आता तरी जागे व्हा

आता तरी जागे व्हा

माणसाचा आता झालाय माकड अन माकडाचा झाला माणूस
प्रत्येक पुढारी हाच मदारी, नाचवे जनतेला, होतो मनापासून खुश

आश्वासनाची दोरी त्याच्या हाती, भुलथापांचा नित्य वाजवे डमरू
सणासुदीच्या निमित्ताने काढतो वर्गणी, बनवे नागरीकांना झुमरू

शिवराय, गांधी, शाहू, फुले, आंबेडकर याचें पुतळे हे चलनी नाणे
जय जय महाराष्ट्र माझा तर कधी माझा भिमराव हे हुकमी गाणे

मतदार याद्या, कधी स्पर्धा, शिबीर भरवत हे जनतेला ठेवती भ्रमात
इलेक्शन आले की प्रचार-भेटी जनतेची कामे आली की हे कोमात

बंद लाईट, रस्त्यावरील खड्डे, उघडी गटारे, यांच्या नजरेला नाही दिसत
लागली निवडणूक, मिळाले तिकीट की हात जोडून दारी येती हसत

काही अडचण असली, यांची गरज भासली तर यांना तेव्हा वेळ नसतो
वर्गणीच्या वेळी दारावर हजर, तेव्हा मात्र प्रत्येक जण यांना नीट दिसतो

हे कसले सेवक? हे जनतेची लुट करणारे, सफेद,भगव्या कपड्यात गुंड
दुर्दैव हेच की दर पाच वर्षांनी त्यांनाच निवडून देतो इतके आम्ही अंध

तो देतो घोषणा, करतो वल्गना, आम्ही मुर्ख, त्या भूलथापांना पडतो बळी
तो उबवतो सत्तेची गादी, आम्ही त्याची अचरट प्यादी, शिकूनही अडाणी भोळी

थांबा! त्यांच्या शब्दांना भुलून रस्तावर उतरू नका, ओळखा त्यातला धोका
भाषणाला भाडोत्री श्रोते बनून ट्रकने आणि बसने उगाचच जाऊ नका

वापरून फेकून देणे हिच तर या कर्तबगार, यशस्वी नेत्यांची यशाची नीती
अखंड आयुष्य कुणासाठी झिजून काय मिळवलत? नका करु आयुष्याची माती

हिंमत अन जिगर असेल तर स्वतः प्रामाणिकपणे निवडा एखादे क्षेत्र
शासकीय सनदी सेवा असो की उद्योग किंवा नोकरी हाच यशाचा मंत्र

खूप काही ऐकलं पाहिलंत, त्यांच्या पाठी पाठी फिरूनही निमुट सोसलं
आता तरी जागे व्हा, आयुष्य फुका दवडू नका, सावध ऐका पुढच्या हाका

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar