पौर्णिमा

पौर्णिमा

तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शे-दीडशे उंबऱ्याचे लालठण गाव वसलं आहे. गावाच्या बाजूने तालुक्याला जाणारा पक्का रस्ता वैतरणा नदीला वळसा घालून जात होता. या लालठण गावात आगरी आणि वारली समाजाची घरे होती. येथील लोकांचा व्यवसाय शेती, पण काही शिकलेली तरुण मुलं, सफाळा, विरार, वसई, बोईसर येथे छोट्या मोठ्या कामावर जात होती. तर काही लोक आगरी लोकांच्या शेतावर मजुरी करत. काही वीट भट्टीवर कामाला जात होती. आगरी लोकांची घरे ही पक्क्या सडकेच्या एका बाजूस होती तर आदिवासी कुटुंबे रस्त्यापासून थोडी दुर एक ओहोळाच्या पलीकडे रहात होती. या ओहोळावर लाकडांचा कच्चा साकव आदिवासी बांधवांनी बांधला होता. दर वर्षी पाऊस येण्यापूर्वी त्याची डागडुजी करावी लागे. पाऊस सुरू झाला की या ओहोळाला तुडुंब पाणी भरे. संपूर्ण किल्ल्यावरून पाण्याचे लोट या ओहोळात येत. आदिवासी तसे निडर म्हणूनच या लाकडी पुलावरून निर्धास्त ये-जा करत. अजून पर्यंत या ओहोळावर लोखंडी पुल किंवा काँक्रीट पूल बांधण्याचं सरकासरने मनावर घेतले नव्हते. अपघात घडल्याशिवाय सरकारचे कधी डोळे उघडत नाही हेच खरं.

आदिवासी कुटुंबातील फारच थोड्या लोकांची शेती होती. चंद्रकांत टोपले आणि त्याची बायको रखमा यांची दोन एकर सरकारी जमीन होती. पावसाळी भात आणि हिवाळ्यात हरभरे, तूर ते लावत. त्यांना पौर्णिमा नावाची मुलगी होती. ती नाके,डोळी होती पण रंग मात्र सावळाच होता. दिसायला जैत रे जैत मधील स्मिता सारखी, हे पोर्णिमा नाव ज्यांनी ठेवलं त्याची कल्पना काय असावी ईश्वर जाणे. ती तांदुळवाडीच्या शाळेत सातवीला शिकत होती. आता कुठे तिला तेरावे वर्ष लागल होतं. एक दिवस त्यांच्या पाड्यावरचा इतवार काका काही निमित्ताने त्याच्या घरी आला तेव्हा रखमाने, पौर्णिमाला इतवार काकाला पाणी द्यायला सांगितलं. तिला पाहून तो म्हणाला, “अरे चंद्रकांत तुझी पोरगी बरीच मोठी झाली. दोन तीन वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा एवढीशी दिसत होती. तिचं लग्न करून टाक.” पोरगी पटकन म्हणाली, “काका तूच तुझं लग्न कर, मला नको सांगू, मला शिकायचं आहे, शहरात जायचं आहे. मला गावात राहायला नाही आवडत.”

तीच चुरूचुरू बोलणं ऐकून इतवार काका हसला, “पोरी,मी डोकरा झालो, आता मी लगीन कोणाशी करू? तू जास्त शिकून काय करणार? आपल्यात कोणी शिकत नाही.”
ती हसली, “आमच्या बाई सांगतात,पोरींनी शिकलं पाहिजे. इंजिनिअर, डॉक्टर, टीचर झालं पाहिजे.आमच्या बाई त आपल्या जातीच्या आहेत त्या कशा टीचर झाल्या? मी पण शिकून मोठी होणार.” इतवार हसून चंद्रकांतला म्हणाला, “बघ बाबा,तुझी पोरगी नको तितकी हुशार झाली आहे. पण सांभाळ, उद्या तिला शिकलेला नवरा मिळणार नाही.”
इतवार जाण्यासाठी उठणार इतक्यात रखमा आली, तिच्या हातात दोन ग्लास आणि चपटी बाटली होती. तिने ती चंद्रकांत जवळ दिली, “मी पावशेर आणली आहे, पहिल्या धारेची आहे ,काकाला दे.” चंद्रकांतने दारू वास घेऊन पाहिली.काय मनात आल कोण जाणे पण माचीस काडी पेटवून बाटलीच्या तोंडाजवळ नेली. फट् आवाज आला . तो हसला. ती आनंद झाल्याची पोच होती. “खरा हाय, पयल्या धारेचीच आहे.” इतवार उभा रहात म्हणाला,”पोरी मी दारू सोडली गेल्या वर्षी मी खूप आजरी पडलो होतो, सारख पोट दुखायचे, पोटाच्या खाली सूज यायची. डॉक्टर बोलला, माझं लिव्हर कामातून गेलं,मी पुन्हा पिली तर जगणार नाय. तीन महिने डॉक्टरकडे जात होतो. घरी आलो की दिवसभर झोपून राहायचो, खूप दुखायचे, कितीतरी गोळ्या खाल्या तेव्हा कुठे बरा झालो. आता दारू बिरु काय नाय. त्या चंद्रकांतला पण देऊ नको.”

चंद्रकांत हसला, “काका, मी पावशेर रोजच घेतो मला काय नाय होत. शेतात काम करून थकायला होत. पावशेर मारली की जेवण बर जात आणि झोप बरी लागते.” इतवार हसला, “चंद्रकांत मला तुझ्या सारखंच वाटायचं पण डॉक्टर बोलला तेव्हा पासून मी तलफ आली की गवती चहाची पात आणि आलं तुकडा टाकून अर्क बनवतो आणि एक घोट घेतो, छान वाटतं, आता मला दारूची आठवण होत नाही. बिडी पण मी पित नाही. डॉक्टर बोलला बिडी पिली तर हार्ट फेल होत. अगदी लहर आली तर सुपारीचा तुकडा तोंडात टाकतो. पण बिडी बंद.”

इतवार काकच ऐकलं आणि पौर्णिमा बाबाला म्हणाली, “बघ, मोठा काका दारू पीत नाही की बिडी ओढत नाही. तू पण दारू सोड, दारू पिली की तू कसा तरी वागतो,आईला शिव्या देतो, तिचा आई बाप काढतो.आमच्या बाई सांगतात, दारू पिली की माणसाचा माकड होतो. तो वाटेल तसे बोलू, वागू लागतो, डुक्कर होतो, तो कुठेही लोळतो, तो राक्षस होतो, तो कोणालाही मारझोड करतो.”

चंद्रकांत रागावत म्हणाला,”तुझ्या बाईच डोकं फिरलं आहे. ती काही तरी शिकवते. तिची तक्रार मी सरपंचांना करतो मग ती बरोबर वठणीवर येईल.देतील कुठेतरी बदली करून मग बोंबलत बसेल. तुला शाळेतच पाठवायला नको, काही शिकून येते आणि इथे शहाणपण सांगते.” रखमा पौर्णिमाकडे पहात म्हणाली ,”ती मोठी झाली, बाई सांगतात ते तिला कळतं. शाळेत नको त घरी बसून काय करेल? तिचं लग्न लावून दे. शाळेत गेली तर बाई तिला काय तरी शिकवणार आणि ती घरी येऊन आपल्याला सांगत बसणार.”

इतवार हसला, “रखमे तुझी पोरगी शहाणी आहे,ती सांगते ते खरं आहे, चंद्रकांतने दारू प्यायली की तो काय काय करतो? जरा आठव, तुला मार झोड करतो की नाय,तुझ्या अंगावर मारल्याच्या किती खुणा असतील? त्या मोज, म्हणजे पोरगी न तिची बाई काय सांगते ते कळेल. एकदा दारूची नशा डोक्यात भिनली की माणूस माकडा सारखे चाळे सुरू करतो. उगाचच बडबड करतो,जमिनीवर लोळतो, वांती करून ठेवतो आणि तिथेच झोपतो, खोटं आहे का? मी म्हणालो पोरीचं लग्न कर ते गंमतीने, तू तिला नक्की शिकव, मोठी साहेब बनू दे, कचेरीत बसेल नाही तर काळा कोट घालून वकील बनेल.”

पौर्णिमा एकदम खुश झाली, “मोठा काका, तू फार चांगला माणूस आहेस, तू शिकला नाही तरी तू चांगलं बोलतो, चांगलं सांगतो. मी आमच्या बाईला तुझं नाव सांगीन.त्या खुश होतील.”

चंद्रकांत मात्र इतवारवर रागावला, “अरे काका पोरीच्या डोक्यात हे काय घातलं? उद्या शहरात शिकायला जायचं म्हणाली तर पैसे कोण देणार?” इतवार बोलला,”अरे पोरीच्या शिक्षणाला सरकार पैसे देते, तेच नोकरी देते. फक्त पोरगी शिकली पायजे म्हणजे बघ.” “अरे काका पोरगी शिकली की जास्त शहाणी होते, मग नट्टापट्टा करते, लिपस्टिक लावते, डोळ्यात काजळ घालते, पिक्चरमध्ये दाखवतात तसे कपडे घालते. शिकली तर तिच्याशी लग्न कोण करणार?”

चंद्रकांतने दारू तोंडाला लावली आणि दोन चार घोट घेतले. एवढ्यात रखमा पूढे आली. तिने बाटली ओढून घेतली. ती बाटली तिने समोरच्या झुडपात फेकून दिली. चंद्रकांत गुरगुरला, “रखमेssss, भोसडीचे कशाला फेकली बाटली? विकत आणली होती ना?तुझ्या बापाचे पैसे होते का?” ती रागावली,”माझ्या बापाचे असतील नाय तर तुझ्या पण काका काय सांगतो ऐकलं ना! यापुढे दारू बंद. उद्या इतवार काकासारख झाल तं डॉक्टरकडे जायला नोटी हायेत का? आता दारू आणि विडी बंद.”

चंद्रकांत चिडला होता पण इतवार ने समजुत घातली. “चंद्रकांत, वेड्या बायकोला शिव्या का देतो, तू इतर लोंकापेक्षा वेगळा आहेस, समजुतदार आहेस,पोरगी शिकली तर तुझ नाव काढेल. त्या दारूने पार वाटोळं होत पोरा. माझं ऐक, मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघीतले आहेत.” “नको नको, पोरीला जास्त शिकवायलाच नको, आता सातवीत आहे त किती बोलते,उद्या जास्त शिकली तर घराच वाटोळ करेल.शिक्षण बी नको आणि नोकरीबी नको.”

रखमेने मात्र अडाणी असुन पोरीला पुढे शिकवायच मनावर घेतल असावं. ती म्हणाली, “बाजारात मी भाजी विकायला जाते तेवा बघते, आता आपल्या जातीतली पोरं बरी रहातात, चांगली भाषा बोलतात. कोण कोण मास्तर नायतर पोलीस म्हणून काम करतात. आपल्या पोरीला अडाणी ठेऊन तिची सत्यानाशी का करायची? मी पोरीला शिकवणार, काय बी झालं तरी आता माझी पोरगी शहरातल्या पोरीसारखी सायेब होणार.”

चंद्रकांत तिच्यावर भडकला, “तू पाठव तिला शाळेत मग बघतो,गांडीवर लात बसेल तेवा कळेल. आली मोठी शहाणी, माझ्या पोरीला साहेब करायला. तुझ्या सुडक्याकडे बघ, आपण आदिवासी हाव, आपण तसेच रहाणार. जास्त उड्या नाय मारायच्या.”

रखमापण आता इरेला पेटली होती, “मी पोरीला शिकवणार, तुला काय करायच ते कर,पण काका सांगतोय तर ते बरोबर आहे. माझं जसं लहान वयात लग्न झालं तस तिचं लग्न नाही लावायचं.”

इतवार समोर नसता तर चंद्रकांतने रखमेला बुकलले असते, तसा तो आक्रमक होता त्याला तिचा प्रचंड राग आला होता पण तो काही बोलला नाही, इतवार उठता उठता म्हणाला, “पोरानो झगडा कशाला? तिच्या नशीबात असल तर शिकल. अरे चंद्रकांत आपण काय कायम अडाणीच राहायचं का? इतर समाज शिकतो, साहेब होतो आणि आपण गुर चारत नाही तर लाकूड फाटा तोडत मजूर म्हणून राबायचं, आपल्या बायकांनी शेतात काम करायचं, अस किती वर्षे चालणार? अरे पोरगी शिकली तर तुझच नाव होईल ना, का रखमेचं?बघ विचार कर मी निघतो, भांडत बसू नको.”

चंद्रकांतच्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता. तो मनात म्हणाला इतवारचा पोरगा लोकांची मजुरी करतो आणि मला शहाणपण शिकवतो. पण एक दिवस शाळेच्या बाई घरी आल्या, त्यांनी सगळ्या गोष्टी समजावून सांगीतल्या त्या स्वतः शिक्षिका झाल्यामुळे त्यांच घर कसं बदललं. आता त्यांना गावात किती मानतात ते सांगितले. खूप प्रयत्न करून त्यांनी चंद्रकांतची समजुत घातली. चंद्रकांत बघत होता बाई गोल पातळ नेसली होती. दिसायला बामणा सारखी वाटत होती. हळूहळू त्याच मतपरिवर्तन होत होतं.

रखमेने ठाम ठरवलं म्हणून पौर्णिमा पुढच्या वर्षी शिकायला तलासरी येथे गेली. बाईंनी स्वतः चंद्रकांत आणि रखमा यांना तलासरी येथे नेऊन तेथिल मुलींचे वसतिगृह दाखवले. आता पौर्णिमा घरी आली की येतांना सुगंधी साबण, पावडर, नेलपॉलिश अस काय काय आणायची.कितीतरी वेळ नट्टापट्टा करायची, स्वतःचे कपडे स्वतः स्वच्छ धुवायची. कसलं तरी पुस्तक वाचत बसायची. तिची भाषा बदलली, रहाणीमान बदललं, चंद्रकांतला ती मुलगी परकी वाटू लागली. तो रखमेला म्हणाला, ” रखमे, तुझ्यामुळे पोरगीला तलासरीला पाठवलं आता ही पोरगी आपली नाय वाटत, वायळीच वाटते, हिला जास्त शिकवल तर ती हाताबाहेर जाईल मग नवरा कुठुन मिळणार? तेव्हा औंदा तिच लग्न उरकून टाकायचं.”

पौर्णिमेन ते ऐकल आणि ती म्हणाली,”बाबा तु माझ लग्न करायला निघालास पण मी साफ सांगते, मी एवढ्या लवकर लग्न करणार नाही. तु लग्न करायला निघालास तर मी पुन्हा घरी यायची नाही. गाडीखाली उडी मारून जीव देईन ” त्याचा नाईलाज झाला. तो म्हणाला, अग आपल्यात पोरी जास्त शिकतात का? तू पावडर लावते, नेलपेंट लावते, तो ड्रेस घालते, बघ बर वस्तीवर कोणी अशी कापड घालतात का ?” बाबा, तुझ डोक फिरलय,हे गाव अडाणी आहे. डोळे उघड, गावाच्या बाहेर पड, मुंबईत जाणारी आपली लोक चांगल्या कपड्यात राहतात. तुझ्या सारखी नागडी, उघडी नाही फिरतं. तू पण चांगले कपडे घाल. बघ कसा माणसा सारखा दिसशील तो.” तिचं ऐकून रखमेन यापूर्वीच गोल पातळ नेसायला सुरवात केली होती.
हळूहळू चंद्रकांतमध्ये बदल घडत होता. आता तो लांब पॅन्ट आणि शर्ट घालू लागला. पौर्णिमा असताना तो घरात दारू पित नसे पण अजूनही दारू त्यांनी सोडली नव्हती. त्यांच्यातील बदल पाहून त्याला गावातील लोकांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलं. या पूर्वी तो कामासाठी गेला किंवा ग्रामसेवक भाऊंना भेटायला गेला तरी बाहेर उभा राहत असे आता ग्रामपंचायत ऑफिसमध्ये त्याला खुर्ची मिळाली. त्याने कात टाकली होती. यापूर्वी पौर्णिमा घरी आली की भांडणे होत, चंद्रकांत तिच्या कमी कपड्यावरून, तिच्या पावडर, लिपस्टीक लावण्यावरून तिला बोलत असे आता ती कधीतरीच घरी येई. चंद्रकांत आणि तिची भांडण कमी झाली. हळू हळू चंद्रकांत बदलत होता.

आता पौर्णिमा पूर्ण बदलली, ती आदिवासी आहे असे सांगूनही कोणी विश्वास ठेवला नसता इतका आमूलाग्र बदल तिच्यात झाला. त्या गावातील मुलांच्या नजरा तिच्या येण्याच्या वाटेवर असत. ते तिची टिंगलटवाळी करत, आपली माधुरी दिक्षित आली बघ. आपल्यातली हाय वाटतं तरी का? बामणीन वाटते. सुट्टीसाठी आली तरी तिला, घरी राहावे असे वाटत नसे.

पाहता पाहता पौर्णिमा ग्रँज्युएट झाली. बाईंनी पुढाकार घेऊन तिला स्पर्धा परीक्षेस बसवले आणि ती तहसीलदार परीक्षा पास झाली. त्या खेड्यातून तहसीलदार परीक्षा पास होणारी ती पहिली आदिवासी महिला. गावाने तिचा जाहीर सत्कार केला. एक आदिवासी महिला अडचणींवर मात करत तहसीलदार होते ही काही सामान्य गोष्ट नव्हती. गावाने तातडीने निर्णय करून त्या ओहोळावर कायमस्वरुपी पुल व्हावा असा अर्ज दिला, दोन तीन महिन्यानी कामाची ऑर्डर आली आणि काम सुरु झाले. गंमत म्हणजे कच्चा रस्ताही झाला. आदिवासी पाडा खुश झाला,चंद्रकांतच्या पोरीमुळे रस्ता झाला हे पाड्याला कळलं.

पौर्णिमाने वर्षभरात चंद्रकांतच्या घराचा चेहरामोहरा बदलला. इंदिरा आवास योजनेमुळे तस घर पक्कच होत पण तिने घराला प्लास्टर करून घेतले. रंगरंगोटी केली. कपड्यांसाठी कपाट घेतलं. घराबाहेर संडास बांधला. गावातील इतर आगरी लोकांप्रमाणे ते निटनेटक दिसू लागलं. चंद्रकांतमध्ये बदल झाला. पाड्यात त्याला लोक आदराने हाक मारू लागले. आता तो तहसीलदार बाईंचा बाबा शोभत होता.

एक दिवस तो मुलीला म्हणाला,”पोरी आता तुझ शिक्षण झालं, नोकरी लागली तू साहेब झाली, पण आता तुला साहेब पोरगा कुठे शोधायचा? लोक मला नावं ठेवतील. आपल्या जातीत तर एवढा शिकलेला मुलगा नाही.” ती म्हणाली, “बाबा मला वरची परीक्षा देऊन कलेक्टर व्हायचं आहे, मग बघू लग्नाचं.” रखमा तिच्यावर रागावली,”पोरी आता लग्न नाय करशील तर काय म्हातारी झाल्यावर करशील? तुला शिकाय दिल तर तू शहाणी झाली.
पण लगीन त करायला पायजेल का नको?”

तिने आईची समजूत काढली, “एवढी परीक्षा झाली की लगेच नवरा शोधते मग लग्न.” ती खळखळत हसत राहिली इतक्यात इतवार काका आला. पौर्णिमा त्याच्या पाया पडली, त्याला तिने कपडे दिले, “मोठ्या काका तुझ्यामुळे मी साहेब झाले. नायतर बाबा माझं लग्न लावून मोकळा झाला असता.”

पोरी फार बर केलेस बघ, तुझ उदाहरण बघून आता या पाड्यावरची मुलं शिकतील अस काहीतरी कर,फार बर होईल. शिक्षण नसलं तर नुकसान होतं, मी अडाणी होतो म्हणून माझी जमीन संतोष केणीच्या बापाने खाऊन टाकली, अंगठा घेतला न नावावर करून घेतली, त्याचं वाटोळं होईल. खोटे हिशेब लिहून त्यांनी माझा अंगठा घेतला न दोन एकर एकवीस गुंठे जमीन ताब्यात घेतली.”

तिने त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली आणि विश्वासाने सांगितले मोठ्या काका, आदिवासी जमीन सरकारी आदेश असेल तरच खरेदी करता येते. तुझ्याकडे काय कागद आहेत ते घेऊन ये, मी ऑफिसला गेली की नक्की काय प्रकार आहे तो पाहते. पुढच्या वेळेस ती गावात आल्याच कळालं तस इतवार त्याच्याजवळ असलेलं खाते पुस्तक घेऊन आला. टिनर स्वतः एक अर्ज लिहून तयार केला त्याच्यावर इतवारची सही घेतली.

महिन्या भराने केणीला समन्स आला तो पौर्णिमा समोर हजर झाला. त्याच्या सोबत वकील होता. त्यांनी रजिस्टर केलेलं खरेदी खत होत. तिने केणीला आणि त्याच्या वकिलाला स्पष्ट शब्दात समज दिली. किणी काका कोणाची जमीन अशी विकत घेता येत नाही. आधी वारसदारांची संमती लागते. हा व्यवहार तहसीलदार यांच्या समक्ष आणि दोन्ही पक्षाचे साक्षिदार यांच्या सहिने व्हावा अशी तरतूद आहे. त्यातही आदिवासी कुटुंबाची जमीन फक्त आदिवासी कुटुंबच घेऊ शकत इतर कोणी नाही.” वकील म्हणाले, ” मॅडम,आमच्या आशीलाने इतवारला त्यासाठी पैसे मोजले आहेत. त्यांच्याकडे खरेदीखत आहे, त्याच्यावर साक्षीदारांच्या सह्या आहेत आणि दस्तऐवज रजिस्टर केला आहे.”

पौर्णिमा म्हणाली, “हे पहा वकील साहेब,खरेदी खत रजीस्टर केले असल्यास तुम्ही त्याचा नोंदणी क्रमांक सांगा… मी चौकशी लावते,ज्या अर्थी तक्रारदार म्हणतो की पैशांचा व्यवहार झालेला नाही त्या अर्थी यात लक्ष घालून व्यवहार कोणाच्या समक्ष आणि कधी झाला याची पडताळणी करणे माझे काम आहे. आपले दस्तऐवज अस्सल असतील तर प्रश्न संपला, मला तुम्ही नोंदणी क्रमांक सांगा. ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचीही चौकशी मी लावते.” वकील गडबडला, “मॅडम एक रिक्वेस्ट आहे, नाही म्हणजे व्यवहार झाला त्याला पाच वर्षे झाली, उगाच कशाला वाकड्यात जायचं, इतवारला आता हाव सुटली असेल तर माझे आशील काही मार्ग काढतील.मी त्यांना सांगतो. इतवार त्याची तक्रार मागे घेईल, बघा कस जमतंय ते.”

“मिस्टर सोनार, तोंड सांभाळून बोला. वकील म्हणून मी तुमचा मान राखते पण चुकीचा सल्ला मला देऊ नका. हे रेकॉर्डिंग ऐका.” तिने मोबाईल सुरू केला, तस वकील घाबरला,”मॅडम हे अस चोरून रेकॉर्डिंग करण कायद्यात बसत नाही, मी तुमच्यावर कारवाई करू शकतो.” “सोनार तुम्ही नक्की माझ्यावर कारवाई करा,मी तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवून बार कॉन्सलला खोटे व्यवहार करून फसवणूक केल्याबद्दल तुमची सनद परत घ्यायला सांगते.”
वकील उठून उभे राहिले, संतोष केणे रागारागाने तिच्याकडे पहात होते. “पोरी, त्या इतवारसाठी तू माझ्याशी वाकडं घेऊ नको. मी कधीही तुझ्या बापाला त्रास दिला नाही मग तू तरी का वाकड्यात जाते?”

“काका,माफ करा, तुम्ही काही माझे शत्रू नाहीत पण, गरिबांची जमीन घेऊन तळतळाट का घेता? मी आता अधिकारी म्हणून काम करते तर त्यांच्या हक्काचे रक्षण मला करावे लागेल. तुम्ही त्याच शेत देऊन टाका नाहीतर मला पोलीस ठाण्यात खोटे दस्तऐवज तयार केल्या बद्दल तक्रार द्यावी लागेल.” केणी समजून चुकले ही पोरगी अशी ऐकणार नाही, आणि आता आपण काही पाऊल उचलले तर आणखी गोत्यात येऊ. ते म्हणाले,”इतवारने माझ्याकडून वेळोवेळी पैसे घेतले ते मला कोण परत देणार? तो ते पैसे आणि व्याज परत देत असेल तर मी हे पेपर त्याला परत करतो.”

“काका, तुमच्याकडे सावकारी करण्याचं लायसन आहे का? ते असेल तर तुमचा व्यवहार अधिकृत मनाला जातो, मुख्य म्हणजे खोटे आकडे लिहून घेऊन त्यावर अंगठा घेतला तर त्या व्यवहाराला अर्थ नसतो. ज्याच्या समक्ष व्यवहार झाला तो तपासणी करताना फुटला तर तुम्ही अडचणीत याल. आता हे प्रकरण थांबवायचं की पुढे तपास सुरू ठेवायचा तुम्ही ठरवा.”

संतोष केणे फसवणूक प्रकरण पूर्ण तालुक्याला कळलं. त्याची बातमी झळकली आणि नाईलाजाने त्यांना मध्यस्ता मार्फत इतवारची जमीन परत द्यावी लागली. इतवारने संतोष केणेला घेतलेल्या कर्जापोटी तेवीस गुंठे जमीन पाच वर्षे कराराने कसायला दिली. पाच वर्षांनी केणे ने ती जमीन पुन्हा इतवारच्या ताब्यात द्यायची होती. या कार्यक्रमाला श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी येऊन गेले त्यामुळे त्याला जास्त प्रसिध्दी मिळाली. इतवार येऊन तिला भेटला,”पोरी तुझ्यामुळे माझी जमीन मला परत मिळाली, तुझे उपकार कसे फेडू? आता तू सायबीण झाली आहेस हेच मी विसरतो मला क्षमा कर.” त्यांनी हात जोडले तेच हात हाती घेत ती म्हणाली, “मोठे काका, खर तर मी तुमचे आभार मानायला हवे, आज जी मी काही आहे ती फक्त तुमच्या ठाम पाठींब्यामुळेच. हे मी जन्मभर विसरणार नाही.” इतवार प्रकरण सगळीकडे समजलं, सगळ्या तालुक्यात पौर्णिमा टोपलेचा सत्कार झाला.

आता तिला लालठणला यायला मिळत नसे, तिने बाबाला मोबाईल फोन घेऊन दिला होता. रोज ती आईबाबाशी बोलायची. खुशाली घ्यायची. कधी पंधरा दिवसांनी तर कधी महिन्याने यायची. येतांना बाबाला, आईला नवीन वस्तू आणायची.आता चंद्रकांत गावात पौर्णिमेचा बाबा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच रहाणीमान सुधारलं.

एक दिवस पौर्णिमा आणि तिच्या सोबत एक पोलीस अधिकारी लालठाण्यात आले. लोकांना कळेना, या पौर्णिमा बरोबर हा अधिकारी आपल्या गावात का आलाय? की पून्हा इतवार केणे प्रकरण सुरू झालं.चंद्रकांत टोपलेला कळेना या साहेबांच इथे काम काय? तरी चंद्रकांतने त्यांच स्वागत केलं. अंगणात खुर्च्या टाकल्या होत्या. वारा सुटल्याने गार हवा वहात होती. चंद्रकांत नमस्कार करत म्हणाला, “या साहेब,बसा ,आमच्या गरीबाच झोपड आहे. गोड मानून घ्या,आमच्या गावात काय काम काढL? पौर्णिमेची आई पावणे आलेत, थंडगार पाणी आण.”

तो तरूण पोलीस अधिकारी,चंद्रकांतच्या पाया पडायला वाकला तसा चंद्रकांत दूर झाला, “तुम्ही मोठे शिकलेले साहेब आमी गावंडळ, अशिक्षित तुम्ही कसे पाया पडता?”
तो तरुण हसत म्हणाला, “काका मी इथे साहेब म्हणून नाही आलो तर तुमच्या मुलीचा सहकारी, मित्र म्हणून आलो. मी मनोहर मुकणे, वाणगावचा. तुमच्या मुलीबरोबर ट्रेनिंगला होतो, तुम्ही गरीब नाही आहात, तुमची मुलगी हुशार आहे. तुम्ही तिला शिकवल,तहसीलदार बनवलं, तुम्ही खरोखर श्रीमंत आहात. आम्ही पाच सहा वर्षांपूर्वी गरीबच होतो, माझी आई पारशी लोकांच्या वाडीत चिकू काढायला जायची. माझे बाबा कसे होते मला आठवतही नाही.
तिनेच मला जिद्दीने शिकवले. आता मी बोईसर पोलीस स्टेशनला इनस्पेक्टर आहे.”

चंद्रकांतला काय बोलावे तेच सूचत नव्हते, मुलगा गोरा गोमटा दिसत होता. तो आपल्या जातीचा असेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. जमेल तसे त्यांनी मनोहरचे स्वागत केले. नुकतीच तुर तयार झाली होती.
वाफवलेल्या तुरीच्या शेंगा त्यांनी समोर आणून ठेवल्या. जेऊन जायचा आग्रह केला. तो जायला निघाला तसा रखमा आणि त्याच्या पाया पडला आणि म्हणाला, “काका मी तुमच्या पौर्णिमाशी लग्न करायच ठरवलं आहे.आम्ही रजीस्टर लग्न करणार आहोत.तुमची परवानगी मिळाली तर फार बरे.” चंद्रकांत गोंधळला, “अहो पावणे,आमच्या गावात पंच मंडळी समोर हा सगळा व्यवहार होतो, तुम्ही मला सांगितले पण पंचाच्या कानावर ही सोयरीक घालावी लागेल. गावाच्या पध्दती प्रमाणे दारात मांडव घालून वाजत गाजत लग्न कराव लागेल.”

पौर्णिमा आतापर्यंत सगळ ऐकत होती ती म्हणाली,”बाबा मला तुमच्या रीतीरिवाजानुसार लग्न करायच नाही. माझा मित्र परिवार आणि सहकारी सुशिक्षित आहेत ते आपल्या लग्नाला हसतील. आमच लग्न झाल की तुम्ही गाव पंचायत बोलवा त्यांना काय पार्टी द्यायची ती द्या पण आम्ही रजिस्टरच लग्न करणार.” “पोरी अस करून कस चालेल? उद्या गाव आपल्याला वाळीत टाकेल आपल्या कार्याला कोणी येणार नाही.” चंद्रकांत म्हणाला. “बाबा, तुम्ही इतवार काकांना सांगा, ते काहीतरी उपाय शोधतील, आता आम्ही निघतो, यांना घरी पोचायला उशीर होईल. पण आमच म्हणणं पटल नाही तर माझा इलाज नाही.”

रखमा तिच्यावर रागावली, “बाबाला अस उत्तर द्यायला तुला कस सूचतं? इतवार काकाच ऐकून तुला आम्ही शिकवली, त्यालाच विचारून पहा गावाच्या विरोधात जाऊन लग्न केल तर गाव काय म्हणेल.” पौर्णिमा थोडी हट्टी स्वभावाची होती, ती म्हणाली, “ठिक आहे मी इतवार काकालाच विचारते, तो नक्की काहीतरी उपाय करेल.” तिची गाडी इतवारच्या दारासमोर उभी राहिली. तीला पाहून इतवार काकाची धांदल उडाली, तिच्या सोबत इनस्पेक्टर होता त्यामुळे त्याला सुधरेना, ही काय भानगड आहे ,तो थोडस बिचकत , शंकेने तिच्याकडे पहात म्हणाला, “या सायबांच माझ्याकडे काय काम आहे का?” “नाही मोठे काका,आम्ही सहज तुम्हाला भेटायला आलो. हे माझे सहकारी आहेत मनोहर मुकणे, आपल्याच जातीचे आहेत.” “पोरी,अग निरोप तरी पाठवायचा, मीच आलो नसतो का? पार्वती बाहेर ये कोण घरी आलयं बघ, पाणी घेऊन ये आणि आपल्या पोराला हाक मार.” पार्वती काकूनी त्यांना थंडगार पाणी आणून दिल. “पोरी चा घेशील ना?” “नको काकू आताच घरी सरबत पील.” ती म्हणाली. “बरं पोरी कस काय येण केल,तु काय नक्कीच नुसत काकाकडे आली नाहीस ना?” “काका,या साहेबांशी मी लग्न ठरवलय.” “अरे वा!लग्न ठरवल हे फार बरं झालं, मग अडचण काय आहे?”
“आम्ही कोर्टात लग्न करणार आहोत.बाबा सांगतो,घरी मांडव घालून लग्न करू” “मग,कर की चंद्रकांतच्या मनासारखं, काय मदत लागली तर आख्खा पाडा मदतीला आहे.” “काका,माझे आणि यांचे सहकारी आणि मोठे मोठे साहेब इथे कसे येतील? तेव्हा आम्ही कोर्टात लग्न करून सहकाऱ्यांना हॉटेलमध्ये पार्टी देणार आहोत, तू बाबाला प्लिज समजव.”

“हे काम कठीण आहे, तुला माहिती आहे चंद्रकांत हट्टी आहे, रागीट आहे, ऐकला तर बरं। नाही तर मला शिव्या देईल.” “मोठ्या काका,माझ्यासाठी तुला हे कारावच लागेल, तुझं तो ऐकेल.आठ पंधरा दिवसांनी मी येते. तू हे काम नक्की करशील, माझी खात्री आहे.” दोघ पाया पडले.जातांना तिने इतवार काकांच्या मुठीत हजार रुपये कोंबले. तो नको नको म्हणत असतांना ती पुन्हा पाया पडून निघून गेली.

इतवारने चंद्रकांतची समजूत काढल्यावर त्याला पटलं की या गावात पाहुण्यांची सोय होणार नाही आणि पाहुणे नाराज होतील. कसाबसा त्यांनी होकार दिला. चंद्रकांतने त्याचा होकार स्वतः मुलीला कळवला. तिला प्रचंड आनंद झाला.पंधरा दिवसांनी ते दोघे कोर्ट मॅरेज करून गावी आले. गावातील देवळात जाऊन पाया पडले.समाजातील काही मोजक्या लोकांना चंद्रकांतने घरी बोलावले होते. त्यांच्यासाठी पार्टी आयोजित केली होती.पौर्णिमाने सगळं बाहेरून ऑर्डर केलं होतं. गावातील लोकांनी चंद्रकांतला विचारल,”दादा पार्टी ओली तरी ठेवायची त्या शिवाय मजा कशी येल?”

चंद्रकांत म्हणाला, “आपला जावय, इनस्पेक्टर आहे. दारू मागवली तर बेड्या घालेल, पण दारू पेक्षा भारी कोल्ड्रिंक्स मागवलय ते प्या, आपल्या पौर्णिमाला आवडत नाही ते कस करणार. पौर्णिमा गेली का मग तुम्ही हायेत आणि मी आहे.” ते ऐकून हास्याचा कल्लोळ उडाला,तस पौर्णिमाने बापाकडे रागाने पाहिलं,” अग पोरी गंमत केली.”असं म्हणत चंद्रकांतने वेळ मारून नेली.

पौर्णिमा आणि मनोहर सर्व मोठया व्यक्तींच्या पाया पडले. तिच्या शाळेच्या बाई या कार्यक्रमाला मुद्दाम हजर होत्या. एक कळी फुलवण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. पौर्णिमा बाईंच्या पाया पडली. त्यांनी दोघाना आशीर्वाद दिले नांदा सौख्यभरे. आज चंद्रकांतला आपल्या मुली आणि इनस्पेक्टर असलेल्या जावया बद्दल अभिमान वाटत होता. हळूहळू पाडा कात टाकत होता. चंद्राच्या चांदणीचं चांदणं गावाला शीतल प्रकाश देत सर्वत्र पसरलं होतं.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “पौर्णिमा

  1. SANDEEP NAGARKAR
    SANDEEP NAGARKAR says:

    मुलींच्या शिक्षणाच महत्व सांगणारा खूप सुंदर लेख.

Comments are closed.