थांबा, कोणाला काही होणार नाही.आणि अस्लमकडे पहात म्हणालो light लावा. पाहतो तो पंधरा वीस पुरुष आणि चार पाच अर्ध कपड्यातील मुली उभ्या होत्या. दारू आणि सिगारेटचा धूर यांच्या वासाने तो हॉल भरून गेला होता. मी चार पाच फोटो काढले.दारा जवळ उभे राहून आमच्या हेडकॉन्स्टेबलला फोन केला. “कांबळे ,मी बोलतोय, गुरुदेवला या.”, तो पर्यंत मी त्या मुलींची जबानी घेतली.दहा मिनिटात कांबळे हजर सोबत आमचे सिनिअर इन्स्पेक्टर साहेब होते.
मला पाहताच हसत म्हणाले,”Well done, Mr.Wagle,I like your daring.” मी हसलो,”सर पंचनामा करूया ना?”
“करू की, आता कांबळे आहेत, He will take care,don’t worry.” मला कळेना हा काय प्रकार आहे,मी त्यांच्या मागोमाग चालू लागलो. “वागळे ,अहो शेट्टी आपल्या पाटील साहेबांचे दोस्त आहेत,पाटील साहेबांना ओळखतां ना! आपले MLA त्यांच्या कृपेने इथे पाच वर्षे आहे नाही तर दोन वर्षे इथे कोणी टिकत नाही.” “सर, इथे काय चालते आपण पाहिले ना?म्हणजे—-“
“Wagle, I already know it,अहो तुम्ही अजून नवे आहात अजून पोस्टिंग व्हायची आहे तुमची,आत्ता पासून एवढं अँग्रेसीव्ह होऊन नाही चालणार, शेवटी माझं आणि DCP च Recommendation लागणार. अजून फक्त सहा महिने आहेत,तुम्हाला पोस्टिंग मिळाली की काय करायचं ते करा.” माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली पण त्यांचं खर होत, एक वर्षांनी मला त्यांच recommendation लागणार होत.
हॉटेल बाहेर पडतांना साहेबांनी माझ्या हाती एक पाकीट ठेवलं,”वागळे हे ठेवा,आणि काय घडलं ते इथंच विसरा.”
“सर,हे मला नको,या साठी मी इथे—” माझं वाक्य तोडत ते म्हणाले “I know it,you are honest to your duty. मित्रा अस वागून तू स्वत:च्या पायावर दगड मारून घेत आहेस हे लक्षात घे,खात्यात येण्यापूर्वी विचार करायला हवा होतास.
It’s too late now.” मला बोलायची संधी न देता ते निघून गेले. मी हातातलं पाकीट कुणी मला पहात नाही पाहून खिशात घातलं,इथंच मी फसलो होतो, माझं लक्ष साहेबांकडे असताना कांबळे माझ्या मागावर होता हे मला कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी senior नी मला बोलावलं तेव्हा मी ते पाकीट त्यांच्या समोर ठेवलं.”सर,प्लीज, मला हे खरंच नको,तुम्ही म्हणाल तसेच मी वागेन पण—-” “मिस्टर वागळे, पण ला काही अर्थ नसतो,तुम्ही पाकीट घेत असतानाचा फोटो,खर तर व्हिडिओ माझ्याकडे आहे.तेव्हा ते पाकीट तुमच्याकडे ठेवा आणि मला सहकार्य करा. सर हे पाकीट तुम्ही मला देत होतात आणि आता फोटो काढून तुम्हीच उलट सांगितले तर कोणाला तरी पटायला हवं ना?तुमचा हात वर आणि माझा हात खाली- – -“
माझ म्हणणं ऐकताच शिंदे साहेब थोडे चाचरले,तरीही माझ्यावर कुरघोडी करत म्हणाले, “मला ठाऊक होत तुम्ही ओव्हर स्मार्ट आहात, म्हणूनच मी शेट्टीची, तुम्ही पैसे मागत होता अशी जबानी घेऊन ठेवली आहे. शेट्टी माझा माणूस आहे.Is that clear to you?”
मी स्वतःला स्मार्ट समजत होतो पण त्यांनी माझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले होते. मी एक पाऊल मागे घ्यायचं ठरवलं,आता ती वेळ नाही हे माझ्या लक्षात आले. “तुम्हाला माझ्याकडून काय हवं?” “तुमचं सहकार्य, ते जेवढ्या लवकर मिळेल,तुमच इथल वजन लवकर वाढेल.” त्या क्षणी माझ्या पूढे अन्य उपाय नव्हता, मी मैत्रीचा हात पूढे केला. That’s like a good friend. Believe me, you will earn That you have never ever imagined.”
त्या नंतर पुढील सहा महिने कांबळे बरोबर मी शहराचा काना कोपरा पाहिला आणि विश्वास संपादन करत राहिलो.कांबळेने माझा बकरा केला होता, हा कांबळे, विष रक्तात भिनते तसा भिनला होता मी तसाही त्याला माफ करणार नव्हतो. कांबळेच्या आशीर्वादाने माझ्याकडे किती माया जमली ते मलाही माहीत नव्हतं.त्या पैशांना मी एकदाही हात लावला नव्हता, अर्थात या सांगण्याला काही अर्थ नव्हता. कुण्या पोरा टोरानेही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता.
एकतीस डिसेंबर म्हणजे पब,डिस्को थेक, नाईट क्लब, यांच्यासाठी पर्वणी. या दिवशी गस्त आणि बंदोबस्त यांच काम मोठं.आमचे साहेब जातीने ऑफिसमध्ये हजर होते, मला जनरल होती. संध्याकाळी मी घरी जायला निघालो तर साहेब म्हणाले “वागळे,आज रात्री बाहेर जाऊ, एका मित्राने बोलावलं आहे . याल ना?” “सर, उद्या माझी जनरल आहे आणि आज रात्री उशिरापर्यंत मला नाही जमणार आपण जा,पुन्हा कधीतरी, आज नको.” “अरे,तुम्ही एकदम यंग आहात,उद्या इथे काय काम असणार? इथे करा की आराम.” मी हात जोडत नकार दिला आणि घरची वाट धरली? गेल्या सातआठ महिन्यात माझ्या आक्केशी माझ बोलण कमी झाल होत. पहिले दोन महिने दर दिवसाआड तिचा कॉल येई आणि तासभर ती उलट तपासणी करत राही. अस करू नको, तस बोलू नको, रात्री एकटा फिरू नको , कुणाशी वाईटपणा घेऊ नको. तिला उत्तरे देतांना खोटं बोलत असल्याने अपराधी पणाची भावना मनाला अस्वस्थ करून टाके.
हळूहळू आक्केला मी टाळू लागलो, माझ्या खोट बोलण्याची चिड येत होती. फोन करायचा झाला की मनाची घुसमट होत होती. जीने जीव लावला तिच्याशी खोट बोलताना मन कळवळत होतं. दोन दिवसांऐवजी चार आठ दिवसांनी मीच फोन करू खुशाली घेत होतो. आठवड्याचा फोन महिन्यावर आला. कधीतरी आक्का अचानक हजेरी लावणार आणि इतके सारे पैसे कुठून आले याचा हिशोब घेणार याची मनात भीती वाटत होतीच.
त्या रात्री मी जमा झालेल्या नोटांची व्यवस्था लावायची ठरवली. जर मनात आणले तर शिंदे साहेबही त्यांच्या मार्गातील काटा दूर करायला मागे पुढे पाहणार नव्हते. गंमत म्हणून मोबाईलच्या प्रकाशात सर्व नोटा मोजल्या, हरामीचे, साडे सहा लाख रुपये जमले होते. मला पगार होता पस्तीस हजार मात्र. मी ते एका पिशवीत भरले आणि ती पिशवी प्लास्टिकमध्ये गुंडाळून कुठेतरी गाडावी असा विचार करत होतो.पण कुठे हा प्रश्न सुटत नव्हता. कुठे खुट झाल तरी अंगावर काटा यायचा.माझ्या रहायच्या इमारती आधी एक झेड.पी ची शाळा होती.
शाळेमागे बरीच झाडे होती.मी तिथेच ती पिशवी पूरली आणि घरी येऊन झोपलो. डोळे टक्क उघडे ठेऊन पडलो होतो.घाबरट मन दमल तेव्हा कधीतरी झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा बराच उशीर झाला होता.कसेबसे आवरून मी मोटारसायकल रस्त्यावर आणली. पोलीस ठाण्यात पोचलो. अस्लम तंबाखू चोळत होता,मला पाहून हसला, “साहेब रात्री गेलता का पार्टीला?” “नाही रे बाबा,आपले मोठे साहेब आग्रह करत होते,मी नाही म्हणालो, सकाळी ड्युटीवर यायच होत ना!,बरं सगळ ठिक आहे ना? काही गडबड कोणाची हाणामारी?” मी अस्लमला विचारले. “साहेब, सगळ एकदम शांत,कोणी काय लफड केल तर आज येतील, रात्री कशाला येतील लॉक अप मध्ये पडायला.” अस्लम हसतच म्हणाला. “बर अस्लम आपल्याला मस्त चहा सांग,हे घे पैसे.”मी पन्नासची नोट काढून त्याला देत होतो.
तो हसला,”साहेब,अहो आणतो की चहा, एकदम स्पेशल,पैसे ठेवा आपली पण काही वट आहे की नाही.” “अस्लम,अरे सकाळीच? त्यांची बोहनी होऊ दे की.”,मी त्याच्या हाती नोट दिली.तो जाताच मी स्टेशन डायरी चाळली, रात्री बाराची वेळ नोंद करून सर गस्तीला गेले होते. अस्लम आणि त्याच्या पाठोपाठ चहावाला पोऱ्या आला.”साहेब स्पेशल चहा आहे,बघा एक घोटात तब्बेत खुश होईल.” पोरगा म्हणाला.मी त्याला जवळ बोलावले,”ए पोऱ्या काय नाव तुझं?” “सर,विजय चहावाला.”पोरगा ठसक्यात म्हणाला. “काय? चहावाला?, अरे आडनाव काय?”मी विचारलं. “साहेब’ याच नावाने मला बोलावतात, मला काय म्हैत आडनाव, बापूला विचारून सांगेन.” ते पोरग म्हणाल. थोड्या वेळाने ग्लास घेऊन तो निघून गेला.
मी ऑफिसमध्ये मस्टर चाळत होतो, मस्टरमध्ये सोळा स्टाफ नोंदवला होता पण ठराविक दिवस सोडले तर सर्व स्टाफ कधीच हजर नसे. मी अस्लमला जवळ बोलावून विचारलं, “अस्लम,आपला पूर्ण स्टाफ हजर कधी असतो?” साहेब सर्व स्टाफ हजर असतो की, कधी कधी मोठ्या साहेबांच्या घरी हजेरी लावावी लागते. एक बाईसाहेबांच्या गाडीवर असतो आणि एक बाहेरच्या कामावर असतो.” “कसलं बाहेरच काम?कोण सांगतो?” मी थोडस मोठ्या आवाजात विचारलं. “मोठे साहेब पाठवतात कधी बिटवर,कधी कमिशनरच्या घरी,कधी हेड ऑफिस.त्यांना कोण विचारणार?” “मग सह्या कधी करतात? की एकदम महिन्याच्या!” तो हसला,”साहेब या भानगडीत आपल्याला नका ओढू. आम्ही हुकमाचे ताबेदार, जास्त डोकं वापरायचं नाही, धु म्हटलं की धुवायचे लोंबते काय? विचारायचं नाही.” तो हसला.थोड्या वेळाने तो बाहेर जाऊन बसला.
बाहेर गलका ऐकू आला म्हणून मी उठून बाहेर आलो, दोन गट जोरजोरात भांडत होते.एका माणसाचं डोकं फुटलं होत, त्याच्यावर ओढणी बांधली होती आणि तो जोरजोराने कण्हत होता. त्याची आई जोरजोराने रडत होती. मी ओरडलो, “शांत राहायच काय घ्याल, अस्लम ज्याची तक्रार असेल त्याला आत घे. ए भवाने आता बसते का शांत, का आत टाकू? ” नाईलाजाने मी ओरडलो. त्यांचा गोंधळ कमी होण्याऐवजी वाढला. अस्लम, ज्याच डोक फुटल होत त्याच्या आईला घेऊन आला, “साहेब यांच्या पोराच डोक फोडल समोरच्या पार्टीने. ए बाई,काय झाल ते सायबाला नीट सांग,रडणं थांबव .” मी बाईकडे पाहिल,पंचावन्न साठच्या दरम्यान वय असाव, शरीर अगदी बेतास बात, कपाळावर कुंकू नाही. अंगावर साडीही जु़नी पुराणी, नियतीने चांगलच झोडपले असावे. “हं, बोला बाई काय तक्रार आहे?”
बाई घडा घडा बोलायला लागली,”साहेब माझ्या पोराच,या परशूच शेजारच्या मारुतीन डोस्क फोडलं,तांब्याभर रगत गेल,तुमीच न्याय करा.” मी तिच्या मुलाकडे पाहिलं, एकदम छपरी दिसत होता. याने काही तरी नक्कीच केल असाव असा संशय माझ्या मनात बळावला.”काय रे परशा,काय केलस? खरं बोल उगाच कुणी कुणाच डोक फोडतं का?
या परशूच्या विरोधात ज्याची तक्रार असेल त्यांनी पुढे या.” मी अस म्हणालो मात्र ,जो तो दुसऱ्याला पुढे लोटत होता.थोडया वेळाने एक मुलगी पुढे आली,म्हणाली, साहेब, मी सौदामिनी, काल रात्री आमच्या शेजाऱ्यांनी डिसेंबर थर्टी फस्ट चा डिजे लावला होता. आमी मुली, मुली एका बाजूला नाचत होतो. त्यात चाळीतील सर्व नाचत होते. थोड्या वेळाने हा परशुराम तिथे आला आणि आम्ही मुली नाचत होतो त्या घोळक्यात शिरुन अश्लील हावभाव करत नाचू लागला.आम्ही दोन वेळा त्याला समजावल पण तो ऐकेना. तेव्हा आमच्या शेजारचा मारुती आणि माझा लहान भाऊ विनोद यांनी त्याला ओढून बाहेर नेल.साहेब, परशुराम माझ्याकडे कस रागाने बघतोय पहा,त्याला सांगा काहीतरी.”
मी अस्लमला, परशुरामला दूर उभ करायला सांगीतल.तस परशुराम तिच्याकडे रागाने पहात बाहेर निघून गेला. मी बेल वाजवून ड्युटीवर असलेल्या हवालदार वझेना बोलवून घेतल आणि ह्या माणसाला बाजूला बसवून लक्ष देण्याची सूचना केली.
“हं बाई,बोला पूढे काय झाल?” माझा होकार मिळताच ती सांगू लागली. “हा परशुराम त्या दोघांना झटका देऊन पून्हा आमच्या दिशेने आला आणि नाचू लागला. मी रागाने त्याला ढकलले तसा माझा हात त्याने धरला आणि मला ओढू लागला. तो भरपूर दारू प्यायला असावा म्हणून मी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला तर त्याने मला जवळ ओढून अश्लील हावभाव केले, चिडून माझ्या भावाने त्याला ढकलून दिले तेव्हा तो खाली पडला आणि त्याच डोक फुटले आम्ही कोणीही मारले नाही. एकदम खर सांगते साहेब .उलट त्यानंतर त्याच्या बायकोने येऊन माझे केस ओढले आणि मारले.”तिने आपल्या पाठीवरचे वळ दाखवण्यासठी ओढणी दूर केली. तीच शरीर त्या पंजाबी ड्रेस मधून दिसत होतं. मी तिला रागावलो, “बाई आधी ड्रेस सारखा करा दुसऱ्या मॅडम येतील त्यांना दाखवा, ती ओढणी सारखी करा.” तिने लाजण्याची नक्कल केली.
एकंदरीत घटना ऐकल्यावर ही केस मोलास्टेशनची असल्याबद्दल माझी खात्री पटली,या परशुराम वर ipc ,section 80/377/ 509/510 अर्तंगत कारवाई होऊ शकली असती.मी त्याच्या आईला समजावले, “हे पहा बाई, तुमच्या मुलाने ह्या मुलीचा हात धरला,तिच्याशी अश्लील चाळा केला,बाई माणसाची छेड काढण गंभीर गुन्हा आहे.त्याला सहा महिन्याची सजा होऊ शकते.तेव्हा तुम्ही मुलाला समजावा.” ती बाई माझ्याकडे पहात विचित्र आवाजात ओरडली, “भाऊ बरा न्याय हाये, त्यांना शिक्षा करण्याऐवजी तुम्ही आमालाच फायरिंग करता.”
तिची समजूत काढावी म्हणून मी त्या मुलीचा भाऊ आणि मारूती यांना आत बोलवले. ते अगोदरच घाबरले होते. विनोद हात जोडत म्हणाला, “साहेब आम्ही खरच काहीच नाही केल,हा परशुराम माझ्या बहिणीशी वाईट वागत होता. दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला तर उलट त्यानेच माझ्यावर हात टाकला तेव्हा माझा मित्र मदतीला आला.आम्ही बचावासाठी त्याला लोटला तेव्हा तो डोक्यावर पडला.” मारुती माझ्याकडे पहात मान डोलवत म्हणाला, “होय साहेब विनोद सांगतो तसच झाल.त्याला समजावून सांगितलं तर त्याने मला आई बहिणीवरून शिव्या दिल्या. हात उचलला. खुप दारू प्यायली होती.
लोटला तर पडला.” मी त्यांच्यावर नजर रोखून म्हणालो, “तुम्हीपण दारू पिली होती ना?” तस विनोद म्हणाला,” साहेब आम्ही दारू पिणारे वाटतो का? बहिणीची छेड काढल्यावर कोण गप्प बसेल.”
मी परशुरामच्या आईला समजावले, “हे पहा बाई तुमच्या मुलाला यांनी मारल नाही, तर दारू जास्त झाली आणि त्यानीच झटापट केली म्हणून तो पडला, तेव्हा शहाण्या असाल तर मुलाला घेऊन डॉक्टरकडे जा आणि पट्टी बांधून घ्या.” ती बाई वस्ताद होती, “ओ साहेब असा कसा न्याय? त्या पोरानी माझ्या परशाच डोस्क फोडल तरी त्यांना तुमी काय म्हणत नाही वरून मलाच शिकविताय पोराला डॉक्टरकडे न्या म्हनून.”
मी तिची असभ्य भाषा ऐकून वैतागलो, “त्या बाईंना म्हणालो, द्या तुमची लेखी तक्रार. “आणि त्या मुलीला म्हणालो,”ये मुली तुझी तक्रार काय आहे ती दे.” मी ओरडत म्हणालो, “वझे, वझे इकडे या, या दोघांची तक्रार लिहून घ्या आणि त्या परशुरामाला बाईच्या अंगाशी छेडछाड केल्याबद्दल आत टाका. या मुलीच्या भावाला आणि त्याच्या त्या मारुतीला आत टाका. राहूदे आजची रात्र चौकीत, उद्या सकाळी साहेब आले की ठरवू काय करायच ते.”
वझे त्याला धरून आणत होते तर ते पोरग हात जोडत म्हणाल, “साहेब एकदा माफी करा, पुन्हा नाही कोणाची तक्रार येणार, जाऊद्या साहेब आम्ही आपसात मिटवतो.एका एरियात राहतो, नाही भांडणार.” वझेने माझ्याकडे पाहिले,मी मानेनेच इशारा केला तस वझे त्याला समजावत म्हणाला,”हे बघ पुन्हा तुझी तक्रार आली तर तीन महिने आत टाकीन जा त्या मुलीची माफी माग, पुन्हा इकडे कम्प्लेट घेऊन यायचं नाय,काय!,” “सॉरी साहेब,आम्ही आपसात मांडवली करतो, विनोद यार,तुझ्या बहिणीची माफी मागतो,आपण एक एरियात राहतो झगडा कशाला? तुम्ही माझं डोकं फोडल मी काय बोललो का. झगडा कशाला? सॉरी बोलतो ना, साहेब एकदा माफी द्या .”मी त्या मुलीला सौदामिनीला बोलावलं, “हे बघ मुली,एकतीस डिसेंबर म्हणून आपण रस्त्यावर नाचलो तर असच होणार,तुम्हाला घर आहे ना, मग? पुन्हा तक्रार आली तर भाऊ लटकणार,मग पुढे शिकायला मिळणार नाही,गुन्हा दाखल झाला की कॉलेज प्रवेश देत नाही,समजाव भावाला.” “साहेब खरंच सांगते आमची काहीच चूक नव्हती,याला घाबरून आम्ही घरात बसून रहायचं का? मग तर कामावरही जायला नको.”,ती स्वतःची बाजू मांडत होती. मला तिच्या वादात काही इंटरेस्ट नव्हता.”हे पहा मिस. सौंदानमिनी तुम्हाला जस वागायचे तस वागा फक्त इथे येऊन आमचा वेळ खराब करू नका आणि आता जाऊ शकता.”
दिवसभर, हाणामाऱ्या, मुलींची छेडछाड, चोरी,कुटुंब छळ, आत्महत्या, सुनेचा छळ आशा अनेक केसेस येत आणि दिवसाचे आठ तास ही कमी पडत.सतत या व्यक्तींच्या कथा,व्यथा ऐकून जीव भंडावून जाई. मी येता जाता ज्या ठिकाणी पैसे गाडले होते तिथ नजर टाकत असे.अजून तरी तिथे कोणी पोचले नव्हते. लवकरच या पैश्याचीं सोय लावली पाहिजे हा विचार मनात आला. बरेच दिवसात मी घरी गेलो नव्हतो. सिनियर ची अनुमती घेतल्या शिवाय जाणे शक्य नव्हतं आणि सांगून निघालो तर न जाणो कोणत्या आरोपात अडकवून अडचणीत आणेल याची मनात भीती होती.मन चित्तीं ते वैरी न चिंती हेच खरं. मी आक्काला बाहेरील फोन वरुन समजावून सांगितले, बाबा आजारी आहेत असा अर्जंट फोन केला तर मी निर्धोक निघू शकलो असतो.
आक्काला माझा प्लॅन नीट समजला नसता तर गडबड होण्याची शक्यता जास्त होती. मी त्याच दिवशी माझे पुरून ठेवलेले पैसे घेऊन आलो पण घरी न आणता कचऱ्याच्या डब्यात ठेवले. आक्काने मी ड्युटीवर असतांना सांगितल्या प्रमाणे फोन केला आणि बाबा सिरीयस असल्याची खोटी बातमी सांगितली तेव्हा हेडकॉन्स्टेब कांबळे हजर होते. मी दुःखी चेहरा करत, घरी तातडीने गेले पाहिजे, सांगितले आणि स्टेशन डायरीत तशी नोंद केली.सिनियर ना मोबाईलवर कळवले. आणि तातडीने घर गाठले.पहिले कचऱ्याच्या डब्यावर लक्ष गेले. नशिबाने डबा झाकलेला असल्याने कुत्र्यांनी समाचार घेतला नव्हता. मी कचरा टाकण्याचा दिखावा करत पैश्याचे गाठोडे उचलले. मी दुपारीच तयारी केली होती. मुंबई साठी गाडीची वेळही पाहून घेतली होती.
दहा पंधरा मिनिटात माझ्या शेजारी राहणाऱ्या गोरेंना, माझ्या बाबांना बरे नसल्याचा निरोप ठेवून मी निघालो. त्या मुळे सिनियर आले तरी शेजारी तेच सांगतील याची खात्री होती. मी ट्रेन पकडायला स्टेशनवर असतांना सिनियर चा फोन आला.फोन पाहूनच मी घाबरलो पण मनावर ताबा ठेवत फोन घेतला.त्यांनी काही मदत हवी का? स्टेशन मास्तरना माझे नाव सांगा तिकीट झटपट मिळेल. येण्याची घाई करू नका अशा सूचना दिल्या.मी आभार मानले. मनावरचा ताण कमी झाला.त्यांनी सांगितल्या प्रमाणे स्टेशन मास्तरांची भेट घेऊन वडील आजारी असून घरी मुंबईला जातो असे सांगितले. त्यांनी चहा पाजला,शिपाई बोलवून reserve बोगीत सोय केली. माझ्या मनावरचा ताण कमी झाला. मोठी रक्कम ती ही रोख असल्याने आणि मलाच चोरांनी हात दाखवू नये म्हणून मी बॅग उशाला घेतली आणि झोपी गेलो.
गेल्या सहा सात महिन्यातील बऱ्याच घटना माझा पाठलाग करत होत्या. दारूच्या गुत्त्यावर टाकलेली रेड आणि मालका एवजी उगाचच नोकारची अटक, बोगस गिऱ्हाईक पाठवून अंटीच्या कुंटण खान्यावर टाकलेला छापा, कॉलेजमध्ये ड्रग एजंटची केलेली धर पकड,गुटखा माफियाच्या गोदामात रात्री टाकलेला छापा,गावठी दारूच्या अड्डयांवर धाड अशा कितीतरी घटना आठवल्या. या वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात शिक्षा झाली ती पोटासाठी मजूर म्हणून राबणाऱ्या गरिबाला. त्यांचा मालक हाती लागूनही सही सलामत राहिला.जे घडलं ते फक्त नाट्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यापूरते.
पोलीस स्टेशनला प्रत्येक रेड वेळी किमान लाख, दोन लाख प्राप्ती झाली.अर्थात यात वर पासून खाल पर्यंत सगळेच सामील.सगळे गुन्हेगारच. फक्त त्यांच्या अंगावर शासनाची कवच कुंडल असल्याने ते सहज हाती येणे शक्य नाही. पकडला जातो तो सामान्य,पोटाची खळगी भरण्यासाठी आदेश पाळणारा.
मी स्वतःला वेगळ कस समजू. मी न मागता आणि इच्छा नसताना या हप्त्यात वाटेकरी होतो हे नाकारून कस चालेल.
क्रमशः
Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how can we communicate
I just wanted to express my gratitude for the valuable insights you provide through your blog. Your expertise shines through in every word, and I’m grateful for the opportunity to learn from you.
Fantastic site Lots of helpful information here I am sending it to some friends ans additionally sharing in delicious And of course thanks for your effort
[…] १, भाग २ व भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक […]