अभिलाषा

अभिलाषा

तू निघून गेलीस तरी सरली नाही आठवणींची नशा
किती काळ लोटला ठाऊक नाही अजून मनी वेडी आशा

आपल्या हळव्या नात्यात होती एक अस्पष्ट पुसट रेषा
प्रेयसी की सखी ठरले नव्हते होती मैत्रीची अभिलाषा

भेटीची तिच ओढ, तीच आस, नव्हती, कसली आकांक्षा?
दिवास्वप्न म्हणजे नक्की काय? कळेना स्वप्नाची परिभाषा

तू म्हणजे उषेचे स्वप्न, दिव्यातील वात, तू चैतन्याची कक्षा
तुझ्या निगर्वी रूपावर भाळूनही शांत रहावे ही सत्वपरीक्षा

वाट पाहतांना केला नाही कंटाळा, ना मागितली मैत्रीची भिक्षा
शारीरिक ओढीच्या पलीकडले काही, मैत्रीला नव्हती रूपरेषा

सतेज चैतन्यात न्हाऊन पवित्र व्हावे हा तुला अभिजात वारसा
नजरेतील करूणतेने मलीनता नष्ट करावी हा तुला उपजत वसा

तुझ्या रुपात नव्हते काही कमी, नितळ मन हाच तुझा आरसा
डोकावून पहावे आरसपाणी मनात असाच तुला ईश्वरी वारसा

तुला प्रत्येक विषयात रूची, त्याचे ज्ञान, तुझी प्रगल्भ समृद्ध भाषा
तुला न विकारांचा स्पर्श, न खोटा हर्ष, तुज ठाऊक प्रगतीची दिशा

कधीकधी विलग होतात रस्ते, वाट्यास नकळत घोर प्रतीक्षा
काळजातील आठवण पुसली जाणार नाही हीच प्रेमळ शिक्षा

तुझ्या सहवासाची होती अंतरी आस पण नसे विखारी अपेक्षा
तू कुठेही असशील तेथे सुखी रहा हीच मनीची अंतिम इच्छा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar