coronavirus

करोना आणि आपली जबाबदारी

चीनच्या बुहान प्रांतातुन या रोगाचा विषाणू आढळला आणि पाहता पाहता त्याने पृथ्वी पादाक्रांत केली तेव्हा “पाहता पाहता वाढे भेदिले शुन्य मंडला” या मारूती स्त्रोत्रातील वाक्याची आठवण झाली नसती तरच नवल. आहारातील भिन्न पध्दती आणि त्यांचे दुष्परिणाम यावर वारंवार चर्चा होत असते तरीही पाश्चांत्यांचे अंधानुकरण करत आपणही शितगृहातील अन्नाचा  स्वीकार करतो त्याचे दुष्परिणाम यापुर्वी फारसे भोगावे लागले नसले तरी

” सावध तो सुखी” या उक्तीप्रमाणे शितगृहात दिर्घकाळ  साठवलेले अन्न खाणे टाळणे कधीही चांगले.

सामान्यतः असे शीत गृहात साठवलेले अन्न  हे विषाणूरहीत आहे असा गोड समज होता परंतू काही विषाणू हे उणे वीस तापमानातही तग धरून राहू शकतात हे संशोधना नंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे.शाकाहारी पदार्थांच्या तुलनेत मांस कुजण्याची क्रीया ही जलद गतीने होते असे आढळले आहे. ब-याच देशात अतिशीत स्वरूपात अन्न साठवून विक्रीस ठेवले जाते व तसेच किंवा अर्ध कच्च्या स्वरूपात आहारात वापरले जाते. साहजिकच त्या अन्नात सुप्तावस्थेत असणारा विषाणू त्या वरील तापमानातही जीवंत राहतो आणि मानवाच्या शरीरातील विविध अवयवांना किंवा संपूर्ण यंत्रणेला हानी पोहोचवतो. गेल्या दोन दशकांत अशा अनेक नवीन विषाणुंचा शोध लागला आहे.जरी असा आहार विकसनशिल देशात  घेतला गेला नाही तरी हे विषाणू संसर्गातुन, संपर्कातुन संक्रमीत होतात तेव्हा गरीब आणि श्रीमंत असा भेद करत नाहीत. या विषाणूंमुळे होणा-या आजाराची लक्षणे प्रथम सहज कळुन येत नाहीत. ब-याचदा कामाच्या व्यापात किंवा पैसे मिळवण्यासाठी काम करण्याच्या गरजेतुन आजार अंगावरच काढला जातो किंवा त्यांचे गांभीर्य लक्षात घेतले जात नाही आणि जेव्हा आजार बळावतो तेव्हा बराच उशीर झालेला असतो. भारतासारख्या गरीब देशात सर्वच आजाराची लक्षणे ओळखणारे, तज्ञ डाॅक्टर खेडोपाडी असतातच असे नाही, योग्य वेळी निदान व उपचार न झाल्याने हा रोग एका व्यक्तीकडुन त्यांच्या संपर्कात असणा-या नातेवाईक तसेच भेटीस येणा-या मित्रपरिवाराला कधी संक्रमित झाला?  ते त्या व्यक्तीसही कळत नाही.

आरोग्याविषयी प्रचंड अज्ञान, उपचारासाठी असणा-या सुविधांचा अभाव आणि तज्ञ डाॅक्टर यांचा ग्रामीण भागाकडे न येण्याचा निर्णय यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आरोग्य , साथीचे आजार आणि मृत्युदर नक्कीच जास्त आहे यात वादच नाही.

आजही खाण्यासाठी किंवा कपड्यांसाठी तसेच  मौजमजेसाठी आपण पैसे खर्च करतो तसे आरोग्यासाठी पैसे खर्च करण्याची तरतुद ही कनिष्ठ मध्यम वर्गाकडे आढळत नाही. मग गरीबाकडे या विषयी अवेअरनेस असण्याची शक्यताच नाही असे म्हटले तर वावगे ठरू नये. जोपर्यंत आजार गंभीर रूप धारण करत नाही तोपर्यंत डाॅक्टरकडे जाऊन उपचार घेणे म्हणजे पैशांचा अपव्यय वाटतो.

आज चीनसह सर्व पूढारलेल्या देशात करोना विषाणूंची बाधा झाली आहे. या आजाराने विश्वात हातपाय पसरले असुन जवळ जवळ लाखभर लोकांना या आजाराची लक्षणे  दिसत आहेत.

प्रत्यक्षात पंधरा हजारापेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत आणि योग्य काळजी घेतली नाही तर मृतांचा आकडा वाढू शकतो.जागतीक आरोग्य संघटनेने या विषयी त्यांच्या सदस्य देशांना या आजारा विषयी व घ्यावयाच्या काळजी विषयी पूर्ण सूचना देऊनही या देशांतील नागरिक पुरेशी काळजी घेतांना दिसत नाहीत. या रोगाची लक्षणे दिसल्यानंतर तो वेगाने हातपाय पसरतो हे चीन, इटली, इराण या देशांतील मृतांच्या आकड्यांनी दिसुन आले आहे. आपल्या देशातही प्रथम अवघे तीस संशयित ऋग्ण होते पण पाहता पाहता ही संख्या पाचशेवर कधी पोचली ते कळले देखील नाही.सुदैवाने आजही मृतांची संख्या ११ आहे ही समाधानाची गोष्ट म्हटली पाहीजे. जर या रोगावर नियंत्रण मिळवायचे असेल तर विलगीकरण या व्यतिरिक्त अन्य तातडीचा पर्यायच उपलब्ध नाही.

हा आजार दहावर्षापर्यंची मुले व साठवर्षांवरील वृध्द यांना होण्याची शक्यता दाट आहे किंवा या वयोगटातील व्यक्ती या आजाराने लवकर त्रस्त होतात हे ऐकल्यावर इतर सारे बिनधास्तपणे कुठेही फिरायला  मौजमजा करायला, पर्यटनाला मोकळे किंवा इतरांना हा आजार होणारच नाही असा अर्थ काढुन लोक सुसाट सुटले आणि रोग संक्रमीत करणारे माध्यम बनले म्हणुनच इटली व इराण येथील मृतांचा आकडा वेगाने वाढला.

भारतातही आम्ही हिच चुक केली तर त्याचे परिणाम किती गंभीर असतील हे सांगण्यासाठी कोणत्याही कुडबुड्या जोतीषाची गरज नाही.आपल्या देशातील लोकवस्तीची घनता ,झोपडपट्यांची संख्या ,गलीच्छ वस्त्या,जागोजागी जमणारा कचरा व सांडपाणी याची बजबजपूरी. आपल्याकडे असणारी तुटपूंजी वैद्यकिय व्यवस्था , लोकांचे वैद्यकीय अज्ञान आणि या प्रचंड लोकसंख्येस अपुरी ठरणारी साधने यांचा विचार करता याचा असाह्य ताण आपल्या सर्वच साधन व्यवस्थेवर आहे. म्हणुनच आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हात जोडुन जनतेला विनंती केली आहे. पूढील तीन आठवडे हे सर्व भारतीयांसाठी कसोटीचे आहेत.जर स्वशिस्त, जागरुकता पाळत आपण घरातच थांबलो, जर स्वत:च्या प्रकृतीची आपण वेळेवर काळजी घेतली आणि स्वत:ला संशय आल्यास घरातील अन्य सदस्यांच्या संपर्कापासुन दुर राहुन स्वत:वर योग्य इलाज केला तर संक्रमणाची ही साखळी थांबवू शकू.

जर काही अपरिहार्य  कारणास्तव आपल्याला घराबाहेर कामासाठी जावे लागले तर घरी परतताच गरम पाण्यानी आंघोळ करून सर्व कपडे स्वच्छ धुवावे,  हे ही शक्य नसल्यास किमान स्वत:चे हात, पाय स्वच्छ पाण्याने व साबणाने किमान वीस सेकंद धुवावे, कोरडे करावे व नंतरच घरी प्रवेश करावा.” सेल्फ हेल्प इज हेल्प टू नेशन” आज देश ज्या संकटातून जात आहे ते पाहता प्रत्येक नागरीकांनी स्वत:पुरती खबरदारी बाळगली तर सरकारचे हात बळकट होतील. या आजाराचे निवारण करता यावे यासाठी डाॅक्टर व 

वैद्यकिय कर्मचारी यांच्यासह पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पाणी खाते आणि अशा कितीतरी अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आपल्या जीवाची आणि ओढवणा-या परिणामांची पर्वा न करता या सेवेसाठी तत्पर आहेत. सैनिक जसे सरहद्दीवर तीनही प्रहर डोळ्यात तेल घालून कार्यरत आहेत तसेच हा सर्व कर्मचारी वर्ग आपल्यासाठी कार्यरत आहे.त्यांच्या ऋणातुन आपल्याला मुक्त होताच येणार नाही तरीही शासनाच्या आदेशांचे पालन प्रत्येकांने प्रामाणिकपणे केले तर या भयाण रोगाला  आपण संपवू शकू त्याच्यावर विजय मिळवू शकू.

 या चैत्र पाडव्याला सर्वांना मनापासुन एकच आवाहन पाडवा घरात राहुनच साजरा करा. शुभेच्छा जरूर द्या  पण मोबाईलवर. शक्य तो भेट टाळा, अतिशीत पदार्थ टाळा, घाला कोणत्याही गंभीर लक्षणांना आळा. या भयाण करोना राक्षसाला गाडण्यासाठी सर्वांनी संकल्प करूया” पूढील एकवीस दिवस आम्ही सर्व काटेकोरपणे शासनाच्या आदेशांचे पालन करू आणि करोना संपवण्यासाठी शासनास सहकार्य करू”

सर्व  मित्रांना आणि माझ्या वाचक वर्गाला पाडव्याच्या मनःपुर्वक शुभेच्छा.शुभम् भवतू !

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “करोना आणि आपली जबाबदारी

 1. Archana Ashok kulkarni
  Archana Ashok kulkarni says:

  पूर्ण सहमत आहे आपल्या विचारांशी. आपल्या घरात, घरातील व्यक्तीने (विशेषतः महिला) केलेला स्वयंपाक. ताजे,गरमागरम अन्न सेवन करणे ही सर्वोत्तम पद्धत आहे जेवण्याची. दुर्दैवाने याचे महत्त्व हल्ली कमी होत होते पण आज उद्भवलेल्या परीस्थिती मुळे पुन्हा एकदा सर्वांना हे कळेल अशी अपेक्षा आहे.

 2. रवींद्र महादेव बाऊल

  नमस्कार सर.
  खरंतर तुमचे खूप आभार.
  तुम्ही ह्या मधामातून समाजाला जनजागृतीचे काम करत आहात , तुम्ही केलेले मार्गदर्शन आणि माहिती खूपच उपयुक्त आहे.
  खरं तरं समाजाने ह्याचे गाभिर्य जाणून आणि सरकार ने दिलेल्या आदेशा चे पालन तसेच सामाजिक भान ठेवून आपण स्वतः स्वतःचे रक्षण करणे हीच त्यांची आणि त्यांच्या करता समाजसेवा आहे. जर ह्या व्हायरस ची लागण एखाद्याला जाणीपूर्वक झाली तर त्याचे रूपांतर मानवी बॉम्ब मध्ये होते . आणि जर का त्याचा प्रसार इतर ठिकाणी झाला तर ते देशद्रोही म्हणून संबोधले गेले पाहिजे.
  धन्यवाद.

Comments are closed.