आहे मनोहर तरी
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री चा हात असतो असे म्हटले जाते पण अशा यशस्वी पुरषांच्या मागे ठाम असणाऱ्या फारच थोड्या सौभाग्यवतींच्या जीवनात भाग्याचा दिवस येतो, जेव्हा त्यांचे जाहीरपणे कौतुक केले जाते. इतिहास त्यांच्या नावाची दखल घेतो. जिजाबाई, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, लक्ष्मीबाई अर्थात तांबे यांची मनू, राणी ताराबाई, डॉ.आनंदी जोशी, सावित्रीबाई फुले आणि काही मोजक्या यांनाच महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात ते स्थान मिळाले. गोदाताई परुळेकर आणि अनुताई वाघ यांचे कार्य ठाणे जिल्ह्यात सीमित असल्याने त्यांच्या बद्दल इतर कोणाला माहिती असणे शक्य नाही. मग त्यांच्या कार्याचे कौतुक करणे दूरच राहिले. त्यामानाने सिंधुताई सकपाळ यांच्यावर चित्रपट निघाल्यामुळे आणि माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळाल्याने त्या आणि त्यांचे अनाथ आश्रम आणि परित्यक्ता महिला याचे काम समाजाला कळाले आणि त्या प्रकाश झोतात राहिल्या.
राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ,अहिल्याबाई होळकर राणी, सावित्रीबाई फुले यांचे मुबंई, दिल्ली, अन्य राज्यात तसेच राज्यात अनेक ठिकाणी शासनाने स्मारक बांधून त्यांचे दिर्घकाळ स्मरण व्हावे अशी तरतूद केली आहे. हे भाग्य डॉ.आनंदीबाई जोशी व इतर मान्यवर महिलांच्या वाट्याला आले नाही. भविष्यात या सन्माननीय महिलांबाबत पूढील पिढी किंवा समाज अनभिज्ञ राहिलं.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या शुर विरांनी आणि क्रांतिकारकांनी उडी घेतली होती. या संग्रामात उडी घेण्यापूर्वी आपल्या पत्नीची संमती घेतली होती किंवा कसे याचे फारच थोडे विश्वासार्ह पुरावे मिळू शकतील. देशासाठी स्वतः त्याग करतांना आपल्या पत्नीलाही आपण सक्तीने या कार्यात ओढून घेत आहोत याचा विचार अभावानेच या देशभक्त क्रांतीकारकांना आणि स्वातंत्र्य विरांना सूचला असावा. टिळक, चाफेकर असो की, सावरकर जेव्हा स्वतः भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले तेव्हा त्यांच्या घरातील संसाराची जबाबदारी पेलण्यासाठी घरी कुणी पुरुष मंडळी नव्हती. टिळकांची लोकप्रियता पहाता त्यांच्यासाठी कोणीही मदतीचा हात पुढे केला असेल पण अनंत कान्हेरे किंवा इतर क्रांतीकारकांचे काय? त्यांच्या घरातील महिलांना इंग्रजांच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागले. छळ सहन करावा लागला आणि कमावत कुणी घरात नसल्याने त्या संसाराच्या गरजा भागवतांना मेटाकुटीला आल्या. याच बरोबर मानसिक कुचंबणा झाली ती वेगळीच. घरात कर्ता पुरुषच नसल्याने सामाजिक बंधनात जगाव लागल ते वेगळच.
आपण सर्व क्रांतिकारकांचे गोडवे गातो परंतु त्यासाठी महिलांनी केलेला त्याग विसरून जातो. इतिहास या महिलांची, त्यांनी झेललेल्या कष्टाची, त्यानी झेललेल्या अपमान आणि मानसिक छळाची कुठेच नोंद घेत नाही. पुरुष प्रधान संस्कृती आणि समाजाची बंधन यामुळे त्यांनी आपल्या नवऱ्याने झटकून टाकलेल्या जबाबदारीची कधीही वाच्यता केली नाही. याचा अर्थ त्यांना नवऱ्याने गृहीत धरणे मान्य होते असे म्हणता येत नाही. त्यांची कुचंबणा आणि वेदना कधी समाजापुढे आलीच नाही हीच ती शोकांतिका. महाराष्ट्रात कोणत्याही महिला लेखीकेचे ऐतिहासीक युगपुरुष, स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारकांच्या महिलांबाबात किंवा त्यांनी सोसलेल्या कष्टाबाबत लिखाण मग ते ललित कथा किंवा कादंबरीच्या स्वरूपात माझ्या वाचनात आलेले नाही.
श्रीमती सुनीता पुरूषोत्तम देशपांडे, अर्थात सुनिता बाईंचं, पुस्तक, “आहे मनोहर तरी” वाचतांना पुलं अर्थात भाईनी सुनीता यांना गृहीत धरलं होत असे वाचतांना पदोपदी जाणवत राहते. भाईंचे सततचे लिखाण, संगीताच्या मैफिली, नाट्यप्रयोग यामुळे सुनीता बाई यांना भाईंचं वेळापत्रक सांभाळता सांभाळता स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली नाही. भाईंच्या उत्तुंग व्यक्तित्वापुढे सुनिता बाईंच कर्तृत्व झकोळून गेलं. याचाच अर्थ सुनिता देशपांडे सारख्या रोखठोक स्वभावाच्या महिलेलाही आपल कर्तृत्व सिद्ध करण्यासत अडचण आली तिथे सामान्य गृहिणींची काय कथा. चंद्र दुरून मनोवेधक दिसला तरी जवळ जाणाऱ्या व्यक्तीलाच त्याची सत्यता पटते.
लग्न करून स्वतःच हक्काचे घर सोडून आलेल्या महिलेला स्वतःच अस्तित्व, स्वतःची ओळख पुसून नवऱ्याच्या संसारात समर्पण बुद्धीने झोकून द्यावं लागतं. स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून नवऱ्याला काय आवडेल आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य काय म्हणतील? याचा विचार करत, भित भित जगावं लागत. या वेळेस नवरा आणि सासू यांना समाधानी ठेवण्यासाठी जी तारेवरची कसरत करावी लागते त्याला काही तोड नाही. बरं इतकं करून स्त्रीच कौतुक झालं तर निदान समाधान वाटेल पण पुरुषांच्या राज्यात ते ही मिळणं कठीण. आजही अनेक महिलांना या अडचणीतून जावं लागतं.
तिला मातृत्व हवं की नको याचा विचार ना तिच्या माहेरची मंडळी करतात ना तिच्या सासरची किंवा घरची. तिने मुलं जन्माला घातलचं पाहिजे हा जणू अलिखित नियम होऊन बसतो. यात तिच्या मर्जीचा भाग येतो कुठे ? ही तर जगरहाट आहे असं तिला ऐकवलं जातं. तिला मुलगा व्हावा की मुलगी हे ही तिच्या घरचे ठरवतात. तिला मुलीची आवड असली तरीही जर तिच्या पोटी वाढणारा गर्भ मुलीचा असेल तर सक्तीने गर्भपात घडवून आणतात.
म्हणजे लग्न होण्यापूर्वी तिने कसं वागावे,कोणते कपडे घालावे, मित्रमैत्रिणींशी बोलावं की बोलू नये ही घरातील आणि सामाजिक बंधने आणि लग्न झाल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांचा जाच. या दुहेरी संकटाचा तिला सामना करावा लागतो. तिचा किती मानसिक कोंडमारा होत असावा? मात्र अगदी तिचा नवरा मानसशास्त्राचा प्राध्यापक असला तरी यातून तिची सुटका नसते. तिच्या साठी ती एक प्रथितयश प्राध्यापकाची बायको आहे, हे लेबलच तिच्यासाठी पुरेसं आहे असा बुद्धिभेद तिची आई किंवा अगदी मैत्रिणी करून देतात. अर्थात यालाही अपवाद असावा, नाहीच असे नाही पण याचे प्रमाण एक टक्का तरी असावे की नाही! कुणास ठाऊक.
लग्न होऊन सासरी जातांना तिला भविष्यात कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे आणि कोणत्या गोष्टीत तडजोड करावी लागणार आहे याचं प्रवचन आईच देते. “मुली हा रिवाज आहे, सासूला आई मान, सासऱ्यांना बाबा, नंणदेला मोठी बहीण मान अन दिराला पाठचा भाऊ, उलट उत्तरं देऊ नको, मान खाली घालून स्त्रीने राहावं. आत्मसन्मान राखण्याविषयी आई सांगत नाही. दिल्या घरी तू सुखी राहा हे सांगताना हे घर तुझं आहे, तुला हवं तेव्हा इथे ये हे सांगितलं जातं नाही. स्त्री हे दुसऱ्या घरचे धन हे सांगून तिची बोळावणी केली जाते. हीच आपल्या समाज व्यवस्थेतील चूक आहे. म्हणूनच कुटुंबात स्त्रीचा आदर राखला जात नाही.
आज स्त्री शिक्षण, नोकरी, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे मात्र एकोणिसाव्या शतकात फारच थोड्या महिला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होत्या. त्यापूर्वी तर त्यांनी घराचा उंबराही ओलांडलेला नसे. स्वातंत्र्य संग्रामात जेव्हा हे देशभक्त, क्रांतीवीर आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन देशकार्य करण्यासाठी निघून जात होते तेव्हा आपला प्रपंच निट चालावा याची तरतूद करून गेल्याचे फारच थोडे संदर्भ सापडतील. बरेच वेळा आपली पत्नी आजारी असतांना किंवा गरोदरपणात अवघडली असतांना या वीर पुरषांनी तिच्या एकटीवरच संसाराचा भार टाकून ते निघून गेल्याचे दिसते. या स्थितीत स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही फार मोठा फरक पडला नव्हता.
स्त्रीचा विचार न घेता भाराभर मुलांचं मातृत्व तिच्यावर लादणे हा अन्यायाच होता पण ती दाद फिर्याद कोणाकडे करणार? तिच्या माहेरी, तिच्या आईची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. एकोणिसाव्या किंवा अगदी विसाव्या शतकातही वकील किंवा शिक्षक पेशातील महोदयांना तसेच स्वतःला सुधारक म्हणविणाऱ्या पुढाऱ्यांना सात सात मुले असत. मुलीच लग्न होत असतांना हे महाशय शेवटच्या मुलाची, कुलदिपकाची वाट पहात,पत्नीवर गर्भारपण लादत होते तर इतर समाजाचं काय?
शिवाजी जन्माच्या वेळेसही शहाजी महाराज शिवनेरी गडावर नव्हते. शहाजी, आदिलशाही दरबारात आणि नंतर निजामाच्या चाकरीत असतांना जिजाबाई आपल्या पुत्राचा सांभाळ एकट्या करत होत्या. आपल्याला सवत आहे आणि शहाजीराजे तेथेच जास्त काळ रमतात, आपल्या मुलाला त्यांचा सहवास मिळत नाही हे जाणवत असुनही घुसमट सहन करत तिने एकटीने शिवाजीच्या पालन पोषणाची जबाबदारी पार पाडली. येणाऱ्या संकटांना तोंड दिले. या बाबत त्यांनी कधीही तक्रार केली नाही. इतकेच नव्हे तर हिंदवी स्वराज्य उभे करण्याचे स्वप्न उरी बाळगले आणि त्यासाठी अपार कष्ट केले.
संभाजी राजांचा जन्म झाल्यावर सईच्या मृत्यूमुळे पोरक्या झालेल्या संभाजीवर छत्र धरून मोठे केले. त्यांच्या वाट्याला जे दुःख आलं ते अनेक स्त्रियांच्या वाट्याला आले. अर्थात त्या जिजाऊ होत्या लखुजी जाधवांच्या मुशीत तयार झाल्या होत्या. संकटाचा सामना करून मजबूत झाल्या होत्या पण पती विरहाचे चटके त्यांनाही सहन करावे लागले. त्यांचे दुःख, ही वेदना जाहीरपणे कोणी मांडली नाही. समाजाने त्यांना मोठेपणा दिला तो त्या कोणातरी महत्त्वाच्या व्यक्तीच्या पत्नी होत्या म्हणून नव्हे तर त्यांनी हे स्वराज्य उभारण्यास शिवबास मदत केली म्हणून. त्या काळी आपल्या दुःखाची जाहीर वाच्यता करु नये अन्यथा समाजात पुरुषाला कमीपणा येतो असा ठाम समज होता. जिजाऊंचं स्मारक झालं, त्यांना इतिहासात स्थान मिळालं पण महाराष्ट्रात अशा अनेक जीजाऊ आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला कोणी वाचा फोडलीच नाही.
स्त्री ची वेदना मांडण्याचा प्रयत्न फारच थोड्या महिलांनी केला त्यातील आनंदीबाई जोशी, सुनिता पुरुषोत्तम देशपाडे बेबी कांबळे, उर्मिला पवार, ज्योत्स्ना भोळे, माधवी देसाई, दुर्गा खोटे, हंसा वाडकर, मेधा पाटकर अशी काही ठळक नावे सांगता येतील. डॉक्टर राणीताई बंग यांनी अल्पवयीन मुलींची लग्न आणि त्यांच्या समस्या, बालमृत्यू या बाबत भरपूर जागृती केली. आपले मत सरकार दरबारी मांडले. आज महाराष्ट्रात आशा सेविका ग्रामीण भागातील महिला व लहान बालके यांची काळजी घेतात. ह्या आशा सेविका नेमण्यात राणीताईंच योगदान आहे. निर्भीड व्यक्तिमत्व असल्याशिवाय आपले प्रामाणिक मत मांडता येत नाही.
हंसा वाडकर यांचा “सांगते ऐका” हा चित्रपट, हेच एक आत्मचरित्र आहे, त्या आतेच्या सांगण्यानुसार चित्रपटात आल्या पण त्यांना चित्रपटात काम करायचे नव्हते केवळ नवऱ्याच्या अट्टहासापायी त्यांना चित्रपट करावे लागले. बऱ्याचदा स्त्री कर्तबगार असली तरीही पुरुषी अहंकारपुढे तिचे चालत नाही आणि त्यामुळे जी कुचंबणा होते ती हंसा वाडकर यांनी, “सांगते ऐका”, चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदीबाई जोशी या मात्र बंडखोर प्रवृत्तीच्या असल्याने त्यांनी परदेशी जाऊन शिक्षण पूर्ण केलं. पुरुषांच्या आधाराशिवाय स्त्रीच्या व्यक्तीमत्वाला परिपूर्णता येत नाही हा समज खोटा ठरवला.
स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला आली तरी तिला वारंवार तू मुलगी आहेस मुलासारखी वावरू नको अस वारंवार तिच ब्रेनवॉश केलं जातं. तिलाही स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे नाकारले जाते. म्हणून मुलगी सात आठ वर्षाची झाली की तिला समान न समजता तिच्यातील स्त्रीत्वाचा शोध समाज घेतो. शाश्वत स्त्रीत्व ही पुर्वग्रहदूषीत संकल्पना आहे.
युसुफ इस्माईल मधला “दिलीप कुमार” सेलिब्रिटी बनला सायरा बानूला काय मिळाले? तिने तर त्याग केला. आता तिची कोणी आठवणही काढत नाही. ही मानसिकता बदलणार कधी? महिला सशक्तीकरण, महिलांना राजकारणात, नोकऱ्यात, स्थानिक स्वराज्य संस्थेत ५०% आरक्षण या गोष्टी कागदोपत्री झाल्या. आजही महाराष्ट्रातील अनेक खेडे गावात, ग्रामपंचायत निवडणुकीत महिला निवडून आल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे नवरे ग्रामपंचायत खुर्ची उबवतात. अगदी ग्रामसभेची बैठक किंवा झेंडा वंदन पुरुष मंडळीच करतात. काही दशकांपूर्वी मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यांच्या सारख्या अनेक महिलांनी सामाजिक कार्यात भाग घेऊन स्वतः ची छाप पाडली तरीही जी प्रसिद्धी पुरुष नेतृत्वाला मिळते तशी प्रसिद्धी महिला नेतृत्वाला मिळत नाही.
अलीकडच्या काळात, ममता बँनर्जी, सुषमा स्वराज, नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर, मीरा बोरवणकर, किरण बेदी अशा काही मोजक्या महिलांनी राजकारणात स्वतःचे स्थान बनवले आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या या वाटचालीत कुठेही त्यांच्या नवऱ्याचा हस्तक्षेप झाल्याचे वरकरणी दिसत नाही. अशिक्षित घरी स्त्रीवर अन्याय होतो आणि सुशिक्षित घरी ती सुरक्षित असते असा समज बरोबर नाही. कित्येकदा उच्चशिक्षित कुटुंबात तिचा जास्त छळ होतो. अगदी माझ्या घरातही माझी पत्नी किंवा मुलगी यांनी घेतलेले निर्णय शंभर टक्के मला पटतातच असे नाही. वादविवाद झडतात, त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे हे पटे पर्यंत मी माझे म्हणणे रेटत असतो पण त्यांची बाजू योग्य आहे हे समजले तर माघारही घेतो. यात अपमान झाला असे मानले
नाही तर समस्या निर्माण होणार नाही. असो, तात्पर्य, पुरुषांच्या मानसिकतेवर आता स्त्रियांनी ठाम राहिले पाहिजे.
राजकरणात, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, मायावती, ममता बॅनर्जी, शीला दीक्षित, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, सुप्रिया सुळे, वृन्दा करात, अंबिका सोनी, सुमित्रा महाजन, या महिलांनी आपले करिअर केले. मुख्य म्हणजे पुरुषाच्या पाठिंब्याशिवाय त्यांनी राजकारणात वेगळी उंची गाठली हे नमूद करावेच लागेल. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात इंदिरा नूई, सुधा मुर्ती, अनिता डोंगरे यासारख्या महिलांनी, काही मोठ्या कंपनीच्या पटलावर स्वतःचे स्थान निश्चित केले आहे ही आशादायक बाब आहे. चित्रपट क्षेत्रातही ज्या महिलांनी चित्रपट व्यवसायाशी कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतांना स्वतःचे स्थान निर्माण केले त्या महिलांमध्ये कंगना राणावत हिचा उल्लेख होऊ शकेल. क्रीडा क्षेत्रातही सुपर मॉम मेरी कोम, सायना नेहवाल, वेट लिफ्टर मल्लेश्वरी,अंजू बॉबी, पी टी उषा, हरमन प्रीत कौर यांचा उल्लेख टाळता येणार नाही. मेरी कॉम हिच्या घरातील परिस्थिती पहिली तर तिच्या खिलाडू वृत्तीला सलाम करावाच लागेल.
मेरी कॉम यांना तीन मुले आहेत आपला प्रपंच सांभाळून ती स्पर्धेत भाग घेते. मुख्य म्हणजे मेरी कॉम हिचे वडील गरीब शेतकरी होते. बॉक्सिंग क्षेत्रात जे यश तिने संपादन केलं ते स्वत:च्या मेहनतीवर केलं. महिला विविध क्रीडा प्रकारात आघाडी मिळवत आहेत ते पाहता त्यांच्या लढवय्या वृत्तीला सलाम.
मित्र आणि मैत्रिणींनो महिला सशक्तीकरण, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री हक्क या विषयी खूप बोलले जाते. महिलांसाठी त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्वतंत्र महिला आयोग आहे, चित्रा वाघ, श्रीमती विजया रहाटकर, रूपाली चाकणकर अशा महिलांनी त्याचे अध्यक्षपद भुषविले आहे पण त्या आयोगाच्या सूचनांची दाखल घेत अंमलबजावणी झाली तरच उपयोग. असो फक्त वर्तमानपत्रात किंवा माध्यमातून लेख लिहून महिलांना सन्मान मिळणार नाही, आपल्या हक्कांची जाणीव प्रत्येक महिलेला होणे आणि त्या साठी ती जागरूक असणे गरजेचे आहे.
प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील महिलेला सन्मानाने वागवले तिला त्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही किंवा घुसमट सहन करावी लागणार नाही याची काळजी घेतली तर, “आहे मनोहर तरी” असं लिहिण्याची पाळी येणार नाही. गंमतीचा भाग असा की काही महिला पूर्ण घराची सूत्रे हातात घेतात आणि मनमानी करतात, अशा घरातील सर्व कुटुंबाला त्या महिलेच्या तालावर नाचवे लागते. तेव्हा महिला सबलीकरण, सशक्तीकरण होणे अतिशय गरजेचे आहे मात्र “अति सर्वत्र वर्जयेत्” ही बाब सुद्धा महिलांनी लक्षात घ्यावी. तेव्हा, “आहे मनोहर तरी” अशी टिप्पणी नंतर करण्या ऐवजी प्रत्येक महिलेने पालकांना दोष देण्यापेक्षा स्वतःला आवडेल त्या शाखेचे शिक्षण, आवडेल त्या शाखेत स्वतःचे करिअर करावे. स्वतः स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे.
खूप छान लेख,
स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचारचे चक्र
अगदी मुलगी आईच्या पोटात असलेपासून (वृध्दाश्रम) मरेपर्यंत चा हिंसाचार
यातून प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे.
लेखात सर्व समाजातील सर्व काळातील स्त्रिया ओढून ताणून आणून बसवल्या आहेत.
प्रत्येक समाज व काळातील स्त्रिया त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांची भव्यता त्यांच्या मनातील सल, त्यांना वाटणारे अन्याय हे वेगवेगळे असतील.
जसे स्त्रियांवरती अन्याय होतात तसे पुरुषांवरती सुद्धा होत असतील.
जिजाबाईंचे पती गनिमाची चाकरी करत होते. माझ्या अभिमानाला ठेच पोहोचली असे जिजाबाईंनी म्हटलं नाही. तिने साम्राज्य उभा केल. शिवबा घडवला.
जो तो आपल्या परीने जगत असतो. जो जागरूक असतो तो या ना त्या पर्यायाने समाजाला घडवत असतो.
ज्याला रडायचं तो रडतच राहतो.
अन्याय अन्याय म्हणून छाती पिटतच राहतो. जो तो आपल्या जागी सुखी असतो आम्हालाच वाटत राहतात की त्याच्यावर/तिच्यावर न्याय झालाय. काही ठिकाणी स्त्री ही घरातच अपेक्षित असते समाज बांधण्यासाठी तिची कुटुंबात घरात गरज असते.
उद्या कोणीही उठेल आणि मला पंतप्रधान व्हायला मिळालं नाही माझ्यावर खूप अन्याय झालाय म्हणून गळा काढेल.
व्यक्ती ऐवजी समाजाचा विचार करायला आम्ही कधी शिकणार माहिती नाही. समाजाच्या गरजेसाठी म्हणून मी या जगात आलो आहे असा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला हवा….