कलियुगातील मीरा
तिला प्रथम दर्शनी कोणी पाहिली तरी ती कोणाला पहिल्या भेटीत आवडावी इतकी सुंदर नव्हती. सडसडीत बांधा, वडीलांप्रमाणे उभट तोंडवळा आणि निमगोरा रंग अगदी चार चौघीप्रमाणे, आणि तरीही ती पळून गेली हे ऐकून वडील टिकेकर सुन्न झाले.पौरोहित्य करणाऱ्या टिकेकरांना गावच नव्हे तर पंचक्रोशीत ओळखत होते. त्यांना दोन्ही कन्या होत्या हुशार होत्या. दोन्ही मुलींवर त्यांचा जीव होता पण विशेषतः मिरेवर कारण ती नेहमी म्हणायची मी लग्न करणार नाही. मी तुमच्याकडेच राहीन तुमची म्हातारपणाची काठी होईन. त्यामुळे मुलगी पळून गेली याचा त्यांना मोठा धक्का बसला. गावात तोंड दाखवायला लाज वाटू लागली. तिची दुसरी बहिण माध्यमिक शाळेत हंगामी शिक्षिका म्हणून गावातील शाळेत कार्यरत होती. तिलाही गावकरी आपल्या बहिणी बद्दल विचारतील अशी सारखी भिती वाटत होती. दोन दिवस ती शाळेत गेली नाही तसा मुख्याध्यापकांचा फोन आला, “मनिषा अशी किती दिवस घरी राहणार आहेस? कुचाळक्या करणारे करणारच आहेत आणि मिरेनी चुक केली त्याची शिक्षा तू का भोगायची? उद्यापासून शाळेत ये. कोणाची भिती बाळगायची किंवा लाज बाळगायचं कारण नाही.” शेवटी ती धीर करून शाळेत जाऊ लागली. चार दोन दिवस लोक तिच्याकडे पाहून हसत, कुश्चितपणे बोलत, पण चार दिवसात तिला सवय झाली. मिरेन नक्कीच असं करायला नको होतं, यामुळे बाबांना किती त्रास झाला असेल, पण आता पर्याय नव्हता. येईल त्याला सामोर जाणं भाग होतं.
पौरोहित्य करणाऱ्या महादेव टिकेकर यांनी वर संशोधन सुरू केलं होतं आणि या मोसमात मिरेच लग्न करायचच असा चंग बांधला होता. सग्यासोयऱ्यांकडे पत्रिका आणि फोटो मोबाईलवर पाठवला होता. चांगला जावई मिळावा म्हणून महादेवावर अभिषेक केला होता. पैशाची जुळणी केली होती.परड्यातील दोन तीन सागाची जुनी झाडे विकली होती. पार्वतीला या वर्षी लग्नात नटलेली पहायला ते उत्सुक होते पण त्या घटनेने त्यांच्या सर्व अपेक्षा आणि मनोरथावर पाणी फिरवल.
ना तिने जातांना कुणाला काही सांगितले, ना कुणाही जवळच्या व्यक्तीला ते जाणवू दिले. मीरा आणि सुचिता करोना काळात माहिती देण्यासाठी आणि आयुषची औषधे वाटण्यासाठी एकत्र काम करत. संपूर्ण गावाला त्याची माहिती होती म्हणूनच मीरा पळून गेली तेव्हा सुचीतापाठी मिरेच्या पालकांनी आणि तिच्या ओळखीच्या अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. “गो सुचीता मेले मीरा खय गेली, कोणा बरोबर गेली ता तुका नक्की माहीत असतला तुका सांगूचा नसला तर नको सांगा. पण कोंबो आरावल्या शिवाय रवात काय?” दुसरी म्हणे, “जातीपातीतलो तरी आसा ना? का हरिजना बरोबर गेली, खायल्या जातीतलो आसात तर त्या भटाक तोंड दाखवूक जागा रवाची नाय.”
ती मुक्ताफळे ऐकून सुचिता रागावली,”गे बाये तिच्या मनातला माका काय ठाऊक? आमी करोनात फिरतेक एकत्र जाव ह्या खरा पण तिचा कोणाशी प्रेम होता, कोणा बरोबर गेला ही चांभार चवकशी मी कित्याक करू? माका घराकडे मोप कामा आसत. तुमका इतको इंटरेस आसा तर टिकेकर गुरूजींका विचारा. मी बापडी काय सांगतलय?” तिथ पासून सुचिताच्या पाठचा ससेमीरा थांबला.
घरातून ना दागदागिने नेले, ना पैसे. ती बीए झाल्यावर वयाच्या बावीसाव्या वर्षी अंगणवाडी सेविका म्हणून रूजू झाली आणि देऊळवाडीत रूजू झाली. गावात सर्वांशी मिळून मिसळून असल्याने ती सर्वपरिचित होती. अंगणवाडीत येणाऱ्या चिल्या पिल्यांची ती छान काळजी घेई. त्यांना अ, आ, इ, ई बाराखडी किंवा पाढे शिकवण्यात फारसे स्वारस्य नव्हते पण हिंदू सण, राम,कृष्ण यांच्या कथा, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र अशा अनेक धार्मिक गोष्टींचे पाठांतर ती मुलांकडून करून घेत असे. त्यांच्या घरात भिक्षुकी चालत असल्याने या गोष्टी तिला मुखोद्गत होत्या. अनेक धार्मिक कथा संत एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव ती लिलया मुलांना सांगत असे आणि मुले या गोष्टी तल्लीन होऊन ऐकत. शिवाजी राजे, रोहिडेश्वरावरची शपथ प्रसंग ऐकतांना मुलं गुंग होत. मोठा शिशू या गटातील मुलांना कथा, या गोष्टी ऐकतांना मजा वाटे. निरागसपणे मुल शंका विचारत, “बाईनों आमी चुकान भिजवलं तर आमची पुस्तका भिजान चोथो जातत मगे तुकारामांचे अभंग इंद्रायणीत बुडाले तरी भिजान त्याचो चोथो कसो नाय झालो?” तर तिने चांगदेवाची गोष्ट सांगताना चांगदेव वाघावर स्वार होऊन भेटीला आले हे पाहून चौदा वर्षांच्या ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली आणि त्याच्या भेटीला गेले हे सांगताच पसो म्हणालो,”बाईंनो ता भिंत चलवल्याचा माका काय खरा वाटणा नाय. आमचो रेडो पकलो एकदा पाण्यात बसलो की बापाशीन काय एव प्रयत्न केलो तरी पाण्यातसून उठाक नाय, मगे ती भिंत तर निर्जीव ती कशी चलात? शेवटी बापूस रेडीक आणून समोर उभी करता तेवा खय पकलो पाण्यातसून उठता.” या मुलांच निरिक्षण अचाट, ज्ञान अगाध. बाई कशी तरी वेळ मारून नेत. ते काही असल तरी मुलांना या बाई फार आवडायच्या कारण त्यांच टापटीप राहणं आणि मुलांसोबत मुल बनून खेळण, नाचत गाणी शिकवण. नकला करणं, ये रे ये रे पावसा पासून इवल्या इवल्याश्या टिकल्या टिकल्यांचे, देवाचं घर बाई उंचावरी, फुलपाखरू छान किती दिसते कितीतरी बडबडगीते ती अभिनयासह शिकवत असे. मुलांसोबत खिचडी खात असे. एखादे मुल रडले तर समजूत घालत असे म्हणून मुलांच्या बाई लाडक्या होत्या.
बाई रिक्षाने येत, बाईंचा शासकीय पगार पाच हजार पण त्यांच रहाणीमान उच्च, आवाज खणखणीत आणि विचार स्पष्ट. शाळा भरण्यापूर्वी मुलं हजर असत आणि शाळा सुटली तरी रेंगाळत रहात आणि बरेच वेळा दोन तीन मुलं तरी बाईंसोबत रिक्षात असत आणि घर जवळ आल की आपल्या आईला हाक मारत, “ए औशी मी आमच्या बाईंच्या रिक्षेन इलय.”, आणि बाईंना म्हणत बाई बाय बाय करत. या बाईंनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून चांगलं नाव कमावल होत म्हणूनच बाई अस काही करतील यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.
या बाईंच्या घरा शेजारी म्हाडगुत रहात होते त्यांचा मेहुणा कधी मधी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी येत असे.
मुक्काम असला की पेपर वाचण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी यांच्या घरी येत असे. ही अवघी बावीस चोविस वर्षांची आणि ते गृहस्थ पन्नाशीचे त्यामुळे ते तिला वडिलांच्या किंवा काकांच्या जागी पण वयाच्या मानाने ते तरुण दिसत आणि राहणंबोलणं यात ऐक ऐट होती हे खर. त्यांच्याकडे येतांना भेटवस्तू आणत आणि गुरूजींनी हटकल तर म्हणत, “आमच्या ताईकडे आणतो तुम्ही तिचे सख्खे शेजारी म्हणून मग…” मीरा त्यांच्याशी मोकळेपणाने बोले.
तिच्या शिक्षणा विषयी, सध्या नोकरीत असणाऱ्या स्पर्धेविषयी. नोकरीतील आरक्षणा विषयी आणि सवर्णांवर नोकरीत होणाऱ्या अन्यायाविषयी. ही चर्चा गुरूजींसमोर होत असे त्यामुळेच संशयाला थाराच नव्हता. म्हणूनच जेव्हा मीरा अचानक गायब झाली तेव्हा पाहुण्यांकडे शोध घेतला, विहीरी शोधल्या. नाईलाजाने पोलीस कंप्लेंट नोंदवली. मुंबईच्या पैपाहुण्यांना फोन लावला यात दोन दिवस निघुन गेले. अन त्याच रात्री तिचा फोन आला, “मी सुखरूप आहे माझा शोध घेऊ नका. मी लग्न केले आहे आणि मुंबईत रहाणार आहे.” गेले दोन दिवस घरात अन्न शिजले नव्हते, मिरेची आई रूक्मीणी रडून अर्धी झाली होती. तो फोन आला आणि सारेच प्रश्न संपले. कार्टीने खरच तोंड काळ केलं. पळून गेली तर स्वतःला शोभेल असा कुणी पहायचा, स्वतःच्या वयाचा विचार करून जोडीदार पहायचा तर सर्वच विचित्र, पळून गेली कोणाबरोबर तर साठ वर्षांच्या पेडणेकर बरोबर. बापाच्या वयाच्या माणसाबरोबर ज्याला विसबावीस वर्षांचा मुलगा आहे अशा व्यक्तीबरोबर पळून जातांना काहिच कस वाटल नाही? पण आता ते प्रश्न निष्पळ होते. सत्य स्विकारण भाग होत. दोन आठवड्यांनी देणेकरी उभे राहिले, टिकेकर तुमच्या मुलीला मी माझ्या नावावर सत्तर हजार रूपये कर्ज काढून दिल होत तर दुसरा म्हणाला गेले दोन अडीच वर्षांचे रिक्षेचे लाखभर रूपये भाडे तिच्याकडे बाकी आहेत. टिकेकर भटांनी कपाळावर हात मारला आणि ठाम शब्दांत सांगीतले माझी मुलगी मला मेली. मला विचारून कोणताही व्यवहार झालेला नाही. तुम्ही तिच्याकडे तुमच्या पैशाची मागणी करा. या घराशी तिचा संबंध संपला. टिकेकर त्या दिवशी प्रचंड संतापले होते. मिरेने त्यांना सर्वांसमोर मान खाली घालायला भाग पाडल होत.अवघ्या तिस एकतीस वर्षांच्या मुलीने साठ, बासष्ट वयाच्या विधूर माणसाशी पुन्हा लग्न करणे हे विपरीत होत. कोणत संसारी सुख या वयात पेडणेकर देणार होता आणि मीरा त्याच्या बावीस वर्षे वयाच्या मुलाचा स्विकार कसा करणार होती हे अनाकलनीय कोडच होत. नियती कोणत्या पुर्वजन्मीच्या कृत्याचा सूड घेत होती न कळे पण त्या महिन्या भरात टिकेकर दहा वर्षांनी वृद्ध झाले. पार रयाचं गेली . भिक्षूकी सोडून गुपचूप घरी बसावे असेही वाटू लागले पण चरितार्थासाठी बाहेर पडणे आणि कोणी मिरे विषयी विचारणा केली तर अपमान सहन करणे याला काही प्रत्यवाय नव्हता. ते विष पचवणे टिकेकर यांना भाग होते. जिच्याकडून आपल्या वृद्धपकाळात मदतीची याचना ते करणार होते, आपली काठी अशी तिची भलामण करत होते ती काठीच तुटून पडले होती.
कुठे ती मीरा अन कुठे ही कलियुगातील मीरा.