आणि लोकल चुकली

आणि लोकल चुकली

पाहिले मी तुला, तू ही मला पाहिले,
ह्रदय दिले अजाणता, कसे ते ना कळे

रोजचीच भेट आपली, रोजचे रागावणे
रोजचेच रूसणे अन रोजचेच हासणे

नेत्रांनी घायाळ करशी, बरे नव्हे वागणे
सरावलीस तु ही आता रोज वाट पाहणे

अंतरलीस नादाऊनी काय माझे चुकले?
मिलनाचा योग नाही हेच मनी टोचले

ही काही कविता नाही हे जीवन गाणे आहे, तुम्हाला नाही खरं वाटणार, पण तिचा मुखचंद्र सकाळीच दिसावा,तिने फक्त एक कटाक्ष टाकावा,थोड स्माईल द्यावे या पलीकडे आजपर्यंत मी काही अपेक्षा केली नाही, म्हणजे करत नव्हतो. पण आता आतुनच काही तरी वाटू लागलय. मनात नव्हे ह्दयात, ती समोर नसताना एक पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीत नकळतपणे मी ओढला जातो. मला तेव्हा काय काय होतं ते नाही सांगता येत. पण अगदी एकाकी वाटतं. वाटतं तिच्याशिवाय मी अपुरा आहे. भावनेची स्पंदने निर्माण होतात. जे काही आमच्या दोघांत चालले आहे ते सत्य की आभास आहे हेच तर कळत नाही. खर सांगायचे तर अजून आम्ही एकदाही खूप जवळून प्रत्यक्ष भेटलो नाही, बोललो नाही पण आंतरिक ओढ तिच आहे. आमचं खूप वर्षांच नव्हे युगायुगांच नातं असावं असं मला वाटतं. आता या वाटण्यावर किती विश्वास ठेवायचा ते ही कळत नाही. ती कोण? कुठली काही माहिती नसतांना मी अजाणतेपणी माझ ह्दय तिच्याकडे हरवून बसलो. कधीकधी हसू येतं, नजरेन प्रेम करायचं तसं अवघड पण. ते अवघड मी करतोय, यात किती शहाणपणा आहे माहिती नाही.

तिच ती, आमची दोघांची भेट घडवणारी होम ट्रेन ८.१४. होम ट्रेनमध्ये जागा पकडायची म्हणजे गाडी प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वी किमान दोन पाच मिनिटे अगोदर यावेच लागते पण जेव्हा पासून आमची नजरानजर झाल्याय आमच्यात स्पर्धा असते की लोकल प्लँटफॉर्मवर येण्यापूर्वी तर मला यायचं असतंच पण त्या ही पेक्षा ती येण्यापूर्वी मला तिचं नजरेने स्वागत करण्यासाठी पोचायचे असते पण..

बरेचदा तीच पहिली पोचते आणि मी अद्यापही आलेलो नाही पाहून तिची नजर जिन्याच्या दिशेने भिरभिरत असते. मी ते चोरून कित्येकदा पाहिलंय आणि माझ्या मनात आपण कोणाला तरी हवे आहोत, कोणाला तरी आवडतो, कोणीतरी आपली वाट पाहत, हे पाहून मनात उकळ्या फुटल्यात. तर मी खूप प्रयत्न करूनही तिच्या आधी प्लॅटफॉर्मवर पोचण्यात अयशस्वी ठरतो कारण कधी आईचा डबा तयार नसतो तर कधी बाईक लावायला जागाच मिळत नाही. खरं तर असे काही झाले की माझी चिडचिड होते. काय उपयोग? मी प्लँटफॉर्म गाठण्याआधी ती तिच्या जागेवर येऊन कदाचित माझी वाट पाहत उभी असते.

एकदा तरी मी तिच्या आधी प्लँटफॉर्मवर येऊन उभा राहीन आणि तिचं हसून स्वागत करीन, नक्की, आज नाही जमलं तरी उद्या तिला आश्चर्याचा धक्का द्यायचाच अस ठरवून मी झोपतो. हल्ली तर ती झोपेतही मला सोडत नाही, चक्क वेडावून दाखवते, मला उशीर झालाय पहाताच खुन्नस देते. अर्थात हे सगळ प्रेमात असत, Everything is fair in war and love, तिच खुन्नस देण ही मला आवडतं. तो assurance असतो, होय मी तुझीच आहे. मला प्लँटफॉर्मवर यायला उशीर झाला तर मी अनेकदा तिची डोळ्याच्या पापण्या झुकवून माफी मागतो मग ती गोड हसते, हा संकेत असतो, ‘जा माफ केले.’ अस मनातच म्हटल्याचा, सुकून मिळतो, तिने माझ्याकडे हळूच पहावं यासाठी मी प्लँटफॉर्मवर कान ही धरेन पण, तिला आवडायला हवं ना!

ती दिसायला चारचौघींसारखी आहे, तिला पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्टही शोभतो पण साडी नेसली तरी ती रुबाबदार दिसते. तिची कोणाशी तुलना केलेली मला नाही चालणार. ती हलकासा मेकअप करत असावी. तिचे निळे घारे बोलके डोळे, कमरेपर्यंत लांबसडक तकाकी असणारा केस संभार आणि मध्यम देहयष्टी तिला शोभून दिसते.तिने लिपस्टिक लावल्याचं किंवा भडक ड्रेस घेतल्याचं मी तरी पाहिलं नाही पण तरीही ती माझ्यासाठी स्वप्नपरी आहे. का ते आज तरी मला नाही सांगता येणार.

अजूनतरी आमची भेट झालेली नाही पण मला खात्री आहे, आज नाही तर पुन्हा कधीतरी भेट होईलच, तिचं ते रागावणं, गोड हसणे, लाजणे आणि गाडीत चढतांना काळजी घे अस डोळ्यानेच सुचवणे सगळंच मला प्रिय आहे. ती खूप सुंदर आहे की कशी? मला नाही सांगता येणार

पण ती मनाने खूप चांगली असावी असा माझा कयास आहे, गेले काही महिने आम्ही प्लॅटफॉर्मवर नजरेने भेटत असूनही तिने एकदाही मुद्दाम पाठी राहून गाडी सोडून दिली अस झालेलं नाही. तिला भेटीची अजिबात घाई नाही. तिच्याजवळ आक्रस्ताळेपणा नाही याची ती खूण आहे. ती mature असल्याची खूण आहे. विशेष म्हणजे ती फार भडक कपडे घालत नाही किंवा फार भडक मेकअप करत नाही, यावरूनही ती फार चिप नाही याची खात्री पटली आहे. त्यामुळे तिच्या प्रत्यक्ष भेटीपेक्षा तिच्या नजरेचा ओझरता कटाक्ष मला सुखावून जातो.

आमच्या या भेटीचे गुपित कोणाला माहिती आहे की नाही हे अद्यापही मला जाणवले नाही पण ज्याने कुणी आमच्या नजरेची इशारत पहिली असेल तो आम्हाला नक्कीच पागल समजत असेल. या ओझरत्या इशाऱ्यात कोणतं सुख लपले आहे त्याला कसे कळणार? कधीतरी ती गाडीला नसते, म्हणजे प्लँटफॉर्मवर आल्यावर तिच्या नेहमीच्या जागेवर माझी नजर जाते तेव्हा मला ते कळते. तिला उशीर तर झाला नसेल ना? तसं असेल तर धावपळ करतांना तिचा अपघात तर झाला नसेल ना? की मग ती आजारी तर नसेल ना? एक का दोन अनेक शंका मनात डोकावतात,मन उद्विग्न होते पण तिच्याशी संपर्क साधायचे काहीच तर साधन नसते, गाडी सुटेपर्यंत माझे डोळे तिचा शोध घेत असतात.

जिना उतरणाऱ्या प्रत्येक तिच्या वयाच्या मुलीच्या तिला मी शोधत असतो. लोकल हॉर्न देते, गाडी हलते, तरीही माझे डोळे तिचा शोध घेत असतात. गाडी प्लँटफॉर्म सोडते आणि मी खट्टू होतो.

कामावर मन रमत नाही, मनात अस्वस्थता असते, त्या दिवशी माझ्या हातून अनावधानाने चुका होतात आणि माझी सहकारी मला विचारते देखील, “रंजन सर, आज खोये खोये से लग रहे हो. गुमसुम हो, कूच हुवा है क्या? आज आपका काम पे ध्यान नही, खाना तक आपने नही खाया.” तेव्हा लक्षात येतं तिच्या शिवाय आपण अपुरे आहोत, तिलाही तसेच वाटत असेल का? की ती आपल्याला खेळवते आहे? एकीकडे तिच्या विषयी चिंता आणि दुसरीकडे तिच्या बाबत शंका,स्वतःचाच राग येतो.
आपण तिच्या विषयी असा वाईट विचार करू कसा शकतो?

त्या रात्री मन अस्वस्थ, नीट झोप लागत नाही,दुसऱ्या दिवशी थोडं लवकर आवरून मी लवकरच प्लँटफॉर्म गाठतो, ती अद्यापही आलेली नसते. माझ्या मनात ती आली नाही म्हणून चिंता आणि आज ती आली तर आपण तिला मिश्किल हसून उशीर झाल्याबद्दल नक्की चिडवू असा विचार, आणि ती जिना उतरून येत असताना ओझरती दिसते.

ती तीच, की कुणी वेगळी. क्षणभर कळत नाही कारण आज ती थोडी अधिक उजळ,थोडी अधिक सुंदर दिसते. खर तर तिचं माझ्याकडे लक्ष नसतेच. ती प्लँटफॉर्मवर येते आणि तिच्या नेहमीच्या जागेवर जाता जाता माझं लक्ष तिच्या हिरवा चुडा भरलेल्या हातावर जात आणि मी गोठतो. डोकं गरगरते, चक्कर येऊन आपण कोसळू असेही वाटते. ती नेहमी प्रमाणे माझ्याकडे कटाक्ष टाकते,तिच्या पापण्या झुकलेल्या असतात. जणू ती माझी माफी मागत असावी,मला काहीच तर सुचत नाही तरीही मी उसासून हसण्याचा निष्फळ प्रयत्न करतो आणि माझ्या डोळ्यात अश्रू जमा होतात. लोकल येते पण ती पकडायचे भान मला रहात नाही. जीवनाची गाडी चुकली होती तिथे लोकलचे काय? लोकल निघून जाते , मी एकटाच रिकाम्या प्लँटफॉर्मवर वाट पाहत उभा आहे नशिबाची. मी मनात म्हणतो Man proposes God disposes.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar