अनुकंपा

अनुकंपा

तो शांतपणे मनात भविष्याच वादळ घेऊन बसला होता, किती विरोधाभास होता, वरवर तो शांत बसला होता पण वास्तव वेगळच होत नियतीच्या क्रुर चेष्टेने तो हादरून गेला होता. अस शांत बसणं आणि स्वतःला आतल्या आत कोंडून घुसमट करुन घेणं, खरंच विचित्रच होतं. जोराने रडावं अस सारख त्याला वाटत असावं, पण घरातल्या लहान बहिणीकडे आणि मोकळ्या कपाळाच्या आईकडे पाहिलं की तो स्वतःला, अनामिक ओढीला दाबून टाकत होता. फार त्रास होत होता, जिवाची घालमेल सुरु होती. लग्न झालेली बहिण अजूनही माहेरी होती. तिला बाळ होत, ती त्याच्या पेक्षा तीन वर्ष लहान होती, पण बारावीत असतांना चांगलं स्थळ आलं आणि वडिलांनी मुलीचं लग्न लावून दिलं. विसाव्या वर्षी मुल झालं. वयान मोठी नसली तरी मनाने आणि लग्नानंतर आलेल्या प्रसंगाने, तसंच मुल झालं म्हणून ती मोठी झाली.

वडील रिटायर होऊन अवघे पंधरा दिवस झाले होते. मला त्यांच्या रिटायरमेंण्टचा दिवस आठवला. रिटायरमेन्ट दिवशी संपूर्ण कुटुंब वडिलांच्या कार्यालयात गेलं होतं. ३२वर्ष नोकरी करून ते निवृत्त होत होते. ऑफिस ने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला होता. ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रुजू झाले होते, पण अंतर्गत बढतीने त्यांना कनिष्ठ लिपिक पद मिळालं होतं त्यावर ते समाधानी होते. निवृत्त होताना त्यांनी लिहून दिलेलं छोटं भाषण केलं.

कार्यालयातील सहकारी वर्गाला लंच पार्टी दिली. सागरने वडील निवृत्त होणार म्हणून त्या दिवशी प्रायव्हेट गाडी बुक केली होती. मित्रांना सांगून ते चाळीत परतल्यावर गुलाब पाकळ्यांची पुष्यवृष्टी करायचा प्लॅन केला होता. अर्थात हे त्यांना माहीत नव्हतं. प्लॅन प्रमाणे, ते ऑफिस मधून निघाले तसा सागरने मित्रांना ready राहण्याची सूचना केली. वडील जिना चढत असतांना अचानक फुले अंगावर पडली त्यामुळे ते गांगरून गेले पण टाळ्यांचा कडकडाट ऐकून ते समजले आणि त्यांनी पत्नीकडे पाहिले. ती हसत होती.

सकाळी मुलांसोबत ते त्यांच्या निरोप समारंभास सजवलेल्या खाजगी गाडीने पोचले तेव्हा स्वतः साहेब त्यांना रिसिव्ह करायला आले हे पाहून त्यांना कानकोंड झालं. घरी आल्यावर त्याच्या मित्रांनी पुष्पवृष्टी केली होती. सर्वच अघटित, अशा समारंभाची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. त्यांना मुलाबद्दल कौतुक वाटले. रात्री जेवताना ते त्यांच्या पत्नीला म्हणाले, “सागरने खूप खर्च केला. सर्व चाळ पहात होती.” हे सांगताना त्यांचे डोळे आनंदाने चमकत होते. ती म्हणाली, “अहो पोरगा आता मोठा झालय, त्याला तुमच्या बद्दल अभिमान वाटतो. किती कष्ट करून तुम्ही त्यांना वाढवले याची त्याला जाणीव आहे, म्हणून त्याने हे केलं. खर्च केला म्हणून त्याला रागावू नका बरं.” ते हसले, नाही रागवणार.”म्हणाले. बाहेर मुलं ऐकत होती.”आई किती समजूतदार आहे.”, सागर स्वतःशी म्हणाला.affiliate link

त्याला हे सगळं कसं कालपरवा घडलं असावं असं वाटत होतं. पण किती दुर्दैव, दोन आठवडे सुद्धा झाले नसावेत आणि हा असा प्रसंग घडला. दिवसा कोण कोण भेटायला यायचे आणि मग प्रत्येकजण वडील किती गरिबीतून वर आले, त्यांनी मुलांना शिकवताना किती मेहनत घेतली. त्यांना माहीत असलेले किस्से त्याला ऐकवत. तो डोळ्याला रुमाल लावून एकांतात बसे. किती वेळ रडणार. कधी कधी त्याला वाटायच बास झालं हे भेटायला येण, ते वारले आणि सुटले मला मात्र—-अर्थात हे सगळ स्वगत होतं. त्यांच्या अकाली जाण्यान त्याचं गणित चुकलं होत. भेटायला येणारा हळहळ व्यक्त करायचा, तेच तेच घासून चोथा झालेले शब्द.
किती तरी वेळा त्याने ती टेप ऐकली होती पण भेटायला येणाऱ्या व्यक्ती आपण त्यांच्या किती जवळचे होतो आणि आपल्याला त्यांच्या जाण्याचं किती दुःख झालं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचं सांत्वन करत होते. त्याला तेेच तेच ऐकून थकवा आला होता म्हणूनच तो असा एकांतात बसला होता.

चार वर्षांपूर्वी तो ग्रॅज्युएट झाला होता, नोकरीचा अनेक ठिकाणी प्रयत्न केला, कुणी विचारी Talley केलंय का? तर कोणी Taxation माहिती आहे का? प्रत्येक ऑफिसमध्ये वेगळी गरज होती अखेर एक होलेसेलर ट्रेडिंग एजंटकडे तो कामाला राहिला. कंपनीतून आलेलं पार्सल ट्रान्सपोर्ट मधून सोडवून आणणे, पार्टीचे कुरियर करणे, चलन, डिलिव्हरी मेमो, बिल बनवणे, पार्टीला मेसेज करणे अशी सर्व कामे तो करत होता. त्याच्या कामाचे ठाम स्वरूप नव्हते आणि पगारही अवघे वीस हजार. पण त्याला बाबा म्हणाले होते, घरी बसण्यापेक्षा काय वाईट, आम्ही तर एकशे साठ रुपये महिना नोकरी केली. चांगला जॉब लागला की सोडून दे. बरं परेल ते ग्रांट रोड हे अंतर काही फार नव्हतं पण सकाळी साडे नऊ ते रात्री आठ पर्यंत ड्युटी करावी लागत होती आणि जेवणाची नक्की वेळ नव्हती. दुसरा जॉब कधी मिळणार ते फक्त ईश्वराला माहिती. तो नियमित Online, Job Requirement Add शोधत होता. पण अजून तरी नशीबाने साथ दिली नव्हती. गेल्या चार वर्षात पगार अवघा दोन हजार वाढला होता. ना बोनस ना फंड त्यामुळे तो कातावला होता.

वडील निवृत्त झाले आणि त्याला जबाबदारीची जाणीव झाली. तो पोक्त झाला. आजपर्यंत वडील सर्व पहात होते. ते बोलता बोलता आठवड्यापूर्वी बोलले होते पुढच्या महिन्यापासून माझा पगार बंद होणार. पेन्शन सुरू व्हायला एक दीड वर्ष लागेल. तेव्हा जपून खर्च करा. त्याच्याकडे पहात म्हणाले, “सागर, आम्ही तुझ्याकडे या पूर्वी पैसे मागत नव्हतो पण पुढच्या महिन्यापासून तू पंधरा हजार तुझ्या मम्मीला द्यायचे, माझी पेन्शन सुरू झाली की पाच हजार कमी दे. तुझ्या मम्मीला महिना चालवायचा असतो.” त्याने होकारार्थी मान डोलवली.affiliate link

ज्या दिवशी रिटायर झाले त्या आठवड्यात रविवारी घरी पूजा घातली. जवळच्या नातेवाईक मंडळींना, चाळीतील शेजाऱ्यांना तीर्थ प्रसादाला बोलावले, रिफ्रेशमेन्ट ठेवली. बहीण आणि भावोजी मदतीला आले होते. बहिणीने वडीलांना शर्ट पॅन्ट पीस आणि स्वीट बॉक्स आणला होता.तो दिवस मस्त मजेत गेला. त्याचे निवडक मित्र ज्यांनी त्याच्या वडिलांच्या निवृत्ती दिवशी मदत केली त्यांना जेवायला बोलावले होते. आपल्या वडीलांशी ओळख करून दिली होती. वडीलांनी प्रत्येकाशी हात मिळवून आभार व्यक्त केले. सर्व मित्रांनी मिळून त्यांना एक मोबाईल गिफ्ट दिला. “अंकल,याच्यावर जुन्या गाण्यासाठी साईट आहे, सागर तुम्हाला डाऊनलोड करून देईल. तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. आता तुमचा मुलगा मोठा झाला आहे. काकू आणि तुम्ही सर्व देवस्थान फिरुन या.” ते हसले. खरच त्यांचा सागर अचानक मोठा झाला होता, जास्त जबाबदारीने वागत होता.

वडिल रिटायर्ड झाल्यापासून, सकाळी तो कामावर जाईपर्यंत ते त्याच्या आईला कामात मदत करत त्यानंतर त्यांचा वेळ जात नसे. नियमित कामावर जायची सवय आणि सतत व्यस्त असणार जीवन यामुळे दोन चार दिवसातच ते कंटाळले, ह्या वेळेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे असे त्यांनी ठरवले. परेलमध्ये एक स्टेशनरी सप्लायर होता. त्याला त्यांनी विचारल. त्याच्या दुकानात दोन माणसं ऑफिस डोअर डिलिव्हरी साठी होती. कधी काउंटर सेल तर कधी डोअर डिलिव्हरी करावी लागेल अस तो म्हणाला. महिना आठ हजार देणार होता. चाळीस हजार पगार घेतल्यानंतर आठ हजार म्हणजे एकदीच कमी, पण वेळ चांगला गेला असता. ते घरी काही न विचारता मालकाला, उद्यापासून येतो म्हणाले. संध्याकाळी सागर घरी आल्यावर, चहा पिता पिता ते म्हणाले, “सागर,मी उद्यापासून “नेलको स्टेशनरी स्टोअर” मध्ये कामाला जाणार, तो मला सात- आठ हजार देतो म्हणाला. घराजवळ आहे, तेवढाच माझा टाईम पास होईल आणि चार पैसे मदत होईल, चालेल ना?”

तो त्यांच्याकडे रागाने पहात म्हणाला,” बाबा हा व्यवहार आम्हाला न विचारता कोणी करायला सांगितला तुम्हाला? लोक काय म्हणतील?” त्यांनी समजूत काढली,”अरे, लोक कशाला काही म्हणतील? आपण काही त्यांच्या बापाचं खात नाही, बोलतील तिथे असतील,काम जवळ आहे, दुपारच्या वेळेत जेवायला येऊ शकतो माझा वेळ बरा जाईल.” “अहो बाबा,इथले रहिवासी तुम्हाला ओळ्खतात. माझे मित्र तुम्हाला ओळखतात, त्यांनी तुम्हाला दुकानात पाहिलं तर म्हणतील सागरला अक्कल नाही, रिटायर बापाला पुन्हा कामासाठी पाठवलं. तुम्हाला आईची शप्पथ आहे. तुम्ही नका जाऊ, हवं तर मी संध्याकाळचा दुसरा जॉब शोधीन चार पैसे जास्त मिळवीन पण प्लीज तुम्ही—–“

ते थोडे संतापले, हे अस काही होईल याची त्यांना कल्पना नव्हती. “अरे सागर, मी त्याला सांगून बसलो उद्यापासून येतो, तो काय म्हणेल? मला काही तिथे त्रास नाही. शिवाय तुझ्यावर आतापासूनच सर्व भार टाकून कस जमेल? प्लीज मला जाऊ दे.” सागर त्याच्या मतावर ठाम होता. तो आईकडे पहात म्हणाला, “मम्मी तूच ह्यांना काहीतरी सांग, नाहीतर आमचं नक्की भांडण होईल, बाबा परत कामावर जायला लागले, तर कसं दिसेल. आपले नातेवाईक काय म्हणतील? तुला कळतंय ना!,” आईने खुणेन त्याला शांत राहण्याची विनंती केली. त्यांना म्हणाली “सागर बरोबर म्हणतोय, प्लीज ऐका त्याचं.” त्यांचा नाईलाज झाला, त्यानी मुलाला हात जोडले, “ठीक आहे नाही जात मी कामावर, पण मी एवढा वेळ काय करू सांग? मी रिकामा बसलो तर मला वेड लागेल.”

“तुम्ही चांगली पुस्तकं वाचा, टीव्ही पहा, मम्मीला मदत करा. मित्रांकडे फिरून या, वाटल्यास गावी साताऱ्याला जाऊन या.” त्यांनी मान डोलवली. यापूर्वी ते बायकोला हवे नको ते आणून देत होते. त्यात आता मोकळे असल्याने ते बाजार करत. सकाळी वर्तमानपत्र वाचत, टीव्हीवरच्या त्याच त्याच रटाळ सिरीयल पाहणे त्यांना पसंत नव्हते. दुसऱ्या मित्रांच्या घरी जाण्याएवढी खास मैत्री कुणाशी नव्हती. एक दोन वेळा पेन्शनच्या कामानिमित्त ते ऑफिसमध्ये जाऊन आले. ऑफिसमध्ये सर्व आपल्या कामात व्यस्त असत आणि त्यांच्या साहेबांना कुणी वेळ वाया घालवलेला आवडत नसे याची त्यांना चांगली माहिती होती.

लवकरच ते ह्या शांत जीवनाला कंटाळून गेले. घरात शांत बसून राहणं म्हणजे शिक्षाच होती. मुद्दाम कोणाला फोन करून त्रास देणे त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. त्यांची आई आणि वडील वारले त्याला तप झाले होते आणि आता गावी राहणाऱ्या भावाजवळ इतका जिव्हाळा नव्हता. किंबहुना भाऊ गावी आला तर शेतीत वाटा मागेल अशी भीती गावच्या भावाला आणि वहिनीला असल्याने ते गावी गेले तरी त्यांच वागणं जिव्हाळ्याचं नसे. नाही म्हणायला कधीतरी सिद्धिविनायकला जाऊन ते येत. या पूर्वी कधी पत्नीबरोबर फिरायला गेल्याच त्यांना आठवत नव्हतं. आता या वयात गेलं तर लोक काय म्हणतील याची काळजी होती. दुपारी झोपण्याची सवय नव्हती. अस आयुष्य जगणाऱ्या माणसाला रिकामा वेळ खायला येणार यात वादच नव्हता. त्यामुळे ते या शांत जीवनाला कंटाळले होते.

कधीतरी ते बायकोला आपली व्यथा सांगत होते, पण मुलगा सांगतो ते त्यांना पटत होते. याचा नकळत त्यांच्या मनावर परिणाम झाला एक दिवस त्यांना झोपेतच सिव्हिअर अँटॅक आला. कोणाला काही कळलेच नाही. नेहमी दूध आणायला जाणारे हे, आज अजून का उठले नाही म्हणून सागराची आई उठवायला गेली तर त्यांची मान एका बाजूस कलली होती. ती घाबरून ओरडली तसा सागर उठून बसला छोटी बहीण जागी झाली. मम्मी का ओरडते पाहीलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं. त्यांने माहीत असलेले सगळे उपाय केले. छाती दाबून पंपींग केले, तोंडात जोराने फुंकून पाहिले. कोणताच उपाय चालला नाही तो समजून चुकला. वडील रात्री झोपेतच दूरच्या प्रवासाला निघून गेले होते. त्याला प्रचंड दुःख झाले. आयुष्यात फक्त कष्ट तेवढे त्यांच्या वाट्याला आले. आता निवृत्ती नंतर शांत आरामाचे जीवन जगावे तर तदपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

