अपूरे स्वप्न

अपूरे स्वप्न

काल मी कामावरून घरी आलो तर माझा मुलगा प्रवीण आजीवर रूसून बसला होता. मी आलो हे पाहून त्यांनी जोराने रडायला सुरवात केली. तो थांबून थांबून रडत होता, “पप्पा मने जवा दोव. हू किल्ला बनावुवामाटे जईश. बा मने जवानी परमीशन नई आपे, तमे येने केजो, मारा बध्दा दोस्त त्या भेगा थया छे। मी ते ऐकलं आणि मी खडबडून जागा झालो. आई माझ्याकडे पाहून चिंतित झाली होती. माझी बायको, ज्योत्स्ना त्याच्यावर ओरडली, “प्रवीण तू नाटक बंद नई करे तो हू बे थप्पड तमे मारी, पछी तमे रमवा केम जाईश खबर पड से. चूपचाप बेसी जा, मोबाईल लेईने रमावा होय तो रम .हवे पप्पा थाकी ने आवशे, येना चा पिवा दे.”

मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला “एटला बध्दा गेम तारी पासे छे,कोई लई न रम जे बेटा. तारे गड बनवुवा माटे जवानू होय तो तारे साथे हू आवीश” तरीसुद्धा त्याच रडण थांबल नव्हतं. “पप्पा तमे साचे केहशे ना, तमे मारे साथे आवजो, मारा बध्दा दोस्त बहू खुश थसे, त्या तमे उभा रेवा नी हेल्प कर जे.” “हा, बेटा, हू थारे साथे आवशे, पक्का प्रॉमिस.” माझ्या बोलण्यावर मुलगा खुश झाला. हॉलमध्ये खेळायला निघून गेला.
बायकोनी मला चहा आणून दिला आणि माझ्या बाजूला बसून विचारू लागली, “प्रविण दोस्त येने लेवा आव्या हता तारी मम्मी ये ना पाडी.मम्मी ने सू प्राब्लेम छे?”

तिने ते विचारलं आणि मला दरदरून घाम फुटला. मी तिला ती घटना ऐकवली, २००३, सालची गोष्ट. मी सातवीत होतो बिल्डिंग मधील आम्ही मुलं रोज संध्याकाळी बिल्डिंगच्या आवारात खेळायचो. शाळेतून घरी आलो की चहा पिऊन होत नाही तोपर्यंत खाली मुलांचा गोंधळ सुरू व्हायचा.अगदी अंधार होईपर्यंत आम्ही खेळ खेळायचो. आमी गुजराती असलो तरी आमच्या घरातच फक्त आम्ही गुजराती बोलायचो, आजही घरातच आम्ही गुजराती बोलतो. माझे आणि पप्पाचे सर्व मित्र मराठीच बोलतात. आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला सर्व मुले दर दिवाळीत त्यांच्या सोसायटीच्या आवारात किल्ला बनवतात. त्या वर्षी आम्ही सात आठ मुलांनी दिवाळी पूर्वी किल्ला बांधायचा ठरवला. प्रत्येकाने घरातून टाकून द्यायच्या वस्तू आणल्या त्यात गोणपाट, प्लास्टिक गोण, तुटकी झाडू, खराटा, सुतळी अस बरच साहित्य होतं. तेव्हा किल्ला बांधा स्पर्धा नव्हती पण परंपरा म्हणून मुलं किल्ला बांधायची. आई आणि घरची मोठी मंडळी घरची साफ सफाई, फराळ करणे, दिवाळी खरेदी यात बिझी असायची. दिवाळी सुट्टी म्हणजे मजा मग मुलांना गुंतवून ठेवायला काही तरी हवं, किल्ला बांधताना मातीकाम करून हस्तकलेला वाव मिळायचा आणि इतिहास मुलांना कळायचा. किमान दोन तीन वेळा आम्ही किल्ला तोडून परत बांधायचो.आमची भांडण व्हायची, रुसवे फुगवे व्हायचे. किल्ला बांधून त्याला गिलावा केला की घोडदळ, हत्ती, भुयारी मार्ग, शस्त्रागार असे करण्यात आम्ही अंधार पडेपर्यंत गुंग असायचो., आम्ही सर्व मुलं मस्त एन्जॉय करायचो. कोणाचा किल्ला चांगला झाला आहे, हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या सोसायटीत फिरून यायची. त्यांनी काही जास्तीच केल असेल तर आम्ही त्यांच कॉपी करायचो. दुपारच्या जेवणाची, संध्याकाळी चहाची आठवण सुद्धा होत नसे मग बा हाक मारत जिन्यात यायची. आम्ही किल्ला बांधायला घेतला की सोसायटीमधले दादा मदतीला यायचे. अर्थात सुरवात आम्ही करायचो.





त्या वर्षी काही मित्रांनी आजूबाजूच्या रस्त्यावरून आणि जिथे बांधकाम सुरू होत तिथून दगड विटा गोळा केल्या.किल्ला बांधण्यासाठी बरच सामान जमा झालं. त्या किल्ल्यावर ठेवायला वर्गणी काढून आम्ही मावळे, भाले, तोफा,हत्ती, घोडे,ध्वज,अस बरच काही जमा केल. मग आम्ही आमच्या आजूबाजूच्या सोसायटीत जावून कोणी कसे किल्ले बांधते ते पाहूनही आलो. आमच्या लक्षात आल,आम्ही जमवलेल सामान अपुरे होते. किल्ला बांधण्यासाठी माती हवी पण आम्हाला माती मिळेल अशी आजूबाजूला मोकळी जागा नव्हती.

बाजूच्या सोसायटीत एक दोन फ्रेंडस्ना विचारल तेव्हा त्यांनी भोपरच्या टेकडीवरून माती आणल्याच सांगितले आणि मग आमच्या डोक्यात आयडिया आली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळीच माती आणायला जायचे ठरवले होते. इतर वेळी रविवार असला की लवकर उठायचा कंटाळा करायचो पण त्या रविवारी मी सकाळीच उठलो.चहा पिऊन मी खाली उतरलो. सर्व मित्र वाटच पहात होते. घरातून पिशव्या घेतल्या आणि आम्ही पाच सहा जण सकाळीच सायकलने माती खणायला लोखंडी सळई ,माती भरायला घरातला डबा, गोणी अशी साधन घेऊन भोपरच्या रस्त्याने निघालो.

हवेत मस्त गारवा होता, थोडे धुके पडले होते. त्या धुक्यातून सायकल चालवायला मजा येत होती. नाला ओलांडल्यावर गावातील लोकांची कौलारू घरे होती. आजूबाजूला भाताच शेत होत. भात पिकून खाली लोंबत होत.त्या पिकल्या भाताचा वेगळाच वास आसमंतात भरून राहिला होता.आजपर्यंत आम्ही कोणीही येथे आलो नव्हतो. रस्त्याला थोडा चढ होता तो मागे टाकून आम्ही गावातील तळ्याला वळसा घालून पूढे गेलो. तिथूनच भोपर गाव दिसत होत.प्रत्येकाच्या दारात केळी, पेरू जास्वंद, अनंत अशी झाड होती. छान वाटत होत.दारात कोंबड्या चरत होता.कुठेतरी कोंबडा बांग देत असल्याचा आवाज येत होता.खुप प्रसन्न वाटत होत.

भोपर गाव मागे टाकून आम्ही दहा पंधरा मिनीटे सायकल दामटल्यावर भोपरची टेकडी आम्हाला दूरून दिसू लागली. टेकडीच्या आडून सुर्य डोकावत होता. त्या टेकडीवरच्या मंदिरिवर भगवा फडकत होता. तो पाहून आम्हाला जोश आला. आमचा मित्र विशाल ओरडला. हरहर महादेव,जय शिवराय,जय महाराष्ट्र.आम्ही त्याच्या मागून तेवढ्याच आवाजात म्हटलं. का कोणास ठाऊक! पण आम्ही शिवाजीचे मावळे असल्याचा आभास क्षणभर झाला. येणारे जाणारे आम्हाला थांबून पहात होते. आम्ही सर्वजण पाठी पूढे सायकल पळवत होतो. टेकडीच्या आजूबाजूला झुडप वाढली होती. इथे थोडं जास्त गारवा वाटत होता.

टेकडीवर आजूबाजूला खडक होते त्याच्यावर बसूनच आम्ही थोडा वेळ आराम केला.रमेशला तहान लागली होती पण कोणीही पाणी आणले नव्हते. भोपरच्या टेकडीवरून संपूर्ण डोंबिवली शहर दिसत होतं. नोव्हेंबर असल्याने हवेत गारवा होता. सर्व मित्रांनी गावदेवीच दर्शन घेतलं. टेकडीवर मंदिराच्या थोड पूढे नुकतेच झोपाळे, सी सॉ आणि मेरी गो राउंड बसवले होते. सकाळची वेळ असल्याने कोणीही नव्हते. आम्ही झोपाळे आणि सी सॉ वर बसून धम्माल केली. सूर्य टेकडीवरून छान दिसत होता. टेकडीवर मुबलक लाल माती होती. झाड लावण्यासाठी काही खड्डे खणले होते. आम्ही ठरवल बस, हिच माती खणून किल्ल्यासाठी न्यायची.



affiliate link

टेकडीवर थोड्या अंतरावर आम्ही माती खणायला सुरवात केली. एवढ्यात गावातले एक काका तिथे म्हैस घेऊन आले आणि त्यांनी माझ्या एका मित्राची कॉलर पकडली आणि शिव्या देऊ लागले. इकडची माती खणतो का? तुमच्या बापाची टेकडी हाय का?इकड नाय खणायचा xxxx लाता बसतील जा त्या खालच्या खदानीची माती काडा. आम्ही दूर पळून गेलो आणि ते ऐकलं. आमचा मित्र रडवेला होत आला. त्यांनी आम्हाला शिव्या घातल्या, “कसले मित्र तुम्ही,पळपुटे xxxxxx मला एकट्याला टाकून पळालात.त्या xxxxx गाववल्याने माझ्या कानफटात मारली.माझा कान गप्प झालाय. तुमचा किल्ला गेला कुत्र्याच्या xxx, मी चाललो घरी.” कशीबशी त्याची समजूत काढली.आम्ही त्याची माफी मागितली. त्याने मार खाल्ला हे कोणाला सांगणार नाही अस हातावर हात ठेवून प्रॉमिस केल. तेव्हा तो तयार झाला.

टेकडीच्या खाली एका मोठ्या खड्याजवळ काही मुल माती खणतांना आम्हाला दिसली.त्या दिशेने आम्ही सायकल नेली.त्या मुलांच्या शेजारीच आम्ही माती खणायला घेतली तस ते आमच्यावर गुरगुरले. “माती काढायला हीच जागा मिळाली काय? जा की पूढे, माझी सटकली आधीच त्या काकांनी हाकलून लावल होतं,आता ही मुलं शहाणपण दाखवत होती. मी मित्रांना सांगितलं, “खणा रे, इकडचीच खणायची, माती काय कुणाच्या बापाची आहे का?”, दोन मुल आमच्या आंगावर धावून आली.”ऐ,कोणाचा बाप काढतो रे? दाखवू का तुला पाणी!” विशालने एकाला धरलं आणि त्याचा हात पिरगळला आणि पाठीवर धरला, “ऐ जा शाणा बन, आपलं डोक आधीच आऊट झालय, डोक्याच दही केल ना तर काय करेन ते बघ! “विशाल रागावला. तो मुलगा जोराने ओरडला,तशी दोन मुल आमच्या दिशेने धावत आली आणि विशालला मारायला धावली. मी त्या दोघांना पाठी खेचलं. “अरे मित्रा जाऊदे भांडायच कशाला? इथे भरपूर माती आहे. तुम्हाला पाहिजे ती तुम्ही खणा, पण ते ऐकायला तयार नव्हते.” , माझ्यावर डाफरले,” ए चल फुट, आम्हाला समजवण्याची गरज नाय,इथून फुटायच बघा नाय तर या पाण्यात फेकून देऊ, कळणार पण नाय.”

ते ऐकून मला चिड आली, विशालही माझ्या मदतीला आला, चेतनने एकाला घुमवल.आम्ही त्यांना चांगलच धुतल. त्यांचे मित्र आमच्या अंगावर पहार घेऊन आले. मग आमचा मित्र अभय आणि संत्या त्यांना भिडले. सदाने त्या मुलाकडची पहार खदानीच्या पाण्यात फेकून दिली. तो सदावर हात टाकत होता. किशोर धावत गेला आणि त्यानी सदाला बाजूला ओढलं आणि त्यांची जुंपली. एवढ्यात कोणीतरी शिट्टी फुंकू लागलं तस ती मुल पळाली. आम्ही पण दुसऱ्या वाटेने निघून गेलो. थोड्या वेळाने कुणी येत का याची जाग घेऊन आम्ही आलो. तिथे कुणीही आल नाही. आम्ही माती गोणित भरली.





आता आम्ही निघणारच होतो तर विशाल म्हणाला, हात पाय धूवून घेऊ पाणी बघ कस स्वच्छ आहे.आम्ही सर्वजण पाण्यात उतरलो. पाण्यात चार पाच निळी कमळ होती.किशोर म्हणाला, “मी कमळ काढतोय कोणाला पाहिजे?” , विशाल त्याला म्हणाला, किशोर थांब पूढे नको जाऊ या खदानीच आपल्याला काही माहिती नाही. पण तो पर्यंत किशोर कमळाच्या दिशेन पोचला होता.त्यांनी एक दोन कमळ काढली आणि अचानक तो घसरला,”विशाल ! विशाल ! त्याच्या दिशेन मी पाहिलं तर त्याचा फक्त हात दिसत होता. विशाल त्याला हात द्यायला जात होता पण विशाल पण घसरायला लागला आम्ही चेन करुन त्याला ओढलं. आमच्या पैकी एकालाही चांगले पोहता येत नव्हते. माझे पाय थरथरत होते मी जोराने बोंब मारली, “किशोर,किशोर!” पण फक्त बुड बुड आवाज येत होता. आम्ही सहाही जण प्रचंड घाबरलो घरी जाऊन किशोरच्या आईला काय सांगयच ते समजत नव्हते.

घरी जायची भिती वाटत होती. टेकडीवर जाऊन कोणाला तरी बोलवून आणू अस अभय म्हणाला आणि तो टेकडीच्या दिशेने जाऊ लागला, त्याच्या मागे संत्या गेला. विशाल, रमेश,चेतन,आणि मी भितीन गोठलो होतो. अभय आणि संत्या टेकडीवर गेले ते परतलेच नाही. आम्हाला जास्तच भिती वाटू लागली. थोड्या वेळाने पोलीसांची गाडी आणि दोन तिन रीक्षा आमच्या दिशेने आल्या. ते पाहून तर पुरती वाट लागली. आमच्या बिल्डींगमधील बरेचजण आले होते. किशोरची आई, विशालचे आणि माझे पप्पा, दोन दादा, काय कराव ते आम्हाला सुचेना. आम्ही जोराने रडत होतो.पोलीस आम्हाला मारणार या भीतीने आम्ही मोठ्याने रडायला सुरवात केली. काहीच सुचत नव्हतं. कोणीतरी आमच्यावर रागावले, ” ए पोरानो गप्प बसा.आलता कशाला,आय घालायला.” बहुदा गावातील कुणी असावं.

पोलीसांनी गावातली दोन माणस सोबत आणली होती. त्यांनी जाडी रश्शी टाकली आणि ते खदानीत उतरले. पंधरा मिनाट शोध घेतल्यानंतर, त्यांनी किशोरला बाहेर काढले. एका गाववाल्यानी त्याला पाठीवर झोपवून पोट दाबले तसे तोंडातून पाणी बाहेर आले.एक पोलीस त्याचे डोळे उघडून पहात होता. एक गाववाल्याने त्याची नाडी पहिली,छाती दाबून पहिली.त्यांचे प्रयत्न संपले. तस गाववाला म्हणाला साहेब हा जिवंत नाही. ते ऐकताच किशोरची आई आक्रोश करू लागली. आमच्याकडे पाहून ओरडत म्हणाली तुम्ही माझ्या मुलाला मारलं. ती स्वतःच्या छातीवर हात मारून घेऊ लागली. तीच रडणं ऐकून आम्ही सुन्न झालो होतो. बिल्डिंगमधल्या दादांनी कसेबसे तिला समजावले. पोलिसांनी तेथील लोकांना गावच्या पोलीस पाटीलांना बोलावून आणायला सांगितलं आणि पंचनामा केला. किशोरचे शव पाहून आमची बोबडी बसली होती.कशासाठी आलो आणि झाल काय? पोलीस आता आपल्याला आत टाकणार या भीतीने आम्ही पुरते घाबरलो होतो.

येताना सायकल चालवायची आमची हिंमत नव्हती. पोलीसांनी त्या सायकली एका बैलगाडीतून घरी पोचवल्या. आम्ही सर्व घरी आलो. सर्व बिल्डिंग आम्हाला पहात होती.जणू आम्ही सर्व गुन्हेगार होतो.खर तर आम्ही किशोरला खदानीत पूढे जाऊ नको सांगत होतो पण तो ऐकला नाही. कमळ काढायला तो पूढे गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला.पूढचे आठ दिवस पोलीस आमचे जबाब घेत होते. किशोरचे आई बाबा आमच्या कोणाशीच बोलत नव्हते. आम्ही सत्य काय ते सांगूनही त्यांच समाधान झाल नव्हतं, त्यांचा तरूण मुलगा ऐन दिवाळीत गेला होता. संपूर्ण बिल्डिंग दुखात बुडाली होती. माझ्या घरून मला खाली खेळायला जाण्यावर बंदी घातली होती. वर्षभर बिल्डींगमध्ये कोणताच उत्सव कोणताच सण झाला नाही. किल्ले बांधण्याच्या आमच्या हौसेपाई आम्ही आमचा एक मित्र गमावला होता. त्याला वाचवू शकलो नाही हे शल्य मनात खोल रूजले होते.



affiliate link

त्या वर्षी किल्ला बांधायचे आमचे स्वप्न अपुरेच राहीले. आम्ही जमवलेले सगळे सामान कचरावाला घेऊन गेला. जमवलेले दगड आणि विटा मात्र बरेच वर्षे एका कोपऱ्यात पडून होते. कोपऱ्यातील दगड विटांकडे पाहिलं की किशोरची आठवण यायची आणि आम्हीच त्याच्या मृत्यूला जबाबदार आहोत असं वाटायचं. त्या नंतर अनेक वर्षे दिवाळी आली आणि गेली पण कोणीही दिवाळीत किल्ला बांधण्याची हिंमत केली नाही. काळ हे जखमेवरचे उत्तम औषध असते. बरीच वर्षे पाठी पडली आम्ही सर्व मित्र शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसायाला लागलो. लग्न झाली, मुलं झाली. कित्येक वर्षे कोपऱ्यात पडलेला दगड विटांचा ढिग तसाच होता.त्या ढिगाजवळ जावं अस वाटत नसे.त्या ढिगाकडे पाहिल की किशोरची आठवण झाल्याशिवाय रहात नसे.

आज अचानक मुलाने दिवाळीत किल्ला बांधायला जायचा हट्ट धरला आणि मनावरील जखमेवरची पट्टी गळून पडली. किशोरसाठी क्षणभर डोळे भरून आले. मुलांना समजावणे कठीण असते हे बाप झाल्यावर कळू लागले. मी माझ्या मुलाची कशीबशी समजूत काढली आणि त्याचं दिवशी संध्याकाळी त्याला जिमखान्यावर पोहण्याच्या क्लासला घालण्यासाठी घेऊन गेलो. माझ्या आईने रडून गोंधळ घातला. तो पोहताना बुडेल याची तिला भिती वाटत होती. तिला मी जिमखान्यावर घेऊन गेलो. तिथे छोटी मुल मस्त पोहत होती. त्यांना पाहिल्यावर तिची खात्री पटली.माझा मुलगा पोहायच्या क्लासला जाऊ लागला.

ही घटना जेव्हा बायकोने माझ्या तोंडून ऐकली तेव्हा तिचेही डोळे भरून आले. मुलाला पोहण्याच्या क्लासला घालण्यासाठी माझी बायको विरोध करत होती. माझ्या मुलाच्या बाबतीत काही अपघात घडेल ही भीती त्यांना होती, पण मी त्यांना म्हणालो जर तेव्हा मला पोहता येत असते तर माझ्या मित्राला किशोरला मी वाचवले असते. हा वाईट प्रसंग आपल्या वाट्याला आला नसता. दोघींना ते पटले. आता मी नसलो तरी माझी मिसेस न चुकता त्याला पोहण्याच्या क्लासला घेऊन जाते. उद्या असाच प्रसंग उद्भवला तर माझा मुलगा चिराग नक्की आशेचा दीप होऊन त्या प्रसंगातून मार्ग काढेल.

ज्या दिवशी माझ्या मुलाने किल्ला बांधण्यासाठी खाली जाण्यासाठी हट्ट केला त्याच रात्री मी किशोरची सतत आठवण करून देणारा तो दगड विटांचा ढिगारा गोणीत भरून माझ्या गाडीने दूर नेऊन टाकला. मुलांनी किल्ला बांधायचा हट्ट करुन पून्हा त्या प्रसंगाची आठवण आम्हाला करून देऊ नये अस मनोमन वाटत होतं. दुसऱ्या दिवशी आमच्या सफाई कामगाराने तिकडील कचरा झाडून कोपरा स्वच्छ केला. इमारतीत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
प्रत्येकजण ह्या कोपऱ्यातील दगड विटा कोणी हलवल्या असाव्या या विषयी अंदाज बांधत होत पण कोणी कोणाला विचारण्याची हिम्मत केली नाही. तो दगड विटांचा ढिगारा ढिग नाहीसा झाला तरी मुलांनी हार मानली नाही. मुलांनी शोध घेऊन कुठून कुठून साहित्य जमा केल आणि किल्ला बांधायला सुरवात केली.

या वेळी मात्र मुलांना मदत करायला त्यांच्या घरातील मोठी माणसं पूढे सरसावली. कुणाचे बाबा तर कुणाचे आजोबा, माझे पप्पा देखील नातवाला मदत करायला हजर होते. मुलांना गाडीने शहरा बाहेर नेऊन बाबा आणि आजोबा लोकांनी गाडीच्या डिकीतून गोणीतून लालभडक माती आणली. दोनतीन दिवसांनी स्वच्छ केलेल्या त्याच कोपऱ्यात मुलांचा किल्ला उभा राहिला. त्या किल्ल्यावर तोफा, हत्ती, घोडे आणि मावळे उभे राहीले. लाईटवर चालणाऱ्या पणत्या लावल्या. किशोरची म्हातारी आईही मुलांच्या आनंदात सामील झाली. मुलांनी त्या किल्ल्याला किशोरगड नावही दिले.मुख्य म्हणजे शाखेने भरवलेल्या गड बांधा स्पर्धेत आमच्या मुलांना रू २५०००/ चे बक्षिसे मिळाले. बिल्डिंग मधील सर्व मोठ्या माणसांनी मुलांचं कौतुक केलं. मुलांच्या उपक्रमात मोठ्या माणसांनी हातभार लावला तर त्यांनाही पुन्हा बालपण जगत येईल याची जाणीव मलाही नकळत झाली. माझ्या बालमित्रांचे किल्ला बनवण्याचे अपुरे स्वप्न या बच्चेकंपनीने पूर्ण केले होते आणि किशोरच्या स्मृतीला वंदनही. मुलांच्या प्रामाणिक प्रयत्नांना माझा सलाम.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar