गजालीक कारण की भाग 2
घराकडली चर्चा पदीच्या कानावर गेली तसो तो म्हणालो. “आवशी तू माझ्या लग्नाची चिंता करण्याची गरजच न्हय, मी पोरग्या बघलय. जो पर्यंत माझ्याकडे पुरेसे पैसे जमा होणत नाय लग्नाचो विषय कोणी काढता नये. माका घरात सुधारणा करून घेवची हां, दादा गावचे पोलीस पाटील आणि घराचे भिंती मातीचे, इतक्या वर्षात घराक घराक चिरे घालूक दादांका जमला नाय, पाटीलकी काय करूची हां? दोन खोलये तरी चिरेबंदी व्हये, घरात संडासबाथरूम व्हयो. रात्रीच्या वक्ताक बाई माणसाक बाहेर जाऊक नको, नवीन स्कुटर घेवची हा. मगे काय ता बघू.” “तु ह्या सगळा करिस्तोवर आमी वरचो रस्तो धरलो तर उपेग काय? इतकी सगळी सुधारणा करुन घेवची म्हणतंस तर पैसे खयसून आणतस? सासरो हुंडो देतलो काय? जिच्यासाठी सगळे सोई करतस ता कोणाचा पोरग्या हा ता तरी सांग? जमीनदाराचा हां, का मामलेदाराचा?” “कोणाचाव का असेना? तिच्यावांगडा संसार मी करतलय, माका ता पास हा, प्रश्न सरलो.”
आवशीन कपळावर हात मारलो. “झिला म्हणजे आता आमची गरज सरली म्हण की, वेगळो रवतलस की काय? का मगे घरजावई जातलं? पोरग्या कोणाचाव असला तरी आपल्या घरातले रीती रिवाज तिका कळाक व्हये मां! का सगळा सोडून कमरेक गुठाळतलस?” पदलो चिडलो, “ह्याच तां, ती घराक येण्या अदोगर तुमची नाटका सुरू झाली, तिका तुमच्या बरोबर रवाक वेळच नाय. ती माझ्यावरी गाडीयेत धंदो करता. गाडीयेत नाश्तो विकता. आंबोळी -चटणी, घावणे, पानगे, ऐलापे, शिरवाळे, एकदम फेमस हां, रत्नागिरी येईसर तिचो माल सरता. परतीच्या ट्रिपीक मस्त आराम करता.”
“बाय माजे! रे झिला, सांगतस काय? बाईमाणूस गाडीयेत धंदो करता, कमाल झाली. मेल्या आमच्या खानदानीत कुणी असलो धंदो करूक नाय. तुका तिच गावली काय रे? लोक आमच्या तोंडात शाण घालतीत. धंद्याची आवडच आसा तर गावात दुकान काडूक सांग, गाडीयेत फिरुन ही धंदो करतली, दमान घराकडे इली तर तिचीच सेवा करूची लागात, आमका तिचो काय उपयोग?” “आवशी, ह्याच ता, तू वाकड्यात जाऊनच विचार करशीत तर तुझ्या बरोबर बोलण्यात अर्थ काय रवलो. तुका ती तुझ्या घरात नको तर मगे माझो नाईलाज हां.”
“म्हंजे, तुका काय म्हणुचा हां,सपष्ट बोल तरी, काय करुचा ठरवलस? , आमका सोडून तिच्या घराकडे रवाक जातलस की काय?” “आवशी, शहरात लग्न झालेली चेडवा काय काय उद्योग करतत, कोणी कपडे शिवता, कोणी ब्युटी पार्लर चलवतत, कोणी पोळी-भाजी सेंटर चलवतत कोणी पापड,सांडगे बनवून विकतत. सरकार त्यांका हिरकणी पुरस्कार देता. टिव्हीवर त्यांची मुलाखात घेतत. आमच्या कोकणात सगळाच उरफाटा, हय कोणाक कोणाचा कौतुकच नाय, आमच्या पुष्पाचा नाव यूट्यूबवर टाकलस तर तीचे किती सबस्क्रायबर आसत ती किती फेमस आसा ता कळात, तुका कायेव वाटो, मी आणि पुष्पा लगीन करतलंव.”
“रे काळतोंड्या, बापाशीक ह्या कळला तर तो तुका सोमतो भायलो करीत, तो गावचो पाटील आणि सुन गाडियेत आंबोळी विकता, लोक काय म्हणतीत? जरा विचार तरी कर. आपल्या गावत महिला उद्योग आसा, ती पावसकरीण आणि तिचो ग्रुप घरघंटी, डंको घेऊन मसाले, पिठी दळतत. पापड, बेसन, लोणची करून विकतत, खय फिराक नको, का जाऊक नको. दुकानावर माल ठेवलो की खपता, तुझ्या पुष्पाक महिला बचत गटात त्यांच्या ग्रुपमध्ये घाल. तिचो वेळ जाईत आणि घराकडे लक्ष रवातं.” “आवशी ता नंतर बघूक येईत, आता तरी तिचो धंदो जोरात चलता. बरी कमाई हां. एकदा गिराईक तुटला तर भारी पडात. आमचा एकदम ठरलाहा, तू दादांच्या कानावर घाल, गे तुमका व्यवहार कळना नाय, ता रोज पाचशे रूपये कमविता, दादांका पाटलकीचे, सरकार सहा हजार वर्षाक एकदा देता. तू दादांका समजावून सांग. चल मी चललय, माल भरुचो हा, तुझ्या बरोबर वेळ घालवून माझा पाँट भरुचा नाय.”
पदलो गाडीत धंदो करणाऱ्या चेडवा वांगडा लगीन करतलो ऐकून बाबल्या मसूरकराचा टाळक्या तापला. पदीच्या आवशीसमोर त्यांनी उच्छाद केलो, “रे आमच्या घराण्यात असली कामा बायकांनी करूक नाय, तिका शिवणकाम करू दे, न पेक्षा बचत गटाचा काम करू दे. गाय,म्हशी पाळू दे, गाडीयेत फिरून आंबोळी घेता का? आंबोळी sss हाळी मारण्यात फिरण्यात काय मजा? लोक नावा ठेवतीत. बाई माणूस असून पुरषावरी गाडीयेत फिरता.” पदी संतापलो, “मी गाडीयेत माल विकून पैसे कमवतय ते चलतत, त्याच पैशातून घरात सुधारणा करतय मां. माझ्या बरोबर गावातली दोन चार पोरा धंदो करतत आणि घर चलवतत ता चलता पण बाई माणसान धंदो केलेलो चलणा नाय हेतूर अर्थ हा काय? बाईन हॉटेल चलवला तर योग्य पण तेच वस्तू फिरान खपवले तर अयोग्य ह्याका काय लॉजिक आसा काय? मुंबईत ग्रँज्युएट मुली कंपनीचो माल सोसायटीत दारावर जाऊन विकतत, तुमका दुनियादारी काय ठावूक हां, तुमी रवलास गावठणात. तुमका तालुक्यात काय चलता ताव ठाऊक नसात.आपली मालवणी पोरगी स्वतःच्या हिंमतीवर धंदो करता याचो अभिमान वाटाक व्हयो. मी तिका शब्द दिलेलो हा,आता तेतूर बदल शक्य नाही.”
‘पुष्पा’ विषय चाळवल्यापासून घरातली शांती गेली. मुंबई वरसून थोरलो झील ,दिलपो इलो त्यांनी पद्याची समजूत काढली. “रे पद्या, तू गाडीयेत माल विकणा आणि बाई माणसान विकणा काय फरक आसा की नाय? आपल्या समाजात व्हय तसला नाय चलणा, तुका लग्नाची इतकी घाय काय झालीहा?” पदलो चिडलो, “बंधुराज आता तुमीच समजुत काडुचे रवलास, मुंबईत सलुनमध्ये बायका केस कापतत ता चलता? हॉटेल, बार मध्ये बाई वेटर म्हणान काम करता ता चलता फक्त गाडीयेत बाई फिरून माल विकता तर तुमका ऑब्जक्शन हां. माका ही तुमची निती मान्य न्हय.” आवशीन पण बाबापुता करून खूप समज दिली पण पदलो ठाम रवलो. बापाशीचो विरोध असून देखील पदीन पुष्षा दळवीशी सावंतवाडीक जाऊन रजिस्टर लगीन केल्यान.
पुष्पा दिसाक देखणी होतीच पण अंगा खांद्यान भरदार होती. आवाजव गोड होतो. बापाशीची कुडाळ स्टँडवर पानाची टपरी होती. आता ती भाऊ चलवीत होतो. अगोदर बापूस सग्यासोयऱ्याकडे जावचो असलो की पुष्पा पानाची टपरी सांभाळी. पदीचो बापूस पोलीस पाटील, घरी दोन जोताची शेती, दारात धा, विस धरते माड तरी झिलाक भिकेचे डोहाळे लागले होते. दिपलो सालस, दिसाक बरो म्हणानच पुष्पान पदीक सिग्नल दिलो. साक्षीदार म्हणान दोन मित्रांनी सय केली. गळ्यात खोटा मंगळसूत्र आणि बेंटेक्सची काकणा घालून पदी पुष्पाक घेऊन घरी इलो. आवशीन प्रथेप्रमाणे दोघांच्या डोळ्याक पाणी लावून, पायावर पाणी घातला. कणकेचो गोळो दूर फेकलो. दोघावं बापाशीच्या पाया पडूक गेली तर बाबलो मसूरकर झिलाक टाकून बोललो, घराची पायरी चडा नको म्हणालो.
पदीन पुष्पाक या सगळ्याची जाणीव अगोदरच करून दिली होती. पुष्पा समजुतदार, सरळ दादांचे पाय धरून बोलली. “मामा, तुमका न भेटता, सवरता व्हयतो निर्णय घेतलो, आमचा चुकला. तुमचा नाव ऐकून बापाशीचा घर सोडून मी इलय. तुमी जा म्हटलास तरी जावचय नाय.” बाबलो मसूरकर काय ऐक बोलाक नाय,पुष्पा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत बोलली. “मामा तुमी करशात ती शिक्षा मान्य. आता या घराची पायरी ह्याच माझा माहेर.” पदीची थोरली बहिण त्याच दिसाक माहेराक इली होती. पदीचा आणि तिचा मोबाईलवर बोलणा झाला असतला. ती बापाशीची समजूत काडत म्हणाली, “दादानु पद्याक ता पास हां, त्यानी लगीन केल्यानी, आता बरा वाईट बघीत रवान कसा चलात? तुमीच मोठ्या मनान त्यांका माफ करून आशीर्वाद देवूक व्हये. तुमका आनंद होऊक व्हयो, पद्यान तुमचो खर्च वाचवलो. तुमका नाय बगल्यानी तर चो विषय वेगळो. पुष्पा दिसाक, वागाक बरी वाटता. आमची आऊस खमकी आसा, तुम्ही टेंशन घेऊ नका. सगळा बराच होईत.” बाबलो मसूरकर चेडवाच्या सांण्यान वरमलो तरी झिलाक म्हणालो, “तू स्वतः च्या मनान ह्या काय केलस ता काय माका पास नाय तुझी बहिण सांगता म्हणाण मी शांत रवलय.” न इलाज म्हणान त्यांनी दोघांका आशीर्वाद दिलो.
चार सा महिने पदीच्या घरात रोज बिनकारणाचा भांडण ठरलेला होता. हळूहळू दोघावं सरावली, सासू-सुनेची मैत्री झाली. सासू, सुनेक मदत करू लागली आणि मसूरकरीण सुनेच्या धंद्यात रमली. पदल्या पुष्पाचो संसार सुरू झालो. रोज फाटफटीक उठून पदल्याची आऊस शे दिडशे आंबोळे, घावने तयार करूनं सुनेक डबो भरून देय. सून आणि झील कुडाळ ते रत्नागिरी माल विकीत. रोज आठशे नवशे घरी येऊक लागले.
पुष्पाच्या संसाराची गाडी कोकण रेल्वेच्या वेगान धावुक लागली. रोज दोघाव स्कुटर वरून घराक येईत. येतांना घराक काय व्हया नको ता आणीत. बघता बघता वरीस सरला आणि पुष्पा गरोदर रवली. मसूरकरणीन सातव्या महिन्यात ओटी भरण्याचो कार्यक्रम केलो पुष्पाची आऊस आणि भाऊ ओटी भरण्याच्या कार्यक्रमाक खण, नारळ, वेणी, वेफर, पेढे पहिल्यांदा इले. अवाठातल्या सवाष्णी बोलवून चहा पाणी आणि हळदी कुंकू केला. पुष्पा, आठव्या महिन्यात ती बाळंतपणाक माहेराक गेली. नववो महिनो सरता सरता पुष्पाक चेडू झाला.पदी आवशी बरोबर चेडवाक बघूक कुडाळाक गेले. ‘पयली बेटी धनाची पेटी’ पदीच्या सासवेन नातीचो बारसो धमधडाक्यात केलो. पदीच्या बरोबरची मित्रमंडळी बारशाक इली होती दिवा गाडीयेवरसून, गंमत म्हणान चेडवाचा नाव पुष्पानी ‘दिव्या’ ठेवल्यान. लग्न रजिस्टर झाल्यामुळे पुष्पाच्या आवशीक लग्नाचो काय एक खर्च झालो नव्हतो म्हणानच, पदीच्या सासवेन,जावयाक आणि नातीक सोन्याची चेन घातली. दोन महिन्यानी पदीच्या सासवेन चेडवाक सासरी पोचती केली. चेडू झाल्यानंतर दिव्या अंगावर दूध पित होता म्हणान पुष्पान स महिने गाडीयेक माल घेऊन जाणा बंद केला होता पण घरखर्च वाढलो. ती पदीक थोडे आंबोळे, घावणे करून देय पण लोकांच्या पचनी पडय ना. दोन तीन दिवस अर्धो माल टाकून देवची पाळी इली,नुकसान झाला. पदीची पिरपिर वाढली त्यांच्यात तंटे होऊक लागले. पुष्पाच्या लक्षात इला, जर मी चेडवसाठी घराकडे रवलय तर अशीच भांडणा होतली.
न इलाज म्हणान पुष्पा म्हाल घेऊन जाऊक लागली, चेडवाक सासवेच्या जीवावर टाकून जाताना लय जड जाय पण दुसरो पर्याय नव्हतो. सासू नातीची काळजी घेय, दूध पिण्याचा टाईम झाला की दिव्या आकांत करी.पुष्पा मुलीक दूध पाजून जाय तरीपण दिव्याची तब्येत बिघडूक लागली. शेवटी पुष्पाक चेडवासाठी धंदो बंद करुचो लागलो. पुष्षाची कमाई बंद झाल्यावर, पदल्यावरचो लोड वाढलो. कमाई असली तरी खर्च वाढले. त्यात त्याका मित्रांसोबत तंबाखूचा व्यसन लागला. ती परिस्थिती बघून पुष्पा आपणहून धंद्याक जाऊक लागला तवसर दुसरी बाई आंबोळी, घावणे विक्री करूक लागली. पुष्पाचो सरळ स्वभाव आणि पदार्थांची चव याचो अनुभव नियमित प्रवास करणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांका ठाऊक होतो म्हणानच पुष्पाचो धंदो पुन्हा तेजीत इलो. नात घराक इल्यावर बाबल्या मसूरकर बदाललो, पुष्पाच्या गैरहजेरीत दिव्या आजासोबत अख्खो गाव पालथो घाली. लोक तिचे लाड करीत. ती पण आवशीवरी धीट होती.आपल्या बोबड्या बोलीत आजा बरोबर गप्पा मारी. बाबलो दिव्यावर एकदम खूश.
पदीन हळूहळू घराचे मातीची भिती पाडून चिरे बांधकाम सूरू केला. बाबलो लक्ष देऊक होतोच. दर बुधवारी पदी दांडी मारून घरासाठी लागणारा साम्यान आणून हजर करी. सुट्टी इली की दोघांचो धंदो जोरात चला. कधीकधी दिव्या कळीक येय, भूर जाऊ नको म्हणान आवशीक गळ घाली. तिचो जीव दिव्याक एकटी ठेऊन जातांना तळमळा पण संसाराची जबाबदारी मोठी होती. गाडीत नवीन इलेली बाई पुष्पाचो धंदो बघून जळफळाट करी. गाडीयेत फिर फिरून दमाक जाय, नको तो धंदो वाटा पण गत्यंतर नव्हता. भराडीच्या जत्रेक जाऊक सवड नव्हती. गावात धयकालो असलो तरी देवीची ओटी भरण्यापुरतीच ती मंदिरात जाय. सणवार जवळ इले की धंदो तैजीत येय.
बघता बघता दिव्या दोन वर्षांची झाली. आऊस पदीक अधुनमधून वंशाक झिल व्हयो म्हणान आठवण करीत रवा. पदी तिच्या अंगावर जाय, “गे तुका इतकी घाय कसली? पुष्पा एकदा गरोदर रवली की तिचो धंदो चौपट झालो. आधीच खर्च वाढलोहा, दुसरा मुल झाला म्हणजे अडकाक जातला.” आऊस म्हणी,तरूण आसा तोवर पोरांचा ठिक, मगे झालीच नाय तर काय शिमगो करशात?”
त्यांका नको असताना तीन वर्षांनी दुसरा चेडूच झाला.तिचो बारसो अगदी साधेपणात उरकून घेतलो. पुष्पाच्या भावाशीन तिचा नाव ‘स्वरा’ ठेवला. पदीची आऊस नाराज झाली. आता ती पयल्यावरी पुष्पाक मदत करीना, पुष्पाची तब्येत या बाळंतपणात नरम पडली. दोन चेडवांचा करतांना पुष्पाची दमछाक होय. पद्याक ती बोलली, आवशीच्या नादाक लागून तुम्ही घाय केलास आणि आता मी घराकडे बसलय. धंद्याचा मोठा नुकसान झाला. पदीन कानाक खडो लावलो, आता कोणी गळ घातली तरी फालतू प्रयत्न करत रवता नये. आऊस मात्र, “रे झीला चेडवा परक्या घरचे तुझा नाव चलवूक पोरगो नको काय? ह्या वेळेक शनिवार धरून प्रयत्न कर नक्की झिल होतोलो. झिल झालो की कुटुंब नियोजन करूनच घे, माका कळता,ह्या दिवसात पोरा पोसणा म्हणजे खेळ न्हय.
पदी आणि पुष्पा यांनी काळजी घेऊन शेवटी नको ताच झाला, पुष्पा पोटुशी रवली, ती पदीक म्हणाली गर्भ काढून टाकुक व्हयो, गडबड झाली खरी पण ह्या बाळंतपण माका नको, कसली मौजमजा न्हय, खय जाणा येणा न्हय. रोज सकाळी आठाक घर सोडूक व्हया आणि रात्री उशिरा येऊन मरूक व्हया.आता सहन जाणा नाय. तो म्हणालो,पुष्पा तुझा बरोबरच हां पण आऊस म्हणता ह्या वेळेस पावणाईच्या दयेन झिलच होतोलो. पुष्पा हट्टाक पेटली आणि तिने डॉक्टर बाई सोनोग्राफी करुन घेवया मग तू निर्णय घे, म्हणत असतांना कुडाळाक जाऊन गर्भपात करून घेतलो. गर्भपात केल्यावर कळला की तो मुलाचो गर्भ होतो. तिका खूप वाईट वाटला. डॉक्टर बाईंचो सल्लो ऐकलो असतो तर पश्चाताप करूची पाळी इली नसती. गर्भ मुलाचो होतो ह्या तिने पदी पासून लपवला. या गोष्टीची कोणाकच याची खबर लागुक देवूक नाय.
सासू मात्र वंशाचो दिवो येतलो म्हणान देव पाण्यात बुडवून बसली होती. ती गप्पांच्या ओघात खूशीत म्हणा, “माका खात्री हां या पावटीक तुका झिलच होतोलो. कळकाई तुका यश देतली. पुष्पा आता तुझो धंदो बंद कर.खूप मेहनत केलस. आपण घराकडेच पिठी,मेतकूट, मसाले वेगवेगळे पदार्थ बनवून विकू. काय मिळात ता मिळात.दोन म्हशी आसत, दोन नवीन घेतले म्हणजे बरोबर भागात. नातींका सांभाळूक अख्खो दिवस जाता.” पुष्पान हसून वेळ मारली आणि काय करतली. एक दिवस पुष्पा धंद्यावरून इली आणि खोलीयेत बसान रवली. सासवेन चौकशी केली तशी रडतच म्हणाली, “आई आज नको ता घडला. गर्भ नासलो.”
ता ऐकून सासू चिडली,”तुका बरा नसतांना गाडीयेक जाऊक सांगलाच कोणी? दैव देता आणि कर्म नेता अशी तुझी तरा.” ता ऐकून पुष्पा निराश झाली. योगायोगान गर्भ मुलाचोच होतो, सोनोग्राफीक पैशे खर्च केले असते तर बरा झाला असता.आता घडलेलो गुन्हो खूप मोठो होतो.
ती कोणाक सांगू शकत नव्हती. तिची सुटका झाली म्हणान पदी अगोदरच खूश होतो, ती आता नियमित धंद्यासाठी मोकळी होती पण दुसरो विचार त्याच्या मनात डोकावलो. खरच झिल झालो असतो तर आवशीची कटकट एकदाची थांबली असती. तो विचार येताक्षणी त्याने पुष्पाक विचारण्यासाठी हाक मारली. पुष्पा खोलीत एकांतात डोळ्याक पदर लावून रडत होती. मनाचो अगदी कोंडमारो झालो म्हणान खरी गोष्ट ती पदीक बोलली. ता ऐकून तो चिडलो, “गो हजार ,दिड हजार सोनोग्राफीसाठी खर्च झाले असते तर आभाळ फाटणार होता काय? गर्भ पाडलो नसतो तर तुझ्या मागची बाळंतपणाची कटकट कायमची सरली असती. झाला ता आता भरून येवचा नाय, उगाच रडत रवा नको.”
त्या नंतर पुष्पाक इच्छा नसतांना सासवेन दोन चेडवांका जन्म देऊक लावलो.एकदा सोनोग्राफी न केल्यामुळे जो घोळ झालो तो होऊ नये म्हणान पुष्पा प्रत्येक वेळेस सोनोग्राफी करून घेय आणि जन्माक येणारा मुल ‘ती’ आसा कळल्यावर स्वतःच्या दैवाक दोष देय.बघता बघता कुलदीपकाची वाट बघून पदी चार चेडवांचो बाप झालो. चार मुलींचे कपडे लत्ते, त्यांची औषधा यांचो खर्च करून हैराण झालो.
चार नातींका खेळवतांना आणि भांडणा झाली समजुत पटवतांना त्यांचो आजो पार वाकलो. दिव्या, स्वरा, सायली आणि निता चारव एकदम देखण्या पण कळीक इल्या तर घर डोक्यावर घेईत. आजो गावात जाऊक निघालो की दिव्या आजाचो उजवो हात फकडी तर निता डावो पकडी. स्वरा आजाचो हात पकडूक गावलो नाय म्हणान भोकांड पसरी. सायरी थोडी बुजरी होती.
ही पिल्लावळ असतांना, आऊस हट्ट सोडीना, ती पदीक म्हणाली, “तुझ्या आजोळी आम्ही धा भावंडा होत़व चार, पाच बहिणींच्या पाठीवर तुझो कांता मामा जन्मलो, म्हणान काय आमका कमी पडाक नाय, तुझ्या आजान चार, चार तोळे सोना घालून माझा आणि तुझ्या मावशांची लग्ना करून दिली.” पदी आवशीवर कातावलो, “गे आये तो काळ वेगळो होतो आता परिस्थिती वेगळी हा. आता पैशान उठूचा लागता आणि पैशान बसूचा लागता. देव दयेन अजून पर्यंत काय पाठी लागूक नाय पण एकदा डॉक्टर पाठी लागलो तर टाके ढीले फडतीत. आमच्या जीवनाचो झालो तितको तमाशो बस झालो. चार चेडवांची शिक्षणा, त्यांचो कपडो लत्तो कसो पुरवतलय होच प्रश्न माझ्यासमोर हां.. तुझो हट्ट पुरवताना आमची काय परिस्थिती झाली हां, तेतूरसुन लोक नक्की शाणे होतीत. यापुढे कुलदीपक नको की पणती नको. आम्ही अक्कल गहाण टाकली. मुलगी असली तरी आवशी बापाशीक बघतली आणि झिल असलो तरी बघतलो तुम्ही त्यांका बरा वळण देऊक व्हया इतक्याच तुमच्या हाती आसा. तेव्हा उद्याच मी कुडाळाक जाऊन ऑपरेशन करून घेतलय.”
बाबलो मसूरकर व्हयती गजाल लोट्यावर बसून ऐकीत होतो. तो पदीक म्हणालो,”झिला उशीरान का होई ना तुका अक्कल इली. आऊस काय सांगता ह्यापेक्षा तुमच्या मनाक काय पटता ह्या बघुक काय धाड भरली होती. आऊस तुझ्या मुलींका पोसात काय? तेव्हा आजच कर कुटुंब नियोजन, म्हणाक नको आम्ही भावंडा सातजण, बोलवलास तर चतुर्थीक करू सुपारी घेऊन भजन. पुष्पा चारही मुलींसोबत बाबल्या मसुरकाराच्या बाजूक येऊन उभी रवली आणि म्हणाली.”मामा तुमचा खराच आसा आईंनी नातू व्हयो म्हणतांना चार चेडवांचो जन्म झालो. आता हे भोग तुमच्या झिलाच्या मानगुटीवर बसले. तेवा तुमी गावचे पाटील म्हणान गावात एकच दवंडी पिटवूक लावा. ‘मुलगाच हवा नको आग्रह, बेटी हे ही उचित धन, भेदभाव करू नका बदला संकुचित मन.’ इतक्या केलास तरी गावावर उपकार होतीत. पदीच्या आवशी सारख्या विचारांच्या म्हातारड्या बायकांचे डोळे उघाडतीत.”
तिच्या बोलण्यावर बाबलो मसूरकार बोललो,”होय ग पोरी तू माझे डोळे लख्ख उघाडले.तुझ्या चारी चेडवांका घेऊन आत्ताच चललय. अजुन उशीर जाऊक नको.”