चला थंडीचा आनंद घेऊ

चला थंडीचा आनंद घेऊ

या वर्षी जानेवारी संपत आला तरी थंडीचा कडाका अजूनही जाणवत आहे. सकाळी आठ वाजले तरी हवेत गारवा असतो आणि संध्याकाळी चार साडेचार वाजले की थंडावा जाणवू लागतो. या थंडीमुळे पर्यटन व्यवसायिक आनंदी आहेत. दर विकेंडला शहरातील कुटुंबे शहराच्या जवळपास निसर्गरम्य ठिकाणी धाव घेत आहेत. थंडीच्या दिवसातही काही हौशी पर्यटक जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल येथे बर्फ वृष्टीचा आनंद घेण्यासाठी जात आहेत. तर काही कोकण, केरळ गाठत आहेत.

पूर्वी रिटायर झालेली माणसे प्रवासाच्या भानगडीत पडत नसत, पण आता सोईसुविधा वाढल्याने देवदर्शनाच्या निमित्ताने का होईना ज्येष्ठ जोडपी ग्रुप करून पर्यटनासाठी बाहेर पडतात. मग कोणी गिरनार गाठते तर कोणी वैष्णोदेवी, कौटुंबिक रगाड्यातून स्वतःची सुटका करून घेऊन वयोज्येष्ठ कुटुंब देवदर्शन आणि थोडी मौजमजा करतात. रिफ्रेश होणं, मनाला विरंगुळा शोधणे ही प्रत्येकाची गरज आहे. त्यामुळे मनाला मोकळेपणा तर मिळतोच पण काही तरी राहून गेल्याची भावना आपोआप कमी होते.

खरे तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात थंडीची खरी सुरवात होते. मकरसंक्रांत संपली की थंडी हळूहळू गायब होते. तसा थंडीचा काळ सर्वांच्या आवडीचा. ज्यांना सकाळी दीर्घकाळ अंथरुणावर पडून रहायला किंवा उबदार पांघरूण, रजई, ब्लँकेट किंवा दैवयोगाने आपल्या आजीची किंवा आईची सध्या उपलब्ध असलीच तर गोधडी घेऊन झोपायला आवडते. त्यांच्यासाठी हा ऋतू वरदान. आमच्या गावी, कोकणात साधारण ३५ वर्षापूर्वीच्या गोधड्या अजूनही आहेत. आता त्या पाहुण्यांना देऊ शकत नाही पण आजही आमच्या वापरात आहेत.

थंडीच्या काळात नियमित व्यायाम करणारे आणि थंडीचे शौकीन, चांगली सवय असणारे नागरिक, जॉगिंग, रनिंग, मॉर्निंग वॉक यासाठी विशेष तयारीनिशी समुद्रकिनारी, एखाद्या बागेत, शासकीय पार्कमध्ये किंवा मोठ्या मोकळ्या रस्त्यावर वेगाने धावतात, चालतात किंवा फिरत असतात. याच काळात ग्रामीण भागातील रिक्षाचालक, बाहेरगावी जाणाऱ्या एसटी स्टँडवरील हमाल किंवा काही श्रमिक मंडळी शेकोटीचा आनंद घेत असतात.

शहरात शेकोटीचा आनंद घेणे अशक्य मात्र अगदी सकाळीच शहराबाहेर पडले आणि पूणे, नाशिक, नगर, माणगावच्या रस्त्याला लागलो तर एखाद्या चौकात किंवा तिठ्यावर, एखाद्या चहाच्या टपरीच्या बाजूला एका हातात कटींग घेऊन सिप सिप पित शेकोटीचा आनंद घेणारे अनेक दिसतील. तुम्ही त्यांच्यातील एक होऊन पहा. शिळोप्याच्या गप्पांसह राजकारणातील अनेक नवीन गोष्टींची माहिती तिथे सहजच मिळेल.

शाळेत दिवाळी सुट्टी संपली की थंडीच्या मोसमात वेगवेगळ्या स्पर्धा सुरू होतात त्यात क्रिडास्पर्धांचा समावेश आवर्जून असतो. विद्यार्थ्यांना प्रार्थना झाल्यानंतर लगेचच मैदानात नेले की फार आनंद व्हायचा. आमचे क्रीडा शिक्षक सर्व मुलांना रांगेत उभे करून तळवे एकमेकांवर घासायला सांगायचे आणि सर्व विद्यार्थी जोराने तळवे घासायला लागले की त्याचा सक् सक् सक् सक् असा लयबद्ध आवाज यायचा. मग गट तयार करून धावण्याची स्पर्धा, खो खो,कबड्डी असे खेळ खेळताना थंडी पार पळून जायची. कधीतरी सरांचाच शेकोटीचा मुड असायचा. चाळीस पन्नास मुलं काटक्या गोळा करून आणायचे आणि आमचा काशीनाथ दादा शिपाई माचिसने थोडे वाळलेले गवत टाकून शेकोटी पेटवायचा. सर्व विद्यार्थ्यी या शेकोटीचा पुरेपूर उपयोग करून अंग शेकून घ्यायचे.

अभ्यास सोडून वेगळे काही करायला मिळणार, मस्त टाईमपास होणार. कबड्डी खेळताना, खो देतांना, गमती जमती होणार हे माहिती असल्याने क्वचितच कोणी वर्गात बसून रहातो. किंवा ऊन खात एका ठिकाणी बसून राहतो. ग्रामीण भागात अगदी मधल्या सुट्टीतही दहा मिनीटे का होईना, एखादा खेळ खेळल्याशीवाय चैन पडत नसे. थंडीच्या दिवसात खेळताना कोणी पडले तर जोरदार लागायचे, ढोपर किंवा करंगळी फुटायची पण शाळेतील लाल औषध लावलं की सगळं विसरायला व्हायचे. त्यावेळी शांताराम पाटील काका हे शाळेचे शिपाई, हे काम आवडीने करायचे. या काळात चिंचा, बोरे, विलायती चिंचा, दगड मारून पाडणे हा प्रकार खूप फेमस होता. लोकांच्या निवडुंगाच्या कुंपणातून आत शिरून आम्ही बोरे वेचायचो. दगड मारून चिंचा, कैरी पाडायचो देखिल, ही चोरी आहे, मालक ओरडेल हा विचारच मनात नसायचा.

गावात गावठणात काही चिंचा,आंबा झाडे होती ज्यावर कोणाचीही मालकी नव्हती, या झाडांवर चढून आम्ही हैदोस घालायचो. शहरात आज मोठमोठ्या ईमारतीत चकाचक शाळा आहेत पण खेड्यातील शाळात जे वैभव आहे त्यातील कोणतेच वैभव इथे नाही, काय करायच्या आहेत असल्या शाळा जेथे आनंदाचे अंगण नाही, गाठीशी जगण्याचा अनुभव नाही? गावातील काही शाळात होतकरू शिक्षकांनी
ज्ञानाची गंगा जिल्हा परिषदेच्या शाळेत आणली आहे. वारे गुरूजी नाव ऐकले असेलच, असे इतर शाळेतही काही मेहनती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संगणकाच्या साह्याने विविध भाषा शिकवल्या आहेत. त्याचे सामान्य ज्ञान अद्ययावत करून घेतले आहे.मुख्य म्हणजे शाळेचे आवार हीच मुले स्वच्छ करतात, फुलझाडे लावून बाग सजवतात, भिंती वरती उपयुक्त शैक्षणिक माहिती रंगवतात. पर्यटन करतांना मुद्दाम वेळ काढून एखाद्या ग्रामपंचायत कार्यालयाला, जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट द्या. तेथील परिसर आणि टापटीप पहा. मन आनंदून जाईल.

याच ऋतूत शाळेतील समाजसेवा कॅम्प, हिवाळी सहल, स्काऊट आणि गाईड कॅम्प जातात. या कॅम्पसाठी एखाद्या ग्रामीण भागाची निवड होते. आजूबाजूला जंगल असते किंवा एखादी नदी असते. तेथे दिवसा एखाद्या ओढ्यावर बंधारा बांधणे, कच्चा रस्ता तयार करणे असा दिनक्रम असतो तर रात्री करमणूक कार्यक्रम आणि कॅम्पफायर असते. गाण्याच्या भेंड्या सुरू होतात, अचानक कोणी तरी रत्नाकर मतकरींची भूताची किंवा अन्य रहस्यकथा सांगतो आणि मग ऐकणारा कथा ऐकता ऐकता वातावरणातील गांभीर्याने गोठून जातो. त्या रात्री एखादा वात्रट मुलगा मुद्दाम कोणाला तरी घाबरवतो. कदाचित त्याला शिक्षकांचा चोपही खावा लागतो. शाळा कॉलेज जीवनातील या आठवणी कायम मनात रुंजी घालत असतात.

१९७४-७५ साली डिसेंबर महिन्यात संघाचा चार दिवसांचा निवासी कँप विक्रमगडला आयोजित केला होता. संघाचे सातशे ते आठशे प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या गावातून कँपमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. तानसा नदीच्या काठी उघड्या माळावर कापडी तंबू लावले होते. या तंबूत आम्ही गटाने राहिलो होतो. तेथे सगळे कार्यक्रम वेळेवर शिस्तबद्ध सुरू होते. पहिल्या रात्री साधारण दिड दोन वाजता थंडीने कुडकुडून जाग आली असावी. अंगावरील चादर दवाने ओली झाल्याचे जाणवत होते. तसाच शरीराचे मुटकुळे करून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. सकाळी सहापूर्वी आमचे संघ शिक्षक उठवायला आले. सगळं शरीरच गोठल्याचं जाणवत होतो. कसाबसा उठलो तर तंबूपासून दूर अंतरावर काही ठिकाणी शेकोटी पेटवलेली दिसली. त्यावरतीच मोठ्या मोठ्या टोपातून पाणी तापत होते.मुले आंघोळीसाठी बकेटमधून पाणी नेत होते. एवढ्या थंडीतही सकाळी सात वाजता सर्व आवरून मैदानावर हजर व्हावे लागले. त्या चार दिवसाच्या कँपमध्ये काय काय शिकलो ते आज लक्षात नाही. लक्षात राहिला तो तेथील तंबू निवास आणि शरीर गोठवणारी थंडी.

असाच अनुभव एकदा डिसेंबर महिन्यात रायगडच्या पायऱ्या चढतांना घेतला होता. आम्ही ठाण्यावरून एसटी पकडून महाड आणि तेथून रायगड पायथ्याशी गेलो. एसटी मधून रायगडला उतरलो तेथील हॉटेलमध्ये चहा घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली तर शरीर थंडीने थरथरत होते. पण काही अंतर चढून गेलो आणि शरीरातील उष्णतेमुळे थंडी पळून गेली. असेच महाबळेश्वर येथेही १९८३ साली मित्रांसोबत गेलो असता, कोणत्याही हॉटेलमध्ये सोय न झाल्याने दुकानाबाहेर रात्री झोपावे लागले आणि थंडीने गारठून गेल्याची आठवण आजही आहे. प्रत्येकाकडे अशी आठवणीची शिदोरी असते. कोणी व्यक्त होतो तर कोणाला ते सांगण रूचत नाही.

शहरातील नागरिक, ग्रामीण भागातील नागरिक, शहरातील लहान मुले, ग्रामीण भागातील लहान मुले, प्रत्येक जण थंडी वेगवेगळ्या प्रकारे अनुभवत असतात. या काळात हायवे किंवा अन्य शहराबाहेरील मोठ्या रस्त्याने अगदी सकाळी सकाळी प्रवासास निघालात तर उनी कपडे विकणारे आपल्या नजरेस पडतील, तर कुठे चहाच्या टपरीवर चहासाठी लोक तोंड घट्ट मिटून चहासाठी प्रतीक्षा करतांना दिसतील.

थंडीच्या काळात जिभेचे चोचले वाढतात तळलेल्या गरम किंवा खमंग पदार्थांची फर्माईश वाढते. मग घरात कधी कांदा तर कधी बटाटा, मिरची भजी किंवा मेथीची, उडदाची भजी तर कधी सूप तर कधी एखादा रबडी सारखा गोड पदार्थ किंवा तरूणाईला पसंत पडेल असे चायनीज, न्युडल्स किंवा अजून काही यांची रेलचेल सुरू होते. गरमागरम जेवण हवेहवेसे वाटू लागते. हिवाळ्यात कोकण किनाऱ्यावर भरपूर मासेमारी होते त्यामुळे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये हलवा, पापलेट, सुरमय किंवा वाम याची डेलिशीयस डीश तर मिळतेच पण छोट्या घरगुती खानावळीत बांगड्याचं तिखलं, तिसऱ्या, तारले किंवा इतर ताजे मासे मिळतात किंवा चिकनमटण खाणारे दात पाजळून तयार असतात तर काही हौसी मुद्दाम खेकडे मागवून त्याची लज्जत चाखतातच. लोक आपआपल्या आवडीप्रमाणे थंडीच्या काळात शरीरात उष्मा राहिल अशा पदार्थांची निवड करतात.

याच काळात मेथी, तिळ, खारीक, डिंक आणि अन्य सुकामेवा वापरून तुपातले ‘थंडीलाडू’ तयार होतात. हे लाडू भूक भागवतात आणि शरीरास उर्जा देतात. हे लाडू चविष्ट असतात पण मेथीचे प्रमाण जास्त असले तर मुले तोंड वाकडे करतात. आजही ग्रामीण भागात हुरडा आणि मक्याचे कणीस घरी भाजून खाता येते. शहरात काही बंगला मालक हुरडा भाजता यावा म्हणून कोळशाची शेगडी बाळगतात. घरी शेगडी असली की त्यावर कबाब भाजता येते किंवा ताजा बांगडा भाजता येतो. काही जणांना शेणाच्या गोवरीत मका, शाडूची कणसे , हुरडा आणि अगदी रताळे भाजून खायला आवडते. अर्थात या गोष्टीला पेशंस लागतो.

थंडी बरेच, बरे वाईट अनुभव घेऊन येते. दिवाळी सरली की या काळात सगळ्यात जास्त लग्नाचे मुहूर्त असतात. लग्न मुहूर्त थंडीच्या काळातच का? तर या काळातील उत्साही वातावरण आणि नातेवाईकांना मिळणारी सवड. वधुवरांची मानसिक स्थिती व वेडींग नंतर फिरण्यासाठी अनुकूल स्थिती या गोष्टी जमेत धरून लग्नाची आखणी होते. त्यामुळे हिवाळ्याच्या आगमना बरोबरच लग्नाचे हॉल, कॅटरिंग या व्यवसायिकांना बरकत येते. तेव्हा थंडी काही व्यावसायिकांना आनंद देते तर काही लोकांना ती संकटांसारखी वाटते. या काळात झाडांखाली पानाचा सडा पडतो. सफाई कामगारांचे काम वाढते. बरे गावात जसा या पालापाचोळा जाग्यावर पेटवून देता येतो ती मुभा शहरात नसते.

उसतोड कामगार कामासाठी उसाच्या शेतात, मळ्यात किंवा रानात पाल टाकून राहतात आणि त्या थंडीने गोठलेल्या उसाच्या शेतात पहाटेपासूनच विळा घेऊन सपासप ऊस कापत जातात. ऊन वाढण्या अगोदर त्यांना शक्य तेवढे काम संपवायचे असते. ऊस तोडणी दर एकरी ठरलेला असल्याने ते काम जितके जलद उरकेल तितका कुटुंबाचा फायदा असतो. अंधारात ऊसतोड करताना सर्पदंश किंवा जंगली प्राण्यांचा हल्ला होण्याची भिती असतेच. अर्थात या ऊस तोडणीचा ठेका मालदार राजकरणी घेतात. गरीबाला वेळेवर मजूरीही मिळत नाही.

कष्टकरी कामगारांना थंडीतही उबदार अंथरुणावर पडुन ना झोप घेता येत ना गुलाबी स्वप्ने रंगवता येत. सकाळी घरोघरी वर्तमानपत्र टाकणारे, पाव विकणारे, दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी आणि विक्रेते, पोल्ट्री फार्म चालवणारे आणि श्रीमंत लोकांच्या चारचाकी गाड्या रोज सकाळी धुवून आपली उपजीविका चालवणारे अशा अनेक व्यावसायिक लोकांना थंडीची तमा न बाळगता कुडकूडत्या थंडीत काम करावे लागते. ग्रामीण भागातील भाजी पिकवणारे छोटे व्यापारी पहाटे चार वाजताच भाजी विक्रीसाठी बाजार गाठतात. तेव्हा गरीबाला थंडीचा बाऊ करून मुळीच चालत नाही.

ग्रामीण भागातील आदिवासी लोक सकाळी सरपण आणण्यासाठी जंगल गाठतात. उशीराने जंगलात गेले तर परततांना जंगल अधिकारी वाट अडवून चिरीमिरी वसूल करतात प्रसंगी या महिलांना संकटाला तोंड द्यावे लागते, कारण हा आदिवासी समाज नवीन लागवड केलेल्या झाडांमधील सरळ वाढलेली चांगली साग, ऐन याचीच तोड करून आणतात आणि तो गुन्हा आहे. समजुतदार असतात ते शक्य तो अशा झाडांना हात लावत नाहीत ते सुके सरपण तेवढेच गोळा करतात आणि जंगल शिपाई त्यांना अडवतही नाहीत. एवढ्या सकाळी थंडीत जंगलाची वाट चालणे खूपच अवघड कारण चूकून ठेच लागली तर डोक्यात कळ जाते.

थंडी सुरू होता होता मिठागरे सुरू होतात. हे काम आधी मिठागरी किंवा खारपाटील करत होते आणि आता बिहारी मजूर मिठाच्या शेतात, जमा झालेले मीठ मोठ्या फळीने ओढून एकत्र करतात. हे काम उशीराने करायचा प्रयत्न केला तर सुर्याची किरणे डोळ्यावर पडून डोळे लालबुंद होतात. हेच काम कायमस्वरूपी करणाऱ्या कामगारांनी गाँगल वापरला नाही तर डोळे गमावण्याची भिती असते. आता शहरालगतची मिठागरे शहरातील सांडपाणी तिथे गेल्याने नष्ट झाली आहेत. पुर्वी पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी ते मुलुंडच्या पट्ट्यात मोठी मिठागरे होती. दहिसर ते नायगाव,वसई, जुचंद्र या पश्चिम रेल्वेच्या हद्दीत मिठागरे होती. आता फक्त खुणा उरलेल्या दिसतील. नगरपालिकेने या जागेचा वापर डंपिंग ग्राऊंड सारखा सुरू केला आणि हे वैभव नष्ट केले.

जेव्हा आपण थंडी वाजते म्हणून स्वेटर घालून घरी आरामात चहाचा घोट घेत असतो किंवा उशिरा संध्याकाळी भुट्टा भाजून देणाऱ्या गाडीवर उभे असतो तेव्हा याच थंडीत कित्येक जण आपल्या चरितार्थासाठी झुंजत असतात. थंडीचा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव भिन्न भिन्न असतो.

गेले काही वर्षे तशीही नीट थंडी पडत नव्हती, मागील काही वर्षांची कसर या वर्षी भरून निघाली. पूर्वी नरकचतुर्दशीच्या दिवशी थंडीची चाहूल लागायची सकाळी अभ्यंगस्नान करताना कडकडीत पाणी अंगावर घेऊन झाले तरी अंगात हुडहुडी भरायची आणि उत्तरोत्तर ती वाढत जायची. किमान तीन महिने म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी मकर संक्रांतीच्या काळापर्यंत थंडीचे नक्की असायचे, सत्तर च्या दशकात ग्रामीण भागातील आम्ही मुलं तेव्हा रोज संध्याकाळी खेळता खेळता काट्याकुटक्या, बारीक काड्या, पाला पाचोळ जमा करून त्यातला निम्मा संध्याकाळी पेटवून त्या भोवती शेकत बसायचो तर निम्म्या भाग सकाळी शेकोटी करण्यासाठी जपून ठेवायचो. याच दिवसात पिंपळाचे छोटेसे पान वहित जपून ठेवायचो आणि कधीतरी गमतीने कुणाला तरी देऊनही टाकायचो.

सकाळी लवकर उठले तर सगळीकडे दाट धुके पडलेले दिसे आणि तोंड उघडलं की तोंडतून वाफ बाहेर पडे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवतावर दव साकळलेले दिसून येई. झाडावर कुठेरी कोळ्याचे जाळे असे त्यातही दोन चार पाण्याचे थेब अडकून ते ओथंबून येत. सकाळचा सुर्यकिरण त्यावर पडले की प्रिझममधून किरणे बाहेर पडतात तसे सप्तरंग पसरत. पेटवलेली शेकोटी परत परत फुंकर मारून पेटवावी लागे कारण हवेतील धूके खाली येऊन ती थंड पडे. एकदा का शेकोटीने जोर धरला की मात्र धूर उंच उंच जात धुक्याला हद्दपार करून टाकी.

हल्ली ऋतू चक्र बिघडलय की काय? कळत नाही, मुळात पावसाळा संपता संपत नाही, थंडीची प्रतीक्षा असतांना अचानक आभाळाला गळती लागते. आता थंडी पडेल असे वाटत असताना अचानक तापमानात वाढ होते आणि पाऊस कोसळतो. ज्या काळात कवळ्या उन्हात गाई गुरे त्यांची वासरे उंडारत असायची ते उन सुरू व्हायला नोव्हेंबर महिना उजाडला लागलाय. या वर्षी ऑक्टोबर हिट चा तर प्रश्न नव्हताच. शेतकरी नोव्हेंबरमध्ये तूर, हरभरा, वाल सारखी कडधान्ये पेरतात, पण जमीन इतकी ओली आहे, की त्याला अजून निट नांगर लागत नाही. जोत रुतते, डिपळ बाहेर येत नाही. ढगांची पांगापांग झाली आहे, वरूण आता स्वगृही गेला आहे. उत्तरेकडे, उर्वशी, किन्नरी किती काळ बिहाग गात होत्या की जेथून वरूणाचे पाय निघत नव्हते त्यालाच ठाऊक! असो आता तरी पक्षांची किलबिल वाढली असल्याने तो स्वप्नातून जागा झाला असावा अशी आशा करण्यास हरकत नसावी.

थंडीच्या आगमनाची ज्यांना प्रतीक्षा असते ते चौर्यकर्म करणारे काय म्हणतात? ते अनेक लेखकांनी त्यांच्या शब्दात लिहून ठेवले आहे ते पाहू, ,”पावसात सर्व घरातच अडकून पडले की रात्रीच्या रीपरीपीने लोकांना नीट झोप येत नाही. आम्हा चोर्यकर्म करणाऱ्या लोकांना आपलं काम निमूटपणे करता येत नाही. त्या मानाने थंडी आम्हाला मानवते, थंडावा वाढला की एकदा अंगावर रजई, जाड गोधडी घेऊन किंवा एकमेकांच्या मिठीत लोक झोपले की गाढ झोपेत असतात. मग आमच्या सर्व मित्रांना आपले काम शांतपणे करता येते.”

एका अनुभवी चोराची डायरी म्हणते की . “गाढ झोपेत असणाऱ्या घराची झाडाझडती घ्यायला थोडे सोईचे जाते. त्यातही कधीकधी कुलूप तोडतांना किंवा कोयंडा काढतांना थंडीने नेमके हातात कंप भरतो आणि हातून एखादे हत्यार खाली पडून यजमानांना जाग येते. अशा वेळी फार बिकट प्रसंग उद्भवू शकतो. मग कितीतरी वेळ निवांत बसून रहावे लागते. पुन्हा शांत झोपतील याची वाट बघत रहावी लागते. जर ते उठून आले तर त्यांची थंडी पळेपर्यंत ते बुकलून काढणार ही शंका मनात घर करते. चोरी करणे तितकेही सोप्पे नाही.आता तर प्रत्येक घराबाहेर निरीक्षण कॅमेरे बसवले असल्याने जास्त सावध राहावे लागते.”

तेव्हा प्रत्येकाच्या या थंडीशी निगडित काही ना काही आठवणी असणारच कोणी सांगून मोकळे होते तर कोणी डोळे गाळूनही मोकळे होत नाही. या आठवणीशी थांबायला आता वेळ ही नसतो काळ,ऋतू चालत रहातात कारण कोणतीही गोष्ट थांबली की त्यातल आकर्षण संपतं.

यावर्षी पाऊस चांगलाच पडला त्यामुळे थंडीही भरपूर पडली. आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती चांगल्या मोसमाची. सध्या बाजारात मटार, मेथी, कोथंबीर, पालक, मुळा या भाज्या मुबलक येत आहेत. प्रत्येक ऋतूत येणारी फळे ही त्या ऋतूतील शरीराची गरज म्हणून निसर्ग निर्माण करतो त्यामुळे जसा मटार आणि फ्लॉवर आवडीने खाता तशाच पालेभाज्याही आहारात हव्या तरच शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळतील. या वर्षी पपई, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, आंबे, डाळींब, पेरु, कलिंगड ही फळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील अशी अपेक्षा याचाच अर्थ फळांसाठी हा ऋतू मानवंंणारा आहे. फळे आपल्या शरीरासाठी आवश्यक खनिजे पुरवतात. त्यामुळे पपई, अननस, संत्री, मोसंबी अशी फळे थंडीच्या दिवसात मनसोक्त खावीत.

या वर्षी चांगली थंडी पडल्याने आंबा चांगला मोहरला आहे, काजूलाही तसाच चांगला मोहोर आहे. सकाळी त्याचा गंध घेताच मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. आंब्याच्या मोहरावर मधमाशा गुणगतांना पाहिल्या की मनात या वर्षी आंबा चांगला येईल याची खात्री पटते. आंबा फळांचा राजा आहे.त्यातूनही हापूस आंब्याला जगात मागणी आहे. देशात शरीरासाठी आवश्यक अशी व्हिटॅमिनयुक्त द्राक्ष, सफरचंद, आंबा ,पेरू, डाळींब, अननस, मोसंबी, संत्री, केळी,स्ट्रॉबेरी, आणि फणस असतांना आपण विदेशी फळांच्या मागे का लागतो न कळे?

असो थंडीत फिरायला जात चला, ओळखीच्या माणसांना हॅलो हाय करून ओळख दाखवत जा, आपल्या आठवणींच्या कप्प्यात नवीन अनुभव साठवत चला, हीच पुंजी कधीकाळी उपयोगी पडेल. जेव्हा निसर्गाच्या कुशीत जाऊन निवांत वेळ घालवाल तेव्हा स्वतःचा शोध ही लागेल कारण को हम् चा शोधही, हेच तर जीवनाचे सत्य आहे. अन्यथा फक्त उपभोग घेऊन वेळ आणि शरीर नष्ट करणे म्हणजे जीवन नक्कीच नाही.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “चला थंडीचा आनंद घेऊ

  1. webdesign freelancer

    i enjoy reading your articles, it is simply amazing, you are doing great work, do you post often? i will be checking you out again for your next post. you can check out webdesignagenturnürnberg.de the best webdesign agency in nuremberg Germany

  2. freiberufler

    i enjoy reading your articles, it is simply amazing, you are doing great work, do you post often? i will be checking you out again for your next post. you can check out webdesignagenturnürnberg.de the best webdesign agency in nuremberg Germany

  3. freelancer

    i enjoy reading your articles, it is simply amazing, you are doing great work, do you post often? i will be checking you out again for your next post. you can check out webdesignagenturnürnberg.de the best webdesign agency in nuremberg Germany

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *