जात, धर्म आणि देशाची अखंडता
हिंदू हा धर्म आहे की जगण्याची जीवनशैली हे अद्यापही आपल्याला ठरवता आलेले नाही. कधीतरी तो धर्म असतो तर कधीतरी जीवनशैली. आपण शाळेत प्रवेश घेतांना Religion, Caste, sub-Caste असे तीन कॉलम असतात आणि तिथे आपल्याला Hindu/muslim/ Baudh/Christian असे पर्याय दिलेले असतात, याच बरोबर जात आणि पोटजात आपल्याला लिहावी लागते. या माहितीच्या आधारे कोणत्या वर्गातून प्रवेश निश्चित करायचा ते ठरते. याचाच अर्थ जगात माहिती मिळवण्याच्या पहिल्या पायरीवर आपल्याला आपली ओळख धर्म आणि जातीनुसार पटवावी लागते तरच प्रवेश मिळतो. इतकेच नव्हे तर प्रवेशासाठी फी याच आधारावर ठरते. साहजिकच लहान वयात समजले नाही तरी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना, आपण अमुक धर्माचे किंवा जातीचे म्हणून आपल्याला नव्वद टक्के गुण असले तरी प्रवेश नाही आणि त्याला माझ्यापेक्षा कमी गुण आहेत पण तो तमुक धर्माचा किंवा जातीचा म्हणून त्याला पहिल्या यादीत प्रवेश किंवा आपल्याला जी फी भरावी लागते त्यात जेव्हा discrimination होते तेव्हाच डोक्यात तिडीक निर्माण होते.
एका विद्यार्थ्यांला तो अमुक धर्माचा किंवा जातीचा म्हणून कमी फी आणि दुसरा तमुक जातीचा म्हणून जास्त फी. आपल्यावर अन्याय होतोय, हे त्या क्षणी वाटू लागते. जणू विशिष्ट जातीत जन्म घेऊन आपण गुन्हा केला आहे असे वाटू लागते. तेव्हा समज आलेल्या मुलांच्या मनात विषमतेचे बीज रोपण सरकारच करते.
प्राथमिक किंवा अगदी माध्यमिक शाळेत असे पर्यंत सर्व जातीपातीची आणि भिन्न धर्माची मुले एकत्र शिकत असतात. एकत्र बसून डबा खातात, खेळतात. मात्र उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतांना जे अडथळे उभे राहतात तेव्हा समानतेचे पित्तळ उघडे पडते. या पूर्वी एकत्र जेवणारे आणि एकमेकांच्या डब्यातील पदार्थ हात घालून खाणारे मित्र हळूहळू वेगळे पडतात. जात आणि धर्म नावाची अभेद्य भिंत हळूहळू मनात उभी राहते आणि ती नसती तर? असेही वाटू लागते. पण प्रवेश घेतांना जो अन्याय आपल्यावर आणि पालकांवर झालेला असतो तो सहसा मनातून पुसला जात नाही. तेव्हा समजते की विशिष्ट धर्मात जन्म घेतल्याने फायदा झाला आहे की तोटा.
सैन्यात भरती करतांना शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण असते तसे आहे की नाही हे ठाऊक नाही पण तुम्ही सैनिक म्हणून भरती झालात की तीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. सैन्यात प्रशिक्षणार्थींना एकच सांगितले जाते की आता तुमचा धर्म सैनिक आणि तुमचं कर्म लढणे आहे. त्यामुळे एका तुकडीत विविध धर्माचे सैनिक असू शकतात. पण ब्रिटिशांनी निर्माण केलेली दंडसंहिता संपवून स्वतःचे भारतीय न्याय कायदे जसे अस्तित्वात आले तसेच, ब्रिटिशांनी रेजिमेंट ना दिलेली जातीवाचक नावे संपवून त्यांना अल्फाबेट द्यावेत. जेणेकरून त्यांच्या मनातील अहंगंड किंवा न्यूनगंड कमी होईल आणि तुम्ही आम्ही भाऊ-भाऊ ही भावना वाढीस लागेल. सैन्यातील प्रत्येकाला आपल्या प्रत्येक भारतीय क्रांतिकारक आणि नेत्यांचा अभिमान वाटेल. सैन्यात अठरापगड जातीधर्माचे मावळे भरती करून खरेतर हीच शिकवण आमच्या छत्रपती शिवरायांनी दिली होती. दुर्दैवाने ब्रिटिशांनी आपल्या सैन्यात भरती करतांनाच मराठा, गुरखा, शीख, महार असे वर्गीकरण करून फुट पाडली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार किती उदात्त असावेत, त्यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिराची स्थापना करून ते सर्वांना खुले केले. नाशिक येथील काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी उपोषण केले होते. सावरकर काळाच्या किती पुढे होते ते यावरून दिसून येते. तुमच्या घरात तुम्ही हव्या त्या देवतांची आणि हवी त्या प्रकारे पुजा करा मात्र समाजात त्याचे पाखंड माजवू नका. देवावरती लेबल लावून हा माझा, तो तुझा, असा हक्क गाजवू नका. हक्कच गाजवायचा असेल तर मातृभूमीवर गाजवा. भारत हा माझा देश आहे, जर भारत माझा देश असेल तर त्याला मी विद्रुप करणार नाही. येथे
कोणाला हिनतेची वागणूक देणार नाही, कोणाच्या मालमत्तेवर अधिकार सांगणार नाही. कुणाचा छळ करणार नाही, कुणाच्या भावनेची खिल्ली उडवणार नाही. केवळ शब्दाने नाही तर माझ्या प्रत्येक कृतीतून तो माझा असल्याची खात्री समाजाला पटली पाहिजे. तरच माझ्यावर इतरांचा विश्वास बसेल, तरच ते माझ्यावर भरोसा करू लागतील.
खरे तर, धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे सदाचरण, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला समानतेची वागणूक देणे. त्याच्या हक्कावर अधिक्षेप न आणता वागणे. मी उच्च जातीत किंवा कुळात जन्म घेतला म्हणून मला काही अधिकार जन्माने प्राप्त होत नाहीत, तर ते कर्माने प्राप्त झाले पाहिजेत.
दुर्दैवाने भारतात व्यक्तीपूजेचे स्तोम माजवले गेले आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीला देव बनवून त्यांची पुजा करतो आम्ही शिवाजी, साईबाबा, गांधीजी यांच्या प्रतिमेची पूजा करतो. त्यांच्या गुणांचे आचरण करत नाही, हेच ते दुर्दैव. आपल्या देशात अधूनमधून पोटशूळ उसळत असतो, भिंद्रेनवाला आणि ऑपरेशन ब्लु स्टार आठवत असेल. या देशात कोणीही काहीही मागणी करतो,कोणाला खलिस्तान हवे असते तर कोणाला स्वतंत्र नागा हवे असते. मणिपूर चे दुखणे कित्येक वर्षे आपण वागवत आहोत. या देशाची अखंडता राहण्यासाठी सरदार पटेल यांनी हैद्राबादच्या निजमाशी कसा लढा दिला त्याची कहाणी लोक सांगत असतात किंवा गोवा पोर्तुगीज मुक्त करण्यासाठी काय करावे लागले याची कथा आपण ऐकतो पण आपली मानसीकता आजही निजामशाहीत वावरते आहे.
जात आणि धर्म हा तुमच्या घरापूरता सीमित ठेवला तर त्याचा कुणालाही त्रास वाटण्याचे काही कारणं नाही. पण सामाजिक क्षेत्रात वावरताना आपल्या धर्माचा किंवा उच्च जातीचा कोणालाही त्रास होणार नाही आणि जाणवणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे.
प्रत्येक धर्माची वेगळी मंदिरे किंवा श्रद्धास्थान असू शकते आणि ते त्या व्यक्तिपूरते त्याने जपावे,जो पर्यंत त्याचा अन्य कुणाला त्रास नाही तो पर्यंत सर्व ठीक आहे. पण जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तेव्हा आपला धर्म,जात, पोटजात त्या कार्यक्रमाआड येणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. मी राष्ट्रगीत म्हणणार नाही किंवा महाराष्ट्र गीत म्हणणार नाही असे म्हणणे उचित नाही. विधानसभेत किंवा लोकसभेत गेल्यानंतर तुम्ही तेथील नियम पाळले पाहिजे. ‘भारत माता की जय’ म्हणण्यात तुमचा धर्म आड येता कामा नये. देशाला माता का म्हणायचे? असा प्रश्न विचारतानाच तुमची मानसिकता किती खालच्या पातळीची आहे ते लक्षात येते. अल्ला के सिवा मै किसीको नही मानता असे मुलाखतीत सांगताना, ‘आपकी माँ को भी नही?’ या प्रश्नावर तो उत्तरही देत नाही, याचा अर्थ कट्टरतेच विष किती भिनले आहे ते पहा. हे संवाद कोणाचे आहेत ते सर्वश्रुत असल्याने मी नाव घेण टाळतो इतकच.
आपले दुर्दैव एकाच देशात रहात असूनही ज्या सुविधा तुम्ही आम्ही भोगतो, मिळवतो त्या सर्वदूर पोचवण्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो. याचा परिणाम तेथील नागरिक आपल्या पासून फारकत घेऊन राहतात. त्यांना तुमच्या विषयी घृणा निर्माण होते. नक्षलवाद हा काही भारताच्या जन्मापूर्वी निर्माण झाला नव्हता. तुम्ही आमचेच आहात, भारतीय आहात हे सांगण्यात, त्यांना विश्वास देण्यात,त्यांना आपल्यात सामावून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांची संभवना आम्ही नक्षली म्हणून केली. जर तेथे रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण रोजगाराच्या संधी, सुरक्षा, वैद्यकीय मदत आम्ही पोचवू शकलो तर त्यांनाही माणूस म्हणून जगायला आवडेल. ती संधी जेवढ्या लवकर आम्ही त्यांना मिळवून देऊ त्यांच्यातील माणूसघाणी वृत्ती नष्ट होईल. हा देश त्यांना आपला वाटेल.
लोकलने प्रवास करतांना आपल्या बाजूस ग्रामीण भागातील गबाळ्या कपड्यातील व्यक्ती बसली असेल तर आपण सावध होतो, त्याचा स्पर्श होऊन आपले कपडे खराब होणार नाही याची काळजी घेतो. ती व्यक्ती तोंडाने आपल्याला बोलली नाही तरी आपले वागणे त्याच्या लक्षात येते. आपण आपल्या वागण्यातूनच दाखवतो की तू वेगळा आहेस. हेच ते दुर्दैव ज्यामुळे भारत तुकड्यात विभागलेला वाटतो. श्रीमंतांचा भारत आणि गरीबांचा भारत, सवर्णांचा भारत आणि दलितांचा भारत. जोपर्यंत हा फरक आपण कमी करणार नाही आपल्या आचरणात सुधारणा करणार नाही , आपल्याला एकसंध भारत वाटणार नाही. आज मोठ्या शहरात अस्पृश्यता पाळली जात नाही पण ग्रामीण भागात आजही हरिजन वस्ती गावकुसालाच असते. जोपर्यंत आपण त्यांना आपल्यात सामावून घेणार नाही त्यांना कोणताही अपराध नसतांना उजळ माथ्याने जगता येणार नाही. सुदैवाने त्याची तिव्रता कमी झाली असली तरी नष्ट झालेली नाही हीच शोकांतिका आहे.
माझ्या प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आपण उत्तर भारतीयांशी हिंदितून बोलण्याचा प्रयत्न करतो,दक्षिणेत असे सहसा होत नाही. एकतर ते तेथील स्थानिक भाषेत बोलतील किंवा फारतर इंग्रजीत बोलतील. आपण सहिष्णू आहोत ,समोरच्या लोकांच्या भावनेचा आदर करतो. अजूनही एक गोष्ट माझ्या लक्षात आली ते ही सांगितल्याशिवाय राहवत नाही आपल्या सैन्यात दक्षिणेकडील सैनिक किती ते ही एकदा पहा. माझा पूर्ण अभ्यास नसला तरी ही संख्या किती त्याची टक्केवारी अतीशय कमी आहे. इतर देशात किमान काळासाठी सक्तीची सेन्य सेवा सर्वांना द्यावी लागते अन्यथा नोकरी मिळत नाही. जोपर्यंत असे करत नाही तो पर्यंत देशाचे मी काही देणे लागतो ही भावनाही निर्माण होणार नाही. किमान सरकारी सेवा किंवा सरकारी खर्चाने चालवल्या जाणाऱ्या आस्थापनातील भरतीसाठी ही अट सक्तीची हवी मग वेगळ्या अग्नीवीर योजनेची गरजच भासणार नाही. देशप्रेम रूजवण्याची गरज आहेच तरच करचोरी टळेल. दलाली कमी होईल.
मी किंवा आमचा समाज तुझ्यापेक्षा किंवा तुमच्या समाजापेक्षा वेगळा आहे दाखवण्याची स्पर्धा सुरू असते. प्रत्येक समाजाला वाटते की आपण वरचढ आहोत. श्रेष्ठ आहोत. हे दाखवण्याच्या स्पर्धेपाई समाजात तेढ निर्माण होते. एखाद्या गृहनिर्माण संस्थेत एखाद्या नागरिकाला घर विकत घेतांना तो मांसाहारी असल्याने बंधने येतात. त्याला सदस्य म्हणून प्रवेश नाकारला जातो हे अयोग्य आहे. त्याने या समाजाला आपले का म्हणावे? तेव्हा वर्गीकरण व्यवस्थेने समाजातील एकसंघपणा कमी झाला.
साहित्य हे साहित्य असावे पण जेव्हा त्याला दलित साहित्य अशी फोडणी दिली जाते आणि आमच्याकडे वेगळ्या चष्म्यातून पाहा असं सुचवलं जाते, साहित्यही दलित होते. नारायण सुर्वे यांच्या कविता वाचतांना किंवा अण्णाभाऊ साठे वाचतांना समाजातून आलेला अनुभव त्यांनी मांडला असला तरी ते दलित वाङ्मय आहे असे लिहिण्याची गरज वाटत नव्हती पण अलीकडे ते लिहिण्याची फॅशन झाली आहे की काय असे वाटू लागले आहे.
अलीकडे प्रादेशिक किंवा प्रांतिक साहित्य संमेलन भरते. हे विदर्भाचे, ते पश्चिम महाराष्ट्राचे हे मराठयांचे ते माळी समाजाचे किंवा धनगरांचे. जेव्हा अशी वेगवेगळी संमेलन भरवली जातात तेव्हा आमची चूल वेगळी आहे हे सांगण्याचा आग्रह दिसून येतो आणि त्यातून आम्ही निराळे आहोत ही भावना वाढीस लागते ही खेदाची गोष्ट आहे. अगदी नेते सुध्दा वाटले गेले आहेतच. भुजबळ किंवा मुंडे अमुक एका जातीचे आहेत त्यांना मी धडा शिकवणार आहे अशी गर्भीत धमकी जरांगे कशी देतात? शासन वेगवेगळ्या साहित्य संमेलनाला निधी कसा देते? त्यातून कोणता संदेश इतर समजात पसरतो याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
भारतात मुघल का व कसे आले? याचा व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येईल की तेव्हा भारतात ४५० किंवा त्यापेक्षा जास्त संस्थाने किंवा राजगाद्या होत्या आणि प्रत्येकाला आपले साम्राज्य टिकवावे वाढवावे वाटत होते,या सत्ता संघर्षातुन दोन शेजारील राज्यात युद्धे होत होती आणि आपले राज्य सुरक्षित राहावे म्हणून हबशांची मदत घेतली जात होती, दुर्दैवाने भटक्या तुर्की आणि अफगाणी टोळ्यांनी ही संधी हेरली आणि स्वतः चा शिरकाव करून घेतला. टीपू सुलतान त्यातील ऐक. मुळच्या वडियार घराण्यात टिपू सुलतानचे वडील सरदार होते पण त्यांनीच वडियार राजाचे राज्य बळकावले. भारतातील अनेक संस्थाने अशीच मोघलांनी बळकावली.
जेव्हा ब्रिटिशांचे संकट होते तेव्हा स्वातंत्र्य मिळावे म्हणून सर्व धर्मातील नागरिक एकजुटीने लढले. कोणाच्याही मनात धर्म आला नाही. पण स्वातंत्र्य मिळाले आणी स्वतंत्र भारतात मुस्लिम समाजाला अल्पसंख्याक असल्याने पुरेसे राजकीय प्रतिनिधीत्व मिळणार नाही असे बॅरिस्टर जिना यांना वाटू लागले. याच गोष्टीचा फायदा घ्यायचा ब्रिटिशांनी ठरवले. खरेतर यापूर्वीच ब्रिटिशांनी वेगवेगळ्या संस्थांना विरोधात Divide and rule हे तत्व वापत राज्य केलेच होते.
तेच तत्त्व पून्हा ऐकदा वापरून येथील ऐकोपा नष्ट करावा हाच विचार मनात ठेऊन भारत सोडून जातांना, भारतात शांती नांदू नये असा विचार करूनच ब्रिटिशांनी जिना यांचे बुजगावणे उभे केले.आज हेच बुजगावणे जिना नंतरही भारतात अशांती निर्माण करत आहे. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी हल्ले देशात अशांतता निर्माण करत आहेत. या हल्ल्यात आपले सैनिक बळी पडत आहेत.
सरकारने काश्मीर खोऱ्यात गेल्या तीन वर्षात नवीन शैक्षणिक संस्था सुरु केल्या, उद्योजकांना चालना दिली, 370 कलम हटवल्यामुळे तेथे बाहेरील उद्योजक येऊन व्यवसाय सुरू करू शकतात, त्याचा फायदा स्थानिक लोकांना नक्कीच होत असावा.
आषाढी, कार्तिकी एकादशीला, पूणे, इंदापूर येथील कुरेशी गल्लीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात मुस्लिम समाजातर्फे शिरकुर्मा दिला जातो. सासवड येथेही एका मुस्लिम कुटुंबाच्या घरी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी थांबते भक्त विसावा घेतात न्याहरी करूनच पूढे मार्गक्रमण करतात. तिथे गेले अनेक वर्षे पालखीचे स्वागत होते. आजही पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी दर्ग्यात मराठी बांधव चादर चढवतात आणि आशीर्वाद घेतात. हा धर्माचा नव्हे तर श्रध्देचा विषय आहे. स्थानिक मुस्लिम समाजाने यापूर्वी वेगळ्या सवलतीची वेगळ्या देशाची मागणी केली नव्हती. या देशात ते शेकडो वर्षे गुण्यागोविंदाने रहात होते. सर्व मुस्लिम काही हिंदू धर्माची अनास्था करणारै किंवा मंदिरे उध्वस्त करणारे बाबर, औरंगजेब, शाईस्तेखान, नजीबखान यांच्या सारखे सैतान नव्हते. त्यातील काही अकबरा सारखे हिंदू धर्माचा आदर करणारे देखिल होते. मग जिनांच्या डोक्यात स्वतंत्र राष्ट्र संकल्पना आली कोठून?
बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ संविधानातील तरतुदीनुसार भारत निधर्मी राष्ट्र आहे का? जर निधर्मी राष्ट्र असेल तर मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मासाठी वेगळे कायदे असण्याची गरज का भासली? घटनेत, लोकसभा आणि राज्यसभेत काही जागा आरक्षित का ठेवल्या गेल्या? राज्य घटनेतील तरतुदी जशाच्या तशा अमलात येणार नाहीत किंवा कालानुरूप त्यातील काही कलमे बदलून त्या जागी नवीन कलमे, नवीन कायदे अस्तित्वात येतील हे अद्यारूत आहे. तथापी देशातील नागरिकांसाठी समान नागरी कायदे असतांना काँगेसी सरकारने घटनेत विना संमती वेळोवेळी बदल केले. मुस्लिम समाजाचे तुष्टिकरण नेहरू कुटुंब कित्येक वर्षे करत आले आहे. आतापर्यंत मुस्लिम समाजासाठी अनेकदा संविधानात बदल करण्यात आले आहेत. अगदी शहाबानो पोटगी प्रकरणाचा हायकोर्टाने दिलेला निकाल बहुमताच्या जोरावर केंद्रातील काँग्रेस सरकारने बदलून शहबानो हिला वृद्धपकाळात पोटगी नाकारली. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मासाठी दिलेल्या विशेष सवलती देण्याचे प्रावधान कशासाठी?
एकसंध भारत आणि नागरिकांसाठी एकसमान कायदे अस घटनेत लिखित असतांना वक्फ बोर्डाच्या अंतर्गत लाखो एकर जमीन, तसेच मशीदीत जमा होणारी पुंजी तसेच बाहेरून मशीद किंवा समाजसंस्थेस मिळणाऱ्या देणग्या या करापासून मुक्त का? याच बरोबर चर्चमध्ये जमा होणारा पैसा यावर सरकारचे नियंत्रण का नाही? याचा स्पष्ट अर्थ घटनेतच भेदभाव करणारी कलमे दिसतात. ज्या समाजाला ही कलमे लागू नसतील तो समाज एकतर नाराज होईल किंवा आक्रमक होईल. घटनेत संख्येच्या आधारावर काही धर्मातील नागरिकांना अल्पसंख्याक समजले गेले. कदाचित तेव्हा ते वास्तव असावे. जेव्हा हे प्रावधान झाले तेव्हा एकूण संख्येच्या किती टक्के हा समाज होता? कल्पना नाही, मात्र आज ७५ वर्षांच्या काळानंतर जर त्या समाजाची लोकसंख्या कागदोपत्री १३% पेक्षा जास्त, प्रत्यक्षात २०% असेल तर त्यांना अल्पसंख्याक म्हणता येईल का? तसे नसेल तर अल्पसंख्याकांना असणारे राजकीय किंवा अन्य आरक्षण फायदे ते कसे घेऊ शकतात? मुस्लिम समाजातच एखादे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम नसेल तर त्यांना आरक्षण देण्यास कोणाची आडकाठी असणार नाही पण सरसकट मुस्लिम समाजाला आरक्षण मान्य नाही.
आपल्या धर्माच्या काही रुढी, परंपरा आहेत त्या प्रमाणे अन्य धर्माच्या परंपरा असणारच पण जेव्हा वर्षाचे ३६५ दिवस ही रूढी सार्वजनिक जागेचा वापर करून पाळली जात असेल तर ते अयोग्य आहे. यामुळे नागरीकांच्या संचार स्वातंत्र्यावर गदा येते. सरकारने घालून दिलेल्या मर्यादा पाळत सणउत्सव साजरे करण्यात कोणतीही चूक नाही. पण एखादा समाज, संख्येने जास्त आहोत आणि आम्ही आमची परंपरा वर्षानुवर्षे पाळत आलो आजही असच वागणार, तुम्हाला त्रास होत असल्यास तुम्ही आमच्या पासून दूर जा, मार्ग किंवा वेळ बदला. असे धमकावतो तेव्हा आश्चर्य वाटते. कायद्याचे रक्षकही या बाबत हतबल असतात. ते सांगतात,साहेब तुम्हालाच नव्हे आम्हालाही त्रास होतो पण वरतून आदेश आहेत त्यांच्या कार्यक्रमात व्यत्यय नको.
तेव्हा कोणत्याही धर्मातील उपासकांनी हे लक्षात ठेवावे की आपल्या उपासनेचा किंवा धार्मिक उत्सवाचा त्रास अन्य कोणास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यावर प्रभातफेरी ,जुलूस किंवा आनंदोत्सवात मिरवणूक काढतांना जनतेच्या अडचणीत वाढ करणे किंवा गैरसोय होत नाही ना याची काळजी घेतलीच पाहिले .
कोणत्याही समाजाने रस्ता अडवून प्रार्थना करणे आणि त्या काळात, लोकांना ठराविक ठिकाणी नाका बंदी केल्या प्रमाणे जाऊ न देणे हे कितपत योग्य आहे? दुर्दैवाने असे वर्षानुवर्षे घडत असुनही कायद्याचे रक्षक बघ्याची भुमीका घेतात. कदाचित त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना तशा सूचना केल्या असाव्यात किंवा या गैरसोयीकडे लक्ष न देण्याच्या बदल्यात तेथील सुरक्षा अधिकाऱ्याला चिरीमिरी मिळत असावी.
प्रत्येक समाजाची श्रध्दास्थान आणि पूजनीय गोष्टी किंवा व्यक्ती भिन्न असल्या तरी त्याचा गवगवा किंवा माज बाळगू नये. कोणताही धर्म, पंथ किंवा जात कोणाही पेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही त्यामुळे कोणीही फुकाची घमेंड बाळगत श्रेष्ठत्वाची भावना बाळगत दुसऱ्या व्यक्तीचा अपमान करत असेल तर ते अयोग्यच आहे.
मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक मोहन भागवत आणि त्या नंतर मा. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदू हा धर्म नसून जीवन पद्धती आहे असे म्हटल्याचे सर्वश्रुत आहे. अर्थात तो निवडणूकीपुरता राजकीय अजेंडा होता. अलाहाबाद चे प्रयागराज नामकरण किंवा गंगापूजा त्यासाठी पंतप्रधान यांची उपस्थिती तसेच दक्षिणेकडे वेगवेगळ्या देवतांची पुजा वा मंदिरांना भेटी काय दर्शवतात?
मा. मोदी पंतप्रधान झाल्यापासून उत्तरेकडील विविध धार्मिक स्थळांचा विकास करण्याचे धोरण ज्या पध्दतीने मोदी आणि त्यांचे सरकार राबवत आहे ते पाहता हिंदू मतांचे राजकारण पक्ष करत आहे हे सुस्पष्ट आहे. तो सत्ताधारी पक्ष असल्याने आपली मतपेटी सुरक्षित रहावी या करता प्रयत्न करणार यात शंका नाहीच. धर्माप्रमाणे मतदारांची टक्केवारी लक्षात घेऊन मोदींनी किमान हिंदू मते आपल्याकडे रहावी असा प्रयत्न केला तर चुकले कोठे? मात्र पंतप्रधान पद असले तरी हिंदूंचा कैवार घेतांना अन्य धर्माबद्दल चुकीचे बोलण्याचा वा त्यांच्यावर टिका करण्याचा कोणालाच अधिकार नाही.
मोदींच्या गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री काळात गोध्राकांड घडले. त्यानंतर गुजरात मधील सुड नाट्यात मुस्लिम समाजावर आक्रमक हल्ले झाले. काही ठिकाणी मुस्लिम महिलांवर बलात्कार झाले, अगदी गरोदर महिलेलाही या समाज कंटकांनी सोडले नाही. तिचा आकांत या हैवानांच्या कानी पडला नाही आणि त्याला गुजरात सरकारची मुक संमती होती असे निष्कर्ष आहेत. या प्रकरणी गुजरात सर्वोच्च न्यायालयाने मोदींना क्लिक चिट दिली असे मानले जाते. ज्या गुन्हेगारांनी बलात्कार प्रकरण घडवले त्यांची केस गुजरात राज्यात चालवून सबळ पुरावा नाही म्हणत त्यांची मुक्तता केली गेली. यालाच आव्हान देत हीच केस पुन्हा मुंबई हायकोर्टात वर्ग करण्यात आली आणि दोषींना शिक्षा झाली. या संपूर्ण प्रकरणात समाज हा मुस्लिम महिलेच्या पाठोशी खंबीरपणे उभा आहे.
गोध्रा प्रकरण ऐवढे संतापजनक होते की त्याची प्रतिक्रिया उठणार हे स्वाभाविक होते. गोध्रा प्रकरणी दोषींना भारतीय कायद्यातील तरतुदी नुसार शिक्षा झाली असतीच पण समाजातील एका गटाला वाटत होते की या प्रकरणी योग्य दखल घेतली गेली नाही तर हिंदू समाजात सुरक्षित नसल्याची आणि आपल्याला कुणी वाली नसल्याची भावना दृढ होईल.
ब्रिटिश सत्तेला भारतातून घालवणाऱ्या क्रांतिकारकात चंद्रशेखर आझाद होते तसा अश्फाक खान होता. पण स्वातंत्र्य मिळवल्यानंतर विशाल अशा भारताचे नेतृत्व कोणी करावे यावरून जवाहरलाल नेहरू आणि जिना यांच्यात सूदोपसुंदी होती, यातूनच मुस्लिम समाजाला भारतात पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार नाही त्यामुळे या समाजासाठी स्वतंत्र मुलुख पाहिजे असा आग्रह जिना यांनी धरला. जिनांच्या या हाकेमुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच दिल्ली, पंजाब, काश्मीर येथे उफाळून आलेल्या दंगली आणि जिना यांचा मुस्लिम राष्ट्रासाठीचा आग्रह यामुळे देशभर हिंदू मुस्लिम दंगे सुरू झाले. जिना यांना भारतात मुस्लिम समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल असे आश्वासन देऊनही ते आपल्या मागणीपासून हटले नाही. सामान्य जनतेला वेठीस धरले जाऊ नये आणि जीवितहानी होऊ नये म्हणून महात्मा गांधी यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र निर्मीतीसाठी उपोषण करून मंत्रीमंडळाची मान्यता घेतली. केवळ गांधीजींच्या शब्दाखातर एकसंघ राष्ट्र दुभंगले.
वास्तवतः भारतावर गेल्या तिनशे चारशे वर्षात मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी अनेक आक्रमणे केली.येथील पवित्र हिंदू मंदिरांची तोडफोड केली. रामलल्ला, ग्यानव्यापी मशीद, काशी विश्वेश्वर ही त्याची काही उदाहरण आहेत. या मंदिराप्रती हिंदु समाजाच्या पवित्र भावना आहेत. दुर्दैवाने हे प्रश्न गेले कित्येक वर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत याचे कारण या तक्रारींच्या सुनावणीसाठी वेळ दिला जात नव्हता. धर्म ही निरक्षरासाठी अफुची गोळी आहे. एकदा का धर्म डोक्यावर स्वार झाला की मेंदू काहीही करायला तयार होतो. बाबर ने राम मंदिर तोडले गझनीने सोरटीचे मंदिर लुटून नेले आणि देवतांची विटंबना केली. मथूरा ,काशी या देवस्थानाची अशीच गत झाली. दुर्दैवाने काँग्रेसच्या मोजक्या नेत्यांनी मतांच राजकरण करत, मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेले अनेक गुन्हे पाठीशी घातले.
सावरकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिर येथे अस्पृश्य समाजाला प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले होते तसेच रत्नागिरी येथे पतितपावन मंदिराची स्थापना याच भावनेतून केली होती. साहजिकच सावरकरांच्या मनात भेदभाव नव्हता तरीही ते ब्राम्हण समाजाचे म्हटले जाते तेव्हा वाईट वाटते. उत्तरेकडे गंगोत्री, जन्मोत्री, बद्रिनाथ, केदारनाथ, चारधाम आहेतच या शिवाय, वैष्णोदेवी, अमरनाथ, ऋषिकेश, प्रयागराज, काशी, तर पुर्वेला जगन्नाथपुरी आहे. ही मंदिरे नद्यांच्या काठावर वसलेली असल्याने, येथे मोठ्या संख्येने भाविक व उपासक येतात, साहजिकच या ठिकाण संपूर्ण भारतातून भाविक येतात. या पवित्र स्थळी असणारी विविध दुकाने मुस्लिम समाजाची आहेत, तरीही हिंदू भाविक तेथून खरेदी करतात मात्र मुस्लिम समाज कट्टर असून त्यांच्या पवित्र स्थळी असणाऱ्या हिंदू धर्मीय दुकानातून खरदी करत नाहीत.
हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म असून इतर धर्मा विषयी आदरभाव व्यक्त करणारा धर्म आहे, अनेक ठिकाणी हिंदू मंदिराशेजारी चर्च किंवा मशीद आहे. ह्याचा अर्थ पूर्वीपासून हिंदू इतर धर्माचा आदर करत होते आणि आजही करतात. बाबरी मशीद वगळता, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे जशी हिंदू मंदिरांची तोडफोड झाली तशी भारतात मशिदीची कधीही तोडफोड झाली नव्हती. भारतात असणाऱ्या अनेक मशीदी ह्या मुळ हिंदू मंदिराच्या ढाच्यावर उभ्या आहेत. या श्रध्दास्थानाबाबत त्या शहरातील जागरूक भक्तांनी पुजा करण्याचा हक्क अबाधित रहावा यासाठी कायदेशीर लढा दिला आहे. दुर्दैवाने न्यायालयात ही केस वेळेवर चालवली जात नाही त्यामुळे निर्णय प्रलंबित आहे.
मुस्लीम शासकांच्या काळात काशी विश्वनाथ, सोर्टी सोमेश्वर, सुवर्ण मंदिर, अयोध्येतील रामल्ला मंदिर आणि शेकडोंच्या संख्येत हिंदू मंदिरांची तोडफोड झाली. दुर्दैवाने हिंदू समाजाला हे मुकाट सहन करावे लागले. पण आज पन्नास वर्षानंतरही तोच वाद चिघळत ठेवण्यात काय फायदा. आपल्या श्रध्दास्थाना विषयी आस्था हवीच मात्र त्यासाठी जुनी मढी उकरण्यात काय हशील?
मात्र आजही आसाम, मणिपूर, मेघालय यासारख्या दुर्गम राज्यात मिशनरी आपल्या चर्च च्या माध्यमातून ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम करत आहेत फक्त ते मुस्लिम समाजाइतके आक्रमक नाहीत इतकेच. तात्पर्य भारतासारख्या विविध धर्म, पंथ, जाती, विविध आणि वेगवेगळ्या प्रांतिक बोलीभाषा, भिन्न संस्कृती, उत्सव भिन्न पोशाख आणि भिन्न आहार संस्कृती ऐवढा फरक असूनही एका संविधानाने आणि लोकशाही तत्वांनी आपण बांधले गेलो आहोत. एकसंध आहोत. विविधेतील एकता टिकवायची असेल तर प्रत्येक नागरिकांने आपला धर्म,आपली श्रध्दा आपल्या घरापूरती सिमीत ठेऊनच आचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे राष्ट्र प्रथम याच ध्येयाने जगले पाहिजे तर आणि तरच देश एकसंध राहील आणि शिक्षणाच्या, विकासाच्या, नोकरीच्या संधी वाढत जातील. एखादा प्रकल्प नको असे म्हणण्यापेक्षा त्या प्रकल्पात कोणत्या सुधारणा केल्या तर तो व्हायबल होईल हे शोधले पाहुजे आणि त्याप्रमाणे वाटचाल केली तरच त्या क्षेत्राचा विकास होईल आणि नोकऱ्या उपलब्ध होतील.
तेव्हा विकसित भारत,एकसंघ सुसज्ज भारत घडवण्यासाठी सगळ्यांनी धर्म, पंथ जात, परंपरा, श्रद्धा, अंधश्रध्दा यांना दूर ठेऊन ध्येयाने आणि एक विचाराने वाटचाल केली तर कोणत्याच संकटाचे भय वाटणार नाही.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