जगलो खुळ्या भ्रमात
मी जगलो खुळ्या भ्रमात, गुंतून तुझ्या प्रेमात
मज ठाऊक कुठे होते? तो मृगजळाचा फास
मज कळून चुकले उशीरा, ती फसवी होती प्रित
मज मनास वाटले क्षणी त्या, एक प्रेम गीत गावे
आकाश पेलणाऱ्या कड्याच्या मदतीस जावे
उशिराच मजला कळले तो आभास मनाचा
मी न ऐकला कधीही आवाज मम अंतरीचा
आता कुणास सांगू दुःख या उध्वस्त मनाचे
जुळता न जुळले सूर उरले इमले कल्पनेचे
मुक्त मी झालो म्हणावे परी अज्ञात असे पाश
आवरले मनास कितीही तरी भरून ये आकाश
डोळ्यास नाही डोळा होती विचित्र मनी भास
कानात गुंजते तुझे हास्य, वाटते आहेस आसपास
करून प्रित तुजवरी, उधळले सर्वस्व जे माझे खास
लाऊन जीव मज केले पिसे, तू माझा होतीस श्वास
तुझीच छबी मी जपली होती माझ्या मन मंदिरात
जपले होते तुझे जगणे, ओठावर नाव, सुर लयीत
गुंजतो अजून आहे तुझा गुणगुणता स्वर कानात
परी सरली कातरवेळ परतून जातो मी अंतरात
येईल आठवण तुजला तेव्हा जमतील थेंब नेत्रात
आठवतील क्षण, सुन्न मन, दिसेल प्रतिबिंब आसवात
येवो न किंचित दुःख तव वाट्या तू नांद शांत वैभवात
विसरून जा बालमित्रास, जातो सोडून हा शेवटचा आर्त
Great Words of feelings eternal soul, superb poem.