तालेवार

तालेवार

गावात, कोंबड्याच्या बांगेने पहाटेस पुर्वेला फुटत तांबडं
अन थंडी पावसात इरसाल गावकरी उबेला घेतो घोंगडं

सकळची न्याहरी करून तो वावरात बीगीबीगी जातो
रामराम म्हणत, “आज एकदम बेगीन” कुणी आडवा येतो

अण्णा, चाल्लो हजामत करून घ्यायला येता का? तो कावतो
जाताजाता, हनुमान मंदिराशी टेकतो, म्हणे नवसाला पावतो

गावात सरळ कुणी वागत नाही, बोलणही तिरसट वाकड
त्यांच्या बोलण्याची गंम्मत वाटते किंवा वाटते आचरट कोडं

गावारान माणसान पायान मारलेली गाठ हातान सुटत नाही
लेंगा, सदरा, टोपी असं ध्यान पण बुध्दीची अचाट चतुराई

सकाळी, संध्याकाळी रिकमटेकडी माणस चावडीवर जमतात
कोणा नवख्या बाईंची गाडी गावात शिरली की पाठी धावतात

डॉक्टर, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांना बिनकामाचं भेटतात
आपली आख्खा गावात वट आहे अस बायकोला चारदा सांगतात

तिला तेच ते खोट ऐकून नवरा शीळ्या कडीवानी वाटतो
ती म्हणते, गाव उंडगुन झालं का? तो केविलवाणा हसतो

बघता बघता तो सरपंच, झेडपी सदस्य अन आमदार होतो
रिकामटेडा नवरा आता लोकनायक, अब्रुदार मंत्री बनतो

काय नशीब म्हणावं, कारखान्याचं अध्यक्षपद चालुन दारी येत
मिशीला पिळ घालत तो बायकोकडं बघत फिदीफिदी हसतो

तो आता तालुक्याऐवजी आता दर हप्तात ममयला जातो
श्रेष्ठी का काय म्हणतात त्यांच्या मर्जीत खोल रूतुन बसतो

सचिवालयात खात्याचे सचिव हेच तर ठरवतात धोरण
गावाकडचा मंत्री, त्याचा पीए ठरवतो, सचिव त्याला शरण

अचानक जाग येते, कळतं खर काय बी नाही, सगळं सपान
तो हताश, निराश, आढ्याकडं पहात पडुन राहतो गुमान

त्याच्या सतरा भानगडी, त्याचे कज्जे तालुक्यात असतात
हद्द,घर, मेर, जमीन, धडेवाटप, वकील त्याला लुटतात

सगळं गहाण पडलं तरी फेटा लावल्यावर गडी रांगडा वाटतो
घरी कारभारीण, बाहेर सावकार, पाहताच त्याचा धीर गोठतो

गावाकडे चावडीवर असली इरसाल माणसं जागोजाग दिसतात
शहरातुन कुणी सुटाबुटात आलं की त्यायला बघून मनात खंगतात

काय म्हटलं तरी गावाच रहाटगाडगं असच जोमात चालत
कोणी नाक मुरडलं तरी गाव तालेवार माणसाच्या शब्दाला भुलतं

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar