जगण्याची मज्जा

जगण्याची मज्जा

जीवनात प्रत्येकाच्या थोडा तरी जरूर संघर्ष हवा
रोज तोच सुर्य पुर्वेला तरी नजरेस दिसतोच ना नवा!

पाऊस असो वा उन, विना तक्रार चालत रहाते घड्याळ
तुमची मनस्थिती कशी ही स्थिती असो,थांबत नाही काळ

कुणाचे असणे नसणे याने कुणाला नाही पडत फरक
सुर्य मध्यानी आला तरी काहींना कधीच नाही कळत

पण काही माणसांच्या मनात तुम्ही बांधले असते घर
ज्याला तुमचा ठाऊक असतो स्वभाव, तोच ठेवतो आदर

कोणासाठी कधी थांबावे, पहावी वाट याचे असावे भान
तुमचा स्वभाव आणि वागणेच ठरवते, जपते तुमचा मान

गरजेनुसार मदतीसाठी धावून गेलात तरच तुम्ही देवदूत
आगंतुक पणे कुठे हजेरी लावणे याने आपण ठरतो भुत

कुणासाठी आपला काही वेळ अत्यंत मोलाचा असतो
जीवन मरणाच्या वाटेवर असाच मित्र प्रथम मनी आठवतो

कधीकधी कुणाची वाट पाहून गोठून जाते आपली नजर
तरीही अश्रूंचा थेंबही फुटत नाही हाच तर निग्रहाचा कहर

इतकं अलिप्त, उदासीन राहून जगणं असतं फारच कठीण
सानिध्य, विश्वास, प्रेम व्यक्त करून का होतो कोणी दीन ?

मित्रा या शब्दात आहे, एक अनामिक सुप्त ताकद
कोकणातील दार ठेंगणी घरात प्रवेशच करावा लागतो वाकत

लिनता, किंवा नम्रता म्हणजे काही क्षमायाचना किंवा नाही हार
दुसऱ्या माणसाच्या मनात उतरण्यासाठी तेच तर खर प्रवेश दार

गोड बोलणं आणि चांगलं वागणं यानेच जर असतील प्रश्न सुटत
आबंट तोंड करून, दुसऱ्याचा मुड घालवत का जगाव कण्हत कुथत?

मित्रांनो वाद, संवाद घडूनही लुटता येते जगण्यातील मज्जा
अबोला, भांडण आणि तिरसट वागुन का घेताय स्वतःला सजा?

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar