अहंकार
सांगण्यासारखं बरंच आहे, पण काय आपला अधिकार?
आपले शब्द गहाण टाकून कायद्याचा घ्यावा का आधार?
मनात संशयाचं विष पसरलं की जीवनी दाटतोच अंधार
काय खरे? काय खोटे? कळेनासे झाले की खुंटतो व्यापार
जीवनात तुम्ही कसे वागता? हे ठरवतो तुमच्यावरील संस्कार
जोवर मन निबर बनत नाही तोवरच द्यावा निर्मळपणे आकार
तुमच्याकडे अधिकार म्हणूनही उगाचच करू नये कधी वार
शस्त्राची जखम परवडली पण शब्दांना नको समशेरीची धार
मिळाले कायद्याचे संरक्षण, तरी मनी उगाचच नकोच अहंकार
आधी मनास विचारावे, सत्य दडपण्यासाठी नको खोटी तक्रार
कोणाच्या बांधिलकीने कधी होऊ नये विवश, द्या स्पष्ट नकार
तुमच्या भावनांशी खेळून कुणालाही कधी, होऊ देऊ नये स्वार
किती कमावले पेक्षा वाटले काय याचाच हिशेब ठेवेल संसार
फारच नशिबवान ते, जे कृतीने करती, आपल्या पिढीचा उद्धार
लक्षात घ्या, आपण डोळे मिटून केला गुन्हा तरी त्याचे खुले दार
निघतांना मनी नको विचारांचे थैमान, करा नियतीशी शुद्ध करार
यशापयश कशाने मोजायचे?सत्ता, शहाणपण, विवेक की उपकार
दिल्याचा नको गाजावाजा, नको मनी अहंकार, करा हलका भार
जे तुमचे नव्हते, भविष्यात नसेल, त्याचा माज का? करा विचार
गोष्टीची हतबलता मनास करते विवश हेच तर जीवनाचे सार
योग्य वाट निवडून जर जीवनाला दिला डोळसपणे आकार
पश्चताप करण्याचे नावच नको असाच हवा स्वतःचा करार
मी पणा नको, नको खोटा अहंकार, नको दिखाव्याचा बाजार
यशाला कधीच नको कोणत्याही नकारात्मक गोष्टींची किनार