चव्हाटा
प्रत्येक गावात एक मोक्याची, एकत्र जमून गप्पा मारण्याची, गावच्या भानगडी एकमेकांना सांगण्याची आणि कामधंदा नसताना टाईमपास करण्याची हक्काची जागा म्हणजे चावडी किंवा चव्हाटा. खरं तर जेथे रस्ते चार ठिकाणाहून एकत्र येतात त्याला चव्हाटा म्हणत असावे. चार वाटा यांच अपभ्रशीत रूप चव्हाटा असावं. तर एकाच गावातील चार वाडीतील लोक सकाळी, संध्याकाळी आणि अगदी रात्रीचे जेवण उरकले की जेथे भेट दिल्याशिवाय मनाला स्वस्थता लाभत नाही ते ठिकाण म्हणजे चावडी किंवा चव्हाटा.
या चव्हाट्यावर कोणाचं लग्न जमले, कोणाचे लग्न मोडले, कोण पळून गेली, कोणी पळवून आणली, कोण गरोदर आहे, कोणी मुलीचा जन्म नको म्हणून डॉक्टर गाठला, कोणाचे कोणाशी लफडे आहे याच्या नोंदी कोणतीही वही नसताना ठेवल्या जातात. गावाकडे याची सुरुवात अतिशय मजेशीर असते.
“रे दाजी, तुका काय कळला काय?”त्याचा प्रश्न ऐकताच दाजी आपल बुड त्याच्याकडे सरकवतो, “कोणाची गजाल सांगत,सांगतरी, तु सांगल्याशिवाय कळाक, मी काय नारद आसय, चिपळे घेऊन फिराक?” “तसा न्हय रे असले गोष्टी काय दडान रवततं. कोणी तरी उगाचच सांगान जाता,भले त्याका अर्धी माहिती असली तरी, म्हणान मी–” पद्या उगाचच सस्पेन्स वाढवतो, खरं तल पद्या म्हणजे पद्माकर पण अशा विचित्र अपभ्रंशीत नावाने हाक मारल्याशीवाय गावाकडे कुणालाच चैन पडत नाही. मग विमलचं विमल्या होतं, गोविंदचं गोंदलो, प्रकाशचं पकलो, सभाषचं सुबलो. असा नावाचा लोचा केल्यावरच बरे वाटते. असो तर, दाजी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, “पद्या मेल्या किती आढेवेढे घेशीत? जणूकाय तुच गरवार असल्याची बातमी सांगतस की काय!” दाजीची ही मात्रा लागू पडते. “मायझया,कायेव काय? तुझो बापूस तुझ्या टायमाक गरवार होतो काय?” पद्या दाजीवर कोसळतो.
दाजी जोराने हसतो,”मेल्या, पद्या चिडतस कित्याक वाईच गंमत रे, काय सांगत होतस ता तरी सांग, तू कथा सांगीसर कावळे अंडी उबवून पिल्ला काडतीत.” मग पद्या तोंड उघडतो, “रे मेल्या दळव्याचा पोरग्या रे!” दाजी त्याच्याकडे पहातो,”त्याचा काय? काय सांगूचा धडपणे सांग बाईलमाणसावानी आढेवेढे कित्याक घेत?” “रे दाजी, ता दळव्याचा सुगंधा परवा डॉक्टर बरोबर पळान गेला.” “पद्या, मेल्या सांगतस काय? तु काय बोलतस तुका कळता काय? खय तो एम.बी.बी.एस डॉक्टर आणि खय ही शाळा मास्तरीण, ही जोडी म्हणजे कायतरीच, पटना नाय, नर्स असती त त्याका मदत तरी झाली असती ह्या काय करतला, त्याका पाडे शिकवतला, का पेशंटाक छडीयेन मारतला?”
“दाजी, तू अगदीच “हो” कसो रे ! मेल्या, सुगंधा औषध घेऊक डॉक्टरकडे गेला आणि अर्धो तास दवाखान्यात थांबला तर चार पेशंट जास्त येतत. डाक्टराकडे, पेशंट अर्जंट म्हणान सरळ आत रीगतत आणि सांगतत सुईच लावा जरा पटकन उतार येऊक व्हयो, म्हणजे डाक्टराच्या बाकड्यावर झोपान सुगंधाक बघूक गावता.”
“रे पद्या, सुगंधा इतको वेळ थय काय करता?” दाजीनी गंभीरपणे विचारले “काय करतला? डॉक्टर आणि ती गुलूगुलू बोलताना मी ऐकलय आणि काय करीत असतीत त आपणाक काय ठाऊक नाय?” पद्या बोललो. त्यांचे गजाली सूरु असतांना बबनो इलो, त्याका बघून दाजी हसत म्हणालो “या सायेब तुमची जीलापरिषद काय म्हणता? व्हयत्या रस्त्यावर यंदा तरी शिरा घालतलास ना? या वर्षी सर्जरी नाय केलास त पेशंट दगावतलो. मग या वर्षी तरी बजेट आसा ना रस्त्याक का कोणी पळीवला?” शाळा कशी घेवची ता दाजीक कोणी शिकवूक नको इतको तो तरबेज.
बबन आला आणि दाजीच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, “दाजी या वर्षी डांबरीकरण पक्यां, व्हयती नालीव बांधून घेवची हा ,साहेब वर्क ऑर्डर कधी काढतत ता बघूया?” दाजीला, बबनराव याच्याकडून विषय मिळतो आणि दाजी सुरु होतो,”मेल्या बबन्या ह्या रस्त्याचा काम कोणाकडे हा? सिरसाटाकडे का खटावकराकडे?” बबन्या त्याच्यावर रागावतो,” रे रस्तो झाल्याशी काम, तो सिरसाटान केलो की खटवकरान त्याने काय फरक पडतलो?” “बबन्या मेल्या ग्रामपंचायत सदस्य ना तू, तुका ठाऊक नको, सिरसाटान केला, तं डांबरी करण वर्ष दोन वर्ष टिकात आणि खटवकरान केला तं पावसात डबरे पडतले.”
“ह्या त्रैरासीक कशावरून मांडल? तू लोकांचे डबरे बघीत रवत की काय? तू कित्याक नाय घेण कंत्राट? घोपाण असात त घे मा रे” “मेल्यानो, आमी कोणी कत्रांट घेतला त लाभाक घालशात काय? तुमी साटे लोटे करुन आपसात घेतास म्हणान उजव्या डाव्या झाला तरी बोंब होणा नाय, तीन वर्षीपाठी मोरी बांधलास आता चिरो तरी जाग्यावर रवलोहा काय? ही असली तुमची कामा, आपल्या गावचा काम असला तरी तेतूर भेसळ केल्याशिवाय तुमका झोप नाय येणा.”
दाजीच लेक्चर ऐकून बबन्या खवळतो. “दाजी, तुका तेतूर गती नाय ह्या खरा, म्हणान आमच्यावर घसरशीत काय? मेल्या कत्रांट घेणा खावचा काम न्हय, मटेरियल, मिक्सर, रोलर मजूरांची मजूरी, तजविज करेसर चड्डी पिवळी होता. पीडब्ल्युडी आठधा महीन्यान पेमेंट करतला तवसर बसा बुड आपटीत.” “मेल्यानो, चार आण्या खर्चाक दिड रूपये लावतास, त्यांका न कळाक ते काय अचरट हंत, त्यांच्या हातावर घालताना कूचकूच करतास, म्हणान ते पेमेंट रखडवून ठेवतत.” दाजी बोललो. “रे येडझया, आमका काय एका माणसाक देऊन चलता? order काढणारो, काम पास करणारो, बिल पास करणारो. सगळे टपून बसतत. रे दीड दमडीचो शिपाय तो पण हात पगळता. सांग कसा परवडात?” बबनो बोललो.
त्यांच्या गप्पा सुरु असतानाच आबा सुतार, दाजीला रस्त्यावर दिसला. दाजीला लहर येते, “आबल्या मेल्या इतक्या उशिरा खडे चलल? मेल्या चार पाच दिवसात गमलस नाय तो! खय काम चललाहा?” “नरसू बामणाचे, त्याचो गोरवांचो वाडो ठोकून दिलय, तेहतीस बाय चवदा, काय चेष्टा हां? वर सिमिट पत्रे घालतलो.” आबलो माहिती देता. “रे इतको मोठो वाडो कित्याक, त्यात बामण बायले बरोबर फुगडी घालतलो काय?” दाजी विचारता. “मी हुकमाचो ताबेदार, ठोक म्हटल्यान की ठोकतय, कित्याक म्हणान विचारणय नाय. त्याका मोठो वाडो व्हयो झालो, म्हणालो कापून सागवान लाकडा फुकट जातत. मी म्हटलय, “तू , सांगशीत तसा.” “रे आबल्या, मायझया, बामणाकडसून कमी मजुरी घेतं अशी ओरडं हा, खरा काय?” दाजीने विचारले.
“छा! तुका कोणी सांगला,तो काय माझो सासरो हा का जावय? दिवसभर थय पंधरा फुटावर उन्हात मराक व्हया.”आबा म्हणाला “रे बामणच सांगत होतो,आबाक चार पैसे कमी दिले तरी चलतत म्हणान विचारतय?” दाजीनी पुडी सोडली. ही मात्रा आबल्यावर लागू पडली. “तसा न्हय रे दाजी, माणसा ओळखूची लागतत, बामणाकडे पोटभर जेऊक घालतत, संध्याकाळी निघताना बामणीन चहा देता, घरात काय असला तर पोरांका बांधून देता, म्हणान आपले—-“
“आबा,किती दिवसाचा काम हां,नाय म्हणजे बामणाचा काम आटपला तर येशीत मा दोन दिवस? पडवीचो दांडो ठोकूचो हा.” “दाजी, तुजा काय खऱ्यातला न्हय, गेल्यावर्षी नांगराक जगाल मारून दिलंय त्याचे पैसे अजून देऊक नाय, विचारलंय की पट काढतं.” आबा सुतार बोलला.
डाव दाजीच्या अंगावर पालटतोय पाहून दाजी सावध झाला आणि आबाला म्हणाला,” मायझया, माझ्याकडून वळती चुडता घेऊन गेलस त्याचे पैसे काय तुझ्या बापाशीन दिले होते काय?” आबा ओशाळा हसला, तरीही बाजू सावरत म्हणाला, “भंगली, कसली चुडता? शाप फाटकी ती, झड बांधूनव भीत भिजली, त्याचे कसले पैशे, तुझ्याकडे पडान होती म्हणान आणलंय, नाय तर जाग्यार कुसणार होती.”
आता वाद होणार आणि दाजी, आबा सुताराची आई,-बहीण काढणार हे बबन्या ओळखून होता म्हणनू तो दाजीकडे पाहून म्हणाला,”रे गेल्या वर्षीचो व्यवहार, दाजी तुझ्या चुडताचे काय ते वाशील करून आबल्याक काय ते देऊन टाक, तू मोकळो तो मोकळो.” त्याच एकून दाजी भडकला,”मेल्या बबन्या,आवशिक खावं, तू कधी पासून वकिली सनद घेतलं, आबल्याक काय तोंड नाय? त्याका पैसे व्हये तर किती ता तो सांगीत.” बबन्या आता संधी सोडणार नव्हता, त्याला दाजीवर राग होताच तो म्हणाला,”रे दाजी, दोन दोन झिल मुंबईक आसत, गरिबांचे पैसे ठेऊन तुका निज कशी रे येता. देऊन टाकी ना आबाचे पैसे, उद्या गावभर सांगत सुटलो तर तुझा काय रवात!”
दाजीने रागाने,आपल्या खिशातून नोटा काढल्या आणि शंभरची नोट आबासमोर धरून म्हणाला,” आबल्या मेल्या याच्यातसून तुझे काय ते घे आणि खय येव बोंब मारीत फिरा नको.”
