ओला श्रावण

ओला श्रावण

‘ऋतू बरवा, ऋतू हिरवा,पाचूचा वनी रूजवा, युगविरही ह्दयावर सरसरती
मधूशिरवा, भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती’

श्रावण महिन्याचे एवढे अचूक वर्णन अर्थात शब्द ‘आरती प्रभू’ चि. त्र्य. खानोलकर कोकणच्या लाल मातीत गंधाळलेला निसर्ग कवी, आणि स्वर आशा भोसले, आहाहा!

ती घराच्या उंबरठ्यावर बसून ते गाण ऐकत होती, तिच्या नजरेसमोर होत गाभूळलेलं शेत. भाताला पोटरी फुटत होती. दारात असलेल्या मांडवावर लटकत असलेली शिराळी, काकड्या, पडवळ, हवेबरोबर हिंदकळत होती. हळदीच्या पानांचा मंद गंध सुटला होता. तुळशी वृंदावनाशेजारच्या प्राजक्ताचा सडा मन वेधून घेत होता. कुंपणावरच्या पिवळ्या भोपळ्याच्या वेलीवर कर्ण्याच्या आकाराची फुले फुलली होती आणि त्यावर किटक रूंजी घालत होते. विविध रूपाच्या जास्वंदीचं संमेलन अंगणाच्या बाहेर पेळेच्या एका अंगाने भरलं होतं. तगरीवर अनंत चांदण्या लटकल्या होत्या आणि वेल रानमोगरा उत्साहात पुढे पुढे धावत होता. त्यावरची फुले धुंदीत हसत होती. सगळच अवर्णनीय, शब्दांत बांधता न येणारं. ते सौंदर्य पाहतांना शमाची गात्र सुखावली. एक वेगळीच धुंदी मनात स्वैर भटकंती करू लागली. असलं सुख तिने कधीच अनुभवल नव्हते. लग्न झाल्यावर ती कोकणात आली म्हणूनच हे निसर्गाच दान तिच्या पदरात पडलं. या सौंदर्याची निर्मिती करणारी होती तिची सासू, जिने राकेशचे वडील गेल्यानंतर त्यालाही असच संस्कार करत वाढवल.सक्षम बनवलं निसर्गाच्या नवनिर्मीतीच ते उदाहरण पाहता पाहता आणि ते गाणं ऐकता ऐकता तिला राकेशची आठवण आली. त्याच्या भेटीसाठी मन तगमगत होतं. तिने व्हिडीओ कॉल करण्यासाठी मोबाईल काढला इतक्यात तिला आठवलं, अजूनही त्याच्या ऑफिसची वेळ संपायला दोन तास आहेत, त्याने मागे सांगितलं होतं, मी कामावर असतांना कॉल करू नकोस ऑफिसमध्ये मला अजिबात वेळ नसतो. मी कुणाचाच कॉल घेत नाही. तिने गंम्मत म्हणून विचारलं होत, ”अगदी तुझ्या आईचापण?” तिला ऐकून माहिती होते, राकेशसाठी त्याची आई म्हणजे सर्वस्व, त्याचं दैवत. राकेश म्हणाला होता, “हो आईचा पण!, माझ्या कामाचे आठ तास सोडले तर मी तुमच्यासाठी मोकळा असतो मग अगदी त्याच वेळेस काय एवढं मोठंस काम पडलं म्हणून तुला मला फोन करावा अस वाटतो?”

तेव्हा ती हिरमुसली, मान फिरवून बसली, तिची कळी कशी खुलते ते त्यांनी लग्नानंतर चार दिवसात ओळखलं होत, त्याने जवळ जात तिच्या मानेवर अलगद ओठ टेकवले, ती शहारली,”राकेश ! तू अगदी मनकवडा आहेस, पण तुझ्या कामापुढे माझी काहीच किंमत नसेल तर मग मी मरून जाणंच पसंत करेन.” “तू मरण्याचा करशील गं प्रयत्न,पण माझ्याकडे अमृत आहे, त्यामुळे अमृत देऊन तुला मी पुन्हा जीवंत करेन, त्यापेक्षा आपण दोघेही एकत्र मरू या का ?” तिने त्याच्या तोंडावर पटकन बोटं ठेवले, “ऐ तू नाही हं मराचयस, पून्हा अस बोललास तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही.” तो प्रसंग आठवला आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती तशी एकटीच बसलेली पाहून आत्याबाईंनी तिला हाक मारली, “शमे! , बाळा काय झाला गो? कसलो एवढो विचार करतस? पंधरा दिवसामागे तर राकेश येऊन गेलो, आता पुना लागलस का डोळे गाळाक ?”

“नाही हो आत्या,सहजच बसलेय मी. काही काम होत का?”
“गो तुझी कसलीशी परीक्षा आसा राकेश म्हणत हो ना? त्याचो अभ्यास कर, उगाच एकटा बसान वेळ कसो जाईत, तो इलो की त्याका सांगतलय, हिका तुझ्या वांगडाक ने म्हणान, तू रडत रवलस तर आमका वाईट दिसता.”

शमा अशी एकटी डोळे गाळायला लागली, की आत्याबाईं म्हणजे राकेशची आई आणि त्याची आत्या यांना या भाबड्या पोरीची चिंता वाटायची. त्या पोरांच ऐकमेकांवरील प्रेम पाहून गहिवरून जायच्या. लग्न झाल्यापासून राकेशच्या गावच्या फेऱ्या वाढल्या होत्या. या पोरांना कोणाची अगदी स्वतःची द्रुष्ट लागू नये म्हणून त्या दोघी मीठ मोहऱ्या ओवाळून टाकायच्या. त्या दोघींच राकेशवर प्रचंड प्रेम होतं.खूप कष्टाने त्यांनी त्याला शिकवलं होतं, त्यानी कष्टाचे चिज केले.बँकेच्या परीक्षा देत तो आधी बँकेत आणि नंतर विमा कंपनीत लागला. आता चांगल्या पोस्टवर असल्याने त्याच उत्तम चाललं होतं.

शमा योगायोगाने त्याच्या आयुष्यात आली. अशीच, त्यांची प्रवासात ओळख झाली. नजरानजर झाली आणि महिन्यभरातच आधी मैत्री आणि नंतर एकमेकांचे सांगाती. मुंबईत राहणारी शमा, लग्नानंतर कोकणात रहायला गेली हे ऐकून कोणाचा विश्वास बसणार नाही पण तस घडलं, राकेश आणि शमा यांची मैत्री आणि ऐकमेकांवरील दृढ विश्वासाचे ते प्रतीक होत.म्हंटले तर दुर्मिळ घटना,स्वानंदी सरदेसाई ही व्हिडीओ ब्लॉगर सोडली तर कोकणातील प्रत्येक स्वप्नाळू मुलीला मुंबईत जावसं वाटत पण शमा चक्क दक्षिण मुंबईतून कोकणात गेली होती. मे महिन्यात लग्न झालं तेव्हा राकेशनी पंधरा दिवस रजा घेतली होती. गंमत म्हणजे लग्न गावीच होतं. ऐसपैस जागा आणि खर्चात बचत त्यामुळे शमाचे बाबा तयार झाले. राकेशने आपल्या गावातच शमाच्या कुटुंबासाठी मित्राचा सुसज्ज बंगला आठ दिवसांसाठी मिळवला होता. तेथे शमाचे कुटुंब आणि नातेवाईक यांची उत्तम सोय करून दिली होती. शमाच्या घरच्या मंडळींना, शमाच लग्न म्हणजे एक पिकनिक असल्याचा फिल आला. आंबे,फणस,जांभळे,करवंद मनसोक्त खाता आले आणि गावातील वातावरण एन्जॉय करता आलं. नदीवर फिरायला जायला मिळाले आणखी काय हवे? नाहीतरी क्षमाच्या वडिलांनी स्वतःच्या गावावर दोन पिढ्या आधीच पाणी सोडले होते. म्हणायच म्हणून त्यांच गाव कुंभवड्यात होत, पण आता तेथे काहीच संबंध नव्हते, त्यामुळे त्यांना ती पर्वणीच वाटली.

लग्नाच्या गडबडीत आठ दहा, दिवस कसे संपले कळलेच नाही. त्या नंतर एक एक करत घरी आलेले पाहुणे गेले. लग्नानंतर लंतो आठ दिवस होता पण देव दर्शन करून ते थकून गेले आणि घरात पाहुण्यांची इतकी वर्दळ होती की त्यांना एकमेकांची नीट ओळखही करून घेता आली नाही. सुट्टी संपत आली तसं तिची समजूत घालत म्हणाला,”शमा very sorry , आता पुन्हा पंधरा दिवस रजा घेतली तर आपल्याला हनिमूनला साऊथला जायचयं तेव्हा मोठी रजा मिळणार नाही. तुझ ग्राज्युऐशन झालं की आपण निवांत फिरायला जाऊ, मग तुला कसलं टेन्शन असणार नाही,चालेल ना?” नुकतच झालेल लग्न,कोवळ वय,मनाचे पुरते समाधान झालेच नव्हते आणि तो मात्र रसपान अधुरं ठेवून निघाला होता.

ती बिचारी कोमेजून गेली, त्याचा फारसा सहवास न मिळताच तो पुन्हा कामावर निघून जात होता. ती त्याला सोडायला रेल्वे स्टेशनवर गेली पण गाडी सुटली तसे तिचे डोळे भरून आले होते. त्या नंतर तो फक्त तिच्या सहवासाच्या ओढीने दर पंधरा दिवसांनी घरी येत होता. दोन दिवस तिच्या सहवासात राहून पुन्हा जात होता. याची नाही म्हटले तरी त्याची ओढाताण होत होती पण मुबंईत तो स्वतः आत्याकडे रहात होता आणि अजून काही वर्ष त्याला घर घेणे शक्य नव्हते.

लग्न ठरले तेव्हाच तीने स्वतः तिची बेडरूम सजवली होती, खिडक्यांना आकर्षक पडदे लावून घेतले होते. एका छोटा टीपॉय खरेदी केला त्यावर वर फुलदाणीची व्यवस्था केली. लग्नानंतर त्या फुलदाणीत ती परसातील वेगवेगळी फुले आणून गुच्छ तयार करून फुलदाणी सजवत असे. तिची ती आवड पाहून आत्या कुठे बाहेर फिरायला गेली की तिच्यासाठी मिळतील ती वेगवेगळी फुलं तिला आणून द्यायची अन तिची कळी खुलायची.

तिच्या बेडरूम बाहेर चाफ्याचे झाड होते त्याचा छान दरवळ नियमित येत असे. एका टेबलवर तिचा आणि राकेशचा फोटो होता आणि बाजूला तिची चार दोन पुस्तके रचून ठेवली होती. दुपारी घरातले काम आटोपून ती वाचन करी, तर कधी मोबाईलवर काही पहात बसे. सकाळ कामात निघून जाई पण दुपारनंतरचा वेळ खूपच रखडत जातो की काय? असे तिला नेहमीच वाटे. सासू आणि आत्या दोघी तिच्याशी बोलून तिला मोकळ करण्याचा प्रयत्न करत,ती माहेरी फोन लावून मम्मी, पप्पा यांची खुशाली घेई, बहिणी सोबत तिच्या नेहमी गप्पा रंगत पण रोज फोन करून बोलणार तरी काय? सध्या पावसाळा असल्याने फारसे बाहेर जाणे नव्हते. सासू सकाळी कामे आटोपली की मंडईत जाऊन रोजच्यासाठी भाज्या, फळे घेऊन येई. एक दोन वेळेस ती सासू सोबत बाजारात गेली होती पण गावात सासूला कोणी भेटल की त्यांच्या इकड तिकडच्या गप्पा रंगत आणि ती ‘बिच्चारी’, असल्याप्रमाणे निवांत उभी राही. गावी घरे दूर दूर असल्याने अजून तरी तिची फारशी कोणाशी मैत्री झाली नव्हती. त्यामुळे बाजारात सासू बरोबर गेली तरी काहीही न करता अस एकटच उभ रहाणे तिला शिक्षा वाटे, म्हणून तिने सासूबरोबर जाणे हळूहळू बंद केले होते.

अलीकडे या संथ जिवनाचा तिला कंटाळा येऊ लागला होता. आपले पुढील दिवस कसे जातील याची तिला चिंता वाटू लागली होती. राकेश बरोबर लग्न करण्याचा आपला निर्णय चुकला तर नाही ना? अशी शंका तिच्या मनात येऊ लागली होती. कधीतरी मैत्रीणींशी video call करून तिचं बोलणे होई. येथील वातावरण, आवारात असलेली नैसर्गिक समृद्धी पाहून आणि ऐकून तिच्या मैत्रिणी म्हणत Shamaa you are very lucky, you can enjoy aromas and beauty of natural Glory. Splendid life for you. You can enjoy natural harmony. तर कधी त्याच मैत्रिणी तिला बिच्चारी ठरवत. तिथलं थंड Slow वातावरण तिच्या विकासाला कसे पोषक नाही याची भुणभुण लावत. आम्ही नवीन पिक्चर कसा एन्जॉय केला आणि तुला आम्ही मिस करतो हे तिने ऐकलं की तिला एकटेपणाचा कंटाळा येई.

लग्न झाल्यावर नातेवाईक निघून गेले तसा तिला निवांत वेळ मिळाला.राकेश गावी असेपर्यंत ती काही दिवस दोघ घराच्या अवती भवती फिरत असत. मे महिना म्हणजे वसंतोत्सव, आंबे,काजू, पेरू, फणस यांनी लगडलेली झाडे पाहून तिला आनंदाच्या उकळ्या फुटायच्या ती त्याचे व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करायची. त्यांचे व्हिडिओ कॉल आले की कितीतरी वेळ तिच्या गप्पा रंगायच्या. राकेशने आईला शहरातील वातावरण कसे असते ते सांगितल्यामुळे सासू या बाबत तिला कधीच बोलत नसे. आते सासूही हळूहळू तिला कामाची होईल सवय, अशी भावजयची समजूत काढत होती. तिने मुंबईत मस्त हसून खेळून दिवस काढल्याने तिला फारशी कामाची सवय नव्हती.

म्हणता म्हणता मे महिना संपत आला तशी तिची सासू आणि आतेसासू कामात बुडून गेल्या. लाकूड फाटा जवळ करणे,शेणी भरून ठेवणे गोठ्याची डागडुजी करणे झडी बांधणे,छत साफ करून घेणे, ती सासुला मदत करण्यासाठी जात होती पण ते काम कष्टाचे होते आणि तिला सरावही नव्हता, तरीही ती जमेल ती मदत करतच होती. हळूहळू पावसापूर्वीची कामे आवरत आली तरीही काही ना काही नवीन काम डोके वर काढतच होते. गुरांच्या गोठ्याची दुरूस्ती, वैरण पेंढा भरून ठेवणे झडी बांधणे, सासू आणि आते सासू यांना उसंत कशी ती नव्हती.आता कामे संपतील म्हणता, दुसरे काम दत्त म्हणून उभे असे.

गायरीतला गोवर शेतात टाकायचा राहिला होता. सकाळपासून तिघी गोवर टाकत होत्या, आते सासू गोवर खणून मोकळा करत होती. गायरीला पान्हा फुटला होता. कितीही कुजलेले शेण वाहून नेले तरी संपत नव्हते. ऊन डोक्यावर रमरमत होतं. तास दिड तास शमा तिथे थांबली असावी पण तिला चक्कर आली तस सासू घाबरली, “शमा,बाय तू घराक जा,लिंबू सरबत करुन घे,
व्हयता निंबर तुका सहन नाय जावचा. आमी काय ता बगतव, चुलीत शेणी घालून तिका उजू करं.” ” आत्या तुम्ही किती वेळ उन्हात थांबणार? तुम्ही पण चला ना.” “गो बाय माझे आता मिरग रिगतीत,मगे तो चांडाळ काय येव करूक देवचो नाय.” तिला त्याचा काही अर्थ कळला नाही पण ती पटापट पाय उचलत घराच्या दिशेने जाऊ लागली, उन्हाच्या लाटा भोवती फिरत होत्या. अंगातून कोणीतरी सारी शक्ती ओढून घेतंय अस वाटत होतं.सासूला ते नित्याचच होतं पण क्षमा त्याने थकून गेली.

संध्याकाळी पुन्हा त्यांनी कामाला सुरवात केली.शमा मात्र घरी बसुन त्यांच्या कष्टाचा विचार करत होती. आपला येथे निभाव लागणे कठीण हे तिला कळून चुकले होते. इतके कष्ट या जन्मात झेपणार नाही याचा विचार करुनच ती थकली. थोडी ऊन उतरल्यावर ती पुन्हा सासूच्या मदतीला गेली. सासू रागावली, “तूका येव नको म्हणानं सांगलय मां, ह्या काम तुका झेपणारा न्हयं,तू सावटेक बसून तुझो अभ्यास कर, तुझो घो इलो की आमच्यावर आरडात. तुका परीक्षा पास जाऊन ऑफिसात जाऊक व्हया,हय आमच्या बरोबर संसाराची माती करून उपयोग नाय.” “आत्या मला वाचून वाचून झोप यायला लागली, आता उनं कमी झालंय म्हणून मी आले, थोडा वेळ मी गोवर टाकते म्हणजे मलाही बरं वाटेल.” “बाय माझे उद्या तुझो घो येऊन हय सत्यनारायण कथा लावीत, ता काय नाय तू निवांत घराकडे बस,आवशीक फोन करं,खुशाली घे.आमी विचारलवं म्हणान सांग.” पण शमाने घमेल घेत गोवर टाकायला सुरवात केली. तासाभरात त्यांच काम संपलं,तस तिने सुस्कारा सोडला.” आई चहा ठेवू का? ” “आता चा सांजेकच घेऊ, तुका व्हयो तर आपलो कपभर ठेव, त्यापेक्षा झाडावचा लिंबू काढून सरबत कर, वाडवण मारुन मी येतयं”

ती घरी गेली सासू आणि आत्या दोघी झाडलोट करू लागल्या. थोड्या वेळातच त्या परतल्या. शमाने आपल्या अंदाजाने सरबत बनवल होत, “आत्या,खूप गोड झालं का हो? म्हणजे मी चाखून पाहिलं पण मला ते आंबट लागत होत म्हणून – – – ” बरोबर हां,वाईच कमी साखर व्हयी होती, नुसता गोड बरा लागणा नाय आंबट गोड बरा लागता पण चलात,तुका आवडला मां” खरं तर तिचा अंदाज चुकला त्यामुळे दोनच ग्लास सरबत झाल पण ती काही बोलली नाही. आत्या पोट धरून हसली,”शमे ह्या गो काय, तुका खय हां,आता तुझ्यासाठी मी करतयं.”

एक दिवस दुपारी रणरणत उन होत आणि जेवण आटोपून थोडा वेळ त्या पडतात तोच, काही वेळातच रंग पालटलां, सार आकाशच काळकुट्ट झालं, अंधारून आलं, सोसाट्याचा वारा वाहू लागला. धुळ सर्वत्र भरून राहिली आणि धडाडss धूमss नाद चहू दिशांनी गरजू लागला. विजा समोरील झाडाला चाटून गेल्या.एका झाडाने तर चक्क पेट घेतला. ते पाहून ती घाबरली तरीही तिने धावत मोबाईल आणून व्हिडीओ घेतला. सासू ओरडली.” गो,गो,गो करतस काय? मोबाईल वापरा नको,
मोबाईल विज ओढून घेईत आणि बॅटरी फुटात. मागे परबळकरणीच्या घरात असोच मोबाईल फुटलो, मी बाय तो डबो बंद करून ठेवतय उगाच झंगाट नको.” शमा हसली,”अहो आत्याबाई! असा सहजच मोबाईल फुटत नाही आपण नेटवर्क वापरल तरच फुटतो. तुम्ही नका घाबरू मी मोबाईल बंद करून ठेवते.” पाऊस जेवढ्या वेगाने आला तसाच तो तासाभरात बंद ही झाला. आता पाखरांचे थवे इकडून तिकडे तिकडून जाऊ लागले. पोपट वर्तुळाकार मंडळात विहरत दूर गेले. कुठेतरी दूर घार चित्कारली. आकाशात विजा चमकू लागल्या. त्यातील एखाद्या विजेचा लोळ जमिनीवर कोसळल्याचा भास झाला. पाऊस टपटपू लागला. आधी कौलातुन गरम वाफ बाहेर पडली आणि क्षणभर धुके पसरल्याचा आभास निर्माण झाला. पाऊस पडताच तिची सासू आणि आत्या सुकवणं काढण्यासाठी खळ्यातून घरात पळापळ करू लागल्या. संध्याकाळी वादळ झालं. घरापाठचा आंबा कोसळल्याचा कडाड् काड जोरदार आवाज झाला. त्या रात्री अचानक लाईटही गेली. बाहेर मीट्ट अंधार आणि त्यात इतस्ततः फिरणारे काजवे पाहून तीला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण जसजशी रात्र वाढत गेली अंधार दाट झाला. लोट्यावर ठेवलेला इमर्जन्सी लाईट अपुरा वाटू लागला. सासू स्वयंपाक करता करता तिची जाग घेत होती. त्या रात्री त्यांनी लवकर जेवून घेतले.ती बेडरूममध्ये न झोपता सासू बरोबरच वाणशीत झोपली. खिडकीतून बाहेरचे काजवे दिसत होते आणि रात्रकिडे किरकिरत होते. तिला राकेशची प्रकर्षाने आठवण आली. तिने डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला. रात्री कधी डोळा लागला तिलाच कळला नाही.

सकाळी सासू उठवायला आली तेव्हाही ती गाढ झोपेत होती. झोपेतच ती बडबडत होती.बहूदा स्वप्नात राकेशच आणि तिच हितगुज सुरू होत. सासू मनातच हसली. सासूने तिला हळूवार हाक मारत उठवलं. तिच लक्ष खिडकीकडे गेलं, बाहेर उजाडले होते. मातीचा ओला गंध तिला जाणवला तशी ती उठून बाहेर आली.वातावरण सुंदर होते. कोबंड्या चकचक करत दाणे टिपत होत्या. पक्षी झाडावर शिळ घालत होते. ती ब्रश करून चहा घ्यायला गेली तशी सासू हसतच म्हणाली,” राती सपान पडला होता काय? कोणा वंगडा बोलत होतस? त्याचो जप चालवलो होत़ो” ती लाजली. तिने चहा संपवला आणि ती बाहेर ओसरीवर येऊन बसली. रात्री पाऊस पडुनही कुठेही त्याचा मागमूस नव्हता. तिने मोबाईल चालू केला तर नेटवर्क आलेल दिसलं, ती फोन करणार होती पण तिच्या लक्षात आलं, सकाळीच राकेश ऑफिसमध्ये जायच्या गडबडीत असणार म्हणून तिने मोबाईल तसाच ठेवला. सगळीकडे शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली. रस्त्यावर ट्रॅक्टर धावू लागले. माणसे भात पेरण्यासाठी शेतात उतरली.

त्यांची दारात थोडी शेती होती, तिची सासू मजूर लावून त्यामध्ये भात लावून घेत असे. या वर्षी लगीनघाई झाल्याने सासूने शेत न लावण्याचं ठरवले होते पण शमाच म्हणाली की, “आई आपण शेत लावूया का?” तिचा आग्रह म्हणून सासुनी ट्रॅक्टर बोलवून थोड शेत नांगरून घेतलं. थोड बारीक भात पेरलं. जून मध्यावर चांगला पाऊस पडला आणि रोप तरारून आलं. वटपौर्णिमा संपली आणि तरवा काढायला झाला. ती भाताचं रोप, तरवा काढायला आणि लावायला शेतात उतरली, सासू नको म्हणत असतांना, दोन तीन तसऱ्या पूर्ण होई पर्यंत शेतात थांबली. संध्याकाळी तीच अंग रसरशीत झालं. ती काही न बोलता बेडरूममध्ये जाऊन झोपली. सासू पहायला गेली तर ती रडकुंडीला आली होती. सासूने तिला मायेने जवळ घेतलं तसे तिचे डोळे भरून आले, “गो, तू अगदीच अशक्त कशी? शहरातली चेडवा म्हणजे मेणाचे पुतळे आसत की काय? तुका सांगलं व्हतय मा व्हयता काम तुका जमाचा नाय म्हणान? आता तुका सुंठ, मीरी, लवंग टाकून अडुळशाचो आणि बेलाचो काढो देतय मगे बघू ताप कसो थांबता तो?”

रात्री तिला पेज आणि तोंडाला कुळथाची पिठी दिली. त्या दिवशी सासूने तिचे अंथरूण स्वतःजवळ घातले.तिला लहान मुलांसारखे थोपटले, दुसऱ्या दिवशी तिला ठणठणीत बरे वाटले. सकाळी ती थोडी उशिरा उठली आणि सासुच्या जवळ बसत म्हणाली, “आत्या मला आता एकदम फ्रेश वाटते.” आत्या हसली, “गो पोरी गावठी उपाय तो गावठी, आमी सर्दी पडशाक गोळी घेईत नाय रवणव, गवती चायची पात आणि आल्याचो तुकडो घालून फुटी चा खाल्ली की तापाचो बापव पळान जाता.” शमा ते ऐकून हसत सुटली. “मला पण फुटी चहा दे द्या की मी पिते.” तिने भात लावणीचा अनुभव,अंग मोडून आलेला ताप, सगळाच वृत्तांत आपल्या बहिणीला सांगितला.

आज सकाळी बाहेर बसल्या बसल्या अख्खा चित्रपटच तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला. तिने आईला फोन लावला. तिची आणि पप्पांची चौकशी केली, एकटं एकटं वाटतय अशी गोड तक्रार केली. त्यांनी तिला मुंबईला घेऊन येण्याची तयारी दाखवली, दुसरी तिसरी आनंदाने नाचली असती, ती म्हणाली, तो घरी नसताना मी अशी येऊ शकत नाही, ती बोलत असतांना जोराची सर आली तसं संपर्क तुटला,दोन तिन वेळा तिने फोन लावला. नेटवर्क नसल्याचे फोन लागे ना म्हणून ती खट्टू झाली. आज तिला पुन्हा पुन्हा राकेशची आठवण येत होती. आज पहिल्यांदा मन आशंकीत झालं. “तो बरा असेल ना? मन वैरी झालं, वेळ जाता जात नव्हते.

इतक्यात दारासमोर रीक्षा येऊन थांबली. राकेश रीक्षेतून बाहेर पडतांना पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. काही न सांगता कळवता तिच्या आठवणीसरशी तिचा राकेश तिच्यासाठी धावून आला होता. तो आला आणि जोरदार एक सर अचानक येऊन गेली. तो घरात येताच ती त्याच्याकडे विस्मयतेने पहात म्हणाली, तू काही न कळवता कसा आलास? तशी सासू बाहेर येत म्हणाली,”शमे गो मीच त्याका बोलावून घेतलयं. सांगलय, तुझा टपाल घेऊन जा, हय उगाच डोळे गाळत बसण्यापेक्षा ज्याची ठेव त्याच्याकडे पोच केलेली बरी.” “आत्या,काहितरीच काय? मी तुम्हाला कधी म्हणाले राकेशला बोलवा म्हणून.” खर तर ते ऐकून तिच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता पण तिला जेव्हा कळाले की राकेशला म्हाडाची हॉसिंग लॉटरी लागली आणि रेडी पसीशन फ्लॅट मिळाला तेव्हा तर स्वर्ग तिच्यासाठी दोन बोटांवरच उरला होता. आत्या तिला म्हणाली,”तुझ्या पावलांनी लक्ष्मी घरी इली. जा घोवाक चा पाणी दी.”
ती चहा करायला जाणार तोच राकेशच्या आत्याची हाक आली, “रे हय ये, तिका बोलव तुझ्या आवडीचे घावणे केलेहत ते खा. मगे काय ते गजाली करा.” चहा घेता घेता राकेश तिच्याकडे पाहत हसत म्हणाला, “शमा झालं ना तुझ्या मनासारखं मग तुझा काय विचार आहे?”
“राकेश आता कुठे नात्याला अंकुर फुटत आहे,मागे मला थोडासा ताप आला होता तर आईंनी मला मायेन जवळ घेत थोपटून निजवल, मला औषध दिलं. जे प्रेम जो जिव्हाळा गेल्या दोन तीन महिन्यात या घराने मला दिला आहे त्यापासून मला पोरकी करु नको. किमान वर्षभरतरी मला या प्रेमात चिंब भिजून घेऊ दे. नंतर आपण आहोतच,तू माझा अन मी तुझी.” ते त्याने ऐकलं आणि आपल्या पत्नीचा त्याला अभिमान वाटला. आपली निवड चुकली नाही याचा आनंदही.”Shama I love you, I love you so much.” दोन दिवस राहून शमाला प्रेमाच्या श्रावण सरीत भिजवून राकेश आनंदाने परत जायला निघाला. तो श्रावण त्यांच्या कायमचा स्मरणात राहणार होतो. राकेशच्या आईला आश्चर्य वाटले,राकेश येऊनही शमा मुंबईला जायला तयार नव्हती त्याचे कारण तिला कळले तेव्हा तिच्या प्रेमाला पान्हा फुटला. तिने सुनेला जवळ घेतले तेव्हा तिचे डोळे आनंदात न्हात होते.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar