आठवणीतला श्रावण

आठवणीतला श्रावण

आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. लहानपणी राख्यांचा खूप सोस असायचा. दोन्ही हातात मनगटभर राख्या असायच्या, राख्यांवर चित्रपटांची नावं असायची. नारळीभात किंवा नेवऱ्या असायच्या. श्रावण महिन्यात जेवणात पापड, सांडगे भोपळ्याच्या फुलांचं रायतं, उसळी आणि वरण असा फक्कड बेत असायचा. प्रत्येक उपवासाच्या दिवशी काही वेगळं गोड धोड असायचं. केळीच्या पानावर नैवेद्द दाखवला की गरमागरम जेवण आणि नंतर मस्त झोप काढणे त्यामुळे आम्हा लहान मुलांना श्रावण महिना प्रिय..

काय गम्मत आहे नाही, लहान असतांना कधी मोठे होणार याचा ध्यास असतो आणि मोठं झालं, किंबहुना साठी गाठली की पुन्हा एकदा लहान होऊन जगावं अस वाटू लागतं. माणसाचं मन मोठं विचित्र आहे, “सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे.” हे अगदी खरं. झालं असं, खूब अगोदर म्हणजे या मोबाईलचा वारा अंगाला शिवला नव्हता तेव्हा, चहा अधिक वर्तमानपत्र बरोबर “सकाळ” अस समीकरण होतं. आता मात्र रोज सकाळी चहा एका हातात आणि मोबाईल दुसऱ्या हातात अस नवी समीकरण जुळालं आणि वाट लागली, आलेल्या मेसेजेसना रिप्लाय करता करता तास कसा सरला कळत नाही. मेसेज फॉरवर्ड करणं किंवा डिलीट करणं हा एक दिनक्रम झाला आहे. या धकाधकीत कोणता ऋतू आला आणि कोणता गेला हे ही मोबाईलवरच आपण पाहू लागलो.

पहिल्या पावसानंतर मातीचा सुटणारा गंध चार भिंतीत कसा येणार? तव्दतच पूर्ण सकाळ मोबाईलची स्क्रीन सरकवण्यात गेल्यास कोऱ्या वर्तमानपत्राचा तो हवाहवासा वाटणारा गंध तरी नशीबी कुठचा? तो गंध अजूनही स्मृतीत माझ्या असं म्हणायची पाळी आम्ही स्वतःवर आणली.

तर अशाच एका श्रावणी सोमवारी अचानक लहानपणी ज्या प्राथमिक शाळेत जायचो त्या शाळेची आठवण होता होता श्रावणी सोमवार आणि मग एकंदरीत पूर्ण श्रावण महिना आठवला. आषाढ संपला की लगबगीनं येतो आणि ज्याची तुम्ही आम्ही, नव्हे समस्त सृष्टी वाट पाहते तो श्रावण.

रोहिणी नक्षत्र संपता संपता एखादी जोरदार वावटळ येऊन जाते आणि पावसाच्या आगमनाची वर्दी मिळते. मृग बरसले की लहान मुलाच्या डोक्यावरील जावळ यावं तशी संपूर्ण धरा हिरवीगार होते.मग शेतकऱ्यांची धांदल सुरू होते. विरली, घोंगडी बाहेर पडतात.जोतं बाहेर पडतात. कुळव,नांगर, टिकाव सगळीच शेत अवजार बाहेर येतात. शेतात पेरलेले बी तरारून येते. आद्रा, पुर्नवसू, उत्तरा मनाजोगत्या लागल्या की रोप लावणी संपते. पुष्यात दिव्यांची अमवास्या येते आणि वेध लागतात ते श्रावणाचे. पाऊस नसेल तेव्हा वर्तमानपत्राच्या होड्या करून आम्ही डबक्यात सोडत असू. नांगर होडी, शिडाची होडी, गलबत किंवा राजा राणी होडी, कधीतरी अचानक पावसाची सर येई आणि घर गाठण्यापुर्वी भिजवून टाकी. घरी मग उत्तरपुजा ठरलेली. पावसात सर्दी पडसे झाले तर लवकर बर वाटत नसे. बेल, तुळसीपत्र किंवा त्याच्या मंजीरी, चहाची पात, सफेद कांदा आणि गुळ याचा दोन वेळा काढा घेतला की सर्दी गायब. आता गावठी औषधांना आजार जुमानत नाही आणि पी हळद अन हो गोरीच्या जमान्यात गावठी औषधांचा गुण येईपर्यंत कुणी थांबतही नाही.

पाऊस आला की आपसूकच बालकवींचं गाणं आठवू लागत आणि प्राथमीक शाळेच्या पावसाळे पाहिलेल्या शिक्षिका अचानक भुतकाळात शिरतात, त्यांच्या शिक्षकांनी तालासुरात वर्गात म्हणून घेतलेलं गाणं आठवू लागते, बालकवींच्या
“श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते हळवी सरसर क्षणात कवळे उन पडे”

या शब्दांबरोबर वर्ग डोलू लागतो. शाळेबाहेर पडणाऱ्या पावसांच्या सरी पहात लहान मुले बाईंच्या गाण्याला साथ देत गाऊ लागतात.

बाईंच्या अंगात हळूहळू श्रावण भिनू लागतो. त्या विद्यार्थ्यांना विचारतात, “मुलांनो आता लवकरच कोणता सण येणार आहे? कोणाला माहित आहे? बरेच हात वर होतात, एका मुलाला उभ रहायची खुण करत विचारतात
चिंचणकर सांग बघू, कोणता सण चार दिवसांवर आलाय?
बाई, बाई, बाई एकच गलका सूरू होतो आणि चिंचणकर म्हणतो, “नागोबाची पंचमी.” सगळी मुलं टाळ्या वाजवतात.

बाईंना,नागपंचमीच गाण आठवू लागतं, “चल ग सये नागोबाला पुजायला.” मुल पायाचा ठेका धरत बाईंच्या मागोमाग गाऊ लागतात. या सगळ्याची आठवण होता होता मी बालपणात पोचतो. आमच्या घरी गावातील दोन देवळ्यांच्या पुजेची जबाबदारी होती. महिना दोन रूपये बिदागीवर आम्ही गावातील दोन छोट्या मंदिरात बरेच वर्षे पुजा करत होतो. ही मंदिरे रानडे नावाच्या सरपंचांनी बांधली होती. तेच दररोज देव पुजेची पूर्ण तयारी आणि महिन्याला दोन रूपये देत. आधी माझे मोठे बंधू, मग मधले बंधू आणि मी सहावीत असताना माझा नंबर आला. तो वर पुजेचे पाच रूपये मिळू लागले. हे पाच रुपये आईकडे द्यावे लागत मात्र देव्हाऱ्यात सणा वाराला दोन ढब्बू पैसे भावीक टाकत, श्रावणात आठवड्यात दोन चार वेळा, कधी शंकराच्या पिंडीवर तर कधी गणपतीच्या मूर्ती पुढे तर कधी मारुती राया समोर पैसे मिळत. अगदी दहा पैसेही कधीतरी हाती लागत.सकाळची शाळा असे म्हणून पूजा पहाटे, अस्पष्ट उजाडले असतांना आटोपवी लागे. एकदा अशीच बहुधा श्रावणातच, सकाळीच पूजा करतांना, पिंडीवर कोणी हार घातला असावा समजून तो बाजू करावा म्हणून हात घातला तर सर सरत साप निघून गेला. अंगावर सर्रकन काटा आला. नशीब बलवत्तर म्हणून तो दंश न करता निघून गेला. श्रावण महिन्यातील ती आठवण पन्नास वर्षानंतरही अजूनही ताजी आहे. तेव्हा मिळणाऱ्या पाच रूपयांना किंमत होती.

तेव्हा कमवत्या एका व्यक्तीवर, पाच सहा तोंड पोसली जात म्हणून काटकसर ही अंगात भिनलेली. पावसात खेड्यात आजही शहरी भाज्या अभावानेच आढळतात. गावी श्रावणात, जेवणात नैसर्गिक भाज्यांची रेलचेल असायची मात्र, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार एवढे दिवस घरात कोणत्या ना कोणत्या देवांचा उपवास म्हणून बिनकांद्याचे बिनलसणीचे जेवण असायचे. देवाच्या नावाखाली तिथेही काटकसर दिसून येई. घराच्या आवारात पिकणारी पालेभाजी, अळू, माठ, शतावरी, तोंडली, लाल भोपळ्याचे कवळे कोंब, पडवळ,दोडके, बांबूचे कोंब, टाकळा, कुर्डू याच भाज्या पुढील दोन महिने आम्ही चवीने खात असू. आज मुलांसमोर या भाज्यांचा विषय काढला तरी मुल तोंड वाकड करतात. पण तेव्हा या भाज्यांचा कुटुंबाला फार मोठा आधार वाटे.

दमदार पाऊस असल्याने, घराबाहेर खेळण्याची सोय नव्हती सगळीकडे पाणीच पाणी पण आकाशवाणी विविधभारती ब वरती सुरेल गाणी लागायची, त्यात कविवर्य माडगूळकर यांचे,
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात,नाच रे मोरा नाच”
किंवा
“श्रावणात घन निळा बरसला रिमझीम रेशीम धारा
उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा” , हे गाणं अनेकदा वाजायचं. श्रावणात पाऊस आणि सकाळच उन पाठ शिवणीचा खेळ मांडून बसायचे आणि कामगार सभेच्या साडे अकराच्या कार्यक्रमात, कवी सुधीर मोघ्यांचं

“आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा”, हे गाणं हिट आणि फिट असायचं. बिनाका माला आणि अमिन सयानी प्रमाणे कामगार सभा कार्यक्रमातील गाणि ऐकत कित्येक पिढ्या मोठ्या झाल्या.

१९७७-७८ ला दहावी झाली, दरम्यान आई देवाच्या घरी त्याच अंगण फुलवायला निघून गेली आणि घरात भाऊ, बहिण असूनही एकलेपण आले. अर्थात श्रावण येत होता, जात होता पण पावसात भिजून आल्यानंतर आईच्या नऊवारी साडीच्या पदराने तिच्या जवळून डोक पुसून घेण्याच भाग्य संपलं होत. पहाता पहाता शैशव आणि बालपण कधी नियतीन हिसकावून घेतलं ते कळलं देखील नाही. मी पुढील शिक्षण आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने घराला आणि माझ्या जन्म गावाला दुरावलो. सय जागी झाली की वेड्यासारखा पून्हा गावी जात होतो पण ती पंख छाटल्या नंतरची केवीलवाणी धडपड होती.

ग्रीष्म जाळून टाकायला लागला की तगमग होई, नको ते शहर, नको ती नोकरी असे वाटू लागे. एखादी वळीवाची सर आली तरी, पाऊस जवळ आला असे वाटून, मनात श्रावण हळवी सरसर करून आठवणी जाग्या करतच होता. कधीतरी अचानक दूरवर गाणे ऐकू येई आणि मी स्वप्नातच माझ्या गावी दाखल झाल्याच दृश्य तरळू लगे. कानात कवी निकुंभ यांचे गाणे गुंजत राही,

“घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात”

मुलींना माहेर असणं यात तसही काही नवल नाही पण शहरात रहाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जन्मगाव हे माहेरच असत. सय येताच अचानक गाव गाठल तर चुलीवरचा निरशा दुधाचा चहा, शेकलेली तांदळाची भाकरी आणि बरोबर खोबरं चटणी इथून माहेरपणाला सुरवात होते आणि किती दिवसाची सुटी हे समजल की शेवया, घावणे आंबोळ्या याची रेलचेल सुरु होते. जेवताना खरपूस भाजलेला बांगडा किंवा जवला आणि नारळाच मिश्रण केलेली चटणी असतेच. तर काही कुटुंबे, घरचा राखून ठेवलेला कोंबा, पाहुणचाराला उपयोगात आणतात. तेव्हा शहरात राहणाऱ्या पुरूष मंडळींना गावाकडे आई, आजी, काकू, मावशी यांच, माहेरच प्रेम मिळतच. त्या अर्थान पुरूषांना आपल माहेर आपल्या प्रिय जनात शोधायला अडचण नसावी.

पाऊस आणि छत्री, त्यातही त्याची रिमझिम आणि छत्री यांच नातं विचित्र असतं, असून अडचण, नसून खोळंबा या प्रकारातलं. तरुण प्रेमीकांना प्रेमात सोबत करते ती छत्री, तिच्या कमरेभोवती हात धरुन किंवा अलगद तिच्या खांद्यावरून हात धरत तिला एका छत्रीतही जवळ करू पाहणारा “तो” म्हणजे श्रावणासारखाच नटखट, लबाड. फक्त संधीच्या शोधात, ती दोघही असतात. कधी तिचा खांदा भिजतो तर कधी त्याचा आणि ही चोरी चाणाक्ष आईच्या किंवा बाबांच्या नजरेतुन सुटत नाही, कारण त्यांनी तोच श्रावण पन्नास वर्ष आधी अनुभवलेला असतो. छत्री नसली आणि अचानक पाऊस बरसला तर तीच्या ओलेत्या शरीराच्या स्पर्शाचा अनुभव आणि त्यांच्या त्या जगाला विसरून प्रेमात डुंबण्याची अदा श्रावणात सही सही जगता येते.
हाय जालीम अब सपनेभी यही तनहाई।

अशोक पत्की मात्र या श्रावणाच्या धारेतील कृष्णाच्या रासक्रीडेचा अनुभव घेतात. मग त्यांना वेगळं काही सूचतं
“रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची पाहते”

श्रावणातला पाऊस म्हणजे खरच खट्याळपणाचा कळसच, कधी अचानक तडतड करत सुरू होईल तर कधी अचानक सुर्याच्या किरणांवर स्वार होतो आणि रिमझिम करत येईल याचा नेम नाही. या पावसाने मांडवावर चढणाऱ्या वेली बेजार होतात, पुन्हापुन्हा खाली घरंगळत राहतात, खोडकर कृष्णाप्रमाणे श्रावण सरी त्यांचा पाठलाग काही सोडत नाही त्यात भरीस भर म्हणजे मधून मधून गार वारा शिरशिरी आणतो. कवी खेबुडकरांना या श्रावण सरीवर गाणं सुचलं नसत तरच नवल, ते श्रावण सरीत वेली कशा धुंदावाल्या ते सांगतात,
“वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली हवा धुंद झाली.”

श्रावणात प्रेमीकांची स्थिती कशी असते? या सरींनी प्रियकराला वाटेतच गाठलेलं असतं आणि त्याची प्रेयसी वाट पाहून थकून जाते. तिच्या खुप अपेक्षा असतात, पण तो थोडा गोंधळलेला, नवखा असल्याने तिला काय आवडेल या भ्रमात ती मात्र अस्वस्थ, आतुरतेने त्याच्या अनुरागाची प्रितीच्या अदेची वाट पाहणारी. तिच्या भावना व्यक्त करतांना कवी उमाकांत म्हणतात,

माझिया प्रियाला प्रीत कळेना
अनुराग त्याचा माझा हाय जुळेना

हे म्हणजे, थोडं अतिच झालं. प्रेमाच्या धारेसाठी आसुसलेली ती आणि ढाई अक्षर प्रेम हा न कळलेला,स्वतः बावरलेला तो. क्या करे? “दिल है की मानता नही.” अशी ही अवस्था असावी. हे अवघडलेपण काही सेकंद किंवा मिनीटांचे पण “युगानी युगे वाट पाहते” चा आभास देणारी, शेवटी त्याला एकदाचा सुर सापडतो आणि श्रावणाच्या धारा जोरकस व्हाव्या तसं तो प्रितीच्या वर्षावात तिला न्हाऊ घालतो.

श्रावणातली प्रेमाची वाट आणि वहिवाट वेगळीच असते. कुणा सजणीला त्याने पडतच रहावे तरच सखा तिच्या समीप राहील असेही वाटते. प्रणय राधना कशी करावी ते श्रावण शिकवतो अस म्हंटल तर वावग ठरू नये.
कोण्या षौडशीला रस्त्यावरून श्रावण सरीत भिजत जातांना पाहिल्यावर आणि मधूनच पडणारे कोवळे किरण तिच्या अंगा खांद्यावर खेळतांना किंवा तिच्या केसांच्या बटावर डुलतांना पाहून गंमत वाटते. जणू श्रावण सरी आणि तो रविराज तिच्या कोमल तनुशी चाळाच करत असावे असा भास सुरेश भटांना झाला आणि त्यांना सुचले,

“ती गेली तेव्हा रिमझिम रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता”

मित्रहो श्रावणात तुमचा आमचा मधुसूदन, खोडकर कान्हा गवळणींची थट्टा मस्करी करतो, त्याचं दही दूध चोरतो, त्यांना वाटेत अडवून त्यांची छेडछाड करतो तरीही त्या गोपीका लाडीक तक्रारी शिवाय काही करतच नाही. विदर्भात, खानदेशात नागपंचमी सणाला माहेरवाशीणी येतात आणि एकमेकींना भेटतात , झाडांवरती झोके बांधून बालपणीच्या आठवणीत हरवून जातात. श्रावण म्हणजे सणांचा राजा. घरात महिलांना आनंद व्यक्त करण्यासाठी कारणच हव, तर श्रावणातील मंगळागौर वाजत गाजत येते, घागरी फुंकण, फुगड्या, काय आणि किती.

आठवणीत रमण्यापेक्षा जगण्याची हौस फिटवणारा हिरवा ऋतू म्हणजे श्रावण. शहराबाहेर पिकनिकला जाण्याची संधी कोणी सोडत नाही, मग भुशी डॅम, झिनिथ फॉल किंवा अजून काही पण उत्साह तोच. कल्याण किंवा टिटवाळा सोडलं की
“हिरवे हिरवे गार गालीचे,हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती.
असं नकळत मनात येऊन जातं. कोसळणारे धबधबे, वाहणारे छोटे मोठे ओढे आणि निसर्गाचे संगीत. दिव्याची अमवास्या, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, दहीहंडी अशा अनेक सणांबरोबर उत्साहाचे आणि उत्सवाचे रूप बदलत जाते. त्या त्या सणानिमित्त वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. बच्चेकंपनी मोठ्या आणि कलात्मक राख्या मिळणार म्हणूनही आनंदी असतातच. तर लग्न झालेल्या मुलींना भावाला भेटायला जायला मिळणार म्हणून आनंद झालेला असतो. सोबत अखंड मिष्टान्न आणि सुग्रास भोजनाची मेजवानी. बस जीने को क्या चाहिऐ?
तर आठवणींचे कबुतर उडत उडत कुठे पोचल ते कळालच नाही. पण काही म्हणा किती सुंदर आणि अर्थपूर्ण चालीरीती आपल्या पुर्वजांनी करून ठेवल्या आहेत! ऋतू कोणताही असो भारतीय तो अर्थपूर्ण जगतात.खरच भारतीय संस्कृतीच्या परंपरांची सुंदर गुंफण म्हणजे श्रावण, हा श्रावण तुम्हाला आनंदी ठेवो.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar