कुंकू टिकली आणि बरेच काही
आत्या गावावरून कधीही आली तरी शकुंतलावर रागावयाची, “शके तुका आवशीन काय शिकवल्यान का नाय? ह्या कपाळ उघडा कित्याक? आणि ही पोरांवरी अर्धी पॅन्ट कित्याक घातलं? तुम्ही काय ख्रिस्ताव आसास काय?”
“राहू दे ग आत्या, मला नाही आवडत टिकली लावायला. आणि ही बर्म्युडा आहे, अर्धी पॅन्ट नाही. “गो, ता बर्म्युडा का काय घातलस ता तुका शोभणा नाय. मुलीच्या जातिक अर्धी पॅन्ट कित्याक? तुझ्या आवडीचा कौतुक माका सांगा नको, आधी गंध, टिकली काय ता लाव मग माझ्यासमोर ये.”
जोपर्यंत टिकली लावणार नाही आत्या उगाचच मोठ्या मोठ्याने बोलणार आणि लोकांना हसायला निमित्त मिळणार म्हणून तिने टिकली लावली. तिला माहिती होते आत्याला बोलायचा अधिकार आईलाही नव्हता आणि बाबांच्या पाठीवरची ती, तिला कस दुखवायचं म्हणून बाबा ऐकून न ऐकल्याच सोंग वठवणार. थोडक्यात आत्याचा हम करे सो कायदा ती असे पर्यंत चालणार ही काळ्या दगडावरची रेघ.
तिने टिकली लावली आणि ती हॉलमध्ये आली. तिच्या टिकलीकडे पाहून आत्याचे पित्त खवळले, “ही टिकली आसा काय? दुर्बीण लावून बघूची लागात.” बाबांकडे पहात ती म्हणाली, “रे ह्याच काय चडवाक शिकवल? हयासाठी इंग्रजी शाळेत घातलस होय रे? बामणा ना आमी, तिका एक कळणा नाय पण तासभर पुजा करतस ती कशासाठी? ह्या असल्या थेरांनी आमची संस्कृती रवात काय?”
बाबा काही बोलले नाही. तस तिला चेव आला. “आम्ही लहान असताना कुंकू लाव, केसाची चुमळण कित्याक केलस, डोंबारणीवरी रवा नको तुच सांगीस ना! आता तुझी तत्वा खय रवली रे ?” शेवटी बाबा तिच्या जवळ जाऊन म्हणाले,”सुमे, जग बदलला, तुम्ही गावात रवतास, तिकडची गोष्ट वेगळी. ह्या शहर आसा, हय आजूबाजूच्या लोंकावरी रवाचा लागता. मुला इंग्रजी शाळेत जातत थय कोणी कुंकू नाय लावणत, केसांचे वेणये नाय घालणत. तसाच ह्यांक रवाचा लागतला नायतर इतर मुली ह्यांक आपल्यात घेवचे नाय. तू त्यांचाकडे लक्ष देव नको.”
“शाळेत जातांना काय करतत ती गोष्ट वेगळी पण घरात नीट रवाक नको? त्यांनी कमरेचा सोडून डोक्याक गुठ्याळल्यानी म्हणून आमी गुठाळूया काय? आमची रितभात काय राखाक व्हयी की नको?” तिला शांत करण्याचा एकच उपाय होता, “आत्या माझे केस विंचरून दे बघ किती गुंता झालाय बघ?” शकुंतला म्हणाली आणि आत्या फणी घेऊन तिचे केस विंचरायला बसली.
“गो! किती हो गुंतो, तुझी आऊस केसात कधी फणी घालता की नाय?” “विंचरते तर, पण माझे केसच तसे आहेत त्याला ती काय करणार?” “गो तुमी काय ते शाम्पू घालतास त्याचो हो परिणाम. माझे केस बघ कसे मऊ सूत आसत ते.” तिने पुढेही सर्व सांगितलंच, रोज खोबरेल घालायला हवं, शॅम्पूने नाही तर रिठीने केस धुवायला हवे. कोरफड तेलात शिजवून ते तेल केसांना लावलं तर केस नरम होतात, जास्वंदीची पान खोबरेल तेलात उकळून लाव, असे नवे धडे आत्याने घेतलेच. कोणत्याही घरात, जुन्या-नव्या माणसांच्या विचारात मतभेद असणारच. “जूनं तेच सोनं” अस म्हणणारे असणार आणि “जुने जाऊद्या मरणा लागूनी.” असा विचार मांडणारेही असणार. तुम्ही काय घ्यायचं आणि काय नाही ते तुमच्यावर आहे.
पॉप सिंगर उषा उथप यांच मोठं ठसठसीत कुंकू किंवा केंद्रातील यापूर्वी ज्यांच भाषण म्हणजे आदर्श नमुना असायचे त्या कै. सुषमा स्वराज किंवा श्रीमती यशोमती ठाकूर किंवा रेखा गणेशन अशी किती उदाहरणे सांगावी, या महिलांचे कुंकू त्यांच्या सौंदर्यात भर घालते. “यदेव रोचते यस्मै भवेत्तत्तस्य सुन्दरम् ” कुंकू चांगलं की वाईट हा वाद व्यर्थ. ज्याला जे आवडते आणि शोभून दिसते त्यांनी ते करावं. ते करणं तस वागणं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
चार ते सहा वर्षाच्या आपल्या लहान मुलींनी शॉर्ट घालणं समजू शकतो पण जेव्हा वीस पंचवीस वर्षांची आपल्या घरातील मुलगी शॉर्ट घालून बाहेर फिरू लागते तेव्हा साहजिकच आजू बाजूच्यांचे डोळे विस्फारले जातात. “काय! लेलेंना हे चालतं? उद्या मिसेस लेलेही शॉर्ट घालून फिरू लागल्या म्हणजे?” अर्थात मिसेस लेले आपली हौस पिकनिकला पूर्ण करतात. त्यांना तशा कपड्यात कंफर्टेबल वाटत असेल तर का करु नये?” मिस्टर लेले म्हणतात,” अग तू शॉर्ट घालू नको अस नाहीच म्हणू शकत मी. फक्त शॉर्टच तर घातलीस, आणि मला चालतंय ना! तु कशाला लोकांची चिंता करतेस?” त्यांचं खरं आहे म्हणा, आम्ही लोकशाहीचा अवलंब केला आहे, लोकशाहीचे समानतेचे तत्व पाळायचे तर आचरणात समानता नको का? त्या कामावर जातात, त्यांच्या इतकं नव्हे, जास्तच पँकेज घेतात. त्या कुठे कमी पडत नाहीत मग इथे तरी त्यांनी मागे का राहावं?
कुंकू लावणे की न लावणे हा तर अगदीच साधा विषय आहे त्यात एवढं बावचळण्याची गरज काय? पण नाही आम्ही कुंकू लावणे कसं आवश्यक आहे यासाठी, कुंकू लावणे याला वैज्ञानिक कारण आहे? कपाळ पट्टीवर मध्यभागी पिच्युटरी gland असतो, यावर योग्य दाब पडल्यास मानसिक संतुलन राखता येत. ताण दूर होतो. एवढच नव्हे तर त्यामुळे कपाळावर अकाली सुरकुत्या येण टाळता येत. रक्त अभिसरण योग्य प्रकारे होत. कुंकू लावल्याने भ्रुमध्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो त्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा होतो व मुख उजळते. पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत तेवत ठेवण्यासाठी सुवासिनी स्त्रीयांनी कुंकू किंवा सिंदूर लावणे गरजेचे आहे अशी कारण देऊ लागतो. भले बहाद्दर, पण हे मात्र खरं आहे की आधी लाल गंध मग कुंकू आणि नंतर टिकली अशी स्थित्यंतरे होत गेली. कोणाला पटो किंवा न पटो बदल हा तर स्थायीभाव आहे मग या बदलाला एवढा विरोध का करावा?
असं म्हणतात की गंध हे द्रवरूप असल्याने ते कपाळावरील त्वचेशी चांगल तद्रूप होत स्त्री च सौंदर्य त्यामुळे खुलून दिसतं. तेव्हाही महिला कुंकू लावण्यासाठी मेणाचा वापर करत असत. आता मुली फाऊंडेशन करतात तस बायका कुंकू लावण्या अगोदर मेण लावत आणि त्यावर कुंकू लावत. ज्याची त्याची मर्जी. टिकलीच्या नावातच टिकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. टिकली तर टिकली नायतर पडली अशी टिकली लावायला एकदम सोप्पी. पडायला त्याहून सोप्पी. ही टिकली आधी मोठी होती, पहाता पहाता ती सुक्ष्माती सुक्ष्म कधी झाली कळलच नाही.
हिंदू धर्मात लाल गंध, कुंकू, टिकली आणि बांगड्या हे सौभाग्य अलंकार घालण शुभ लक्षण मानलं जातं पण कालापरत्वे टिकली सुक्ष्म होत अतिसूक्ष्म झाली. “कालाय तस्मै नमः” जे कुंकू टिकलीचं, तेच मंगळसूत्राचं,आधी बायका भारदस्त मंगळसूत्राची मागणी आपल्या पतीकडे करत. जास्तीत जास्त तोळ्यांच आणि लांबलचक मंगळसूत्र असणं हे सौभाग्याचे ठसठशीत लक्षण समजले जाई. हातातही पाटल्या किंवा हाताला शोभतील अशा चार सोन्याच्या बांगड्या असल्याशिवाय स्त्रीला कोणा आप्तांच्या लग्नाला जाणे कमीपणाचे वाटे. मग बाजूबंध, तोडे, नथ, कानात मोत्यांची कुडी, केसांत सोन्याचे फुल, मोत्यांची माळ असा साज शृंगार करून ती समारंभाला गेली म्हणजे तिच्या श्रीमंतीचा बोलबाला व्हायचा आणि ते दोघे कौतुकाचा विषय व्हायचे.
मंगळसूत्र घालणे, बांगड्या घालणे, अंगठ्या घालणे, कान टोचणे, नाक टोचणे पायाच्या बोटांमध्ये वेढणे घालणे या गोष्टी बाबतही नको तितका आग्रह बाळगला जात होता आजही आहे. हा फक्त संस्काराचा भाग नाही तर त्यामुळे शरीरातील विविध संस्थावर, त्यांच्या कामावर ताबा मिळवणे किंवा रक्तभिसरण यास चालना मिळते यासाठी आभुषणे वापरली जात होती अशी मल्लीनाथी कोणी केली तर काय करणार?
मेहंदीच तेच, हिंदी चित्रपटात लग्नाचा सिन असेल तर तद्वपूर्वी मेहंदी कार्यक्रम असणारच आणि नाचगाणही असणार सलमान आणि माधूरीच्या चित्रपटात मेहंदी कार्यक्रमाला चित्रपटाची पंधरा मिनिटे खर्ची घातलेली दिसतील. रीमा लागू आणि अनुपम खेरलाही नाचवत हा कार्यक्रम रंगत आणतो. लग्नघरी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आणि मेहंदी काढणे यासाठी एक दिवस राखून ठेवला जातो. श्रीमंतांच्या लग्नात ही गोष्ट ओघाने आलीच.
फार पूर्वी मेहंदी पाने,कात वगैरे एकत्र वाटून ही मेहंदी तयार होई. आता रेडीमेडचा जमाना आहे आणि त्यात कौशल्य प्राप्त असलेल्या महिला उपलब्ध असताना दगदग कोण करेल? तेव्हा साज शृंगार म्हटलं म्हणजे मेहेंदी सजावट आलीच. मेहेंदी कुठून कुठं पर्यंत काढावी याला कुठे सीमा आहे? आवड ज्याची त्याची निरुत्साही माणसांनी त्यात लक्ष घालण्याचे काम नाही. या मेहंदीने सगळ्या मंडळीचं लक्ष वेधून घ्यायचं म्हणजे ती तितकीच आकर्षक हवी. म्हणूनच रसवंती सारखे किंवा ब्युटी पार्लर सारखे मेहंदी स्टुडिओ जागोजागी उभे राहिले. महिला शृंगार करतात म्हणून फॅशन इंडस्ट्री सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
मध्यंतरी बाजीराव मस्तानी चित्रपट आला तेव्हा दिपीका पादूकोण यांचा पेहराव पाहून तशा नववारी साड्यांची, नथीची क्रेज आली होती. लग्न समारंभात तशा पेहरावात अख्ख वऱ्हाड शोभत होत. कोण म्हणतं तरुण पिढीला संस्कार नाही म्हणून? फक्त या गोष्टी ते त्यांच्या सोयीने घेतात किंवा टाकतात, शेवटी ‘Human Rights’ नावाचं काही आहे की नाही?
तर हो, हळूहळू रीतिरिवाज बदलले, सौभाग्य अलंकार बदलले. कपाळावर टिकली किंवा काही लावणं गावंढळपणा समजला जाऊ लागला. गळ्यात मंगळसूत्र घालणं पुरुष दास्यत्व समजलं जाऊ लागलं. गळ्यात सोन्याचा दागिना किंवा हातात बांगडया किंवा पाटल्या घालण कमी पणाच किंवा मोठेपणाच प्रदर्शन मांडणं समजलं जाऊ लागलं. पण क्रेझ म्हणून आता बांगड्या घातल्या तर पूर्ण हातभर घातल्या जाऊ लागल्या. जर दृष्याची गरज असेल आणि त्यावर गाणं चित्रित होणार असेल तर बांगड्या आणि अर्थात गाणं सुद्धा आलंच. आता गळ्यात मंगळसूत्र आहे की नाही ते पाहण्यासाठी बारीक नजर करावी लागते. बहुतांशी महिला मंगळसूत्र घालतही नाहीत शेवटी ते घालावे की घालू नये प्रश्न त्यांचा.
पण हातावर, पाठीवर आणि अगदी छातीवर टॅटू काढून सोशल मिडियावर प्रदर्शन करण्यात कोणालाही कमीपणा वाटेनासा झाला. अहो, कासार गेले,काचेच्या, प्लास्टिकच्या बांगड्या गेल्या आणि जागोजागी टॅटू पार्लर निघाले. टॅटू काढून घेण्यासाठी अँडव्हान्स बुकिंग करावं लागतं होत, आजही असावं. आ हा हा ! किती ही प्रगती. अहो हौसेला मोल नसतं हेच शेवटी खरं. बर हे टॅटू कशा कशाचे असतील सांगता सोय नाही, कधी तिच किंवा त्याच नाव तर कधी स्वतःच नाव कधी देवा दिकांचे फोटो तर कधी कोब्रा, कवट्या, पत्यातील बदाम, गुलाम, इस्पीक एक्का,याच्या वरताण लिखित संदेश “मै तुलसी तेरे आंगन की”.”तुझी मैना”, “जख्म तुने दिया है”. हे गोंदवण ही जुनी रीत आहे अस कुणी म्हणेलही पण पूर्वी हे गोंदवण बंजारा समाजातील रूढी होती आणि त्यामागे उद्देश होता, हा भटका समाज भटकंती करत असल्याने त्यांची आणि मुलांची ताटातूट व्हायची आपल मुल हरवलं तर मिळावं एवढाच उद्देश. त्या टॅटूचं व्यावसायीकरण होईल अस कुणी स्वप्नात पाहिलं नसेल.
विराट कोहली सारख्या काही क्रिकेटपटूंनी दंडावर, मानेवर, पाठीवर टॅटू काढून घेतला आहे. हे स्टाईल स्टेटमेंट बनलेलं फॅड आकर्षक दिसत असेल तरी त्वचेसाठी ते हानिकारक आहे. टॅटू काढतांना वापरली जाणारी सुई कोणत्या त्वचा रोगाला आमंत्रण देईल याचा नेम नाही. कायमस्वरुपी काढलेला टॅटू भविष्यात नको झाला तर ऑपरेशन शिवाय शक्य नाही. भविष्यात कोण कुठे टॅटू काढून घेतील त्याचा नेम नाही. ह्याला सौंदर्यकरण म्हणाव का? हा ज्याचा त्याचा प्रश्न.
जागोजागी फाटलेली जीन्स किंवा लो वेस्ट जीन्स, त्यावर असलेला आखुड टॉप घातल्याने सौंदर्यात कोणती भर पडते ते ईश्वर जाणे. पण शहरात कुणी ग्रामीण भागातील वयस्क व्यक्ती बऱ्याच वर्षांनी आली आणि ह्या फाटक्या जीन्स मधील सोंग त्यांनी पहिली तर कदाचित हे सुधारित दैन्य पाहून तो ढसा ढसा अश्रू गाळेल. “आरे रे रे! काय हे! किती ही बेकारी, बिचारे कसे बसे अर्ध कपड्यात वावरतात.” कोणी तरी त्यांची समजूत काढली “काका अहो ते फाटके किंवा जुने नाहीत ते महागातले कपडे आहेत. योग्य जागी फाडल्यामुळे सूंदरतेच दर्शन त्यातून घडते. गांधी नाही का पंचा आणि उपरणे इतक्याच कपड्यात वावरत, म्हंटल तर तेही अर्ध कपड्यातच होते तरी ते तुम्हाला चालले मग आमच्या कपड्यांची एवढी चर्चा कशाला?
कधी? कुठे? आणि कोणतं उदाहरण द्यायचे याच ताळतंत्र उरलेलं नाही. काका ते पाहून आणि ऐकून तीन ताड उडाले ते खाली काही आलेच नाहीत. मग रागाने बेभान होत म्हणाले, “अरे गाढवा गांधी म्हणजे देव माणूस त्यांच्याशी ह्या फाटक्या कपड्यातील माणसांची बरोबरी होईल का? त्यांनी गरीब जनता कशी दैन्यात जगते हे कळावं म्हणून पंचा, उपरणे स्वीकारले. “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे गंगू तेली. भले तुमची सुंदरता! हे फाटके कपडे सूंदर आहेत का? मग आम्ही काय घाणेरडे कपडे घातले आहेत की काय?”