आबाने ते पैसे खिशात घातले आणि वाटेला लागता लागता म्हणाला, दाजी,वाईट वाटान घेव नको, आदल्या वर्षीचे हत ते पण वाळते करून घेतंय. चलात मा?” पद्या आणि बबन गालात हसत होते,दाजीची चांगलीच खोड मोडली होती. आबल्या दाजीकडे पहात म्हणाला,”वाईच तमाखूची डबी दी, बार भरून जातंय. बामणाची खोटी जाऊक नको.” दाजीने नाईलाज म्हणून डबी त्याच्या पुढे धरली. आबाने तंबाखू चुना मळला, हात, पद्या बबन्या समोर धरला. त्यांनी चिमूट चिमूट तळहातावर घेतली,पुन्हा अंगठ्याने मळली आणि तोंडात टाकली.आबा गाणं गुणगुणत निघून गेला. दाजी, पद्याकडे बघत म्हणाला, “या बबन्यान माका सकाळीच घोडो लावलो.” बबन्या दात काढून हसत होता. “मेल्या, जमणा नाय तर अंगार घ्या कित्याक? आणि त्या फाटक्या आबाकडसून काम करून घेतल्यार पैसे देऊक नको? कधीतरी बोंब मारतलोच.. हय, आमीच आसव म्हणान ठिक, नायतर व्हयती गजाल खयखय पोचात सांगूक येवचा नाय “
“एक वेळ लोक वेताळाक हात जोडूचे नाय पण या पिपळावर बसून गजाली मारल्याशिवाय घराकडे जावचे नाय. एक डोळो रस्त्यार आणि एक डोळो बावडीवर. कोण कोण येततजातत यांच्यार देखरेख करण्यात बाबल्याची सकाळ जाता.” दाजीचा खोडसाळ स्वभाव उफाळून आला. “मी देखरेख करतय आणि तू हय बसान काय मोजीत रवतं? उगाच तोंड चाळवा नको, मगे म्हातारो झालस तरी कोणी बाईल माणूस गेला की उगाचच खाकारत बसतस ताव जगाक कळतला, आपण रवता शाणाच्या घरात आणि आमका म्हणता वास येता काय? “
त्यांचे भांडण आता रंगात येणार इतक्यात सुगंधा परबळकर पाण्यासाठी दोन हंडे आणि दोन कळशा घेऊन विहिरीकडे जाताना बबन्याने तिरक्या नजरेन पाहिली. सुगंधा तशी उफाड्याची, दिसायला देखणी तर होतीच, लांब सडक केस, भरदार बांधा, डौलदार चाल, लांबसडक हात, हातात डझनभर काकणं, तिच्याकडे पाहून नजर ठरत नव्हती. तिच्या पायातले पैंजण छुम छुम वाजत होते. तस दाजी पद्माकरकडे कटाक्ष टाकत म्हणाला, “मायझया बबन्याची मान कशी फिरता ती बघ, बाईल माणूस बघल्यान की खुळावलो, पण जी दोन हंडे कपाळावर घेऊन काखेत एक कळशी, हातीत दुसरी कळशी सहज घेता ती बबन्याक सहज कडेर घेईत.”
ते ऐकतात बबन प्रचंड चिडला, “ती काय माका कडेर घेतली, माझ्या प्रकृतीवर जावं नको, मी तिला खय घेईन कळाचाव नाय.” त्याच बोलणं संपत न संपत,ती तरा तरा बबनकडे आली आणि कळशी बाजूला ठेऊन तिने खाडकन बबनच्या कानाखाली वाजवली. बबन्या भेलकांडत दूर पडला. दाजीकडे पाहत सुगंधा, कडाडली, “दाजीनो, तुमच्या वयाचो मान राखतय, आज काकीक येऊन तुमचा चव्हाट्यावर काय चलता, ता कानावर घालतय, तुमकाव सुना येतले, मगे तुमच्या सुनेक कोणी काय बोलला की कशी मिरची झोमता ता कळतला.” तिचा अवतार पाहून पद्या वाटेला लागला. बबनला सुगंधाने कानाखाली मारल्याची बातमी लगोलग गावात पोचली आणि बबन्याला गावात तोंड दाखवायला लाज वाटू लागली. चार दिवसांनी पद्या आणि बबनची गाठ नदीवर पडली तसा, बबन धावत पद्याकडे रागाने पहात म्हणाला, ”पद्या तुचमारीच्या, तूच व्हयता गावभर केलस ह्या माका कळला पण कधीतरी तू तावडीत गावशीत तेवा सोडुचय नाय.”
पद्या त्याची समजूत काढत म्हणाला, “बबन्या तुझी कागाळी करूची, माका रे काय गरज? बहुतेक सुगंधानच आपल्या घोवाक, रत्न्याक सांगल्यान, तो बघ समोरून रत्नो येता, शाणो असशीत त बेगीना पट काढ, नाय त पुना थोबाड रंगवून घेवची तयारी ठेव.”
बबन्याक रस्त्याच्या दुसऱ्या टोकाक,कोणीतरी त्यांच्या दिशेला येताना दिसला, तो खरच रत्नोच आसा का आणखी कोण, बगण्या आधीच तो झाळीत दिसेनासो झालो.
शाण्यान चव्हाट्यावर जाव नये, बाईल माणसाची गजाल तर मुळीच काढता नये. एखादी सुगंधा कधी कानाखाली जाळ काढीत सांगूक येवचा नाय. पण अतरंगी चव्हाट्यावर गेलोच नाय तर चव्हाट्याक अर्थ रवात काय?
गाव थय xx वाडो म्हण होतीच पण गाव थय चव्हाटो आणि इरसाल माणसा असततीलच.