अस्मितेची ऐशी की तैशी
कुणाला जातीची, कुणाला मातीची, म्हणजे आपल्या गावाची तर कुणाला भाषेची अस्मिता असते. कोणाला पक्षाची, कोणाला आपल्या विशिष्ट वर्गाची, क्लासची असते. अस्मितेच काय हो! जो कोणी तिचा हात पकडेल त्याच्या बरोबर ती जाते. काही जणांची अस्मिता बेगडी असते,म्हणजे ती कुठं पर्यंत टिकेल काही सांगता येणार नाही. मुंबईत पक्षागणिक अस्मिता असणारे अनेक कार्यकर्ते होते. अस्मिता होती म्हणून वडापाव आणि एक कप चहा मिळाला की त्यांची अस्मिता टिकून राहायची दादा म्हणाले म्हणून किंवा भाई म्हणाले म्हणून ते आपल्या अस्मितेच प्रदर्शन करायचे, मग कोणाला दम दे, खुन्नस दाखव,कोणा फिरस्त्या व्यवसाईकाला टपली मार, त्याची वस्तू काढून घे, त्याच्या जवळून चिरीमिरी घे अशी चिंधीचोर कामे ते करायचे आणि एरियात आपली लय वट हाय,आपल्याला पाहून सगळे टरकतात, फाटते त्यांची, अशी शेखी मिरवायचे. त्यांच्या अस्मितेची निष्ठा म्हणून, कोणी लिडर येणार असेल तर ते रस्त्यावर पक्षाचे झेंडे, बॅनर लावण्याचं काम आनंदाने करायचे. घरी जेवणासाठी आणि रात्री झोपताना हजेरी लावायचे. घरून हाकलून देण्याची वेळ येईपर्यंत यांची निष्ठा कायम असायची.
चार महिन्यांपूर्वी अचानक अस्मितेला खिंडार पडलं, अलीबाबा आणि चाळीस चोर वाचलं होतं, समजलं होत आणि नव्हतही. पण मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत असणार सरकार अचानक चाळीस शिवसेना निष्ठावंतांनी हायजॅक केल. त्या चाळीस जणांची संख्या पन्नास कधी झाली ते कळलही नाही आणि आमचाच गट खरा वरून हमरातुमरी झाली. कामाख्या देवीने कौल दिला आणि मराठी शिंदेशाही सरकार कामाला लागलं. शंभर दिवसात कितीतरी निर्णय घेण्यात आले. किती यशस्वी किती निरर्थक काळ ठरवेल. आधी अवघ्या तुझं माझं अस दोन जणांच सरकार पाहतापाहता बारा जणांचं झालं. अद्यापही अनेकांना मंत्री पदाचे डोहाळे सुरू आहेतच. कायदेशीर लढाई न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याकडे सुरू आहेच पण दोन्ही सरकारी आस्थापनं केंद्राची बटीक तर नाहीत ना अशी जाहीर टिका विरोधीपक्ष सतत करत असतो.
मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र अस्मितेला कर्नाटकचे मुख्यमंत्री सुरूंग लावण्याच काम करत आहेत. निपाणीसाठी पाणी आणि इतर सुविधा देण्याची ग्वाही देत आहेत. बेळगाव, कारवार भिजत घोंगडे आहेच. खरच मराठी अस्मीतेशी या डोमकावळ्यांना घेणदेण आहे की फक्त महाराष्ट्रातील नागरीकांना झुलवत ठेवण्याच काम सर्व पक्ष करत आहेत हेच कळत नाही. एकीकडे गुजरात महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी पळवत दुसरीकडे कर्नाटक स्वतः च्या राज्यात मराठी कुटुंबावर अन्याय करत. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रहित जपायचं तरी कस?
राज्यात मात्र अस्मितेच्या नावान गळा काढत मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य ताब्यात रहावं म्हणून पक्ष वाटेल त्या थराला जाऊन निवडणूक लढवली जाते. नेते तिकीट मिळालं नाही तर रात्रीत पक्ष बदलत आहेत. आजही फार काही बदललेल नाही पण ही पागल मुलं हे समजून घेत नाही की त्यांचा बॉस दहा वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या सोबत होता, पाच वर्षांपासून तो पवारांच्या सोबत, “साहेब”, “मोठे साहेब” म्हणत फिरत होता आणि परवा अचानक त्यांनी कमळाचा दांडा धरला. हे वेडं पीर मात्र या भाई सोबत उगाच भरकटत निघालं आहे.
गेल्या वीस वर्षांत हा भाई चाळीतून,बिल्डिंगमध्ये, तिथून अपार्टमेंटमध्ये आणि या वर्षी त्रेसष्ट माळ्याच्या टॉवरमध्ये गेला, दोन हॉटेल सुरू केली. शेतजमीन घेतली, प्लॉट घेतले. जमेल तेव्हा अस्मिता गहाण टाकली, विकली पण हे पाप्याचं पितर मात्र भाईचं बोट धरून आहे तिथेच आहे.
त्याची अस्मिता भाईशी जोडली आहे, जिथं पत्रावळ तिथं द्रोण अशी एक म्हण आहे, दुर्दैवाने पत्रावळ मोठी झाली आणि द्रोण मात्र फाटून गेला. अस्मितेचं भुत मानगुटीवर बसल की सामान्य कार्यकर्ते भाईसाठी फटके खातात, स्वतःच्या अंगावर केसेस घेतात, जेलमध्ये जातात, भाई सुरक्षित आणि कार्यकर्ता जेलमध्ये.
आई बापाच्या जीवाला घोर, कार्ट सुटून येणार की तिथच मुक्काम करणार? भाईला अशा कार्यकर्त्यांची गरज असतेच म्हणून ते जामीन देऊन सोडवतात अर्थात तुमची उपयुक्तता असेल तर! तेव्हा अस्मितेच भांडवल करत भाई, दादा, साहेब मोठे झाले. पंटर पोर शिवजयंती, गणपती उत्सवाची वर्गणी गोळा करुन चार दिवसाची सोय करत तिथेच पडले. अस्मितेची मशाल भाईच्या कामी आली. त्याने पोर नादावली, शिक्षणापासून, घरापासून दूर गेली. भाईला तिकीट मिळाले. नगरसेवक, विधानसभा, विधानपरिषद आणि लोकसभासुध्दा, आपली पोर मात्र आयुष्यभर बॅनर आणि होर्डिंग लावण्यासाठी रात्रभर जागत बसली. कोणाची आणि कसली अस्मिता?
ना बेळगाव, कारवार महाराष्ट्रात आला, ना गोव्यात मराठीला समानता मिळाली. ज्यांनी त्यासाठी मोर्चे काढले त्यांच्या बातम्या पेपरात छापून आल्या ते रात्रीत मोठे झाले, ज्यांनी मोर्चा खऱ्या अर्थाने जागविला त्यांनी फटके खाल्ले, त्यांना केसेसमध्ये अडकवले गेले. पोरानो तुमचा घरा बाहेरील “बाप” सांगतो म्हणून खोट्या अस्मितेच्या पाठी लागू नका. आपले करिअर बरबाद करू नका. अस्मिता जपायची असेल तर तुमच्या वर्तनाची, नितीमत्तेची, सभ्यतेची आणि माणुसकीची जपा. तिच्यासाठी कोणत्या पक्षात जायची गरज नाही. पक्षाबाहेर राहूनही ती जपता येईल आणि जागविता येईल. सुर्य उगवला की त्याची किरण त्याच्या सोबत प्रवास करतात, तुम्ही समाजाचे सुर्य व्हा लोक तुम्हाला साथ देतील. तुम्ही पेटती वात व्हा, लोक त्या वातीसाठी तेल होतील.
केवळ कोणा शाखेवरील भाईसाठी काम करून तुम्ही मोठे होणार नाही. या भाईने आपल्या एरियात भैय्याला इस्त्रीसाठी टपरी टाकू दिली, बंगाली माणूस फळांचा स्टॉल लावून पैसे कमवू लागला, एका मारवाड्यांनी आपले सामानाचे दुकान थाटले, कोणा बंगाली इस्माईल भाईने आपले बांधकाम साहित्य गोडाऊन टाकले. आपली पोर टपोऱ्या सारखी भाईची अस्मिता जपत आजही त्याच्या ऑफिसमध्ये दिवसभर बसून असतात.
नाही म्हणायला भाईने त्यांना कुठे security, doorkeeper, pump man,असल्या नोकऱ्या लावल्या पण त्यांनी व्यवसाय करावा म्हणून प्रेरित नाही केलं. पक्ष बदलत आणि वेळोवेळी अस्मिता गहाण टाकत तो मोठा झाला पण आपल्या पंटर मुलांनी मोठे व्हावे, एरियात व्यवसाय करावा असे त्याला नाही वाटले. कारण सोप्प आहे. त्याच्या अस्मितेन शेण खाल्लं तरी त्याच्यासाठी काम करणाऱ्या मुलांनी त्याच्याशी एकनिष्ठ असावं हीच त्यांची अपेक्षा. अर्थात अशा पक्ष बदलू नेत्यांच्या सोबत असणारे काही हुशार आहेतच त्यांनी आपल्या पदरी योग्य ते पद पाडून अस्मिता बाळगल्याची योग्य किंमत पदरी पाडून घेतली.
तेव्हा राष्ट्रीय अस्मिता, राज्याची अस्मिता किंवा गाव अथवा भाषेची अस्मिता ही बहुदा बेगडी असते, जोपर्यंत वैयक्तिक स्वार्थ साधता येतो तो पर्यंत अस्मिता टिकते. आज महाराष्ट्राचं राजकारण ज्या अंगाने जात आहे ते पाहता वैचारिक पातळी आणि स्वपक्षीय निष्ठा किती पोकळ आहे ते जगाने पाहिले. स्वर्गीय मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, ना.ग.गोरे, कॉम्रेड डांगे, पर्रीकर आशा काही मोजक्या वंदनीय आणि प्रात स्मरणीय व्यक्ती सोडल्या तर, देशाची, राज्याची, पक्षाची अस्मिता असणारे किती असावेत? ते ईश्वर जाणे. कोणी नेता काल रात्री ज्या पक्षात होता त्याच
पक्षात उद्या राहील याची अजिबात खात्री नाही. कोणी आपल्यावर ईडीची खप्पामर्जी होऊ नये म्हणून तर कोणी राज्यसभेची उमेदवारी मिळते म्हणून रात्रीत पक्ष बदलतो. पहाटे आपल्या पोरांना गोळा करतो आणि दिवस उगवायच्या आत आपल्या ऑफिस वरील बॅनर बदलून टाकतो. काही समजदार लोकांनाच कळत की भाई राजकारणाच्या पुरात वाहून गेला. मूर्ख पोर, काल ज्या पक्षाच्या पोरानंबरोबर राडा केला होता त्याच पोरांबरोबर आज गळ्यात गळा घालून भाईची मिरवणूक काढतात.
“झेंडा”, चित्रपट पाहिला असेल, एखादा कार्टा म्हणतो, “बंड्या यार, आपल्याला भाईंच हे अस एका रात्रीत पक्ष बदलण नाही पटत, इतके वर्ष एकनिष्ठ म्हणून लोकांनी वाहवा केली, अगदी आपला बाप पण म्हणायचा, “गण्या तू एक वेळ बापाला सोडशील पण झेंडा नाही सोडणार.”, उद्या बापाला समजलं की मी आता दुसऱ्या पक्षासाठी काम करतो, ज्यांची पोर आम्ही धोपटली त्यांच्या पोरांबरोबर एकत्र बसून काम करतो तर घरात आपली इज्जत काय राहिल? ही तर चक्क रंडीबाजी झाली.” त्याच संध्याकाळी गण्याचा मुडदा त्याच्या दारात पडतो, एकनिष्ठ राहिल्याच पारितोषिक. बाप धाय मोकलून रडतो, पण त्याला आपलं पोरग ज्याला एरिया घाबरायचा, कुत्र्याच्या मौतीन का मेला कळत नाही. अपघाती मृत्यू म्हणून नोंद होते. बापाला उशीरानं कळत की मुलाला अस्मिता जपल्याचं पारितोषिक मिळाले.
काय समजले? तेव्हा ऋतू बदलला की लोक कपडे किंवा चपला बदलतात तसे हल्लीचे लिडर पक्ष बदलतात. एका रात्रीत पक्षनिष्ठा बदलली जाते, बदलावी लागते. टिकण्यासाठी एवढं करावंच लागतं, नाहीतर ईडीची धाड पडते, कोणत्यातरी केसमध्ये अडकवून आत टाकण्याची भिती असतेच. राजकरणात धुतल्या तांदळाच कोण आहे? भिती वाटणं स्वाभाविक आहे. धंदा चौपट होतो, सलाखो के पिछे कई साल निकालने पडते है और शायद तब तलक लैला छोडकर चली जाती है और दुसरे किसी के साथ घरोंदा कर लेती है। Nothing is permanent except change. क्या करे भाई? हवा का रुख देखके नाव हाकनी पडती है। अस्मितेला काय चाटायचय? जगण्यासाठी पैसा आणि पद दोन्ही लागतं. हे मिळवायचे तर स्वभावाला, मताला मुरड घालावीच लागते.
काल मनसेत असणारा आज राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता बनतो आणि मनसेत हुकूमशाही कशी चालते यावर अकलेचे तारे तोडतो. तेव्हा स्वतःची आणि पूर्व पक्षाची अस्मिता कुठे गहाण ठेवतो? ते फक्त त्यालाच माहिती. शिवाजी महाराज नक्की कोणाचे? त्यांची फ्रांचायसी नक्की कोणाकडे आहे ते ठरवता येत नाही. गरजे प्रमाणे आम्ही राष्ट्रपुरुषांचा वापर करतो, त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतो, त्यांच्या नावाने चंदा जमा करून धंदा करतो. दहावीस खर्चही करतो. अस्मिता पेटती ठेवणं गरजेचं असतं, आम्हाला वर्गणी गोळा करण्यासाठी हे राष्ट्र पुरुष मदत करतात. नव्हे तेच आमचे तारणहार आहेत. सावरकर यांच्या त्यागावर, त्यांच्या राष्ट्रप्रेमावर आणि दृढ निश्चयावर आक्षेप घेणारे महाभाग सावरकरांनी कधीही न लिहिलेल्या माफी पत्राचा जाहीर सभेत उल्लेख करतात ते ही महाराष्ट्रात आणि आम्ही हे उघड्या कानांनी ऐकतो तेव्हा आपली महाराष्ट्र अस्मिता कुठे पाणी भरते कोण जाणे. या महाभागाच्या गळ्यात गळा घालून राजकारण करू पाहणाऱ्या युवराजला त्यांच्या आचरट विधानाबद्दल राग येत नाही. अर्थात त्यांच्या बोलण्याने मराठी आणि महाराष्ट्रातील मनातून सावरकर कधीही मिटवता येणार नाही. राग याचाच येतो की पक्षीय राजकरण करतांना आम्ही कशी झक मारतो. पण मग पक्षीय अस्मितेचे काय? भविष्यातील सोय व्हावी म्हणून अस्मिता दिल्ली चरणी गहाण टाकली आहे का? गेल्या दोन वर्षात कितीतरी नेत्यांनी एका रात्रीत पक्ष बदलले,गोची झाली ती त्यांच्या चमच्यांची.
संभाजी ब्रिगेड, छावा, शिवपुत्र, धर्मवीर अशी नावे म्हणजे रसरसते निखारे, ते फुंकले की राष्ट्रप्रेम जागृत होतं. धमन्यांमधून विराच आणि शुर शिपायाच रक्त सळसळत वाहू लागत. अस्मिता जागवल्या शिवाय प्रत्यवाय नाही. एक ओवेसी दहा मिनिटांच्या भाषणात देशात रक्त तापवू शकतो आणि आम्ही शिवाजीचा वारसा सांगूनही काही करु शकत नाही.
शिवाजींनी अठरापगड जातीतील स्वामीनिष्ठ मावळे राष्ट्र उभारणीसाठी एकत्र केले. अस्मिता जागवली आणि महाराष्ट्र निर्माण केला आम्हाला साध आमच्या वार्डात, शहरात, तालुक्यात आमच्या पक्षाला समर्पित फौज निर्माण करता येत नाही, कुठे आहे मातृ प्रेम?
तेव्हा स्वतःची अस्मिता गहाण टाकू नका, चहाच्या कपासाठी किंवा चखण्या बरोबर, बिअर, देशी किंवा, इंग्लिश मिळणार म्हणून आपले छात्रतेज कोणाच्या पायाशी वाहू नका. आठवा बाजी, मोरारजी आणि तानाजी, आठवा धर्म अभिमानी संभा अन आठवा शिवबाचा वाघ्या. आपली पत नक्की काय? आपल्याला काय होणं पसंत आहे हे ठरवा, सावध ऐका पुढल्या हाका. अस्मितेनं पोट भरणार नाही. घोषणा देऊन रक्त पेटवण सोप्प असत पण कुणाची विझती चूल पुन्हा पेटवणं तेवढं सोप्प नसतं.
अस्मितेची दवंडी पीटताना एखाद्या मातेचा लाल, मातीत मिसळला तर तिचे अश्रू आणि हृदयातील दुःख थांबवण्याच कोणतं सोल्युशन तुमच्या या सो कॉल्ड “बापाकडे” आहे ते आधी विचारा मगच त्याचं बोट अस्मितेसाठी धरा. आनंद दिघे का गेले? कोणत्या अपघातात वारले? तो अपघात खरा होता की घडवून आणला होता? आता त्यांचच क्रेडिट वापरून आता पुन्हा कोणी मोठ होईल पण आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत, शोधुही नका. तुम्ही तुमच्या लिडर पेक्षा मोठं बनण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला संपवायला मागे पुढे पाहणार नाही. “मेरी बिल्ली मुझसे म्याव” हाच तो इशारा. बापाला बंदी बनवणाऱ्या औरंगजेबाचा आदर्श मानणारी आणि त्याच्या थडग्यावर चादर चढवणारी मराठी अवलाद आणि त्यांची पिल्लावळ याच महाराष्ट्रात आहे हे विसरून कसं चालेल. म्हणून सावध व्हा “अस्मिता” या शब्दाला भुलून आपला स्वाभिमान आणि आपले आयुष्य पणाला लावू नका.
अस्मिता शब्दाचा गैरवापर करून तुम्हाला कामाला लावणारे लफंगे या शिवबाच्या महाराष्ट्रात आहेत. जावळीच्या खोऱ्यातील सूर्यराव मोऱ्यांचं दूषित रक्त अजूनही कोण्या पाप्याच्या धमन्यात आहे, त्याला ना बाजी कळला ना तानाजी. सावध व्हा हनुमान चालीसा असो की गणपतीची आरती, तो तुमच्या भावनेला हात आणि साद घालून तुम्हाला लढा म्हणेल, तेव्हा रक्त तुमचे सांडेल, तो सुरक्षित कामांडोच्या घेऱ्यात आणि तुम्ही कपाळ फुटलेले आग्रीपाडा जेलमध्ये. मित्रानो राष्ट्राची अस्मिता जपायची असेल तर काही असे भव्य दिव्य करा जे तुमचं वर्तमान बदलून टाकेल. एमपीएससी, यूपीएससी किंवा अन्य परीक्षेत उज्वल यश संपादन करा. भ्रष्टाचार नष्ट करा. उद्योग उभारा, लोकांच्या हातांना काम आणि मुखाला रोटी द्या. राष्ट्रनिर्माणात सहभाग द्या. सैन्यात भरती व्हा डोवाल, नरवणे बना. अस्मिताच जपायची तर रस्त्यावर न उतरता जपता येईलच पण राष्ट्र सुद्धा तुमचे गुणगान गाईल असे काही करा.
ही भुमी असे नर विरांची, इथ परंपरा छात्रतेज अन अभिमानाची
इथे ठाई ठाई ठेव, पुण्यश्लोक अहिल्येची अन वीरता बाळ अभिमन्यूची.
पक्ष बदलू येतील जातील, तयाची गणना बाजार बुणग्यांची, सर येईल का कधी धर्मवीर आनंदी आनंदाची?
असावा मनी मराठी बाणा, जयाची किर्ती दिंगती जाणा, तो एकची विर अभिमाना
प्रत्यय देऊन गेला राणा अजूनही दुंदुभी गाजे त्रिभुवनी
अस्मितेचे ते परिमाण, त्यापुढे सत्ता तोकडी जाण म्हणोनी किर्ती अखंडीत
तेव्हा घराण्याची, ऐतिहासिक पुराव्यांची, मराठी किंवा उच्च जातीच्या जन्माची, अशी खोटी प्रतिष्ठा किंवा अस्मिता जपण्यापेक्षा स्वकर्तृत्ववाने काही घडवा. कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घ्या. घराला, गावाला, जिल्हा अन राज्याला अभिमान वाटेल अस काही करा तर “अस्मिता” शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल. मान उंचावेल अन मुखावर मंद स्मित येईल.