आव्हान

आव्हान

मी दिला सोडुनी परिचित रस्ता, दिली सोडून जुनी वहिवाट
स्विकारले स्वतः खुले आव्हान, नवे करण्याचा घातला घाट

दिली सोडून शहरी नोकरी, मनी केला एक निश्चय, संकल्प
धाव घेतली गावाकडे, करायचा होता शेताचा कायाकल्प

मज पाहून राबताना, मित्र भेटूनी जाता जाता हिणवती
म्हणती खुळ लागले तुला, चार दिवसात जिरेल हो मस्ती

बा म्हणे शिकवले कर्ज काढूनी, का ओढून घेतो स्वतः घात
परी विश्वास मनाशी होता, काळीच देईल मज मदतीचा हात

ठरवून मनाशी काही, फिरवला ट्रक्टर चौफेर, खोल शेतात
घालून शेणखताचा भराव, भांगलण करून घेतली हातोहात

घेतला नवीन बोअर शेतात, पाणी साठवले शेत तळ्यात
पाडुनी सऱ्या उभ्या आडव्या, ठिबक बसवले शिवारात

बिज आणूनी निवडक भले, सरीवर मंचींग स्वतः अंथरले
वाफसा मातीस येता मृदू गंध, बीज हात, हातावरी लावले

वाढवले श्रीफळ, केले ठिबक सुरू, दिल्या पाण्याच्या पाळ्या
चार दिसात नादावले बीज, फुटुनी वेली, आकाशी झेपावल्या

दिवस उगवे शेतात माझा, होतसे सूर्यास्त नित्य केळीच्या बागेत
डोळ्यात होते स्वप्न माझ्या, डोलू लागले पिक निबीड ओस जागेत

हसू लागली सुर्यफूले इथे,पलीकडे डाळींबाच्या कलमास खुळा बहर
शुभ्र फुले दुधीच्या वेलीस, हिरवी गार काकडी, लागो न कुणाची नजर

कोथिंबीरीचा, नाकात गंध, टोमॅटोचा तांबडा रंग, सारा मळा फुलण्यात दंग
मला आठवले सावत्याचे शब्द, शेतात पक्षी नित्य गाती विठ्याचा अभंग

थकून भागून जेव्हा मी जातो दुपारला घरी, आई देते पिठलं भाकरी
बा हसून म्हणतो, मर्द हायस गड्या, तुझं खरं, नकोच कुणाची चाकरी

मनापासून काळ्या आईची केली सेवा, तर ती देईलच माणक मोती
शहरात फ्लॅट, गाडी, असलं सगळं, पण माणसात आहे कुठं निती?

आलास हितं, जोडलं नातं, ही भूमी गाईल तुझ्या कष्टाची महती
भले बहाद्दर! तुझी जिद्द आवडली, तू माझ्या कुटुंबाची शक्ती

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “आव्हान

  1. सागर सिद्धू पाटील
    सागर सिद्धू पाटील says:

    मस्त कविता सर, शेताची उबेउब वर्णन कवितेत केलेली आहे, कविता वाचताना नांगरणी पासून ते पीक काढणीला येऊ पर्यंत चा प्रवास डोळ्यासमोर तरंगतो .जे शेतात काम करणे कमी पणाचे समजतात त्यांना ही कविता वाचून नक्कीच चांगली प्रेरणा मिळेल. ते पण आनंदाने शेती पिकवतील. धन्यवाद सर

  2. Neha tendolkar
    Neha tendolkar says:

    सध्याची युवा पिढी नोकरीच्या शोधात मुंबई कडे येते.
    बारा बारा तास काम करून महिना 10ते 12 हजार रुपये कमवतात. ते सुद्धा पुढच्या महिन्यात नोकरीला तिथे रहातील त्याची शाश्वती नसते.
    गावी कित्येक एकर शेतजमीन असूनही शेती करणे पसंद नसते.
    अश्या युवक मंडळींसाठी हे आव्हान चं आहे.
    छान सुंदर कविता, समर्पक शीर्षक,दादा

Comments are closed.