गजालीक कारण की

गजालीक कारण की

आमच्या कोकणात म्हण आहे, “भितीक कान असतत” तर, खर तर मी ही खाजगी गोष्ट तुम्हाला का म्हणून सांगावी? पण कोणावर भरोसा ठेवायचा? बऱ्याच बातम्या घरातूनच लीक होतात. तिला काही विश्वासानं सांगावं, “तू धर्मपत्नी म्हणून सांगितलं, कुणाला सांगू नको हा, अगदी स्वतः ला तर मुळीच नको.” त्याच दिवशी तीच बातमी पुन्हा मला सप्रेम भेट. “रे विज्या, सकाळी आमची ही असा असा म्हणा होती खरा काय रे!” तर असा कोणताही किस्सा उडत उडत तुमच्या कानावर पडेपर्यंत त्याला नातवंड झालेली असतात. वीतभर माहिती किंवा बातमी हातभार होते. वांग्याच्या रोपाला भोपळा येतो, तो ही गाडीत मावणार नाही इतका. हल्ली नवतरुण मुला मुलींचे वर्षभरात डीव्होर्स होतात पण माझ्या लहानपणी आई बाबा रोजच भांडायचे, पण त्यांचं एकमेकावर भारी प्रेम होतं. कस त्याचा हा किस्सा मी आमच्या हिला सांगण्याऐवजी तुम्हाला सांगतो. खाजगी आहे कुणाला सांगू नका हा?

गेले कत्येक वर्षे आमच्या गोठ्यात इतर गुरांसोबत गाय असायची. असायची म्हणजे आवर्जून आम्ही पाळायचो. तिच्यासाठी गोठ्यात वेगळी जागा राखीव ठेवायचो. कोणाला गाईच पान द्यायचं असलं तर गावातील बुजुर्ग म्हणायचे, “खय नाय गावली तरी बामणाच्या गोठ्यात गाय असतलीच” गेले पन्नास वर्ष गोठ्यात एक तरी गाय असलेली मी पहात होतो. त्या पुर्वीही असाव्या. गोठ्यात म्हैशीही होत्या पण पावसात गाय हमखास बुळकत असे आणि ते पातळ शेण भरण आईला अवघड होई. गोठ्यात मुरकुटे आणि मच्छर यांच राज्य असे, रात्री कितीही वेळ धुरी केली तरी मुरकुट थोडा वेळ पळून जाई आणि धुरी विझत आली की पुन्हा अवतिर्ण होई. आमच्या घरातील माणसांशी मुरकुटे कबड्डी कबड्डी खेळत. तर असो महत्त्वाचे असे की, आई सकाळी गोठ्यातुन बडबड करे,” फटकेक घालूक तुमका गाय व्हयी कित्याक? एकव दिस शेण गोठो करणास नाय. माकाच हयसर मरमर मरूचा लागता. पाऊस गेलो की “कपीलेक” काढून टाका.” तिचा तो त्रागा ऐकला आणि लोट्यावरच्या आरामखुर्चीत बसून गावकराकडुन मागून आणलेला पेपर वाचता वाचता बाबा मोठ्याने तोंड सोडल, “तुका जमणा नाय तर तसा सांग, त्यांका कित्याक फटकेक घालत, सणावाराक गाईच्या नैवेद्याचा पान देऊक कुळवाड्यांकडे जाऊक नको म्हणान गोठ्यात गाय बाळगली, तुमका ता कळाचा नाय, तुमची अक्कल शाण खाता. मशेरीक शेळकुंड गाईच्या शेणाचीच करतस मां? का म्हशीची? नैवेद्याक दूध, दही, तुप तिचाच वापरतास ना? म्हशीचा न्हय मां, उगाच माझा तोंड चाळवू नको. शिक्षण नसला का ही अशी गत होता.”

“शिक्षण कोणाचा काढतास? तुमी शिक्षक होऊन काय उजेड पाडलास? मी कमी शिकलेली होतय म्हणाय राबवून घेऊक तुमच्या हातीक गावलय, शिकलेली बाईल गोठ्यात शाण काडुक इली नसती, या गावात रवली नसती, लावणेक कुणग्यात उतरली नसती. माका बोलाक लावू
नका, दसरो झालो की गाय गोठ्यात दिसता नये, न पेक्षा तिचा शाण काडीत चला. थय खुर्चीत बुड टेकवून सांगाक काय जाता!”

घरी प्रेमाचा संवाद सुरू झाला की आम्ही भावंड गुपचुप बसायचो, चुकून मध्ये बोलल की नौबत आलीच समजायची, त्या पेक्षा शांत रहाण फार उत्तम. बाबा तरा तरा गेले, गोठ्यात पाय टाकणार तोच सरकून पडले, “आये आये गे, पडलय गे. मेलय गे, हाड मोडलासा वाटता. आता काय खरा नाय, शाळेत कसो जातलयं, सायबाक कळवूचा लागतला.”

एकटेच बडबडत होते. आई शेण भरलेल घमेलं टाकायला गायरीकडे गेली होती. तिने ते आये गे, ऐकल आणि ती पळतच गोठ्यात आली. शेणाच्या हातानेच तिने बाबाना उठवण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत आम्ही दोघ भावंड लोट्यावरून धावत आलो. पहातो तर बाबांनी साष्टांग नमस्कार घातला होता, आई पाठून त्यांना ओढून उभं करण्याचा प्रयत्न करत होती. आमच्या पावलाचा आवाज ऐकताच त्यांनी पुन्हा जोराने ओरडायला सुरवात केली, “बाबल्या मेलय रे,बहुतेक हाडच मोडला, तो न्हानगो खयं? बापूस पडलो ता ऐकाक इला नाय काय? रे झिला हात दी, उठूक जमता का बगतय.”

मी हात धरून उठवू लागलो तस आई ओरडली, “मेल्या बापाशी परास बुद्धी गेलीहा काय? पाठसून कित्याक ओढत, पाय जमनीक कसे लागतीत? मी पाठून धरतय, तू पूढून हात दी, रे विजा, मेल्या बापाशीक हात दी तो एकटो संजो काय करतलो? ह्या आठ मणाचा वजा उखलूक नको!” तिने बाबांच्या वजनाच मोजमाप काढलं.

आईने हात चऱ्याला पुसून शेण घालवले होते पण त्या हिरव्या गवताची खाज बाबांच्या अंगाला लागत होती, तिचा हात लागताच ते पुन्हा विव्हळत ओरडले, “गो हात आसा का करवत, चामडी नुसती कापता. सड पडतीत काखेत.”
आईने दुर्लक्ष करत नेट लावून त्यांना उठवलं, आम्ही त्यांना दोन्ही हात धरून जोर लावून उभ करण्यात यशस्वी झालो. पण ते उभ रहाता रहाता कळवळले.” कमरेतसुन मी मोडलय का काय ताच कळना नाय, रे हळू धरा, हयच बापाशीक मारून घालतास का काय?”

आई रागावली,”काय मरणास नाय,हय नाटका करूक बरी जमतत, थय शाळेत नायत वाटेत आडवे जाता, त तुमका कोण उठवूक येणार होतो? त्या वाटेवर वाघूट फिरता, त्याका बघूनच काय ता झाला असता. मगे जीव वाचवूक उठान पळुचाच लागला असता. हय बाईल आसा ना वडी काडुक म्हणाध थेरा सुचतत.” मला ते ऐकून आणि बाबांच्या पाठी वाघूट लागलय आणि बाबा पळत आहेत हे चित्र डोळ्यापुढे आणताच हसू आलं. मला हसताना पाहून बाबा चिडले, “रे शिंदळ्या हय बापाशीचो जीव चललोहा आणि तुका हसाक काय जाता?” खर तर मला काही बोलायच नव्हते पण आईच म्हणाली, “रे कित्याक म्हणान हसत, तुझो बापूस काय विदूषक हा?” तस मला पून्हा हसू आलं, मी म्हणालो, “गे माका अचानक सूचला जर वाघूट बाबांच्या पाठी लागला तर बाबा कसे पळतीत, आणि वाघटान बाबांका धरल्यान तर तो काय करीत.”

ते ऐकून बाबांच पित्त खवळलं, “मायझया, हय माका उभ्या रवाक जमणा नाय आणि तुका चेष्टा सूचता”, त्यानी मी ज्या हाताला धरल होत,त्याला हिसका मारून मला मारण्याचा प्रयत्न केला, मी त्यांचा फटका वाचवण्यासाठी दूर झालो आणि ते पून्हा गोठ्या बाहेर तोल जाऊन पडले पण ह्या वेळेस ते आईच्या अंगावरच पडले. आई रागावली,” ओ! काय करतास? मी चेपलय तुमच्या वजाखाली, खुळावलास? दिवस आसा, रात्र न्हय.” अस म्हणत तिने त्यांना ढकलून दूर केल तस मी आणि भावाने पून्हा आधार देवून उठवलं.

आता त्यांच्या लक्षात आलं, डाव्या पायाला नक्की कुठेतरी फ्रक्चर असावं, उभ रहायला गेल की पायातून प्रचंड वेदना येत होती. “गो साप मॅड झालस काय? माका उभ्या रवाक जमणा नाय, तुझ्या अंगावर पडूक मी खुळो नाय,हाच काय तुझ्या अंगावर पडूक? मग आईचा पारा तापला,”गेले तीस वर्षा तुमच्यासाठी राबतय, दिस म्हणाक नको रातव म्हणाक नको, शिल्लक ठेवलास तर रवतलय. पिडून खाल्लास. तुमी आणि तुमच्या आवशीन आणि आता तोंड वर करून विचारूक काय जाता. तरी नशीब सकाळी उठल्यापासून केर, वारो, न्हाणी पेटवणा, शाण काडणा, तुमका गिळूक भाकरे, पोरांचो डब्बो, कपडेलत्ते, पेज पाणी, दुपारचा जेवण कोण करता? तुमी दुध पोचवून इलास की शाळेक गेलास. पाठला बघता कोण? ठेवलेलीक धाडतास? मगाशी सांगलय माझ्या तोंडाक लागा नकात म्हणानं.”

आईने दिवस भरात काय करते ते न विसरता सांगीतलं पण ही ठेवलेली कोण? हे प्रकरण आम्हा दोघांनाही माहित नव्हतं. विचारायच कोणाला आईला की बाबांना ते कळेना. उशिरा विचारण्यात काय अर्थ अस मनात आलं,आमचे धोंड सर नेहमी म्हणायचे मनात शंका ठेवू नये, म्हणून मी अगदी सहज विचारलं, “बाबा आऊस म्हणता ता खरा की काय?” “रे कशा बद्दल विचारत,काय ता नीट बोल.” “नाय आऊस म्हणीत होती ना, ठेवलेलीक धाडतास की…”

बाबा आईच्या बोलण्याने आधीच संतापले होते. माझा प्रश्न ऐकताच चिडले आणि मला मारायला म्हणून जोराने लाथ उचलून माझ्या दिशेने झटकली, त्या बरोबर कळवळले, “आय आय गे आता माका कळला बहुतेक या पायाकच फ्रॅक्चर आसा, आदी गावडे हाड वैद्याक बोलवून हाडा. तो आल्या शिवाय माका बरा वाटाचा नाय, गो मी पोरां बरोबर हळूहळू येतय आधी माका आंघोळीक पाणी काड, अख्ख्या आंगाक शाणाचो वास येता.” त्यांच्या दुखण्याने , ते माझा प्रश्न विसरले, तेवढ्यात संजा माझा धाकटा भाऊ पचकला, “आवशी होय गे बाबांनी ठेवलिहा, दादा काय म्हणता?” आईने जोरदार तडाखा त्याच्या पाठीत घातला, तिच्या काटकुळ्या लांब सडक बोटांनी पाठीवर नक्की बोटं उठली असावीत. तो रडत रडत म्हणाला,”प्रकरण बाबांचा,माका कित्याक मारत, त्यांनी शाण खाल्ल्यानी, माका शिक्षा कित्याक?” तस ती त्याला समजवत म्हणाली, “रे खयला प्रकरण, प्रकरण वगेरे काय नाय मी असाच रागासरशी म्हटलय. आपण मोठ्यांच्या भानगडीत पडा नये, उगाच मार खाल्लस ना? आदीच हाडांगती, लागला काय रे? नंतर आठवण कर, खोपरेल लाऊक व्हया मगे बरा वाटतला.”

तो आता रागावला होता, “भानगडी तुमचे आणि मार आमका ह्या बरा न्हय. आमी लहान आसव म्हणान मारीत रवतास पण तो वेतोबा तुमका बघून घेईत.” “सोन्या, गप रव रे, आपण काय येव विचारता नये. आपणाक कळणा नाय ना,आपण चिप रवाक व्हया.”

बाबाना आयता मुद्दा मिळाला, ते आईवर संतापले,” भंगले तुझे हात कित्याक म्हणान त्याका मारलस, नवसाचो तो, तुका बघवणा नाय त बावडेत लोटून टाक. तुझ्या शापान आधी माका उताणो पाडलस आणि आता त्याका मारलस. आऊस आसस का डंकीण.” “खूप ऐकान घेतलय, आऊसव तसलीच होती आणि झिलव तसलोच, आता निमुट न्हाणियेत चला, नाय तर मगे काय ता सांगतय.” आई हातवारे करत म्हणाली. आईने बाबाना, थेट न्हाणी घरात नेले, बसायला स्टुल ठेवले आणि तिनेच लहान बाळाला घालावी तशी आंघोळ घातली. आंघोळ घालतांना पाठ खांदे खसाखसा चोळले आणि त्वचेवर आलेली मांग काढताना म्हणाली “अंगाक किती ती घाण, न्हातास की अंगाक पाणी लाऊन येतास, संगी रेडीच्या अंगावरसून निघणा नाय इतकी मांगा काढलय. तरीच तो वास येता.”

आई आंघोळ घालतेय त्याचा आनंद बाबांना होत असावा पण तिने त्यांची तुलना थेट रेडीशी करावी म्हणजे थोड अतिच होत, तिने पून्हा खसाखसा चोळायला सुरवात केली. आम्ही दोघे अधूनमधून बाबांच्या अंगावर तर कधी आईच्या हातावर कढत कढत पाणी घालत होतो. पण आईचे शब्द ऐकून बाबा संतापले,”काय न्हाऊक घालू नको,चलत रव माझे हात काय मोडाक नाय, त्या संगी रेडीची बरोबरी माझ्याशी करतस, तुका काय वाटता की नाय?” चुक आईच्या लक्षात आली,”ओ डोक्या काय बिगडला? मी म्हटलय त्याचो तसो अर्थ नव्हतो. संगीक मी रोज धुतय म्हणान ता तोंडात इला तुमचो मोटको हात पाठीपर्यंत पोचाक तर व्हयो तर पाठ चोळतलास असा माका म्हणूचा होता. आता जाऊदे, तुम्ही आपले सावचीत घरात चला. नायतरी गाढवाक गुळाची चव काय?”

आईची म्हणण ऐकून बाबांच तोंड पाहण्या लायक झालं, तिने त्यांच्या जाड आणिआखुड हातांचाही उल्लेख केला. कोणती म्हण कुठे वापरायची? तिच्या लक्षात आलं नसावं, आमचा बारका म्हणाला, “गे आवशी तुझी म्हण चुकली, गाढवा बरोबर नळ्याची जत्रा असा म्हटल असतस तर बाबा रागार इले नसते.” तो अजून अतिशहाणा, आता त्याला काय सांगणार कप्पाळ! आमच्या बाबाना वाटलं असावं आंघोळ नको पण ते उपरोधिक बोलण थांबवा. गरम पाण्याचा शेक लागल्याने बाबा थोडे तरतरीत झाले. आईने त्यांना बदलायला कपडे काढून दिले.

त्यांनी कपडे बदलले आणि ते लोट्यावरच्या देवखोलीत गेले. हात जोडून त्यांनी देवाला प्रार्थना केली. म्हणाले, “बा वेतोबा! माझ्यावर जा काय संकट इला होता ता तुझ्यामुळे टळला, तरीपण माझ्यावर कोणी वाचेबाध केलो असात, संबंध उठवून घातले असतीत, मुठ मारली असात तर ती पायाबुडी घाल. घरातली माणसा देवचारावरी वागतत त्यांका सुबुद्धी दी,गावडो हाड वैद्याक बोलवलोहा, तो उपचार करीत त्याका यश दी.” नेहमी प्रमाणे गाऱ्हाणं घातल्या नंतर साष्टांग नमस्कार घालायला म्हणून वाकले आणि जोराने ओरडले,”हाय हाय गे,मोडलय गे.”मी धावत त्यांना पाहायला गेलो,तर दोन्ही हात जमिनीवर टेकवून उठण्याचा प्रयत्न करत होते. मी हात देऊन त्यांना उठवलं. आई देवखोलीत आली, ” सारख्या घातलास ना गाऱ्हाणा, त्याचो हो परिणाम, आता तो गावकर येईपर्यंत निवांत बसा, चहा टेबलवर ठेवलोहा तो व्हयो तर घेवा, मी गोरवा सोडूक जातंय आणखी उपद्व्याप करून माझ्या पाठी लंचाड लावून देऊ नकात.”

आम्ही दोघे गुपचूप उभे होतो, आमच्या अंगावर ओरडली, “तोंडा उघडी टाकून बघित काय रवलास, बापसाक कधी बघलास नाय काय? जावा, आपलो अभ्यास करा, बापूस मास्तर आसा पण पोरंका अभ्यासाचा कधी विचारणे नाय की बघणे नाय. माकाच मरूचा लागता.” आम्ही आमची स्कूल बॅग घेतली आणि अभ्यासाला बसलो. बाबा खुर्चीत बसून थोड्या थोड्या वेळाने घड्याळ पहात होते. “हो गावडो गावकर रवलो खयं? काय सांगता कोण जाणे? त्याच्या औषधाचो गुण येऊक व्हयो नायतर कणकवलेक ठाकूर डॉक्टरकडे जावचा लागात. मगे एक्सरे इलो, प्लास्टर इला, गोळये इले, पथ्य ईला, झंगाट पाठी लागात, झक मारलंय आणि गोठ्यात गेलंय.” त्यांच्या बडबडण्याने अभ्यासात लक्ष लागत नव्हत. संजा उपरोधिकपणे बोलला, “त्या कपीलेक विकून टाका तिच्यामुळे व्हयती बिलामत ईली. आवशी कडून तुमची उत्तरपुजा झाली.” बाबांनी ते ऐकलं आणि त्यांचा इगो हर्ट झाला, तुझ्या आवशिक विचारता कोण? ती काय माझी उत्तरपुजा घालतली? मीच तिची उत्तरपुजा घालीन पण हो पाय बरो जाऊक व्हयो.”

आई गुरं बांधून येताना किंचीत खाकरली, तस बाबा चपापले, “बाबल्या तुझी आऊस ईली काय रे? ” “आऊसच ती,येईना तुम्ही तिका घाबरणास नाय मा? मग झाला.” “रे मी कित्याक तिका घाबरू, तसो मी नायच घाबरणय पण काय हा, एकदा तोंड उघडल्यान तर भोंगो बंद जाणा नाय त्याचो कंटाळो.” त्यांचा वाक्य संपाक आणि आऊस घराचो उंबरठो ओलांडूक एकच वेळ असात, मी बाबांका सांगलय, “भोंगो इलो.” तसे ते चपापले, “मेल्या चिप रव. ऐकल्यान तर धयकालो घालीत.” ते वाक्य तिने बहुदा ऐकलं पण तितक्यात गावडे काका आले. त्यांनी आखंडा ओलांडत आईला हाक मारली, “गे वयनी, घरात आसस मा, काय झाला? कोणाक बरा नाय?” आईने ते सांगण्यापूर्वी ते लोट्यावर आल्यावर त्यांनी बाबांना खुर्चीत बसलेलं पाहिलं. “मास्तर, काय झाला, कोणाक बरा न्हाय?” “रे ! माकाच, ह्या पायाक काय झाला ता बघ, वाईच मांगरात घसारलय आणि ह्या असा झाला. डाव्या पायातसून कळ येता,जमीनीवर पाऊल लाऊक येणा नाय.” त्यांच्या त्या “वाईचं”शब्दावर आम्हा दोघाना हसू येत होतं, चांगला दंडवत गोठ्यात घातला होता आणि त्याला सांगताना वाईच घसारलय सांगत होते.

त्यानी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,”रे झिला आवशिक सांग कडत पाणी व्हया, जा बापाशीचो पाय शेकूक व्हयो तरच फ्रॅक्चर असा की काय ता कळतला.” त्यांनी एका रिकाम्या घमेल्यात त्यांचा पाय धरून त्याच्यावर गरम पाणी ओतले. मग पायावर एक दोन वेळा हात फिरवून कुठे सूज आली आहे ते पाहिलं, मग स्वतः जवळचे तेल लावून मालिश सुरू केले तसे बाबा ओरडू लागले, “वसंता, मेल्या जरा हळू मालिश कर नाय तर जाग्यावर बसवून ठेवशीत, शाळेक न जाऊन चलाचा नाय, इन्स्पेक्टर येवचो हा!” “मास्तर शाळेत इन्स्पेक्टर कित्याक म्हणान येतले? काय झंगाट केलास नाय मा? तुमचो काय भरवसो, तुमच्या बरोबर शाळेत बाईव असतीत, काय नाय केलास तरी तुमच्या अंगट येईत म्हणान सांगतय.” “वसंता, मेल्या माझ्या शाळेत बाई हा की बाबा तुका रे काय माहिती? उगाच कायेव बडबडा नको, आमच्या हिका उगाच संशयाक जागा. रे मेल्या तो तसलो इन्स्पेक्टर न्हय शाळा तपासणीचो.” “होय काय? माका वाटला शाळेतच काय भानगड केलास आणि ह्या असा झाला आणि गोठ्याचा निमित्त उगिचच पूढे करतास.” त्यांनी दहा मिनिटे मालिश केले,बाबा सारखा पाय हलवत होते. “आये गे, वसंता हळू रे, जीव जाईत.” बहुदा त्यांना सहन होत नव्हतं. शेवटी गावडे काकांनी पाय घट्ट धरून ओढला. बाबा जोराने किंचाळले, “हाय हाय गे,वसंता, मेल्या हयच मारत की काय?” तस गावडे काका हसले,”मास्तर वाईच खय पाय ओढलो तर लहान पोरावरी करतास, तो जाग्यावर बसवूक नको?, जा पाय बरो झालो,चलून बघा व्हये तर.”
मला कळेना,गावडे काकांनी पाय जाग्यावर बसवला म्हणजे नक्की केल काय?या आधी बाबांचा पाय नक्की कुठे गेला होता?पण असली शंका विचारून पाठ तिंबून घेण्यापेक्षा गुपचूप पहात बसणे चांगले, म्हणून आम्ही शांत बसलो होतो.आई लोट्यावर आली की पेन्सीलने लिहण्याच नाटक करत होतो. बाबांना उठून उभे रहाण्याचा त्यांना धीर होत नव्हता, पण आईला लोट्याच्या आतल्या बाजूस उभी असलेली पहिल आणि ते उठून उभे राहिले, त्यांनी चालून पाहिलं आणि ते गावडे काकांकडे पाहून म्हणाले, “वसंता काय जादू केलंस? अजिबात दुखणा नाय. माका वाटला आता चलूक गावता का नाय.” “मास्तर, हात पाय बसवून घेऊक, पार दुरून लोक येतत, ती खुळी म्हणून की काय?
आई त्या काकांच्या हाती चहाचा कप देत म्हणाली,”आता डॉक्टरकडे जाऊक नको मा?” “गे वयनी विषयच सोड, आता त्याका भंग नाय,खड्ड्यात जरी उडी घातल्यानी तरी काय जावचा नाय. गॅरेटी हा आपली.”

“ओ सकाळ पासून देव उठवून घातल्यानी, आता मी कसो चलतलय म्हणान, बरा केलास. वर लेप लावूक देतलास काय? म्हणजे थोडी सुज आसा ती काढीत.” “गे वयनी आता त्याका काय येक नको, आता कामावर धाडलस तरी हरकत नाय.” आईनी गावडे काकांच्या हातावर पन्नास रूपये घातले आणि विचारायच म्हणून विचारलं, “गावकरांनू ह्यात भागतला मां? का आणि काय देवूक व्हया.” “तुमच्याकडे कसलो व्यवहार?अडीनडीक हयच येवचा लागता. वाईच गरम पाण्यान पाय शेक हां. चल निघतय. काय असला त सांग.” ते निघून गेले तस आई त्याच्या नावाने बडबडली,” सकाळीच मेल्याच्या हातावर पन्नास घालूचे इले, गोठ्यात येवा म्हणान कोणी सांगला होता पण नाय,बायलेक उत्तर देऊक नको!” बाबांना चांगल माहिती होतं आता या पन्नास रूपये खर्चाच पालूपद दिवसातून दहा वेळा त्यांच्या कपळावर फुटणार, म्हणून त्यांनी शाळेत जायची तयारी केली. त्यांची ती धावपळ बघून आई चिडली, “खय चललास? तासभर अगोदर देव काडीत होतास, विसरलास काय? चालतांना पायावर जोर येईत आणि पुन्ना दुखाक लागात. आज घरीच रवा, मी भाकरी भाजूक नाय, पेज चुलीवर शिजता. चार वेळ गरम पाण्याचो शेक दिलो की बरा वाटात.” पण त्यांनी आईला समजावल,” गो! आज एज्युकेशन इंस्पेक्टर येवचे हत. मी नसान कसा चलात. त्यांका सगळा दाखवूचा लागात. तिका काय ऐक कळाचा नाय, नको तो शेरो मारून निघून जातीत आणि खयतरी आडरानात बदली होईत.” आता याच्यावर आई तरी काय बोलणार? ती म्हणाली तुमका व्हया ता करा, नंतर घराकडे येऊन निजान रवू नकात. ती कोण बाई आसा तिका काय ऐक कळणा नाय तर सायबांनी ठेवल्यानी कित्याक? नुसतो पगार घेऊक. थोड्या वेळान पेज जातली ती घेवा नी जावा. बाबल्या बापाशीक अर्ध्या वाटेपर्यंत डबलशीट सोडून ये. मेल्या निट ने नाय त वाटेत पाडून घालशीत.” बाबांना हायस वाटलं, चला एकदा हिच्या तावडीतून सुटका तर झाली. त्यांनी गरम पेज ताटलीत घेऊन पंख्याखाली ठेवली, थोडी थंड झाल्यावर तशीच घेतली. आईने आणून ठेवलेली लोणच्याची फोड शेवटी खाल्ली आणि तोंड धुवून तयार झाले. आईची लोट्यावर येण्याची वाट न पाहताच वाटेला लागले, मोठ्या आवाजात म्हणाले, “येतय गो, ता मी पडल्याचा गावभर सांगा नको, नायतर आमची अब्रू चव्हाट्यावर.”

आई लगबगीने बाहेर येत म्हणाली, “बाबल्या तुमका सोडीत, वाईच थांबा. इतकी घाय कित्याक म्हणानं?” तर म्हणाले,”नको नको, त्याका आपलो अभ्यास करूं दे, मी आपलो पाईपाईच जातय ,अगदीच दमाक झाला तर बाईंची फटफटी आसाच.” ता शेवटचा वाक्य ऐकला आणि आईचो तिळपापड झालो. “त्या सटवीच्या फटफटेरं मुळीच बसता नये, तुमचे काय पाय मोडलेत?” बाबांवर आता आफतच आली, ते कसबसे म्हणाले, गो बसता कोण त्या फटफटेर? मी आपला असाच म्हटलय झाला. चल माका उशीर करशीत.” त्यांनी कोल्हापूरी चप्पल घातली आणि ते करsss, कर करत वाटेला लागले.

सकाळी बाबा गोठ्यात पडल्यानंतर जे महाभारत घडलं होत त्याचे आम्ही साक्षिदार होतो. आम्ही शाळेत गेल्यानंतर महाभारताचा दुसरा अंक सुरू झाला तर कोण विजयी होणार आणि पराभव कोणाला पत्करावा लागणार ते माहिती असल्याने बाबांनी कल्टी मारली होती. म्हणूनच त्या प्रकरणावर पडदा पडला होता. तर मंडळी गावाकडे प्रत्येक घरात अशी दशावतारी पात्र असतात म्हणूनच घरा संसाराला रंगत येते. साध्या बोलण्यातही कोपरखळी मारण्यात कोकणी पटाईत म्हणून तर गावात नाक्यावर कटींग सोबत गजाली रंगतात. “आता मी थांबतय नायतर आमची ही माझो आऊस बापूस काडुक कमी करूची नाय.”, काय म्हटलात, ही कोण ?” अहो आमची बायको,अगदी माझ्या आवशीच्या वळणावर गेलीहा,पण प्रेमळ आसा, आमच्या गावाकडे प्रेम असाच व्यक्त करतत. सांभाळा,आणि हो मी सांगलय ती गजाल उगाच कुणाक सांगू नका,आपल्या घरात तर मुळीच नको, काय हालत झाली तर नतंर सांगा नकात मि ह्या सांगूक नाय म्हणान. चला रजा घेतय.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar