आयुष्याची चौकट आणि आपण
कोणी कसं जगावं हा ज्याच्या त्याचा स्वतःचा प्रश्न असतो पण काही अधिकार नसताना आम्ही दुसऱ्यांनी कसं जगाव, कसं वागावं ह्याची चर्चा करण्यात आणि एकमेकांच बौद्धिक घेण्यात समाधान मानतो. मी जगतो ते योग्य,मी शहाणा बाकी सर्व अडाणी असा आपला सूर असतो. हे सांगण्याची किंवा ठरवण्याची आपली योग्यता आहे की नाही याचा सारासार विचार न करता आपण जाहीर मत व्यक्त करत असतो. जाहीर पण आपल्या कंपू पुरते, त्याला जाहीर म्हणावे की नाही हा वेगळाच प्रश्न. आपण आपल्या जगण्याला दिलेलं परिमाण किंवा स्वातंत्र्य प्रत्येकाला योग्य वाटत असते. तो त्याचा भ्रम असतो. सकाळी तिसऱ्या प्रहरी, किंवा ब्रह्म मुहूर्ताला उठून आपला दिवस सुरू करणाऱ्या व्यक्तीला जस तो योग्य जगतो असे वाटते तसेच साडे आठला आपला बेड टी घेऊन दिवसाची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीलाही वाटते. शेवटी तुम्ही कोणाशी तुलना करून तुमच्या कृतीची योग्यता ठरवता त्यावर सारे अवलंबून आहे.
श्रीमंत माणसाचे जगणे, वागणे,मध्यम उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचे जगणे, वागणे आणि गरिबांचे जगणे यात फरक असणारच. इतकेच कशाला दोन श्रीमंत किंवा मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबाच्या जगण्यातही फरक असणारच,हे वागणे,जगणे ज्याच्या त्याच्या मनावर,त्याच्या घरातील राहणीमान, त्या कुटुंबातील वैचारिक,सांस्कृतिक,सामाजिक बैठक यावर अवलंबून आहे. त्यामुळे दुसरी व्यक्ती पैश्याची उधळपट्टी करते आणि आम्ही अगदी योग्य खर्च करतो, त्यांच्याकडे काय खर्चायला हरामाचा पैसा आहे किंवा ‘ती माणसे अगदीच कंजूस बाई!’ अशी शेरेबाजी आपण अगदी सहज करतो.आपल्या आयुष्याची चौकट भले आपण ठरवली असावी,पण दुसऱ्याच्या आयुष्याची मोजदाद करणारे आपण कोण? कोणी हा अधिकार आपल्याला बहाल केला?
एखादा श्रीमंत, घरी गाड्या असूनही पाई किंवा शेअर रिक्षाने जातो किंवा एखादा गरीब कुटुंबातील व्यक्ती नेहमी रिक्षाने जातो पण म्हणून श्रीमंत व्यक्ती अगदी कंजूष आहे आणि गरीब व्यक्ती ऐपत नसूनही शो ऑफ करते असे म्हणणे योग्य नाही,श्रीमंत शरीराला व्यायाम हवा म्हणून आणि गरिबाला काही शारीरिक त्रास असेल म्हणून ते त्या प्रकारे जाणे योग्य समजत असावे. तेव्हा दुसऱ्या कुटुंबाने कसे राहावे? काय खावे? कोणते आणि कसे कपडे घालावे? कोणाशी मैत्री करावी? हे आपण ठरवू शकत नाही, किंबहुना ठरवू नये. आपली नेमणूक त्या जागी कोणी केली नाही. काही व्यक्तींना दुसरा किंवा दुसरी कधी घरून बाहेर पडतो किंवा पडते? किती उशिरा घरी येते? कसे चिवित्र कपडे घालून जाते ? त्याचे किंवा तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? कुठे फिरत असतात? यावर बारीक नजर ठेवायची सवय असते.त्यांना दुसऱ्या विषयी जी माहिती मिळेल ती सार्वत्रिक करण्यातही रस असतो. अरे आपले फाटले आहे ते पहा दुसऱ्याचे पाहतांना आपण उघडे आहोत हे का विसरता? पण नाही काही व्यक्तींना ही खोडच असते.
मी किंवा आपण आपल्या भोवती चौकाट आखून जगतो या बद्दल स्वतःला अभिमान असण्यात काही चूक नाही पण जेव्हा या अभिमानाचे गर्वात रूपांतर होते आणि जगात मी एकटाच शहाणा बाकी सारे मूर्ख अशी स्वतःची समजूत होते तेव्हा खास समजावे की “ग” ची बाधा आपल्याला होत आहे, हट्टाने किंवा ठरवून आपण सकाळी उठतो, व्यायाम करतो, दिवसातून एकदाच चहा घेतो,सटर फटर खात नाही, उगाच कपड्यांचा भपका करत नाही ही तुमची जीवन शैली झाली तशीच जीवन शैली दुसऱ्याची असेल तर बरोबर अन्यथा त्याचे जगणे वाया असा वृथा अहंकार बाळगणे अयोग्य. आपण आपली चौकाट ठरवावी मात्र दुसऱ्या व्यक्तीची चौकाट ठरविण्याचा किंवा त्या चौकटीत हस्तक्षेप करण्याचा करंटेपणा करू नये.
आदर्श असे काही नसते,संस्कृत मध्ये सुभाषित आहे.
“यदेव रोचते यस्मै भवेत्तत्तस्य सुन्दरम्” ।
तुमच्या मानण्यावर असते, एखाद्या व्यक्तीला जे आदर्श वाटेल ते दुसऱ्याला वाटणार नाही कारण प्रत्येकाची चौकट आणि त्याचा चष्मा हा स्वतःचा आहे त्या चष्म्याचा उपयोग दुसऱ्यास होईलच असे नाही. तुमचे शिक्षण,घरातील वातावरण,संस्कृती,तुमची समज,तुमचे सहकारी, त्यांची वैचारिक पातळी या साऱ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर नकळत होत असतो. तुमच्या आदर्श व्यक्तिमत्वाची व्याख्या ही संकुचित असू शकते किंवा भ्रामक विशाल किंवा अवास्तव असू शकते. तुमच्या आदर्श व्यक्तिमत्व किंवा वागण्याचे परिमाण हे व्यक्ती निहाय भिन्न असण्याची शक्यताच जास्त असू शकते.
माझी मैत्री कोणाशी आहे? किंवा माझी उठबस कोणात आहे? मी कोणते वर्तमानपत्र वाचतो? किंवा मी कोणती पुस्तके वाचतो? यावरून माझी अभिरुची,माझ्या व्यक्तिमत्वाचा दर्जा ठरवण्याची शक्यता जास्त आहे. मी साध्या पोशाखात वावरत असेन, इस्त्री केलेले कपडे वापरत नसेन, खरेदी मोठ्या किंवा ब्रँडेड दुकानातून करत नसेन,बोलतांना इंग्रजीचा वापर करत नसेन तर मी खूप साधा,मागासलेला आहे किंवा मला अभिरुची नाही असा शिक्का सहज मारला जातो.
दुसऱ्या व्यक्तीने आखून दिलेल्या चौकटीत जगणे फारसे कुणाला आवडत नाही, अगदी आपल्या हिताचे असले तरी तो जुलूम वाटू लागतो. दुसऱ्या व्यक्तीने घालून दिलेली चौकट मनापासून आपल्याला पसंत नसते मग चौकट घालणारी व्यक्ती आपली आई, बाबा पत्नी किंवा नवरा असो.का म्हणून मी त्याच्या आज्ञा पाळाव्या? माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर त्याने अंकुश का ठेवावा? अमुक तमुक वाजताच उठावे, Exercise किंवा व्यायाम करावा, सकाळी न्याहारी सॉरी ब्रेकफास्ट ला मोजून मापून आणि कमी फॅट व जास्त कॅलरी असणारे खावे, उशिरा पर्यंत आंघोळीचे राहू नये, लंच करताना TV समोर बसून करू नये, दुपारी फार झोपू नये अशी अनेक बंधने कोणालाही आवडणार नाही. कुणाला रात्री सातच्या आत घरात अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे तद्दन संकुचित,गावंढळ वृत्ती वाटू शकेल. तेव्हा दुसरे कुटुंब कसे जगते, कसे वागते त्याची तुलना करण्याचा अधिकार आपल्याला नाही तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या वागण्यावर टिप्पणी करणेसुद्धा हिटलरशाही ठरु शकते.
तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात अथवा योग्य वाटतात त्या तुमच्या जोडीदाराला योग्य वाटाव्या किंवा वाटल्याच पाहिजे असे वाटणे हे वैचारिक आक्रमण आहे. तुम्हाला योग्य वाटणाऱ्या कृतीची योग्यता ही फक्त तुमच्या पुरती असते जेव्हा त्या बाबत कोणतीही फायद्याची बाब समोरच्या व्यक्तीच्या निदर्शनास येत नाही किंवा त्याच्या पचनी पडत नाही तो पर्यंत ती गोष्ट तो नक्कीच स्वीकारणार नाही मग भले त्यात फायदा असो वा नसो. कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या कृतीचे अनुकरण करा असे सांगण्याचे आणि ऐकण्याचे दिवस संपले. जेव्हा स्वतःच्या न्याय भूमिकेचा किंवा बुद्धीचा विचार न करता मोठी व्यक्ती सांगते म्हणून कृती करण्याचे दिवस कधीच संपले,लहान मुलेही जोपर्यंत त्यांच्या बुद्धीला गोष्ट पटत नाही तो पर्यंत स्वीकार करत नाही.आणि बौद्धिक प्रगतीसाठी प्रश्न विचरून समाधान करणे नक्कीच प्रगतीचे लक्षण आहे.
‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ असे जे आपण म्हणतो त्याचा खरा अर्थ जो पर्यंत वैज्ञानिक पातळीवर एखादी गोष्ट सिद्ध होत नाही तो पर्यंत तिचा आंधळेपणाने स्वीकार करणे अयोग्यच.
काही दशकापूर्वी मासिक पाळी आली की मुलींना घरातील एका खोलीत किंवा कोपऱ्यात बसून राहावे लागे. त्या काळात तिने देवपूजा करणे, सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमाला जाणे निषिद्ध मानले जाई परंतु आज मासिक पाळी ही बीज निर्मिती प्रक्रियेत अंतस्थ स्त्रावामुळे स्त्री च्या जीवनातील दर महिन्यात येणारा नैसर्गिक असा बदलाचा काळ आहे आणि कोणतीही निर्मिती निषिद्ध असूच शकत नाही मग महिलांची बीज निर्मिती प्रक्रियेतील मासिक पाळी निषिद्ध कशी असा प्रश्न सुशिक्षित डॉक्टरांनी आणि समाजानी उपस्थीत करून स्त्रिया भोवती आखलेली संचार स्वातंत्र्याची चौकाट मोकळी केली. जो पर्यंत सुशिक्षित समाज विचारपूर्वक आपल्या घरात अशा जुन्या रूढी,परंपरा मोडून काढून विचारपूर्वक त्याचा त्याग करत नाही तो पर्यंत त्याचे अनुकरण करण्यास समाज धजावणार नाही.
अगदी नवरा वारला की स्त्रीला ती विधवा झाली असा शिक्का मारून तिचे कुंकू पुसून टाकणे, तिचे मंगळसूत्र तोडून टाकणे किंवा पूजा, लग्न आशा पवित्र गणल्या जाणाऱ्या समारंभात तिची उपस्थिती नाकारणे नक्कीच तिच्यासाठी मानहानी आहे. जो पर्यंत आशा कालबाह्य आणि ज्यांना काही आधार नाही अशा चौकटी मोडून काढत नाही तो पर्यंत कोणालाही मुक्त जगता येणार नाही.एकीकडे स्त्री मुक्तीच्या बढाया मारायच्या आणि स्वतःच्या सुनेचा हुंडा मिळाला नाही म्हणून छळ करायचा अशा गोष्टी नजरेआड करून चालणार नाही.भारतीय संस्कृतीत असणारी व्रत वैकल्याची त्या पाठचा आशय योग्य प्रकारे पुढील पिढीस सांगितला न गेल्याने हेटाळणी होण्याची शक्यता जास्त.
ज्या रीतीरिवाजास काही ठोस शास्त्रीय कारण नाही अशी व्रत वैकल्ये भविष्यात स्विकारली जाण्याची शक्यता कमीच. मग ती वटपोर्णिमा असो कि करवाचौथ.
पांढरपेशा समाजाने वेगवेगळ्या कारणांनी,स्वतःला सुरक्षित करण्यासाठी, दुसऱ्यासाठी सामाजिक बंधनाच्या ज्या मर्यादा आखल्या आहेत त्या मर्यादा योग्य की अयोग्य याची शहानिशा होत नाही तो पर्यंत ती बंधने त्या मर्यादा यांचा स्विकार करणे म्हणजे स्वतः त्यास मान्यता देणे होय, म्हणूनच जो पर्यंत मनास या गोष्टी पटत नाही तो पर्यंत त्या स्वतः पाळू नये आणि दुसऱ्यावर लादू नये, या करीता मानहानी स्विकारावी लागली तरी तयारी ठेवावी.केवळ कुणी सांगितले म्हणून ऐकले म्हणण्याचे दिवस संपले. पुरोहित सांगतो म्हणून पूजा करण्यापेक्षा त्यातील तर तम भाव समजून घेऊन ती केल्यास त्याचा मानसिक आनंद मिळेल.
कितीतरी गोष्टी मनास पटत नाहीत जसे चप्पल घालून देवळात गेल्यास चपलांची धूळ मंदिरात जाईल हे अगदी बरोबर पण चप्पल काढूनच देवाच्या पाया का पडावे? आमच्या वेताळाला चामड्याचे जोडे नवसाला ठेवण्याची प्रथा आहे, तेव्हा मंदिर आवारात जोडे नेले तर कसे चालतात?
देवाच्या उपवासाला फलाहार करतात, शक्यतो शिजवलेले अन्न चालत नाही मग काही देवतांना मांसाहाराचा नैवेद्य कसा चालतो?
देवाच्या चरणावर वाहिलेल्या दूध वा अन्य अभिषेकाचे जल तिर्थ म्हणून दिले आणि त्यातील दुधावर बुरशी बसून जर तिर्थातून विषबाधा झाली तर देव वाचविणार की पूजारी? तेव्हा ज्या गोष्टी पूर्वंपार चालत आल्या आहेत त्या अंधश्रद्धेमुळे असाव्या त्या आजच्या युगात जश्याच्या तशा पाळण्याची आवश्यक्यता आज नाही.
अगदी पेहरावाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल,जुन्या काळी नववारी नेसली जात होती, अगदी सर्वत्र तेच नजरेस पडत होत म्हणून त्या काळी त्या बाबत कुणाचा आक्षेप नव्हता पण आज जिथे मिनीटे सेकंद हिशोबाने पिढी चालते तिथे त्यांनी नववारी किंवा साडी नेसण्याचा आग्रह कोणती सासू करेल.अगदी पंजाबी ड्रेस सुध्दा ओढणीसह वापरणे मुलींना अवघड वाटते. सोईचे म्हणून तिने शर्ट पॅन्ट पोशाख केला तर आक्षेप का असावा? पण हा पोशाख तिच्या आवडीवर आहे तिला वेळ नाही म्हणून ती हा शर्ट पॅन्ट पोशाख वापरते हे म्हणणे तितकेसे खरे नव्हे जेव्हा या महिला मैत्रिणींचे आपसात काही ठरते तेव्हा त्या साडीच काय तर नववारी नेसून जातातच ना? तेव्हा अमुक तमुक पोशाख का करत नाही तर सवड नाही ही पळवाट आहे. ज्यांनी ज्याला जे चांगले शोभते जे आवडते ते घालण्यास कुणी मज्जाव करूच शकत नाही.
तेव्हा कोणती चौकट ठेवायची आणि कोणती मोडून टाकायची ते सर्वस्वी त्या व्यक्तीवर निर्भर करते.फक्त चौकट मोडतांना त्याचा स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या सुरळीत आयुष्यवर परिणाम होऊ नये हीच इच्छा.
नात्याचे असेच आहे, “आईकडची प्रेमाची,कोडगी ती बाबांची” असा समज किंवा गैरसमज सर्वदूर पसरला आहे. काका दूर राहात असले तरी काकांच्या गावाला जाऊया असे कोणी म्हणत नाही. माय मरो काकी जगो असेही कोणी म्हणत नाही. काका आमचा तालेवार रेशीम घेईल हजार वार असे कोणी म्हणत नाही. नात्याचे सूत्र माहेरच्या माणसाच्या भोवती का बरे फिरते? ही नात्याची अदृश्य चौकट मुलांभोवती कोणी आणि का म्हणून आखली? याला आपण मोठे जबाबदार आहोत हे मान्य करावेच लागेल.
आम्ही नात्या भोवती काटेरी कुंपण घालून आवडती आणि नावडती अशी विभागणी केली तीच पुढील पिढीसाठी अयोग्य आहे.”प्रेम द्यावे प्रेम ल्यावे, प्रेम स्वीकारून अर्पावे ही प्रेमाची लेन देन मर्यादित का? तिला लिमिटेड कंपनी का बनवावी? अगदी लहान असताना, आपण खेळतांना मी फक्त ह्यालाच घेणार,तू अमच्यात नको असं म्हणतो तेव्हा सुजाण आईने आणि अर्थात बाबांनी ही आखली जाणारी चौकट चुकीची आहे हे मुलांवर बिंबवणे गरजेचे आहे. याआपण कुणीतरी वेगळे आहोत,स्पेशल आहोत ही भवाना मुलांच्या मनात रुजवणे चुकीचे आहे. समाजातून आजही जात नष्ट झाली नाही उलट “जात नाही ती जात” असे मराठी साहित्यात वर्णन करून तिचा पुरस्कार केला जातो.
केवळ चातुर्वर्ण्य इतक्याच सीमा याला नाहीत तर अगदी ब्राह्मण म्हटले तरी, देशस्थ, कोकणस्थ, कांस्यस्थ इथपासून ते कऱ्हाडे, चित्पावन, आणि अगदी अत्री, सांख्यन, भारद्वाज, आशा विविध गोत्रा पर्यंत ताणून आमची जातच श्रेष्ठ कशी त्याची मखलाशी केली जाते. बर हे फक्त ब्राह्मणात आहे का तर तसे नाही, मराठेही आम्ही शहाण्णव कुळी, आम्ही ब्यांणव कुळी,कोणाला घाटावरच्या मराठ्यांशी सोयरीक नको तर कोणाला कोकणी मराठा नको. अवघी मानव जात विभागली आहे, प्रत्येकाला वेग वेगळे लेबल लावून त्याची प्रत आणि किंमत जणू ठरवून टाकली आहे.
ह्याच त्या चौकटी पुढे मोठ्या होत जातात आणि ह्या इमारतीत मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना सदनिका विकत घेता येणार नाही किंवा या समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश नाही किंवा या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाही अशा सूचना लावल्या जातात आणि समाजातील काही घटकांना त्या अटींचे काटेकोर पालन करावे लागते. तसे न केल्यास समाज स्वतः न्यायालय बनून त्याला शिक्षा करते. सुशिक्षित झाल्यानंतर जर आजही कोणत्याही गोष्टीची कारण मिमांसा जाणून न घेता दुसऱ्या समाजावर,व्यक्तीवर बंधने लादणार असू किंवा निमूटपणे बंधने पाळणार असू तर त्या दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत. कोणीकोणाशी विवाह करावा,कोणता आहार घ्यावा,कोणता धर्म स्विकारावा,कोणाची पूजा करावी या बाबत कोणतीही बंधने असू नयेत मात्र या मुळे पारिवारिक वाद,कौटुंबिक कलह निर्माण होणार नाही याची काळजी स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या व्यक्तीने घेणे गरजेचे आहे.स्वतः स्वातंत्र्य उपभोगताना त्याचा उपद्रव कुटुंबातील इतर मंडळींना होऊ नये याची जाणीव हवीच.
तुम्ही कोणाची भक्ती करावी, कोणाला आदर्श मानावे, कोणाचे गूण गावे, कोणी म्हणतो आम्ही शैव तर कोणी वैष्णव. शंकर आणि विष्णू यानी एक मेकांशी युद्ध केल्याचा दाखला पुराणात आहे की माहीत नाही पण आम्ही मात्र कोणाचे पूजक आहोत आणि आम्ही श्रेष्ठ कसे हे सांगून मारामाऱ्या करणार मग डोकी फुटली तरी बहात्तर. कोकणात देवाचा मान कोणाकडे असावा? देवाची पहिली पूजा कोण करणार किंवा पालखीला पुढे खांदा कोणी द्यायचा यावर कोर्ट कज्जे सुरू आहेत. त्यावर लवकर निर्णय होत नाही आणि हे वाद तसेच सुरू राहतात.
विठ्ठलाच्या मंदिरातील पंड्या लोकांचा वाद असाच कैक वर्षे पडून आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र तुमचेच पण त्यामुळे वैरभाव उत्पन्न होणार नाही याची काळजी तुम्हीच घ्यायची आहे. आदर्श आणि बरे वाईट हे त्या त्या व्यक्तीवर,त्याच्या वैचारिक क्षमतेवर अवलंबून आहे. कोणताही धर्म कोणताही पंथ दुसऱ्याचे वाईट करा असे सुचवत नाही सांगत नाही.
स्वतः भोवती तुम्ही कोणती बंधने घालून घेतली आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा तुम्ही कसा विचार करता, त्यांच्यावर तुमची बंधने लादता की त्यांना मोकळीक देता त्यांच्या मताचा आणि मनाचा आदर करता या गोष्टीवर तूम्ही सोशल आहात की कसे ते त्यावर ठरते. जर घरातील व्यक्तींच्या वागण्यावर तुम्ही सतत शेरेबाजी करत असाल तर फार काळ तुम्ही कुणासाठी आवडते असू शकणार नाही,आणि घराचे नेतृत्वही करू शकणार नाही,जोपर्यंत ते तुमच्यावर आर्थीक कारणासाठी अवलंबून असतील तो पर्यंत तुमच्या शब्दाला नाराजीने मान देतील पण जेव्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील तुमच्या संगण्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करतील. अनुल्लेखाने मारणे म्हणजे काय त्याचा प्रत्यय तुम्हाला घ्यायचा नसेल तर हस्तक्षेप त्वरेने थांबवणे जास्त समजूतदारपणा ठरेल.
जगण्याला चौकट हवी पण स्वतःपुरती, दुसऱ्या व्यक्तीच्या जगण्याची चौकट आणि मर्यादा न ठरवणेच उत्तम, Live and let them leave happily is the essence of life..
खूप छान लेख, सर
BWER is Iraq’s go-to provider for weighbridges, ensuring durability, accuracy, and cost-efficiency in all weighing solutions, backed by exceptional customer support and maintenance services.
BWER Company provides Iraq’s leading-edge weighbridge solutions, designed to withstand harsh environments while delivering top-tier performance and accuracy.
Thanks for your comments Mishra Mam.