अधिकार भाग 4

अधिकार भाग 4

भाग १, भाग २भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईला पोचलो तो वेगळ्या मूड मध्ये बऱ्याच दिवसांनी आईच्या हातच जेवण मिळणार होतं, बाबांशी मोकळ्या गप्पा मारायला मिळणार होत्या आणि मित्रांना भेटता येणार होत,पण सर्वात प्रथम मला बाबांना घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेतल्याचे पत्र लागणार होता. गरज नसताना ते आजारी आहेत असं सांगून त्यांच्या टेस्ट करून घ्याव्या लागणार होत्या. ते माझ्या प्लांनिंगच्या पायरीचा भाग होता.घरी आल्यावर मी फ्रेश होऊन मस्त झोपलो. संध्याकाळी चार वाजता आईने मला उठवलं तेव्हा ती थरथरत होती. मी तिचा हात धरला आणि तिला शांत करत म्हणालो. “काय ग अशी घाबरलीस कशाने,काय झालं?”

ती म्हणाली, “तुझे कपडे आवरून ठेवावे म्हणून तुझी बॅग पहिली.” तिने पुढचे काही सांगण्याची गरजच नव्हती,एवढे एकत्र पैसे तिने आयुष्यात पाहिले नसावेत, बाबांचा पगार गरज भागेल इतका होता पण उभ्या आयुष्यात एवढ्या नोटा तिने कोणाकडे पहिल्या नव्हत्या साहजिकच मी वाईट काम करूनच पैसे आणले असावे अस तिला वाटलं तर नवल नव्हते.

बाबा माझ्याकडे येत क्रुद्ध चेहरा करून म्हणाले, “तरीच असा अचानक न सांगता आलास, कुठे डाका टाकला सांग? एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? “हे पापाचे पैसे या घरात नको.काय बोलावे ते मला सुचत नव्हते. मी हाताने खुणावत त्यांना शांत राहण्याची खूण केली आणि म्हणालो. “विश्वास ठेवा मी कोणाची चोरी केली नाही की कुठे डाका टाकला नाही.” “मग हे एवढे पैसे आले कुठून आणि कसे?” बाबांनी माझ्या डोळ्यात रोखून पहात विचारले “बाबा, जे मी सांगतो ते ईश्वरा शपथ सत्य आहे. ना मी पैसे चोरले,ना कोणता गुन्हा केला.मी कोणाला काही सांगू नये, माझे तोंड गप्प ठेवावे म्हणून ही लाच आहे ती ही कोणा व्यक्तीने दिली नाही तर आमच्या खात्यातील भ्रष्ट लोकांनी दिलेली आहे. या पैशांना आज पर्यंत मी कधीही हात लावला नव्हता पण हे पैसे मी तिथे सोडून येऊ शकत नव्हतो,ना कुणाकडे किंवा बँकांमध्ये ठेवू शकत होतो.आई यातला एक शब्दही खोटा किंवा चुकीचा नाही.”

माझ्या स्पष्टीकरणाने त्यांचे समाधान झालेले दिसले नाही, “जर ह्या रकमेला तुला हात लावायचाच नव्हता तर ही रक्कम तिथेच कुणाला वाटून का टाकली नाही?” बाबा माझ्या समोर ताठ उभे राहून म्हणाले. “बाबा,तिथे वाटून टाकले असते तर आमच्या अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आले असते आणि त्यांनी मी त्यांच्या या भ्रष्टाचाराला विरोध करतो असे मानून माझ्या विरुद्ध कट कारस्थान आखले असते. हे पैसे इथे एखाद्या अनाथ आश्रमाला, एखाद्या शैक्षणिक संस्थेला तुमच्या वडिलांच्या नावाने दान देऊ. या पैशांचा मोह मला अजिबात नाही, तस नसते तर तुमच्या समोर असे पैसे आणण्याचे मी धाडस केले असते का? मला का आईचा स्वाभिमानी स्वभाव माहीत नाही. तुमचा मुलगा अस वागेलच कसा? हाच का तुमचा विश्वास!”

माझं म्हणणं बहुदा त्यांना पटलं असावं, ते आई कडे पहात म्हणाले. “ते पैसे तसेच पलंगाखाली ठेव आणि उद्या याला कोणाला द्यायचे असतील त्याला देऊन टाकायला सांग हे विष या घरात नको.” विषय संपला तस ते शांत झाले. “बरं, आता सांग तुझं कसं चाललंय,म्हणजे असा अचानक का म्हणून आलास?” “बाबा,मी समजत होतो त्या पेक्षा आमच्या खात्यात घाण आहे,भ्रष्टाचार, अवैध धंदे यावर अंकुश ठेवण हे पोलीस खात्याचे काम, पण पोलीस या गोष्टींचा वापर पैसे कमावण्यासाठी करत आहेत, तुमचा व्यवसाय कोणताही असो,पोलीस त्यामध्ये हप्ता वसूल करण्यास संधी शोधत असतात, जे नियमांना बगल देऊन वैध किंवा अवैध धंदा करतात ते स्वतः पोलिसांना हप्ता पोचता करतात पण जे नियमांचं काटेकोर पालन करतात त्यांच्याकडूनही पैसे वसूल करायला आमचे खाते कचरत नाही. एखाद्या व्यक्तीने गरीबीला कंटाळून आत्महत्या केली तरी हे लोक त्याच पोस्टमार्टेम होऊ नये म्हणून पैसे खातात. ते पाहताना खूप वाईट वाटतं. आमच्या पोलीस स्टेशनला पाहिले की एकही सहकारी स्वच्छ प्रतिमेचा नाही. उलट एक हॉटेलवर अनैतिक डान्स बारवर मी छापा टाकला तर त्यांनी माझ्या हाती नोटांचं पाकीट देऊन माझे गुपचूप फोटो काढले आणि आमच्याशी सहकार्य न केल्यास परिणाम योग्य होणार नाही असे कृतीने सांगितले.” “अरे,मग तुझ्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची, अस हातावर हात धरून कसं चालेल? कुठे गेला तुझा करारी बाणा?”बाबा माझ्यावर रागवत म्हणाले. “तुम्ही समजता तस आमचं पोलीस खात सरळ नाही, जिथे प्रत्येक झोन मधून महिन्याला किती पैसे आले पाहिजे हे आधीच तोंडी कळवलेल असत तिथे तुम्हाला तुमचं डोकं वापरून चालत नाही.” माझं बोलण बाबांना समजलं नसावं, ते विस्फारल्या डोळ्यांनी पहात म्हणाले,”तुला काय म्हणायचे आहे कोणी किती पैसे पाठवायचे हे आदेश वरिष्ठ कार्यालय तोंडी देत?”

“अर्थात, तुम्हाला पोस्टिंग दिली की तुमचा अधिकारी काही दिवसांनी तुम्हाला तुमच टार्गेट सांगतो, ते कसं पूर्ण करावं तो प्रश्न तुम्ही सोडवायचा, मला ते टार्गेट सांगितलं नाही कारण मी ट्रेनी आहे, म्हणूनच माझं तोंड बंद कस ठेवावं त्याचा त्यांनी मार्ग शोधला.मी या भानगडीत पडू नये असं मला कृतीने दाखवलं. म्हणून इच्छा नसून मला त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं अन्यथा ते माझे काढलेले फोटो वापरून मला बदनाम करू शकतात, माझं करिअर खराब करू शकतात.” माझे बोलणे ऐकून बाबा हादरले,”बापरे,हे सर्व भयानक आहे,अभय तू ही नोकरी सोडून दे आपण मीठ भाकरी खाऊ पण त्या वाघाच्या गुहेत राहून तडफड नको. माझं ऐक,तूला कुठेही कंपनीत नोकरी मिळेल.”

“बाबा, पोलीस खात्यात जाण्याचा निर्णय माझा होता. तिथे जाण्याचा मार्ग आहे, परतण्याचा मार्ग आपल्याला तयार करावा लागतो,तो कसा करायचा? ते टेकनिक तुमचे आहे. मला खात्री आहे मी लवकरच त्यात यशस्वी होईन पण तो पर्यंत काही झाले,अगदी माझ्या बाबत गैरसमज पसरावणाऱ्या चुकीच्या बातम्या आल्या तरी प्लिज माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे असणारे हे लाखो रुपये एखाद्या गरीब मुलांच्या शाळेला मदत देता येईल. नाहीतरी हे समाजाचे पैसे आहेत ते त्यांना या मार्गे परत देऊ.”

“अभय तू जे सांगतो आहेस त्या वरून तुझे आयुष्य किती खडतर आहे ते मी पहात आहे. माझी विनंती आहे,ही नोकरी सोडून दे, मीठ भाकरी खाऊ पण भीत भीत जगावं लागणार नाही. तुझ्या आईला हे आवडणार नाही. उद्या आधी या पैशाचा सोक्ष मोक्ष लाव हे विष या घरात मुळीच नको. तुला कळले असेल,आजवर स्वाभिमानाने जगलो,कोणी बोट दाखवलेलं मला चालणार नाही.”

अभयने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. “बाबा उद्या माझ्यासाठी डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या,छातीत दुखत होत, अस सांगा, म्हणाले तर सोनोग्राफी, एन्जोग्राफी करून घेऊ आणि आमच्या सिनियर चा फोन आला तर असंच सांगा, बाबा कळतंय ना,मी काय म्हणतो ते! “

“अभय, हे नाटक करण्या व्यतिरिक्त काही उपाय नाही का रे? साधं पडसे झाले तरी डॉक्टर कधी पहिला नाही आणि आता केवळ तुझ्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली तर सांगता यावं म्हणून..” बाबा या योजनेमुळे नाराज झाले पण अन्य उपाय नव्हता.

दुसऱ्या दिवशी वडिलांना डॉक्टर गोखले यांच्याकडे मी घेऊन गेलो,त्यांनी बाबांना तपासले, माझ्याकडे पहात म्हणाले, “मी.अभय Everything is normal, कोणतेच सिम्पटम नाहीत. कदाचित त्यांना ट्रेस आला असेल म्हणून छातीत धडधडले असेल. त्यांच्या मना विरुद्ध काही घडलं का?”
मी, चेहरा स्थिर ठेवत, तस काही नसल्याचे सांगितले.तस म्हणाले, “मी काही गोळ्या लिहून देतो, Let him take a sound sleep, he will be alright soon.” आम्ही हॉस्पिटल बाहेर पडलो तर बाबा गंभीर चेहरा करत म्हणाले, “पहा,आपण डॉक्टरांना फसवू शकलो नाही,तुझ्या खात्यातील लोकांना काय फसवणार? त्यांचा व्यवसायच मुळी समोरच्या माणसाचा,त्याच्या मनाचा वेध घेणे आहे.पहा हो उगाचच नसती बिलामत पाठी लागायला नको.” मी त्यांना शांत राहण्याची खूण करून सिनियरला फोन लावला, “हॅलो पवार साहेब, मी वागळे बोलतोय, आत्ताच वडिलांना डॉक्टरकडे नेवून आणलं डॉक्टर म्हणाले सिरीयस काही नाही, कदाचित वातावरण बदलाने झाले असेल, मी दोन तीन दिवसात परत येतो.” “काय म्हणता साहेब , घाई नाही, तुम्ही परवानगी दिलीत तर दोन दिवस वडिलांनसोबत थांबतो. बरं, फोन ठेऊ का?” “बरं, साहेब येतो लवकरच.” म्हणत मी मोबाइल ठेवला. “साहेब तू आहेस की तो.याच साठी IPS झालास का?” “अहो बाबा सध्या मी त्याच्या हाताखाली प्रशिक्षण घेत आहे, मला वाटो न वाटो मान द्यावाच लागणार, एकदा ट्रेनिंग पूर्ण होऊन पोस्टिंग मिळुदे मग पाहाल तुम्ही.” “ठीक आहे,मला काय कळतंय तुझ्या खत्यातलं पण आम्ही दुनियेला सांगत फिरतो माझा मुलगा IPS आहे म्हणून. उद्या त्यांनी तुला कुणा समोर मान डोलवताना पाहिले तर आमचं काय राहिलं?” दुपारी आक्का, दाजी आणि मुलं तेजस आणि श्रावणी भेटायला आली.
मुलं माझ्या जवळ बसून पोलिसांच्या गमती जमती सांगायला सांगू लागली,कशी बशी वेळ मारून नेली. संध्याकाळी आक्का जायला निघाली तसे दहा हजार रुपये तिला दिले, म्हणालो, “मुलांना काही आणलं नाही त्यांना कपडे घे, खाऊ न्हे.”
ती म्हणाली “अरे,खाऊ खाऊ किती रुपयांचा हे एवढे कशाला? सगळे उधळू नको लग्नाला ठेव बर,सोन किती महाग आहे माहीत आहे का? तीस पस्तीस हजार लागतात दहा ग्रामला.”ती पैसे परत करत होती तर आई म्हणाली,” ठेव आक्के,उद्या लग्न झाल्यावर देईलच अस कुठे आहे. तुझा भाऊ साहेब आहे,त्याच्या प्रतिष्ठेला शोभायला नको.” दाजी बिचारे साधे,ते म्हणाले,”अभय तुझी आक्का बरोबर सांगते,लग्न झालं की पैसे किती आणि कसे संपतात ते कळत नाही ,एवढे देऊ नको तू कितीही दिलेस तरी थोडेच.”

मोठ्यांच्या चर्चेत मुलांना जास्त रस असतो आणि मुल गप्पांच्या ओघात जे चार चौघात सांगू नये अस पालकांना वाटत तेच सांगून मोकळ होतात, म्हणून आक्काने मुलांना खेळायला बाहेर पाठवले होते. ती निघण्यापूर्वी घडला प्रकार अभयने तिला सांगितला.
ते ऐकून ती त्याच्याकडे पहात म्हणाली “अरे कमालच झाली तुमची, आलेली लक्ष्मी का कोणी अशी लाथाडते ! तू नव्हता ना गेलास कोणाकडे हप्ते गोळा करायला?आणि तू स्वतः खर्च केले नाही. समजा तू ते दान केलेस तरी तुझे सहकारी ते खर मानतील का? तेव्हा माझ ऐक, तुझ्याकडे ते धन नको ना,मी ते सुरक्षित ठेवते तुला गरज असेल तेव्हा तुझे धन घेऊन जा नाही पेक्षा यांच्या बिझिनेसमध्ये टाकते जो फायदा होईल तो तुझा शिवाय मुद्दल आहेच उद्या हेच पैसे अडचणीत उपयोगी येतील.काय पटतय ना!”
तिच बोलण ऐकून बाबा रागावले,”आक्के कसल शिक्षण भावाला देते, उद्या तेच धन भूत बनून मानगुटीवर बसल तर तू सोडवायला येणार का?” “काय हो बाबा,मी साधा व्यवहार सांगते, कुणाचा गळा धरून हप्ता वसूल कर, कुणाला लुबाड असा चुकीचा सल्ला मी दिला का? पण पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही, हे तर खर ना ? जर या गोष्टी आपल्याला मान्य नाहीत तर त्या करता तुम्हाला वरीष्ठ अधिकाऱ्यांची मदत लागेल.तोच जर चोर असेल तर तक्रार कोणाकडे करणार? शिवाय डाव चुकला तर जो विरोध आणि मानहानी दोन्ही पत्करावी लागेल त्याचे काय? जो पर्यंत आपली मुळे खोल जात नाही तो पर्यंत झाडाने वादळ अंगावर घेऊ नये नाहीतर नष्ट होण्याची शक्यता जास्त, अभय पटतय ना?” आक्का म्हणत होती त्यातला शब्दन शब्द खरा होता. मी बाबांकडे पाहिलं, बहूदा तिच म्हणणं त्यांनाही पटल असाव.

“आक्के,हात जोडले तुझ्या पूढे,पण हे धाडस करून तू स्वतः संकटात पडू नको, दाजींना पटतय का बघ,उगाच नको ती जबाबदारी पेलायला जाशील आणि स्वतः संकटात सापडशील. दाजी तुमच काय म्हणण? ही काय म्हणते ते पटतय का?”
दाजी बायकोकडे पहात म्हणाले, “तुमची मुलगी नको तितकी हुशार, ती म्हणते ते खरच आहे,सापाच्या बिळात हात घालावा तरी पंचायती, सध्या अभयन जे चालल आहे त्यातून शिकून घ्याव. ही टर्म संपली आणि तिथून बाहेर पडल की पून्हा संधी मिळेलही मग पाठचे हिशेब चुकते करता येतील. राहता राहिलं पैशांच,मी ते पैसे हळू हळू धंद्यात गुंतवतो, थोडे बँक लोन घेतो म्हणजे जुळून येईल. ती जबाबदारी हिने घेतली तर करू काहीतरी पण या पुढे हे असे पैसे जमा करण चूकच, हरामाचे पैसे नको ना, मग वाटून टाक की गोर गरिबांना ते तुला अडचणीला मदत करतील,माहिती देतील. पैसे साठवले की चिंता आलीच, भणंग माणसाला चिंता असते का? तो झोपला की दुसऱ्या दिवशी त्याला कळत आपण जिवंत आहोत,खिशात पैसे असले तर सण नाही तर रोजचच मरण.”

दाजी फारस बोलत नसत, त्यामुळे दाजी सादा माणूस, आपला धंदा की आपण अस नेहमीच आम्हाला वाटायच पण दाजींच डोक फास्ट आहे हे तेव्हा कळल. आई बिचारी हे आमच संभाषण आणि आक्काचा सल्ला ऐकून थक्क झाली, ती आक्काला म्हणाली,”आक्के फारच शाहणी झालीस पण हे जमणार ना? नाही पेक्षा एखाद्या आश्रमाला दान द्या आणि मोकळे व्हा डोक्याला ताप कशाला करुन घ्यायचा?” “आई,आश्रम संचालकांनी विचारल, एवढ दान का देता? तर काय सांगणार? परिस्थिती नसताना एवढ दान दिल तर संशय येणार च ना!,
मी योग्य तेच करते तू नको काळजी करू.”

आक्का ती नोटांची पूडकी पिशवीत टाकून घेऊन गेली.दोन दिवस आराम करुन मी ड्युटी जॉईन केली. नेहमी प्रमाणे रुटीन सुरू झालं आक्काने सांगितले ते मी पाळले शक्य तो त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही. आणि त्यांनी स्वतः पैसे दिले तर नाही म्हणायचे नाही. का कुणास ठाऊक पण मी दर गुरुवारी साई बाबांच्या मंदिरात जाऊ लागलो तिथे बसणाऱ्या भिकाऱ्याना पैसे देऊ लागलो. हे पाप क्षालन होत की दाजींचा तोडगा होता त्या ईश्वराला माहीत पण माझे मन शांत झाले. कधी कधी मी जास्तीची फळे नेऊन शेजारच्या मुलांना देऊ लागलो त्यामुळे जी मुले आधी माझ्या वर्दीला घाबरत ती अंकल, अंकल म्हणून हाक मारू लागली.या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे माझे चाहते वाढले.एक वेगळा आत्मविश्वास माझ्या वागण्या बोलण्यात आला.

“अस्लम, जरा चहा सांग पाहू.एकदम कडक, काय?” माझी ऑर्डर ऐकली की तो मला म्हणू लागला, “साहेब,अब आपमें तब्दीली झाली,बरे वाटते, कांबळे म्हणतात वागळे साहेब चांगला माणूस आहे.मला ऑर्डर देऊन ठेवल्याय लक्ष दे साहेबाकडे उद्या आपल्याच जिल्ह्यात आला त लात घालेल कमरेत. मी बोललो तुम्हाला, किसीको मत बताना.” आता खरंच मस्त रिलॅक्स वाटत.

आक्काचा फोन आला तरी कधीही मागच्या विषयावर आम्ही बोलत नसू, मात्र एकंदर माझ्या बोलण्यावरून माझा जम बसल्याचे तिच्या लक्षात आले असावे. ती मला म्हणाली, “अभय बैलांची वाहिवाटी वाट बदलली किंवा एक बैल बदलला की दोघ वेग वेगळ्या दिशेने गाडी ओढणार मग गाडीच्या चाकांचा आवाज यायचाच, तू नको काळजी करू शेवटी दोन्ही बैलांना कळते आता परिस्तिती बदलणार नाही आपल्यात बदल केलेला बरा, कळतंय ना?” मी होकार भरला तिचा शब्द खरा ठरला पहिल्या पेक्षा मी comfort feel करत होतो. आक्काने माझी तुलना बैला बरोबर केली होती असो तीच कुठं चुकत होत, झापडं लावूनच मी जगत होतो आत्ता अंतर संपेल अस वाटून बैल घाण्याला फिरतो तस्सा.

पाहता पाहाता चार महिने कसेच निघून गेले. माझा शेवटचा महिना राहिला होता. एव्हाना आमचे सिनियर माझे चांगले मित्र बनले, त्यांनी एक दिवस हॉटेल मध्ये नेले.आम्ही हॉटेल मध्ये बसलो होतो, माझ्या समोर कांबळे कॉन्स्टेबल बसले होते. पवार साहेबांनी मोबाईल काढला मला म्हणाले, “वागळे तुम्हाला मी Surprise देणार आहे.” आणि त्यांनी दहा महिन्यापूर्वी कांबळेने माझ्या नकळत काढलेले फोटो शोधून काढले आणि माझ्या समक्ष device memory मधून माझे save केलेले फोटो डिलिट केले. कांबळेचा फोन माझ्याकडे देत म्हणाले ” सांगळे यांच्याही मोबाईल memory मध्ये असतील तुम्ही स्वतः डिलिट करा, ह्याच फोटोच्या जीवावर आम्ही तुम्हाला ब्लॅकमेल करत होतो, आज विषय संपला.” मी Thanks Sir म्हणालो. “वागळे तुम्ही क्लास वन ऑफीसर म्हणून डिपार्टमेंट मध्ये काम करणार, तुमच्या माझ्यात काही वाद नको तुम्हाला जो मनस्ताप भोगावा लागला त्या बद्दल माफी असावी.” दारू न पिता, पूर्ण शुद्धीत पवार माफी मागू शकतो? मी मलाच विचारले. पण पवार साहेब माझ्याकडे पहात हसले, “सोचो मत,I am not Drunk, What I say is by true Hart, तुम्ही अजून लहान आहात department मध्ये इतकं साधं राहून नाही जमत, क्या पता कब खेल खत्म हॊगा? आगे की सोच करनी पडती है। मला वाटत इस बातपे एक पेग बनता है, मला माहित आहे तुम्ही ड्रिंक घेत नाही पण इस खुशी मे बिअर प्यायला हरकत नाही,बिअर काय मुली सुद्धा घेतात.” मी काय बोलतो ते पाहण्यासाठी त्यांनी माझ्याकडे पाहिले,”Sir, Thanks for cooperation,I will certainly keep the fact in mind, but I can’t drink, today is Thursday, my fasting.” मी त्यांच्याशी हात मिळवला.
“तुम्ही काही घेणार नाही आणि आम्ही प्यायची म्हणजे Not justified, I will order Coffee.”ते हसत म्हणाले.
“NO Sir, no formalities,you may start ,I will take coffee.” मी अगदी आदर पूर्वक म्हणालो. “Wagle,are you sure, you are comfortable !” पवार पुन्हा मला विचारत होते. पवार मधला बदल मी पहात होतो.आता त्यांना दुखवण्यात आणि त्यांची नाराजी ओढवून घेण्यात अर्थ नव्हता. पवार मोठा हुशार होता आणि भविष्यात काहीही होऊ शकतं याची त्याला कल्पना होती, कांबळे पवारांचा चमचा होता, बहुदा त्या दोघांच्या मनावरचं दडपण उतरले असावे कारण दोघ मनसोक्त प्यायले मी कॉफी संपवून त्यांची मजा पहात होतो. खर तर माझ्याकडे मोबाइल होता आणि वर्दी असतांना कसे मौजमस्ती करतात ते टिपणे सहज शक्य होते पण तो विश्वासघात ठरला असता. ते उठण्याचे नाव घेईनात शेवटी मीच त्यांचं बिल भरलं आणि टॅक्सी करून त्यांना घरी पोचत केलं.

दुसऱ्या दिवशी माझी सेकंड शिप होती. मी पोलीस ठाण्यात पोचलो प्रवेश करणार तर कॉन्स्टेबल कांबळे वाटेत भेटले, मला सॅल्युट ठोकत म्हणाले साहेब तुमची आठवण काढत होते. मी मस्टर वर सही केली थंब केला आणि ऑफिसमध्ये शिरलो माझ्या समोरच्या खुर्चीत पवार बसले होते. मी त्यांना शेक हँड केलं तस हसले,”वागळे काल आमच्यामुळे तुम्हाला बराच त्रास झाला असावा.आमचं थोडं चुकलंच, please कोणाला काही बोलू नका .जरा जास्तीच झाली. आम्ही पण कधी तरीच घेतो पण —“
“NO issue sir, रात गयी बात गयी.”मी अगदी सहजच म्हटलं तस पवार हसले, “वागळे,तुम्ही माझी नक्कल तर करत नाहीत ना!” “No Sir, not at all,मी तुमची नक्कल का करू सहज तोंडात आलं ते म्हटलं. I do not mean to hurt you, Sorry if you feel so.” मी उगाच विषय भरकटू नये म्हणून बोललो.

“यार, सॉरी कशा बद्दल,बर काल तुम्ही हॉटेलच बिल भरलं, हे पैसे ठेवा.” त्यांनी दोन हजारच्या दोन नोटा काढून टेबलवर ठेवल्या.
“No thanks, मी जॉईन झाल्या पासून कुठे पार्टी दिली. अस समजा की मी पार्टी दिली. बरं सर निघू परवाच्या त्या मारामरीचा FIR अजून पडून आहे. त्यांना आज बोलावले आहे. ते आले असतील.” मी हात पुढे करत निरोप घेतला.त्यांनी मान हलवून संमती दिली. अखेर माझा ट्रेनिंग टेन्युर संपत आला मी खूश होतो मी राहात असलेल्या बिल्डिंगच्या मालकांचा व्यवहार पूर्ण केला. अस्लमच्या मदतीने आवश्यक तितके मागे सोडून उरलेल्या सामानाची बांध बांध केली. काही वस्तू अस्लमला दिल्या.तो त्याच्या घरी यावे म्हणून आग्रह करत होता. वर्षभर रोज गाठभेट होत होती. नाही म्हणता आले नाही. मोमीनपुरा इथे त्याच दाट वस्तीत घर होत. घरी आई वडील बायको आणि तीन मुली असा परिवार होता.त्याच्या परिवाराला कपडे न्हेले. त्याची बेगम म्हणाली ,”साहेब कॉफी रखती हु,लेनी पडेगी.” ठीक म्हणालो, कॉफी घेतली, त्याच्या अम्मीअब्बाना पाया पडलो. दुवा घेतला निघालो. मुलांच्या हाती खाऊला पैसे दिले. निघालो तर त्याचे म्हातारे अब्बा रस्त्यापर्यंत सोडायला आले. दिल्लगी और क्या होगी?

पाहता पाहता जुलै उजाडला माझा शेवटचा आठवडा, मी सर्व सहकारी मित्रांसाठी व्हेज, नॉनव्हेज पार्टी ठरवली.कमिशनर साहेबाना स्वतः निमंत्रण दिल. शहरातील एक दोन प्रतिष्ठित व्यक्ती आणि पत्रकार यांनाही बोलावलं. अगदी चहावाला पोरगा आणि हार फुले टाकणारा दुबे यांना बोलावले.चाळीस माणसंच जेवण झालं, ट्रॅफिक वाले पुष्पगुच्छ घेऊन आले. Bar आणि Hotel Owner association बुके आणि गिफ्ट घेऊन आले. मी सगळ्यांचे सहकार्या बद्दल आभार मानले. त्याच दिवशी मला relieving letter मिळाले.दुसऱ्या दिवशी अस्लम आणि कांबळे मला सोडायला ट्रेन वर आले. वर्षभरात थोड Furniture काही पुस्तके अस सामान जमा झाल होत. दोन दिवस आधी ते रोड ट्रान्सपोर्ट ला टाकलं होतं,तिसऱ्या दिवशी घरी डिलिव्हरी मिळणार होती. आता सोबत एक सुटकेस आणि दोन मोठ्या सॅक तेवढ्या होत्या. रेल्वे स्टेशन वर पोचलो,गाडीला वेळ होता.

गप्पा सुरु होत्या. गप्पांचा विषय पहिल्या रेडवर गेला तसा, कांबळेने मिठी मारून माझी माफी मागितली.”साहेब मी चुकलो मी तस करायला नको होतं’ केवळ मोठया साहेबांच्या प्रेशरखाली मी केलं.” मी त्याला थोपटत म्हणालो ,”तुम्ही वयाने,मानाने मोठे आहात,तुम्ही अस वागाल अस नव्हतं वाटलं असो, आपण सर्वच कठपुतळी आहोत नाचवणारा कोणी वेगळाच आहे, आज साहेब उद्या आणखी कुणी,काळजी घ्या.दिवस सारखे नसतात..”

गाडी सुटली, अस्लम किती तरी वेळ हात हलवत होता. माणस ओळखायला कधी कधी वेळ लागतो हेच खरं! घरी आई, मी येण्याची आतुरतेने वाट पहात होती.मी उबेरने घरी पोचलो तर खाली खेळत असलेली मुले माझं सामान घ्यायला आली. त्यांनी माझ्या सॅक घरी आणून ठेवल्या.वडिलांनी माझ्या हातून सुटकेस घेत घरात नेली. मागचा अनुभव होता म्हणून थोडीबहुत कॅश होती ती आईकडे नेऊन दिली.तिने ते पैसे पाहात विचारले आक्का जवळ दिले तसलेच नाहीत ना? मी हसलो, “काय आई? आपल्याच मुलावर कसला संशय घेते.ते माझे कष्टाचे आहेत. कपाटात ठेव.तुला घे.” दोन दिवस मस्त आराम केला.मित्रांसोबत खेळलो त्यांना पार्टी दिली. आक्काकडे जाऊन आलो. भावोजींचे हार्डवेअर दुकान पाहून आलो. दुकान चांगले चालले होते. त्यांच्या कामाच्या वेळेत थांबणे योग्य नव्हते. मी त्यांचा निरोप घेऊन निघालो. त्या संध्याकाळी कांबळे हेड कॉन्स्टेबल चा फोन आला, म्हणाला, “वागळे साहेब दोन दिवस झोपलो नाही, निघतांना तुम्ही म्हणालात दिवस सारखे नाहीत,काळजी घ्या. त्या वाक्याचा विचार केला की मनाला धास्ती वाटते. साहेब मी तुमचे पैसे घेतांनाचा फोटो घेऊन तुमच्या पाठीत वार केला. साहेब या क्षणापासून मी माझे पूर्वायुष्य सोडले, मला एकदाच माफी द्या. मी पुन्हा त्या वाटेला कधी ही जाणार नाही.” मी निश्वास सोडला, “कांबळे तुम्ही काढलेल्या फोटोमुळे गेले सहा महिने मी ही निश्चिंत झोपू शकलो नव्हतो, तेव्हा तुम्ही विचार केला होतात का?
पण मी तस कदापि करणार नाही, तस करायचे असते तर पंधरा दिवसांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये वर्दीत असतांना तुम्ही ओव्हर ड्रंक होतात तेव्हाच तुमचा विषय संपवला असता. कांबळे या पूढे निट वागा, उद्या तुमचीच मुल तुमच्याशी अशी वागली तर! ” माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच कांबळे ढसाढसा रडल्याचा आवाज येऊ लागला.
“कांबळे,शांत व्हा ,शांत व्हा ,काय झालं निट सांगा.” मी समजूत घालत होतो. “साहेब माझ्या मुलाला गांजाच व्यसन लागलयं,रोज आईकडे पैसे मागतो,नाही दिले तर तिला मारझोड करतो. काल माझ्यावर हात उचलला तर मी पट्ट्याने फोडून काढले.तरी पण तो एकच सांगत होता मला गांजाला पैसे द्या.”

ते ऐकून मी सुन्न झालो. चुकीच्या मार्गाने आलेले पैसा कसा हैदोस करू शकतात त्याच ते उदाहरण होतं. कांबळेच्या बाबतीत वेळ हातातून निघून गेली होती. नियतीने कांबळेवर डाव साधला होता आणि त्याच चिंतेने मला ही ग्रासल होत. पण मी निर्धार केला, या गटारात थांबायच नाही बाबा म्हणतात तसं कोणतीही दुसरी नोकरी करायची पण पोलीस खाते नकोच नको. संध्याकाळी मी आक्केच घर गाठल आणि कांबळेची कथा सांगितली, तिला म्हणालो, आक्के मी राजनामा द्यायच ठरवलं आहे. या खात्यात राहून मला स्वतः ला इतरांपासून अलिप्त ठेवण नाही जमणार.”

आक्का माझ्याकडे पहात हसली, म्हणाली, “पळ काढणारा नामर्द असतो, उठ तुझ्या शरीरावरची कात झटकून टाक. मनातील निराशा भय सोडून दे आणि आपल अभय नाव सार्थ करायला सिध्द हो.” आक्केचा शब्द माझ्या कानात गुंजतो आहे मला मिळालेला अधिकार हा यापुढे फक्त लोकांच्या कल्याणासाठीच वापरीन. होय आजपासून मी निर्धाराने अभय होऊनच जगेन.

समाप्त

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “अधिकार भाग 4

  1. دانلود تیک تاک با لینک مستقیم

    I have been surfing online more than 3 hours today yet I never found any interesting article like yours It is pretty worth enough for me In my opinion if all web owners and bloggers made good content as you did the web will be much more useful than ever before

  2. stufferdnb

    Fantastic site Lots of helpful information here I am sending it to some friends ans additionally sharing in delicious And of course thanks for your effort

Comments are closed.