गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा भाग २
काल पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं, गणपतीची उत्तरपुजा करायला गुरूजींना सवड नाही, तांदूळ देऊन म्हणतात, “प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळेस पुजा केली तेवढी उत्तर पुजा अवघड नाही. आचमन करा आणि प्रोक्षण करून कलश पुजन, घंटा, दीप यांची पुजा करा. दुर्वेने त्याला अभिषेक करा, आणि गंध फुल वाहा. नैवैद्य दाखवा, पुजा करून झाली की आवाहन करा.गा-गाऱ्हाणं घाला आणि पुनरागमनायः म्हणून अक्षता मुर्तीच्या मस्तकापासून पायापर्यंत तीन वेळा वहा.” गुरूजी म्हणाले म्हणजे अधिकचं बोलायचं नाही. आम्ही त्यांना आमचं पुरोहित मानलं आहे मग त्यांच म्हणणं प्रमाण. असो तर आजतरी गणेशपुजनासाठी गुरूजी उपलब्ध होत असले तरी भविष्यात कालनिर्णय अँप वापरून पूजा विधी उरकावा लागणार यात संशय नाही. पहिल्या दिवशी पूजा झाली की गुरुजी गणेश पूजन घेऊन जाऊ लागले तेव्हाच आश्चर्य वाटलं. असो कालाय तस्मै नमः
आता तर मुर्ती आणणे आणि विसर्जन यासाठी कुणी उपलब्ध होत नाही. भविष्यात गणपतीची मुर्ती जेवढी लहान तेवढी सोईची. स्वतः गणेश मुर्ती आणणे आणि विसर्जन करण्याची तयारी सर्वांना ठेवावी लागेल. गंमत म्हणजे आजही कोकणात मोठमोठ्या गणेश मुर्तीचा सोस आहे. या मुर्ती चित्रशाळेतून घरी आणण्यासाठी रस्त्याची स्थिती पाहता टेंपो हि तितकासा चांगला पर्याय नाही. डोली किंवा बाळाचा पाळणा करून मुर्ती आणावी लागते. पण हौसेला मोल नाही हेच कोकणी माणसाबद्दल खरे.
गावाकडील गणपती उत्सवासाठी दर वर्षी दोन तीन दिवस अगोदर पोचायचे हा शिरस्ता मी गेले तेहतीस वर्षे पाळत आहे. जेव्हा कोकण रेल्वे नव्हती तेव्हा एसटीच्या बुकींगसाठी दोन दिवस रात्री रांग लावल्यानंतर रिझर्वेशन मिळत असे, रिझर्व्हेशन मिळाल्यानंतरचा आनंद अवर्णनीय असे. गणपती उत्सवाला गावी जायला मिळणार या सारखे सुख नसे. एसटीचा प्रवास तसा खडतरच, अर्थात पहिला थांबा पेण श्रीरामवाडी स्टँड, तिथे कलिंगड किंवा महिला गृह उद्योग यांची भजी किंवा वडा खाल्ला की रात्रीचे जेवण इंदापूर ठरलेले. रस्ता इतका खड्डेमय होता की शरीराचे स्पेअर पार्ट व्हायचे, त्यातही बरेच वेळा एसटी कुठेही बंद पडे मग प्रवाशांच्या हालाला सिमा नसे,असे असले तरी उत्साह तसुभरही कमी होत नसे.
एसटी मुंबईतुन निघतांना आणि मुक्कामी पोचलो की गणपती बाप्पा की जय नारा ठरलला असे. हे दिवस कोणताही कोकणी माणूस विसरणार नाही. मुंबईतील चाकरमान्यांना आता थोडे बरे दिवस आल्याने लाल परीचा प्रवास फारसा कुणी करत नाही. लाल परीचा प्रवास लांब अंतरासाठी ज्यांना गाव आडवाटेला असल्याने, कोकण रेल्वे प्रवास अडचणींचा वाटतो ते आजही करत आहेत.
थोडी आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही लक्झरीने गणपतीसाठी जाऊ लागलो. एसटीच्या तुलनेने हा प्रवास थोडा सुखद असे. पण लक्झरी प्रवासा तसा महागडा आणि सणाला त्यांनी प्रवाशांना लुटण्याचा ठेका घेतलेला असतो, त्यामुळे १९९५ ला कोकण रेल्वे सुरू झाली आणि प्रवास सुखकर झाला. तरीही कोकण रेल्वेचे रिझर्वेशन मिळणे हे कामही अवघड होते. दोन रात्री वाट पाहून टोकन मिळवले की रिझर्वेशन मिळे. हा सर्व खटाटोप आजही असूनही गेल्या तेहतीस,चौतीस वर्षात उत्साह तिळभरही कमी झाला नाही.
एकंदरीत प्रवासात किती गंमती होतात ते सांगण्यापेक्षा अनुभवणेच चांगले. बच्चे मंडळींना प्रवास खूप आवडतो आणि त्यातही मामाच्या गावी जायचं म्हटलं की मज्जा ही ठरलेली.कोणीतरी काकाकाकू दुष्ट आणि मामामामी प्रेमळ असा समज या मुलांच्या डोक्यात घालून दिल्याने, काका,काकीला थोडं वाईट वाटत पण त्याचं टेन्शन कमी होतं, अर्थात त्यांची भाचे कंपनी असणार. ते ही आपल्या मामाकडे येणारच मग एकच व्यक्ती भाच्यांशी प्रेमळ आणि पुतण्याशी दुष्ट कसा असू शकेल. पण समज किंवा गैरसमज आपणच खोल रूजवले आहेत म्हणून एकाच जोडप्याला डिप्लोमसी समजून वागावं लागत असेल.
हो तर सांगायचा मुद्दा ही भाचे मंडळी मामामामीला अशी काही चिकटतात की सांगता सोय नाही.मामालाही आपल्या बहिणीची मुल जास्त जवळची असतात याच कारण बहिणीच्या वाटच्या अनेक गोष्टी लहान भावाने लाटलेल्या असतात.
असाच एकदा भाच्याने गावी यायचा हट्ट धरला, सहा वर्षांचा होता. बहीण म्हणाली गणपतीला याला घेऊन जा. तो ही यायला तयार झाला. म्हटलं ठिक आहे पुरवावा हट्ट. तेव्हा कोकण रेल्वे नव्हती. आम्हाला लक्झरीत ओळखीने पुढची सीट मिळाली होती. या सीटच्या पूढे थोडी जागा होती. बराच वेळ बस एकाच जागी उभी होती, भाचा चुळबूळ करत होता म्हणाला, “मामा मला कसतरी होतय,आता आली का पंचाईत, आम्ही त्याला पाया पूढील जागेत पेपर आणि शाल टाकून जागा करून दिली आणि तो झोपला. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी थांबलो पण तो दुसऱ्या दिवशी गावी पोचला तेव्हा एकदम फ्रेश होता.
भाचा धडपड्या होता, त्याला हजार शंका असत.
आम्ही चित्रशाळेतून गणपती घेऊन आलो. त्या चित्रशाळेतील अनेक गणपती पाहून भाचा खूष झाला म्हणाला, “मामा, इतके सगळे गणपती एकमेकाशी काय बोलत असतील?” मी म्हणालो, “ते एकमेकांना विचारत असतील, इतके दिवस एकत्र राहिलो, गप्पा मारल्या पण आता आपली ताटातूट होणार, आता पून्हा भेट पूढच्या वर्षी. चला तयार व्हा आपला भक्त आपल्याला न्यायला आला आहे.” माझं ऐकताच, तो म्हणाला,”मामा,खरचं गणपती एकमेकाशी बोलत असतील का? ते आपल्या घरी यायला खुश का नाहीत?” मी म्हणालो,”अरे ते बोलत असले तरी आपल्याला कस कळणार? त्यांनी बोललेलं आपल्या ऐकू येणारच नाही.” “मामा, जर त्यांची भाषा आपल्याला ऐकू येत नाही आणि कळतही नाही तर मग आपलं म्हणणं त्यांना कळणार कसं? आणि ऐकू आलं तरी ते आपल्याला सांगणार तरी कसं?” आता खरं तर त्याचा राग येत होता,पण त्याच समाधान झाल नाही तर आमच्या मामाला काही कळत नाही अशी जाहिरात नक्कीच करणार म्हणून मी म्हणालो. “आपली भक्ती मनापासुन असेल तर त्याच म्हणणं आपल्याला आणि आपल म्हणण बाप्पाला कळेल.”
ते ऐकून तो म्हणाला,”पण आपण खरं बोलतोय की खोट कस कळणार?”
त्याच सततच अस छळण सुरू होतच म्हणून मी म्हटलं,
“तू शांत राहिलास तर बाप्पा काय बोलतात ते तुला कळेल.
पण तू शांत रहातच नाहीस मग तुला ते ऐकू कस येणार?”
थोडा वेळ कसाबसा तो शां राहिला. पण त्याच्या मनात मात्र खळबळ सुरूच होती. आमच्या भाच्याने गणपतीच्या पायाजवळचा मुषक पाहून विचारल, “हा उंदीर इथ का ठेवलाय?” मी म्हणालो उंदीर म्हणू नको, ते गणपतीच वाहन आहे, बाप्पा त्याच्यावर बसून इकडे तिकडे फिरतो. तर हसून मला म्हणाला,”मामा मीच मिळालो का तुला मामा बनवायला? एवढासा उंदीर बाप्पा त्याच्यावर बसून कसा फिरेल?तो मरून नाही का जाणार?”
गणपतीच्या मुर्तीचा आकार पाहता ते खरेच होते,पण आता त्याची समजूत पटेल असे काही तरी सांगणे गरजेचे होते. मी म्हणालो, “बाप्पाला फिरायचे असते तेव्हा तो छोट रूप धारण करतो.” त्याला प्रश्न पडला, “बाप्पा छोट रूप का धारण करतो? मग तो आपल्याला दिसणार कसा? त्या उंदीरालाच मोठ्ठ करायच ना त्यांनी!” त्याचं म्हणणं बिनतोड होत. आता माझी पंचाईत होती, मी म्हणालो, “तुझ बरोबर आहे, पण बाप्पाला तस नसेल वाटत, कोणाच्या नजरेस न पडता त्याला फिरायचं असेल तर काय करणार?”
तो विचार करू लागला, थोड्या वेळाने म्हणाला, “कोणाच्या नजरेत न येता त्याला का फिरावस वाटतं? त्याला कुठेही फिरायची मुभा नसते का? त्याची आई त्याला रागावते का? का तो अभ्यास पूर्ण न करताच आईचा डोळा चुकवून खेळायला जातो?” माझ्या भाच्याने माझी परीक्षा घ्यायची ठरवल होतं, मी म्हणालो, “तो बाप्पा आहे,आईला विचारल्याशिवाय तो काहीच करत नाही, पण तो फिरायला जातांना सर्वांना दिसला तर सर्व पाठी लागणार ना! ,कोणी म्हणेल आमच्या बरोबर खेळायला ये, तर कोणी म्हणणार बाप्पा थांब जरा हा मोदक, लाडू खा, मग त्याची पंचाईत होणार. कोणाला, नाही कसं म्हणणार ना !मग जास्त खाल्ल तर त्याच पोट दुखणार, बरोबर की नाही, म्हणून तो लपून जातो.” त्याने “मी बरोबर की नाही?” म्हणताच मान डोलवली, मला वाटलं चला, ह्याला पटलं माझं म्हणणं. सुटलो एखदाचा, पण कुठचं काय? त्याचा पुढचा प्रश्न, “तो कुणी दिलेल खात नाही तर मग याच पोट एवढ मोठ का?” माझं पोट बघ मोठ झालय का?”
मी म्हणालो,”अरे! तो नैवेद्य खातो ना? शिवाय आपल्या घरी दर्शन घ्यायला येतात ते ही त्याला नैवेद्य दाखवतात, मग त्याच इतक सगळ खाऊन पोठ होत मोठ.” “मामा, तो जीरा सोडा का घेत नाही?, माझे बाबा अजीर्ण झाल की जीरा सोडा घेतात, ढेकर देत बसतात. त्यालाही जीरा सोडा द्यायचा मग त्याचा अपचन होण्याचा प्रश्न सुटेल.”
मी त्याची बाप्पाला जीरासोडा द्यायची आयडीया ऐकून चक्रावून गेलो. आता काय उत्तर द्याव या विवंचनेत असतानाच,त्याने मला विचारल, “मामा तू म्हणतोस नैवैद्य खाऊन त्याच पोट भरत, पण मी तर पाहिलं आजोबा त्याला नैवद्य दाखवतात आणि स्वयंपाक घरात आणून ठेवतात मग खाण्याचा तर प्रश्न येतच नाही. म्हणजे आता पर्यंत तू मला गंडवत होता. खरं की नाही.”
आता त्याच्यापुढे दंडवत घालायची माझी पाळी होती. काय काय प्रश्न या मुलांना पडतात, तो बाप्पाच जाणे. माझी चोरी पकडली गेली अशा अविर्भावात तो माझ्याकडे पहात म्हणाला, “म्हणजे मग गणपती बाप्पा आपल्याकडे पाहूणा म्हणून येतो पाच दिवस रहातो हे सगळंच,म्हणजे हे सगळंच..” “बोल हे सगळ काय?” मी म्हणालो.
“हे सगळ खोट आहे तर.” भाचा एका दमात म्हणाला.
माझ शरीरच थंड पडायची वेळ आली होती, मी म्हणालो,
“अरे खोट नाही काही, बाप्पा येतो हे एकदम खरं,फक्त येतो म्हणजे आपण श्रध्देने त्याला आणतो, पूजा करतो नैवैद्य दाखवतो आणि खातो.”
मामा,आता मला समजलं,”म्हणजे तो आपल्याकडे येतो ही कल्पना आहे. वास्तवात आपण त्याच्याकडे जातो,म्हणजे आपल्याला त्याला आणावं अशी बुद्धी तो देतो, बरोबर ना?” त्याची शंका, अगदी बरोबर मी म्हणालो. “पण मग गणपती घरी का आणायचा? पुजा का करायची?
नैवेद्य का दाखवायचा? भजन का करायच?” आमच्या वडिलांना असा प्रश्न आम्ही कधी विचारला नव्हता, कदाचित एवढी चौकस बुद्धी आमच्याकडे नव्हती,आणि आम्ही प्रश्न विचारला असता तर कानफटवले असते.पण मामा प्रेमळ असतो ना, मग ते बिरूद फुकट घालवून कसे चालेल?
मी म्हणालो,”अरे आपण गणपती आणला की मातीच्या वस्तू बनवणाऱ्या कामगारांना, मूर्तिकाराना काम मिळत. शोभेच्या वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना, मिठाई विकणाऱ्या दुकानदारांना, भाजी विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना, अस प्रत्येकाला काम मिळत.” “म्हणजे गणपती बाप्पा आला की सर्वांना पैसे मिळतात,ते आनंदी होतात, बरोबर ना?” अगदी बरोबर तू खरचं हुशार आहेस, सर्व प्रश्नांची उत्तरे आताच मिळणार नाहीत, अरे बेटा तू मोठा झालास की तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील.” “मामा,पण तुम्ही तर मोठेच आहात मग तुम्हाला उत्तरं मिळाली असतील ना? प्लीज सांगा ना गणपतीचा सण साजरा केल्यामुळे भक्तांना काय मिळते?”
आता काही तरी सांगून वेळ निभावून नेण गरजेच होत. मी म्हणालो “तुम्हा लहान मुलांना नवीन काही शिकवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कंटाळा करता पण त्याच गोष्टी तुम्हाला देवबाप्पाने सांगितलं, असं आई किंवा बाबा म्हणतात मग तुम्ही करता की नाही अगदी तस्सच, गणपती घरी आणला की सर्व कुटुंब एकत्र जमते, वेगवेगळी कामे वाटून घेते. म्हणजेच एकोप्याची भावना निर्माण होते.तुमच्या हातांनी तुम्ही मकर तयार करता, ते सजवता, रांगोळी काढण्याचा प्रयत्न करता. मुली देवाच्या दिव्यासाठी वाती तयार करतात, वस्त्रे तयार करतात, आईला मोदक करायला मदत करतात. याचा अर्थ एखाद्या गोष्ट तुमच्याकडून करून घेतांना त्याला पुराणांचा आधार दिला, पौराणिक गोष्ट सांगीतली तर तुम्ही ती गोष्ट आनंदाने स्वीकारता. गणपती घरी आणल्यामुळे हे सर्व संस्कार आपसूक एकत्र देता येतात तुम्ही मुले आनंदाने या गोष्टी करता,काही नवीन शिकता, जसे अथर्वशीर्ष पाठ करता, आरत्या म्हणता, मुख्य म्हणजे एका जागी मोबाईलची आठवण न करता उभे राहता म्हणूनच गणपतीची पूजा आर्चा करणे किंवा इतर उत्सव होणे गरजेचे आहे.”
भाच्याला ते पटले,”मामा मी आजीला मदत करायला जाऊ का?” मी विचारलं,”काय मदत करणार आहेस?,तू अजून लहान आहेस” तर म्हणतो,”आजी, आजोबा सांगतील ती मदत करीन. पुजेची तयारी करायला मदत करीन,आजीला कांदे, लसूण सोलून देईन.” माझा होकार गृहीत धरून तो आईच्या व्होवऱ्यात गेला आणि तिला म्हणाला,”आज्जी मी तुला मदत करू का?” आज्जी म्हणाली,” सोन्या तू रे काय मदत करतलस?” तो तिलाही तेच म्हणाला,”कांदे सोलून देईन,लसूण सोलीन.” आई त्याला म्हणाली,”रे सोन्या गणपतीच्या नैवेद्यासाठी कांदा, लसूण चालत नाही.” “आज्जी! बिन कांद्याचं जेवण बाप्पा कसं जेवणार? माझे पप्पा आईला म्हणतात तू कांदे घाल, लसूण घाल नाहीतर खोबरं घाल, माझ्या आईच्या हाताच्या जेवणाची सर तुझ्या जेवणाला नाही, मग तू कांदे न घालता जेवण कसं चांगलं होत.” आई हसली, एवढासा पोरगा,सगळं लक्षात ठेवतो, ह्याला काय उत्तर द्यावं, ती त्याच्याकडे पहात राहिली.मग म्हणाली मन लावून बनवलं, तर साधं जेवण ही चांगल होत.” भाचा लबाड, म्हणाला, “आज्जी तू माझ्या मम्मीला मन कस जेवणात घालायचं ते शिकवायला विसरलीस का?” आई म्हणाली, “अरे सोन्या ते ज्याचं त्यानं घालायचं असतं, कोणी सांगून आणि शिकवून मन नाही घालता येत.”
भाच्याचे प्रताप पाहून मला धडकी भरली. याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी अडचण आणि उत्तर नाही दिल तरी अडचण. आम्ही खरंच अडाणी होतो,देव बाप्पाचा धाक दाखवून आमचे बाबा, आई आम्हाला काहीही सांगायचे आणि आम्ही मान्य करायचो, या पिढीला त्या संगणक बाप्पाच्या मूषकाने नको तेवढे ज्ञान दिले त्यामुळे गडबड झाली आहे.काही सांगायची किंवा कसला धाक दाखवायची सोय नाही. प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय यांचे समाधानच होत नाही. असल्या भाच्यांना तोंड द्यायच म्हणजे फजीती होण्याची शक्यता अधीक. असो, तुमच्या घरातही भाचे कंपनी असेलच सांभाळून रहा, अडचणीचे प्रश्न विचारून कधी वस्त्रहरण करतील सांगता येत नाही. पून्हा कधी या नवीन पिढीच्या शहाणपणाबद्दल अवश्य बोलू. तुर्तास विराम देतो.