त्या निसरड्या वाटेवर भाग 3
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्याने अभयला फोन केला. तिथून हॅलो ऐकू येताच शेखर त्याला म्हणाला, “तुझे प्रताप कळले, आता तू राहू शकत नाही, तुझा तूच निर्णय घे,तेच बरे.” त्याने उत्तराची वाट न पाहताच फोन कट केला. मेधाने आपला मोबाईल हॉलमध्ये ठेवला होता तो वाजू लागला, त्याने तो उचलून कानाला लावला, “मेधा! ,शेवटी तू माझ्या एक चुकीसाठी माझ्यावर सूड उगवणार मला दिसतं आहे. पण लक्षात ठेव, मी एकटा नाही जाणार तुलाही संपवून टाकणार.” त्याच बोलणं ऐकताच शेखरचा तिळपापड झाला, “हरामखोर, नीच, सख्ख्या वाहिनीवर हात टाकतांना तुला काही वाटले नाही, तुला तात्काळ पोलिसात द्यायला हवे होते. पण या पुढे तुझा माझा संबंध संपला. तुझे काय करायचे ते ठरव, तुझे प्रताप घरी कळण्यापूर्वी निर्णय घे…”
त्याने फोन कट केला आणि नंबर ब्लॉक केला. त्याचा आवाज ऐकून मेधा बाहेर आली, “शेखर कोणाचा फोन? कोणाशी बोलत होता? “अगं ऑफिसमधून मित्रचा फोन होता, का नाही आलो? विचारत होता.” तिने पाहिलं,तिचा फोन त्याच्या हातात होता. “मला कोणाचा फोन आला होता का?” शेखरला कळेना, तिला काय सांगावं, पण तो स्वतःला सावरत म्हणाला, “तुला कोणाचा फोन येणार? आलाच तर नानांचा, पण आता तरी फोन नाही आला.”
ती स्वयंपाक करायला निघून गेली, पण शेखर नक्की मित्राशी बोलत होता की अजून कुणाशी या बाबत तिच्या मनात संभ्रम होता.
रात्री उशिरापर्यंत दोघेही तळमळत होते, ती शरीराने जवळ असूनही त्याचा धीर होत नव्हता, तिलाही त्याच्या जवळ जावे असे वाटत नव्हते. ती आगतीक झाली होती. स्फुंदून, स्फुंदून रडू लागली, “शेखर मी अपवित्र झाले अस तर तुला वाटत नाही ना? तू मला जवळ घेणार नसशील तर मला जगण्यात काहीच अर्थ नाही, त्या पेक्षा मी मेले तर तू ही सुटशील.” ते ऐकून शेखर तिच्यावर रागावला, “मेधा प्लिज आधीच मी या प्रकरणाने हैराण आहे, प्लिज समजून घे. आधी यातून बाहेर कसे पडायचे त्याचा विचार कर, मगाशी मी तुझ्याशी खोटं बोललो,अभयचा फोन आला होता.
मी त्याला सांगितले,त्याचा योग्य तो त्यांनी विचार करावा,अन्यथा —”
तिने शेखरला मिठी मारली,”शेखर मला वाटलंच त्याचाच फोन असेल म्हणून, त्याने मला धमकी दिली होती की मी तुला संपवेन मगच जाईन. मला भीती वाटते,आता काय होईल? अभयने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं तर पोलीस आपल्या पर्यंत पोचणारच.” “त्याने स्वतःच काही बर वाईट केलं तर कदाचित पोचतीलही, तू त्याच दिवशी घडला प्रकार मला सांगितला असता तर बरं झालं असतं, त्याला तेव्हाच पोलिसांच्या ताब्यात दिला असता. आता मन खंबीर कर, जे काही व्हायचं असेल ते होईल, घाबरून चालणार नाही.” “अरे शेखर, आपली इज्जत जाईल, लोकांना तोंड दाखवता येणार नाही.” “Medha it’s too late now. आता तसं ही काही राहीलं नाही. आपण शांत राहून काय होतंय हे पाहण्यात शहाणपण आहे.”
“प्रत्येक दिवस डोक्यावर ताण घेऊन दोघे जगत होते,आज नक्की काय ऐकू येईल आणि कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल याचे दडपण होते. मेधाला जेवण करावे अस वाटेना, केलं तर जेवावं असं वाटेना. बेल वाजली तरी भितीने अंगावर काटा उभा रहात होता. या भितीच्या ताणाने
वेड लागेल असही तिला वाटत होतं. चार दिवस गेले.
डॉक्टर त्रिवेदी मॅडमची आज appointment होती, ती तयार झाली. शेखर office मधून परस्पर हॉस्पिटलमध्ये येणार होता. ती बरोबर तीन वाजता पोचली. शेखर तिची वाट पाहत होता. रeceptionist ने त्यांचे नाव विचारून मॅडमना फोन केला. तासाभरात त्यांना आत घेतले, तिची तपासणी करून मॅडमनी तिला अँडमिट करून घेतले. शेखर बाहेर बसून पेपर चाळत राहिला. संध्याकाळी सात वाजता, मॅडमनी शेखरला consulting room मध्ये बोलावून घेतले, काही antibiotic लिहून दिल्या आणि बिल दिले. अवघ्या चार तासाचे मॅडमनी वीस हजार चार्ज केले होते. त्याने बिल पे केले आणि दोघ बाहेर पडली, आठ दिवसांनी पुन्हा त्यांनी तपासणीसाठी बोलावलं होतं.
ते दोघे बाहेर पडले, शेखरने तिचा हात हाती घेत विचारलं, “कसं वाटतंय तुला? चक्कर वगैरे आल्या सारख वाटत नाही ना?” तिच्या डोक्यावरचा ताण कमी झाला असावा, ती मलूल झाली होती. तिने मानेनेच बरं असल्याचा निर्वाळा दिला. दोघ रस्त्यावर आली. मेडिकल स्टोर मधून औषधे घेऊन ते रिक्षाने घरी आले. त्याने तिला बेडरूममध्ये सोडून आराम करायला सांगितले. स्वतः चहा करून तो तिच्यासाठी घेऊन आला, “मेधा हा चहा घे आणि पडून राहा. तुझ्यासाठी आता विषय संपला आहे. गेल्या चार दिवसात त्यांनी एकदाही फोन केला नाही, तो आपल्यासाठी मेला, आपण त्याची चौकशी करायची गरज नाही.” रात्री त्यांनी वरण भात केलं आणि ती नको नको म्हणत असताना तिला खायला लावलं. सगळं आवरून तो तिच्या बाजूला येऊन बसला. या प्रसंगामुळे कामावर लक्ष लागत नव्हतं. सारखा तिच्याशी झोंबणारा अभय डोळ्यासमोर यायचा. मनाला शांती नव्हती. पण मेधासाठी त्याला सगळं सहन करावा लागत होतं. तो चुकूनही काही बोलला तर त्याचा परिणाम वाईट होण्यास वेळ लागणार नव्हता. त्यांनी तिची समजूत काढत म्हटलं, “हे बघ तुझ्यावरच संकट टळलं, आता उगाच चिंता करू नको. त्याचा फोन आला तरी घेऊ नको,अरे हो! मी तो already block करून ठेवला आहे.” “शेखर तू तो ब्लॉक केलास तर कोणालाही संशय येईल. त्यापेक्षा तो आहे तसाच ठेव, मी नाही उचलणार.”
“बघ काळजी घे. रागाच्या भरात काही बोलू नको,आणि हो आय होल मधून पाहून खात्री केल्याशिवाय दार उघडू नको. मी काय म्हणालो कळतंय ना?”
दुसऱ्या दिवशी पासून ती नेहमी प्रमाणे सगळं करू लागली, तिला थोडा थकवा जाणवत होता पण शेखर सुट्टी घेऊ शकत नव्हता. तिला घरात भीती वाटू लागली. कोणाच्या दाराचा आवाज आला तरी छातीत धडधडत होऊ लागली. रोज ती शेखरला म्हणे, “शेखर मला भीती वाटते, आज तू घरी राहा.” कशीबशी समजूत काढून तो ऑफिसमध्ये जात होता.तिला दर दोन तासांनी फोन करून चौकशी करत होता.
असेच चार सहा दिवस गेले तशी तिची भीती कमी झाली. आणि एक दिवस ध्यानी मनी नसतांना आणि शेखर घरी नसताना अनोळखी नंबर वरून फोन आला, तिने तो घेतला नाही पण पुन्हा पुन्हा फोन येत होता.अगदी नाईलाज म्हणून तिने फोन घेतला तेव्हा पलीकडच्या व्यक्तीने सांगितले की ते बांद्रा रेल्वे पोलीस स्टेशनमधून बोलत असून अभय पटवर्धन नावाचा इसम आताच धावत्या गाडीतून पडून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मोबाईलवर हा नंबर मिळाला म्हणून फोन केला. सदर इसम तुमच्या परिचयाचे असतील तर तुम्ही तातडीने रेल्वे पोलीस ठाण्यात या. तिने ते ऐकून जोराने हंबरडा फोडला, “कसे आहेत ते? वाचतील ना? फार वाईट झालं हो, ते माझे दिर आहेत, मी आमच्या ह्यांना कळवते ते येतील तिथे,त्यांना वाचवता येणार नाही का हो?”
“मॅडम समजून घ्या त्यांचं on the spot death झालं आहे. तस खरं सांगायचं नसतं पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो. आम्ही आपली वाट पाहतो. आलात की ह्याच नंबरवर फोन करा.”
क्षणभर तिला कळेना,आपल्याच फोनवर, फोन कसा आला? खरं तर ती त्यामुळे घाबरली, पण आता पर्याय नव्हता. तिने शेखरला फोन करून आलेल्या फोन बद्दल माहिती दिली. त्याने तिला ओरडून विचारलं, “काय म्हणतेस ?अभयचा accident झाला! कधी? कुठे?”
“अरे ! फोनवर या सगळ्या गोष्टी कुणी सांगत का? मी तुला त्या पोलिसांचा फोन नंबर पाठवते तू जा आणि काय ते पहा, आणि मला काय झाले ते कळव. उगाचच काही बोलू नको.कळतंय ना?” त्याने होकार भरला,तो बॉसला भेटला घडलेला प्रकार त्यांनी सांगितला.ऑफिसमधून सुट्टी टाकून निघाला, निघतांना त्याच्या सोबत ऑफिसमधील दोन सहकारी होते.त्यांनी त्याला धीर दिला. बांद्रा स्टेशनवर पोचताच त्यांनी मेधाने दिलेल्या नंबरवर फोन केला,” हॅलो!
साहेब मी अभयचा भाऊ बोलतोय आपल्याला कुठे भेटायचं?” त्या पोलीस दादांनी एक नंबर प्लॅटफॉर्मवर ज्या रूममध्ये अभयची डेड बॉडी ठेवली होती त्याची खूण सांगितली.
शेखर तिथे पोचला, पोलीस त्या रूम बाहेर उभा होता, शेखरला पाहताच त्यांनी त्याला एक खोलीत नेले. तिथे स्ट्रेचरवर बॉडी झाकून ठेवली होती. पोलीस दादांनी वरचा कपडा दूर करताच अभयचा छिन्नविच्छिन्न चेहरा त्याला दिसला, त्याने जोराने टाहो फोडला, “अभय काय झालं र हे? अण्णांना काय सांगू, अभयsss, बोल ना,बोलत का नाहीस? आई कसं सहन करेल हे,अभय नको ना जाऊस”
त्याच आक्रंदन पाहून पोलीसाच काळीज हललं,”साहेब फार वाईट झाल,तुमचा सख्खा भाऊ होता का?” त्यांनी होकारार्थी मान हलवली. सगळंच विचित्र घडल होत. तो पोलीस त्याची समजूत घालत होता. “घडणारं घडून गेलं, पाठी असतील त्यांना भोगावे लागते. या मुलांना सांगून उपयोगी नाही लोकलच्या बाहेर उभं राहण्यात काय गंमत वाटते ईश्वर जाणे. आमचे साहेब राऊंड ला गेलेत येतील इतक्यात” थोड्या वेळाने शेखरला ड्यूटी ऑफिसरने बोलावलं, त्याची माहिती त्याच्या हस्ताक्षरात लिहून घेतली,मग प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, “तुम्ही कुठे काम करता? राहता कुठे? तुमच्या ऑफिसची वेळ काय आहे? घरून ऑफिसला कधी निघता? तुमचा भाऊ तुमच्याकडे रहात नव्हते का? ते अचानक इथे का राहायला आले? शेवटचा फोन तुम्ही कधी केला होता? काय बोलणं झालं होतं? एक ना दोन.
प्रश्न विचारून पोलीस निरीक्षकानीं भंडावून सोडलं पण शेखरने डोकं थंड ठेऊन माहिती दिली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या ऑफिसरने अभयचा मोबाईल ड्रॉवरमधुन काढून त्याच्या समोर धरला आणि म्हणाला हा मोबाईल त्यांच्या खिशात सापडला,आम्ही तो तपासला आज त्यांचा कुणालाच फोन नव्हता पण काल सकाळी ते कोणाशीतरी फोनवर बोलले असावेत, हा फोन नंबर कोणाचा आहे?”
शेखर क्षणभर चपापला पण सावरत म्हणाला,” हा,नंबर माझाच आहे दर दोन तीन दिवसांनी मी किंवा तो एकमेकांची चौकशी करत होतो, तो रहेजाला MBA करत होता. परीक्षा जवळ आली म्हणून होस्टेलवर रहात होता.”
पोलीस ऑफिसर त्याच्याकडे पहात म्हणाला,”त्याचे मित्र कोण याची काही माहिती, किंवा कधी तो काही बोलला का तुमच्याशी?” “नाही.आम्ही कधीतरी त्याच्या अभ्यासा विषयी बोलायचो पण मित्र कोण किंवा अन्य विषयांवर फारशी चर्चा होत नव्हती.” “बरं तुम्हांला या अपघाताबद्दल कोणाचा संशय वगैरे काही वाटतो का?” “नाही हो ,माझा भाऊ शांत स्वभावाचा होता, MBA होऊन चांगलं करिअर करायचं हा त्याचा ध्यास होता त्यामुळे अभ्यासात तो बिझी असायचा उगाचच कोणाशी मैत्री करायला त्याला वेळही नसावा.”
“तुमचं स्टेटमेंट आम्ही लिहून घेतलंय, आकस्मिक अपघात हे तर दिसतं आहेच, पण तुमची काही हरकत नसेल तर पोस्ट मार्टम करावं म्हणजे त्यांच्या मृत्यूच कारण समजेल,चालेल ना?” “साहेबsss, माझा भाऊ आता या जगात नाही,या पेक्षा दुःख ते काय असेल! जर खरंच गरजेच असेल तर तुम्ही जरूर पोस्ट मार्टम करा पण माझी विनंती आहे अजून त्या शरीराचे हाल नको.” “पटवर्धन, पोस्टमार्टम करावंच लागतं, आज तुमचं भले काही म्हणणं नसेल पण उद्या काही भानगड उद्भवली तर कोर्टाच्या फेऱ्या कोण मारणार? काय फार वेळ नाही लागणार? भाभात सोय आहे तासाभरात बॉडी मिळून जाईल. तुम्ही फक्त गाडी सोबत जा. आणि तुमच्याकडे असेल तर मयताचं आधार कार्ड झेरॉक्स सोबत न्या.” इलाज नव्हता. त्या अधिकाऱ्यांनी कोण्या हवालदारला हाक मारली आणि ambulance बोलावून घेतली. पंधरा मिनिटात ते भाभा हॉस्पिटलमध्ये पोचले, तिथे अगोदर आलेल्या दोन बॉडी ठेवल्या होत्या, अर्धा पाऊण तास झाला तरी कोणी दखल घेत नव्हते. त्याची अस्वस्थता वाढत होती ते पाहून हॉस्पिटलचा एक शिपाई जवळ आला आणि शेखरला बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, “साहेब तुमचं काम संध्याकाळ शिवाय होणार नाही, रात्रपण होईल, पहा काही तोड पाणी करता का? लवकर नंबर लावतो.” अडला हरी गाढवाचे पाय धरी,अगदी नाईलाज झाला, शेखरने विचारले
“ओ भाऊ,किती घेणार?” तो म्हणाला,”तीन हजार.”
शेखरला काय बोलावं सुचेना, तो म्हणाला,”माझा भाऊ वारला तो तर परत येणार नाही, तीन हजार जास्त नाही का होत?” शिपाई वस्ताद होता,म्हणाला,अहो आम्हाला किती सहन करावे लागते तुम्हाला माहित आहे का? हे पैसे मी काय एकटा खाणार आहे का? सायबांचा वाटा असतो. शिवाय रात्रभर बॉडी इथेच ठेवावी लागेल, चालेल का? बघा तुमची मर्जी.”
