अश्वत्थाचा अंत

अश्वत्थाचा अंत

गेल्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळी भाईंचा फोन आला, “भगवान गेला” , मी काय समजायचे ते समजलो. आपल्या डोक्यात त्या व्यक्ती विषयी जुना संदर्भ असेल तर लगेचच ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी रहाते. भगवान गेला म्हणताच मला तो आठवला. खरे तर माडावर चढणे त्यानी बंद केले त्याला किमान दहा वर्षे तरी लोटली असतील. माड पोफळीवर चढण्यात त्याचा हातखंडा होता, काथ्याची दोरी माडासभोवती घेऊन फास तयार करून त्यात पाऊल अडकवले की तो चाळीस पन्नास फुट उंच माड एका दमात लिलया चढून जायचा. त्याची अंगयष्टी बारीक आणि उंची साडेपाच फुटाच्या दरम्यान असावी. कष्टाने रापलेला, दिसायला अगदी सामान्य पण कामात एकदम तरबेज.

भगवान गेला आणि गेल्या पस्तीस चाळीस वर्षांचा चलतपट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. कोकणात आमच्या दारासमोरच आमचे चार पाच एकर शेत आहे. सध्या जेमतेम एक एकर शेतात आम्ही भात लावतो आणि एकरभर भरड शेतात आम्ही नारळाची बाग केली आहे. उर्वरित शेत पड आहे. तेथे रान उगवते तर काही भागात शेतात व्हाळ पडले, ते शेत अगदी फुकट गेले. भविष्यात या शेतीचे काय होणार मनात आले तरी वाईट वाटते.

आजची ही परिस्थिती नजरेसमोर आली आणि तीसपस्तीस वर्षापूर्वीचा भगवान उभा राहिला. त्याचीच ही कथा. सामान्य माणूस कथेच पात्र होतं तेव्हाच सामान्य माणसाच्या कष्टाची जाण शहरातील लोकांना होते. आज खेड्यापाड्यात शेती नापीक पडली आहे येथील तरुण गाव सोडून शहराकडे गेले आहेत मात्र सणावाराला त्यांची पावले येथे पडतात. घराभोवती उगवलेले रान, मिटत चाललेल्या अस्तित्वाच्या खूणा, वाडीतील घटती माणसे पाहून ते ही हळहतात पण येथे थांबून प्रगती शक्य नाही म्हणत पुन्हा मुंबईची वाट धरतात. मग त्यांच्या हळहळण्याला अर्थ तो काय?

येथे शाश्वत विकासासाठी काही तरी ठोस उपाययोजना केल्याशिवाय ही घरघर थांबणार नाही आणि खेडी हळूहळू नष्ट होतील. ती होऊ नये म्हणून शहरातील नातेवाईकांनी गावाकडे असणाऱ्या आपल्या भावाची किंवा कुटुंबातील तेथे राहणाऱ्या व्यक्तींला मदत करून त्याला शेती करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे तरच गाव टिकेल. अन्यथा जेथे आंबा, फणस, काजू पपनस यांची लयलूट होती तेथे कोराटी उगवून तुमच्या आजा पणजाची नामोनिशाण मिटून जाईल.

आजही कोकणात ज्या घरात वावर नाही त्या घरांच्या छतावर गवत उगवलेले दिसते. तर काही भिंतीवर वड ,पिंपळ आपले बस्तान बसवून उभा आहे. शहरातील काही लोक आर्थिक परिस्थिती नाही म्हणून दोन दोन वर्षे गावी फिरकतही नाहीत. तर काही येथील गाशा गुंडाळून विदेशात स्थाईक झाले आहेत. कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या पुढील कुणाला आपले मुळ शोधायची लहर आलीच तर उत्खनन करून मातीच्या ढिगारा उपसून चौथरा शोधून काढावा लागेल. मुंबईत पोटासाठी आपण आलो तरी आपली पाळेमुळे टिकवून ठेवणे ही मुलभूत गरज आहे. उद्या शहरात पेचप्रसंग निर्माण झाला तर डोके टेकवण्यासाठी स्वतःची मठी (घर) हवी की नको? याचा तरूणांनी जरूर विचार करावा. आज महाराष्ट्रातील रजपूत लोक आपल्या कुलदेवतेच्या शोधात सौराष्ट्र, राजस्थान येथे जातात तसे आपले न होवो.

आता तुम्ही गावी गेलात तर तुम्हाला भेटायला चार दोन मित्र येतात, तुम्ही आवडीने मुंबईची भेट त्यांना देता पण तुमची मुले भविष्यात गावी आली तर त्यांची खबर घ्यायला कोणी असेल की नाही. तुमचे वडिलोपार्जित घर साफसूफ करून द्यायला पैसे देऊनही कोणी येईल की नाही, हा प्रश्न तुम्हाला भेडसावतो की नाही? म्हणूनच गावातील जुने लोक, त्यांची पुढील पिढी आणि हितसंबंध जपले पाहिजे. आमची शेती खंडाने करून देणारा ढाण्या वाघ, भगवान अचानक गेला आणि ही जाणीव मला तीव्रतेने झाली.

कोणेकाळी भगवान एखाद्या ‘अश्वत्थ वृक्षा’ प्रमाणे कुटूंबाला सावली देत होता आणि आमच्या मदतीला वेळोवेळी धावत होता, आम्ही गावी गेल्यानंतर येथून नेलेली भेट त्याला देत होतो. तो येतांना मेरेवर दिसला तरी आम्हाला आधार वाटे. तो असताना शेतीची कधीही काळजी वाटली नव्हती. पाऊस पडला वीज चमकू लागली आणि जोत शेतात असले की आम्हाला जोताचे बैल दगावतील म्हणून भीती वाटे. पण तो त्या भयानक वादळ वाऱ्यात एकटा जाऊन बैल घेऊन येई. त्याला काम सांगावे आणि त्याने ते निमूट पार पडावे असे अनेक वर्षे चालत होते. रसाळ फणसाचे झाड बरेच उंच, त्याचे फणस उतरवून द्यावे तर त्यानेच, कधीतरी लाकडे फोडून दे किंवा माडाचे अळे नीट करून दे, नारळ सोलून दे असे किरकोळ कामही तो करून देई पण त्यासाठी त्याने कधी हात पसरला नाही.

पस्तीस वर्षांपूर्वी आमच्याकडे धरते माड मोजकेच होते पण वर्षातून दोन तीन वेळा भगवान आमच्या दोन चार माडांचे नारळ काही मेहनतांना न घेता काढून द्यायचा. तीस वर्षांपूर्वी एका माडावर चढायला एक नारळ दिला जायचा ,आज कोकणात एका माडावरचे नारळ काढून द्यायला ₹१०० घेतात. मग त्यावर दहा नारळ असो की पन्नास. तेव्हा माणुसकीची किंमत होती आता पैसे मोजून माणूस मिळत नाही. आता यांत्रीक शिडीच्या मदतीने नारळ पाडतात पण त्यालाही तंत्र शिकावे लागते. ते येरागबाळ्याचे काम नाही.

भगवान त्याच्या घराकडून गावात चव्हाट्यावर निघाला की पहिला थांबा आमच्या ओसरीवर असायाचा. कोणीही दारावर आला तरी तहानलेला राहू नये म्हणून पाण्याचा तांब्या पेला ओसरीवर कायम ठेवलेलाच असे. आजही ती पध्दत गावात रूढ आहे. भगवान पेला बाजूला ठेऊन तांब्यातले पाणी न उष्टवता घटाघटा पिऊन चालू लागे.

कधीतरी मामी किंवा वहिनी त्याला विचारी, “रे! चा व्हयी हां?” त्याचे उत्तर ठरलेले, “असली तं दी, उगाच माझ्यासाठी करीत बसा नको.” मग मामी फुटी (कोरी) ‘चा’ त्याला स्टिलच्या छोट्या पेल्यातून आणून देई. दोन घोटात ती घशाखाली ढकलली की, “बाई चलतयं गे, गावातून बेगीन येऊक व्हया, मळणी काढलयं झाडूची रवली हां! ” म्हणत तो वाटेला लागे. क्वचित प्रसंगी तंबाखू-चुन्याची डबी मागून तंबाखू मळून तोंडात धरला की वाटेला लागे. त्याला फारशी उंची नव्हती मात्र चाल वेगवान होती त्यामुळे काही सेकंदात तो दिसेनासा होई. रंगाने तो काळा कुळकुळीत होता म्हणून मी त्याला गमतीने ‘देवचार’ म्हणत असे.

भगवान गेले अनेक वर्षे आमचे शेत पावसाळी भातासाठी वाट्याला करत असे, त्यालाच गावाकडे खंडाला करणे असेही म्हणतात. त्याच्याकडे उभ्या शिंगाची लाल-काळ्या रंगाची हुकमी बैलजोडी होती. त्यांच्या पाठीवर नुसता हात ठेऊन ‘हीडी-डी’ असा आवाज दिला की ते चालू लागत. पहिला पाऊस पडला की आमची घरासमोरील दोन तीन एकर शेती तो आणि त्याचा मित्र प्रदीप नांगरून काढत. त्यांच्या घरातच वडीलांना पानसुपारी लागत असे. घरातील महिलाही पान खात त्यामुळे त्याला पानसुपारी आणि बिडी चे व्यसन लहानपणापासून होते. काम करताना त्याला फुटा (बिन दुधाचा) चहा द्यावा लागे. नाश्त्याची त्याची तक्रार नसे. किंबहुना भूक हा शब्द त्याला माहित नसावा.

काम करता करता, तंबाखू तोंडात टाकली की त्याला उत्साह येई. चहा आणि तंबाखू ने त्याची भूक मारून टाकली होती. एकदा कामाला लागला की तो सहसा थांबत नसे. सकाळी साडेसहासातला नांगर जुंपला की दहासाडेदहाला तो बैल सोडून त्यांना पाणी पाजून मोकळे सोडून देई. अकरा वाजता एकदा पेज घेतली की तो उन्हाचा अंदाज घेई, फारसे ऊन नसले तर पुन्हा नांगर जुंपला की दिड वाजेपर्यंत सहजच नांगरत राही. त्या दरम्यान तो दोन तीन लिटर पाणी सहज पित असे. उन्हात त्याचे अंग घामाने डबडबून येई, मग त्याचे शरीर शिसवीच्या लाकडासारखे उन्हात चमके पण त्याची फिकीर करायला त्याला वेळ नसे.

ऊन असले तर अकरा वाजताच नांगर सोडून बैलांना पाणी पाजून त्यांना चरायला मोकळे सोडून देई. पाऊस पडून हिरवागार तरवा वर आला की त्याची लगबग पाहण्यासारखी असे. साधारण फुट सव्वाफुट भाताचे रोप वाढले की अवाठातून चार सहा मुली, बायका जमा होत आणि कोपऱ्यातला तरवा काढू लागत. लयबद्ध तालीत आणि वेगाने त्यांचा हात चालत राही. तेव्हा पावसाने भिजू नये म्हणून इरले वापरत आता प्लॅस्टिक खोळ डोक्यावर घेतली की काम भागते. इरले पळसाच्या पानाने शिवलेले असल्याने थंड रहात असे. प्लॅस्टिक खोळ आरोग्यास तितकी मानवणारी नाही. पण आता इरले इतिहास जमा झाले. कोपरा रिकामा होण्याचा अवकाश, भगवान तो कोपरा उभाआडवा नांगरून लोण्यासारखा चिखल तयार करत असे. कोपरा चांगला नांगरला तर पाय जवळजवळ ढोपरा ऐवढे रूतत पण त्याला त्याची फिकीर नसे.

कोपऱ्यात भाताची लावणी करण्यासाठी पुरेसे पाणी नसेल तर डोंगरातून येणाऱ्या पाण्याची व्हाळी खरडून साफ करत तो पाणी घेऊन येई. पुन्हा एकदा जोताने कोपऱ्यात फळी मारली की लावणीसाठी आलेल्या बायका अर्ध्या तासात रांगोळीचे ठिपके आखून रांगोळी काढावी तसे योग्य अंतरावर रोप लाऊन मोकळ्या होत. तेवढ्या वेळात भगवान अजून एखादा कोपरा लावणीसाठी तयार करून ठेवी. कधीकधी तर कोपरा नांगरटीने तयार करून तो लावणी करायला कोपऱ्यात उतरत असे. भगवान आणि थारा ह्या भिन्न गोष्टी होत्या.

साधारण सात आठ दिवसात आमची लावणी पुरी होत असे. या काळात माणसांना, सकाळी फुटी चा आणि भाकरी, अकरा वाजता पेज, दीड वाजता जेवण आणि तीन वाजता चहा तयार ठेवावा लागे. हे सगळ करण्यासाठी एक बाई माणूस घरातच गुंतून पडे. त्याला इलाज नव्हता.

श्रावण सरला आणि गणपती जवळ आले की भा.रा.तांबे यांच्या कवितेतील हिरवे गार मखमली गालीचे आमच्या दारात अवतरत. कधीतरी आमच्या शेतीचा राखणदार मेरेवरून फॉस फॉस करत उंदरांना पिटाळतांना आम्ही पहात असू. अर्थात तेव्हा ते पाहताना अंगावर काटा येई.

तेव्हा कामाला येणाऱ्या माणसांना माणूसकी होती त्यामुळे, पेजेच्या तोंडाक काय? भातावर निस्त्याक कसला? असले प्रश्न कोणी विचारत नसे. उकड्या तांदळाचा लाल करडा भात, पाठी, डाळीची आमटी, उसळी किंवा बटाट्याची भाजी. पेजेच्या तोंडाला पापड किंवा लोणच्याची फोड किंवा खाऱ्या पाण्यातला आंबा मिळाला तरी कोणाची कुरकुर नसे. आज लावणी करण्यासाठी दूरून रीक्षेने बाई माणसे जास्त मजूरी देऊन आणावी लागतात. पुरूषांना संध्याकाळी बाटलीची सोय करावी लागते. रीक्षेने घरी पोचवावे लागते हा बदल अपरिहार्यपणे लोकांना पचवावा लागतो. आम्ही या मार्गाने कधीच गेलो नाही आजही शब्दाखातर कामाला येतात ती या घराची पुण्याई आहे.

लावणी संपेल त्या शेवटच्या दिवशी कोकणात शेतमालक आवडीने वडे आणि सांबार जेवण कामगारांना घालतोच . काही मालक वडे- कोंबड्यांची सागुती घालून श्रम परिहार करतात. गमतीचा भाग, त्याच कामासाठी म्हणजे लावणीसाठी तेव्हा बायकांची मजूरी दहा ते बारा रूपये आणि पुरूषांची मजूरी विस रूपये होती पण कोणत्याही बाईने पुरुषांना जास्त आम्हाला कमी मजूरी असे का? प्रश्न कधी कोणाला विचारला नाही.

आमचा ‘भगवान’ कामाला वाघ होता, पाऊस सरत येण्यापूर्वी कोणते भात कापायला तयार झाले की, कोणता कोपरा लवकर कापायचा आणि कोणता नंतर तो ठरवत असे. भात शक्यतो सकाळी लवकर कापले तर त्याचे दाणे गळून पडत नसत. एकदा मोठे सुर्यकीरण पडले की भात कोपऱ्यात घळून पडे त्याला ‘निडकणे’ म्हणतात. भात थोडे हिरवे असताना कापले आणि सुकवले तर गिरणीत त्याचा तांदूळ मोडत नाही. हे अनुभवाने आलेले शहाणपण त्याचेच.

भात कातरणी झाले आणि कोपरे रिकामे झाले की मामी त्याच्या मागे लागून मेर काढून घेई. पावसात मेरेचे नुकसान होते म्हणून दर दोन चार वर्षांनी मेर म्हणजे शेताचा बांध ठिकठाक करून घ्यावा लागतो. जोपर्यंत कोपऱ्यात पाणी असेल आणि माती ओली असेल तोपर्यंत मेर बरी बांधली जाई. एकदा माती सुकली की मेरेला तडे जाऊन मेहनत फुकट जाई. शेतात भात असतांना आधी खेकडे आणि भात पिकले की उंदीर शेताच्या बांधात बिळे करून त्यात खोलवर भाताचे दाणे साठवून ठेवतात. कधीकधी एका बिळात शेरभर भाताचे दाणे असतात.

कोपऱ्यात पाणी रहावे यासाठी मेर बांधून घ्यावी लागते. हे काम कष्टाचे असते. शेतातील ओली माती खोऱ्याने खापाऊन मेरेला लाऊन ती ठोकून घट्ट करावी लागते. भगवान कधीतरी त्या मेरेवर ती घट्ट बसावी म्हणून नाचायचा. या कामात तो तरबेज होता. मेर कढता काढता तो चिखलात रंगून जाई पण त्याने कधी कंटाळा केला नाही. लाल मातीचे आणि त्याचे घट्ट नाते होते.

ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये परतीच्या पावसाची झंझट असते, दुपारी अचानक पाऊस पडतो म्हणून सकाळी कापलेले भात शक्यतो रोजच्या रोज मारावे लागे, त्यालाच झोडणी म्हणतात. साधारण दोन फुट उंचीच्या मजबूत बाकावर भाताचे पेंडूक केसरावर जोराने आपटले की भात खळ्यात पडे. हवा असेल तर भात वारवले जाई, भात वारवले की त्यातील पळीव आणि कचरा दूर पडतो. हल्ली भात पेडस्टल पंख्याने वारवतात. यंत्र वापयूनही भात केसरापासून वेगळे करतात. पावसाळी वातावरण असले तर भात गोणीत भरून घरी नेऊन ठेवले जाते. हे भात कालांतराने सुकवून ठेवले जाते. त्याने बांधलेले पेंडूक इतके मोठे असे की ते इतर कोणाला मारायला जमत नसे.

भात मारण्यासाठी तीस फुट चौरस क्षेत्रफळाचे खळे तोच करी, त्यासाठी पाण्याचा सहज निचरा होईल असा उंचावरील कोपरा चांगला नांगरून सपाट करून त्याच्या सभोवती उंच बाध बांधावा लागे, ज्याला पेळ म्हणत. ही जमीन पेटण्याने चोपून तुळतुळीत करून घ्यावी ज्यामुळे बाहेरील पाणी खळ्यात यायला प्रतिबंध होत असे. भगवान कामावर आला की काम कोणतेही असो ते पूर्ण होणारच याची आम्हाला खात्री पटत असे.

बियाण्याची जात असेल त्या प्रमाणे काही भात पिकून लवकर म्हणजे ९० दिवसात तयार होते त्याला हळवे तर काही १०५ ते १३० दिवसात तयार होते त्याला गरवे म्हणतात. जुन्या काळी टायचून, रत्ना, रत्नागिरी २४, सुवर्णा असे बियाणे होते. आता दर दोन तीन वर्षांनी नवे बियाणे बाजारात येते. काही कोपऱ्यात भात पूर्ण पिकले तरी मुळात ढोपरभर पाणी कोपऱ्यात असे. तिथले भात कापून कवळे काढून मेरेवर सुकत घालावे लागतात. ते काम दमछाक करणारे असते. भगवानला कामाचा कंटाळा नव्हता. एकदा भात कापून झाले की तो मोकळा.

खरे तर आमच्या शेळीच्या कोपऱ्यात वायंगणी भात होत असे पण पावसाळी भात पुरेसे असल्याने तो वांयंगणी भाताची खटपट करत नसे. मात्र भात वाढतांना वेळोवेळी मेर कापून स्वच्छ ठेवावी लागे. विशेषतः भाताची कणसे बाहेर आली की जास्त काळजी घ्यावी लागे. उंदीर मेरेवर बिळ करून पोसवलेल्या भाताची कशी वाट लावून टाकतील? सांगता सोय नसे.

भगवान आपली बहीण सखू आणि आईच्या मदतीने खंडाला शेती करू लागला तेव्हा अवघा अठरा, वीस वर्षांचा होता. त्यानंतर दहा एक वर्षांनी त्याचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर शेतकामाला त्याला मदत होईल असा आमचा समज होता पण त्याच्या बायकोला शेतकामाची फारशी माहिती नव्हती. त्याच्या लग्नाच्या चार वर्ष अगोदरच बहिणीचे लग्न झाले होते त्यामुळे त्याच्यावरचा ताण वाढला होता. संकट आले की ओळीने येते. याच दरम्यान त्याचा एक बैल दगावला. दुसरा बैल घेण्याची त्याची ऐपत नव्हती, तो शेती सोडून देण्याची भाषा करू लागला.

भगवान बरेच वर्षे तग धरून आमची शेती करत होता, एखाद्या वर्षी फारसे भात पिकले नाही तरी आम्ही समजून घेत असू, तेव्हा आम्ही त्याला आमच्या घरचे मणभर भात, तांदूळ मदत म्हणून सहजच देत असू आम्ही त्याला एक बैल विकत घेऊन दिला कारण एवढी शेती पड ठेवणे परवडणारे नव्हते. आमच्या घरात तर मनुष्यबळ नव्हते. मुंबई वरून गावी जाऊन शेती करणे शक्य नव्हते. पण एखाद्या गोष्टीत विघ्न येऊ लागले की ते थांबत नाही, बहिणीच्या लग्नानंतर त्याची अर्धी ताकद हरवलीच होती. घरून हवी तशी मदत मिळत नव्हती, आम्हाला न सांगताच त्याने बैलजोडी विकून टाकली. खरेतर एक बैल आम्ही विकत घेऊन दिला होता. त्याची आईही थकली, त्यानंतर दोन पाच वर्षात त्याने शेती सोडली.

भगवानच्या पदराला दोन मुले होती. खाणारी तोंडे वाढली पण कमाई घटली. शेत सोडले आणि दुर्दैवाने मित्रांच्या संगतीने दारूचे व्यसन लागले आणि पाहता पाहता संसाराची रया गेली. एक काळ तो वीस ते तीस खांडी भात पिकवत होता. घरात भाताची रास असे, दोन दोन वर्षे जूने भात संपत नसे पण शेती सोडल्यावर घरात रेशनच्या धान्यावर जगायची पाळी आली. चार दोन भाताचे कोपरे घराच्या खाली होते त्यात पिकून भात तरी किती पिकणार? दारात दहा विस माड होते, चार दोन पोफळी होत्या, त्यांची नीट निगा नव्हती. थोडी काजूची झाडे, थोडे रतांबे होते पण त्याचे उत्पन्न घरी येत नसे कारण व्यसनापाई कोणाचे न कोणाचे आगाऊ पैसे घेतलेले असत.

मे महिन्यात त्याला कोकमाचे आणि काजूचे पैसे मिळत, कर्ज देणारा दारावर उभा राहिला की असतील ते नारळ काढून द्यावे लागत. कोकम द्यावी लागत. जंगलातील एखादे सागाचे झाड लोक पैसे वसुलीसाठी घेऊन जात. घरातले काम, लाकूड फाटा हे कष्ट होतेच त्यात वेळेवर अन्न नाही. या विपरीत परिस्थितीशी टक्कर देत एक दोन किलोमीटर चालत जाऊन मुले शिकली. बापाला हवं, नको पाहू लागली पण तो पर्यंत केलेल्या व्यसनाने मिळणारे आयते खाण्याची संधीच नियतीने भगवानला दिली नाही.

अनेक आजार त्याच्या पाठी लागले. मुले कमावती झाल्याने औषधे आणून देत पण शरीरातील रक्त कमी होत गेले. शारिरीक हालचाल मंदावली आणि अन्नपाणी बंद झाले.आठ पंधरा दिवस तो जाग्यावर होता. आजुबाजूचे भेटून हळहळ व्यक्त करत. शेवटी अन्नच पोटात जाईना. तो गेला, अवाठातील लोकांनी प्रथेप्रमाणे लाकडासाठी दारातली आंबोली तोडली, ती नुकतीच धरायला लागली होती पण ती तोडू नका सांगायचे कसे?

जोपर्यंत तो आमच्या अवठात येत होता, कामात सतत व्यस्त होता. आजुबाजुचे लोक कामाला आवर्जून बोलवत. चार पैसे हक्काचे मिळवत होता. तेव्हा तंबाखू सोडला तर अन्य व्यसनही नव्हते. त्याच्या वडिलांना रोज गावठी दारू घ्यायची सवय होती. ते हयात असतांना त्यांना तो नियमित दारू आणून देत असे. यासाठी तो रोज तीन चार किलोमीटर फेरा मारे. याचसाठी अधूनमधून मामी त्याला बापाला दारू आणून देतोस पण दारूचे व्यसन करू नको, एकदा तोंडाला लागली की संसाराची वाट लागते असे सांगत होतीच. पण बापासाठी दारू आणता आणता तोच दारूच्या आहारी गेला. तोच त्याच्या वाईट संगतीचा परिणाम वाईटच होतो.

कोकणात काही समाज आजही दारूच्या विळख्यातून बाहेर पडलेला नाही. शिक्षणाचा अभाव आणि कमालीचे दारिद्रय यामुळे चांगली तरुण मुले संगतीने व्यसनाधीन बनली आहेत. जी मुले गवंडीकाम, चिरे तासणे फँब्रीकेशन किंवा अन्य काम करतात त्यांच्या सवयी आणि व्यसने बदलली आहेत. अर्थात त्यातही स्वतःला सावरून कुटुंब सावरण्याची धडपड करणारी आहेतच. भगवानचा मुलगा बापाचे हाल पाहून या व्यसनांपासून दूर आहे. तो कुटुंबाचे भविष्य आहे. पण बापाचा असा दुर्दैवी शेवट पाहून तो दुःखी आहे.

भगवानने शेत सोडले आणि त्याच्या दुर्दैवाने मित्रांच्या संगतीने दारूचे व्यसन लागले आणि पाहता पाहता संसाराची रया गेली. आमची शेती त्यानंतर इतर दोन तीन भागेल्यांना खंडाने दिली होती. ते शेत करीत पण त्या शेताची डागडुजी करत नसत. पावसाळा आला की तरवा पेरणे आणि भात पिकले की भात कापून नेणे, ना मेरेचे सफाई ना कोपरा स्वच्छ ठेवणे त्यामुळे हळूहळू शेती फुकटच गेली. मालकाला खंडही येरेमेरे घालत. तरीही आम्ही त्यांना मना करत नव्हतो कारण एकच आता गावाकडे शेतीत राबणारे कोणी राहिले नाही.

आता गावातील तरुण मुले दहावी परीक्षा देत नाही तो मुंबई गाठतात. मुंबईत झोपडपट्टीत राहतात वाटेल ते कष्ट उपसतात पण शेतात काम करणे त्यांना कमीपणाचे वाटते. आज कोकणातील बरेच जमीन पड आहे याचे कारण जंगली प्राण्यांचा त्रास आणि बेसुमार माकडांची संख्या. यावर वनखात्याने आणि कृषी अधिकारी यांनी उपाय शोधला नाही तर सामान्य शेतकऱ्यांना जगणे कठीण होईल.

दारासमोरच शेती असल्याने, दहा वीस कोपरे आम्ही आजही कसेबसे करत आहोत पण आम्ही येथे वर्षभर स्थाईक नसल्याने आमच्याकडे स्वतःचे जोत नाही. कोकणात मनुष्यबळ कमी असल्याने शेतमजुरी न परवडणारी आहे.ज्यांच्या कुटुंबात अधीक माणसे त्यांना शेती पुरवते. आज गावात शेती करण्यासाठी कुणी तरणेताठे नाही, शेताचे सगळे काम मजुरीने परवडतही नाही. जोपर्यंत जमीन मालक स्वतः कंबर कसून शेती करत नाही, त्याला आधुनिक तंत्रज्ञान, नवे बीबियाणे, योग्य खत व्यवस्थापन आणि गरजेनुसार किटकनाशक, बुरशीनाशके वापरत नाही तोपर्यंत शेती करणे अवघड आहे. याच बरोबर गवे रेडे, हत्ती, माकडे यांचा उपद्रव ही आता नव्याने आलेली आपत्ती आहे.

कोविड पासून गेले सात वर्षे पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील गरीबांना रेशन फुकट वाटणे सुरू केले तेव्हापासून माणसे आणखी आळशी बनली, कष्ट करेनाशी झाली पण तुघलकी सत्ता चालवणाऱ्या सरकारला सांगणार कोण? ग्रामीण भागातील छोट्या शेतकऱ्यांनी या फुकटच्या रेशनपाई कष्ट करणे सोडून दिले. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असाच समज बोकाळत गेला. साधारण वयात आलेली मुले आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबई, गोवा, पुण्यात धाव घेतो. जो कोकणातच थांबतो काही कामकाज करून कुटुंब चालवतो त्याच्या लग्नाचा प्रश्न बिकट कारण कोणीही शेतकरी मुलाला लग्नासाठी मुलगी देत नाही.

आधी भगवान काही ठराविक घरी कामाधंद्याला जात असे, कोविड काळात जाणे येणे कमी झाले. हळूहळू कष्टाची सवय गेली शरीर आळसी बनले त्यात मोदींच्या गँरेंटीने पुरती वाट लावली आणि भगवान निकामी झाला. शरीरात आजार भरले. दारूने शरीर निकामी केले. कधीतरी दारू पिऊन वाटेतच तोल जाऊ लागला. दोन वर्षांपूर्वी आम्ही मुद्दाम त्याची चौकशी करण्यासाठी गेलो तर केविलवाणा होऊन रडत होता. शरीरात रक्त नसल्याने सूज आली होती. ढाण्या वाघ मरण पंथाला निघाला होता. त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगून आम्ही निघालो.

काल अचानक भाईंचा फोन आला भगवान गेला ऐकून वाईट वाटले. भविष्यात आणखी अशा किती झाडांना वाळवी लागणार आहे आणि वाडवडीलांनी जोपसलेली किती घरे नष्टप्राय होणार आहेत त्याचा विचार करूच वाईट वाटते. मित्रांनो आपल्या कुटुंबापुरते आपण पाहतोच पण आपल्या वाडीतील किंवा गावातील आपल्या मित्र परिवाराला व्यसनमुक्ती देऊन त्यांच्यातील अश्वत्थला वाळवी खाणार नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तरच आपले गाव टिकेल. गावा गावात असे भगवान आहेत त्यांना भगवान भरोसे सोडणे आपल्याला परवडणारे नाही. गाव, वाडी, शेत ,घरदार टिकवायचे असेल तर थोडा समजुतदारपणा दाखवत यावर विचार केलाच पाहिजे. वेळ आलीच आणि अश्वत्थ घरच पोखरू लागला तर त्यावर शस्त्रक्रिया करण्याची हिंमतही आपल्याला समजुतदारपणे दाखवावी लागले.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “अश्वत्थाचा अंत

  1. Emie Ward

    Normally I do not read article on blogs however I would like to say that this writeup very forced me to try and do so Your writing style has been amazed me Thanks quite great post

  2. Leon Labadie

    My brother suggested I might like this blog He was totally right This post actually made my day You can not imagine simply how much time I had spent for this info Thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *