झिंगरी
तो काळच तसा होता, माणूस कोणत्या जातीत जन्मला यावरून समाजातील त्याचे स्थान ठरत होते. गावाला तो हवा होता, परंतु त्याचे स्थान मात्र गावकुसाबाहेर होते. त्याची सावली अंगावर पडता नये, ती अशुभ असं मानणाऱ्या कर्मठ लोकांच्या हाती सत्ता होती. मात्र देवासाठी ढोलताशे वाजवण्याचं काम त्यांचच होतं. त्यांच्या अंगावर ना पुरेसा कपडा की खायला पुरेसे अन्न. गावातील मोठे जमीनदार या समाजातील लोकांची पिळवणूक करत असत. त्यांच्या शेतावर हा समाज सुर्योदय ते सुर्यास्त या वेळात काम करत असे. या वेळात दुपारी अर्धा तास जेवणासाठी सुट्टी इतकाच काय तो आराम.
याच समाजात झिंगरीच्या पोटी रामाचा जन्म झाला. रामाचे आई वडील गावातील पाटलाकडे कामाला होते. झिंगरी लग्न होऊन आली तेव्हा अवघ्या चौदा वर्षांची होती पण ती मुळातच उफाड्याची असल्याने मोठी वाटत होती. सावळा रंग, पाणीदार डोळे आणि लांबसडक वेणी यामुळे झिंगरी दिसायला रुबाबदार वाटत असे. सोमाशी लग्न झालं तेव्हा ती आणि सोमा मालकांच्या पाया पडली. रिवाजच तसा होता. लग्नाचा सर्व खर्च पाटलांनी केला होता. अर्थात भविष्यात पाटील तो त्याच्या मजुरीतुन दाम दुप्पट वसूल करून घेणार होता. पाटील सोमाला म्हणाले, “चार दिसांनी बायकोला शेतावर याया सांग, नी त घरी ठेवशील. सोमा दबक्या आवाजात म्हणाला, “घरा क्याला ठेऊ, तुमचे शेतावर कामाला येल ती.”
झिंगरी पाटलाकडे कामाला गेली तेव्हा पाटील तिच कौतुक करत म्हणाला, “पोरी दिसाय भारी हाय हो तू , आमच्या सोमाला शोभ नाय. एखांदे दिवशी ये हो घरी, तुला सुडका द्याचा हाय. त्याची चाल झिंगरीच्या लक्षात यायच तिच वय नव्हते. तीने आपल्या नवऱ्याला, सोमाला, पाटील काय म्हणाला ते सांगितलं. सोमा तिला म्हणाला, “त्यान वायळा काय हाय? आपला मालक हाय तो, एखादे दिवशी बोलावला त जाय हो.” खरं तर मनातून तो घाबरला होता. या पूर्वी त्याचा जोडीदारांची लग्न झाली त्यांच्या बायका पाटलांनी कशा नासवल्या ते तो ऐकून होता, पण न पाठवून चालणार नव्हते, पाटील कसा आहे हे तो ऐकून होता.
त्याचं लग्न होऊन पाच,सहा महिने झाले तरी झिंगरी पाटलाच्या हाती येत नव्हती. काही ना काही कारण सांगून ती टाळत होती. त्यामुळे पाटील स्वतःवर चडफडत होता. गावच्या देवीची जत्रा जवळ आली की तो सर्व कामगारांना खर्ची देत असे. त्याने सोमाला बोलवून सांगीतले,” सोमा
आपले गावची जत्रा बिस्तरवारी हाय, तुला खर्ची पायजल का नको?” सोमा म्हणाला, “पायजल त, माना न झिंगरीला कपडे घ्यायचे हान, देवीची ओटी भरायची हाय, परसाद घ्याचा हाय, पैस त पायजेल.” “मंग असा कर, उद्या दोपारचे झिंगरीला पाठवून देस होय, तीचकड उचल देतो.” तो त्याच्या सांगण्यावर काय म्हणणार, त्याने होकार दिला.
पाटील वारंवार बोलवू लागला त्यामुळे या वेळेस उचल घेण्यासाठी झिंगरी त्याला भेटायला गेली आणी दूर उभी राहिली. “पाटील आमाना उचल देतान ना, तो बोलला पाटलान वाहारलाय ते करता मी आलू.” झिंगरी त्याला म्हणाली. पाटील तिला खुणेने जवळ बोलवत होता, ती जवळ जाताच म्हणाला, “उचल घ्याया आली का तू, तुला सुडकाव देयाचा रेलाय त्याव ने.” त्याच्या हातात साडी होती. पण झिंगरीच्या मनात आलं, इतर वेळेस आपल्या सावलीला उभा न राहणारा पाटील जवळ का बोलावतो? ती जागची हलली नाही. पाटील तिच्या जवळ येऊ लागला, त्याच्या हातात साडी आणि दहा रूपयांची नोट होती. झिंगरी सावध झाली. पाटलाची वासनांध नजर पाहून ती हादरली. या डुकराच्या हाती लागलो तर आपल्या शरीराचा पालापाचोळा केल्याशिवाय पाटील सोडणार नाही हे तिच्या लक्षात आले. तिचा हात धरायला तो पूढे येताच ती पटकन त्याच्या तोंडावर थुंंकली आणि पळत सुटली. नक्की काय झालं ते तिलाही कळल नाही. ती हिंमत तिच्यात कुठून आली तिलाही समजलं नाही. त्याच्या अमिषाला ती बळी पडली नाही. पाटील त्यामुळे खवळला तिच्या पाठीमागे धावला पण ती लवलवत्या पाती सारखी धूम पळाली.
झिंगरीने ती गोष्ट सोमाला सांगीतली, सोमा तिच्यावर रागावला, “तुझा डोका फिरेल हाय का? आथा उंद्या तो माना कुटल.” पण झिंगरीने त्याला खडसावले, “नवरा हाईस का कोण? माना त्याच्या बरोबर झोपाय सांगतस का? ते पेक्षा मी आयाकडे जान, तू रे एकटा, न पाटलाची गाण चाट” ते ऐकताच सोमाने तिच्यावर हात उचलला. झिंगरीने तो वरच्या वर झेलला. ती त्याच्यावर ओरडून म्हणाली, “त्या आयघाल्या पाटलाकरता माना मारशील का? हात उचलला तं मोडून टाकीन.” सोमा टरकला, हे प्रकरण वेगळच होत.
दुसऱ्या दिवशी सोमा एकटाच कामाला गेला, पाटील म्हणाला, “सोमा एकटास आला तो, बायको नी आली?”
“तिला बरा नी, तिचे पोटान दुखतयं.” तो खोटं बोलला. एक आठवडा ती कामाला गेलीच नाही. पाटील रोजच तिच्या बद्दल विचारत होता. शेवटी धीर करून सोमा म्हणाला, “पाटील माही बायको आग हाय, तिच्या वाटला जाव नको. चार दिस आधी माह्यावर हात उचलला, तीचे सुडक्यान चाकू हाय, उगाच नको त्या होल.” पाटील सोमाकडे खाऊ की गिळू नजरेने पहात होता, “माजा काय उपटील, गांडीवर दोन लाता घातल्या की चुप रेल, मी पायतो तिच्याकडं, माज चढलाय का?” पाटील अस म्हणाला, पण ज्या आक्रमकतेने ती त्याच्या तोंडावर थुंकली, तो समजला हे सावज गाठणं कठीण आहे. झिंगरी आठ दिवसांनी कामावर गेली. तिने सहज दिसेल असा खरच एक छोटा सुरा कमरेला लटकवून ठेवला होता.
पाटील काही घडलेच नाही अस वागत होता, मात्र झिंगरीला माहिती होते कधीतरी पाटील डाव साधल्या शिवाय राहाणार नाही. एक दोन महिने काही घडलं नाही. पाटील सांगेल ते काम ती निमूट करत होती. एक दिवस पाटलांनी सोमाला वाड्यावर बियाणे आणायला पाठवले. झिंगरी आता एकटीच होती, अवघ्या चौदापंधरा वर्षाची झिंगरी, आणि चाळीसपंचेचाळीस वर्षांचा पाटील. तब्येतीने आडदांड, झिंगरीच्या लक्षात आल आज सहज सुटका नाही काहीतरी शक्कल लढवावी लागेल. पाटील झिंगरीकडे आला तिच्या मागे जाऊन उभा राहिला. तिला म्हणाला,
“झिंगरे, एकदा ये हो, बग म्हागातला सुडका देन,पैसव देन. माझेच काम करतय न मनाच हुशारी करून दाखवतंय या बरा नी.”,झिंगरीने रागानेच त्याच्याकडे पाहिले, व म्हणाली, “मी सोमशी लगीन करेल हाय. तू माजा नवरा होशील का? माना शंभरची नोट देशीला का? त एक डाव येन, परत परत नी सांगायचा.” पाटील तिच्या शब्दांना भुलला. आयला यी बरी तयार झाली, आज रेमटवाय मिलल, तो एकदम खुश झाला. पोरी, शंभर रूपये कधी बघतलेन का? चल त खरी, उद्याना पन्नास नक्की देन हो.” झिंगरी म्हणाली, “पाटील उंद्या नको, माना आथास पायजेन, आथा देशील त येन. सोमाला सांगू नको हो नी त माना कुटेल.”
झिंगरीने विचार केला आज याला धडा शिकवायचाच, “उद्या क्याला आथास देशी त आजस चल.” ती खोपटात जाऊन उभी राहिली पाठून पाटील गेला. पाटलांनी खोपटाच दार ओढून घेतल, पाटील तिला जवळ घ्यायला उतावीळ झाला होता. त्याने अंगावरचे कपडे उतरवले. झिंगरीला खुणेन बोलवू लागला.तरी ती मान खाली घालून उभी राहीली. तिने लाजण्याचं बेमालूम नाटक केल. पाटील तिच्याकडे पाहून पून्हा तिला खुणावू लागला, तस काय होतय ते कळायच्या आत झिंगरीने घारी सारखी झडप घालून पाटलाचे कपडे उचलले आणि खोपटा बाहेर पळून गेली. बाहेर सोमाच्या नावाने ती हाका मारू लागली.”अवाsss वाsss वाss, ओ सोमा, या पाटलान माना धरला नांग. यो बग काय करतय, ये रं ये,ती पळत पळत गेली आणि तिने पाटलाचे कपडे भरल्या विहिरीत फेकून दिले. तिची ओरड ऐकून आजूबाजूच्या शेतावरून लोक जमा झाले. तिला विचारू लागले,” काय झाला ग पोरी,बोंब क्याला मारतस? तुझा नवरा सोमा नी दिसं तो?” तिने खोपटाकडे बोट दाखवत सांगितले. “त्यान आपलख पाटील लपलाय, त्याचा माझेवर डोला हाय. निगूत त्यान सोमाला बंगलीवर पाठवला. माना धरलाता. माझा सुडका खेचीत होता. मी पलालू. पाटील नागडास हाय नांगा जा. माना बोलवत होता.”,
पाटलाला खोपटातून बाहेर येता येईना पुरती फजीती झाली. लोक पाटलावर चवताळून मारायला धावले. झिंगरी खोपटाच्या तोंडावर उभी राहून ओरडली. “पूना माह्या वाटेला आला त चोट कापून टाकीन, झिंगरी हाय मी, म्हादूची पोर, लक्षान ठेव.” झिंगरीच नाव खेड्यापाड्यात पोचलं.
गावात चर्चेचा विषय झाला. जो तो पाटलाची शी थू करू लागला. पाटलाला घरा बाहेर पडणं मुश्किल झालं. खेड्यापाड्यात गोर गरीब दलीत महिलांवर जमीनदार, शेतमालक यांच्या जवळून होणाऱ्या अन्यायाला तिने वाचा फोडली. या पूर्वीच सोमाचा आंगठा घेऊन पाटलांनी त्याच्या नावे दोन हजार कर्जाच खात बनवल होत. त्याच्या मजुरीतुन ते कर्ज त्याला फेडायच होत. गंमत म्हणजे या जमीनदारांच्या शेतावर कितीही वर्ष काम केल तरी त्यांच कर्ज फिटत नव्हतं.
ग्रामीण भागात आदिवासी आणि इतर दलित समाजाला त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन असच नाडलं जातं. सोमाने अंगठा दिलेला कागद पाटलाकडे होता त्यामुळे सोमाला पाटलाची चाकरी करण भाग होत. पण हा प्रकार घडल्याने पाटील डिवचला गेला होता. सोमा एकटाच पाटलाकडे कामाला जात होता, त्याला पर्यायच नव्हता. दोन तिन वेळा पाटलांनी सोमालाच मारण्याचा प्रयत्न केला पण तस झालं असतं तर पाटलावर संशय आला असता. झिंगरी डोंगरातली सुकी लाकड मोळी बांधून आणून गावात विकत होती. पहाता पहाता सात आठ वर्ष झाली. आता ती सोमाच्या दोन मुलांची आई होती. आठवडा बाजाराला जाऊन स्वतः सामान आणत होती. मोठा मुलगा रामा आता सात वर्षांचा होता तर लहान बुध्या पाच वर्षांचा.
एक दिवशी सोमा खुप दारु पिऊन घरी आला आणि झिंगरीला मारण्यासाठी धावला, झिंगरीने त्याला खुप शिव्या घातल्या, इतक्यात पाटील तिथे आला आणि झिंगरवर डाफरला, “नवरा सादा हाय म्हणून त्याचेवर हात उचलतस का? त्याचे घरान रेव नको, जा तुझ्या बापासकडे, तो पोरगा होता तवापासून माझेकड हाय, त्याला तू मारला त मी तुला कुटीन.” ती चवताळून बाहेर आली, तिच्या हातात धारदार कोयती होती, “सोमा माझे लग्नाचा नवरा हाय, तुझा संबंध काय? तुच त्याला दारू पेया दिली, माझे घरासमोर उभा रेव नको नी त मी पोलीस ठेसनला, सायबाकडं तुझी तक्रार करीन,जाय होस.” तिचा अवतार पाहून पाटलांनी पळ काढला. त्यानंतर पाटलाने तिचा नाद सोडला.
पाहता पाहता तिचा मुलगा, रामा सात वर्षाचा झाला. झिंगरीने त्याच नाव झेडपी च्या शाळेत घालायचं ठरवलं. ती त्याला म्हणाली, “पोरा सोमवारशी तुला शालेन जायचा हाय. आज तुला बाजारानशी पाटी-पेन्सिल आणल्याय, नांग जा पिशवीन हाय. अंकलपट्टी आणल्याय, ती बघून पाटीवर लीव हो. गावातली सगली पोरा शालेन जातन, तुलाव शिकाय पायजे. मी तुला शरट आनी पाटलून आणल्याय घालून नांग होय, होतय का?” झिंगरीने त्याला आठवडा बाजारातून जुनी पॅन्ट आणि शर्ट आणला होता.
आतापर्यंत तो फाटक्या चड्डीवर बापा बरोबर शेतावर जात असे, अंगात शर्ट कसा तो नव्हताच म्हणून कधी शर्ट पॅन्ट घालून पाहतो अस त्याला झालं होतं. तुमच्या आमच्या सारखा रंगाचा चॉईस त्याला नव्हता. कपडे मिळाले हेच फार होते. त्यांनी झिंगरी समोरच कपडे घातले.पॅन्ट कमरेतून खाली घसरत होती. त्यांनी दोन्ही हातांनी पॅन्ट धरली, “आया, यी पाय कमरेवर नी रेय.” झिंगरीने एक दोरीने पॅन्ट कमरेवर बांधली. पाय आता रेली ना, कय पण बसू नको हो, पाटलून मलल, सारखी सारखी धोवाय नको, नी त फाटून जाल.”
त्याने कपडे घालून घरात इकडे तिकडे फिरून पाहिलं. बऱ्याच वर्षांनी तो स्वतःला पूर्ण कपड्यात पहात होता. सोमवारी सकाळीच तिने रामाला उठवले,कपड्याच्या साबणाने त्याच अंग चोळून अंघोळ घातली, काळा चहा, रात्रीचा भाकरीचा चतकोर दिला आणि पाटी पेन्सिल पिशवीत भरून झिंगरी त्याला शाळेत घेऊन गेली.
गुरूजींनी झिंगरीकडे पहात विचारलं, “तुझा मुलगा का?”, झिंगरीने मान हलवली, “गुरूजी माह्या मुलाला शालेन घालाय आणलाय, शिकवायचा हाय, त्याला डॉ. बाबासाहेबावानी मोठ करांच हाय.” गुरूजी हसले. तिच्या शरीरभर नजर फिरवत म्हणाले, “झिंगरे, त्याला डॉ. आंबेडकर साहेब बनवणार आहेस का? छान, बनव, बनव, तुमचेच दिवस आलेत.” गुरूजींनी झिंगरीकडे पहात मुलाच नाव विचारलं, त्याने नाव सांगितले, “रामा सोमा झिंगाड. राहाणार, काथोडपाडा.” “आणि तुझ ग काय नाव? हजेरी पत्रकात आईच नाव असले तर बरे, सांगतेस ना!” “माझा नाव क्याला पायजे? माझा, झिंगरी सोमा झिंगाड.”
गुरूजींना कळलं की सोमा, वामन पाटलाच्या शेतावर काम करतो. पूढच विचारण्याची गरज नव्हती. गुरुजी वामन पाटलांना चांगले ओळखत होते. वामन पाटील तसाच कसलेला गडी होता. यांना बाईचा स्पर्श चालतो, पण पुरूषांची सावलीसुध्दा चालत नाही. त्या बाबतीत करून सवरून नामानिराळे. झिंगरी बाबत घडलेला प्रकार मास्तर ऐकून होते. शाळेत एक बाजूला लांब लचक लाकडी पाट एका मागे एक ठेवले होते. एका एका पाटावर पाचसहा मुलं बसली होती. दुसऱ्या बाजूला एका भागात जमिनीवर त्याच्यासारख्या चार पाच पोरांना जागा होती. गुरूजींसमोर एक ड्रॉवरच टेबल आणि खुर्ची. त्यामागे भलामोठा फळा. वर्ग ऐसपैस होता. एवढ्या मोठ्या वर्गात वीस पंचवीस मुले म्हणजे परातीत मुठभर तांदूळच.
गुरुजी रामाकडे पहात म्हणाले, “रामा, या मुलांच्या बाजूला बस हो.” रामाच्या बाजूस बसलेली मुलं थोडी कृश आणि अस्वच्छ वाटत होती. त्याने पाहिले, पलीकडे बाकावर बसलेली मुलं थोडी तरतरीत वाटत होती. तिथे जाऊन बसावं अस त्याला वाटलं पण पहिलाच दिवस असल्याने तो गप्प बसला.
एक आठवड्यात त्याच्या लक्षात आले, गुरुजी पाटावर बसलेल्या विद्यार्थ्यांवर जास्त लक्ष देतात. त्यांच्याकडे कधीतरीच लक्ष देतात. गुरुजी त्यांच्या पाट्या कधीच हातात घेऊन अभ्यास पहात नसत. शाळेतील इतर मुलेही त्यांना खेळायला घेत नसत. ती पाच सहा मुले नीट रहात नसल्याने रामाला फारशी आवडत नसत, त्याला प्रश्न पडे कोणाबरोबर खेळायचे? रामाला हळूहळू हे कळू लागलं होतं की शाळेत आपल्याला वेगळं बसायला लागत, इतर विद्यार्थी आपल्या पासून दूर बसतात. अगदी गुरूजीही, ना त्यांचा अभ्यास पहात ना त्यांना जवळ बोलवत. चार सहा मुलांनाच गुरुजी अस वेगळं का बरं बसवत असावे? घरी त्याने बापाला विचारलं, “दादा,आमचे गुरुजी आमाना वायले क्याला बसवतान? गावातल्या पोरांना बसाय पाट नी आमाना जमीनीवर असा क्याला?” पोराला काय सांगावे ते त्याला कळेना, तो त्याला म्हणाला, “आयाला विचार जा, ती सांगल होय.” तोच प्रश्न त्याने आईला विचारला, “आया, गुरुजी आमाना वायळ क्याला बसवताना?” “अर पोरा,आपण काथोडी हाव, त्यांच्यापक्षा वायले, आपण गुरांचा मास खाताव, ते नी खात. ते मोठं हांन, आपन त्यांचेन नी जायचा, गुरुजी बसवतीन तय बस, शिकवतांन तय ध्यान ठेव.” “आपन गुरांचा मास नी खाल्ला त अपल्यालाव पाटावर घेतीन का?” “पोरा, माना नी माहीत. गुरुजी तुला सांगल, त्यायला विचार.” आईने सांगितले ते त्याला पटले नव्हते, म्हणूनच त्याने गुरुजींना विचारायचं ठरवलं. अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना बसायला पाट आणि आपण जमिनीवर हे त्याच्या मनाला पटत नव्हतं.
affiliate link
एक दिवस तो गुरुजी समोर जाऊन उभा राहिला. “गुरुजी माना काय तरी तुम्हाना विचारायचा हाय.” गुरुजी त्याच्याकडे पहात म्हणाले, “आधी थोडं दूर उभ राहा, हो दूर, हां तुला काय विचारायचं ते नंतर विचार” तो थोडा पाठी सरकला आणि म्हणाला,”आथा विचारू का, चाललं?” गुरुजींनी मान डोलावली. “गुरुजी,तुमी अमाना वायळ बसवतान, तुमी आमचा अभ्यास नाय नांगत अस क्याला? आमी आणि ही पोर वायली हायेत का? त्याचा प्रश्न ऐकून गुरुजी खुर्चीतून उडाले, डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागले.”राम्या,जास्त बोलायला लागलास, हे कोणी विचारायला सांगितलं? काय रे! कोण म्हणालं तुला गुरुजींना विचार म्हणून?” “येरच, मना वाटला का माना दोन डोले, दोन हात, दोन पाय, दोन कान हाईत, तय पाटवर बसलेन त्या पोरानाव माझ्या सारखे हातपाय हान मंग आमाना जमीनीवर क्याला? तय पाटावर बसाय गेलो त काय होल?”
भोईर गुरूजी त्याच्या प्रश्नांची सरबत्ती ऐकून आता तापले, “काय रे काथोड्या, माज आला काय तुला? म्हणतो पाटावर बसायचं आहे! तुला शाळेत बसवतो उपकार समज, शिकायच असेल तर गुपचूप सांगेन तिकडे बसायचं. समजलं? जा आता जाग्यावर बस.” तो तरीही तिथेच, थांबला. “गुरूजी ती पोर मानसं आणि आमी काय गुर हायेत का? आमच्यावर अन्याव का?”
भोईर गुरूजींनी लाकडी रूळ काढून रागाबरोर दोन तिन फटके हातापायावर ओढले. तरीही रामा जागचा हलला नाही. रडला नाही. तो स्तब्ध उभा राहिला. बाजूच्या पाटावर बसलेली मुलं त्याच्याकडे पाहू लागली. आता गुरूजी पुन्हा राम्याला बडवणार अस सर्व मुलांना वाटलं पण झालं उलटच, ते त्याच्या समोर हात जोडून म्हणाले “रामा, तू तुझ्या जाग्यावर जाऊन बस, उद्या मी वरच्या सायेबांना विचारून तुमची पाटांची व्यवस्था करतो. जा म्हणतो ना.”
गुरूजींच्या बोलण्याने रामा ओक्साबोक्शी रडू लागला, “माना तुमी मारला ना,आमची आया येऊन तुमाला कुटल तवा कळंल.” ते ऐकून गुरुजींच टाळक सटकलं, “काय म्हणालास? तुझी आई येऊन मला मारेल! बघूया तुझा बाप आणि आईमाझं काय वाकड करतात ते?” अस म्हणत रामा जमिनीवर लोळण घेईपर्यंत भोईर गुरूजींनी त्याला बदडून काढलं.
नंतर गुरूजी खुर्चीत बसून धापा टाकू लागले. इथे रामा जमिनीवर पडला तो उठायच नाव घेईना, काही मुलांनी मडक्यातलं पाणी तोंडावर मारल, कोणी त्याला उठवून बसवण्याचा प्रयत्न करू लागल पण पोरग काही हलेना. आता मात्र गुरुजींच धाब दणाणले. त्यांनी त्याच्या जवळ येऊन हाक मारली, “रामा, ए रामा उठ, नाटक नको करू.” गुरुजींनी रामाला मारलं आणि तो जमीनीवर पडला ,ही बातमी त्या सहा पोरांपैकी कोणीतरी काथोड पाड्यात जाऊन रामाच्या आईला, झिंगरीला सांगितली.झिंगरी तिथूनच मोठ मोठ्याने ओरडत,रडत शाळेत आली. तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तिच्या हातात खुरपणीची कोयती होती.
ती शाळेत येताच तिचा अवतार पाहून भोईर गुरूजी शाळेबाहेर पळत सुटले. झिंगरीने पोराला उचलून घेण्याचा प्रयत्न केला पण पोराची हालचाल जाणवेना. झिंगरीने हंबरडा फोडला. बहुधा पोरग गेलं असा तिचा नक्की समज झाला. तिने छातीवर हात मारून आक्रोश केला. मुल सगळी भेदरली. हळूहळू गावातील लोक जमा झाले. झिंगरी मोठ्याने रडून सांगत होती,”गुरुजी तू माझ पोरगं मारल, माझं पोरगं मला दे, कायला म्हणून मी रामाला तुझ्या शाळेत घातला? नसता शिकला त बी चालला असता,तेच्या बापाला मी काय उत्तर देव. गुरुजी माझ पोरगं मेल तर तुला मी सोडणार नाय”
काही वेळाने रामा हलला,तस तिन त्याला जवळ घेऊन पापे घेतले, “पोरा ,रामा बोलं रं, हे पाणी पी, काय झालं रे पोरा तुला? तू मला सोडून जाव नको रं पोरा.” तिने त्याला पुन्हा पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.दोन तीन वेळा थोड, थोड पाणी पाजल्यावर रामा सावध झाला. तस ती रामाला खांद्यावर घेऊन घरी जायला निघाली, तिच्या पाठीमागे वस्तीवरची पाच, सहा मुलही सोबत होती. रामाची पाटीची पिशवी एका मुलाच्या हाती होती. दोन चार दिवसांनी झिंगरी रामाला घेऊन शाळेत आली,तिला येतांना पाहूनच भोईर गुरुजी घाबरून बाहेर पळाले, ती शाळेच्या दरवाजावर येऊन गुरूजींकडे पहात म्हणाली,”मास्तर , माझा रामा आजपासून पाटावरच बसल. पुन्हा त्याच्या वाटेला गेला त मी हाय न मंग तुमी, या कोयतीन नाय कापल तं सोमाच नावं लावणार नाही.” तिने रामाला पाटावर नेवून बसवलं,आज पासून अयाच बसायचा,कोण काय बोलला त माना सांग मंग कोणीव आसो. गुरूजींनी तिला हात जोडले. “तू म्हणाली तसच होईल. तू जा मला शिकवू दे.”
affiliate link
बाकीची मुलमुली चुळबूळ करू लागली तस ती महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शेजारचा डॉक्टर आंबेडकरांचा फोटो दाखवत म्हणाली, “पोरानो यो कोण हाय? कोणाला माहीत हाय?” त्यातली एक तरतरीत मुलगी म्हणाली, डॉक्टर आंबेडकर आहेत ते, त्यांनी घटना लिहिली.” “पोरीचा बरोबर हाय, डॉक्टर बाबा सांगतो आमी सर्व भाऊ बहिणी हान, वायल क्याला बसायचं, रामा रोज आंग धुतो,बरे कपडे घालतो मंग त्याला क्याला वायल बसवता, बरोबर हाय ना? ती म्हणाली. एक पोरगं उठून म्हणाला, “माझी आई म्हणते तुम्ही गुरांचं मास खाता,आम्ही गुरांच मास नाही खात.” “पोरा, खरं हाय तुझं, पण आता आमी कोणीच गुरांचं मांस नाही खाणार, देवा शप्पथ. त्या बाबासाहेब आंबेडकरांची शप्पथ. मंग त तुमी रामाला बाकावर बसवणार ना?
भोईर गुरुजी घाबरून गप्प बसले होते,तितक्यात गावातून काही बायका आल्या, त्यात पाटलांची बायको होती, त्यांनी ओरडून झिंगरीला दारातून दूर व्हायला सांगितलं आणि गुरुजींकडे पहात म्हणाल्या, “आमची मुलं या काथोड्या बरोबर नाही बसणार, आमची मुलं आम्ही शाळेतून काढून घेऊ, गुरुजी नीट विचार करा. ये भवाने हो बाहेर,आमच्या मुलांशी बरोबरी करू नको.”
झिंगरी हट्टाला पेटली, तिने मुलाला पाटावर नेवून बसवले. “बस रे पोरा ही काय करतात मी बघतेच,”इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था गुरुजींची झाली. गावातल्या बायकांनी आरडाओरडा केला,पण झिंगरीला हात लावणार कोण? हात लावला तर बाटणार. म्हणून बायकांनी गुरुजींना धारेवर धरलं. गुरुजी झिंगरीवर रागावून म्हणाले,”झिंगरी तुझ्या मुलाला घेऊन जा, शाळेच्या बाहेर हो,उद्या शिक्षण अधिकारी येतील आणि तेच हा तिढा सोडवतील.
झिंगरीने आपल्या पाड्यावरील सर्व जात बांधवांना बोलावून समजावले. “जर आपल्या पोरांना शाला शिकवायला होवी त या पुढे कोणीबी गाई गुरांचं मास खायाचा नी, न गावानची मरेल गुरा नेऊन टाकायची नी… कबूल हाय का?” सर्व लोकायनी होकार दिला.दुसऱ्या दिवशी अख्खा पाडा तालुक्याच्या ऑफिसमध्ये गेला. साहेब,” म्हणाले तुम्ही कोण?” झिंगरीने आख्खा पाढा वाचला,तावातावाने तिने घडलेली हकीकत सांगीतली. साहेब अवाक होऊन पहात होता.त्याने झिंगरीला विचारले, “ये पोरी, मी गुरुजींना बोलावून तुझी तक्रार सांगतो पण माझ्या ऑफिसवर मोर्चा आणायची हिंमत कशी झाली?” “साहेब कांय करणार, आपला गुरुजी ऐकना मंग यावं लागल.”
गुरुजींनी झिंगरी आणि गावातील महिला यांची तक्रार यापूर्वच कार्यालयात केली. दोन दिवसांनी गट शिक्षण अधिकारी आले आणि त्यांनी शाळेतील पालकांची सभा घेतली. त्यांनी शिक्षण हक्क कायदा सर्वांना सांगितला आणि समजावले की समान न्याय तत्वाने जाती धर्मानुसार वेगळी वागणूक देत येत नाही. तेव्हा रामा आणि त्याचे मित्र इतर मुलांप्रमाणे पाटावर त्यांना हवे तसेच बसणार. जर कोणी त्यांना त्रास दिला तर पोलीस कारवाई होऊन अटक होऊ शकते.”
चार आठ दिवस शाळेत फक्त रामा एकटाच येत होता. गुरुजी घाबरले, गटशिक्षण अधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर बदली केली तर काय करणार? शेवटी ते पाटलांच्या घरी गेले. परिस्थिती समजावून सांगितली. पाटील ऐकेना तेव्हा मास्तर म्हणाले, “झिंगरी म्हणत होती की, पाटील..” अस वाक्य अर्ध्यावर सोडलं आणि पाटलांनी डोळे वटारून गुरुजींकडे पाहिलं. मास्तर जावा,जावा आपल्या शाळेला जा, उद्यापास्न सगळी पोर शाळेला येतील.
पाटलांनी आपल्या बायकोला समजावलं, “पार्वती उद्या तुझ्या मैतरनीना जाऊन सांग, जे आईबाप पोरानं शाळेत पाठवणार नाही पोलीस त्यांना पकडून नेतील.” दुसऱ्या दिवशी सगळी पोर नेहमीच्या वेळेवर शाळेला आली. रामा आईला म्हणला, “आया,आज जकली पोरा शालेन आल्ती.” झिंगरी हसली. कधी न्याय आडवाटेने मिळतो. अर्थात झिंगरी हे मुलाला सांगू शकत नव्हती.
आजही समाजातील विषमता संपलेली नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान येथे दलित समाजातील नागरीकांना आजही फारशी चांगली वागणूक मिळत नाही. शासनाने त्यांच्यासाठी निशुल्क शिक्षणाची सोय केली असुनही हक्क मिळवण्यासाठी त्यांना लढा द्यावा लागतो. सहजासहजी त्याचा लाभ त्यांना मिळत नाही.
झिंगरी बाई असूनही तिने आपल्या मुलाला समानतेचा न्याय मिळवून दिला. रामा इतर मुलांच्या जोडीला बसू लागला आणि गावातील अस्पृश्यता निकाली लागली. अर्थात गावातील सधन लोकांना आपल्या मृत गाई गुर नेण्यासाठी आता काथोडी मदत करत नाहीत. मेलेली जनावरे घेऊन त्यांना स्वतः जावं लागतं. एक झिंगरी जर गावात जनजागृती करु शकते, स्वतःच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटू शकते तर समाज कसा पाठी राहील. जेव्हा अशा अनेक झिंगऱ्या समाजत उभ्या राहतील तेव्हा कोणीही अत्याचार करण्यास धजवणार नाही. झिंगरी हे एक प्रतिनिधिक स्वरूप होत. याच झिंगरीचा मुलगा रामा पुढे शिकून जिल्हा परिषदेच्या शाळेचा निरिक्षक झाला. हा बदल घडला तो एका अशिक्षित महिलेमुळे. आज या झिंगरीचं नाव जगाला माहितही नसेल पण रामा सोमा झींगाट याची शिक्षण क्षेत्रातील वाटचाल हिच झिंगरीची ओळख होती. त्या झिंगरीला ही कथा सादर प्रणाम.