शेखरला प्रचंड राग आला वाटलं दोन चार मुस्कटात ठेवून द्याव्या, पण तिथे मेधाची काय अवस्था झाली असेल ते आठवलं आणि त्यांनी गयावया करत म्हटलं, “भाऊ, दीड देतो की. माझ्याकडे जास्त पैसे नाही आहेत.” शिपाई म्हणाला, “गुगल पे करा मी नंबर सांगतो.” शेखर म्हणाला, “माझ्याकडे गुगल पे नाही.” “काय राव गरिबांची थट्टा करता काय? बघा कसे द्यायचे तो प्रश्न तुमचा.”
आता हद्द झाली,इलाज नव्हता, मेलेल्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय? ते आज समजलं. शेवटी दोन हजारात तडजोड झाली आणि तासाभरात सुटका झाली. अभयच्या वाईट कर्माने मेल्या नंतरही छळ संपवला नव्हता. शेवटी तासाभराने बॉडी आणि रिपोर्ट ताब्यात आला. नरक यातना म्हणजे काय त्याचा अनुभव आला. तो पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आला. मित्र वाट पहात थांबले होते, तर एक सहकाऱ्याला लवकर घरी जायचे होते. त्याच्या एकंदरीत अविर्भावावरून लक्षात येत होते. शेखर त्याला म्हणाला,गायकवाड घाई असेल तर तुम्ही जा, हे दोघे आहेत सोबत. पडत्या फळाची आज्ञा मानून तो नमस्कार करून निघून गेला. माणूस ओळखावा तो संकटात हे तेव्हा पटले.
पोलीस निरीक्षकांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट झेरॉक्स घेतली आणि डोळ्याखालून घातली, serious injury and brain hemorrhage त्यांनी तो रिमार्क पेनाने अंडर लाईन केला. “पटवर्धन, हा रिमार्क महत्वाचा आहे.ठीक आहे मी साहेबांशी बोलून घेतो मग तुम्ही बॉडी घेऊन जा.”
त्या साहेबांनी कुणाशी तरी फोन केला, बहुदा वरिष्ठ अधिकारी असावेत, मग त्याच्याकडे पहात म्हणाले, “ठीक आहे या FIR वर लिहून द्या की या अपघाता बाबत आमचा कुणावरही संशय नाही.” शेखरने त्या पेपरवरती साहेब म्हणाले त्या प्रमाणे लिहून दिले. पोलीस अधिकाऱ्यांनी, रजिस्टर वर नोंद करून त्याची सही घेतली? मग त्याला म्हणाले, “ठीक आहे तुम्ही बॉडी नेऊ शकता, या अपघाताचे तुम्ही ₹३५००/ भरून पावती घेऊन या आणि बॉडी नेण्यासाठी कपडा आणा, तो पर्यंत मी पेपर तयार करतो. तुमच्या मदतीला कोणी मित्र आले असतील ना,नसतील तर तुम्ही बोलावू शकता.”
शेखरचे आपल्या ऑफिसमधील मित्र त्याच्या सोबत होते. भावाचा अपघात घडला आणि त्याला बायकोने फोन करून कळवले असा घडला प्रकार त्यांनी सहकाऱ्यांना सांगितला होता. ते गेले दोन तास बाहेर उभे होते. पोलीस स्टेशन मधील चौकशी पूर्ण होता होता त्याला अण्णांचा फोन आला तस त्याने पुन्हा रडत रडत सगळा प्रकार सांगितला आणि मोठं मोठ्यांनी तो रडू लागला, एक हवालदार येऊन समजूत काढत म्हणाला, “या तरुण मुलांना हेच तर कळत नाही ना,उगाच दारावर लटकत राहतात आणि जीव घालवून बसतात, पाठी राहील त्याला दुःख ,त्यांचं काय? ते निघून जातात. साहेब कोणाचा फोन होता?” “आमचे वडील, अण्णा, त्यांचं काय झालं असेल, आमची आई रडून वेडी होईल फार जीव होता हो याच्यावर.”
“आता मरण काय कोणाच्या हाती असतंय होय,फार वाईट झालं, कुणी कडचे तुमी?” “आम्ही सांगलीचे,पटवर्धन वाड्या जवळ राहतो. आमची आई फार हळवी आहे हो! ती हे दुःख कशी सहन करेल? तिला कोण समजावेल?” “हे रेल्वेच्या अपघातच लय वाईट असतंय हो, chance न्हाईच वाचण्याचा. बरं मी काय म्हणतो,ती कापडं आणून देव का,तेवढी खोटी वाचेल, आणायची असतील तर दोन हजार देऊन ठेवा, उरतील ते तुम्हांसनी देतो.” शेखरने पैसे काढून त्या हवालदारच्या हाती ठेवले. तो कापड आणायला निघून गेला. थोडया वेळाने पहिला हवालदार आला शेखरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “त्यांना Ambulance ने नेणार असाल तर ambulance सांगायची का?”
शेखरने मान डोलवली, तो पोलीस निघून गेला.
थोड्या वेळात ऑफिसमधले मित्र तिथे आले, “शेखर, काही मदत हवी का?” त्यांना पाहताच शेखरचे डोळे भरून आले, त्याला पुन्हा रडू कोसळलं, त्यांनी शेखरची समजूत काढली. अर्ध्या तासाने अभयची बॉडी बांधून तयार झाली, ambulance आली आणि दोन accident हमालानी बॉडी गाडीत ठेवली. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती त्यांनी बोलावून घेतलं. “हे तुमच्या भावाचे वॉलेट आणि हा मोबाईल. तुम्हाला मिळाल्याचे लिहून द्या. हो! काही भविष्यात चौकशी करावीशी वाटली तर सहकार्य करा, नाहीतर लोक मदत केल्याचं विसरूनही जातात.”
“अस कस साहेब, तुम्ही जबाबदारी घेऊन सहकार्य केलं तुमचे आभार आहेतच. कधीही फोन करा.” “लोक आभार मानण्यात चुकत नाहीत, पण आम्हाला किती मेहनत पडली ते पहातही नाहीत.”त्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक जण म्हणाला.
त्यांच बोलण शेखरच्या मित्राच्या लक्षात आलं, त्यानी पाचशेच्या काही नोटा काढून त्यातील अधिकाऱ्याच्या हाती ठेवल्या. “साहेब हे आपल्या सहकार्याबद्दल.” “अहो हे कशाला? आम्ही कोणाकडून काही घेत नाही,आमचं काम आहे हे, हे पैसे ठेवा.तुम्ही Thanks म्हणालात तेच खूप आहे.” “राहू दे हो साहेब, मग आम्ही आता निघू ना,एकदा ट्राफिक लागला की पुन्हा उशीर होईल.”मित्र म्हणाला.
“हो हो निघा,पटवर्धन सगळे पेपर घेतले ना? ओरिजिनल कुणाला देऊ नका, तुम्हाला लागू शकतात.” शेखरचे डोळे पुन्हा भरून आले,”साहेब येतो, मदती बद्दल धन्यवाद.अशी पाळी कुणावर येऊ नये, माझे वडील येतील त्यांना काय सांगणार? या मुंबईने त्यांचा एक मुलगा खाऊन टाकला.” त्याला हुंदका अनावर झाला. पोलीस निरीक्षकानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला,”पटवर्धन,नियती क्रूर असते ,आपला मृत्यू कुठे? कसा? होईल कोणाला माहीत असते का?
सावरा आता, तुम्हालाच सगळं करावं लागेल.” ते पोलीस स्टेशन बाहेर पडले, ambulance आवाज करत निघाली. दहा मिनिटात व्हॅन BKC मधून बाहेर पडून मार्गाला लागली.
मुलुंडला मेधा पलंगावर निपचित पडली होती आणि त्यांच्या माळ्यावरील अय्यर मॅडम तिला वारा घालत होती. बदलापूर वरून शेखरचा मावस भाऊ विशाल देशमुख आला होता आणि त्यांनी बिल्डिंग मधील लोकांच्या मदतीने पुढील तयारी सुरू केली होती.
लिखाण छान आहे.विषय न पटणारा आहे.
The desired locale has been saved to your browser. To change the locale in this browser again, select another locale on this screen.
The desired locale has been saved to your browser. To change the locale in this browser again, select another locale on this screen.