ओंजळ
शब्द फुले ही तुझ्या यशाला जपून ठेव ग मुली
ओंजळ तुझी रिती न राहो मी बाप तुझा मामुली
तुज न दिला कपडापैका न डामडौल दाविला
अनुभवाचे शब्द सांगुनी, मी बोल तुला लाविला
कुंपणात या मी ही बंदी, काय देऊ मी तुला?
काय दिले ते तुला न कधी कळले, हृदयाच्या रे फुला
तुला न ठाऊक, तुझे बालपण आईने कसे जपले?
भासू दिली न चणचण तुजला, कोडकौतुकही केले
परिस्थितीचे चटके खावून, न कधी कुणा बोल लावले
हतबल होती परि तीही, न फुला तुला कधी ते दिसले
घे समजून व्यथा मनाची, उरातील शल्य आज मांडले
कळून तुज हे समज येवो, घडव भविष्य तुझे चांगले
रागे भरतो जेव्हा बाप, परी आक्रंदे त्याचे मन
नाही सोनुले तुझा पिता ग, पत्थरावरील घण
ठेव ध्यानी पुन्हा सांगतो, विसरशील ही खूण
म्हणशील तेव्हा माझे बाबा, परी नसेन मी जाण
चिमणे तेव्हा माझ्यासाठी, प्रेमे आणशील दाणे
परी असेल माझे घरटे, तुजविण अगदी रिकामे
आई, बाबा असती तेव्हा, मोल न कुणाला कळते
आपण होतो आई तेव्हा, मुठीतून सारेच निसटून जाते
Chan….