चारित्र्य

चारित्र्य

मित्रांनो आठवतोय का तुम्हाला धडा, साने गुरूजींचे “सुधास पत्र”?
दूर असून गुरुजी, वयातलं अंतर विसरून, झाले होते पुतणीचे मित्र

मुलगी म्हटली की होते सुरू शिकवणी, ‘बिचारी’ हाल खाईना कुत्र
द्या की मुलांनाही सच्छिलतेची शिकवण, घडवा त्याचं ही चारित्र्य

मुलगी दिल्या घरचं धन, चांगली नाही, ही बुरसटल्या विचारांची म्हण
मुलीचा जन्म झाला की घर दुःखी, आईच्या हृदयी विवंचनेचा घण

कसे वागावे? कसे जगावे? कसे जपावे, कसे ठेवावे शुध्द आचरण?
आता कुणाला सांगणं अवघड, बोललात काही की क्षणात रणकंदन

सावित्री बाईंच्या लेकी शिकून झाल्यात आता सुजाण अन शहाण्या
तरीही दर वर्षी ऐकू येतात रिंकू, निर्भया, अत्याचारी अनेक कहाण्या

माणूस होमोसेपियन झाला त्याला झाली असावी काही लाख वर्ष
अजूनही त्याच्या उगमाची रोमहर्षक, कहाणी ऐकतांना होतोच हर्ष

आग, चाक, शस्त्र, असे नवनवे शोध लावत त्याने घडविला उत्कर्ष
आपल्या इंद्रियांचा वापर कसा होतो हे आठवताच करे शरीर स्पर्श

वाटले बुध्दीच्या जोरावर तो होईल सुसंस्कृत, सुशिक्षित, सुजाण
अनुभवे शिकला शहाणपण, पिकवू लागला शेतीत धान्य मिळे मान

अंगावर धड वस्त्र नव्हते तेव्हाही त्याची नियत कधीच नव्हती खोटी
तेव्हाही तो मनातून माणूस होता, झाली नव्हती बुध्दी भ्रष्ट, मन माती

जो जो ‘तो’ शिकत गेला दुर्दैवाने त्याचा सुसंस्कृतपणा हरवत गेला
हळूहळू शरीरात विकार शिरले, षड्रीपुने ताबा घेताच तो पशू झाला

विसरला नाती, विसरला परस्त्री, माता-भगिनी, विकारी राक्षस झाला
जिच्या पोटी जन्म घेते शक्ती तिच्या, ‘अबला’ उल्लेखानेच घात केला

ती विसरून गेली आपली शक्ती, शौर्य,मग दुष्ट हैवानांनी घातला घाला
बेसावध क्षणी तिच्या शरीराची केली विटंबना, केला क्रूर दुष्टावा चाळा

नराधमाने पाहिले नाही तिचे वय, नातं, कन्या शोभेल इतका देह कोवळा
देवाचा पुजारी म्हणवितांना, स्त्रीवर वाईट नजर त्याचा आचार कुट्ट काळा

स्त्रीच्या सौंदर्याच गुण गाता गाता, नराधमाने माणुसकीचा खून केला
विश्वास ठेवावा कोणावर? जर सग्यासोयऱ्यांनीच मुलीचा घात केला

नेत्याच्या, कधी नात्याच्या, तर कधी गुरूच्या पेहरावात तो दिसतो चांगला
का करावी दया? बना ‘फुलन’ दिसूदे त्याचा छिन्नदेह जो चौकात टांगला

भगिनी पुन्हा आठव तुझे रूप, हो चंडिका, सौदामिनी, कर शत्रू निःपात
मनी आठव, अहिल्याबाई, कर स्वतःस जागे, संपवून टाक धरेचे पाप

रूपाचा नको करूस गर्व, शक्ती उपासक हो, बाळग एकच मनी ध्यास
सभ्यतेचा बुरखा पांघरून फिरणाऱ्या नराधमांच्या नरडीचा घे घास

कलीयुगात सगळेच रावण, नको ठेऊस अपेक्षा, कर तूच तुझे रक्षण
मॉडर्न दिसण्याचा नको ध्यास, त्याआधी कर बलोपासना तेच तुझे धन

आचार, विचार आणि संस्कार यानेच घडत असते माणसाचे चारित्र्य
केवळ सौंदर्य, कपडे, शिक्षण याने ना कोणी मोठा ना त्याचे कुणा पावित्र्य

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar