तो राजपुत्र एक

तो राजपुत्र एक

एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वसई मधून शेरलॉक नावाचं त्रैमासीक निघत असे.या मासिकाचे संस्थापक, मुद्रक, प्रकाशक होते श्रीकृष्ण ठाकूर. या मासिकात ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील गोष्टी आणि पोलिस शोधमोहीमांबाबत काही सत्य कथा तर काही काल्पनिक कथा छापून येत असत. याचे मालक श्रीकृष्ण ठाकूर यांचा मुलगा कमलाकर याची शोध कथाही त्यात असे. शोधपत्रकारिता करून तो स्वतः त्या कालखंडात घडलेल्या घटनेला मीठमसाला लावून कथा लिहीत असे. त्याची उंची सहा फुटांच्या वर, पिळदार शरीरयष्टी आणि आखीव रेखीव चेहरा या मुळे तो अभिनेता म्हणूनही शोभून दिसला असता. अर्थात त्या काळी मध्यम वर्गीय कुटुंबात अभिनेता बनण्याची क्रेझ नव्हती.

ह्या शोध पत्रिकारिके करता त्याची भटकंती कुठेही चाले. कधी कधी तो सफाळे गावातही येत असे. तेव्हा तो ऐन तारुण्यात होता. गावात त्याचे आजोळ होते. तो आजोळी आला की त्याची खरंच एखाद्या राजपुत्राप्रमाणे बडदास्त असे. आजोबांचा टांगा होता. घरी घोड्यांची पाग होती,आवड म्हणून घोड्यांच्या दोन जोड्या पागेत होत्या. आजोबांकडे आले,की हे महाराज एकदम आनंदी असत, घोडेस्वारी करायला मिळे. सकाळी घोड्यावर बसून घोडा तांदुळवाडी रस्त्याला फेकला की तासभर फिरून मगच हे साहेब घरी येत. या आजोबांचे दोन नातू  मुंबईत वास्तव्याला होते. ते कमलाकर पेक्षा वयाने लहान. त्यांचे पिताश्री मोठे सरकारी अधिकारी. ते आले की हे तीनही वीर घोडेस्वारी करण्यासाठी दूरवर जात. आम्हाला ते दंतकथेतील राजपुत्राप्रमाणे भासत.

मोठ्या धेंडांची मुलं, त्यामुळे लोक त्यांना कौतुकाने पहात. आजोबांकडे चार सहा दुभत्या म्हशी, गाई होत्या. प्यायला घरचं दूध होत. घरचे काम करायला चार मजूर होते. काही म्हणून कमी नव्हते. त्यात हा  मुलीचा मुलगा असल्याने आजी समोर बसवून दूध पिण्यासाठी सक्ती करत असे. खरं तर पंचवीस वर्षाचा मुलगा म्हणजे घोडाच की, पण शेवटी नातू . मग आजी हवं नको पहणारच. आंघोळीला घंगाळ भरून पाणी, भल मोठं स्नानगृह, साधारण शंभर चौरस फूट किंवा थोड मोठंच. आता ब्लॉकचा हॉल किंवा असलाच तर किचन एवढा मोठा असतो. 

तर असं लाडाकौतुकात वाढत असल्याने हे राजकुमार एकदा सफाळ्याला आले की वसई येथे जायचं नाव घ्यायचे नाही. आजोबा त्याला विचारत “अरे, तू बापाला प्रेस चालवायला काही मदत करतो की नाही!” तर ह्या महाशयांनी काय करावं, दोन महिन्यां पूर्वी छापलेला अंक आजोबांच्या पुढ्यात टाकला,” आजोबा,पहा मी लिहिली आहे सत्य कथा,”पॅट्रेशियाचा बळी”. ते नाव ऐकून आजोबा सर्द. “हे असलं तुझा बाप छापतो. माझ्या मुलीचं, भिमेच काही खरं नाही. कोण घेत ही असली पुस्तक?”

तो एक तुच्छ कटाक्ष आजोबांकडे टाकून म्हणतो, “तुम्ही राहता गावंड्यात,तुम्हाला काय कळणार! आजोबा, हे मासिक छापल्या छापल्या खपतं, लोक वाट पहात असतात,मासीक कधी बाजारात येत त्याची”  आजोबा त्याला हात जोडून म्हणत, “धन्य तुझी आणि तुझ्या बापाची. काही चांगला व्यवसाय करा, नोकरी करा, ही गुन्हेगारी कथा पुस्तक छापून पोट जाळण्यापेक्षा कष्ट करा, मेहनत करा.” झालं, आजोबा एवढं बोलले, स्तुती तर नाहीच पण थेट हल्ला,आपल्या कलेच काही आहे की नाही! तो स्वतःशी पुटपुटला.

आजोबांचा भलामोठा गवताचा व्यवसाय होता,त्या वेळेस गोरेगाव, जोगेश्वरी,मालाड येथे म्हशींचे तबेले होते त्यांना सुके गवत लागायचे. मुंबईत म्हशीच्या तबेल्याना ते गवत गासड्या पुरवायचे. खूप आदिवासी माणसे या गासड्या बनवण्याच्या कामावर होती, त्यांच्या कडून काम करून घ्यायला, त्यांना सूचना द्यायला मुकादम होते, ही प्राथमिक शाळा पाहिलेली आगरी मंडळी होती.

आजोबांनी नातवाला बोलावलं आणि  दम भरला, “कमलाकर, उद्या पासून मुकादम बरोबर काम पहायचं. शिकून घे काम, फुकट गिळायचं नाही, तुला अशोक पाटील मदत करेल.” आजोबा त्याला रागवताना आजीने ऐकलं, “अहो, त्याला कशाला मुकादमा बरोबर? उद्या जावई आणि तुमच्या मुलीला कळलं तर काय वाटेल? म्हणतील आजोळी काम करून घेतलं, नातवाला पोसायची हिम्मत आजोबात नाही.”

आजोबा चिडून म्हणाले, “अग घोडा झालाय तो, तुझे दोन नातू पहा. एक वकिली शिकतोय, दुसरा science graduate होतोय आणि हे महाशय गुन्हेगारी कथा लिहितात. या कथा वाचणार कोण? टवाळच ना,अशाने पोट भरेल का?” त्याला आजोबांचा राग आला, तो तिथून निघून जात होता. आजीनेच हाक मारून थांबवलं, “अरे कमलाकर, दुपार होत्याय कुठे निघालास?,जा अंघोळ करून घे,मी पान वाढते.” तो त्रागा करत निघून गेला. आजोबा रागावून म्हणाले, “अहो तुमचे लाड पुरे झाले. एकतर  बरोबर तुमच्या नातवाला गोदामात पाठवा नाही पेक्षा त्यांना वसईला पाठवून द्या. उद्या बाप आपल्या नावाने खडे फोडेल, मुलगा नाहक सफाळ्याला गेला आणि बिघडला.” त्यांनी रदबदली करण्याच्या प्रयत्न केला,”अहो मी काय म्हणते, तो स्वतः गेला तर गोष्ट वेगळी आपणच त्याला जा म्हणणं शोभत का?, राहिला महिनाभर तर आपलं काय कमी होईल?” ते तिला समजेल अशा भाषेत म्हणाले “सध्या,आपले नातू गाव फिरत असतात, इथे उनाड मुलांची कमी नाही, त्यांच्यात फिरता फिरता त्यांचे दुर्गुण घ्यायला वेळ लागणार नाही मग आपल्या मुलीला काय उत्तर द्याल? तो गोदामात गेला तर अशोकचं, माझं लक्ष राहील,काही कळतय का तुम्हाला?” आजीने मान हलवली “ठीक आहे तुम्हाला योग्य वाटेल ते करा पण तो मोठा झाला आहे त्याला टाकून बोलू नका. कुठे तोंड घेऊन गेला तर तुम्हालाच शोध घ्यावा लागेल, म्हणून म्हणते.”

आजी माजघरात गेल्या, न बोलताच जेवणं झाली. आजोबा बाहेर शत पावली घालत होते.कमलाकर माडीवर झोपायला गेला.रात्रीही कुणी कुणाशी बोललं नाही. सकाळी आजोबांनी आजीकडे निरोप ठेवला,”मी गोदामात जाणार तुमच्या नातवाला तयार राहायला सांगा.” कमलाकर ते ऐकत होता, आज नाइलाज होता, आजोबाबरोबर जाणे भाग होते. तो तयार झाला. अशोक मुकादम आले, त्यांनी टांगा जुंपला. आजोबा पाठी बसले, कमलाकर टांग्यात अशोक शेजारी बसला. त्या दिवशी त्यांनी गोदामात पूर्ण सकाळ मजुरांवर देखरेख केली. त्याची पिळदार यष्टी आणि एकंदर देहबोली पाहून कामगार मान खाली घालून काम करत होते.

दोन चार दिवसात त्यांने काम समजाऊन घेतलं, आजोबांना वाटलं, चला बरं झालं. नातू कामाला लागला. नाहीतरी ते एवढं मोठा कारभार एकटे सांभाळू शकत नव्हते. सर्व काम मजुरांवर सोपावणे तितकेसे योग्य नव्हते. हळू हळू कामगारांशी तो त्यांच्या भाषेत बोलू लागला. कधी कामगाराने दांडी मारली तर तो बिनदिक्कत घोड्यावर स्वार होऊन त्याच्या झोपडी बाहेर उभा राही आणि खड्या आवाजात त्याला साद घाली,”कोण आहे रे घरात राम्या बाहेर ये,मी तुला न्यायला आलोय.”  बऱ्याच कामगारांची नावे त्याच्या जिभेवर होती, कृष्णा, कंबा, मना, दत्तू, माणक्या, बुध्या, चित्या आणि असेच कितीतरी.

जेव्हा पासून तो गोदामात यायला लागला मजूर दांड्या मारायचे कमी झाले. गवत गासाड्यांचे उत्पादन वाढले,आजोबा खूश होते पण जे मुकादम होते ते कधी कधी मजुरांची खोटी उपस्थिती दाखवून त्यांच्याकडून मलिदा मिळवत होते. बाहेरून जे गवत खरेदी केले जात होते त्याचे  वजन मोजमाप योग्य होत नव्हते. गवत आणणाऱ्या शेतकरी कष्टकरी वर्ग  यांच्याकडून चिरी मिरी मिळवत होते. मुकादम लोकांचे त्याच्या येण्याने नुकसान झाले. त्यांना कोठेही काही वाव नव्हता. हे नवीन छोटे मालक सर्व ठिकाणी देखरेख करू लागले. या  छोट्या मालकाची मजुरांना दहशत वाटू लागली. त्यांनी मुकादमांशी संगनमत करुन या छोट्या मालकाला धडा शिकवायचा ठरवले. कोणत्या तरी लफड्यात त्याला गुंतवल्या शिवाय मोकळीक नाही हे मुकादम लोकांना माहित होते. तसे न करते तर गोदामात त्यांचं बिंग फुटले असते.

गोदामात पार्टी द्यायचं निश्चित केले.या नवीन मालकाला पार्टीचे निमंत्रण दिले. त्यांनी स्पष्ट नाही म्हणून कळवले तेव्हा त्यांनी पार्वतीला, मालकाला बोलाव म्हणून गळ घातली. पार्वती येऊन म्हणाली ,”शेट, तुमाना बोलीवलाय जेवाय, चला ना, अशोक काकन जेवन  केलाय .अयास केला, चावलाचे भाकरीव हान, या, चला सगली वाट बघतन.” तो म्हणाला,”नाही  मी घरी चाललो, तिथे आजी वाट पहात असेल माझी,तुम्ही घ्या जेऊन.” ” शेट, चला ना, एकदा नांगा त खरा ,नी आवडला त जा घरा.” ती परत जायला तयार नव्हती. त्याचा नाईलाज झाला.”तो म्हणाला, ” तू हो पुढे, माझं काम संपवून मी येतो, तुम्ही घ्या जेवून.”

ती तिथेच उभी राहून त्या तरुण मालकाकडे पहात बसली. चांगला, गोरागोमटा, पिळदार शरीरयष्टी असलेला आणि रेखीव मिशीचा हा मालक खाष्ट होता पण तिला तो मनापासून आवडला.तो काम करता करता तिच्याकडे पहात होता. ती त्याला टक लावून पाहत होती. ती आदिवासी असली तरी दिसायला नाकी डोळी होती.बांधा सुडौल होता. त्याची तंद्री  लागलेली पाहून  ती  पुन्हा म्हणाली, “शेट येतान ना! सगली वाट बगतान.” तो तिच्या नजरेनं घायाळ झाला, “ही सावळी असली तरी काय रुपड आहे आणि लबाड वाटते. या लोकांचा काही डाव तर नाही ना?”  त्याच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली.अनेक कथेत त्यांनी सापळा रचून शिकार कशी होते ते वाचलं होत, लिहीलं होतं. यांचाही काही डाव असावा.जावे की न जावे ते त्याला कळेना, पण ती पोरगी तर तिथून पाऊल वळवून जाईना. तो तिला रागावून म्हणाला,”जा म्हटलं ना, जा मी येतो.” त्याने हिशोबाच्या वह्या कपाटात ठेवल्या. कुलूप लावून तो तिच्या मागोमाग निघाला ती मुद्दाम लचकत चालत होती. त्यांने तिच्याकडे न पाहाता, गोदामांची शेड गाठली.सर्व वाट पाहत होते.”शेट आला, शेट आला, द्या ती टेबल,खुर्ची.”त्या टेबालाचे पाय लटपटत होते.त्यांनी टेबलवर केळीच्या पानावर त्याला भाकरी आणि एका द्रोणात चिकन वाढलं. त्याच्या बाजूला एक ग्लास आणून ठेवला. “शेट करा सुरवात”,  मुकादम त्याला म्हणाला. “कमलाकर त्यांच्याकडे पहात म्हणाला,” काका हे काय आहे? पाणी वाटत नाही.” “शेट, नुसत्या मटणात काय मजा, ती मोहाची आणल्याय पार्वतीनं,खास तुमच्यासाठी, पोटाला बरी असते.” 

तो मोहाच्या फुलांच्या दारू विषयी ऐकून होता पण पिण्याचा योग आला नव्हता,वसईला मित्रांसोबत त्यांने बिअर घेतली होती आणि वडिलांचा मार ही खाल्ला होता. तो त्यांना दादा म्हणायचा,त्याने कोणाकडून तरी ऐकलं होत की दादाही बाहेर घेतात पण घरी कधीच असला प्रकार त्यांनी पहिला नव्हता. त्यांने तरीही नकार दिला, “काका मी नाही घेत,ती दारूच ना शेवटी.” अशोक काका हसून म्हणाले, ती मोहाची आहे खास तुझ्यासाठी आणली आहे. नाही आवडली तर टाकून दे, मोठ्या शेटला नाही कळणार.” हो, ना, करता त्यांनी ग्लास तोंडाला लावला, “मोह” कधीही वाईटच. ज्या फुलांची दारू बनवली त्या झाडाचे नावही मोह, त्याला त्याची नशा आली. दोन चार घास घेतल्यावर त्याची नजर ग्लासकडे गेली. अशोक त्याच्या शेजारीच बसले होते. त्यांनी बाटली मधून थोडी दारू ओतली. त्याने ती दोन घोटात संपवली.मासा गळाला लागला होता.

तो घरी जेवायला आला नाही म्हणून आजीने एक माणूस त्याला बोलवायला पाठवला. त्या माणसाला दम भरत अशोक  म्हणाला, “आजीला सांग, शेटच्या पोटात बरं नाही आज नाही जेवायला येणार.” त्या माणसाने निरोप आजीला सांगितला, आजी बिचारी नातावाची  वाट पहात जेवायची थांबली होती. आजोबांना तो न आल्याचं, न सांगताच कळलं. संध्याकाळी आजोबांनी नातवाला बोलावलं, “ये कमलाकर, ये, तुला दुपारी म्हणे बरं नव्हतं, मग कोणते औषध घेतले.आणि बर नव्हते तर घरी यायचे, एक दिवस नाही थांबला गोदामात म्हणून काही बिघडत नाही.”

क्षणभर काय सांगाव ते त्याला सुचेना पण तो स्वतःला सावरत म्हणाला, “थोडं दुखत होते, पण मी काही औषध नाही घेतलं,रिकाम्या पोटी औषध घेऊन ऍसिडिटी वाढेल म्हणून, मी लिंबू सरबत घेतलं, आता बर आहे. येऊ मी.” आजोबा काहीच बोलले नाही.तो जायला निघाला तसे ते म्हणाले, “दोन दिवस तू आराम कर, उन्हात उभे राहून बरं वाटत नसेल तुला असल्या कामाची सवय नाही. उगाच आजारी पडायला नको.” “आजोबा, मला बरं आहे आत्ता, आराम करायची गरज नाही. मी जाईन गोदामात, वाटलं तसच काही तर लवकर घरी निघेन.” त्याच्या उत्तरावर आजोबा ठीक आहे म्हणाले.

रात्री त्याला नीट झोपही आली नाही, सारखी त्याला न भिता पहात राहणारी पार्वती नजरेसमोर दिसत होती.त्याच्या मनात असाही विचार आला,ती कोण? मी कोण? असा मूर्खा सारखा विचार आपण कसा करू शकतो? दुसऱ्या दिवशी तो लवकर तयार झाला तस आजीने विचारलं, “कमलाकर, एवढ्या लवकर का निघालास,अजून तुझ्या न्याहरीच मार्गी लागलं नाही, थोड थांब, दोन पोळ्या आणि दूध घे. मग जा हो.” त्याला आजीला काही बोलता येईना. तो गोदामात पोचला तेव्हा सर्व कामावर रुजू झाले होते. त्यांनी रजिस्टर घेऊन हजेरी घेतली. त्याला पार्वती दिसेना, तो निमूट ऑफिस मध्ये येऊन बसला. पार्वती दुपारी आली, त्याने तिला हटकली, “सकाली पोराला  बरं नव्हत, म्हनून। डॉक्टरकडे गेलती.उशीर केला तवा नी आले.” त्याच डोक सटकलं, “मग आता कशाला आली?, उद्याच यायचं की.” “शेट, खाडा झाला त मजूरी कमी येल. त्या मेल्याला दारू पायजे सकाल, संधेकाल,पैसे घरान देय नी. कामावर नी आलू त काय खाव?”

तो काही बोलला नाही, त्यांनी हातानेच जाण्याची खूण केली. असं आहे तर, लग्न झालं, पोरं झाली तरी अशी दिसते, लग्नाअगोदर किती सुंदर दिसत असेल!” ती गेली आणि अशोक काका आले, “शेट,पार्वती कशी वाटली?” तो अशोक काकांकडे पहात राहिला, साला जोतिष जाणतो की काय? तो काही घडलं नाही अस भासवत म्हणाला, “अशोक काका, कोणाविषयी बोलताय?” काका हसले “तीच की पार्वती,उफड्याची आहे, तुम्ही म्हणाल तर थांबवतो तिला, बघा काय म्हणते ती!” तो घाई घाईत म्हणाला,” अशोक काका ती कोण आम्ही कोण आपल्या बोलण्याला काही ताल तंत्र आहे का?” “शेट, बाई ती बाई, तिला का जात असते, बघा असली संधी पुन्हा नाही मिळणार?” “नको नको,हे असलं आजोबांना कळलं तर हे असले धंदे करायला मला गोदामात पाठवलं का? मला नसत्या भरीला घालू नका जा तुम्ही”

अशोकच्या लक्षात आले, सावज काही सहज जाळ्यात अडकणार नाही. त्यांनी पुन्हा पार्वतीला त्याच्या मागावर सोडली. संध्याकाळी कामगार गेले तरी पार्वती उगाचच वेळ काढत राहिली. तो त्याच्या ऑफिस मध्ये हजेरी पूर्ण करत होता, दुसऱ्या दिवशी रविवार होता. रविवारी संध्याकाळी त्यांचा पगार करायचा होता. ती अचानक आत आली, “शेट मी येव का?” त्याला काही सुचेना. तिने कुठूनशी चपटी बाटली काढली, “मोहाची हाय, पयल्या धारची, चाखून बघा.” त्यांने आजूबाजूला पहिलं, तो रागावत म्हणाला, तु जा इथून, ही तुझी बाटली घे.” ती हलली नाही, “त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. त्याचा श्वास गरम झाला, तो रागाने ओरडला, “जा म्हणतो ना, तुझ तोंड मला दाखवू नको आणि ही बाटली घेऊन जा. उद्या मोठ्या शेटला सांगून तुला काढून टाकतो कामावरून.” 

तिने त्याचे पाय धरले,”माना माफी करा, रामू काकानं सांगलात, बारका शेट बोलला त त्याचे बरोबर नीज. तुला खाडा भरून देन म्हनून.” त्यांनी तिला हातानेच बाहेर निघून जाण्याची खुण केली.ती निघून गेली.त्याच्या टेबलवर अजूनही ती दारूची बाटली होती. त्याने ती एका घोटात संपवली. ऑफिस बंद न करता तो वाटेला लागला. अशोक पाटीलला आपला डाव फसला हे लक्षात येताच त्यांनीच पार्वतीला  शेटच्या घरी नेलं आणि उलट सुलट सांगून कमलाकर वरती खोटे आरोप केले.आजोबांनी त्याला बोलावून जाब विचारला.

तो प्यायलेल्या अवस्थेत होता, त्याची पावले लट पटत होते. दोन दिवसापूर्वी घडलेला प्रकार त्यांने आजोबांना   सांगितला. आजोबा त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. ते रागावून म्हणाले, ” माझी अब्रू धुळीला मिळाली माझ्या समोरून तोंड काळं कर. माझी विश्वासू आहेत ही माणसे ,गेले वीस वीस वर्ष काम करत आहेत, आणि तू काल  येऊन तुझी चूक लपण्यासाठी त्यांच्यावर आरोप करतोस? ” 

कमलाकर  आपण कोणतीच चूक केली नाही, काल घडला तो प्रकार यांचा डाव होता हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण आजोबा त्याच म्हणणं ऐकायला तयार नव्हते. अखेरीस त्यांने आजीचा निरोप घेतला.पण तो आजीला म्हणाला “आजी मी खरंच काही केलेलं नाही तू माझ्यावर विश्वास ठेव. अशोक काकांनी माझ्यावर केलेला आरोप खोटा आहे हे सिध्द केल्याशिवाय मी राहणार नाही.” 

आजीने नातावासाठी रदबदली केली पण आजोबा निर्णयावर ठाम होते. अखेर त्याने आजोबांचे घर सोडले आणि थेट पार्वतीकडे येऊन म्हणाला,” पार्वती, आज पासून मी तुझ्या घरी राहीन,चालेल ना?” तो तिच्या घरी येईल असा विचारही तिने केला नव्हता. आता तो इरेला पेटला, सख्ख्या बायकोला सांगाव अशा दिमाखात म्हणाला, “पार्वती मला भूक लागलीय चल लवकर भाकरी कर.” तिचा नवरा त्याच्या अंगावर धावून गेला,पण कमलाकर ने त्याचा हात पिरगळला. तस तो विव्हाळला, “अक्करमाशी, माझी बायको पलवतो आणि मलाच मारतो. मी पोलीस ठेशनात जाऊन तुझी तक्रार करून येतो.” तो घरा बाहेर पडणार इतक्यात कमलाकरने त्याचा हात धरून त्याला झोपड्यात खेचलं. तो जमिनीवर आदळला.त्याने पुन्हा शिवी घातली,” मायला बामनाच्या पोरा, माझी बायको काय वाटेवरची शिनाल हाय काय? लगीन लावलाय, एक पोरं दिलाय तिला, ती तुझी कशी होल?” त्याने पार्वतीचा हात धरून तिला आणली आणि विचारल, “पार्वती, खरं सांग तुझ्या नवऱ्यासमोर, मी तुझ्यावर अतिप्रसंग केला का? का मोठ्या शेटला जाऊन खोटं बोललीस? खरं बोल नाहीतर —-”

त्याचा रुद्र अवतार पाहून ती म्हणाली,”मुकादम माना बोलला, का शेटचे जाऊन मी सांगीन तसा सांग नी सांगला त तुलाच खपवीन, म्हनून मीन शेटला सांगला.”  “काय सांगितलं शेटला, खरं बोल, माझ्याशी गाठ आहे.” “मीन सांगला मोठ्या शेटला,का  बारका शेट मना संद्याकाली ऑफिस मध्ये बोलवीत होता, न मी गेलू त माझा सुडका खेचीत होता.” ती थरथरत बोलत होती. तिचा नवरा सुकऱ्या ते ऐकत होता. कमलाकर तिच्या नवऱ्याला हलवत म्हणाला, “सुकऱ्या, हरामखोर, ऐकलं तुझी बायको काय म्हणते ते, तुम्ही दोघंही आत्ता आजोबांकडे चला आणि खरा प्रकार त्यांना सांगा नाही तर मी तुमची खांडोळी करून टाकेन.” आता सुकऱ्या सुद्धा थर थर कापू लागला. त्यांने सुकऱ्याचा गळा धरला,आणि त्याला ओढत रस्त्याने नेऊ लागला पार्वती त्याच्या पाठी मोठमोठ्यांनी रडत जाऊ लागली सर्व आदिवासी पाडा ते दृश्य पहात होता पण त्याला अडविण्याची हिम्मत कोणातही नव्हती.

त्यांने दोघांना आजोबांच्या समोर उभे केले आणि, म्हणाला,”सांग पार्वती काय घडलं ते, या माझ्या बिनडोक आजोबाला कळू दे, त्यांनी कोणती माणसं पदरी पोसलीत.” त्याचं वाक्य ऐकून आजोबा थरथर कापू लागले,आजवर त्यांचा कोणी एकेरी उल्लेख केला नव्हता, तरी आव आणत म्हणाले, “काय सांगणार आहे ती, जे सांगायचं होत ते झालं की सांगून, जा तुझ तोंड काळं कर.” 

पार्वती त्यांच्या पायावर पडून म्हणाली,” शेट मी तुमाना खोटा सांगला, बारक्या शेट नी काय पण केला नाय, आपले अशोक काकान माना सांगलाता, तू शेटला मी सांगतोय तसा सांग, नी सांगला तं मारून टाकीन तवास मी तुमचे येऊन खोटा सांगला, बारक्या शेटची गलतीच नाय.”  “खरं सांगतेस तू! खोटं बोललीस तर पोलीसात देईन याद राख.” ,आजोबा ओरडून म्हणाले. आजी बाहेर उभी राहून सगळं ऐकत होती. ती कमळाकरच्या शेजारी उभी राहून त्याची समजूत घालत होती पण तो आता ऐकायला तयार नव्हता.

ते आदीवासी जोडपं जायला निघणार इतक्यात अशोक तिथ आला. “पार्वती,काल शेटला काय बोलली नी माना खोट्यात पाडत का, मायला तुमच्या कंदी सुदरनार नी, अक्करमाशी कंची, ये हो काम मागत, तुमचे गांडीवर लातस घालाय पायजे.” आजी ओरडली, “शी, कसलं अभद्र बोलतोस, आणि खोट पण बोलायला लागलास, तुमचे काळे धंदे लपवण्यासाठी  माझ्या नातावावर आरोप करत होतात ना? मोठ्या शेटला किती फसवत होता कुणास ठाऊक?”

आजोबा आजीकडे पाहून ओरडले, “अहो, तुम्ही जा घरात, खर काय? खोट काय ते आम्ही पाहू. आम्ही बायकांच्या बुध्दीने निर्णय नाही घेत.” त्यांनी मुकादम अशोककडे पहात सांगितलं “उद्या पासून कामावर यायची तसदी घेऊ नको तुझा हिशोब कारकून घरी पाठवेल.” अशोक हात जोडत म्हणाला,” एकडाव माफी द्या, पुन्हा चूक नाही होणार. इतकी वर्षे नोकरी केली आता कुठे जाऊ?” “ते तू ठरव माझं गोदाम तुझ्यासाठी कायमच बंद, तुम्ही काय काय गोंधळ घातला तो शोधावा लागेल मी उगाचच नातवाला दोष देत होतो.”

निवाडा संपला होता. कमलाकर आपली बॅग घेऊन पुन्हा वसई येथे जायला निघाला होता. आमच्या मनातील राजपुत्र स्वच्छ चारित्र्याचा अभिमान मिरवत  आजोबाचे घर सोडून निघून जात होता. आजोबांनी त्याला न जाण्याची विनंती केली, आजी त्याची वाट अडवून राहिली पण त्याच्या चारित्र्याचे दहन होऊ नये म्हणून त्यांने आजीची माया ममता याचा मोह सोडून तो पुन्हा नव्या दिशेच्या शोधात निघाला होता.

तो आमच्या मनाच्या कोपऱ्यात स्थान मिळवलेला राजपुत्र होता. त्याच्याजवळून व्यभिचार झाला असता तर त्या राजपुत्राची कथा सांगताच आली नसती. काही कारणास्तव त्याने लग्न न केल्याचे नंतर समजले थोडं वाईट वाटलं, कारण वडिलांच्या पाठी त्याला शेरलॉक मासिक चालवता आलं नाही पण आजही आमच्या मनातील घोड्यावर मांड टाकून दौडणार राजपुत्र तसाच जिवंत आहे. त्याच्या घोड्यांच्या टापाखाली  रगडले गेलेले रस्ते आजही त्याची साक्ष मिरवत उभे आहेत. आणि त्याचा मी पाहिलेला जीवनपट जेव्हा मी मुलांना सांगतो तेव्हा माझ्या मनात तो राजपुत्र पुन्हा जिवंत होतो. अनाहूतपणे टापांचा निनाद माझ्या मनात गुंजत राहतो.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “तो राजपुत्र एक

 1. PRASHANT GIDH
  PRASHANT GIDH says:

  सुप्रभात सर….. ???
  खूप छान लेख आहे….
  खरेतर या लेखाच्या माध्यमातून आपण TV serials काढू शकता
  ????

 2. Kocharekar mangesh
  Kocharekar mangesh says:

  Thanks for compliment

Comments are closed.