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री तिरथसींग रावत म्हणाले,” घुटनेपर फटी हुई जीन्स पहनकर महिला अपने बच्चे को क्या संस्कार देगी” अर्थात त्यांच्या या विधानाला असे कपडे घालणाऱ्या समुहाने आक्षेप घेतलाच. त्यांनी केवळ महिलांना टार्गेट केल हे योग्य नव्हते.जे काही असेल ते समानतेच्या पातळीवर सांगा.
बऱ्याचदा या कपड्यातील तरुण, तरुणींच म्हणणं असतं तुम्हाला आमच्या कापड्यांकडे पाहण्याच कारणं काय? पण दोस्त हो रस्त्यावर डोळे बंद करून I mean, डोळेझाक करून चालता येईल का? आणि समजा चालण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या युवतीशी अपघात घडला तर काय?
“सुदंर किंवा आकर्षक पेहराव असावा यात वाद नाही पण शरीराचे जागोजागी प्रदर्शन व्हावे आणि लोकांनी ते थांबून किंवा मान वळवून पाहावे असा अट्टाहास नसावा.”असे आपले काकांचे मत. मी नाही म्हणत हो. आम्हा शहरवासीयांचे डोळे आता चांगले सरावले आहेत. वेगळं किंवा काही आकर्षण म्हणूनही आम्ही नाही पहात.आता अगदीच जात्याच सुंदर असणाऱ्या सुंदरीने तसे कपडे घातले तर, “मना सज्जना तू पाहू नको रे!” ,असे सांगूनही मन नाही ऐकत हो,हल्ली मनाचे श्लोक मन ऐकत नाही हेच काय ते वाईट.
सोशल होण्यास कोणाची हरकत नसावी. तरी पण सोशेल तेवढच कराव की नाही, पण त्या क्लबातही जाऊ लागल्या रमी, तिनपत्तीचे डाव टाकू लागल्या, फक्त पुरुषांना याचा मक्ता कुणी दिला आहे का?असे विचारू लागल्या.पत्ते आणि दाणापट्टे खेळण्याची ही मक्तेदारी या वीरांगनानी मोडून काढली ते धाडस आहे म्हणूनच ना? खांद्याला खांदा लावणं यापेक्षा वेगळं काय असावे? पुरुष वागतात ते समर्थनीय आणि आम्ही तस वागलो तर म्हणे धर्म बुडतो. अहा रे तुमचा धर्म, नाहीतरी द्रौपदी वस्त्र हरण झाले तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म. हे ही ह्या विरंगानंच म्हणणं हो, त्या काय म्हणाल्या त्या मी सांगतो.
त्यांचं म्हणणं अगदी एकशे एक टक्के खरं, “पुरुष तंबाखू खातात कुठेही थुंकून ठेवतात, पान खातात, बिडी,सिगारेट पितात ते योग्य कसं? ते तरी आम्हाला पटवून द्यावं. पुरुषांच्या या अयोग्य कृतीची दखल समाजाने वेळीच घेणे गरजेचे आहे. त्यांच्या दुर्गुणावर पांघरून घालण्याचे किंवा पुरुषाचा तो पुरुषार्थ असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. समानतेच्या तत्वाने उद्या आम्ही सिगार शिलगावली किंवा पान खाऊन थुंकलो तर मग तुम्ही विनाकारण तक्रार करू नका म्हणजे झाले.” हे अस महिला मंडळाने म्हटलं तर काय चूक आहे हो. शेवटी स्त्री स्वातंत्र्य म्हणून काही आहे की नाही!
यावर पुरुषांच म्हणणं स्त्रियांनी अगदी सगळच सोडलंय, स्त्री म्हणून काही लाज लज्जा हवी की नको,अहो जीन्स घालून अंग ढाकल तर का कोणाची हरकत आहे! पण लो वेस्ट जीन्स आणि त्यावर पोटाच किंवा कमरेच प्रदर्शन मांडणारा टॉप घालायचा म्हणजे थोडं जास्त होतंय अस नाही का वाटत?”. यावर स्त्रियांच म्हणणं,”आमची प्रगती आणि आमचा वेग खरंच भन्नाट आहे, पहा आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो एसटी बस ,ट्रेन, विमान चालवतो. अगदी अंतरिक्षात यान चालवण्यातही आम्ही मागे नाही हे पाहूनच यांच्या पोटात दुखतंय दुसर काय?आम्ही कसेही कपडे घालू,या पुरूषांनी मुळात मान वळवून आमच्याकडे पहाच का? आमच्याकडे पाहून मनातच खुश व्हायचं, मनातच काय ते करायच आणि काही गडबड झाली की आम्हाला दोष द्यायचा हे मुळीच योग्य नाही.
आम्ही काहीही केल तरी यांचा विरोध ठरलेला आहेच. आता जीन्स घालून वडाची पुजा केली तर बिघडत कुठे, खरं तर एकच नवरा सात जन्म पुरवायचा म्हणजे फारच जुलूम पण एखादा वेगळा सेल्फी घेता येईल, मित्र,मैत्रीणींना स्टेटस म्हणून पाहता येईल, खर तर सरप्राईज देता याव म्हणूनच मी गेले तर आमच्याच भगीनी विचित्र नजरेने पहात होत्या. त्यांना त्यातलं ग्लॅमर काय डोंबाल कळणार!
आम्ही किटी पार्टी केली, कंटाळा घालवण्यासाठी गप्पा टप्पा केल्या किंवा मग वेळ जावा म्हणून पत्यांचा नुसता डाव टाकला की या पुरुषांचा जळफळाट होतो. आम्ही किती उंची गाठली ते हे सोयीस्कर विसरतात. स्वतः गच्चीवर बसून तीन पत्ते किंवा रमी खेळतात तेव्हा यांची शोभा इतर बिल्डिंग मधून लोक बघत असणारच की. हे तिथ खुलेआम ग्लास भरणार ते यांना चालतं आणि थोडा विरंगुळा म्हणून आम्ही रमीचा डाव टाकला की ह्यांच्या पोटात गोळा येतो. म्हणे धर्म बुडवायला निघाल्यात. खेळून कुणाचा धर्म बुडल्याच कधी ऐकलंय का?
पांडव विरंगुळा म्हणून द्युत खेळत होते तेव्हा द्रौपदी सारीपाट खेळत होती तिला पांडवांनी विरोध केल्याच कुठं ऐकलं नाही. आता पत्ते खेळताना गंमत येईना म्हणून एक पेग रंगीत पेयाचा आस्वाद घेतला म्हणून काही यांचा धर्म बुडेल का? टीव्हीवर महिला जे काही करतात ते आमचे हे आवडीने बघतात. त्यांचं कौतुक करतात. इतकच कशाला यांना बारमध्ये दारू सर्व्ह करायला बायका हव्या असतात, आम्ही काही करायचं म्हंटल की मात्र यांच डोकं शिणत.
आता पत्ते खेळताना गंमत म्हणून शिगार शिलगावली तर घर डोक्यावर घ्यायची काही गरज आहे का? पण नाही. त्याची गंम्मत किती आगळी वेगळी ते झुरका घेणाऱ्या तिलाच कळणार? जर सरकारला त्यात काही दोष आढळला असता तर सुसंस्कृत मुबंई पुण्यात असे हुक्का पार्लर निघाले असते का? त्यास सरकार मान्यता आहे म्हणजे नक्कीच काही गैर नाही, “ही तो त्या राजकुमार यांचीच इच्छा.” निवांत हुक्का पिता यावा, श्रम परिहार म्हणून एखादा पेग घेता यावा, म्हणून त्यांनी Night Life जाणीवपूर्वक सुरू केले. आमच्या कित्येक व्यवसाय भगिनी राजरोस रस्त्यावर, पानपट्टी समोर उभ्या राहून ताण कमी व्हावा म्हणून सिगार पेटवतात, त्या तरी काय करतील! Law ची आणि medical ची मोठ्ठाली पुस्तक वाचून आणि कोर्टात बाजू मांडून किंवा एखाद अवघड ऑपरेशन करून दमल्यावर थोडं रिलॅक्स झालं तर यांच्या बापाचं काही कमी होणार आहे का?
आमच्या काही उच्चभ्रू महिला भगिनींना कौटुंबिक ताण सहन होत नाही. त्यांचे पुरुष मीटिंगचे कारण सांगत उशिराने घरी येतात, सतत कामावर जातात यांच्यासाठी कधी वेळ काढत नाही. या गोष्टीचा ताण सहन करायची एक सीमा असते की नाही? हा ताण कमी व्हावा म्हणून नियमित आणि ठरल्या वेळी एखादी सिगार ओढली तर ते चुकीच कसं? पुरुषांना सगळी मोकळीक, कधीही घरी या आणि म्हणा,”Sorry Darling, तू जेवून घे माझं बाहेर झालंय.”, कधी कधी तर हे एवढे टाईट असतात की त्यांना आपण बुटासह बेडवर झोपलोय याची शुद्ध नसते तरी त्यांना आम्ही काही बोलायच नाही? सकाळी उठून त्यांच Good Morning Honey, म्हणत स्वागत करायचं, त्यांना बेड टी द्यायचा आणि रात्री काय घडलं त्याचा उल्लेखही करायचा नाही. हे म्हणजे अतीच झालं.
बर यांच स्टेटस जपण्यासाठी जर जरा चांगले कपडे घातले की इतर लोकांच्या भुवया उंचावतात,आम्हा उच्चभ्रू कुटुंबातील महिलांना सामान्य महिले सारख वागून कस चालेल? आमचं आणि अर्थात आमच्या यांच स्टॅण्डर्ड जपायला हवं की नको? मेहेर जेसीया,अशोक शेट्टी, टीना शहा, रॉनी कौल, असे कितीतरी गुरू या क्षेत्रात मुलांचं करिअर घडवण्यासाठी उभे असतांना आम्ही काकू सारख का जगावं? आमच्या सुंदर दिसण्याचा आणि राहण्याचा उपयोग करिअर डेव्हलप करून पैसे कमवण्यासाठी का करू नये? जो पर्यंत हे सुंदर शरीर आणि दुसऱ्याला इंप्रेस करण्याची क्षमता आणि कला आहे तोवर आमची रोजी रोटी. हे महिलांचा अस रोखठोक ऐकलं की निरुत्तर व्हाव लागतं. पैसे कमावण्यासाठी सर्वांकडे बुद्धी असेलच असे नाही. कोणकडे उच्च शिक्षण, कोणाकडे बुद्धिमत्ता, कोणाकडे हजरजबाबीपणा, कोणाकडे सुंदर चेहरा,कोणाकडे कला.शेवटी जगण्यासाठी “survival of the Fittest.” हेच खरं. जर आम्ही मॉडेल म्हणून काम केलं तर त्यात चूक आहे का? विविध उत्पादक कंपन्यांना आकर्षक चेहरा,केशभूषा,आरोग्य असणारे मुलगे किंवा पुरुष आणि मुली किंवा स्त्रिया हव्या असतात, सुश्मिता सेन, आदित्य रॉय, अश्या मॉडेल जवळून स्फूर्ती घेऊनच या क्षेत्रात इतर मुले करिअर करत आहेत. शेवटी सन्मानपूर्वक चरितार्थ चालवण्याच साधन हवं हेच सत्य.
काही रेप्युटेड ब्रँड आणि त्यांचे कपडे आणि वस्त्र प्रावरणे ही आमच्या सारख्या महिलांशिवाय घेणार कोण? शेवटी कारागीर, कामगार,डिझायनर, यांच पोट या व्यवसायावर आहे हे नाकारून कसं चालेल! आम्ही हे कपडे स्वतःहुन घेत नाही काही. आमच्या ह्यांनाच तस वाटते,हेच कधी कधी पार्टीला नेताना म्हणतात “डार्लिंग, आज तुम ओ अँडमे सोना पेहनती है वैसा पेहनो.” त्या प्रसिद्ध मॉडेलचा तो सुट बघूनच तर ह्यांनी माझ्यासाठी हा युनिक पिस निवडला. ज्या मदनिकांनी कपड्यांची क्रेज निर्माण केली त्यांना बोलायची कोणाची शामत नाही उलट त्यांना अवॉर्ड देणार म्हणूनच त्या कपड्यात मला पाहिल्यावर जर यांच दिल खुश होते म्हणून तर मी तस रहाण्याचा प्रयत्न करते.
यांचे स्टेट्स राखण्यासाठी मग आम्ही थोड ग्लँमरस कपडे वापरले तर लोकांनी गळा काढण्याची गरज काय? पूजा बेदी, मंदिर,मलायका, जॅकलिन, डझनभर कपूर भगिनी यांना फॉलो करणं हा काही गुन्हा आहे का? आता आमचे हे अशा आधुनिक कपड्यांचे वेड उत्पादक कंपन्याच्या पथ्यावर पडले म्हणजे इंडस्ट्रीचा फायदाच तर झाला. ही उत्पादने वापरल्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो हे उगाच नावे ठेवणाऱ्या या मुर्खांच्या लक्षात का येत नाही?
अक्षय वेगवेगळ्या जाहिराती मधून दिवसातून अनेकदा दिसतो,मिलिंद सोमण दिसतो, शाहरुख,सलमान आणखी कितीतरी हिरो अगदी अर्धे कपडे घालूनच जाहिराती करतत आणि त्याचा तो लुक आम्हाला आवडतो पण तस आम्ही जाहीर बोललो तर मात्र यांच्या डोक्यात जाते हे बरोबर का? आम्ही असे लेटेस्ट कपडे खरेदी करतो म्हणूनच तर प्रोडक्ट प्रपोगंडा होतो. जाहिरात कंपन्यांना चांगले कळत असल्यानेच त्यांची उत्पादन खप वाढावा म्हणून तर आम्हाला zee Award, IFFA Award, अशा कार्यक्रमाचे पासेस पाठवले जातात.या कार्यक्रमात स आम्ही हजेरी न लावून कस चालेल ?
जे कपड्यांचं तेच लिपस्टिक, आयब्रो, शाम्पू,फेस पॅक यांच.शाम्पू बद्दल तितक तुम्ही बोलणार नाहीत कारण तुम्हालाच वाटतं ना आपल्या बायकोचे केस मुलायम असावेत,चमकावेत म्हणून तुम्हीच तर Vedix, Mamaaearth, wow Skin, Dove, Himalayan Indulekha, असे नको नको ते ब्रँड try करायला सांगता, आणि माझ्या मुलायम केसांचं कौतूक करता. मी स्वतः मात्र थोडे स्टॅंडर्ड, Maybelline, Blue Heaven,Swiss beauty,Lakme,miss Claire,Lenphor Mars Micro,Firtszon,Meesho ह्या आयब्रोची ऑर्डर दिली तर उगाचच घर डोक्यावर घेता. म्हणे वेस्टज ऑफ मनी. हे ढोसतात ना ते लिकर पाणी! आयब्रोनी आम्ही थोडं अधीकच सुंदर दिसत असू, आणि त्यासाठी थोडे पैसे खर्च झाले तर आकांडतांडव करायची गरज आहे का?
तुम्ही घरी नसता तेव्हा beauty Sense म्हणून माझ्या पॉकेट मनी मधून Blue Heaven, Just herbs, Myglamm, Amag Beauty, Foxy, Beautivia, Meesho ,Miss rise Hot, Lake,Street Wear, Renee, या सारखे लिपस्टिक ब्रँड वापरून थोडं सेक्सि दिसण्याचा प्रयत्न केला तर काय चुकलं हो? दुसऱ्या मुलींच्या ओठांवर पाहून तिची तारीफ करायची आणि घरात मुलींनी केल की खडे बोल सूनवायचे हे डबल स्टँडर्स तुम्हाला बरं जमत. म्हणजे बाहेर आम्ही किती सुधारणावादी आहोत दाखवायचे आणि घरात मात्र स्त्रीवर बंधनेच बंधने.
आता विविध वाहिन्या आम्हा स्त्रियांना वाव देण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित करत असतील आणि त्यात आम्हा हाऊस वाईफ महिलांना थोडी संधी मिळाली तर चांगले आहे की, Party Manners आम्हाला कळणार कसे? वाहिन्या असे कार्यक्रम आयोजित करून महिलांचा सन्मान करत आहे. हिरकणी,सह्याद्री अवॉर्ड मिळाला तर तुम्हाला आवडतो ना? आमची आवड थोडी वेगळी आहे. अल्फा अवॉर्ड सारख्या कार्यक्रमात आमच्या आवडत्या मालिकेतील सहभागी होणार कलाकार आणि हजेरी लावणारे चित्रपट किंवा मालिका कलाकार यांची मांदियाळी यांची भेट होण्याचा योग येत असेल तर त्यास आम्ही हजेरी का लावू नये?
नवीन फॅशनेबल कपड्यात एकत्र, एकाच व्यासपीठावर नाट्यश्रुष्टी, चित्रपट कलाकार दिसू लागली तर त्याच स्वागत व्हाय.ला नको का? त्यांनाही थोडा मोकळा वेळ मिळाला तर आनंदच आहे. या कार्यक्रमाच्या निमिताने, एक वेगळे अटायर वाटल्याने Middle class घरातील महिलांना त्यांची फॅशन उचलावी वाटले तर काय नवल.
आता ह्या कपड्यांची fashion बाजारात यायला फारसा अवधी लागत नाही. अभिनेते आणि अभिनेत्र्या घालतात तसेच कपडे शरीराला योग्य बसतात आणि आकर्षक दिसतात. शरीराचे सौंदर्य हे दाखवण्यासाठी असे नवीन कपडे घालणे गरजेचे आहे असा समज नवीन पिढीत तयार झाला तर त्यात नवल कसले? कॉलेज गोईंग मूल, मुली यांच हेच तर एन्जॉय करायचं आणि नवीन काही ट्राय करायचं वय असते. अर्थात हे जवळजवळ सगळ्याच महिला मंडळाचे मत आहे बरे का? त्यांना त्यांच्या तरुण वयात ज्या गोष्टी करणे जमले नाही त्या गोष्टी आपल्या मुलीला मिळाव्या असा प्रत्येक महिलेचा आग्रह असतो नव्हे त्या गोष्टी मुलीला मिळाव्या या साठी त्या नवऱ्याशी पंगा घ्यायला तयार असतात.
काही महिलांचं मात्र एकदम भिन्न आहे, “टीव्हीवर जी काही थेर चालल्यात ना त्यामुळेच सगळी वाट लागल्याय हो. अहो वहिनी तुम्हाला सांगते मी किचनमध्ये मर मर मरून यांच्या साठी स्वयंपाक करते तर निट गिळाव की नाही, पण यांच सगळ लक्ष त्या सिरियल मधील नटव्यांकडे, टिव्हीच्या अगदी जवळ बसून बघत असतात. काय मेल त्या नट्यांना सोन लागलय तेच कळत नाही.” कधी त्यांना प्रेमाने विचारल,”अहो! भाजी कशी झाली आहे?” तर यांना ते ऐकूच येत नाही, ऐकू येईलच कस? सगळ लक्ष मेलं त्या कमी कपड्यात मुरडणाऱ्या नट्यांकडे असल्यावर ऐकू येईलच कस?” असे संवाद दुपारच्या वेळेत middle class society ऐकू आले तर नवल वाटू नये.
समाजात आजही असा एक गट आहे की तो या बदलत्या स्वरूपापासून खूप दूर आहे.आपल्या सुनेने विचित्र कपडे निदान आपल्या आजूबाजूच्या घरातील पाहतील किंवा त्यांना दिसतील असे घालू नये असे त्यांना वाटते. त्यांच स्टेटस त्या सोसायटी मध्ये खराब होतं ना. अर्थात हाच नियम त्या आपल्या मुलींना लावू गेल्यास त्यांचं हे मत किती टिकेल? की मुलं त्या विचारांना केराची टोपली दाखवतील हे त्या सांगू शकणार नाही.”माझी सून त्यातली नाही हो. माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाही.” हे पालुपद त्यांना सांगता यावं या करिता सुनेवर अन्याय झाला तरी चालेल पण तिच्या मनाचा विचार होईल आणि तिला कपड्यांची किंवा कुणाशी मोकळेपणे बोलण्याची मोकळीक मिळेल असे नाही.
“शिक्षण घेतलं म्हणून काही अस अगदीच सर्व सोडून दिल्या सारख वागायला पाहिजे का?” त्यांचा प्रश्न. बाजारात ह्या गेल्या की त्यांनाही ह्या चकचकीत कपड्यांचा मोह होतोच पण अगदीच अंग उघड टाकणारे कपडे घालायचे म्हणजे जरा अतीच नाही का? त्यांना हे ही कबुल आहे की महिलांच्या गरजा आणि त्यांची विविध खरेदी यामुळेच बाजारपेठ नक्कीच वाढली पण आपल्या घरासाठी हे योग्य की अयोग्य याचा विचार करण्याची वेळ आली की अशा अर्ध कपड्यात आपल्या मुलांनी किंवा सुनेने आजी आजोबा समोर किंवा भावंडांसमोर जायचं म्हणजे?
अनुनय करणे फार सोप्पे, पण अनुनय का करावा? दुर्दैव हेच की सारासार विचार न करता स्टेटस वाढावे म्हणून आम्ही चार चौघी तशाच वागू लागलो.शरीर ढाकण्यात आणि सौंदर्य लपवण्यात काय हशील त्यापेक्षा ते दाखवणे आणि स्वतःचे कौतुक करून घेणे कधीही योग्य हा विचार बळावू लागला.आणि विविध जाहिरातींनी त्याला खतपाणी घातले तर मग घरापर्यंत ते पोचणार यात शंकाच नाही.
मी सुंदर होणारचा जप सुरू झाला आणि सुंदरता जपण्यासाठी बाजारात मिळतील ती सौंदर्य प्रसाधने घरी आली. मनाची सुंदरता जपण्यापेक्षा शरीराची सुंदरता बाह्यांगी दाखवण्याची स्पर्धा वाढली.ही उत्पादने विकली जावी म्हणून त्यांची जाहिरात करण्यासाठी रॅम्प वॉक नावच आणि मॉडेलिंगच भूत मानगुटीवर बसल. सुंदर असणाऱ्या व्यक्तीला सुंदर दिसण्यासाठी वेगळं काही करावं लागतं नाही पण मार्केट मधील स्पर्धा वाढली आणि स्वतःच अस्तित्व अर्थात नोकरीही टिकवण्यासाठी स्त्रीला सुंदर दिसणं गरजेचं झालं. थोडक्यात सुंदर दिसणं हा व्यवसायाचा अपरिहार्य भाग बनला. आम्ही स्त्रीच्या सौंदर्याचा व्यावसायिक गणिती वापर करून तिला नोटा छापायचे मशीन बनवले.
मग अपरिहार्यता म्हणून डोक्यावरचे कुंकू, टिकली गेली आणि सौंदर्याची नवी परिमाणे तयार झाली. शरीराचे उत्तान प्रदर्शन जेवढे जास्त तेवढी त्या स्त्रीच्या कामाचे मूल्य जास्त अशी नवी परिभाषा समाजात आणि इंडस्ट्रीत तयार झाली. अर्थात स्वतःसाठी जास्त पैश्याची गरज म्हणून, मनात असो वा नसो तिला कॉम्प्रेमाईज करत आणि व्यवसायात आपली मागणी टिकून राहावी म्हणून काही गोष्टी नजरेआड करत जगावे लागले.”विकेल तेच टिकेल.” या नव्या सुत्रात तिला मनाचे स्वातंत्र्य उरले नाही मात्र उपभोगाचे स्वातंत्र्य तिला प्राप्त झाले.
या गोष्टींचा परिणाम व्हायचा तोच झाला,महिलांची आर्थिक सुबत्ता वाढली,अवलंबित्व कमी झाले मात्र मानसिक परिपक्वता आणि मनाचे स्वास्थ्य तिचे काय? मानसिक स्थिती डळमळीत झाली,योग्य आणि अयोग्य यांच्या गुंत्यात मन अस्थिर झाले. मनातील टिकलीने भस्मासुराचे रूप घेतले. या भस्मासुराने तिला अनितीच्या मार्गावर नेले. हवे ते मिळवण्यासाठी कोणतीही पातळी गाठण्याची मानसिकता त्यातून तयार झाली. अधःपतन सुरू झाले की थांबवणे अवघड असते हेच खरे. मग मनावरील जखमांचा विसर पडावा म्हणून मद्य, मादक द्रव्य किंवा अजून काही. याच नशेत असल्यावर हातून गैर किंवा अनैतिक काही घडू शकते याची तिला जाणीव नव्हती असे नव्हते पण – – – !
आता कोणत्या गोष्टी कुठे कराव्या या बाबत तिचे नियम शिथिल झाले. जी गोष्ट घरीही उघडपणे करण्याची तिला लाज वाटत होती तीच गोष्ट उघडपणे, राजरोस करण्यास ती धजाऊ लागली. किंबहुना तोच तिचा स्टेटस सिम्बॉल बनला. बिंधास्त जगणे अंगवळणी पडले. बऱ्याच अभिनेत्री आणि अर्थात अभनेते रात्रीची पार्टी संपवून घरी निघतात तेव्हा दारूच्या नशेतच गाडी चालवत.त्या वेळेस ट्रॅफिक हवालदार किंवा पोलिसांनी त्यांना पकडले की जो तमाशा करतात तो पहिला की हे अभिनेते किंवा अभनेत्री कोणती छाप समाजावर सोडत आहेत? असा प्रश्न पडतो. काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
कुंकू की टिकली हा वाद केव्हाच तर संपला. आता प्रसाधनांची प्रचंड मालिका बाजारात उपलब्ध असतांना, ही प्रसाधने वापरावी म्हणून जाहिरातींचा सतत भडिमार होत असताना कोणी अस्पर्श राहिलच कसे? या पैकी बरीच उत्पादने आपल्या कामाची नाहीत किंवा त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात हे माहीत असूनही आम्ही ही उत्पादने वापरू लागलो तर त्याची सवय होणारच.
म्हणून घरी आपल्या मुलांना योग्य आणि अयोग्य याची जाणीव योग्य वयात होणे गरजेचे आहे. नको त्या गोष्टीला प्रोत्साहन देणे थांबवा. अन्यथा आज मुलं लहान आहे म्हणून त्याच्या ज्या कृतीचे तुम्ही समर्थन कराल तीच कृती भविष्यासाठी त्यांना मारक ठरेल याची जाणीव ठेवा. कोणत्या गुणांची वाहवा करावी त्याच सोयर सुतक कुणी बाळगतांना दिसत नाही. मुलगा किंवा मुलगी हा भेद नक्कीच नको पण मुलगी आहे मग तिने थोडं नटले, मुरडले तर काय झाले ? असे म्हणणे किंवा तिला लहान वयात अति स्वातंत्र्य देणे.
घरीदारी मुलं लहान असतांना जाणीव पूर्वक मुलांचा पोशाख घालणे भविष्यात संघर्षाची नांदी ठरू शकते. घरातून बाहेर पडून स्त्री स्वतंत्र झाली आणि स्वतःची तिला नव्याने ओळख झाली, चूल आणि मूल या पलीकडे स्वतःचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती अबाधित ठेवण्याची क्षमता तिच्यात निर्माण झाली ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे पण स्वभाव आणि त्यामुळे चुकीचे वागणे यावर बंधन नसले तर विनाश अटळ असतो ह्या वास्तवाचे भान जपणे गरजेचे आहे.
भपकेबाज कपड्यात आणि बेलगाम वागण्यावर तुमची प्रसिद्धी अवलंबून नाही. तुमचे राहणीमान साधे असले तरी तुमचे बोलणे आणि वागणे आणि तुमची कामावर असणारी निष्ठा, कार्य तत्परता हेच गुण महत्वाचे आहेत. यातच मनाचे सौंदर्य आहे. भपकेबाज राहिल्याने चार दिवस चांदणी चमकेल कदाचित या सौंदर्यपूर्ण वागण्याची चर्चा होईल,वाहवा होईल परंतु साधेपण जपले तरच तिच्यातील अभिव्यक्ती आणि मातृत्व दोन्ही टिकेल.तेव्हा कुंकू किंवा टिकली नसली तरी बिघडणार नाही मात्र मनातील संस्काराची टिकली टिकलीच पाहिजे, तेच आपले वैभव आहे.
चेहऱ्यावरच सौंदर्य, ग्लामर हे चार दिवसांच आहे, वय वाढत जाईल तस हे सौंदर्य कमु होईल पण मनाची सुंदरता कमी होणार नाही तर वयानुसार आणि अनुभवानंतर ती परिपक्व होईल. कोणते कपडे घातले म्हणजे आपण सुंदर दिसतो हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे पण आमच्या गावाकडे म्हण आहे दशावतारी रात्री असतो राजा आणि सकाळी कपाळावर बोजा. तेव्हा आपला साज शृंगार उतरून ठेवल्या नंतर तुम्ही सुंदर दिसता का हे मनावर आहे. तुमच्या मनात दुसऱ्या विषयी आदर आणि सद्भावना असेल, प्रेम असेल तर तुम्ही सर्वसाधारण असलात तरी सुंदर दिसाल. तेव्हा सगळ काही कुंकू टिकली लावण्यावर नाही किंवा झगमगीत कपडे घालण्यावरही नाही तर तुमच्या मनाच्या सुंदरतेवर आहे.
Nice post. I learn something new and challenging on sites I stumbleupon on a daily basis. Its always helpful to read through articles from other writers and use something from their web sites.
छान लेख आहे सर.