त्या निसरड्या वाटेवर भाग 4
सांगली वरून पटवर्धन फॅमीली इतक्या झटपट येण शक्य नव्हतं आणि accident केस असल्याने बॉडी जास्त वेळ घरी ठेवण शक्य नव्हतं. Ambulance रस्त्याला लागताच शेखरने मेधाला फोन लावला पण बराच वेळ ती उचलेना, त्यामुळे तो काळजीत पडला, कधी एकदा घरी पोचतो असे त्याचे होऊन गेले. मनात नको ती शंका येऊ लागली. घरी
तेथील पोलीस गेले नसावेत ना? त्यांनी मेधाला काही उलट सुलट विचारलं नसावं ना? एक ना दोन. मनातील विचारांची भूतं नाचू लागली की अन्य विचार कसे सुचणार? दोन मित्र सोबत होते. त्यांनी आपल्या बँगेतून पाण्याची बाटली काढून त्याला पाणी दिले, तस तो घटा घटा पाणी प्यायला. मित्र त्याला भावा विषयी माहिती विचारत होते, तो शक्य ते टाळून माहिती सांगत होता. पटवर्धन, वेळ खराब असली की काहीही होत, तुमचा भाऊ तुमच्याकडे रहात होता त्याचं अस घडण नशिबात होतं म्हणून त्याला घर सोडून होस्टेलवर राहायची इच्छा झाली. होस्टेलवर फोन करून कळवलं पाहिजे हो, नाहितर ते पोलीस कंप्लेंट करतील आणि नाहक त्रास सहन करावा लागेल. मोबाईल नंबर देता का ?” “माझ्याकडे नाही, होस्टेलवर जाऊन आठ दहाच दिवस झाले होते म्हणून नाही घेतला, पण बहुतेक त्याच्या मोबाईलवर असेल, मी पाहतो.”
त्यांनी मोबाईल स्क्रीन ओपन करण्याचा प्रयत्न केला पण स्क्रीन ओपन होईना. शेवटी त्यांनी प्रयत्न सोडून दिला. त्याचा पासवर्ड माहिती नाही. त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटल, पोलीसांनी त्याचा फोन वापरून त्या फोन वरूनच मेधाला कॉल केला होता. त्यांना मात्र तो ओपन होत नव्हता. ते मुलुंडला पोचले, तो रहात असलेल्या सोसायटीच्या तळाला बरीच गर्दी जमा झाली होती. ती गर्दी पाहून शेखरच्या पायाला कंप सुटला, काय झालं असावं कळायला मार्ग नव्हता. घाई गर्दीत तो ambulance मधून खाली उतरला. त्याला पाहताच विशाल लगबगीने त्याच्याकडे आला. “अरे वाहिनीची शुद्ध हरपली होती.आता बरी आहे. तुझी वाट पहात आहे.सांगलीवरून मावशी आणि अण्णा यायला निघाले आहेत.” “बरं, तिची तब्येय ठीक आहे ना? विशाल बॉडी खाली घ्यावी लागेल. काय करू या, घरात हॉलमध्ये न्यायची की व्हरांड्यात ठेवूया?”
“शेखर आधी तू वहिनींना भेटून ये, मग कस काय करायच ते ठरवू. इकडची व्यवस्था आम्ही पाहतो, तू जा, वहिनींना समजव. नाहीतर तिथे उगाच गडबड होईल.” शेखरला पाहताच मेधाने पुन्हा जोराने रडायला सुरवात केली, त्याने तिच्या जवळ जात तिला समजवण्याचा प्रयत्न केला, “मेधा, आपला अभय आपल्याला सोडून गेला, पण तू अशी खचून गेलीस तर मी काय करू. जे घडलं ते खूप वाईट पण आता तो परत येणार आहे का? थोडी शांत हो. त्याच सगळं करायला हवं. अण्णाना धीर दयायला हवा.” मेधा म्हणाली “शेखर ,अण्णांचा फोन येऊन गेला,ते अर्ध्या मार्गात असतील, त्यांच्याशी बोल, त्यांची वाट न पाहता अग्नी दिला तर तुला रागावतील.”
शेखरने बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर फोन लागला, अण्णा अद्यापही पुण्यातच होते, वाटेत एक ट्रक accident झाला होता आणि अण्णांना उशीर होणार होता. शेखर त्यांना म्हणाला, अण्णा इथे सोसायटीमधले लोक जमले आहेत, थांबता येणार नाही, काय करू तुम्ही प्लिज आईला समजवा.” अण्णांचा होकार मिळताच त्याने विशालला तसे कळवले. जवळचे दोन तीन नातेवाईक आले होते आणि प्रत्येक वेळेस मेधा त्यांना तीच गोष्ट सांगून थकून गेली होती.
सोसायटी मधील लोकांनी तयारी केली होती, उपचार म्हणून दोघानी अभयचे पाय धुतले, त्याच्या मुखात तुळशीने पाणी घातले, हार घातला. त्यांच्या पाठोपाठ इतरांनी आणलेली फुले, हार घातले शेखरने मडके धरले आणि अंत्ययात्रा निघाली. मेधाचे डोळे भरून आले. काय घडले ते आठवून तिला खूप वाईट वाटले. प्रेतयात्रा निघून गेली आणि सोसायटी मधील महिला भेटायला आल्या. शेजारच्या अय्यर काकू देखील तिच्या बाजूला बसल्या होत्या. तो दिसायला हँडसम होता, रोज फक्त येता जाता दिसायचा,”भाभीके साथ अच्छा रिलेशन था, बहुत कम उम्र मे गया”,अस जीला जे वाटेल ते बोलत होत्या. कोणी,” उमर क्या थी ? तर कोणी,” अच्छा पढ रहा था क्या?” “खुदखुशी तो नाही की ना?”, अस मनाला येईल ते विचारत होत्या. ती या सगळ्याला कंटाळली होती. सकाळ पासून काही पोटात नव्हते. अय्यर अंटीने चहा आणून दिला होता.
शेखर येईपर्यंत या सोसायटीच्या सगळ्या महिला छळणार हे पाहून तिची वाईट अवस्था झाली होती. वॉशरूमला जायचं होतं पण जमलेल्या महिलांच्या तोंडाची टकळी सुरू होती. शेवटी ती अय्यर आंटीला म्हणाली, “आंटी, मै वॉशरुम होके आती हू.” तशा हळूहळू एक एक उठून जायला लागल्या. ती परत आली तेव्हा विशालची बायको, स्मिता आणि अय्यर आंटी बसल्या होत्या. स्मितानेच तिला सांगितले, “वहिनी तू जाऊन आता आंघोळ कर, शेखर दादाला पाणी तापवून ठेव तो ही दिवस भर पळापळ करून थकला असेल. आले तर अण्णा काका येतील,तुझे नानाही येतील, मग पुन्हा गडबड होईल. मी तुमच्यासाठी पिठलं भात करते, सकाळ पासून तू उपाशी आहेस.थोडा चहा देऊ का?” मेधाने मानेनेच नकार दिला आणि ती अंघोळीला गेली. अय्यर आंटी निघून गेली. स्मिता किचनमध्ये गेली,डबे शोधून तिने कुकर लावला. कांदा चिरून ठेवला. मेधासाठी चहा ठेवला.
मेधा अंघोळ आटोपून आली तेव्हा तिला चहा दिला, स्वतः घेतला. “हे बघ वहिनी अभय गेला फार वाईट झाले, शेखर दादावरती नको तो प्रसंग आला आहे पण आता तुझं मन घट्ट कर. तूच शेखर दादाला आधार द्यायला पाहिजे, सावरलं पाहिजे. शेखर दादा आज पूर्ण थकला असेल, अण्णा आणि मावशी प्रवास करून दमलेले असणार, त्यांची समजूत घाल. विशेषतः मावशींना सांभाळ त्यांचा मुलगा अकस्मात गेला आहे. किती वाईट वाटत असेल? ,किती दुःख झालं असेल?त्यांना थोडा वरण भात जेवायला घाल, ते नको म्हणाले तरी दे. त्यांची काळजी घे.
तासाभराने शेखर, विशाल आणि सोसायटीमधले शेजारी आले,अय्यर अंकल त्याला घेऊन आले. “Mr. Patwardhan what happened is very painful, I can understand your sorrows and fillings.
Now you have to be calm,take a bath and rest for some time,you have to stand firm behind your father. You have to support your mother.If you need any help knock my door.” त्यांनी पाठीवरून हात फिरवला. त्यांच्या बरोबर सोसायटी मधील इतरही पाच सहा शेजारी होते. प्रत्येकांनी त्याचा हात हाती घेत रजा घेतली.
विशाल त्याला म्हणाला,”शेखर तू अंघोळ करून घे,साडेदहा वाजत आले. मी अण्णा कुठपर्यंत पोचले विचारून घेतो. वहिनी याला चांगलं गरम पाणी काढ.” स्मिताने त्याला चहा आणून दिला. शेखर आंघोळीला गेला. विशालने अण्णांना फोन लावला होता, त्याचं बोलणं सुरू होत, तो मेधाकडे पहात म्हणाला, “वहिनी मावशी ऐरोली पर्यंत आली आहे म्हणजे फार तर अर्ध्या तासात पोचतील, अण्णा येण्यापूर्वी तुम्ही काहीतरी जेवण तयार करून घ्या.”
स्मिता त्याला म्हणाली, “अरे मी वरणभात आणि पिठलं तयार करून ठेवलं आहे,मला कळतंय की त्यांची स्थिती काय असेल, मला वाटत आपण आता मावशीला भेटूनच जावं तेच बर. उद्या पुन्हा धावपळीत येता येईल की नाही सांगता येणार नाही.” शेखर त्याच आवरून आला,तस स्मिताने त्याला चहा आणून दिला, “दादा चहा घ्या, थोडं बरं वाटेल.” अभय चहा घेत होता, काय बोलावं कोणाला सुचत नव्हतं, शेखर या धक्यातून सावरला नव्हता. विशाल त्याच्या बाजूलाच बसला होता.
ती शांतता स्मिताला अस्वस्थ करत असावी ती म्हणाली, “मला खरंच कळत नाही, इथे चांगली सोय असताना अभय तिथे कशाला राहायला गेला? काय अडलं होत?” विशाल म्हणाला,”अग त्याची परीक्षा जवळ आली होती ना? वाटलं असेल मित्र मित्र मिळून अभ्यास करतील, वेळ आली की बुद्धी सुचते. आता त्या दिवशी सकाळी दहाला कुठे जात होता त्याच त्यालाच माहिती.”
शेखरला या चर्चेचा कंटाळा आला होता पण मेधा म्हणाली थोड्या वेळात अण्णा पोचतील म्हणूनच त्याचा नाईलाज झाला होता. सकाळची घटना आठवली की त्याच मन अस्वस्थ होत होतं. हे सर्व कस घडलं? एवढा धीर आला कुठून? काहीच तर सुचत नव्हतं. गाडीचा ब्रेक दाबल्याचा आवाज आला तसा तो दाराकडे गेला, अण्णा, सुहास काका, काकू आणि आई गाडीतून उतरल्याचे त्यानी पाहिले आणि त्याचा धीर खचला, आपण आई आणि अण्णांचे गुन्हेगार आहोत या वयात त्यांना आपल्यामुळे नको ते पाहावं लागलं याची खंत त्याला वाटू लागली.
अण्णा त्याच्या पर्यंत येता येताच वाटेतच बसले,आईची अवस्था तशीच होती, तिने तोंडाला पदर लावून रडायला सुरवात केली. त्यांनी कसेबसे अण्णांना घरात नेले. आई त्याचा हात ओढत म्हणाली, “शेखर तुझ्या भरवशावर त्याला मुंबईत पाठवले होते, त्याच अस कसं झालं? तो तिथे होस्टेलवर राहायला गेला, तू त्याला जाऊ दिलंच कसं? आता मी काय करू? मेधा, पोरी तू तरी त्याला समजवायच होतं, आमच्या आधी तो गेला. देवा त्याच्या ऐवजी मला न्यायचं होत. मला का पाठी ठेवलंस?” आठवण होईल तस ती रडत होती,त्याच्या गोष्टी सांगत होती.त्यांनी आईला फोन करून, आपण होस्टेलवर राहायला जात आहोत आणि अण्णांना थोडे जास्त पैसे माझ्या अकाउंट मध्ये टाकायाला सांग, अस बोलणं केलं होतं.
मेधा सासूच्या शेजारी बसली होती पण काय बोलावे? कसे सांत्वन करावे? तिला कळत नव्हते. काकू सासूची समजूत घालत होती, “ताई फार वाईट घडलं हो, पण त्याला बिचारा शेखर तरी काय करणार? त्याला कुठे माहीत होते की असा वाईट प्रसंग त्याच्या वाट्याला येईल? देव महाविचित्र आहे,तरण्या ताठ्या मुलाला घेऊन गेला,भोग भोगायला आपल्याला पाठी ठेवलं आहे.” सुहास काका,विशालला घडल्या प्रसंगाबद्दल विचारत होता,शेखरला कळत नव्हते, लोक दुःख हलकं करायला येतात की दुःखाचे धागे मोकळे करायला येतात. तीच तीच गोष्ट सांगणार तरी किती वेळा? काकाने शेखरकडे पाहिलं, दिवसभराच्या थकाव्याने तो गळल्या प्रमाणे दिसत होता.
स्मिताने त्यांना चहा आणून दिला,कोणी चहा घ्यायला तयार नव्हतं, स्मिताने बळे बळेच मावशीला चहा पाजला.तीच दुःख खरेच डोंगरा एवढे होत, पुन्हा पुन्हा हुंदका येत होता, स्मिता तिला म्हणाली “मावशी आता विसरण्याचा प्रयत्न करायला हवा. शेखर दादाने सकाळी खूप काही भोगलं आहे, त्याला आराम मिळण्याची गरज आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा रडत राहिलात तर त्यांनी काय करावं? आता तुम्ही सर्वांनी हात पाय धुवून घ्या, मी तुम्हाला दोन घास वाढते ते खा आणि थोडं झोपा म्हणजे जीवाला आराम मिळेल.”
मावशी पुन्हा जोराने रडू लागली,”पोरी माझा लहान मुलगा अचानक मला सोडून गेला. आता कसलं जेवण आणि कसलं काय? त्याच्या शिवाय मी एकटी कशी जेवणार? मला धीर होईल का? कोणती आई एकटी जेवेल ग!” सुहास काकाच मदतीला आला, “वहिनी अस कांय करताय बरं? दादा तूच सांग वहिनींना, ती पोरं बिचारी पूर्ण दिवस उपाशी आहेत, गेला तो परत येणार आहे का? आता तुम्ही समजून घ्यायला हवं. दोन, दोन घास खाऊन घ्या, बारा वाजत आले, विशालला बदलापूरला जायचं आहे.” त्यांनी तिला समजावलं, “सुमन जा बघू हातपाय धू, वहिनी हिला घेऊन जा तिथे, काय करणार आता नशिबी आलं त्याला सामोरं गेलं पाहिजे.” पटवर्धनांनी आपल्या पत्नीला समजावलं. तस शेखरची आई आणि काकू उठल्या.स्मिताने त्या सगळ्यांना जेवण वाढलं. विशाल जेवणाचं नको म्हणत होता पण आता बदलापूर गाठण्यासाठी अजून तासभर वेळ लागणार होता. मेधाने स्मिताला घाई केली. ताई तुम्ही निघा तुम्हाला गाडी मिळायला पाहिजे.
विशाल आणि स्मिता त्यांचा निरोप घेऊन निघाले.मेधानी भांडी धुवून किचनच्या सिंकमध्ये ठेऊन दिली.सगळे थकले होते. शेखरने हॉलमध्ये अंथरूण घातले. तो सर्व पाहून बेडरूममध्ये आला, मेधा त्याची वाट पहात होती.त्याला पाहताच तीने हळू आवाजात विचारले, “शेखर अभयच तू काय केलंस? मला खरं खरं सांग, मी म्हणते तसंच झालं ना?” शेखरने तिच्या तोंडावर हात ठेवला,”मेधा ! काहीतरी बोलू नकोस. त्याचा अपघात झाला, तूच तर मला कळवलं, त्याच्याशी माझा काही संबंध नाही.” “तूच तर म्हणला होतास की त्याचं काय करायचं ते मी पाहीन म्हणून, मला खरं सांग. मी म्हणते ते खरं ना. नाहीतरी माझ्याशी अस वागल्यावर त्याला जगण्याचा हक्कच नव्हता.” “गप्पं बस, उगाच काही तरी बोलू नको, भिंतीलाही कान असतात, आणि तू म्हणतेस तस मी काही केलं नाही त्याचा गाडीतून पडून अपघात झाला.” ती त्याच्याकडे पहात विचित्र हसली, “मला फसवतोस, गेले आठ दहा दिवस तू तळमळत होतास. एक दोन वेळा तू रात्री झोपेत म्हणालास देखील, अभय तू माझा प्रेमळ स्वभाव पाहिलास आता मी थंड डोक्यांने तुला कस संपवतो ते पहा.”
शेखरने तीच तोंड वाक्य पूर्ण होण्यापूर्वी दाबलं, तरी तिने वाक्य पूर्ण केलं. ते ऐकून तो हादरला.”मेधा, तुझं खर आहे, माझा नाईलाज होता. तुम्हा दोघांपैकी एकाला संपवण गरजेच होतं, तुझी प्रत्यक्ष चूक नव्हती पण तुझ्या मोकळ्या वागण्याने तू त्याला आव्हान दिलंस तिथेच त्याचा पाय घसरला. चुकीला माफी करून चालणार नव्हतं.” ती ते ऐकून हादरली,”म्हणजे? म्हणजे माझी चूक नसतांना तू मला संपवणार होतास?” “मेधा, काही गोष्टी हाता बाहेर जाण्यापूर्वी इलाज करावा लागतो. कुटुंब बरबाद होण्यापासून वाचवण्याचा अन्य मार्ग नव्हता. रक्ताची चटक लागली की बोका जीवंत कोंबडी मारून खातो अस मी ऐकल होत आणि आपण तर बुध्दीमान प्राणी म्हणून…” “शेखर, तो स्वतः घर सोडून गेला होता, तुझा सख्खा भाऊ होता. त्याला एवढी मोठी शिक्षा देण्याची गरज होती का?” “नियती क्रूर असते, तिच्याकडे, दया शब्द नसतो, असतो तो फक्त न्याय. तुला न्याय मिळाला. मला शांती मिळाली. मग उगाच विचार कसला करते? ये शांत झोप. निसरडी वाट धोकादायक असते. सावरून चाललं नाही तर खोल दरीतील मृत्यू अटळ असतो.”
मेधा भीतीने गोठली होती,शेखरच हे रूप तिला अगदी नवीन होत. ती स्फुंदून रडत होती,शेखरने तीला अलगद झोपवल आणि प्रेमाने तीच डोक थोपटत तो पडून राहीला. किती तरी वेळ ती मुसमुसत रडत होती. सकाळी मेधाला जाग आली तेव्हा शेखर तिथे नव्हता, ती थडपडत उठली तर अण्णा आणि शेखर हॉलमध्ये चहा पीत होते. तिने अण्णांना पाहिलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. बाकी मंडळी अजूनही गाढ निद्रेत होती.
दुपारी शेखर अभयच्या अस्थी घेऊन आला. अण्णा, काका, काकू आणि आई संध्याकाळी सह्याद्री पकडून अस्थीसह गेले. मेधा एका वाईट स्वप्नातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. शेखरही तणाव घेऊन दिवस ढकलत होता. तो आठवडाभर रजेवर होता. अभयचे मित्र शोध घेत भेटून गेले. त्यांनी अभयची बॅग त्याच्या सुपूर्द केली. कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी अभयची डेथ झाल्याची माहिती कॉलेजच्या रजिस्ट्रारला लेखी कळवली. ऑफिसमधले अनेक सहकारी फोन करून भेट घेऊन गेले. जे घडलं ते नियतीला मान्य असावं. एक आठवड्याने तो कामावर गेला. तिथेही अनेक सहकारी भेटून गेले. त्याच आठवड्यात अभयचे दहावे, अकरावे शनिवार, रविवारी होते. त्याला मेधासह गावी जावे लागले.
मेधा आणि शेखर खूप अस्वस्थ होते. काय सांगावे हा प्रश्न होताच. मेधाचे आई बाबा त्याच दिवशी भेटून गेले. त्यांनी मेधाला चार दिवस घरी सोडून जा अशी शेखरला विनंती केली. पण या स्थितीत मेधानेच नकार दिला. कदाचित तणावाखाली ती खरे बोलून नको त्या प्रसंगाला तोंड देण्याची पाळी आली असती. तीच म्हणाली, या वेळी शेखरला माझी जास्त गरज आहे. मग तिच्या आई बाबांनी जास्त आग्रह केला नाही. अभयचे अनेक मित्रमैत्रिणी त्यांच्या भेटीला आले, त्यांच्या भेटीचा शेखरला खूप त्रास होत होता. प्रत्येक वेळेस लोकलच्या खाली पडणारा आणि खांबावर आदळलेला अभय दृष्टीसमोर येत होता. ते सगळं त्याच्या डोळ्यासमोर घडलं होत, असह्य होत. कधीतरी वेड लागेल असं वाटत होतं.
हे कमी म्हणून की काय, आई अधून मधून, “अभय तुझ्याकडून होस्टेलवर गेला तेव्हा अडवलं का नाहीस?” असं विचारून भंडावून सोडत होती. कधीतरी, “तुझं,त्याच काही भांडण तर झालं नव्हतं ना?” अशी शंका तिने व्यक्त केली. ते तीन दिवस त्याला तीन वर्ष झाल्या सारखे वाटले. निघताना अण्णानी मिठी मारून हंबरडा फोडला, “बाळा काळजी घे, आता तूच आम्हाला आहेस, स्वतःवर लक्ष दे”
त्याच आतड पिळवटून निघालं, आता भावनेच्या भरात आपण काहीतरी बोलून जाऊ म्हणून तो निस्तब्द राहिला. रात्री त्यांनी सह्याद्री पकडली. अण्णा आणि मेधाचे बाबा नाना गाडीवर सोडायला आले होते. गाडीने प्लॅटफॉर्म सोडला आणि त्यांनी निश्वास सोडला. दोघांच्या जीवनातील एक वाईट अंक संपला होता.