उशीराच सुचतंय तरीही
“सिंहावलोकन”, चुक घडुन गेल्यावर केलं जातं. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” असं आपण म्हणतोच ना! मी चुका केल्या, त्याच चुका तुम्ही करु नका अस अनुभवी माणूस उदाहरणे देऊन सांगतो. विश्लेषक कोणाला म्हणायचं? तर ज्यांनी आयुष्यभर चुकाच केल्या आणि नंतर मी कुठे कुठे चुकलो ते शोधत बसला अशाच अधिकारवाणीने बोलणाऱ्या माणसाला.
सल्लागार आपल्या चुकांचं परिमार्जन करत असतो, म्हणूनच तो मी ह्या चुका केल्यामुळे सल्लागार झालो अन्यथा मी यशस्वी उद्योजक झालो असतो अस म्हणतो. त्याच्याकडे, कोणत्या चुका केल्या? तर खड्डयात पडायला होतं याची शेकडो उदाहरण असतात, यातूनच सल्ला घेणाऱ्या माणसाने बोध घ्यावा अशी अपेक्षा असते. तेव्हा आधी एकांतात स्वतःशी बोला. मी यशस्वी झालो ते कसे किंवा मी अयशस्वी झालो ते का? हे ही बोलून पहा की मी माझ्या पुरता जीवनात यशस्वी झालो. माझ्या इच्छा आकांक्षा पुर्ण झाल्या पण मी एक चांगला मित्र किंवा मैत्रीण म्हणून कोणाचा तरी नवरा किंवा बायको म्हणून आणि पालक म्हणूनही यशस्वी आहे का?
एकदा स्वतःशी बोलून तर पहा, मागील बऱ्याचा वर्षांचा इतिहास झरझर आठवत जाईल. शाळेतील पहिल्या नंबरसाठी असलेली स्पर्धा, मित्रांशी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी झालेले भांडण, अचानक झालेली मैत्री, पहिले वहिले प्रेम, एखाद्या व्यवहारात चुकीचा घेतलेला निर्णय, शेजाऱ्यांशी उगाचच झालेलं भांडण, असं काहीही आठवेल आणि लक्षात येईल की ही आपली चूकच झाली.अर्थात तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले तरी त्याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी प्रयत्न करणे आपल्या हाती आहे.हे मनोगत आहे,आयुष्यात झालेल्या चुकांची कबूली द्यायला हरकत नसावी.
बऱ्याच वेळा अगदी शुल्लक कारणासाठी आपण उगाचच आपल्या पत्नीवर, मुलांवर, घरातील कामवाली किंवा ऑफिसमध्ये आपले कनिष्ठ कर्मचारी यांच्यावर तापतो, ओरडून बोलतो आणि त्यांची नाराजी ओढवून घेतो. राग शांत झाला की चूक लक्षात येते.आपल्याला वाटतं छाss अस वागायला नको होतं, वाटतंय ना? मग म्हणूया तसं, ज्या व्यक्तीविषयी गैरसमज झाला असेल त्याला मनमोकळेपणाने सांगा, चूक मान्य करा, काही वेळ गेलेली नाही. “देर आये दुरुस्त आये.” त्यांची माफी मागण्याची गरज नाही, फक्त इतकचं म्हणूया, “मगाशी मी तुमच्यावर उगाचच रागावलो, मलाच कळेना असं का वागलो? वाईट वाटून घेऊ नका,पुन्हा माझ्याकडून अस नाही होणार.” विषय पुन्हा मार्गी लागेल, पण मनाचा तेवढा मोठेपणा दाखवावा लागेल, तरच अढी सुटेल. हे केव्हा होईल? जर तुम्ही स्वतःशी बोललात तर!पहूया जमतंय का? सोप्प आहे फक्त स्वतःला हो म्हणा.
मुल आठवी इयत्तेत गेली की स्वावलंबी होतात हे मी पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा माझी मुलं शाळेत होती तेव्हा जी स्थिती माझी होती त्याबद्दल बोलतोय. म्हणजे मुलांची इच्छा नसली तरी त्यांची आई त्यांच्या सोबत शाळेत जायची. आता मुलं चौथी इयत्तेत जातानाच स्वावलंबी झालेली दिसतात.तेव्हा मुलं इयत्ता आठवी नववी पर्यंत बाबा सांगतात म्हणून का होईना, अभ्यासासाठी बसत होती.आता मुलांच्या कलाने “डॅड” ला अभ्यास घ्यावा लागतो.त्यांचं खेळाचं, खाण्याच आणि फ्रिक आऊट वेळापत्रक सांभाळून त्यांना शिकवाव लागत. गंमत म्हणजे आताच्या मुलांच्या वेळापत्रकात mobile hours पण असतात. आमच्या डोक्यात मात्र प्रकाश पडत नाही, आजही मुलं जास्त वेळ मोबाईलवर दिसली तर आम्ही त्यांना बोलतोच ते ही हार्श शब्दात, हे कळतच नाही की ती आता मोठ्ठी झाली आहेत. आज लहान मुलांनाही ठराविक वेळेत मोबाईल गेम खेळण्याची मुभा असते, पालकांनी या वेळेत मुलांना disturb करायचं नसतं असा अलिखित करार असतो.
आपण आपल्या मुलांना शिकवत होतो, तेव्हा मुलं चुकली तर कान धरायचो, एखादा रट्टा पाठीत घालयचो आणि बिचारी मुल कळवळली तरी तोंडातून एक शब्द काढत नसत. मुलांनी शाळेत खेळतांना मस्ती केली, मारामारी केली की त्यांचे सर, मुख्याध्यापक त्यांना रागवायचे. वर्गाबाहेर ओणवं उभे करायचे पण एकतर मुलं असली गोष्ट घरापर्यंत आणत नसत. त्याच्या मित्रांनी ती गोष्ट किंवा घटना पालकांना येऊन सांगितली तरी आपण सर किंवा मुख्याध्यापक यांची उलटतपासणी करण्यासाठी कधी शाळेत गेलो नाही. तशी पध्दतच नव्हती, शाळेत शिक्षा झाली समजलं की का शिक्षा झाली? याची चौकशी होऊन घरी पुन्हा प्रसाद मिळायचा. आताच्या पिढीतील मुलांचा कान धरण सोडा त्याला मोठ्या आवाजात रागावलं तरी आवडत नाही, समय समय की बात है।
आपल्या वेळी मुलांची पिढी खरच सोशिक होती. शिक्षकांनी शिक्षा केल्यामुळे किंवा आम्ही पालकांनी शिक्षा केल्यामुळे त्याला वाईट वाटतच होते पण मुलांच्या आत्मसन्माला ठेच लागली असे तेव्हा आपल्याला वाटत नव्हते आणि त्या बाबत त्यांनी जाहीर नाराजी केल्याचे आपण अनुभवले नव्हते. खरं म्हणायचे तर तेव्हा आपण चुकलोच होतो. आम्ही आपल्या बाबांचे धपाटे निमुट खाल्ले असल्याने, मुलांना कसला आत्मसन्मान? असं आपल्याला वाटायचं. पण ते चुकीचं होतं हे नक्की.
लहान मुलांनी रागावू नये, पालकांनी चुकीने दिलेल्या शिक्षेबद्दल निषेध व्यक्त करू नये असं आपल्याला वाटायचं पण ते चुकीचेच होते. हे तेव्हा लक्षात आले नाही कारण तेव्हा आपण कोणत्या युगात वावरत होतो माहिती नव्हते, parent नावाचा बिल्ला अडकवला होता आणि आम्ही आम्हाला सर्व अधिकार स्वतः घेतले होते.
पण आज पोटच्या मुलाला शिक्षा करतांना पालकांना दहा वेळा विचार करावा लागतो. मुलगा कसा रिऍक्ट होईल, अबोला धरेल की उलट उत्तर देईल? की त्याच्या मनावर परिणाम होईल? याचे कारण आताच्या पालकांना एकुलते एक मुलं असते, त्यामुळे त्याच्या कलानं घ्यावं असं त्यांना वाटतं, सुशिक्षित कुटुंबात वंशाचा दिवा ही संकल्पना हळूहळू पुसली जात आहे हे नक्कीच चांगले मात्र एकुलते अपत्य असल्याने त्याचे नको तितके लाड होत असतात, घरातील आजी आजोबा सुद्धा त्याची बाजु घेतात परिणामी तो किंवा ती या गोष्टीचा फायदा घेऊन आपले ते खरे करण्याचा प्रयत्न करतात ही वस्तुस्थिती आहे.
मुलांच्या बाबतीत पालक चुकीची बाजू उचलून धरतात, शाळेत शिक्षकांनी शिक्षा केली आणि ते मुलानी घरी येऊन सांगितले तर पालक लगोलग शिक्षा का केली? याची फिर्याद घेऊन नगरसेवक किंवा अन्य व्यक्तीला सोबत घेऊन मुख्याध्यापकांना भेटतात. ज्या शिक्षकांनी शिक्षा केली त्यांना माफी मागायला लावतात. आम्ही आज पर्यंत आमच्या मुलावर आम्ही कधीही हात उगारला नाही तुम्ही आमच्या मुलावर हात उचलणारे कोण?असा प्रश्न त्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांना विचारतात. खरचं आम्ही आताच्या नवीन पिढीला कसं घडवतोय हेच कळत नाही!
मुलांची मानसिकता शिक्षक आणि पालक यांनी समजून घ्यायला हवी हे नक्कीच बरोबर आहे पण शिक्षा केल्यानंतर जर मुलगा डिप्रेशनमध्ये जात असेल तर भविष्यात तो जगाचा सामना कसा करणार? खरं तर शिक्षा का झाली असावी हे कारण पालकांनी शिक्षकांजवळून समजून घ्यावं आणि मुलांना योग्य समज द्यावी. ही मुलं वेगवेगळ्या आव्हानांना कसं तोंड देणार? हा मुलांच्या भविष्याचा प्रश्न पालकांना पडत नाही हे चिवित्र आहे. दुसरे म्हणजे ज्या शिक्षकांशी तुम्ही मुलासमोर वाद घातलात आणि त्यांना माफी मागायला लावली त्या शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार? शिक्षकांचा मान राखला गेला नाही तर ते भावी पिढी कशी घडवणार?
लहान मुलांना समजावून सांगणे कधीही चांगलेच पण त्याचे तुष्टीकरण करणे किती योग्य? याचा विचार पालकांनी आताच न केल्यास कमकुवत मानसिकता किंवा मनोबल असणारी पुढील पिढी जन्म घेईल याची नोंद घेणे गरजेचे आहे. अशी पिढी अपघाता किंवा मानसिक आघात किंवा अपमान या सारख्या छोट्या प्रसंगाला तोंड देण्यास सक्षम असेल का? सांगणे अवघड. मुलं नापास झाले किंवा अयशस्वी झाले तर समाज काय म्हणेल? या भितीने गांगरून जाईल. या करता पालकांनी वेळ काढून मुलांशी बोलले पाहिजे, जर मुलांना स्वतःच्या कृतीचे आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घेतली तर अशी स्थिती उद्भवणार नाही.
आताच्या आई-बाबांनी आपल्या मुलाची जरूर काळजी घ्यावी. दोन्ही पालक घरात फारच कमी वेळ त्याच्यासाठी उपलब्ध असल्याने आणि ती पाळणाघरे किंवा बेबीसीटींग येथे दिवसाचा दिर्घकाळ असल्याने, ती कमी किंवा पोकळी अन्य मार्गाने भरून काढावी म्हणून त्याला चांगल्या वातावरणात, संस्कारात वाढवणे गरजेचे आहेच. त्याची गरज पूर्ण जरूर करावी पण किती लाडाकोडात वाढवावे, याचे भान नक्की बाळगावे. त्याने मागितलेली वस्तू त्याला लगेच मिळू लागल्यास, त्याच्या कलानेच प्रत्येक गोष्ट घडू लागल्यास तो आत्मकेंद्रित किंवा आत्ममग्न होण्याची शक्यताच अधिक. “सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे.” अशी मानसिकता त्याची झाली. तर सर्व गोष्टी झटपट उपलब्ध करून देणारे आणि त्याच्या हो ला हो म्हणणारे पालकच त्याच्या वागण्याला जबाबदार असतील.आर्थिक दृष्टीने सक्षम असाल तरीही मुलांच्या कोणत्या मागण्या मान्य कराव्या याला ताळ तंत्र हवेच.
अगदी याच्या विरोधी टोकाने आमच्या पिढीने प्रवास केला आणि आम्ही पालक म्हणूनही आमच्या मुलांवर अत्याचार केले की काय? असे आताच्या पालकांचा अभ्यास करताना वाटू लागते. आमच्या विद्यार्थी दशेत साधनांची आणि घरातील आर्थिक बाबींची वानवा असल्याने कोणतीही गोष्ट सहज साध्य नव्हतीच, अगदी शैक्षणिक साधने मिळणेही कर्मकठीण होते. याच बरोबर स्वतःचे कितीही बरोबर असले तरी पालकांना तुमचे बरोबर नाही किंवा तुम्ही चुकताय असे म्हणण्याचे धाडस आमच्या पिढीत नव्हते. पालकांच्या समोर मागण्या मांडणे किंवा मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य तेव्हा नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांचे श्रम पाहता तसे वागणे योग्य वाटत नव्हते. त्यामुळे आमच्या पिढीने अनेक नकार पचवून आमची पिढी मानसिक दृष्टीने स्ट्रॉंग झाली आणि भविष्यातील आव्हाने पेलू शकली. संकटे आली तरी ना ढेपळली ना आत्महत्या करायला धजवली. मानसिक दृष्टीने सक्षम झाली. कदाचित हाच impact आमच्या मनावर असल्याने आम्ही आमच्या मुलांना जरा कठोर शिस्तीने वागवले हे आज कबूल करायला हरकत नाही. अर्थात त्यात शिस्तीपेक्षा पालक म्हणून आग्रह अधिक होता असे वाटते.
आमच्या पिढीवर पालकांनी जे संस्कार केले आणि जी थोडी सक्तीची वागणूक आम्हाला दिली त्यामुळेच मनाने आम्ही स्ट्रॉंग झालो. म्हटलं तर आमचे पालक आमची शाळा आणि गुरुजी किंवा सर यांचे आमच्यावर अनंत उपकार झाले. त्यांनी आम्हाला सक्षम बनवले, घडवले. जेव्हा कधी आमचे गुरुजी किंवा आमच्या बाई रस्त्यात दिसतात तेव्हा आमचे हात त्यांच्या पायापाशी जातात, आजही त्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी अमूल्य वाटतात. याचे कारण आजच्या पिढीकडे पाहता छोट्या छोट्या कारणाने पती पत्नीतील गैरसमज, भांडणे यांनी घटस्फोट किंवा न्यायालयात जाण्याची वेळ दोघांवर येते ती वेळ आमच्या पिढीवर आली नाही. दोघांनी एकमेकांना समजून घेतले. याचे कारणही घरातील संस्कार. “संस्कार”या शब्दाची ताकद काय असते ते यावेळेस आचरणातून दिसते.
क्रमशः
[…] भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा […]