आम्ही खातो खते
मुंबई ही अशी नगरी आहे की इथे कोणत्याही ऋतूत काहीही मिळतं. एकवेळ गावाकडे ठराविक भाज्या मिळणार नाही पण मुंबईत तुम्हाला हवी ती भाजी केव्हाही मिळेल ते ही घरबसल्या. आपल सर्च इंजिन हाती आहे आणि जास्त दाम द्यायची ऐपत आहे ना मग Every things is possible. अर्थात या भाज्या पॉली हाऊस, शेड नेट, ग्रीन शेड अशा कुठूनही आल्या असतील पण तुमच्या साठी उपलब्ध होतील हे नक्की. ह्या भाज्या दिसायला हिरव्या गार, चमकदार दिसत असल्या तरी पोषण मूल्यांचा विचार करता किती चांगल्या ते मात्र सांगता येणार नाही.
तसं तर म्हणा कशाचाही भरोसा नसतो, एक दोन वर्षापूर्वी तुमचे लाडके भावोजी, अहो आदेशजी बांदेकर यांनी म्हणे पवई, हिरानंदानी येथील मोठ्या मॉल मधून हलवा खायचा म्हणून दूधी घेतला. त्यांच्या सौ नी मस्त दूधी हलवा केला आणि भावोजींनी तो हादडला. त्या दूधीच काय बिघडले कोणास ठाऊक भावोजींना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं, अगदी मरणातून वाचले. तेव्हा Everything that glitters is not gold हे लक्षात ठेवा. फार कौतुकाने घेतलेल्या महागड्या भाज्या आपण खातो आणि मैत्रिणींनी विचारल तर रसभरीत वर्णन करत सांगतो, किंवा पावसात, मटार, फ्लावर या भाज्या खुप महाग होतात.’अर्थात दिल लग गया तो पैसा क्या चिज है’ , आम्हाला त्या खायच्या आहेत ना मग दाम किती? काय करायचय? असं असलं तरी मलायका अरोरा एक फुटपाथवरच्या भाजीवाल्याशी भाज्या महाग देत असल्याने वाद घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं मी पाहिलय. प्रत्येक गृहिणी खरेदी करताना विशेषतः भाज्या खरेदी करतांना किती कटकट करतात, मात्र मॉलमध्ये डेबिट कार्ड देऊन बिल भरताना आपण किती श्रीमंत आहोत असा आव आणतात. काय पटतंय ना!
affiliate link
तेव्हा भाज्या मॉल मधून आणल्या, किंवा रिलायन्स फ्रेश, बिग बास्केट मधून फ्लिपकार्ट किंवा आणखी कुठून मागवल्या आणि मस्त हिरव्यागार दिसत असल्या तरीही त्या चांगल्या आहेत असा निकष लावू नका. आज बाजारात येणारा कृषी माल हा रासायनिक खत वापरून उत्पादित केला जातो. त्या मध्ये पोट भरण्याची क्षमता असली तरी पोषण मूल्य असतील याची कोणतीही हमी नाही. म्हणूनच गावठी भाज्या घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. काही शेतकरी फक्त सेंद्रिय शेती करतात आणि आपले उत्पादन जाहिरात करत मुंबई, पुणे येथे ठराविक दुकानातून विकतात.स्वस्त घ्यायचे की आरोग्यासाठी मस्त घ्यायचे हा निर्णय अखेर तुमचा.
पन्नास वर्षापूर्वी आमच्या गावातील एक धनवान शेतकरी गरीब आदिवासी शेतकऱ्यांकडील भात विकत घेत असे.आम्हाला आश्चर्य वाटे, यांच्या शेतात मुबलक भात पिकते मग हे आदिवासी लोंकाजवळून खरेदी का करतात? इतकचं नव्हे तर आपल्या मुंबईच्या मुलासाठी रोज गावातून पालेभाज्या, फळभाज्या आणि दूध कुलाब्याला का पाठवत असावेत?तेव्हा ते कळल नव्हते. त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत होता आणि प्रचंड पिकत होते पण ते खाण्यासाठी योग्य नाही अस तेव्हाही त्यांना वाटत असावं. आदिवासी खत वापरू शकत नव्हते. त्यांच्या शेतात शेण गोवर ,पाला पाचोळा याचा वापर करूनच शेती करत त्यामुळे त्यांचे भात हे गावठी असे.
मुद्दा इतकाच की ग्रामीण भागातील काही गरीब शेतकरी रासायनिक खतांचा वापर न करता शेती करतात. त्यांच्याकडे गावठी भाजी मिळते ती शरीरास हानीकारक नसावी असं म्हणू शकू. आजही दादरला मारूती मंदिराच्या बाजूच्या फुटपाथवर, तांबे आरोग्य भुवन येथे विकली जाणारी गावठी भाजी घेणाऱ्या अनेक महिला आहेत. दुप्पट पैसे देऊन ते ही सफाळा, नालासोपारा, अर्नाळा, वसई येथील भाजी खरेदी करतात. बारीक पानांची मेथी, पानांवर बारीक लव असणारा मुळा, केळफुल,शेगटाच्या शेंगा,शेपू आणि बरेच काही. दादरला प्लाझाकडे मोठे भाजी मार्केट असूनही काही नागरिक तेथे भाजी खरेदी न करता या वसई, केळवा, अर्नाळा येथून येणाऱ्या महिलांकडील भाजी खरेदी करतात. काही ग्राहक तर अगदी मटणही आपल्या परीचीत भाजीवालीला आणायला सांगून त्यासाठी जास्तीचे पैसेही मोजतात. वस्तूची ओळख ज्याला आहे तो स्वस्त च्या पाठी लागणार नाही आणि हिरवीगार, फ्रेश, पाकिटबंद या शब्दांना किंवा ब्रँडला भुलणार नाही.
स्वातंत्र्यापासून आता पर्यंत लोकसंख्येचा विस्फोट झाल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात असणाऱ्या ३३ कोटी लोकसंख्येत आणखी १०० कोटींची भर पडली आहे.या काळात शेतीचे क्षेत्रफळ तर वाढले नाहीच उलट नागरीकरण, रस्ते, लोहमार्ग, खाण उद्योग, कारखाने अशा विविध कारणांमुळे घटलेच आहे तरीही आज अन्न धान्याचा तुटवडा जाणवत नाही.आता पर्यंत १३ पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. हरित क्राती, धवल क्रांती भारताने साध्य केली. कोणे ऐके काळी आपण अन्नधान्य आयात करत होतो हे सांगितले तर आताच्या तरूणांचा विश्वास बसणार नाही इतके अन्न आम्ही लग्नसमारंभ तसेच विविध समारंभात फुकट घालवतो. अर्थात आजही, काय? आणि किती? पिकवाव याच व्यवस्थापन ना कृषी मंत्रालयाला जमल ना शेतकऱ्यांना. एक वर्ष तुरडाळ गगन उंची गाठते तर दुसऱ्या वर्षी कांदा, कधी लसूण तर कधी बटाटा. या वर्षी खाद्य तेलाने परीसीमा गाठली होती.म्हणूनच जो शेतकरी भावातील चढ उतार लक्षात घेऊन शेती करतो तो तोट्यात जात नाही.
आजही खाद्य तेल आपण मलेशिया जवळून आयात करतो. तेलबिया बाबत ठोस धोरण घेऊन त्यांच्या पिकाला अनुदान आणि उत्पादनासाठी बाजार भाव हमी दिली तर आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू ही राज्ये तेलबिया उत्पादनात अग्रेसर ठरू शकतात. धोरणलकवा हा खरच शाप आहे. त्यात मोठे व्यावसायिक साठेबाजी करतात आणि बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून भाव वाढवतात. अर्थात या साठेबाजांचं आणि राजकीय नेत्यांच गुळपीठं असतं म्हणून एवढी हिम्मत ते करतात. राजकीय नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी पैसे लागतात आणि ते व्यापारी मंडळीच देतात.
affiliate link
अन्नधान्य, पालेभाज्या, फळे, मांस-मटन, जे आज विपुल प्रमाणात उपलब्ध आहे त्याला खरच पोषणमूल्य आहे का? हाच खरं तर कळीचा मुद्दा आहे. आठ आठवड्यात पूर्ण वाढ होणारी पोल्ट्री मधली कोंबडी आणि घरातील कोंबडी पहिली की हे लक्षात येईल. आता दिसतात तशा दोन तीन किलो वजनाच्या कोंबड्या, दहा वीस किलोचा बोकड, दोन दोन किलो वजनाचा फ्लॉवरचा किंवा कोबीचा गड्डा, पाच किलो वजनाचे कंलीगण, हातभर लांबीचा मुळा, दिड किलो वजनाचे रताळे, एक किलो वजनाचा द्राक्षाचा घड हे माझ्या तुमच्या लहानपणी होते का? जरा मेंदूला ताण देऊन आठवून पहा. खरं खरं बोलायच तर असं अजब, अवास्तव काहिच शेतीत होत नव्हते. कसं होणार? कारण तेव्हा शेतात जी पिक होत त्यांना रासायनिक खते अभावानेच वापरली जात होती. तेव्हा शेतीला शेणखत आणि पालापाचोळा जाळून जमलेली राख इतकेच दिले जात होते. तेव्हा पारंपरिक बियाणे वापरले जात होते आणि द्राक्ष मोठी दिसावी म्हणून त्यावर संप्रेरकांचा मारा होत नव्हता.
चाळीस लिटर दूध देणारी गाय पाहिली तरी तुम्ही तोंडात बोट घालाल, आपल्या घरच्या गाई एवढ दूध संपूर्ण आठवड्यात देत नाही मग ही काय जादू? अहो हे हायब्रीड गाईंचे वाणही असेच शास्त्रीय संशोधनाचा परीपाक आहे. त्यांची वाढ अनैसर्गिक वाटते. त्यांना लागणार खाण किंवा खुराक पाहिलात आणि या खुराकासाठी कोणते पदार्थ दिले जातात ते कळलं की चाळीस लिटर दूधाच गमक कळत पण तुमच्या ग्रामीण गाईच्या दूधाची चव या जर्सी किंवा अन्य गाईच्या दूधाला येणार नाही. पण आम्हा शहरवासीयांना पिशवीतून मिळणारे सफेद रंगाचा द्रव हेच दूध. खर तर आम्हाला शुद्ध दूध दिलं तर आम्ही म्हणू इसमे कुच मिलावट है। याचे कारण ग्रामीण भागातील दूधाची चवच आम्हाला माहीत नाही.
लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि अन्नधान्य कमी पडू लागल्याने आम्ही सुधारीत बी बियाणे, जनुकीय शेती,विपुल खते,संप्रेरके यांचा वापर करू लागलो. याच बरोबर या सुधारीत हायब्रीड शेतीवर पडणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही रासायनिक बुरशी नाशके वापरु लागलो. किटकांपासून संरक्षण मिळावे म्हणून किटक नाशके वापरू लागलो. परिणामी शेती उत्पादन नक्कीच वाढले मात्र पिकवल्या जाणाऱ्या धान्य, कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, तेल बिया यात रासायनिक पदार्थाने शिरकाव केला. एकदा एक ग्रामीण भागातला अभ्यासू म्हणाला, ज्या पिकावर काही किडे, अळ्या, पाखरे बसतात ते पिक खाण्यास हरकत नाही. ज्याच्यावर कोणती किड थांबत नाही, ज्याच्यावर तुडतुडे येत नाही, याचा अर्थ ते पिक विषारी आहे. खाण्यासाठी अयोग्य आहे. पण आम्ही मात्र तेच अन्न खातो, पचवतो. आमच्या शरीराने हे विषयुक्त अन्न पचवण्यासाठी क्षमतेत बदल केला असावा.
अगदी दूध देणाऱ्या जनावरांचे खाद्य सुध्दा आम्ही जनुकीय तंत्राने बनवले. जी म्हैस किंवा गाय दोन चार लिटर दूध देत होती त्या म्हशीची पुढील पिढी वीस तीस लिटर दूध देऊ लागली. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळावे म्हणून जे युध्दपातळीवर प्रयत्न देशाने केले त्यामुळे काही बाबतीत आपण फक्त स्वयंपूर्ण बनलो इतकेच नव्हे तर इतर देशांना निर्यातही करु लागलो. पण मित्रांनो आपण शहरवासी जे चकचकीत दिसणारे अन्न खातो मग ते वाडा कोलम तांदूळ असो, एमपी सिहोर किंवा लोकवन आणि पेप्सी गहू असो किंवा इंदोर तुवरदाल असो की पंजाब बासमती खरच या धान्यात पौषणमुल्य आहेत का? पडताळून पहा. माझी खात्री नव्हे विश्वास आहे यात रासायनिक खतांची मात्रा अधिक आणि शरीर पोसणारी मुल्ये कमी. मित्रहो जर तुम्ही खतांची नावे ऐकली तर गांगरून जायला होते. सुपर फॉस्फेट, युरिया, अमोनियम नायट्रेट, अँग्रोस्टार, डाय अमोनियम सल्फेट, अमोनियम पाँली फाँस्फेट, पोटँशियम नायट्रेट, डाय सुपर फाँस्फेट, मोनो अमोनिया फाँस्फेट, नायट्रोफाँस्फेट, ही त्यापैकी काही नावे. तण नाशक म्हणून डायोरेक्स,मेट्री फ्यूजीन,सेंटाँर २४०, फ्युजी फ्लेक्स, फोम साफेन परशूट , सरूची फ्लेक्स या तण नाशकाचा वापर केला जातो. यामुळे हरळ, धोत्रा, रानभेंडी, दुधाडी, गोखरू इत्यादी प्रकारच्या तणांचा नाश करता येतो. पण फवारले जाणारे हे औषध अल्पप्रमाणात पिकातही शोषले जाते.
याच बरोबर बुरशी नाशक म्हणून अनेक औषधांचा वापर करण्यात येतो. एम्फान ४०/२२/०३, ,प्लूटाँन, मँट्रिक्स, कोनिका(धानूका), मेलोडिडिओ(द्राक्षासाठी) अलाईट किंवा बावस्टीन(कांदा), ताकद(टाटा),कवच( सिझंटा), बुरशी नाशक म्हणून,रेडीमिल गोल्ड कांदा या पिकासाठी. क्रिस्टल बायर, सँफ, ड्यूपाँट, रोको, ब्लू काँपर, रोडोमील गोल्ड(भेंडी,मिरची,आले), मेलोडीडीओ, आंतर प्रवाही, (करपा,भुरी डाउनी या रोगासाठी भाजीपाल्यावर वापरावे) , ड्यू पाँइट चे करझट,,कँब्रीओ टाँप( कापूस, आले) ,(कांदा,)अँमीट्रार अँट्राकाँल(कांदा), प्रोपिनेब (डाळींब) , बेनफिल, धनूस्टीक, झेन, स्टारबेन्झ
आता मला सांगा, वर उल्लेख केलेली खते, तण नाशके, बुरशी नाशके वापरल्या शिवाय शेती करणे शक्य नसतांना त्यात निर्माण होणाऱ्या शेत उत्पादनात या खतांचा, किटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकांचा अंश आल्या शिवाय राहिल का? म्हणूनच वाटते आम्ही अन्न नव्हे तर विविध रसायने आहारात घेतो. भविष्यात माणसाला अन्नाऐवजी NPK डोस बुस्टर म्हणून दिला तर नवल वाटायला नको. आज गावाकडे गेल्यावर झाडावरची कैरी, चिंच, आवळा न धुताही आपण बिनधास्त खातो तशी डेरींग आपण शहरात करू शकू का? नाही ना!कारण गावाकडे आपण जे काही खाऊ त्या बद्दल आपल्याला भरोसा आहे. आजही मुंबईकर पाहुणा गावी गेला तर त्याला राखून ठेवलेल्या कोंबड्यांची सागूती जेवणात असेल किंवा गावठी बोकडाचे मटण असेल ब्राँयलर किंवा इंग्लीश कोंबडीचे चिकन त्याला खाऊ घालणार नाही. आजही आदिवासी कुटुंबाकडून खरेदी केलेल्या पालेभाज्या, रानभाज्या खातांना जो आनंद होईल तो सिमला मिरची, मटार आणि भोपळी मिरचीची भाजी खातांना होणार नाही. अन्न हे पूर्णब्रह्म पण केव्हा जर ते शरीरातील ब्रह्म जपत असेल त्याच रक्षण करत असेल तर. तेव्हा चकचकीत आणि सिलबंद म्हणजे चांगले अन्न हा दुराग्रह सोडा.
डोळस व्हा चांगले अन्न खा. तरच शरीराचे पोषण होईल. अन्यथा हे अन्नच धडधाकट शरीराला पोखरून टाकेल. तेव्हा आपण किती खातो? यापेक्षा कोणते अन्न खातो? त्यात कोणती पोषक द्रव्ये आहेत? हेच महत्त्वाचे आहे. अर्थात शहरात सिलबंद म्हणजे चांगले ही संकल्पना मल्टी नॅशनल कंपन्यांनी रूजवल्यामुळे आमचाही हाच गोड समज आहे. हा समज आता कोणीही बदलवू शकणार नाही. पण शक्य झाल्यास पर्यटन म्हणून का होईना ग्रामीण भागात गेल्यास तिकडच्या भाज्या पहा, जेवण जेवा आणि नंतरच स्वतःला विचारा की तुम्ही काय खाता?
affiliate link
असो मी बुध्दीभेद करत नाही वस्तुस्थिती मांडतो. शरीर आणि त्याचे आरोग्य तुमचा विषय आहे. आपल्या कृतीत चैतन्य आणायचे असेल तर समरसून ती कृती करावी लागते.त्यात सहभाग घ्यावा लागतो. मग या शरीरात चैतन्य आणण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागला तर हरकत नसावी. तेव्हा शक्य असेल तर सिजन प्रमाणे ग्रामीण भागातून भाजी विकायला येणाऱ्या महिलांकडून गावठी भाज्या जरूर खा, ठाणे, कल्याण येथे वर्षातून एकदा रानभाज्या महोत्सव भरतो तेव्हा या भाज्यांची ओळख स्वतःला करून घ्या आणि तुमच्या घरातील बच्चेकंपनीला दाखवा.
पावसाच्या आरंभी, पाऊस पडून गेल्यावर आणि हिवाळ्यात मुबलक गावठी भाज्या विक्रीसाठी येतात. मिळतील तेव्हा तुमच्या आहारात वापर केला तर नक्कीच चांगल्या भाज्यांची ओळख तुम्हाला होईल. गावठी पालक, कोथंबीर, मेथी यांची पाने नाजूक असतात. सफेद रंगाची किंवा गर्द हिरवी लांब भेंडी आदीवासी किंवा ग्रामीण भागातील शेतकरी पिकवतात. अशा कितीतरी अन्नधान्य, फळभाज्या आणि पालेभाज्या बाबत निरीक्षणाने हा फरक लक्षात येईलच, तेव्हा खतांवर आणि किटकनाशके, बुरशीनाशके यांच्या साहाय्याने वाढलेल अन्न खायच की स्वतः स्वताच संरक्षण करून निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल अन्न खायच हे सर्वस्वी तुमच्या हाती.
पाव, पिझ्झा, बर्गर, मंचुरीयन, पेस्ट्री चायनीज, आणि मला माहिती नाही असे कितीतरी रूचकर लागणारे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे इनग्रेडीयंट डोळसपणे पाहिले तरच या चवीचे रहस्य तुम्हाला कळेल याच बरोबर कोक किंवा या सारखी पेये आणि त्याचे घटक अभ्यासली तर आपण नक्की काय पितो ते कळेल. तुम्ही कोणते खाद्यपदार्थ खावे कोणती पेय प्यावी याचा निर्णय तुम्हीच घेणार असलात तरी मिंत्रानो कधीतरी गंमत किंवा चेज म्हणून हे पदार्थ खाणे आणि या पदार्थाना आपला मेन कोर्स बनवणे यात नक्कीच फरक आहे.
आंबोळी, धपाटे, उत्पीट, ऐलापे, खिचडी, पोहे,इडली, दोसा किंवा या सारखे त्या त्या भागातील असंख्य पोषण मुल्य आणि रुचकर पदार्थ सोडून सर्वजण रेडी टू इट पदार्थांचे सेवन करत आहेत. परदेशातील वातावरणात जे आहार मान्य आहेत तेच आपण स्वीकारले तर यामुळेच चरबी वाढणे, मधूमेह, श्वसन विकार, याने संपूर्ण शरीर पोखरल्यानंतर वैद्यकीय उपचार करत बसायचे की स्वास्थ्य वर्धक पदार्थ खाऊन तंदुरुस्त रहायचे हे सर्वस्वी तुमच्या हाती.शरीर स्थुल झाले की डायेट सुरू करायचे त्यासाठी डायेट तज्ञ गाठायचा, जीम सुरु करायची आणि डॉक्टरची पायरी चढायची, हे चक्र सुरू ठेवायचे नसेल तर वेळीच सावध व्हा. आपण खातो त्याने शरीराचे पोषण होते की शरीराची हानी हे ठरवणे सर्वस्वी तुमच्या हाती.
तुमच्या निरोगी, निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा.