एक डाव भूताचा

एक डाव भूताचा

काही दिवसांपूर्वी हिवाळ्यात गावात मध्यरात्री गोंविंद भटाकडे चोरी झाली होती. घरातील पाण्याने भरलेली पितळेची भांडी रिकामी करून चोर घेऊन गेले होते. पोलिसात तक्रार दाखल झाली आणि चार दिवसानी ती भांडी वझेच्या शेणकईत लपवून ठेवलेली दिसली. आधी भूताच्या गोष्टी पेरायच्या आणि नंतर लोकांच्या भितीचा फायदा उचलत चोरी करायची अशी पध्दत चोरांनी सुरू केली होती. साहजिकच लोक अशा गोष्टींची चर्चा करायचे आणि कालांतराने विसरून जायचे.

गावात काही घडले की त्याचा संबध भूताखेताशी लावण्यात जुन्या लोकांना काय आनंद मिळायचा ते त्यांनाच ठाऊक. साधारण दोन महिन्यापूर्वी शीनवार घरताची मुलगी उशिरा घरी येत असताना तिला पाराच्या समोरच्या चिंचेकडे कुणीतरी बसून गप्पा मारतेय असे वाटले. यापूर्वी चिंचेच्या झाडावर कुणीतरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गोष्ट तिने घरी ऐकली होती. साहजिकच त्या चिंचेवर तेव्हा भूत बोलत बसले असावे असा तिच्या मनात विचार आला आणि त्या भितीमुळे तिला ताप आला. मग मांत्रीकाने उतारा केल्यानंतर तिला बरे वाटले. अधूनमधून अशा घटना घडल्या की चिंचेवर भूत असल्याचे लोक खात्रीने सांगत.

भूत अमवास मुहूर्त का शोधते? या साध्या गोष्टीचा कोणी विचार करत नाही. त्यामुळे भूत या शब्दाभोवती वलय निर्माण होते आणि लोक अशा गोष्टी आवडीने चघळतात.

या घटनेनंतर महिन्याभराने एका संध्याकाळी चार मित्र गावाबाहेर पारावर बसले होते. गावात येणारी शेवटची एसटी परतून गेली त्यालाही बराच वेळ झाला होता. लोक कामावरून घरी आले त्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. का कुणास ठाऊक पण नेमके आजच रस्त्यावरचे दिवे लावायला उशीर झाला होता. पिंपळाच्या पारावर चार मित्र नेहमीप्रमाणे सुखदुःखाच्या गप्पा मारत होते. इतक्यात सोमनाथ चिंचेच्या झाडाकडे पहात म्हणाला, रवी तुला त्या चिंचेच्या मुळावर कोणी बसलेल दिसतय का?”

रविंद्र डोळ्यासमोर वाकडा हात धरत निरखून पहात म्हणाला, “नाही रे, मला तर तिथे कुणीच दिसत नाही. पण अस का विचारतोस, तुला कोणी दिसतय का?” “होय तर, पण मला दिसतेय ते तुला का दिसत नाही? हरेश तुला कुणी त्या चिंचेच्या झाडाखाली दिसतय का?”

“नाही रे ! खरच तर मला तिथे कुणीही दिसत नाही, त्या झाडावर काय झालयं हे माहिती असतांना एवढ्या उशिरा त्या झाडाखाली थांबायची हिंमत कोण करेल? तुला कोण दिसतय ते तरी सांग. कदाचित तुला भास होत असावा.” हरेश म्हणाला.

“अरे शप्पथ घेऊन सांगतो, मला तिथे एक तीशीतली बाई दिसते आहे, तिने सफेद सहा वारी साडी नेसली आहे, केस मोकळे सोडले आहेत. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर भलमोठं कुंकू आहे आणि ती जोराजोराने श्वास घेत आहे, तिची छाती वरखाली होत आहे. फारच थकलेली दिसते जणू ती फार दुरवरून पळून आल असावी.”

“सोमनाथ! काही तरी फेका मारू नकोस, तिथे मला चिटपाखरू देखील दिसत नाही, हवं तर मी तिथपर्यंत जाऊन खात्री करून येतो मग तरी तुझा विश्वास बसेल.”

“रविंद्र, भलतेच साहस करू नको, आताच एवढा अंधार दाटून आलाय म्हणजे कदाचित आजच आमवास असेल. कदाचित ती तिथे भटकत असेल. एकदा का तू तिच्या जवळपास पोहोचलास मग तू परतू शकणार नाहीस. ती तुला परतू देणार नाही.”

सोमनाथने त्याला धोका सांगूनही, रविंद्र खरोखरच चिंचेच्या दिशेने चालू लागला. सोमनाथला काही कळण्याआधी, रविंद्र बराच दूर गेला होता. तो चिंचेकडे जाऊ लागला तसं दाजी तोंडाने राम राम म्हणू लागला. “याला तिथे जायची अवदसा का आठवली, आता ती सोडणार नाही, भ्रमिष्ट तरी करेल नाही तर जीव घेईल.”

“दाजी तू उगाच आम्हाला घाबरवू नको. संध्याकाळी भूत येतात का रे? मी तर ऐकलय मध्यरात्री येतात. आजुबाजुला जाग असतांना भूतं कशी येतील?” हरेशने दाजीची भिती घालवण्याचा प्रयत्न केला.

“अरे, सोमनाथला दिसली ती काही भूत नाही, ती मेलेल्या व्यक्तीची मागे राहिलेली इच्छा किंवा वासना आहे. तीला काळाचं बंधन नसतं. ती एखाद्या व्यक्तीला एकांतात दिवसा उजेडी दिसू शकते. तिची इच्छा पूर्ण झाली की ती निघून जाते.”दाजी म्हणाला.

“दाजी तू काही थापा मारल्या तरी माझा काही विश्वास बसणार नाही, तुला माहिती आहे का तिची काय इच्छा होती ? आता रवींद्र शहानिशा करून परत येईल मग काय खर आणि काय खोटं ते नक्कीच कळेल.” हरेश म्हणाला. सोमनाथ तुला देखील भास होत असावा. आधी भुताखेतांच्या गोष्टी वाचायच्या आणि मग त्यात गुंतून पडायचे. भूत हा कमकुवत मनाचा भास आहे. मनी वसे ते
स्वप्नी दिसे.” हरेश दाजीच्या भोळसट स्वभावाला हसत होता.

रस्त्याची लाईट नसल्याने अंधार दाट झाला होता. गावातील घरातील लाईटच्या उजेडात त्यांनाच त्यांचे चेहरे स्पष्ट दिसतही नव्हते. सोमनाथ म्हणाला, “रवींद्र एकटाच गेला आहे, आपण शूर आहोत दाखवायची गरज होती का? खरच तिने त्याला धरलं तर? आपण त्याच्या मदतीला जायला हवं.”

त्यांच बोलणं सुरू असतांना चिंचेकडून कसला तरी आवाज आला तस दाजी घाबरला, “हरेश, सोमनाथची भिती खरी ठरली. रवींद्रने उगाचच धाडस करायला नको होतं, हा रवींद्रचाच आवाज होता. तिने त्याच काही बर वाईट केल तर नसेल ?” “चूप रे दाजी, सदा न कदा एकच. शुभ बोल रे नाऱ्या तर नाऱ्या म्हणणार घराला आग लागली. तो आवाज रवींद्रचाच असावा, तो तिथे पोचला हे सांगण्यासाठी तो ओरडला असावा.” हरेश म्हणाला.

नेमके त्याच वेळेस पारावर बसलेल्या एका घुबडाने फडफडत चित्कार केला. पिंपळाच्या गर्द छायेमुळें खाली अंधार गडद होता. यापूर्वी अनेकदा ही चौकडी गप्पांच्या फड जमवण्यासाठी येथे येऊन गेली होती. पाराजवळ इलेक्ट्रिक दिवा होता नेमके आजच तो बंद होता. आजची परिस्थिती पाहून, दाजी गोंधळीचे हातपाय लटपटू लागले. आज एवढा अंधार का वाटतोय? खूप उशीर झालाय का? गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला समजले नाही. सोमनाथ तुझ्याकडे मोबाईल आहे ना? मार की फ्लॅश.”

सोमनाथने मोबाईल फ्लॅश पेटवला, ती लाईट पाहताच झाडावरची घुबडे उडून गेली. दाजी सावरला. “पाहिलस मोबाईल असुनही एवढा वेळ सुचले नव्हते.” सोमनाथने मोबाईल चिंचेच्या दिशेने फिरवला तस तो पून्हा दचकला. “दाजी त्या चिंचेच्याखाली नक्कीच कोणीतरी आहे.”

“सोमनाथ, रविंद्रने नको ते धाडस करायला नको, खरचं जर ती तिथे असली तर त्याचा जीव घेतल्याशिवाय रहाणार नाही. मी घरी निघतो मला फार भिती वाटते. तुम्ही पण इथे उगाच थांबू नका. केव्हा काय होईल नाही सांगता येत.” दाजी म्हणाला.

“दाजी मित्राला संकटात एकट टाकून जातांना तुला लाज नाही वाटत? असला कसला मित्र?” सोमनाथ दाजीवर रागावला.

“सोमनाथ तू रागावलास तरी चालेल पण मला इथे थांबण शक्य नाही. मला भूतांची भिती वाटते. मी घरी नको जाऊ म्हणतोस, मग काय करू म्हणतोस? इथ या अंधारात आपल्या मदतीला कोणी येण्याची शक्यता नाही. “

“अरे दाजी आपल्याकडे उजेड असून तू घाबरतोस? शर्थ झाली. चल आपण रवींद्रला शोधायला जाऊ. तिथूनच घरी जाऊ.” हरेश म्हणाला

दाजी पारावरून उठला पण चिंचेकडे जाण्याच नाव काढताच तिथेच हटून उभा राहिला. “हऱ्या सोमनाथला जायचं तर चिंचेकडे जाऊ दे, आपण घरी जाऊया, कातरवेळेला संबंध कुठेही फिरत असतात. या चिंचेवर काय झालं ठाऊक आहे ना?”

“दाजी इतकं घाबरून कसं चालेल, आता तर मोबाईलचा उजेड आहे. शिवाय बाजूनी वाटसरू जात असतात, जनार्दनला जाग आली की दिवे लागतील. अगदीच भिती वाटत असेल तर तुला अर्ध्या रस्त्यात सोडून येतो,मग तर जाशील ना?” “हऱ्या, शप्पथ घेऊन सांग, सोमनाथ सांगतो तस तुला खरंच चिंचेकडे कोणी नाही दिसलं.”

“अरे नाही दिसलं, शप्पथ नाही दिसलं, माझा देवगण असेल म्हणून नसेल दिसत. तुलाही नाही दिसलं मग तू इतका घाबरतोस का?”

“अरे आमचे आप्पा म्हणतात, त्या झाडावर परगावतल्या मुलीने लग्नानंतर तिचा नवरा गुपचूप दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो म्हणून आत्महत्या केली होती. तिची संसाराची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून ती अमवास्येला लोकांना दिसते. एखादा चांगला मर्द गडी दिसला की त्याला मोहात पाडते. गावच्या वेशिपासून दूर घेऊन जाते. मग तो मुलगा वेड चाळे करू लागतो, आपला वर्तमान काळ विसरून जातो.”

“दाजी, तुमचे आप्पा हे म्हणतात, ते म्हणतात हे ऐकीव झालं, अशा गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतो का? तुला कधी अनुभव आला आहे का? गावातील कोणाला तिने त्रास दिला आहे का? मी तरी काही ऐकल नाही. आज आपण मुद्दाम चिंचे जवळून जाऊन पाहू म्हणजे तुझ्या मनात शंका राहणार नाही.”

“हऱ्या, काय पागल झाला आहेस का?उगाच जीवावर उदार होऊ नकोस. अंधार गडद होत चालला आहे.”

सगळ्यात पूढे मोबाईलचा फोकस मारत सोमनाथ चालत होता. दाजीने हऱ्याचा हात घट्ट पकडला, दोघे चिंचेच्या झाडा पासून दहा हात अंतरावर असावेत.

ते चिंचेकडे पोचणारच होते तो त्यांना, मागून पावलांचा आवाज येऊ लागला. अधुन मधून एक लांबलचक सावली त्यांच्या पुढे पुढे चालतांना दिसत होती. ती सावली जणू त्यांचा पाठलाग करत असावी. हरेशने पाठी वळून पाहिले. पाठी कुणीही नव्हते.

ते चिंचेच्या जवळ पोचले तर तिथे रवींद्र चा पत्ताच नव्हता, त्यांनी घाबरुन रवींद्रला हाक मारली, हाक अंधारात घुमली पण कोणी. प्रतिसाद दिला नाही. रवींद्रच काय पण तिथे कोणतेही चिटपाखरू तिथे नव्हते. रवींद्र चे नक्की काय झाले कळे ना? मोठ्याने हाक मारायची भिती वाटू लागली. त्यांच्या पाठीमागून येणारा आवाजही पूर्ण थांबला. त्यांनी सहजच चिंचेच्या सभोताली फिरून पाहिले, त्यांना आश्चर्य वाटले, चिंचेकडे गेलेला रवींद्र अद्रुष्य झाला होते.

सोमनाथने झाडावर फ्लॅश मारला तर अचानक जोराने हसण्याचा आवाज आला. तो ऐकून दाजी लटलट कापू लागला. हरेश मात्र न घाबरता जोराने ओरडला. “कोण आहे रे झाडावर? जीव हवा असेल तर लवकर खाली उतर.” सोमनाथने झाडावर पून्हा मोबाईल फ्लॅश मारला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की झाडाच्या फांदीवर शर्ट लटकवला होता आणि त्याचे लांब हात हवेने हलत होते. त्यांनी खात्री करण्यासाठी हरेशला जवळ बोलावून पुन्हा फ्लॅश मारला तस हरेश जोरजोराने हसू लागला. त्याच्या हसण्यात अजून एक आवाज मिसळला.

चिंचेच्या खोडाकडे काहितरी हालचाल झाल्याचे दाजीला जाणवले तसा दाजी जोराने ओरडला, “भूत,भूत, पळा, सोमनाथने खोडावर फ्लॅश मारला तेव्हा त्याला जाणवले की खोडावर काहीतरी प्रतिमा दिसत होती. सोमनाथने पुन्हा फ्लॅश मारला तस पुन्हा काहीतरी आकृती चमकून गेली. ते पाहताच हरेश हसत म्हणाला च्या मायला, कोणीतरी या खोडावर फ्लूरोसंट रंग मारून खोड रंगवले आहे तेच लाईट पडला की चमकते आणि आपल्याला वाटते तिथे कोणी आहे. रवींद्र मुकाट्याने बाहेर ये तू त्या खोडात उगाचच लपला आहेस पण आत जनावर लपले असेल तर तुला दंश करेल. हळूहळू रवींद्र खोडातून सरपटत बाहेर आला. त्याच्या अंगावर रेल्वे गँगमन घालतात तसे कपडे होते ते चमकत होते. तो जवळ येताच जोराने हसू लागला. तसे दाजीसह सगळे जोराने हसू लागले. दूर रस्त्यावर जाणारी दोन माणसे मात्र पळत पळत जातांना दिसली.

रवींद्र म्हणाला, मी चिंचेकडे आलो तेव्हा माझी जाग लागताच तिथून कोणीतरी पळून जातांना मी त्याला पाहिले. दुर्दैवाने तो मला पाठमोरा दिसला आणि अंधार असल्याने मी त्याचा चेहरा पाहू शकलो नाही. जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरील कपडे चमकत होते. मला त्या माणसाच्या वागण्याचा संशय आला म्हणून मी त्याचा पाठलाग केला पण तो निसटून गेला. त्यानंतर माझ्या लक्षात आले की माझ्या वडिलांचे कपडेही अंधारात असताना कुणी बॅटरी मारली तर असेच चमकतात. म्हणून मी घरी गेलो आणि गुपचूप माझ्या वडिलांचे कपडे घातले आणि परत आलो. येतांना सोबत छोटा टॉर्च घेऊन आलो.

“माझ्या मनात या चिंचेच्या रहस्याबाबत संशय होताच म्हणून मी टॉर्च मारून आजूबाजूला पाहिले तेव्हा या झाडाखाली मला काहीतरी पडलेले दिसले. मी ते उचलले तेव्हा तेथे ढोल असून त्यात बरेच दागिने मिळाले . बहुतेक आजूबाजूच्या गावातून चोरी करून चोर या झाडाच्या आश्रयाने येथे आपली लुट चौकशीचा ससेमिरा शांत होई पर्यंत ठेवत असावेत.” रविंद्रने दागिने मित्रांना दाखवले तेव्हा ते चाट पडले. एक दोन मंगळसूत्र, पाटल्या, सोन्याच्या मण्यांची माळ,आंगठ्या असे अनेक दागिने होते.

ते पाहताच दाजी म्हणाला, “रवींद्र आता या दागिन्यांच तू काय करणार? मला वाटललं होत इथे खरच भूत असावे पण हे तर काही वेगळेच आहे. रविंद्र बराच वेळ परतला नाही तेव्हा वाटले रविंद्रच आपली थट्टा करत असेल. पण जुने जाणते लोक सांगतात की आमवास असली की ती इथे ती दिसते त्याचे काय? “

“दाजी! गावात या झाडविषयी जी दहशत निर्माण झाली आहे त्याचाच फायदा चोरटे घेत असावेत. जो चोर पळून गेला तो आता आपल्या सहकाऱ्यांना सांगेल आणि साहजिकच आपण त्यांना कधीही पकडू शकणार नाही. पोलिसांजवळ आपण तक्रार केली तर हे दागिने ते ताब्यात घेतील आणि आपल्यालाच वेळोवेळी चौकशीसाठी बोलावतील. तेव्हा आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल.” रवींद्र म्हणाला

“मग तू आता काय करायचे ठरवले आहेस? कोणाची मदत घ्यावी अस तुला वाटतंय?” सोमनाथने विचारले

“तेच तर आपल्याला ठरवायचे आहे? आपल्याला यातून काही तरी मार्ग काढावाच लागेल. येथील दागिने आपल्या ताब्यात आहेत त्यांना चुकूनही समजले तर ते आपल्यावर हल्ला करायला मागेपुढे पाहणार नाहीत.” रविंद्रने सांगितले.

सोमनाथ म्हणाला, “आपण साठे गुरूजींची मदत घेऊ. गावात त्यांच्या शब्दाला मान आहे. सरकार दरबारी त्यांच वजन आहे. ते नक्कीच यातून मार्ग काढतील. रविंद्र तुला काय वाटतयं?”

“चालेल की, नक्कीच गुरूजी आपल्याला मदत करतील. फक्त या प्रत्येक दागिन्याची आपल्याला नोंद करून ठेवावी लागेल. हे दागिने ज्याचे आहेत त्यालाच मिळायला हवेत. कुठे मधल्या मधे लंपास झाले तर त्याचा दोष आपल्यावर यायला नको, दाजी बरोबर ना?”

“रविंद्र तुझे म्हणणे अगदी बरोबर पण आता ही जबाबदारी सांभाळायची कोणी, चोरांना कळले की दागिने आपल्या कुणा एकाकडे आहेत तर दरोडा टाकायला कमी करणार नाही.” दाजी म्हणाला.

“आपण थेट साठे गुरूजींचे घर गाठू तेच आपल्याला उपाय सुचवतील. या प्रकरणाची आपण कोठेच वाच्यता करायची नाही म्हणजे कोणाला कळण्याचा प्रश्न नाही. “ हरेश म्हणाला.

ते साठे गुरूजींकडे पोचले, घडला प्रकार त्यांनी गुरूजींना सांगितला. आपण जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली.
गुरूजी म्हणाले, “मुलांनो,मलाही माझा जीव प्यारा आहेच ना !-तुम्ही अस करा, आज सगळेच माझ्या घरी थांबा. काकूला तुमचे जेवण बनवण्यासाठी मी सांगतो. सकाळी आपण सरपंच, पोलीस पाटील यांच्या सोबत पोलीस ठाण्यात जाऊन रितसर हे प्रकरण मार्गी लाऊ. “

सोमनाथ म्हणाला, ”आम्ही घरी गेलो नाही तर आमचे पालक शोधत येतील आणि गावात चर्चा सुरू होईल. गुरूजी आम्ही आळीपाळीने घरी जाऊन जेवण करून येतो आणि गुरूजींनी आज महत्त्वाची चर्चा करायला बोलवलय सांगून येतो म्हणजे. कुणी उगाच शोध घेणार नाहीत.” सगळ्यांना हा मार्ग आवडला आणि अर्ध्या तासात मुल घरी जाऊन आणि गुरूजींनी आजच्या रात्रीला बोलवलय निरोप ठेऊन आले देखील.

दुसऱ्या दिवशी साठे गुरूजींनी सरपंच आणि पोलीस पाटील यांना बोलावून घेतलं आणि चार पंच बोलवून पंचनामा केला. पोलीस पाटलांनी वर्दी दिली तसे हवालदार हजर झाले आणि रितसर माहिती देऊन रात्री मिळालेले दागिने जमा केले मात्र, साठे गुरूजींनी आग्रह धरला की याची माहिती वर्तमानपत्रात छापल्यास ज्यांचे दागिने चोरीला गेले आहेत ती माणसे हजर होतील आणि ही मुल निश्चिंत होतील. साठे गुरूजींच्या सूचनेला सर्वांनी अनुमोदन दिले त्यामुळे पोलीस हवालदारांनी त्यांची सूचना ग्राह्य धरली .

दुसऱ्या दिवशी मुलांची नावे बदलून त्यांच्या साहसा विषयी बातमी छापून आली आणि पंधरा दिवसात ज्यांचे दागिने चोरीला गेले होते त्यांना दागिनेही मिळाले. बातमीत मुलांचा उल्लेख नव्हता मात्र एक पत्रकार रविंद्र पर्यंत पोचलाच आणि त्यानंतर चार दिवस वर्तमानपत्रात एकच बातमी चर्चेत होती. पोलीसांनी ओळख पटवून दागिने परत केले आणि चिंचेवरचे भूत विषयाला कलाटणी मिळाली. साठे गुरूजींनी योग्य भुमीका घेतली नसती तर दागिने मुळ मालकांना परत मिळालेच असते याची ग्वाही देण तस कठीणच.

या प्रसंगाची खेड्यात चर्चा झाली आणि मुलांना प्रसिध्दी मिळाली. जिल्हा पोलीस कार्यालयाकडून बक्षीसही मिळाले. लोक सावध झाले. ज्यांना कष्ट न करता पैसे मिळवायचे असतात तेच अशा प्रकखरची गुन्हेगारी कामे करतात. पण चिंचेवर भूत असल्याचे वलय संपले.

नेहमीप्रमाणे चोरांचा तपास सुरू आहे असे म्हणत यदाकदाचित केसची फाईल बंद होईल पण मुळातच जोपर्यंत दागिन्याचा सोस आणि बाजारात दागिन्यांना किंमत आहे तोपर्यंत चोरीचे प्रकार थांबणे कठीण. महिलांनी पूर्ण काळजी घेऊनच दागिने वापरावे अन्यथा दागिन्यांपाई जीव गमवावा लागल्याची उदाहरणे कमी नाहीत.

आठ पंधरा दिवसांनी मुल जेव्हा पारावर जमा झाली तेव्हा दाजीला चिडवण्यासाठी रविंद्र म्हणाला, काय दाजी आज तू चिंचेकडे जाऊन दाखवणार का? “ दाजी, अस्वस्थ होत म्हणाला, ”मला त्या चिंचेवर घडलेल्या प्रकारामुळे अजूनही भिती वाटते. भूत नसेलही पण त्या बाईंचा आत्मा भटकत असेल ना?”

“मित्रांनो भूत कोठेही अस्तित्वात नाही पण लोक ऐकीव माहितीवर भूत पाहिल्याचे तपशीलवार सांगतात. लोकांना ऐकीव माहिती हातभर. रंगवून सांगायची सवय असते. काही लोक या खोट्या माहितीचा आधार घेत अमवास असली की चित्रविचित्र कपडे घालून फिरतात आणि दहशत पसरवून चोरीमारी करतात. यालाच लोक घाबरतात आणि काही गोष्टी रचून सांगतात.” रविंद्र म्हणला.

“रविंद्र तुझ्या खुशालचेंडू स्वभावाला धन्यवाद पण मला अजूनही भिती वाटते की ज्या चोरांच्या हातचा माल आपल्या साहसामुळे गेला ते आपल्या मागावर तर धसतील ना?” दाजीने शंका काढली. “दाजी, चोर आपल्यावर हल्ला करण्याची डेरींग मुळीच करणार नाही, तसा प्रयत्न करतांना ते सापडले तर पोलीस त्यांना चौदावे रत्न दाखवतील आणि त्यांना मोठी शिक्षा होईल. त्यांनी यापूर्वी जितके गुन्हे केले त्याचा तपास होईल त्यामुळे उगाचच घाबरत बसू नको आणि जे शौर्य पदक मिळालय त्याला कमीपणा आणू नको. हरेश म्हणाला.

“दाजी सारख्या दुबळ्या मनाची माणसे त्यालाच फसतात. भोंदूबाबा त्याचा फायदा उचलून भूत उतरतो किंवा दुसऱ्या कुणावर करणी उलटवतो सांगून तुम्हाला त्याच्या विधीसाठी उलट्या पिसाची कोंबडी, काळे वांगे, कोहळा, अबीर, अंडी अशा गोष्टी तुमच्याकडे मागतात आणि उगाचच त्यांचा खेळ मांडतात. आपल्या भित्र्या स्वभावाचा फायदा उचलून गंडा घालतात. तेव्हा भूत कोठेही अस्तित्वात नाही. असलेच तर ते तुमच्या मनात आहे. त्यामुळे यापुढे अशा गोष्टी कृपया कुणाला सांगू नका. मी आता चिंचेकडे जात आहे माझ्या सोबत कोण कोण येणार?”

दाजी हसत म्हणाला,”रवींद्र माझ्या मनातील भीती आता गेली. हा पहा मी निघालो.” दाजीने चार पावले टाकली नाही तोच रोहन पाठून ओरडला,” सोमनाथ, आज भूत आपल्याला भेटायला येतंय की काय? तिकडे पहा त्याचे पाय उलटे आहेत.” अस म्हणताच दाजी उलट्या दिशेने त्यांच्याकडे पोचला. सगळे पोट धरून हसू लागले. आजही लोक मीठ मसाला लावून चिंचेचे भूत आणि रविंद्रची साहस कथा सगळ्यांना ऐकवतात.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar