उशीराच सुचतंय तरीही भाग २
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जेव्हा आम्ही पालकांच्या भूमिकेत शिरलो तेव्हा आमचे अनुभव आणि आमच्यावरील संस्कार हे आमच्या पालकांचे आणि शाळेचे होते परिणामी त्याच तराजुनी आम्ही आमच्या मुलांचे मूल्यमापम करत गेलो. मुलांची आवड न लक्षात घेता त्याच्या वाढीसाठी आम्हाला जे अन्न आवश्यक वाटले आणि परवडले तेच अन्न सात्विक समजून त्याला देत होतो. आमच्या मुलांनी ना कधी हट्ट केला ना स्वतः आम्ही त्यांना काही विशेष दिले. आमच्या मुलांच्या मागण्याही फारशा नव्हत्या. ज्या होत्या त्याच आम्हाला आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे जास्त वाटतं. पालक म्हणून आम्हाला ज्या गोष्टी सोयीच्या वाटतील किंवा परवडतील त्याच गोष्टी त्यांना दिल्या. त्यांच्या प्रगतीसाठी आमची भूमिका महत्त्वाची होती असा आमचा समज होता, यासाठी अभ्यासाचं स्वतःच एक वेळापत्रक ठरवून त्या त्या वेळेस ते ते विषय आमच्या कुवतीप्रमाणे शिकवत होतो. त्या वेळात त्याला अभ्यास करण्याचा मुड आहे की नाही याची तमा केली नाही. जर मनच ताळ्यावर नसेल तर पुस्तकात डोक घालून किंवा आम्ही जबरदस्ती करून त्याला कळणार नाही हा विचार तेव्हा मनाला शिवलाच नाही.
“बाबा वाक्य प्रमाण” समजून मुलं नाराज असली तरी विरोध न करता अभ्यासाला बसत होती. सातवी पर्यंत तरी हा रिवाज सुरू होता. जशी मुलं वरच्या वर्गात गेली तसे आम्हा पालकांचे ज्ञान तोकडे पडू लागले. आम्हाला आमच्या मर्यादा कळून आल्या. याच काळात शिकवण्याच्या पध्दतीत बदल झाला. अर्थात शाळेत शिकवण्याची पध्दत आणि पालकांची शिकवण्याची पध्दत यात फरक तर पडणारचं होता. यामुळे आई बाबा जवळ बसून शिकण्यात मुलांचा इंटरेस्ट वाढत्या वयाबरोबर कमी होत गेला. क्लासमध्ये एकत्र बसून अभ्यास केला तर त्यांना विषय लवकर समजेल, चढाओढीने मुलं अभ्यास करतील असा आमचा समज होता, शेजाऱ्यांनी आणि जवळच्या नातलगांनी आम्हाला नावं ठेऊ नये की मुलांना क्लासला घालण्याची यांची ऐपत नाही म्हणून मुलांना मोठ्या क्लासला घातलं. अर्थात तो समजही चुकीचा असल्याचे कालांतराने समजले. अर्थात दोष आमचाच होता.
मुलांनी काय आणि कधी खेळायचं हे जरी आम्ही ठरवल नव्हते तरी मैदानी खेळ खेळावे यासाठी आमचा आग्रह होता.सातच्या आत घरात असा खाक्या तेव्हा होता. पर्वचा-उजळणी दररोज म्हणण्यावर आमचा कटाक्ष होता.
आज आई बाबा हे घरी येईपर्यंत त्यांची ऊर्जा संपलेली असते,ते पर्वचा, उजळणी आणि होमवर्क याला वेळ कुठून आणणार? म्हणूनही संयुक्त कुटुंब चांगलं की स्वतंत्र घर,आणि स्वातंत्र्य खरंच हवंय का? सासू सासरे किंवा modern भाषेत “Old Furniture” नको ह्या भूमिकेचा तरूण जोडप्यांनी नक्की विचार करावा. संयुक्त कुटुंब असेल तर तुमच्या मुलांवर आजी-आजोबा, आत्या, काकी कोणीतरी लक्ष ठेवेल, मुलांचा अभ्यास घेईल हा फायदा आजची तरुण जोडपी का बरे लक्षात घेत नाही?
