अयोध्येस परतला राम
दशरथपुत्र राम, वशिष्ठ शिष्य, उत्तम धनुर्धारी
एकनिष्ठ, सत्यवचनी, विनय, विवेकी, सदाचारी
कौसल्या नंदन राम, गुणांची खाण, तो पुरुष अवतारी
हरण करी पीडा, संहारुनी राक्षस खडा, भजे ब्रह्मास अंतरी
बालक्रीडा रामाची विचित्र, मागू लागला गगनीचा चंद्र
प्रधान सुमंत बहु आयामी, धरीला आरसा त्यास केला शांत
दशरथपुत्र एकवचनी राम, त्याचा भक्त बलशाली हनुमान
कौसल्या पुत्र राम गुणवान, लक्ष्मण भरत शत्रुघ्न अभिमान
लव, कुश पुत्र अभ्यासू सज्ञान, रामाचे ते गाती गुणगान
मंथरा दुष्ट दासी, कैकई संशयी, भोगले कौसल्येने परिणाम
ऋषी विश्रवापुत्र, केकसी नंदन, दशग्रंथी रावण, महाविद्वान
चार वेद सहा शास्त्रे पठिता मिळविले ज्ञान, रामचंद्रा होती जाण
आयुर्वेद पारंगत, राज्यशास्त्र नितिज्ञ, संगीत कौशल्य याचे ज्ञान
तपस्वी, शिवभक्त, लंकेश, इंद्रासहित देव पराभूत, महाबलवान
भ्रष्ट बुध्दी, सरला विवेक, हरिले सितेस, अविवेककाचा परिणाम
जानकीस बनविले बंदी, अशोक वनात शोकाकुल, कंठी राम नाम
अशोकवनी शोकाकुल सीता, दुत बनूनी भेटीस गेला बलवान हनुमान
परिचय देण्या स्वतःचा जानकीस छाती फाडून बळे सीतेस दाविला राम
मंदोदरी विनवे लंकेशा, सत्वरी मुक्त करा सीतेस, करुन योग्य सन्मान
अहंकारी रावण वदे मंदोदरीस, सीतेस भार्या बनवीन, लंकेची राखीन शान
विभिषण रावण बंधू, त्यागूनी लंका, रामचरणी लीन, मागे जीवदान
रामे अलींगले त्यासी, विचारून कुशल, देऊन आसन केला सन्मान
विभिषणे सांगितले गुपित, अमृतकुंभ नाभी कुपीत, लक्ष तिथेच बाण
कुंभकर्ण, इंद्रजित पडले रण भूमीत, झाली लंका नगरीची दाणादाण
महायोद्धा, महाशूर, बलशाली, लंकाधीश अवतरला रणभूमी, कपींची पकडे मान
बहू हस्त विविध आयुधे, विकट हास्य, कंपित योध्दे, बलशाली राक्षसी अभिमान
रामे लावूनी अमोघ बाण ओढली प्रत्यंचा, धाडीले रावणास निजधाम
तपोबल विजयी, शुरवीर, एकबाण राम, कर जोडून रावण वचे रामनाम
विजयादशमी उत्सव अयोध्येत, जो तो म्हणे परतला माझा विजयी राम
घेता भेट भरताची, ओघळले नेत्र चरणी रामाच्या, वचनाशी भरत ठाम
पावले चालती योजना सहस्त्र, न थकवा मनास सोबतीस माझ्या चाले राम
निजसुख, हसतमुख, अजानबाहु, प्रभू रामचंद्र, तोच विष्णू तोच घनश्याम
सजे जन्मभूमी रामाची अयोध्या, उजळती दिप चहुकडे पहा छान
कोटी, कोटी भक्त, भेटीस अधीर अयोध्या, जेथे पुर्नवसे त्यांचा राम
राम ना कुणा ऐकाचा, अहिल्येचा, अन शबरीचा, सुग्रीव, विभिषणाचा
गुंजते नभांगणी ऐका रामनाम, राम आहे आराम, ह्दयी या चराचराचा
त्रैलोक्य सारे भजे अंतरी, पितृभक्त, सत्यवचनी, एकपत्नी माझा श्रीराम
दोन अक्षरी मंत्र जिव्हेवरी जपता मिळे जिवा आराम, भजा रे नित्य राम, राम
अयोध्येत अवतरे रामराज्य, ऋषी मुनी, भक्त, सज्जन समस्त गाती गुणगान
पेटे नंदादीप, घंटा निनादे, किर्ती त्रिखंडी पुन्हा गाजे, बैसले मंचकी राम