कसा हा पाऊस
पावसाचे आले दिन, परी डोळ्यात पाऊस
आड गेले तळाबुडी, आता पाण्याचाच ध्यास
ऊसासे मन, फाटली जमीन, देवास नवस
पाण्याविना कंठा सोस, मरतील गुरे दावणीस
पक्षी व्याकूळ होती, पाण्याविन कासावीस
पक्षी सोडूनीया खोपा, गेले पाण्याच्या शोधास
तळ दिसे धरणाचा, दुर्गंधी कुजल्या मातीस
खणून नेती माती, त्यांना तिचाही हव्यास
एक एक दुडीसाठी, पडे कोसाचा वनवास
थकली चालून पावले, पडे कोरड कंठास
काळी तापली बेफाम, सोडे दीर्घ उसासा
होई काहील जीवाची, जलविण जसा मासा
शेतात कोणी उभा, पाहे फाटली जमीन
निरखून पाही वर, जळे आकाश संतापानं
झाला कृषक बेभान, पेटवून दिल रान
घातली ज्वाळात उडी, शंभो नको हे जीवन
वाट पाहती लेकरे, हैराण भुकेन, तहानेन
तु कैलासी आनंदी, विष्णु करतो आराम
गेला निरोप कैलासा, त्याचं गहिवरे मन
केले तांडव सत्वरी, ब्रम्हा, विष्णू या धावून
क्रोध शंभूचा शांत, त्याची नंदीलाच जाण
भरले वरूणा कापरे, घाले हराशी लोटांगण
हात जोडूनी हरीशी, गेला विनम्र शरण
घेऊनी ढगांची वरात गेला धरेवरी धावून
उजळती दाही दिशा, चाले विजांचे तांडव
धरणी बसली मंचकी, सजे लग्नाचा मांडव
आली दाराशी वरात, वरमाला धरेच्या हाती
वरूणा पाहून लाजली, निखळून पडले मोती
वाजे तडतड ताशा, गाती मंगलाष्टके बेडूक
धारा कोसळती जोमान, चाले विजेचा नाच
मुले अंगणी नाचती, गाती, आला पाऊस पाऊस
बाप कुशीत घेई मुलांना,म्हणे सुखाचा मिळेल घास
बरसले हसत काळे मेघ, तृप्त धरा सुखावून हासे
मॉओ चा गजर करीत, मोर फुलवून पिसारा नाचे
गोठ्यातून ओरडे म्हैस, तीज हौस पाण्यात डुंबण्याची
कोंबडी चिकचिक करून बोले, तिज भिती जलधारांची
घरात गुडुप म्हातारा म्हातारी, सुनेला दोघे बहुत प्यारी
म्हणे आई, मामंजी उठा, आणली ठेचा अन भाकरी
ते ऐकता उठून बसली, आनंदली मनी म्हातारी
ईश्वरा, माझे आयुष्य दे सुनेस, दिस येऊ दे सोनेरी