ज्या घरात आई आणि बाबाच ऑफिसमधून उशीरा घरी येतात त्यांना मुलांना क्लासला पाठवण्या शिवाय गत्यंतर नाही. आता तर नोकरी करणारे पालक घरी आल्यानंतरही कामासंबंधी सहकाऱ्यांशी मोबाईलवर बोलत असतात. बरेच पालक आल्या पासून मोबाईलवर असतात आणि दिवसभराचा बॅकलॉग भरून काढत असतात. जर पालकच मोबाईलवर असतील तिथे मुलांच्या मोबाईलवर बंदी कुठून आणणार? यथा राजा तथा प्रजा ही म्हण आहेच. शिवाय मुले आपला क्लास आणि इतर ऍक्टिव्हिटी संपवून सात वाजता घरी आल्यानंतर खेळणार कधी? तोवर बाहेर अंधार झालेला असतो मग मोबाईल हाच मित्र,त्याच्या सानिध्यातच खेळ, एका जागी बसून आणि त्या स्क्रीनवर सतत पाहून शिण येणारच पण ऐकंतय कोण?
आमच्या मुलांना सातवी आठवी पर्यंत पत्ते माहिती नव्हते किंवा पत्ते खेळणं वाईट असं आम्ही बिंबवलं होतं. फारच फार तर सापशीडी पर्यंत येऊन गाडी थांबायची. आताची दुसरीतली मुल मोबाईलवर मलाही माहिती नसलेले अनेक गेम आणि लुडो, मेंढीकोट असे खेळ आपल्या पालकांसोबत खेळतात. मोबाईलवर पब्जी किंवा हवा तो गेम डाउनलोड करून पाहतात. आता या युगात त्यांनी अधिकच smart असणं ही गरजच आहे म्हणा. करोना काळात त्यांनी मोबाईलशी चांगलीच दोस्ती केलेली आहे आणि आता मुलांनाही मोबाईल पालकांइतकाच अपरिहार्य वाटतो. आताच्या मुलांचं हे स्वातंत्र्य पाहता आम्ही आमच्या मुलांवर “हिटलरगिरी” केली अस म्हणायला वाव आहे.
आम्ही पालकाच्या भूमिकेत असताना अर्थार्जन मर्यादित होत, शिकवणी फी परवडणार नव्हती आणि आमच्याकडे वेळीही होता. जेवढ आपल्याला येतं तेवढे शिकवण्यास काय हरकत? म्हणून मुलांचा गृहपाठ घ्यायचो, तेव्हा एखादा इंग्रजी धडा शिकवतांना किंवा गणित शिकवतांना बाबा अडला तर, मुलांनाही छान वाटायचं, म्हणजे आपला बाप काही सुपरमॅन नाही तर! मुलं बाबाच्या तोंडाकडे पहात असत आणि आम्हाला आमच्या मर्यादा कळून येत. त्यांच्या चेहऱ्यावर पूढे काय? किंवा बाबा आता पूढे काय? असा अविर्भाव दिसत असे. पण तसे बोलण्याची हिम्मत तेव्हा मुलांच्यात नव्हती किंवा ते स्वातंत्र्य त्यांना नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता आताच मला नेमक कस येत नाही अस वाटून स्वतःचा राग येत असे. आणि अपराधीपणाची भावनाही मनात असे. आपण यांना बऱ्याचदा निक्षून सांगतो, “अर्ध्या तासात हा एक्सरसाईज पूर्ण व्हायला पाहिजे, टवाळ्या करत नाही बसायचं. मी आंघोळ करून येण्यापूर्वी अभ्यास झाला पाहिजे, ते किती योग्य? यांनाही होमवर्क करतांना आपल्या सारखीच अडचण येत असणार, मग आपण हे का गृहीत धरत नाही? मुलांजवळ ढीगभर अपेक्षा बाळगताना या वयात आपण नक्की काय साध्य केलं होतं हे आपण मोठी माणसं का बरं आठवत नाही?
आज सिनिअर केजी मधल मुलं ट्युशनला जातं, याचं कारण या मुलांना काय? किती? आणि कस? शिकवावं याचे ट्रेनिंग आई बाबांचे झालेले नसते. मुख्य म्हणजे स्मार्ट मॉम -डॅड कडे त्यांच्या बिझी शेड्युल मध्ये वेळ नसते. म्हणूनच या मुलांच्या मनात बरेच काही अव्यक्त असं साचलेलं असतं, व्यक्त होण्यासाठी घरात आजी आजोबाही नाहीत आणि समवयस्क मित्रही नाहीत. ही कुचंबणा पालकांना कळत नाही.
शाळेच्या किंवा इतर परीक्षेत मिळलेल्या गुणांच्या बाबतीत तेच,आमची अपेक्षा ही नेहमी त्यांच्या क्षमतेपेक्षा मोठी असे, कोणाशी तरी स्पर्धा किंवा आमचीच मुलं पुढे हवी या अपेक्षेपायी कितीही चांगले गुण मिळाले तरी आमचं समाधान होत नसे. पालक म्हणून मुलांकडून नको ती अपेक्षा करणे नक्कीच चूकच. पालक म्हणून हा विचारही मनी आलाच नाही की कोणत्या परीक्षेत इतके चांगले गुण “मी” मिळवले होते का?कोणत्या अधिकारात मी मुलांजवळ अपेक्षा बाळगावी? पण त्याऐवजी आम्ही मुलांना म्हणत असू,” आमच्या वेळी शिकवण्या नव्हत्या की गाईड नव्हते बरं, तुम्हाला आम्ही सर्वच देतो मग गुण नको मिळवायला?” अशा लंगड्या सबबी आम्ही सांगितल्या असाव्यात. अर्थात पालक म्हणून ही सोयीस्कर पळवाट होती. तेव्हाही आत्मपरिक्षण करणे गरजेचे होते. या बाबतीत आमची चूक झाली हे खरेच.
मुलांना शिकवतांना शिक्षक किंवा पालक नव्हे तर त्याच्या वयाचा त्याचा मित्र बनून त्याला शिकवले तरच त्याला विषय समजणे सोप्पे होईल. “आधी केले मग सांगितले.” या उक्तीनुसार पालकांनी मुलांचा अभ्यास किंवा गृहपाठ घेण्यापूर्वीव स्वतः ही नवीन पाठयक्रम पुस्तके डोळ्याखालून घालावी त्यानंतरच मुलांसोबत बसावे अन्यथा, “डॅड एवढं साध तुला येत नाही? कमाल आहे अगदीच मंद आहेस.” अस आताच्या मुलांनी म्हटलं तरी आश्चर्य वाटणार नाही. या मुलांसमोर बोलतांना आपण आत्मभान बाळगले नाही तर ते तुमची आणि आलेल्या पाहूण्याची कधी विकेट घेतील सांगता येणार नाही.
अर्थात आताचे काही पालक आपल्यापेक्षा जास्त जागृत आहेत स्वतः मुलांच्या अभ्यासाची तयारी करून घेतात, त्यासाठी वेळ देण शक्य नसेल तर पैसे मोजतात.आपलं मुलं वर्गातील इतर मुलापेक्षा पाठी असू नये किंवा आपलंच मुलं पुढे असावं त्याच नाव फलकावर लिहिलं जावं आणि आपल्या मैत्रिणीला ते दाखवता यावं असा सगळा अट्टहासाचा परिपाक असतो.
विशेषतः कोणतीही स्पर्धा असली किंवा हस्त कौशल्य किंवा क्राफ्ट असल की पालक स्वतः त्याच्या वस्तू बनवण्यात सहभाग घेतात मात्र या वस्तू पालकांनी बनवून देणे अभिप्रेत नाही. गुणांची शर्यत नको तर मुलांची मानसिक घडण महत्त्वाची आहे. हा उपक्रम माझा आहे, मी बनवेन, भले तो वीस टक्केच जमला तरी चालेल. शिक्षकांनी चांगल्याच प्रकल्पाच कौतुक न करता ज्यांनी स्व प्रयत्नांने बनवले असेल अशा फसलेल्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले आणि कौतुका पाठचे कारण सांगितले तर मुलांना स्वतःची वस्तू स्वतः बनवण्याची आपोआप प्रेरणा मिळेल.
बऱ्याचदा आपण आमच्यावेळी असं होत,किंवा माझे बाबा आम्ही काही मागीतल तर अस म्हणायचे अस पालुपद लावतो,साहजिकच मुलं म्हणणारच “बाबा ती गोष्ट तुमच्याकडून शंभर वेळा ऐकली असेल आता काही नवं असेल तर सांगा.” म्हणून आगतीक होऊन किवा भावनेच्या भरात मुलांना जुने संदर्भ देण शक्य तो टाळावं, अर्थात ही समज मलाही मुलं मोठी झाल्यावर आली, जेव्हा गमतीने म्हणू लागली की बाबा तुम्ही पुन्हा पुन्हा तीच कथा सांगता. आपण त्यांना गुणाविषयी प्रोत्साहित करावे पण इतकेच गुण कसे? किंवा तुझ्या मित्राला किती गुण मिळाले? आणि मित्राचे गुण जास्त असतील तर तू का पाठी पडलास? असे चुकूनही विचारू नये, ते तुम्हाला नक्की विचारू शकतात की डॅड तुला किती मिळायचे? म्हणून मोठ्या मनाने त्या मुलांचं त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करा.” आपण वापरलेली जुनी पुस्तके आणि पाने एकत्र करून शिवलेल्या वह्या, अनवाणी शाळेत जाणे किंवा सहलीसाठी शाळेतून मागितलेल्या दोन रूपयांना वडिलांनी दिलेला नकार ह्या गोष्टी पुन्हा उगाळून अपमान करून घेऊ नका.आपण भोगलेल्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत आणि आता त्यांचे चर्वण उपयोगी नाही हे पालक म्हणून आम्हाला कळले नाही. आज जेव्हा मुलांनी न मागता पालक सर्व काही तेही उच्चतम प्रतीचे देतात तेव्हा मनात विचार येताच की आम्ही आमच्या मुलांशी कसे वागत होतो.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी वारंवार नकार देतो तेव्हा आपल्या विषयी मुलाच्या मनात चिड निर्माण होते आणि नकळत मुले आणि पालक यांच्यात कटूता येते. मुलं पाठी पडू नये असही वाटत पण हा आग्रह फक्त अभ्यास किंवा त्यांच्या स्पर्धा या बाबतच असतो. मुलांच्या पिकनिक किंवा कल्चरल प्रोग्रॅम या बाबत मुल आग्रही असतात पण आपण मात्र आर्थिक कारणासाठी किंवा त्या बाबत आपणास फारसा रस नसल्यामुळे किंवा अभ्यासावरून लक्ष विचलीत होऊ नये म्हणून तेथे त्यांना विरोध करतो किंवा नाराजी व्यक्त करतो. पालक म्हणून आपल हे वागण दुटप्पी ठरत, त्याने अभ्यासात प्रगती दाखवावी पण पिकनिकला मात्र जाऊ नये असा विचार त्यांना पटणारा नसतो.आज पिकनिकची नोटीस निघण्यापूर्वी पालक पैसे घेऊन येतात तेव्हा वाटतं, खरच आपण आपल्या मुलांच्या वेळी आत्मपरिक्षण करण्याची गरज होती.
पालकांच्या मतानेच मुलांनी चालावं हा आग्रह मुलांच्या नाराजीला आणि मुलांनी पालकांपासून स्वतः फारकत घेण्यास कारणीभुत ठरू शकतो. तुम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटतात, त्याच गोष्टी मुलांना अयोग्य वाटू शकतात ही गोष्ट पालक म्हणून लक्षात घेणे गरजेचे आहे. याउलट काही पालक मुलांच्या गरजा पुरवण्यात नको तेवढा पुढाकार घेतांना दिसतात. एखादी गोष्ट नवीन दिसली की ती मुलासाठी तात्काळ उपलब्ध केली जाते. याच बरोबर मुलानी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यावा, कल्चरल पोग्राममध्ये त्याचा सहभाग असावा असा आग्रह असतो. यामध्ये कधी आई आग्रही आणि उत्साही असते तर कधी बाबा. गंमत म्हणजे आपल्या मुलांच्या वाढदिवसी शाळेतील मुलांना गिफ्ट वाटणे किंवा किमती पोशाख घालून शाळेत पाठवणे या बाबतही आग्रही असतात. जी मुल या गोष्टी करू शकतात त्यांच्या मनात अहंगंड निर्माण होतो, याचा परिणाम इतर मुलांच्या मानसिकतेवर होतो.एकतर त्यांच्या मनात न्युनगंड निर्माण होतो किंवा इतर मुलांजवळून गिफ्ट स्विकारतांना मनात अपराधी भावना निर्माण होते.
पालकांनी मुलांच्या मागण्यांबाबत आणि वागण्या बाबत किती उदारता दाखवावी याबाबत डोळस विचार मनात नक्कीच हवा अन्यथा आपल्या मुलासोबत शिकणाऱ्या मुलांच्या आणि अर्थात पालकांच्या मनातही न्युनगंड पसरू शकतो किंवा या उलटही होऊ शकते. अशा कृतीने, जे पालक विचाराने परिपक्व नसतात त्यांचे मन दुखावले जाते. मुलांच्या नेमक्या गरजांची जाणीव आपल्याला नसेल तर , मुलांबाबत आपल्याकडून अन्याय होण्याची शक्यताच जास्त. म्हणून प्रत्येक टप्प्यावर पालकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
जी गोष्ट शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडून घडण्याची शक्यता असते तशीच परंतु थोडी वेगळी गोष्ट आपल्या मोठ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडून घडू शकते. मतदार यादीसाठी मुलं अठरा वर्षांची असावी लागतात तेव्हा त्यांना मतदान हक्क प्राप्त होतो मात्र आत्ता खाण्या पिण्यातील बदलामुळे एकदा मुलं पंधरा वर्षांची झाली की आपण मोठे झालो असे त्यांना वाटू लागते. पालकांच्या चर्चेत भाग घ्यावा आपले मत नोंदवावे असे वाटू लागते. तू अजून लहान आहेस असे मत व्यक्त केले तर मुले नाराज होतात.
त्यांच्या शरीरात घडून आलेल्या बदलामुळे त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे असे वाटते, बाहेर किंवा मित्रांजवळून मिळालेल्या ऐकीव माहितिच्या आधारे ते आपल मत बनवतात. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो की करिअर निवडण्या संदर्भात. समाजात घडणाऱ्या घटनेबाबत ते विचार करून स्वतः मत बनवतात. त्यांचा एकाकीपणा वाढतो. आई बाबा पेक्षा, मित्र-मैत्रिणी जवळच्या वाटू लागतात. कधी एखाद्या मित्रांनी अथवा मैत्रीणींनी मैत्री सोडली तर ते अंतर्मुख होतात, कोलमडून जातात. त्यांच्या मनात चाललेली खळबळ सहसा व्यक्त करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. “हम भले,अपना काम भला” असा अविर्भाव असतो. त्यांच्या गरजा बदलतात, ते स्वतः किंवा मित्र, मैत्रिणीसोबत शॉपिंग करू लागतात, मित्रांसोबत पिक्चरला जातात, कोणत्याही कौटुंबिक, सामाजिक कार्यात सहभागी होत नाहीत. त्यांचा परीघ आणि परिवार या वर्षात बदलतो.
जिथे त्यांना मोकळेपणाने बोलता येत.आपल्या भावना व्यक्त करता येतात अशा मित्रमैत्रिणीचा सहवास त्यांना कुटुंबातील व्यक्तीपेक्षा हवा हवासा वाटतो. त्यांची देहबोली बदलते, बोलीभाषा बदलते, ही भाषा ते आपल्या आई बाबा बरोबर घरात बोलू शकत नाहीत. जर आपण त्यांना या बदला बाबत समजवण्याचा प्रयत्न केला तर अबोला धरतात, तेव्हा गरज आहे या मोठ्या मुलांच्या कलाने पालकांनी स्वतःशी संवाद साधून आपल्या मुलांशी वागणे बदलण्याची. त्यांच्या मनात साठलेल्या विचारांचा निचरा होणे गरजेचे आहे.त्यांच्या प्रत्येक कृतीकडे आणि वागण्याकडे संशयाने न बघता डोळस पालक म्हणून समजून घेतले तर ती संयमाने वागतील त्यांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. यासाठी पालक आणि मुलं हे नात संपवून मैत्री स्थापन केली पाहिजे, असे झाले तर ती चुकीच्या रस्त्याने जाणार नाहीत. मोठ्या मुलांनीसुद्धा आपल्या स्वतःच्या मनाशी संवाद साधून आपल्या पालकांबरोबर कसे बोलावे? काय बोलावे? हे समजून घेणे गरजेचे आहे. टाळी एक हातांनी वाजत नाही हे दोघांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. संवाद हे प्रबळ शास्त्र दोन व्यक्तितील दुरावा कमी करू शकते.
मुले हार्मोनल ग्रोथ झाल्याने, स्वतंत्र विचार करू लागतात. इंटरनेट किंवा अन्य साधनांवर त्यांना जी माहिती मिळते ती पूर्णतः सत्य नसते. कोणत्याही स्थरातील कुटुंबात मोठ्या मुलांचा मित्रमैत्रीणी परिवार वेगळा असतो. त्यांची मानसिक गरज आहे आईबाबानी त्यांना समजून घेणे. त्यांचे मित्र आहेत तशा मैत्रिणी असणारच, घरातील खाणे किंवा जेवण यापेक्षा घरा बाहेरील चमचमीत पदार्थ आवडणार यात शंकाच नको. म्हणूनच त्यांच्या विशिष्ट भाषेबाबत, कपड्याबाबत, आहारा बाबत, मैत्री बाबत, त्यांच्या अवेळी जाण्या येण्याबाबत किंवा त्यांच्या खरेदी बाबत त्यांना समजून सांगणे योग्य. जर त्यांच्यावर वारंवार शेरेबाजी केली तर त्यांचा राग उफाळून येतो हे सुद्धा शरीरातील संप्रेरकामुळे घडते, आपण मात्र अनभिज्ञ असतो.
जेव्हा घरातील वृद्ध माणसं आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत तेव्हाही आपला पारा चढतो नकळत आपण त्यांचा अपमान करतो, त्यांनी काय दिले? किंवा ते आपल्याशी कसे वागले याची उजळणी करू लागतो, कधी कधी खालच्या पातळीवर येऊन त्यांची मानहानी करतो तेव्हा आपणही या अवस्थेतून कधी ना कधी जाणार आहोत हे आपण का लक्षात घेत नाही? वृद्धपकाळ म्हणजे दुसरं बालपण असतं, वारंवार भूक लागणं, गोष्टी विसरणं, उगाचच संशय घेणं या गोष्टी असुरक्षिततेच्या भावनेतून येतात पण हे समजून घेण्याची कुवत आपल्यात नसते. वृद्ध माणसापेक्षा आपणच अधिरतेने वागतो.म्हणून वृद्ध माणसां सोबत कसा व्यवहार किंवा आचरण असाव हे शिकून घेणे गरजेचे आहे. त्याच्या मनावर हळुवार फुंकर घालून आपण त्यांची व्यथा किंवा असुरक्षित असल्याची भावना दूर करू शकतो. आपल्या सोबत आपले आई बाबा हळू हळू चालू लागले, लग्नात किंवा अन्य समारंभात आपल्या सोबत असतांना मोठ्याने शिंकले, खोकले किंवा जेवताना त्यांनी योग्य काळजी घेतली नाही तर आपले डोके तापते,आपण त्यांच्या वयाचा विचार न करता त्यांना रागाने बोलतो किंवा पाहतो. हे खरंच निंदनीय आहे.तरुण वयात आपल्या अविवेकी वागण्याचा परिणाम वृद्ध आई बाबा अथवा शेजारी यांच्यावर होऊ न देण्याची दक्षता घ्यावी.
लहान मुलांच्या बाबतीत असो किंवा मोठ्या आणि वृद्ध व्यक्तींशी आपण कसे वागतो हे फार महत्वाचे आहे.स्वतः, स्वतःशी वेळोवेळी संवाद केल्यास आपले आणि आपल्या सानिध्यातील लोकांचे जीवन सुखी होईल यात वाद नाही. इतरांशी आणि कुटुंबातील सर्वांशीच आपण वेळोवेळी बोलत असतोच कधी उच्च स्वरात, कधी नाराजीने तर कधी अधिकारवाणीने पण आपण स्वतःशी कधी बोलतो का? दिवसातून किमान पाच मिनिटे जर आपण स्वतःशी बोललो तर आपल्या बऱ्याच चूका कमी होतील,बरेच गैरसमज कमी होतील,अविश्वासाच वातावरण कमी होईल. आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही आणि कुटुंबात किंवा आपल्या सानिध्यात असलेली व्यक्ती नाराज होणार नाही.
सुसंवाद ही गैरसमज टाळण्याची पहिली आणि अत्यन्त महत्वाची पायरी आहे. या पायरीवरूनच सुखाचा प्रवास होईल हाच विश्वास मनी ठेवा. म्हणूनच आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींबाबत आणि शेजारी यांच्या बाबत आपण सहिष्णू असणे गरजेचे आहे.आपलेच बरोबर, असं हेकेखोरपणे वागणे आणि दुसऱ्याला पीडा देणे थांबावले तर आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि काही अंशी चुकांचे परिमार्जन होईल.
बऱ्याचदा आपली चूक मान्य केल्यामुळे कमीपणा येईल अस वाटू लागतं आणि त्यामुळे चूक उघड करण्याचा किंवा मान्य करण्याचा मोठेपणा आपण दाखवत नाही. आज पर्यंत मुलांवर किंवा आमच्या हाताखाली काम करणाऱ्या नोकर किंवा सहकारी याला विनाकारण रागावलो पण त्यामुळे संबधात दरी निर्माण झाली. काम करणे अवघड झाले. भविष्यात अशाच चुका पुढील पिढीकडून होऊ नये तर दोन व्यक्ती मधील सामाजिक, आर्थिक, दूरी कमी व्हावी आणि ममत्वाने जवळ यावे. माणुसकीचे बीज अंतरी रूजावे,स्नेह भाव जागृत व्हावा आणि अधिकाराचा वापर कमी होऊन कटुता कमी व्हावी एवढीच माफक अपेक्षा.घडल्या त्या चुकांबद्दल आत्मचिंतन करून सकारात्मक बदल घडावा हीच इच्छा.