शेवटचे पत्र

शेवटचे पत्र

तुम्हाला आठवतय का तुम्ही शेवटचं पत्र कधी आणि कोणाला लिहीले? खरं सांगायचं म्हणजे मलाही नाही आठवत, खूप ताण देऊनही नाही आठवत. आमचं,म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा त्या वर्षी एप्रिल महिन्यात मिसेस मुंबईवरून गावी गेली आणि सप्टेंबरमध्ये घरी गणपती येणार म्हणून थांबली त्या पाच सहा महिन्याच्या काळात तिला पत्र लिहिल्याचं आठवतय, त्या नंतर ती कधीही एकटी गावी राहिली नाही आणि दुर्दैवाने पत्र लिहिण्याचा योग हरवला. एकदा कशावरून तरी पत्राचा विषय निघाला आणि मुलं म्हणाली, बाबा तुम्हाला आठवतयं का तुम्ही आईला पत्रात काय लिहायचा? ‘ही’, मुलांवर रागावली, म्हणाली “तुम्हाला कळतयं का तुम्ही बाबांना काय विचारताय ते” मुलं हसली. मुलगा म्हणाला, “एखादं पत्र तरी आठवण म्हणून जपून ठेवायला हवं होतं.” त्या विचारासरशी मी भुतकाळात गेलो. काय लिहीत होतो आठवण्याचा प्रयत्न केला आणि हसू आलं. तुम्हीही पहा आठवून, मला खात्री आहे, तुम्ही लिहिलेल्या एखाद्या पत्राची आठवण तुम्हाला भुतकाळात नेऊन सोडेल. ते पत्र कधी, कशासाठी लिहीले ते आठवेल.

मोबाईल नसतांना, प्रेमपत्राचा मायना कसा होता? ‘लाडके, प्रिये, माझ्या राणी मला तुझी खूप आठवण येते, तु कधी येशील? तुझ्या विरहात मी झुरतो आहे. तुझ्याशिवाय मला एक क्षणही करमत नाही, सारखी तुझीच आठवण येते. तूझ्या पत्राकडे डोळे लावून मी बसलो आहे.’ असा साधारण तो समान मायना असावा, अगोदर मुली घरात नवऱ्याला प्रेमाने किंवा लाडात अहो ऐकलत का! असं म्हणायच्या, तर शहरातील उच्च मध्यमवर्गीय My Sweetheart म्हणत, पण त्या ऐवजी आता नवऱ्याला पिल्लू, Baby म्हणतात. ऐकून अगदी गलबलून येतं. त्यांनी अशी हाक मारली की, नवरा, हात आणि गुढघ्यावर राहून, ‘भू ,भू’ करत, नसलेली शेपटी हलवतो की कसे? माहिती नाही. अर्थात त्या नवऱ्याला पत्र लिहीत नाहीत तर ही गोष्ट मोबाईलवर किंवा सरळ समोरा समोर सांगतात. हेच लिहून कळवले असते तर हा मायना संस्मरणीय झाला असता.

तुम्ही असच एखादे पत्र आपल्या तिला किंवा त्याला नक्की लिहिले असेल. जरा मेंदूला ताण देऊन पहा, ते आठवणे ही सुध्दा एक गंमत असते. जसे लग्नाचा अल्बम काढून आपल्या मुलांना तो दाखवतांना पत्नीच्या फोटोकडे बोट दाखवून तुझी आई एवढीशी होती म्हणणे गंमतीचे असते. तर तुम्ही ते शेवटचं पत्र कधी लिहिले आठवायचा प्रयत्न करा, तिची किंवा त्याची मदत घ्यायला हरकत नाही पण फोन ए फ्रेंड नाही, बरं का!, ज्या जोडप्यानी संपूर्ण आयुष्य एकत्रच काढलं त्यांना विरह, हुरहूर काय कळणार म्हणा?

तर आमच्या देवस्थान मंडळाकडून वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि आशीर्वाद पत्र येते, म्हणजे येत होते. करोना काळापासून ते बंद आहे, देवस्थान ट्रस्ट मंडळाचा असा विचार असावा की आपण पत्र का पाठवले? याचा आशय लक्षात घेऊन काहीतरी भरीव देणगी देवस्थानच्या नावे पाठवली जाईल. असे वाटण्यात काही चूक नाही, काही स्वतः अशी देणगी देतात. आमचे संकट वेगळे होते,एकदा काही रक्कम पाठवणे फारसे अवघड नक्की नव्हते पण त्या देणगीची त्यांना सवय होईल आणि अपेक्षा वाढत जातील. त्यामुळे या देवस्थान मंडळाला या पत्राची पोच न देण्याचा करंटेपणा मी केला हे अगदी खरे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासी संघ यांचा मी तहहयात सदस्य आहे. जेव्हा कोकणात जाणारी रेल्वे नव्हती तेव्हा ग्रुप बुकिंग करून आम्ही गणपतीसाठी गावी जात होतो. त्यानंतरही हा संघ कायम होता, दर वर्षी ते एसएससी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा बक्षीस समारंभ आणि हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करत असे, ज्याचे निमंत्रण पोस्ट कार्ड वरती येत असे. कालांतराने ते बंद झाले. लोकांना गावी जाण्यासाठी पर्याय मिळाला आणि राजू अंधारी याला सिंधुदुर्गवासी विसरले.

आमच्या डोंबिवलीत सेवानिवृत्त संघाचे पोस्ट पत्र या संघातील सदस्यांना येते. सोसायटीच्या टपाल पेटीत ते पडलेले असते म्हणुन कळते. असेच पोस्टकार्ड कोकणातील काही गाव मंडळींचे हळदीकुंकू कार्यक्रमाचे यापूर्वी येत होते. करोना नंतर बहुधा असा पत्र व्यवहार बंद झाला.

तीस वर्षांपूर्वी माझे परूळा येथील मामे सासरे माझ्या नावाने पोस्ट कार्ड पाठवायचे त्या कार्डाच्या डोक्यावर ठळक श्री लिहिलेला असा, मग “रा.रा. मंगेशराव यांस पत्र लिहिण्यास कारण की अलीकडे बरेच दिवसांत आपले पत्र न आल्याने तेथील खुशाली कळलेली नाही. येथे अवेळी वादळ पाऊस झाल्याने बागेतील सुपारी कोसळून पडली, वगेरे वगेरे.” त्यातला तो रा.रा. फार सुखावून जाई, आता कोणी राजमान्य राजश्री लिहीत नाही, लिहीणार नाही. सुंदर अक्षरातील आणि एका सरळ रेषेतील पत्र पाहणं, वाचणं हा एक आगळा आनंद असतो. मी तो तेव्हा घेतला. त्यांचे एखादे पत्र, नमुना म्हणून जपून ठेवायला हवे होते. पण आम्ही सगळच रद्दी म्हणून पाहणारे कर्मदळीद्री.

मात्र मा. विकास आमटे यांचे एक पत्र माझ्या संग्रही आहे. ते मुद्दाम जपून ठेवले आहे, शोधावे लागेल.असेच एक पत्र आमच्या शाळेचे संस्था सदस्य मा. अशोक कुलकर्णी साहेब यांना रक्तदान केल्यानंतर पाठवले होते. एक पत्र राणीताई बंग यांनी शाळेला एका कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून भेट दिल्यानंतर लिहीलं होत, ते ही आहे. खर तर हा ठेवा जपून ठेवायला हवा. त्या पत्रात लिहिलेले शब्द हे मनाच्या गाभ्यातुन आणि आपुलकीच्या शाईने लिहिलेले आहेत असं वाचतांना जाणवलं.

जेव्हा फोन नव्हते तेव्हा पोस्टातुन येणाऱ्या पत्राची खूप उत्सुकता असायची, जर पोस्टमन घराच्या दिशेने येतांना दिसला तर लहान मुले, धावत जाऊन, काका कोणाचं पत्र आहे? विचारपूस करत, आता त्या आठवणी राहिल्या. नाही म्हणायला आजही, सरकारी कागदपत्रे असतील तर ती टपाल खात्यामार्फत पाठवण्याची सरकारी पद्धत आहे. मात्र बरेचदा हे पत्र वेळेवर मिळत नाही. विशेषतः जर एखाद्या सरकारी पदासाठी मुलाखत असेल, वैद्यकीय तपासणी असेल तर त्याचे पत्र तुम्हाला ही मुलाखत किंवा वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यावर प्राप्त होते त्यामुळे अनुभवाने लोक सर्वस्वी या टपाल खात्याच्या भरवश्यावर रहात नाहीत. न जाणो भरवश्याच्या म्हशीला टोणगा व्हायचा. टपाल सेवा योग्य नसल्याने अनेक मूल नोकरी मुलाखतीस मुकली. साहजिकच हा तळतळाट लागूनच टपाल खात्याचा कारभार आटपत आला असा माझा समज आहे.

खुले पोस्ट कार्ड आणि आतंरदेशीय किंवा पोस्ट पाकीट यात बराच फरक पडतो. ज्याला ढोबळ लिहायचं असेल तो चार ओळी खुल्या कार्डवर खरडून पाठवतो याचे कारण ना अंतकरणाची तळमळ, ना वळवळ मांडायची असते ना विरह, ना मनाची गहिरी जखम वा खोली मांडायची असते. फक्त एक सोपस्कार पार पाडायचा असतो तुमच्या पर्यंत मी पोचलोय, फारच फार तर ठिक चाललय ना? या पलीकडे कोणताही अट्टाहास नसतो. अर्थात अशा पत्राचे उत्तर देणे वा पोच देणे गरजेचं असतच असही नाही.

पण दोन प्रेमिकांचे पत्र म्हणजे ते आंतरदेशीयच असायचं. दाटून आलेल्या भावना चार ओळीत व्यक्त तरी कशा करणार? कधीतरी बहुधा तिच्या भावना अनावर व्हायच्या आणि जिथे जागा शिल्लक असेल तिथे किंवा आंतरदेशीय पत्राची चिकटवायची कडा, असायची त्यावर त्या पत्राचा शेवट व्हायचा.

कधी आंतरदेशीय पत्र पुरायच नाही मग तो किंवा ती चार पानांचं पत्र पाकिटातून पाठवायची. लिहितांना ते चार कागदीही नाही पुरायचे आणि मग अनावर भावनाने हे पत्र तिच्या अश्रूंच्या थेंबाने भिजलेलं असायचे. त्याला ते बरोबर कळायचे आणि तो ते पत्र वाचतावाचता गहिवरून जायचा. डोळे भरून यायचे. तो त्या पत्राचे उत्तर तितकेच प्रदीर्घ लिहायचा. मधू इथे अन चंद्र तिथे अशी अवस्था व्हायची, पण ‘शासन नियमांची नोकरी’ आणि ‘पापी पेट का सवाल’ असायचा. फारच कढ आला तर मात्र तो, आई किंवा बाबा यांना मारून त्यांच्या मृत्यूची तार मिळवून तिला भेटण्यासाठी निघून यायचा. तेव्हा अशी ही प्रेमपत्र. पण हरामखोर मोबाईल आला आणि त्याने ती गम्मत घालवली.

के मेरा प्रेम पत्र पढकर, तुम नाराज ना होना
तुम मेरी जिंदगी हो, तुम मेरी बंदगी हो ।
तुझे मै चांद केहता था, मगर, उसपे भी दाग है
तुझे मै सूरज केहता था, मगर उसमे भी आग है।

तेव्हा या पत्राद्वारे वारेमाप स्तुती करायला पेन थकायचं नाही. हे पत्र उघडतांना ती हलक्या हातानी ते फाटणार नाही अशा कलाने उघडायची कारण ते पत्र किंवा लिफाफा बंद करतांना तिच्या सजणाने त्याला ओठांचा स्पर्श केला आहे याची तिला खात्री होती.

पत्रात, तुझ्यासाठी काय काय करीन, याची यादी खूप मोठी असायची अगदी चांद,सितारे तोड लाऊ अस म्हणायला तो पाठी पुढे नाही करायचा.असा हा प्रेम पत्रांचा सिलसिला.

पण जर तुम्ही जर एखाद्या मंडळाचे सभासद असाल आणि त्रैवार्षीक किंवा तशीच एखादी सभा असेल तर सोपस्कार म्हणून अस खुलं पत्र पाठवल जातं. आपण खरेच जर त्या संस्थेच हितचिंतक असू तरच ते पत्र गांभीर्याने घेतो अन्यथा वाचून होताच महत्त्वाचे नसल्याने त्याची रवानगी कचरापेटीत होते. कधीकधी आपले राजकीय महत्त्व सिध्द करण्यासाठी सामान्य नागरिकांना आवाहन करून त्यांचे समर्थन करणारे पत्र लिहिण्यासाठी उद्युक्त केले जाते. नव्हे तसा प्रघात आहे. आपल्या पाठीशी मोठा जनसमुदाय आहे हे वरिष्ठांना जाणवू देण्याची ती ट्रिक आहे.

अलीकडे काही राजकीय नेते किंवा अण्णासारखे समाजसेवक वर्तमानपत्रात महानगरपालिका कमिशनर, पोलीस निरीक्षक,आयुक्त, एखाद्या खात्याचा मंत्री, मुख्यमंत्री पंतप्रधान यांना खुले पत्र लिहितात. कधी ती सूचना असते तर कधी चूक नजरेस आणून देणे वा जाब विचारणे असते. आता अण्णालोकांना लोक फारसं मनावर नाही घेत.

मा. माजी अर्थमंत्री असे खुले पत्र लोकसत्ता वर्तमानपत्रात लिहीत असतात. गिरीश कुबेर, कुमार केतकर यासारखे जागरूक लोकसेवक आणि अर्थात संपादक अशी पत्रे लिहून काही राजकीय नेत्यांचे पोलखोल करत असतात. ही राजकीय मुस्सदेगीरी विरोधी पक्षांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असते. जर आपल्या चुका कोणी मान्य करत नसेल तर जाहीर वाचा फोडणे गरजेच आहेच पण कोणत्याही एका पक्षाच्या दावणीला बांधल्या प्रमाणे बुध्दीजीवी वागू लागला की समजावं त्याला आमदारकी, खासदारकी याचे वेध लागले. कुमार केतकर यांनी हेच साधलं म्हटलं तर वावग ठरू नये.

आजकाल बरीच वर्तमानपत्र एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधलेली असतात. त्या वर्तमानपत्रांना मोठ्या जाहिराती मिळवून देण्याच्या बदल्यात किंवा आर्थिक मदत देण्याच्या बदल्यात पक्ष किंवा त्यांचा नेता स्वतःच्या समर्थनार्थ आणि विरोधकांचं पितळ उघड पाडणाऱ्या बातम्या किंवा संपादकीय छापून आणतो. त्यामुळे काही वर्तमानपत्र ही सत्ताधारी गटाची तर काही विरोधी गटाची समर्थक असतात. संपादकीय हे खुले पत्रच असते. त्या पत्राचा गेंड्याची कातडी परिधान केलेल्या नेत्यावर काही परिणाम होतो की नाही न कळे, पण कधीकधी एखाद्या संपादकीय
लेखामुळे संपादक रस्त्यावर येऊ शकतो. तेव्हा पत्र हे इशारावजा धमकी बनते. ज्यामुळे करिअर बनते किंवा संपते. आपले शब्द हे दुधारी हत्यार आहे त्याचा योग्य वापर केला तर नाती बहरतील आणि हातून चुक घडली तर करिअर संपून जाईल. वागळे यांच काय झाल ते आठवून पहा. हल्ली ते दोन्ही हात हलवूनही फारसे बोलतही नाहीत.

असो, अलीकडे तर कोणीही खुले पत्र लिहिते. यामध्ये एखादी अभनेत्री एखाद्या दिग्दर्शकाने आपल्याशी कसा व्यवहार केला या बाबत एखाद्या वर्तमानपत्रात लिहिते, या मागे षडयंत्र असण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा तिच्याबाबत अनिष्ट प्रकार घडतो तेव्हा ती त्या बदल्यात त्या व्यक्तीकडून ती विविध मार्गाने भरपाई करून घेत असते मात्र काही कारणास्तव तिला मिळणारा लाभ बंद झाला तर मात्र ती या बाबत जाहीर वाच्यता करून त्याला जगासमोर उघडा करण्याचा कांगावा करते. हे झालं जाहीर पत्रासंबंधीत. पण एक व्यक्ती मग ती पुरुष असो की बाई आताच्या काळात मोबाईल वर विविध अँप असतांना पत्र का बरे लिहिलं? फार तर जर ज्या ठिकाणी तक्रार नोंदवायची असेल तेथे प्रत्यक्ष जाणे सोयीस्कर नसेल किंवा काही कारणामुळे टाळायचे असेल तर तक्रार म्हणून पत्र लिहून टपाल कार्यालयात टाकेल. तथापि आजही एखाद्या गोष्टीचा आग्रह उच्च पदस्थ व्यक्तीकडून करण्यासाठी किंवा आपल्याला जनतेचे किती समर्थन आहे हे दाखवण्यासाठी पत्र मोहीम राबवली जाते हे ही खरे.

या पूर्वी, ज्याला मनाची दुखरी जखम मांडायची असेल किंवा जिला आपली विरह वेदना सख्याला पोचवायची असेल ती चोरून पत्र लिहून गाण्यातच आपली वेदना मांडत होती, आठवा ते गाणं,
लिखे जो खत तुझे ओ तेरी याद मे
हजारो रंग के नजारे बन गये
सवेरा जब हुवा तो फुल बन गये
जो रात आई तो सितारे बन गये

किंवा

अफसना लिख रहा हू, दिले बे करार का।
आँखो मे रंग भरके तेरे इंतजार का ।

तर अशा अनेक गाण्यांतुन प्रेमपत्राचे महत्त्व अधोरेखित होते.

चिठ्ठी आयी है वतन से चिठ्ठी आयी है
बडे दिनो के बाद हम बेवतनोके बाद
वतन से चिठ्ठी आयी है।

तर तेव्हा चिठ्ठीचा असा हा सिलसिला सुरु असायचा. एवढच कशाला अहो पुस्तकातुन किंवा वहीतुन चिठ्ठ्याचपाट्या एकमेकांना पाठवल्या जायच्या आणि त्याची हुरहूर चिठ्ठी हातात पडून ती एकांतात वाचेपर्यंत असायची. कधीतरी ही चिठ्ठी किंवा पत्र नको त्या व्यक्तीच्या हाती पडायचं त्यातून गोंधळ निर्माण व्हायचा किंवा घरातीलच जाणत्या माणसाच्या हाती पडलं तर प्रेम प्रकरण फुलण्याआधी त्याचा अंत व्हायचा.

कधीकधी ते पत्र किंवा चिठ्ठी शेवटची असायची. ते पत्र ह्रदयाशी धरून हमसून रडणं किंवा रागाने त्या पत्राच्या चिंधड्या उडवण ओघाने आलंच. पण ज्या विवाहित जोडप्यापैकी पत्नी घरी आणि तो पोटाच्या शोधार्थ, म्हणजे नोकरीसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक किंवा सुरत, बडोदा अशा मोठ्या शहरात असायचा आणि जेव्हा घरी फोन बाळगण्याची श्रीमंती तर नव्हतीच पण गावात सार्वजनिक फोन बुथ नव्हते तेव्हा ते दोघ पत्रातून आपल्या भावना मांडायचे. लग्न होऊन पंधरा दिवस होत नाही आणि एकमेकांची नीट ओळखही पटत नाही, मन आणि शरीर एकमेकांना भेटत नाही, जाणून घेत नाही तोपर्यंत त्या बिचाऱ्या नवऱ्याला नाईलाजाने घरी सोडून शहरात नोकरीसाठी धाव घ्यावी लागायची.

सैनिकांच्या जीवनाची कहाणी वेगळीच. एकदाच, तरुण वयातच प्रेम जुळते ते देशावर आणि प्रेयसीवर, त्याला सरहद्दीवर पोचण्याच पत्र किंवा तार येत आणि जड अंतकरणाने तो तिचा निरोप घेतो, पाय निघता निघत नाही. हात हातातून सुटत नाही पण कर्तव्य पथावर निघावंच लागत. तिचे डोळे डबडबतात, त्याच अंतकरण भरून येत पण इलाजच नसतो. मग दोघांमध्ये पत्र लिहिण्याचा सिलसिला सुरू होतो. दुर्दैवाने सैनिकांनी पाठवलेली किंवा त्यांना आलेली पत्रे देशाचे हित लक्षात घेऊन तपासली जातात त्यामुळे प्रेम आणि विरह व्यक्त करण्यात अडसर निर्माण होतो. तो प्रत्येक पत्रात लवकरच आपली भेट होईल असे आश्वासन देतो आणि एक दिवस त्याचं कलेवरच तिच्या भेटीला येत. तेच त्याच अखेरच पत्र ठरतं, त्याच्या त्या शेवटच्या पत्रावर ती अश्रूंचा अभिषेक करते. त्याची आठवण पुसून टाकण तिला अशक्य होते.

ग्रामीण भागात जेव्हा मुलींना शाळेत पाठवल जात नव्हतं आणि अगदी सोळा अठराव्या वर्षी लग्न ठरत होतं, तिचा तो, “सेहर मे जाकर खूब कमाऊंगा और हम धुमधाम से शादी करेंगे.” म्हणत तो शहरात जातो. तेव्हा त्याने पत्र पाठवलं तर तिला ते पत्र डाकीया कडून वाचून घ्यावं लागायचं आणि तो वाचून दाखवताना ती डोक्यावर पदर घेत अनेकदा लाजायची तर त्या डाकबाबूला ती का लाजते? तेच कळत नसायचं. तो तिला विचारायचा, ”क्यू शर्मा रही हो?” जणू काही त्याला प्रेमाबद्दल काही माहिती नसावं.

डाकीया डाक लाया,डाकीया डाक लाया
किसी का पयाम कही दर्दनाक लाया ।।
राजेश खन्नावर चित्रित झालेल गाणं नक्की आठवत असेल.

ती किंवा तो सुशिक्षित असेल तर ठीक, जर तसे नसेल तर त्यांना कोणाच्या तरी सहाय्याने आपल्या सख्याला किंवा सखीला पत्र लिहाव लागे, तिच्या कोमल भावना ती किंवा तो परक्या माणसाकडे व्यक्त तरी कशा करणार? पण पत्र न लिहूनही चालणार नसते कारण त्याचे पत्र ठरल्या वेळी आले नाही तर ती वेडीपिशी होईल कदाचित अन्न बंद करेल याची त्याला खात्री असते. तर तेव्हा पत्रातून प्रणय व्यक्त केला जात असे. अखेर pco आले आणि पत्रातून भेटीची तळमळ, हुरहूर व्यक्त करण्याचे दिवस संपले.

या पत्र व्यवहारात कोणी कोणाला शेवटचे पत्र लिहिले आणि त्याची परिणती काय झाली ते समजणं तसं अवघड आहे. पण या पत्राची वाट पाहण्याची अनोखी मजा होती हे मान्य करावेच लागेल. आमच्या पिढीने या पत्रांचा आधार घेऊनच आपले प्रेम व्यक्त केले. आज इंस्टाग्राम किंवा अन्य माध्यम आहेतच. येस or नो. हुरहूर वगेरे काही असते, लागते की कशी त्यांनाच माहित. WhatsApp मेसेज, किंवा चिन्हे पाठवून भावना व्यक्त करण्याचा जमाना आहे. तिने किंवा त्याने रिप्लाय करण्यासाठी काही सेकंद वेळ लावला तरी ब्रेकअप होऊ शकतो म्हणून त्याला किंवा तिलाही सतत, जागते रहो च्या भूमिकेत मोबाईल आणि बोटे तयार ठेवावी लागतात. सतत अलर्ट रहावे लागते. ‘ये कंबख्त मोबाईल जीने भी नही देता और मरने भी नही देता म्हणायची पाळी आहे.’

पांडुरंग साने अर्थात साने गुरूजी यांनी आपली पुतणी सुधा हिला आदर्शवाद आणि जगण्याचे तत्वज्ञान शिकवणारी अनेक पत्रे लिहिली. खरे तर ही पत्रे महाराष्ट्रातील सर्व मुलांना उद्देशून लिहीली होती. सानेगुरुजी यांची पत्रे ही आदर्श पत्राचा नमुना आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. अर्थात त्यांचे पुतणी सुधा हिला लिहिलेले शेवटचे पत्र साधनामध्ये प्रकाशित झाले होते की नाही समजवायस वाव नाही.

HSC Board येथील भिंतीवर अब्राहम लिंकन यांचे आपल्या हेडमास्तर यांना लिहिलेले पत्र उद्धृत केले आहे. त्यात लिंकन म्हणतात, “तुमच्याकडे येणारा विद्यार्थी विद्वान असेल वा सामान्य, प्रामाणिक असेल वा अप्रामाणिक, श्रीमंत असेल वा गरीब, त्याला जगण्याची कला शिकवा आणि सत्याचा मार्ग दाखवा. पुस्तकात लपलेला खजिना त्याला दाखवा. निसर्गात दडलेल चैतन्य पाहण्याची नजर त्याला द्या. यशस्वी होण्यासाठी चुकीचा मार्ग धरू नये हे त्याला समजवा. चांगल्या माणसाशी चांगले आणि ठकाशी ठक बनून वागावे हे त्याला कळू द्या. आपल्या आतला आवाज ओळखायला त्याला शिकवा. जगातील गोंधळात टिकून रहायच्या शक्तीची ओळख त्याला द्या.” असे पत्र भावनिक असते पण हे समजून घ्यायला काळीज जीवंत असावं लागतं.

एखादा कैदी, कैदेतून पळून जातांना किंवा आपली दिर्घकालीन शिक्षा संपवून जातांना तुरूंग अधिकाऱ्यास काय पत्र लिहिल याचा विचार करून पहा. कोणताही गुन्हेगार विनाकारण गुन्हा करण्यास धजावणार नाही. त्याने गुन्हा करण्यापूर्वी त्याच्या मनाची स्थिती काय असावी? त्यामुळे हातावर तुरी देऊन गुन्हेगार पळाला तरी त्यांनी आपले मन उघड केले, क्षमा मागितली या बाबत तो पोलीस अधिकारी सहमत असावा की मेमो मिळणार, या मूर्ख गुन्हेगाराला शोधून मोठी शिक्षा द्यायला हवी असा विचार करेल काही सांगता येत नाही.

दोन देशात जेव्हा शीतयुद्ध सुरू असते तेव्हा त्या देशादरम्यान होणारा जुन्या काळातील पत्र व्यवहार दुताकडून होत असे. जोवर दोन देशात समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत दोन्ही बाजुचे सैनिक यांची स्थिती अतिशय अवघड असते. जागा सोडताही येत नाही आणि हल्ला करताही येत नाही. अशावेळी प्रत्येक वेळेस येणारा किंवा जाणारा खलिता हा शेवटचा ठरो अशी घरापासून अनेक महिने दूर असणारे सैनिक प्रार्थना करत असावेत. तेव्हा पत्र म्हटलं तर एक कागदाचा तुकडा आणि म्हटलं तर आशानिराशा. म्हटलं तर एखाद्या गोष्टींवर निश्चित उपाय आणि म्हटलं तर शब्दांच्या जखमेनी होणारा अपाय. ते पत्र इच्छित स्थळी पोचेपर्यंत मनाची किती तगमग होत असावी ते शब्दात मांडणं तसही कठीणच.

आता मोबाईल आल्यापासून परदेशात रहाणाऱ्या आपल्या मुलाशी, मुलीशी व्हिडीओ कॉल करून बोलता येत असल्याने कुणाला पत्र लिहण्याचा प्रश्न येत नाही पण ज्यांनी आपलं घरदार विकून किंवा कर्ज काढून मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवलं पण त्यांनी पाठवलेल्या पत्राची ना दखल घेतली गेली, ना उत्तर लिहिलं गेलं. बिचारे पालक आजउद्या मुलांच पत्र येईल या आशेने व्हरांड्यात फेऱ्या मारून थकून विझून गेले. त्यांनी अनेकदा पत्र पाठवूनही उत्तर न आल्याने हताश, निराश झालेल्या आईबाबांच्या शेवटच्या पत्राचा तपशील काय असावा? खरंच मुलाला पत्र मिळत नव्हते की त्यांनी आपल्या जीवनातून जन्मदात्या पालकांना वजा केले होते की त्या मुलांवरच काही आपत्तीचा डोंगर कोसळला असावा? नक्की काय घडले असावे? तेव्हा त्या शेवटच्या पत्रातील आशय वाचून कोणाच्या प्रेमाला भरती आली असावी, तर कोणी हळहळले असावे तर कोणाला शेवटचे पत्र कधीच मिळाले नसावे आणि त्या धक्क्यातच त्याने राम म्हटला असावा.

मात्र विनायक दामोदर सावरकर यांचे पत्र आजही कुठे उपलब्ध असेल तर त्या पत्रातील आशय पाहून, किंवा मुक्त संवाद ऐकून मातृभूमी आतून थरारून जागी होईल आणि म्हणेल, “विनायका ये बाळा तुझी मी आतुरतेने वाट पहात आहे, ये मला तुला आलिंगन देऊ दे.” अशी अनेक पत्रे असतील की जी ज्यांच्यासाठी त्यांच्या प्रिय व्यक्तींनी लिहिली त्यांना कधीच मिळाली नसतील आणि ते पत्र मिळेल या आशेवरच जगता जगता त्यांनी जगाचा निरोप घेतला असेल. तेव्हा पत्रातील शब्दांना असतो अर्थ, विचार, संवेदना, भावना ज्यानी कोणी फुलेल ,हसेल तर कोणी त्या शब्दांनीच जायबंदी होऊन स्वतः ला हरवून बसेल. कोणी त्यातील मतितार्थ मनाच्या गाभ्यात रूजवेल आणि स्वतःच्या आयुष्याचे सोने करेल. शब्द पत्रातील असो की मुखातील पहिले असो की शेवटचे त्यांचा सन्मान करा.आदरपूर्वक वापरा.

जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा पत्र हाच संवाद साधण्याचा दुवा होता. आता मोबाईलवर संवाद होतो की वाद, माहिती नाही पण सतत संपर्कात असल्याने प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हरवला आहे एवढे खरे.

पहा तुमच्या खाजगी कोषात एखादे असेच पत्र असेल, जे तुम्ही कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून लपवून ठेवले असेल. घरी कुणी नसतांना ते एकदा पहावे, त्या अक्षरांवर अलगद हात फिरवावा, त्याचा मुका घ्यावा, म्हणून शोध घेऊन वाचू पहाल आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल दडवलेले रहस्य, ती जखम भळभळून वाहू लागेल.

कदाचित असेही होईल ते पत्र आता तिला किंवा त्याला दाखवावे असे मनात येईल पण… या पणचे उत्तर माहित नसल्याने तुम्ही ते पत्र गुपचूप एखाद्या नदीच्या पात्रात प्रवाहित कराल आणि दोन आसवे गाळाल तुमच्या दरम्यान असणारा एक छोटा दुवाही संपला म्हणून…

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “शेवटचे पत्र

  1. मनिषा प्रदीप ताडमारे
    मनिषा प्रदीप ताडमारे says:

    आमच्याकडे आलेली पत्र फाईलला लावण्याची सवय यांना म्हणजे प्रदीप ताडमारे यांना आहे. त्यामुळे जुनी पत्र वाचतानाचा आनंद मिळतो.

  2. tempmal

    What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up

Comments are closed.