क्षणात चाळभर बातमी पोचली, कोणीतरी डॉक्टरांना घेऊन आले . त्यांनी मनगट हाती घेऊन नाडी पहिली, डोळे उघडून पाहिले आणि शांत स्वरात म्हणाले, “He is no more, sorry.” त्यांचे ते शब्द ऐकून सागर वडिलांच्या पायाशी कोसळला. कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्याला उठवलं. लहान बहीण संजना रडत होती तर त्याची आई सुन्न होऊन नवऱ्याच्या डोक्याकडे बसली होती. शेजारचे काका डॉक्टर बरोबर गेले आणि डेथ सर्टिफिकेट घेऊन आले. सागर नि:शब्द झाला होता. असे काही होईल ह्याची कल्पनाच नव्हती. चाळीतल्या जेष्ठ लोकांनी सारी तयारी केली. कोणीतरी बहिणीला कॉल केला. ती आली तिने वडिलांच्या अंगावर घालून घेतले.काही केल्या उठेना.कशी बशी लोकांनी समजूत काढली, “सुमती अग आईकडे पाहा, तिने काय करावं!” अंत्ययात्रेत त्याच्या ऑफिस मधले कर्मचारी,नातेवाईक, मित्र सहभागी झाले. निवृत्त होऊन वीस दिवस होत नाही तो बिचारा दूरच्या प्रवासाला निघून गेला. अगदी चित्रपटात दाखवावं त्या प्रमाणे घडलं आणि सागर धाय मोकलून रडला, स्वतःला दोष देऊ लागला, “त्यांना कामावर जायची इच्छा होती,मीच नको म्हणालो आणि आत्ता मला एकट ठेऊन—-“

त्याला शोक अनावर होत होता.पण आता काही उपाय नव्हता. वडिलांच्या ऑफिसमधले कर्मचारी भेटायला आले, ते ही हळहळले. कोणीतरी म्हणाले, ड्युटीवर असताना वारला असता तर मुलाला नोकरी तरी मिळाली असती. खरंच लोक सांत्वन करायला येतात की आणखी कशाला ईश्वराला ठाऊक. जे भेट द्यायला आले ते निघून गेले. पण ते शब्द त्याच्या कानावर पडले. “काय! खरच अस झाल असत का?, जर बाबा वीस पंचवीस दिवस आधी वारले असते तर! खरच आपल्याला गव्हर्नमेंट नोकरी मिळाली असती.”, हा स्वार्थी विचार त्याच्या मनात आला आणि घट्ट बसला. “किती नशीबवान असतात ती मुलं! ज्यांना त्यांचे वडील निवृत्तीपूर्व वारल्याने नोकरी, ती ही शासकीय मिळते.”affiliate link

दिवस पळत होते, गावचे काका,काकू,आत्या तेराव्याला आले.हळहळ व्यक्त करून निघून गेले. आता संसाराचा सारा भार त्याच्यावर होता. वडिलांचा Provident Fund, Gratuity, leave encashment काही काही त्यांनी पाहिले नव्हते. महिन्याभराने त्यांच्या Office चे रितसर पत्र आले त्यात वारस, डेथ सर्टिफिकेट, त्याच्या आईचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, इत्यादी कागदपत्रे, त्यांच्या सत्य प्रति अशी बरीच माहिती मागितली होती. कशीबशी त्याने एक दिवस रजा मागून घेतली. आईला घेऊन तो वडिलांच्या कार्यालयात गेला. तेथे सर्व माहिती भरली. कार्यालयात तो गेला असतांना बऱ्याच जणांनी विचासरपूस केली. एका मॅडमने चहा मागवला. त्यांची आपसात चर्चा सुरू होती. एक क्लार्क दुसऱ्या माणसाला पुन्हा तसंच म्हणाले, “श्रीधर खोपडे आधी वारला असता तर बाईंना पेन्शन मिळाली असती आणि मुलाला अनुकंपा नोकरी मिळाली असती, काय बिचाऱ्याचं नशीब बत्तीस वर्ष नोकरी केली पण रिटायरमेंटचा एक पैसे पहिला नाही. जगला असता तर पूर्ण पेन्शन घेतली असती.” सागरने ते ऐकलं आणि पुन्हा एकदा मन अशांत झालं, वाईट विचार डोकावून गेला, खरंच बाबा अगोदर वारले असते तर? अचानक त्याच लक्ष आईच्या कपाळावर गेलं आणि त्याची त्यालाच लाज वाटू लागली. किती दुष्ट आहोत आपण स्वतः वडिलांच्या निधनाचा विचार सहजपणे करतो, का? तर सरकारी नोकरी मिळाली असती म्हणून. त्याला अपराधी वाटू लागलं.

ऑफिसमधलं काम संपवून तो घरी आला. बाहेरच्या खोलीत वडिलांचा फोटो लावला होता तो त्या फोटोसमोर हात जोडून उभा राहिला आणि जोराने रडू लागला. आई आतल्या खोलीत स्वयंपाक करत होती. ती बाहेर आली त्याची समजूत काढत म्हणाली, “सागर शांत हो. त्यांनी आपल्या साठी खूप केलं. आपलं दुर्दैव आपण त्यांची सेवा करू शकलो नाही. त्यांना समजून घेऊ शकलो नाही, जर ते म्हणत होते ते आपण ऐकलं असतं तर कदाचित असं झालं नसतं. आता रडून काय उपयोग.”

सागर तिला मिठी मारत म्हणाला, “मम्मी, मी खरंच दुष्ट आहे, मघाशी ते काका म्हणत होते, जर बाबा रिटायर होण्या आधी वारले असते तर मला नोकरी मिळाली असती आणि मी—–, मी मनात म्हणालो तस झालं असत तर खरच बर झालं असत, मम्मी, मी खरच दुष्ट आहे ग, किती स्वार्थी विचार मनात आला. बाबा मला क्षमा करा.” तिने त्याला जवळ घेतलं,”चल वेडा कुठला, असं कुणी म्हणून थोडं कुणी जातं? अरे त्यांचं आयुष्य तेव्हढं त्याला तू आणि मी काय करणार? हे बघ बहिणीला चांगलं शिकव त्यांची जबाबदारी तू पार पाड. तुझ्या नशिबी असेल तर तुलाही चांगली नोकरी मिळेल. आणि असे वाईट विचार मनात आणू नको. स्वतःच्या कर्तृत्वान मोठं व्हावं उपकराने नाही. अनुकंपा म्हणजे हक्क नाही तर दया आहे. आपल्या विषयी कोणाला दया का वाटावी? कर्तुत्वहीन माणस दयेवर जगतात. जा आणि पुन्हा असला क्षुद्र विचार करू नको” आई बारावी शिकली होती. केवळ बाबांची सरकारी नोकरी म्हणून तिच्या वडिलांनी, आजोबांनी मुलीचं लग्न कमी शिक्षण असणाऱ्या श्रीधर खोपडेंशी लावल होतं. आईचे विचार ऐकून त्याला आनंद झाला. तो तिची माफी मागत म्हणाला, “मम्मी, यापुढे मी नक्की स्वार्थी, क्षुद्र विचार करणार नाही.” आईने त्याला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले. हळू हळू सगळं सुरळीत झालं. आता आई सर्व व्यवहार पहात होती. तो पगार झाला की पंधरा हजार आईकडे आणून देई.

चार पाच महिने निघून गेले, हळू हळू मन शांत झालं. एक दिवस तो नसतांना आईच्या नावाने रजिस्टर टपाल आलं. संध्याकाळी सागर घरी आला चहा पाणी झाल्यावर आईने सागरला ते टपाल दाखवलं. तिच्या पेन्शनचे पेपर त्यात होते.. त्यांने ते पत्र, सुट्टी घेऊन कार्यालयात दाखवून आणले. त्यांने काही पेपर ट्रेझरीत, तर काही बँक मध्ये जमा केले. वडिलांच्या मित्रांच्या मदतीने काम पूर्ण केलं.

दोन तीन आठवड्यांनी आईच्या मोबाईलवर फंड जमा झाल्याचा मेसेज आला. बारा लाख रुपये तिच्या बँक खात्यात जमा झाले होते. एवढी मोठी रक्कम आयुष्यात ऐकली नव्हती की पहिली नव्हती. तिने मुलगी आणि जावयांना बोलावून घेतले. या पैश्याचे काय करावे? तिने मुलीला विचारले. मुलगी वयाने लहान असली तरी समजूतदार होती. ती म्हणाली आई, हे बाबांचे निवृत्तीचे पैसे आहेत त्यावर फक्त तुझा अधिकार आहे ते तुझ्याच नावावर ठेव. तुझ्या गरजेला कोणाकडे मागायची पाळी तुझ्यावर येऊ नये. तसेही संजना आता बारावीत आहे. दोन चार वर्षांनी तिचं लग्न करावं लागेल, दादाचं लग्न आहेच. जावई भला होता त्याने मान डोलवली. सागर म्हणाला, “बाबा असते तर त्यांनी सुमतीच्या नावावर काही रक्कम ठेवली असती. तेव्हा मला वाटतं तुला योग्य वाटेल ती रक्कम सुमतीच्या नावावर ठेवावी.” सुमती ठाम होती, तिने नकार दिला,आणि विषय संपला.

दिवस जात होते. पण त्याने अनेक ठिकाणी ऑनलाइन अर्ज करूनही दैव साथ देत नव्हतं. संजना बारावी परीक्षेत चांगल्या गुणाने पास झाली. या पूर्वी सागरला नोकरीसाठी जो अनुभव आला तसा बहिणीला येऊ नये म्हणून सागरने तिला प्रोफेशनल शिक्षण देण्याचे ठरवले आणि तिच्या आवडीच्या क्षेत्रात रुईयाला जर्नालिझम ला प्रवेश घेतला. आईची पेन्शन सुरू झाली आणि त्याच्यावरचा आर्थिक भार कमी झाला. वडिलांना जाऊन वर्ष झाले आणि वडिलांचे ग्रॅच्युईटी व इतर पैसे जमा झाले. त्यांने बहिणीला कळवले. तिच्या नवऱ्याला विचारून तसेच या पूर्वी रिटायर झालेल्या चाळीतील काकांना विचारून पैसे योग्य ठिकाणी गुंतवले.

एक दिवस तो उशिराने उठला तर त्याच्या मेल बॉक्स वर मेल दिसत होता. त्याने फारस लक्ष दिलं नाही नेहमी प्रमाणे व्यायाम करत होता इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. त्यांने मोबाईल उचलला तर समोरून एक मुलगी बोलत होती, “hello, I am Yogita from Sunshine,am I speaking to sagar.?” “Ya ma’am,I am Sagar Khopde, may I know why you called me?” “Mr. Sagar you didn’t see your mail regularly, you have a walk in interview today at Ballard pier at Sharp 10am Do bring your documents, ok.” “Thanks ma’am.”
त्याने मोबाईलवर सकाळी मेल पहिला पण त्यात सिरीयसनेस नव्हता. त्यांनी पुन्हा मेल पहिला तेव्हा त्याला त्याची जाणीव झाली. आता आठ वाजत होते म्हणजे हाताशी तासभर वेळ होता. त्यांने झटपट तयारी केली,आईला या कॉल बद्दल थोडक्यात सांगून तो निघाला तेव्हा आई म्हणाली, “चांगल्या कामासाठी जातोस, देवाच्या आणि ह्यांच्या पाया पड. तुला आज नक्की यश मिळेल.”


तो आईच्या म्हणण्यानुसार देवाच्या आणि फोटोच्या पाया पडला, तिने त्याच्या हातावर साखर घातली. तिच्याही पाया पडला आणि निघाला. बँलार्ड पियर इथे दिलेल्या पत्त्यावर पोचला तेव्हा दहा ला दहा मिनिटे होती. त्याने Reception counter वर चौकशी केली. टीपॉयवर ठेवलेली मॅगझीन चाळली. कंपनीचा अहवाल तिथेच होता. त्यांने तो ओझरता पहिला. गाडीतून येतांना त्यांने कंपनी अँक्टिव्हिटी विषयी माहिती मिळवली होती. त्याच्या नंतर अजूनही दोन तीन candidates येऊन बसले. साडेदहाच्या सुमारास इंटरव्ह्यू सुरू झाले. त्याच्या पूर्वी दोन candidate जाऊन आले. तो अगदी निवांत बसला होता. त्याने यापूर्वी ऐकले होते की रिसेप्शन हॉल मध्ये असलेल्या कॅमेराची स्क्रीन आत असते त्यावर तुम्ही तिथे कसे बसता? काय करता? ते पहिले जाते त्यामुळे Candidate judge करणे सोप्पे जाते.

त्याला बोलावले तेव्हा तो अदबशीर गेला. त्यांची अनुमती घेऊन बसला आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची शांत उत्तरे दिली. त्याने तो करत असलेल्या कामाचे स्वरूप सांगितले आणि अपेक्षाही सांगितली. त्याला त्यांनी अखेरचा प्रश्न विचारला? Do you think we must select you for this job? If so, Why? त्यांने शांत नजरेने interview घेणाऱ्या चार अधिकारी ज्यापैकी एक महिला होती, त्याच्याकडे पाहिले आणि उत्तर दिले. Yes, I am confident you will select me, because I am the most suitable candidate to whom you are searching for. I know about your work culture. I am ready to devote my time to rise to a higher position by giving good results to your organization.” Amazing त्यांच्यापैकी मधल्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती बोलली. Then When can you join us? तो थोडं थांबला आणि म्हणाला,Sir,let me inform my previous company, give me atleast fifteen days to give them notice, they should not suffer because of my absence. त्याच उत्तर ऐकून मधल्या खुर्चीत बसलेली व्यक्ती उठली, Gentleman I am Rathod MD of this company,I am glad to hear from you. Yes we will give you an appointment letter today and you can join us after fifteen days. सागरने नमस्कार केला.Thanks sir,I will try to give my best. त्याने प्रत्येकाशी shake हॅन्ड केलं. तो बाहेर आला.आज पहिल्यांदा इतका खूश होता. निघतांना त्यांने रिसेप्शनिस्टचे आभार मानले, खरं तर तिच्यामुळे हा जॉब त्याला मिळाला होता.affiliate link

पंख लावून उडत घरी जावे अस त्याला वाटत होतं. तो हॉल मध्ये थांबला. थोड्या वेळाने त्याच्यासाठी कॉफी आली. रिसेप्शनिस्ट त्याला म्हणाली, Sir, you have to wait for half an hour, collect your appointment letter while going.” No problem Mam, I will wait. तो स्मित करत म्हणाला. थोड्या वेळाने त्याला पत्र मिळाले, त्याने ते पत्र वाचले. सहा लाख रुपये अधिक इतर लाभ अशी ऑफर होती. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है। तो मनात म्हणाला. त्याने सकाळी फोन करून मालकाला तो आज येत नसल्याचे कळवले होते तरीही आजच जाऊन नोटीस द्यावी का? त्याच्या मनात आले पण दुसरे मन म्हणाले ही आनंदाची बातमी आत्ता मम्मीला सांगितली तर तिला किती आनंद होईल! तो घरी आला, छोटी बहीण कॉलेजला गेली होती. आई वाट पाहत होती.
तो घरात प्रवेश करतांना आईने त्याचा प्रफुल्ल चेहरा पहिला आणि ती समजली. त्याने हातपाय धुतले आणि अँपॉईंमेंट लेटर आईच्या हाती दिले.”मम्मी तुझे आशीर्वाद कामी आले,मला नोकरी मिळाली. किती पगार ऐकलास तर आनंद होईल, किती माहीत आहे?” आईने त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिले, तो आनंदी पाहून तिला स्वतःला नोकरी लागली असावी असा आनंद झाला होता. “मम्मी वार्षिक सहा लाख म्हणजे पन्नास हजार महिना शिवाय बोनस वगैरे निराळा.”

तिने तीचे हात त्याच्या गालावर फिरवले आणि म्हणाली, “जा ते पत्र आधी देवाकडे आणि मग तुझ्या बाबांच्या फोटोकडे ठेव, आज ते असते तर चाळीत पेढे वाटले असते.” “मम्मी तू म्हणालीस तसा मी स्वतःच्या हिमतीवर जॉब मिळवला अनुकंपा नाही, खरं ना?” “होय रे माझ्या राजा, तू तुझ्या हिमतीवरच मिळवला, एक आईला या पेक्षा काही नको. मी अभिमानाने सांगेन माझ्या मुलाने स्वतः जॉब मिळवला.”

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “अनुकंपा

  1. Bhosle R. B.

    Khup chan katha. Khupach aavadli sir.

  2. Milind Chavan
    Milind Chavan says:

    लय मस्त ,वाचताना अगदी आपल्या जीवनात घडलेली घटना, माझ्या सारख्या सर्व सामान्य घरातील वास्तव आपण ह्या शब्दात बंदिस्त केलं आहे, खूप छान

Comments are closed.