गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
नमस्कार, आज गणेशचतुर्थी. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो परंतु कोकणासहठाणे पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या संपूर्ण पट्ट्यात तो जल्लोषात साजरा होतो. कोकणात त्याच्या उत्सवाचे स्वरूप थोडे वेगळे असते. बहुसंख्य कोकणणवासी या काळात आपल्या जन्मगावी किंवा मुळगावी असतात. या गणेशाचे कोकणातील वेगळेपण कोकणाने जपले आहे.
कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याचं पुजन केलं जातं आणि साकडं घातलं जातं “हे गणराया, हे कार्य निर्विघ्नपणे पार पाड.” तो मुळारंभ आरंभ गणपती बाप्पा. गणांचा अधिपती तो गणपती, “गणानां त्वा गणपति हवामहे” ही ऋग्वेदातील ऋचा आहे. हे आवाहन आहे त्या विघ्नहर्ता गणरायाला. गणपती हा चौसष्ट कलांचा अधिपती आहे. त्याच्या पायात ताल आहे, मुखावर सौंदर्य आहे. हास्यवदन,आणि नेत्रांना दर्शनाने सुखशांती देणारा, कनवाळू दयेचा सागर, त्याला त्रिवार वंदन.
कोकणात नाटकाची सुरवात गणेश वंदनेने करण्याचा प्रघात आहे. गणपती नाचून गेल्याशीवाय नाटक आणि तेही आमचं दशावतारी शक्यच नाही. त्या गणेशाचा वर्ण लाल किंवा गुलाबी आहे म्हणूनच तो लाल मातीची जवळीक साधतो तद्रूप होतो. कोकणात दिवाळी सणाला सर्व शेतकरी भात कापणीत मग्न असतात. भाद्रपद महिन्यात भाताला पोटरी फुटत असते, गुरांना भरपूर चारा असतो,त्यामुळे शेतकरी कुटुंबाला निवांपणा असतो, म्हणून गणपती हा उत्सव कोकण दिवाळी सारखाच साजरा करते.
गावाकडे मुर्तीकाराला नदीची किंवा डोंगरातली चिकणमाती आणून मळून देण्याचं काम त्याची ठराविक माणसं करतात. त्यांना मोबदला तर मिळतोच पण गणेशमूर्ती भेट म्हणून मिळते. अर्थात आता ही माती ट्रॅक्टरच्या साह्याने आणली जाते. या मातीचे गणपती वजनाला जड असले तरी मुर्ती लवकर पूर्ण केली तर वजन कमी होते. हे गणपती
पाण्यात विसर्जन केल्यावर विरघळून जातात त्यामुळे पर्यावरणाची कमी हानी होते. कोकणातील मुर्तीकार आपल्या चित्रशाळेकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून पाहात नाही तर कलेची आवड म्हणून तो कृष्ण, गणपती,
हरतालिका, गौरी, सरस्वती यांच्या मूर्ती घडवतो. वेगवेगळ्या आकारातीलवआणि आसनावरील गणपतींची मांदियाळी एकाच मोठ्या खोलीत भरलेली पहिली की मन प्रसन्न होते.
“गणपती कोणत्याही आकारात असला, कोणत्याही रंगारुपात असला तरी तो सुंदरच दिसतो. त्याच्या त्या छोट्या डोळ्यांचा आकार मनाला मोहून टाकतो. त्याच्या सोंडेमुळे गळ्यातील आभुषणांना एक वेगळाच साज चढतो. पितांबर आणि त्यावर शेला हे त्याच राजस रूप मनाला भुरळ घालते. कोकणात कोठेही गेलात तरी प्रत्येक गावात चार, सहा गणेश मुर्तीकार असतातच, या काळात त्यांची लगबग पाहण्या सारखी असते. एकदा मुर्ती तयार झाली की रंगंकाम करणारे सरसावून कामाला लागतात. पंचपक्वानाने भरलेलं ताट समोर असावं तसे रंगाचे तबक त्यात तयार केलेले विविध रंग म्हणजे रंगाची जत्राच असते. मुकुटाला द्यायचा सोनेरी किवा चंदेरी रंग मात्र जपून वापरावा लागतो. रंगकाम संपत आले की डोळे रेखाटले जातात. हे काम म्हणजे रंगकामाचा कळस असतो. मुर्तीला जीवंतपणा येतो तो डोळ्यातील रंगकामाने. बाप्पा आपल्याकडेच टक लाऊन बघतोय असा भाव निर्माण करण्यात यश मिळालं म्हणजे रंगकाम उतरलं म्हणायला हरकत नसते. अस्सल कोकणी एका गणेश शाळेतून मुर्ती घ्यायची असली तरी वेळ काढून चार सहा रंगशाळा किंवा चित्रशाळा फिरून तेथील गणपती पाहतो.रंगसंगती
आणि त्यातील ब्रशचे स्ट्रोक तो नजरेन वाचतो.
फारच थोडे कारागीर हाताने मुर्ती घडवण्याचे कौशल्य बाळगून आहेत. बिनसाच्याची मुर्ती फक्त एखाद्या मुर्तीकारालाच शक्य असते. मुर्तीची प्रमाणबद्धता ही साच्यावर अवलंबून असते. अर्थात साचा हा ही एखाद्या मुर्तीकारानेच घडवलेला असतो. हे साचे वर्षभर कोनाड्यात एका बाजूला पडून असतात. शेतीची कामं संपली की मुर्तीकार जागा होतो मग नेहमीच्या माणसांजवळून नदीची माती आणूनजोपर्यंत घरातील सर्व मुर्ती आपल्या आपल्या स्थानी स्थानापन्न होत नाही मुर्तीकाराला उसंत नाही.
कोणत्याही कुटुंबाला गुटगुटीत गणपतीची मूर्ती आवडते.या गणपतीने कशावर आसनस्थ व्हावं याला कोणतंच बंधन नसतं, कोणाचा मयुरावर कोणाचा हंसावर, चंद्रावर तर कोणाचा चक्क हत्तीवर. कमळावर आसनस्थ अनेक गणपती असतात. त्याच्या दोन हातात आयुध तर एका हातात मोदक हा ठरलेलाच असतो तर एक हाताने बाप्पा आशीर्वाद देत असतो. त्याच्या पायाशी त्याचे वाहन, मुषक हजर असतो.
कोकणात नाचपंचमी झाली की चित्रशाळेत गणपती बाप्पाचे आसन असणारा ठराविक लाकडी पाट पोचता केला जातो. या पाटावरच गणपतीची पेढी म्हणजे आसन आकार घेतं. उत्सुकता असणारी मंडळी, बहूदा मुलं त्यांचा बाप्पा घडतांना दोन चार वेळा चित्रशाळेला भेट देऊन येतात. जर मुर्ती त्यांच्या मनात नाही भरली तर बदलही सूचवतात. मुख्य म्हणजे आमचे दिलदार चित्रशाळा मालक त्या मुलांचे मन राखत त्याने सांगितलेला बदलही करून देतात. गणपतीच्या आदल्या दिवशी वाजत गाजत गणपतीची मुर्ती घरी येते आणि लोट्यावर एका ठिकाणी रांगोळी घालून व्यवस्था केली जाते.
संध्याकाळी निगुतीने बाप्पाच्या पुजेसाठी लागणारी मिळतीलत ती पत्री शमी,वआघाडा ,बेल, फुलांच्या पत्री, दुर्वा, तुळस इत्यादी पत्री स्वच्छ धुवून दवात ठेवली जाते. विविध प्रकारची फुले, अनंत, तगर, जास्वंदी, मोगरा, पिवळा चाफा दुसऱ्या तबकात तयार असतो.
त्या रात्री गणपतीचे मकर सजवण्याची गडबड उडालेली असते, गणपतीच्या पाठची भिंत अगोदरच सवड काढून रंगवून तयार असते. त्यावर कमळ किंवा डोंगरातून वाहणारी नदी, चरणारी गुरे वासरे अस चित्र रंगवलं जातं. देवाच्या डोक्यावर स्वच्छ धुवून सुकवलेली लाकडी माटी समतल बांधली जाते. प्रथम आंब्याचा टाळ बांधला जातो. मग सुशोभीकरण केलं जातं. या माटीवर निसर्गाने दिलेली हरण, कांगल, शिपट, तेरडे, शेरवाड, तवसं असं जे जे शोभीवंत दिसेल ते किवणीच्या वाकाने बांधून माटी तयार होते.
सकाळी स्नान व घरच्या देवतांची नेहमीप्रमाणे पुजा झाली की प्रतीक्षा असते ती गुरूजींची. ते आड्याजवळ येता येताच हाक मारतात, “मी इलय गे, काय ता सोवळा नेसून हजर रवाक सांग.” मग त्यांची गाडी सुरू होते, “आचमन करा, केशवायन नमः, माधवायन नमः…, गंध लावा, हळद, पींजर वाहा, अक्षता वाहा.. त्यांच्या हस्ते षोडशोपचारे पुजा झाली की पंचखाद्याचा नैवेद्य दाखवून आरती झाली करून गणपतीला आवाहन केलं जातं. हे गणराया यथासांग, मनोभावे तुझी पुजा केली आहे, काही चुक झाली असल्यास पोटात घे आणि कुटुंबातील सर्वांजवळून सेवा, चाकरी करून घे. कुटुंबाला सुखी ठेव. चांगले आरोग्य दे. मग त्या दिवसाची पहिली आरती गुरूजींच्या समोर झाली की मंत्रपुष्पांजलीने विधी पूर्ण होतो. गुरूजींना गरम दूध आणि दक्षिणा दिली की देवाकडचे काम पूर्ण होते.
पुजा चालू असतांना तिकडे होवऱ्यात नैवेद्याच्या जेवणाची गडबड उडालेली असते, कोणी खोबरे कातत असते, कोणी भाज्या, कोणी मोदकाचे पीठ भागवत असते आणि गप्पाही सुरु असतात. फोडणीला घातलेल्या भाज्यांचा वास बाहेर लोट्यावर दरवळत असतो. नैवेद्यासाठी केळीची पाने धुवून, पुसून तयार असतात आणि अवाठातून आरतीसाठी
निरोप येतो. आमच्या घरापासून आरतीला सुरवात होते, सुखकर्ता दुःखहर्ता पासून सुरू झालेली आरती, आरती सप्रेम जयजय स्वामी गजवदना, ये ही हो विठ्ठले असा वळसा घेत घालीन लोटांगण पर्यंत पोचते आणि एकच घोष दुमदुमतो. गणपतीबाप्पा की जय, तिर्थ आणि पंचखाद्य आणि फळांची शीरवळ प्रसाद म्हणून वाटला जातो.
अवाठातील आरत्या संपवून येईपर्यंत बाप्पा समोर नैवैद्य वाढण्यासाठी पाने मांडली जातात. सगळ्यात मोठ्ठ पान बाप्पाचं, एकवीस मोदकांच. भाताची मुद, गरम वरण त्यावर घरचं साजूक तूप, पापड, लोणचं, रायतं, बटाट्याची भाजी, खीर एवढ सगळ पाहिल्यावर बाप्पा तृप होईलच पण ते पाहून आम्हाला भूक लागल्याची जाणीव होते. गाईचं पान आणि कावळ्याला घास दिला की पंगत सजते आणि हळदीच्या पानावरचे उकडीचे मोदक, खीर आणि गरमागरम वरण भात खाऊन मन तृप्त होते.
आता नकळत डोळे बंड करू लागतात, वामकुक्षी घ्यायची म्हणता कधी डोळा लागतो कळत नाही, बाहेर रिपरिप सुरू होते, हवेत गारवा येतो आणि क्षणात आभाळ स्वच्छ होत.
संध्याकाळी, चहा होताच बाहेर फेरफटका मारता मारता दुसऱ्या दिवसासाठी दुर्वा,फुले जमा करण्यासाठी आपोआप पावले वळतात. घरात लहान बच्चेकंपनी मात्र आपल्याच मस्तीत दंग असतात. त्यांनी आपल्या आयांचे, पप्पाचे मोबाईल घेऊन गेम सुरू केलेले असतात. कोणीतरी रागावतं, “मुलांनो इथे फोनवर नाही खेळायचं, बाहेर पहा किती फुलपाखरे बागडत आहेत, चतुर भिभिरत आहेत. हे तुमच्या मुंबईत पाहायला मिळणार नाही. पेरूच्या झाडावर पेरू पिकलेत, जा, त्यातले पेरू काढून खा, नाहीतर माकडं फडशा पडतील.” मग मुलं नाईलाजने उठतात आणि एक एक करत बाहेर पडतात. बाहेर चिखल असतोच,पण एकदा तो मृदु स्पर्श होताच ती गुंग होतात. मुलांपैकी एकाला माकडे दिसतात तशी मुलं हुर्ये करतात आणि माकडं धूम पाळतात. आपण काय मर्दुमकी गाजवली अशी मुलांची समजूत होते. हळू हळू मूळ फुल पाखरे बघण्यात गुंग होतात.महिलांच्या गप्पा रंगतात. गाई गुरे गोठयात येतांना मुले उगाचच त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करतात. मामा ओरडतो,”बाबल्या दूर हो व्हयता लात मारता.” नशिबाने म्हशीने लाथ मारूनही बाबल्या ती चुकवतो. त्याला फार अभिमान वाटतो. अंधार होऊ लागतो तशी मुलं पाय धुवून घरात येतात. आजोबा नातवाकडे प्रेमाने पहात असतात. सुख सुख ते वेगळं काय असतं, आपली पिल्ले वर्षातून एकदाच बाप्पाच्या नावाने का होईना घरट्यात येतात. अजून काय हवं.
आजोबा मुलांना जवळ बोलावून विचारतात, पर्वचा कुणाला येते, सर्व मुले चढाओढीने शुभंकरोती पासून सुरवात करतात, सदा सर्वदा म्हणत गुणाधिश जो ईश सर्वा गुणांचा पर्यंत आवाज टिपेला पोचलेला असतो. सर्व मुले आधी गणपती बाप्पाच्या आणी आजोबांच्या आणि नंतर इतर जेष्ठ मंडळींच्या पाया पडतात. आजोबा प्रसन्नपणे हसतात, मुलांजवळ संस्कार आहेत हो ते सर्व महिलांना ऐकू येईल एवढ्या मोठ्याने म्हणतात. महिलांच्या अंगावर मुठभर मास चढत आणि बाप्पा तथास्तु म्हणतो. रात्री मामा पून्हा एकदा सोवळं नेसून गणपती बाप्पाला गंध फुल वाहतात.
अवाठ गोळा होत, झांजा कडाडतात आणि “मंगलदायक सिध्दी विनायक” आरतीने सुरवात होते. अर्धा पाऊण तास मनसोक्त आरती झाल्यावर मंत्रपुष्पांजलीसह बाप्पाचा जयजयकार होतो आणि तिर्थ प्रसाद घेऊन अवाठ हसत हसत दुसऱ्या घराकडे निघते.
आजोबा आणि बाप्पा एकमेकांकडे प्रसन्न नजरेने पाहतात. जीवा शिवाची भेट होते. दोघही तृप्त तृप्त होतात.