आपल्याला हे जमलेच पाहिजे
माणूस शिकून सुसंस्कृत होतो का? माणसासारखे वागतो का? आपल्या हातून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची दक्षता घेतो का? दुसऱ्या व्यक्तीला सन्मानाने वागवतो का? बरं घरातील व्यक्तींचा, जेष्ठांचा आदर राखतो का? आपल्या आईला तरी तहहयात सन्मानाने वागवतो का? की जोपर्यंत तिची गरज असते, आई आई म्हणून तिच्या मागे मागे लागतो पण स्वयंपूर्ण झालो, आपली गरज सरली की तिला बाजूला सारतो?
खरेच यावर एकदातरी शांतपणे विचार होणे गरजेचे आहे. लहानपणी आपले तिच्याशिवाय पान हलत नाही. आपल्या तारुण्यात ती आपण आणि बाबा यांच्यातील मेडिएटर किंवा माध्यम बनते. आपली बाजू भक्कमपणे मांडते, त्यासाठी स्वतः अपमान सहन करते. मोठे झाल्यावर आपण चुकलो तरी ती आपल्याला समजून घेते, सावरते. आपल्या प्रगतीने ती मनोमन आनंदते. आपल्या मुलांच्या लग्नात ती झटते अन नातू होताच सुखावते पण नातू मोठा होतो. त्याचे भावविश्व वेगळेच असते. साहजिकच त्याला आजीची आठवण येण्याचा प्रश्न उरतच नाही. आपल्या गरजेपुरता आपण घरातील महिलेचा वापर करतो, असे नाही का वाटत? यामुळेच हळूहळू ती एकाकी पडते आणि चिंतेने तिचे शरीर सुरकुतते. तिच्या पदरात आपले आणि आपल्या मुलांचे बालपण निभावून नक्की काय पडते ? फक्त उपेक्षा आणि अपमान. या गोष्टीला आपण जबाबदार नाही का?
साठी झाली की माणूस रिटायर होऊन मस्त आराम करतो, दोस्तांची मैफल भरवतो पण आपल्या आईला, पत्नीला, मोठ्या बहीणीला तू थकली असशील थोडावेळ मस्त आराम कर कोणी म्हणता का? तिच्यासाठी स्वतः कधी वेळ काढता का? तिला काय हवेनको कधी विचारता का? तिच्या आवडीचा एखादा पदार्थ स्वतः आणता का? शिजवून घालता का? पण तुमच्या अपेक्षांची यादी कधीही संपत नाही. उलट ती काही विसरली तर तुम्हाला ते सहनही होत नाही.
आपले शिक्षण झाले की काही काळातच आपण स्वतंत्र होतो, स्वयंपूर्ण होतो, ती आपले सुख आपल्या इच्छेनुसार साजरे करते, देवाला दिवा लावत आपल्याला अखंड यश, वैभव आणि आनंद मिळो अशी प्रार्थना करते, आपण देवाकडे खास आईसाठी काही मागितल्याचे आठवते का? आपल्याला हक्काची मैत्रीण पत्नी म्हणून लाभते त्यानंतर आपले प्राधान्य बदलते की नाही? आई थकत जाते तेव्हा तिच्या गरजांकडे आपले लक्ष असते का?
भौतिक साधनांच्या गरजेपेक्षा आई किंवा पत्नीची गरज वेगळी असू शकते तेव्हा आपण तिची सोबत करतो का? तिला समजून घेतो का? ती आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण नसली तर आपण ते लक्षात घेऊन तिची मदत करतो का? जन्मदात्या आई बद्दल कळत नकळत इतकी अनास्था आपण दाखवत असू तर मग इतर पत्नी या नात्या विषयी बोलणेच अवघड. हे असे उपरेपण आपल्यात आले कोठून? तिने केलेले संस्कार आपल्यावर का झाले नाही? का तिचे संस्कार विसरून गेलो? तिच्या आपल्या जोपासनेत काय कमी पडले ?
आई या विषयावर सर्वच लेखकांनी विपुल लेखन केल आहेत, चित्रपट निघाले, आईची गोडवी सांगणारी प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधु आई सारखी गाणी, कविता लिहिल्या आहेत कथेतून आईचे ह्रदय मुलाला काय म्हणाले ते नाट्यरूपात ऐकले आणि शासन पुरस्कार मिळवले पण खरचं आपल्या आईची दाद फिर्याद ऐकली का? की तो फक्त लिखाणाचा आणि स्वतःचे कौतुक करून घेण्याचा प्रपंच होता.
माझ्या नशिबी नव्हते म्हणून माझी आई मी पुरता सज्ञान होण्यापूर्वी गेली. जर ती हयात असती तर मला हे शहाणपण सुचले असते का? मी माझ्या आईला सूखी ठेवले असते का? की तुला काही कळत नाही तू उगाचच मधे मधे बोलू नको असे ज्ञान पाजळले असते? जी गोष्ट तुमच्या जवळ असते, सहज प्राप्त होते त्याची किंमत कळत नाही हेच वास्तव.
तेव्हा आई विषयी मी वेगळे काय लिहावे हा प्रश्न माझ्या समोर तर होताच. प्रत्येकाला आपल्या आईचे दर्शन वेगवेगळे होते. माझा एक मित्र त्याच्या आईविषयी आपल्या मित्रांना सांगताना आईचा उल्लेख, घरचा हिटलर’ म्हणून करत असे. त्यांच्या घरात मुलगी नसल्याने त्याची आई त्यांना ते अगदी आठ दहा वर्षाचे असल्यापासून भावंडांत कामे वाटून देत होती. खरे तर त्यामुळे त्याना शिस्त लागली पण त्यामुळेच त्यांचा आईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तो कायमचाच.
माझा अनुभव वेगळा आहे. आज जो आणि जसा मी काही आहे त्यामागे आईचे अमुल्य योगदान आहे. पत्नीचेही योगदान आहे. आईने कधीच काही सांगितले नाही, मी, ती जे काय करत असे त्याचे फक्त निरीक्षण करून शिकत गेलो. चुकत गेलो, प्रयत्नाने शिकत गेलो. माझ्या लहानपणी म्हणजे मी आठवी इयत्तेचा निकाल लागण्यापूर्वी ती गेली पण समजुतीची जी दोन चार वर्षे मिळाली ती पुरली. वाचन,पाठांतर, देवाविषयी श्रध्दा, गोडी, चांगल्या सवयी, हात शिवणाचे टाके असोत, सारवण असो, एखादा पदार्थ बनवणे असो, दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून जाणे. स्त्री-पुरूष समानता, स्वावलंबन अशा अनेक गोष्टी तीने काही न बोलता अनुकरणातून शिकवल्या. जर माझ्याकडून काही चुकीचे घडत असेल तर ते माझे आहे. पण मी जो आज समाजात सन्मानाने उभा आहे तो आईच्या शिदोरीवरच.
आई प्रत्यक्ष शाळेत गेली नव्हती पण ती रोज तिचा भाऊ म्हणजे आमचे मामा, शाळेतून घरी आले की त्याच्यांकडून शाळेत शिकवलेले समजावून घेई. थोडक्यात तिचा भाऊ हाच तीचा गुरू झाला आणि त्याने तीला लिहावाचायला शिकवले. मुळातच ती हुशार असल्याने व्यवहारी ज्ञान तिने आत्मसात केले आणि ते इतरांना दिले. गमतीचा भाग म्हणजे मी काय अभ्यास करतो, यावर तिचे बारीक लक्ष असे त्यामुळे आई जवळ टंगळमंगळ करता येत नसे. तुम्हाला लहान वयात चांगली सवय लागली तर ती दिर्घकाळ टिकते हेच ते यशाचे रहस्य आहे.
आमच्या घरात वडील थोडे कर्मठ होते मात्र आईने जातपात पाहिली नाही. उलट या उपेक्षित लोकांना जमेल ती मदतच केली आणि चांगला पायंडा घालून दिला. स्वयंपाक ते शिवण आणि सरपण ते वाती किंवा रांगोळी या प्रत्येक गोष्टीत तिला रस होता. तुमची आई शिकलेली असो वा नसो तिला सरावाने बऱ्याच गोष्टी येतात, ती सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कोणकोणती कामे करते त्याची यादी करा मग तिच्या कामाची व्याप्ती तुम्हाला कळेल. आई कुठे काय करते असे म्हणणे ठिक आहे पण घरात अगदी एकटे राहून पाहिले की घरात आई किंवा पत्नीची गरज काय ते समजते. घर म्हणजे भिंती किंवा फर्निचर नाही, घरातील प्रत्येक गोष्टीवर स्त्री चा हात फिरल्याशिवाय घराला घरपण येत नाही.
तुम्ही लहान असताना आई माहेरी म्हणजे तुमच्या मामाकडे जायची तेव्हा तुम्हाला सोबत घेऊन जायची, तुम्ही आजोळी येऊन चार आठ दिवस होत नाही तो मामाकडे तुमच्या वडिलांचे पत्र यायचे त्यात खुशाली विचारण्याच्या निमित्ताने हिला लवकरात लवकर घरी आणून सोडावी सगळी कामे खोळंबली आहेत, वाट पाहत आहे असा मजकूर असायचा. आईचा नाईलाज होई, तिला खरोखरच घरची कामे दिसू लागत आणि ती तातडीने घरच्या वाटेला लागे. तुम्ही मोठे झालात, लग्न झाले तरी तुम्ही तिला कधी निवांतपणे तू चार दिवस माहेरी राहा असे म्हटले नाहीत कारण आता, तुमच्या पत्नीला घरचे काम करतांना होणारा त्रास तुम्हाला दिसू लागला. तुमच्या आईला कामाचा होणारा त्रास तुम्हाला कधी आठवला होता का?
आपण श्यामची आई पुस्तकात साने गुरूजींच्या कथेत आई विषयी वाचले असेल. नेहमीच्या उदाहरणातून संस्कार कसा करावा? त्याचे या कथा आदर्श उदाहरण आहेत. सानेगुरुजी यांचा काळ पाहता त्यांच्या आईने त्यांना हरिजन वृद्धेस मोळी उचलून देण्यास मदत करण्यासाठी सांगितले तेव्हा प्रथम माणूसकी पाहिली . लहान मुलांवरच नव्हे तर घरातील इतर व्यक्तींवर संस्कार रुजवण्यात आईचा जेवढा मोठा वाटा आणि सहभाग असतो तितका अन्य कुणाचाही नसतो. मग तो स्वच्छता, टापटीप, शिस्त, दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाणे,आजारपणात काळजी घेणे, वाटून खाणे, मोठ्या माणसांचा आदर करणे अशा असंख्य गोष्टीत सहज दिसून येतो. अर्थात आताच्या मातेला आपल्या मुलांच्या बाबतीत हे शक्य होईलच हे सांगणे तसे अवघड. आईशी बरोबरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मुलांना शिस्त लावू पाहणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आई त्या गोष्टी २००% योग्य प्रकारे आचरणात आणेल.
आई करूणेची मुर्ती असते, ती लहान थोर मुलांसाठी संजिवनी असते. ती घराचा भक्कम पाया आणि आधार असते. मुलं वाकडे वागत असल्याचे आढळल्यास ती शब्दांची समशेर असते. पूर्ण आयुष्यात तिने स्वतः साठी काहिच मागितलेले नसते. मुलं नजरेसमोर मोठी व्हावीत याचीच तर तिला घाई. मुलांचे भले व्हावे याचाच ध्यास, त्यासाठी कष्टाच्या कामाची तिला तमा नाही. ईश्वराच्या चरणी ती एकच मागते, ‘माझ्या मुलांना चांगली बुध्दी दे, सुखी ठेव’. ‘माझ्या सौभाग्याचे रक्षण कर.’ पण कलीयुगात स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्री आपल्या लहान मुलांना सोडून आपल्या प्रियकरासोबत निघून जाते तेव्हा वरील दावे फोल ठरतात. सध्या तर असे प्रसंग वारंवार घडतात तेव्हा ऐकून वाईट वाटते.
अर्थात तिने नेहमीच त्याग करावा अशी अपेक्षा आपण का करावी? पण नक्की अशी कोणती परिस्थिती उद्भभवते? की ती आपल्या लहान मुलांच्या भविष्याचा विचार न करता मातृत्व त्यागून निघून जाते. एवढा निर्ढावलेपण तिच्यात आला कुठून? तिला कोणत्या अग्नी परीक्षेतून जावे लागले की ज्यामुळे तिच्या मातृ हृदयात कडवटपणा आला? जर एखाद्या स्त्रीला आपल्या लहान मुलाचा त्याग करून आपल्या प्रियकरासोबत जावेसे वाटत असेल तर तिला समजून घेण्यात पती कुठेतरी कमी पडला असावा असे म्हणण्यास वाव आहे. पण दुर्दैवाने काही तरूणांच्या बाबतीत अशी घटना घडल्याचे आपण पाहिले असेल की त्या जोडप्यात गैरसमज होण्याचे काही कारण न दिसता ती निघून जाते तेव्हा कलीयुगाचा शिरकाव घरात झाल्याची जाणीव होते.
खरे तर आई बनण्याचा पिंड आणि संथा जन्मताच तिला मिळतो, म्हणून अवघ्या पाच वर्षांची चिमुकली आपल्या लहान भावाला बाटलीने दूध भरवते त्याची दाई होते. रडू लागला तर त्याला इवल्याशा मांडीवर निजवते. बडबड गीत ऐकवते, थोपटून झोपवते. प्रत्येक मुलींकडे मातेच ह्रदय ईश्वराने जन्मताच दिलेल असत. तिला ममता, दयाळू वृत्ती ईश्वराने जन्मताच दिली असावी. कठोर ह्रदयाची स्त्री ही आपल्या पतीने तिचा किंवा कुटुंबाचा अक्षम्य गुन्हा केला तरी त्याला क्षमा करण्याचे औदार्य दाखवते ते त्याचमुळे. नवरा एखाद्या प्रसंगात कोसळला तरी तिचं त्याला उभारी देते, धीर देते. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते त्यामुळे स्त्री मधील मातृशक्तीला त्रिवार वंदन. ‘ ती’ स्त्रीलिंगी शब्द, त्या शब्दात सृजनता, ऋजुता असते, ‘ती’ या अक्षरतील ई कार हाच आईचा असतो.
पण आज वर्तमानपत्रात जे काही ऐकू येते किंवा फेसबुक सारख्या माध्यमातून जे पहायला मिळते तेव्हा आईच्या बदलेल्या भुमिकेबद्दल आश्चर्य वाटते. कदाचित वर्षानुवर्षे जे भोग स्त्री च्या वाट्याला आले तेच भोग माझ्या वाट्याला येत असतील तर ते मी सहज स्वीकारणार नाही. मी सुशिक्षित आहे, अर्थार्जन करते तर मीच एकटीने कुटुंबाची जबाबदारी का घ्यावी? असा विचार जर तिच्या मनात येत असेल तर त्यात तिला गुन्हेगार ठरवणे योग्य नाही. समानतेच्या पायरीचा विचार केला गेलाच पाहिजे. कुटुंबातील अडचणींमुळे तिच्या नोकरीवर, तिच्या स्वविकासावर गदा येत असेल किंवा तिच्या अपेक्षांची पुर्तता होत नसेल तर स्त्री, आई म्हणूनही तिच्या इच्छेखातर समज न आलेल्या मुलांना नवऱ्याच्या ताब्यात देऊन जात असेल तर तिच्यावर ठपका ठेवणे योग्यच आहे असे मानणे गैरवाजवी ठरेल. पुरुषांला अशी परदेशवारीची संधी किंवा वरिष्ठ पदी इतर शहरात जाण्याची संधी आली तर तो ती सोडेल का? आपल्या कुटुंबासाठी त्याग करेल का? मग स्त्री ने नेहमीच असा त्याग करावा असे आपण अपेक्षीत धरणे कुठपर्यंत योग्य?
स्त्री, विवाहित महिला तिला उच्च पदी, विदेशात जाण्याची संधी मिळाली तर तेथे जाण्यासाठी तिने मनाची तयारी केली. जाण्याचा अट्टाहास धरला तर त्यात अयोग्य ते काय? अर्थात ती आपल्या स्वार्थासाठी मुलांना येथे ठरवून अचानक सोडून गेली तर त्यांच्या मनावर आघात तर होणारच. मुलांचा गुन्हा कोणता? की ज्यासाठी त्यांना ऐवढी मोठी शिक्षा भोगावी लागते. अर्थात हेच वडिलांच्या बदलेल्या भुमिकेबद्दल बोलता येईल. अचानक आई किंवा वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांनी नक्की कसे जगावे? त्यांच्या कोवळ्या वयात त्यांना पोरके करून जाण्याचा नतद्रष्ट विचार येतो कुठून गिरीश यांना हे विचारावे लागेल.
आई घरात राहणारी असो की पालात राहणारी तिला आपल्या बाळाचा विचार करावाच लागतो. आईने नोकरी केली किंवा व्यवसाय केला, कितीही पैसे कमावले तरी घरची कर्तव्य तिला चुकत नाहीत. घरी येताच ती एकतर आपल्या कामाला जुंपली जाते किंवा आता ज्या कामांचा फडशा पाडायचा आहे ती समोर पाहता कोणत्या क्रमाने कामे उरकवी याच्या विचार करूनच न थकता कामाला भिडते. शरणागती हा शब्द आईकडे नाही. दिवसा आणि बाळाच्या लहानपणी संपूर्ण रात्र आई बाळाच्या सेवेत असली तरी तिला पतीसाठी पत्नीची भुमिका बजावावी लागतेच. बाळाचे दिवसभर करून ती थकली असावी ही संवेदनशीलता पतीकडे असेल तर तिचे भाग्य थोर समजावे.
पती हयात नसेल तर मुलांच्या संगोपनासाठी तिला परिस्थितीशी झगडावे लागते. ती जर तरूण आणि सुस्वरूप असेल तर समाजात वावरतांना उगाचच दया किंवा कणव दाखवणाऱ्या बुरखा पांघरलेल्या समाजातील प्रतिष्ठित लोकांशी आणि तिच्या घरी असणाऱ्या माणसांतील श्वापदांपासूनही स्वतःला सुरक्षित ठेवावे लागते. खरे तर बाहेरच्या लंपट लोकांशी लढा देणे सोप्पे असते पण घरातील श्वापदांपासूनही स्वतःची अब्रू वाचवणे फारच कठीण कारण कुटुंबाच्या प्रतिष्ठिपाई आपल्यावर घरातच अन्याय होतो हे ती उघडपणे सांगू शकत नाही.
अकाली वैधव्य आले आणि त्याच काळात बाळाचा जन्म झाला तर बाईची अवस्था बिकट होते. मुळात ते बाळ त्या कुटुंबाचा वारस आहे हे समाजाला पटववतांना सर्व शक्ती पणाला लावावी लागते. तिनेच कष्टाने बाळाला वाढवले तरी मुलाच्या मागे बापाचं नाव लागते. आर्थिक कुचंबणा स्त्री सहन करू शकेलही पण सामाजिक टिका सहन करणे तिला शक्य नसते. कधीकधी स्वैराचारातून जन्म घेणाऱ्या बाळाचा बाप आपले नाव उघड करायला तयार होत नाही. अशावेळेस आईने करावं काय ? व्यभिचारी किंवा कुलटा नामाभिधान लावूनही ती बाळाला वाढवते कारण तिच्यासाठी बाळ हेच सर्वस्व असते. त्यातून तो स्वतःला इज्जतदार वगेरे समजत असेल आणि तीच्या तोंडातून वाच्यता होण्याची भिती वाटत असेल तर प्रसंगी तिला उदरातील बाळासह जिवही गमवावा लागतो..
दुष्ट कंसाने शापवाणी ऐकली होती की त्याची बहिण देवकीच्या पोटी जे बाळ जन्म घेईल तेच त्याच्या मृत्यूचे कारण असेल. कंसाने देवकीचा सातवा पुत्र आपला कर्दनकाळ ठरणार आहे हे ऐकले होते म्हणून आपली बहिण देवकी आणि तिचा पती वासूदेव यांना तिची प्रसुती जवळ येताच कंसाने कडेकोट बंदोबस्त असलेल्या तुरुंगात सैन्याच्या गराड्यात कारागृहात टाकले होते. तिचा अपराध कोणता? तरीही जन्म घेतलेल्या कृष्णाची जन्माबरोबरच आईपासून ताटातूट झाली होती. त्यापेक्षाही जन्म देऊनही देवकी आपण मुलाच्या प्रेमासाठी आसुसलेलीच राहिली. जन्मताच देवकीच्या बाळाला मारून टाकण्याची व्यवस्थाही कंसाने तयार केली होती. यापूर्वी कंसाने देवकीच्या सहा अपत्यांची हत्या केली होती. देवकीने हे ऐकले असेल तेव्हा तिच्या जिवाला काय वाटले असावे? देवकीला तिच्या उदरात वाढणाऱ्या बाळाचे, भविष्य दिसत होते. आपला जन्मणारा पुत्र हा काही क्षणांचा सोबती असेल हे माहित असुनही तीने नऊ महिने गर्भ वाढवला होता. प्रत्येक युगात अशी एखादी घटना घडतांना पहायला मिळते की आईवर सतत अन्याय होतच राहिला.
एकदा जलविहार करतांना रेणुकेला रूपवान चित्ररथ याचे दर्शन झाले. क्षणभर राजा चित्ररथाविषयी रेणूकेच्या मनात त्याच्या विषयी विकार उत्पन्न झाला. ती आश्रमात आली तेव्हा अंर्तमनाने ती गोष्ट जमदग्नी यांनी ओळखली. त्यांच्या मनात पत्नीविषय क्रोध उत्पन्न झाला. जमदग्नी ऋषींनी आपल्या पुत्राला पत्नीची हत्या करण्याची आज्ञा दिली आणि परिणामाची पर्वा न करता, किंवा मातेचा नक्की अपराध काय? हे न विचारता परशुरामाने पित्याची आज्ञा प्रमाण मानून त्याच्या परशूने तिचा शिरच्छेद केला.
भार्गव ऋषींनी मुलाला आज्ञा केली तेव्हाही रेणुका निरुत्तर होती. केवळ मनात परपुरूषांचा मोह उत्पन्न झाल्याची केवढी कठोर शिक्षा दिली गेली. यापूर्वी देवांचा राजा इंद्र याच्या मनात कित्येकदा अशी दुष्ट इच्छा निर्माण झाली होती. त्याला शासन का झाले नाही? आज पुरूष आणि स्त्री या दोघांचेही विवाह बाह्य संबंध असतात आणि त्या बद्दल वाच्यता होतही नाही. कधीतरी मतभेद विकोपाला जातात, धुसफूस वाढते आणि घटस्फोट होतो. मनावर संयम नसेल तर कुटुंब व्यवस्थेला अर्थ नाही.
जन्माला आल्यानंतर बाळ पहिले दहा वर्षे आईच्याच सानिध्यात जास्त असते. पहिला शब्द, पहिली अक्षर ओळख आईच तर करून देते. बाळ ‘आई’ हा शब्द पहिला उच्चारते की ‘बाबा’ महत्त्वाचे नाही पण त्याला स्वराची ओळख आईच्या गीतातूनच होते हे ही नक्की. कवी सोपानदेव चौधरी आपल्या कवितेविषयी सांगतात ‘आईचे शब्द माझ्या ओठी.’ पोटात बाळ असतांना आईची बेंबी आणि बाळ यात एक नलीका असते जिला ग्राम्य भाषेत ‘नाळ’ म्हणतात. बाळाचे पोषणच मुळात या नाळेतून होत असते. आपल्या रक्ताने ती बाळाचा गर्भ वाढवते. त्यामुळे प्रत्येक बाळावर आईचे रक्ताचे ‘अलिखित कर्ज’ असते. त्यामुळे या कर्जातून खरे तर उतराई होण्याची आपली पात्रताच नाही.
एरव्ही ती आपलं शरीर पूर्ण झाकून घेणारी बाई, आपल्याला शरीरावर बाळाला अमृतपान करू देते, त्या वेळेस कोणी आपल्या उघड्या शरीराकडे पाहिलं याची तमा बाळगत नाही. तिचे बाळाप्रति असणारे वात्सल्य तिला शांत करत असते. भयमुक्त करत असते. बाळासाठी ती कोण कोणता त्याग करते ते वाचून आणि लिहून समजणार नाही. पहिला त्याग कौमार्य भंग. लग्न झाल्यानंतर तिची इच्छा असो वा नसो तिला नवऱ्याची शय्या सजवावी लागते. तिच्या बावरलेल्या मनाचा विचार न करता, नवऱ्याजवळून तिच्याशी शारीरिक संबंध साधला जातो.
ती या गोष्टीसाठी मनाने तयार असो वा नसो तिला या साखळीतून जावेच लागते. तिला आई बनायची घाई नसली तरी योग्य माहिती नसल्याने मातृत्व लादले जाते. दुर्दैवाने गोपनीयता बाळगण्याच्या अट्टाहासापाई तिची आई तिला लग्न झाल्यानंतर कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल याचा नीट परिचय करून देत नाही. त्यामुळे ती लग्न झाल्यानंतर गोंधळलेली असते.
सोळा सतराव्या वर्षी लग्न, पती सहवास, शरीर सुख या गोष्टीशी अनभिज्ञ असतांना नवरा झालेल्या अनोळखी पुरुषाच्या सहवासात येते तेव्हा तिला यौनसंबध म्हणजे काय ? याची कदाचित माहिती नसावी. तरीही लग्न झालेली मुलगी पतीच्या सहवासात आल्यानंतर शरीराने परीपक्व नसेल आणि मनाने आई होण्याच्या स्थितीत नसली तरी गर्भधारणा होताच मातृत्वासाठी सिद्ध होते. या काळात शरीरात होणारे बदल ती बाळासाठी पचवते.
प्रसुतीनंतरही जर पतीकडे संयम नसेल, तो संमंजस नसेल तर तिचा पतीकडून शारिरीक छळ होतो पण पत्नी बिरूद लावल्याने हा छळ तिला निमुट सहन करावा लागतो. त्याच्या संसाराच गाडा हाकतांना तिला सतत समजून घ्यावे लागते. अडचणींना तोंड द्यावे लागते. पतीची कमाई कुटुंबासाठी पुरेशी नसेल तर गैरव्यवस्था सहन करावी लागते. प्रसंगी स्वतः उपाशी राहून घरच्यांना खावू घालावे लागते. याची वाच्यताही सहसा ती करत नाही. या सगळ्या संकटाना तोंड देत ती आदर्श पत्नी म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असते. नवरा समजुतदार असेल तर या प्रयत्नात ती यशस्वी होते अन्यथा तिची कुचंबणा होते.
पतीच्या कौटुंबिक वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतांना तसेच घरातील कामे सांभाळतांना त्याची खप्पा मर्जी होऊ नये म्हणून ती सतत राबत असते. तो मदत करणारा असेल, तिला समजून घेणारा असेल तर त्या सारखे अन्य सूख नसते. पण सर्व जबाबदाऱ्या तिच्या अंगावर लोटून तो नामानिराळा राहात असेल तर तिच्या कष्टांना अंत नसतो. लग्नापूर्वी तरूणतरूणीत असणारे प्रेमळ बंध लग्नानंतर जेव्हा त्याच्या अधिकारात बदलतात तेव्हाच तिच्या मनातील त्याच्या प्रतिमेला धक्का पोचतो. दुर्दैवाने तो तिला पचववा लागतो.
तिच्या प्रसुती काळात जर ती सुस्थितीतील माहेरी असेल तर त्या काळात तिची बडदास्त राखली जाते. तिला हवे नको ते पाहून तिचा सन्मान राखला जातो. ती आनंदी रहावी असा प्रयत्न केला जातो. बाळंतपणात झालेली शारीरिक आणि मानसिक झीज भरून काढता यावी असा प्रयत्न आई बाबा करतात.परंतु ज्या स्त्री ला लग्नानंतर माहेरचे सूख नसेल किंवा सासरीही तिला योग्य वागणूक मिळत नसेल किंवा ती आपल्या पतीसोबत कुटुंब करून शहरात एकटीच राहत असेल त्या स्त्रीला जास्त त्रास सहन करावा लागतो. नवरा समंजस नसेल तर तिच्यावर कोणताही प्रसंग ओढवला तरी तिच्यापुढे पर्याय नसतो. अपमान गिळून परिस्थितीशी दोन हात करत तिला आयुष्य तेथेच कंठाव लागते.
समाजात कुटुंब आणि आपली जबाबदारी याविषयी असलेल्या पुरूषांच्या अशिक्षितपणाची शिक्षा स्त्री ला भोगावी लागते.अगदी व्यावहारिक दृष्टीने सुशिक्षित असणारा पती बरेचदा पहिले बाळ लहान असतांना पुन्हा तिच्यावर मातृत्व लादतो, बाळंतपणात झालेली शारीरिक झीज भरून येण्यापूर्वीच जर पुन्हा तिला त्याच चाकोरीतून जावे लागले तर मानसिक दडपण येते, समाज काय म्हणेल? हा प्रश्न तर असतोच पण आपले सहकारी किंवा मैत्रिणी काय म्हणतील? हा प्रश्न तिला भेडसावत असतो. तरीही तिच्या पतीला यात काही वावगं वाटत नाही. परिणामी तिला एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मुलांचे संगोपन आणि घर. ती नोकरदार असेल तर ही गोष्ट किती अडचणीची ठरत असेल ते तुम्हीच समजू शकता.
या अवघड परिस्थितीतही कोणत्याही स्त्री ला मी थकले म्हणता येत नाही, काम ठेऊन थांबता येत नाही. तिला कितीही त्रास झाला, दुःख झाल तरीही तिच सात्वंन कुणी करत नाही.चरैवती,चरैवती या न्यायाने तिला सतत काम करतच रहावं लागतं. एकाच वेळेस नवऱ्याची सेवा आणि त्याचे समाधान, मुलांच्या गरजा आणि त्यांच्या दुःखात दिलासा देण्याचं काम आणि सासूसासरे आणि अन्य जेष्ठ सदस्य यांची सेवा आणि घरकाम कर्तव्ये समजून निमुटपणे करण्यातच अभिमान बाळगावा लागतो. चुकूनही घरचे, दारचे, नातेवाईक हे कसेही वागले तरी त्यांचा शब्दानेही अपमान होणार नाही याचे भान बाळगावे लागते. लग्न होऊन सासरी आलेली स्त्री म्हणजे गरीब गाय, कुटुंबातील तिच्यपेक्षा लहान दिर किंवा नणंद तिच्याशी चुकीची वागली तरी तिला प्रत्युत्तर करता येत नाही.
जर नवऱ्याला, मुलांना योग्य नोकरी नसेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल आणी दुर्दैवाने पती किंवा मुलांना काही व्यसन असेल आणि त्यापासून सुटका करून घेणे जमत नसेल तर तिलाच मोठ्या मनाने त्यांची समजूत काढून घरात कलह होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याला लवकर त्या प्रसंगातून बाहेर काढून त्याला किंवा मुलांना दुखल, खुपलं विचारपूस करून त्यांच्या मनावर फुंकर घालण्याचा काम तीच करू शकते. ते व्यावहारिक नीतीनियम टाळून वागत असतील त्याला योग्य समज किंवा शिक्षा देऊन त्यांना वठणीवर आणणे हे अप्रिय कामही तिला करावे लागते.
वयात आलेली मुलगी जेव्हा ऋतुमती होते तेव्हा तिची पूजा करण्याची पद्धत काही ठिकाणी रूढ आहे, याचे कारण निसर्गाने तिला उपज दिला आहे. ती अपत्य जन्माला घालू शकते. ऋतुमती होणे म्हणजेच गर्भधारणा होण्यासाठी सिद्ध होणे.दुर्दैवाने तिच्या वयाचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार कोणाला सुचत नाही ही गंभीर बाब आहे. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात तेरा ते पंधरा वयाच्या मुलीच लग्न लावलं जातं. कळी स्वतः फुलण्यापूर्वी तिच निर्माल्य करण्यात कोणत शहाणपण? पण अगदी शिकल्यासवरल्या कुटुंबातील माणसही या बाबतीत आघाडीवर असतात.
तेव्हा स्त्री मिळालेले मातृत्व हा शाप तर नाही ना? असे तिला खचितच वाटत असावे. ऋतुमती झाल्यावर दर महिन्याला तिला ज्या शारीरिक अडचणी सोसाव्या लागतात, आणि जर कुटुंब रीतिरिवाज पाळत असेल तर त्या काळात जी मानसिक कुचंबणा सहन करावी लागते ती पाहता तिला स्त्री जन्म नकोसा वाटला तर त्यात नवल नाही.
पन्नासच्या दशकात स्त्री दहा ते बारा अपत्यांना जन्म देत होती. पण आजही तोच कित्ता काही शहाणे पुत्र व्हावा यासाठी आजही गिरवतात तेव्हा संताप येतो. कुलदिपक हवा म्हणून पाच पाच कन्यारत्ना नंतर वाट पाहणारे अनेक महाभाग आहेत. हे ऐकलं की त्या भगीनीची किव येते. का तीने हा अत्याचार सहन करायचा? ग्रामीण भागात मुल वाढवण्यात किती पुरूषांचा सहभाग असतो? तर नगण्य. मग पुरूषी जुलूम स्त्रीने का सहन करायचा?
पुरुष आपल्या नोकरी,व्यवसायातून निवृत्ती स्वीकारू शकतो,स्त्रीला विशेषतः पत्नी किंवा आईला निवृत्ती स्वीकारता येत नाही. कोणी ना कोणी तिच्यावर कायम अवलंबून असतो. घरातील प्रत्येक घटनेतील तिचा सहभाग हेच तिच्या व्यस्त राहण्यामागचे कारण ठरते. कधी कधी याचा तिला गर्व वाटतो, पण यामुळेच तिला अपमान किंवा दुःख सहन करावे लागते. जोपर्यंत तिच्या शरीरात उर्जा असते आणि ती कुटुंबासाठी राबत असते तिची सर्वांना आठवण असते, ती सर्वांना हवी असते पण जर तीला काही आजार झाला किंवा ती शरीराने किंवा मनाने थकली तर!
मुलं मोठी झाली की त्यांना वैचारिक स्वातंत्र्य हवं असते. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे असते मात्र आईला मुले अजूनही लहान आहेत त्यांच्यावर आताच जबाबदारी टाकून त्यांना जमणार नाही असे समजून त्याना परावृत्त करत असते. मुल मोठी झाली की आईच्या पंखाखालून कधी निसटून गेली ते तिलाही कळत नाही. एकीकडे पतीचा तिच्यातील उत्साह संपलेला असतो तर दुसरीकडे मुलांना मित्रमैत्रिणी असे नवे आकाश खुणावत असते. साहजिकच ती एकाकी पडते. घरात राब राबून नवरा व मुले यांच्या भौतिक गरजा पूर्ण करणारी ती नोकराणी ठरते.
तिच्या मताचा कोणी फार गांभिर्याने विचार करत नाही. मुले एखाद्या खानावळीत जेवायला यावं तशी वेळी अवेळी येऊन आपली गरज भागली की निघून जातात. घरातील कामे, आवराआवरी इतकेच तिच्यासाठी शिल्लक राहते. तिला दिवसभर राबावे लागते याची सहानुभूती कोणी दाखवत नाही. प्रेमाचे चार शब्द बोलायला कोणाकडे वेळ उरत नाही तेव्हा आई तुटून जाते.
तरूण वयात ती आपल्या इच्छाआकांक्षा मारुन तुमच्यासाठी राबलेली असते. पतीनेही कामाच्या व्यापात वा तिला काय इतके महत्त्व द्यावे असा विचार करत ना कुठे फिरायला नेलेले असते ना देवदर्शन घडवलेले असते. तिच्या भावनिक गरजांचा त्याने विचार केलेलाच नसतो आणि त्याची खंतही त्याला नसते. तरीही ती त्याबद्दल चुकूनही तक्रार करत नाही. तोंड बंद ठेवत सगळे सहन करण्यातच तिने आयुष्य घालवलेले असते. दुर्दैवाने खुद्द तिच्या पतीला, घरातील जेष्ठ व्यक्तींना किंवा अगदी मोठ्या मुलांना याची साधी जाणीवही होत नाही. तिच्यावर कुटुंबाकडून खूप अन्याय झाला असे वाटत नाही हेच दुर्दैव.
तेव्हा यापुढे घरातील स्त्री तुमची आई असो किंवा तुमच्या मुलाची, तिचा सन्मान करा. कोणापुढे तिला मान झुकवावी लागेल, तिचा अपमान होईल असे स्वतः वागू नका आणि दुसरा कोणी वागत असल्यास त्यास परावृत्त करा. कारण तुमच्या आईने किंवा तुमच्या पत्नीने तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला जन्म दिल्यापासून ते तुम्ही स्वतंत्र युवक होईपर्यंत तुमच्या घरासाठी जो त्याग केला, जे आयुष्य खर्ची घातल त्याची किंमत तुम्ही पैशाने करूच शकणार नाही.
तुमचे बालपण जपतांना तिने फक्त शरीरावर दूधच नाही पाजले तर तुम्हाला वात्सल्याने वाढवले, तुम्हाला लिहा वाचायला शिकवले, ताठ मानेने,अभिमानाने, जगायला शिकवले. दुसऱ्या व्यक्तींशी आदराने कसे वागावे आणि गरज पडल्यास माघार कशी घ्यावी? किंवा विनवणी कशी करावी ते ही शिकवले. तुमच्या सुख दुःखात आधार दिला. सावली होऊन तुमचे रक्षण केले. तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला. आज जे कोणी तुम्ही आहात! जी काही तुमची चांगली ओळख समाजात आहे ती केवळ तिच्या चांगुलपणाचा परिपाक आहे. म्हणून आईचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या.
आई ने मुलांसाठी चौदा पंधरा वर्षे खस्ता खायच्या, त्याची आई, दाई, शिक्षिका असे सर्व रोल निभावायचे पण हे बाळ पंधरा वर्षाचे झाले की स्वतंत्र नव्हे तर मुक्त होत. आधी मित्रांमध्ये मग प्रियकर किंवा प्रेयसीसाठी आणि नंतर जोडीदारासाठी समर्पित व्हायचे, आई मागे पडून जाते. आईला मुद्दाम काही तिच्या आवडीचे विकत घेऊन जावे किंवा तिला सरप्राईज म्हणून खरेदीला न्यावे असा विचारही मनात येत नाही. सर्वात जास्त गंभीर बाब म्हणजे. तिच्यासाठी काही न करतांना तीला गृहीत धरले जाते. मुलांची लग्न झाली की त्यांचं भावविश्व बदलते त्यामुळे आई पाठी पडत जाते.
आताच्या मुंलांना स्वतः चा वेगळा संसार हवा असतो, नेमक त्याच वयात आईही थकत जाते. तिला घरात मदतीची गरज कमी असते पण तिची मैत्रीण बनून तिला समजून घेणारी कुणी हवे असते. तिच्या दुःखावर फुंकर मारणारे कुणी हवे असते. ही गरज मुलगी किंवा मुलीसारखी वागणारी सूनच पूर्ण करू शकते. हे समजून घेणारी सून मिळाली तर हवीच. असते.
प्रत्येक स्त्री ने मुलं मोठी झाली की स्वतःच स्वातंत्र्य जपलं पाहिजे, आपल्या आवडीच्या क्षेत्रात काही करता आलं तर जरुर करावे. मैत्रीणी गोळा कराव्यात, पिकनिक काढावी, चित्रपट पहावे, समाज कार्याची आवड असेल तर झोकून द्यावे म्हणजे मोकळ्या वेळाचे काय करावे? हा विचार पडणार नाही.
अर्थात तिच्या जोडीदाराने अशी मोकळीक देण्यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. यापूर्वी कदाचित तिच्या स्वातंत्र्याचा विचार आपण केलाही नसेल पण आपण सेवानिवृत्त झालो की स्वातंत्र्य उपभोगतो तसे स्वातंत्र्य ती सेवानिवृत्त झाल्यानंतर उपभोगू शकते का? उपभोगू शकत नसेल तर घरातील सर्वांची ती सामुहिक जबाबदारी आहे की तिची स्पेस तिला मिळवून दिलीच पाहिजे.
मग ठरलं तर, जसे तारूण्यात असतांना पती पत्नी एकमेकांना समजून घेऊन वागतात तसे आपल्या कुटुंबातील प्रत्येक महिलेचा सन्मान करायला शिकले पाहिजे. ताई, आई किंवा घरातील कर्त्या स्त्रीच्या कलाने बोलायच,वागायचे आणि यापूर्वी तिचा विचार केला नसेल तरी आता नक्कीच करायचा. तिचे समाधान आणि विरंगुळा तिला मिळवून द्यायचा. ठरवले तर संसाराच्या जोखडातून आईला, पत्नीला थोडं मोकळ आपण सगळे मिळून नक्कीच करू शकतो, ही तिच्यावर मेहरबानी नाही तर तो तिचा हक्क आहे. तिच्या मातृत्वाच्या भूमिकेत असताना तिने जो त्याग केला, तिने जे आपल्या अपत्याला, पतीला प्रेम दिले, मुलांची काळजी घेतली त्याची भरपाई करणे या जन्मात शक्य नाही पण तिला हसते, खेळते ठेवणे आणि शांत जीवन जगू देणे यासाठी प्रयत्न करणे नक्कीच आपल्या हाती आहे.
Profesyonel hacklink hizmeti ile sitenizi güçlendirin. Doğal görünümlü backlinkler, yüksek DA siteler ve uygun fiyat seçenekleri. 2091