दाजी
“कधी इलास? मुंबईत सगळी बरी आसत मा?” असं माझ्याकडे पहात त्यांनी विचारलं आणि ते पेळेवर बसले. मी त्यांना सर्व कुशल असल्याचं सांगितलं. त्यांच्यासाठी आणलेली भेट त्यांना दिली. मामीने त्याना स्टिलच्या पेल्यातून चहा आणून दिला. तो त्यानी दोन तीन घोटातच प्यायला. “थंडी खाता गे,सकाळी धड उठाकव जाणा नाय.” म्हणत ते हात टेकून उठण्याचा प्रयत्न करत होते. हातात अंगठ्या एवढ्या जाडीची काठी होती.
“खय जातास,आता थांबा,थोड्या वेळान पेज घालतय ती खा आणि जा. ती काय करता? सुनेक सकाळीच गाळी कित्याक घाली होती, डोक्या बिघडलाहा काय तिचा?” मामीने विचारलं.
“तुच जाऊन इचार, सकाळ धरन तोंड सुटलाहा ता थांबाक नाय, नर्मदेक बरा नाय म्हणान वाणशेत निजलीहा, तिच्या नावानं शिरा पाडता. शाण भरूक सांगता, तिका बापडीक उठूक घोपाण नाय, शाण काय भरतली?”
“तुमची बाईल म्हातारडी झाली तिका कळणा नाय? सुन मुद्दाम निजान रवात कित्याक? आता वाजले धा. तुमी तरी विचारपूस केलास काय सुनेची?” मामीने विचाऱलं. “गे! मी विचारी होतय तिका, पण पोरवता, काय येक सांगणा नाय, काय झाला कसा कळतला? ” दाजी काकूळतीला येऊन सांगत होते.
“तिचो घो खय गेलो हा? बायलेक बरा नाय त्याने जाग घेऊ नये? लोकाचा पाँर लगीन करून हाडलास, ता काय तुमची कामा करूक? तिका नजा होय झाला तर विचारूक नको? घराकडे गेलास की जाग घ्या. पैसे नसतीत तर सरकारी दवाखान्यात नेवा.” मामी रागाने बोलली.
“व्हय गे, ता काय माका कळणा नाय? झाडपाल्याचा दिला तरी बरा वाटात पण काय व्हता ता सांगल्याशीवाय औषध काय देव, खरा मा?” “तुमचो जीव थकलो हा, आता झाडपाल्याचा औषध आणतलास कुठून? औषध बघूक डोंगराक गेलास आणि थय धडपडलास तर सोधतलो कोण?” तिने काळजीने विचारल.
ते जाण्यासाठी निघाले, “गे! पेज रवांदे, घराक जातय, बघतय ती उठता काय, रमलो इतको मोठो झालो, पण अक्कल म्हणान नाय. प्रत्येक गोष्ट काय मीच सांगतलय? बाईल उठलीहा नाय त्याका नको कळाक?”
“आतापर्यंत त्याच्यावर काय सोपवलास? जय थय तुमीच जाईत रवलास. त्याका धाडतास तर तो शाणो झालो असतो, तुमीच त्याका घरकोंबडो करून ठेवलास, गोरवा राखणा, शाण भरणा , लाकुड फाटो बघणे हीच कामा करीत रवलो, कधी बाजाराक नाय, कधी तलाठ्याकडे नाय की गाव मिटींगीक नाय, कळतला कसा?” मामी म्हणाली
“आमका कोणी शिकवला?आमी मामलेदार सायबाकडे जातवच ना? आज पर्यंत शात, मेर, घरदार सगळा बगलव, अखरेकलव, कोणाची मदत होती काय? आपणच शिकाक होता. बाहेर पडूकच बघणा नाय त्याका काय करुया?”
“स्वतःचा सांगीत रवा नका , तुमका कोणतरी मदत करता. कोण तिकीट काडतत, कोण चाय देतत, उशीर झालो तर जेऊनव धाडतत, तो बापडो सरळमार्गी, कोणाशी काय बोलतत ह्या ठाऊक नाय. त्याच्या हातात पैशे नको. भायर कशाच्या आधारावर पडतलो, खय मजूरेक गेलो त इल्यावर तुमी मजूरीची पैसै मागून घेतलास त्या बापड्याकडे हा काय बाजाराक जावक?” ते निरूत्तर झाले.
काही न बोलता ते वाटेला लागले. त्यांच्या पाठमोऱ्या कृश आकृतीकडे ती पहात राहिली. चालताना दांडा धरलेला हात लटलट कापत होता. पाय निट पडत नव्हते, आता शरीर पूर्ण थकले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, कधी काळी त्या शिडशिडीत देहाची उंची सहा साडेसहा फूट होती. नांगर धरला तर सकाळच्या विरडीत चार फाळ्या नांगरून काढीत पण गेले पाच सहा वर्षे कोपऱ्यात उतरले नसावेत.
मामांची आणि त्यांची दोस्ती होती. दोघेही एकमेकांच्या मदतीला धावून येत. कुठे कचेरीत जायचे असो की बाजाराला जातांना हाक मारूनच बाहेर पडत. दोघांपैकी कुणी एकटाच कुणाच्या नजरेस पडला तर लोक विचारत आज जोडीदाराक खयं ठेऊन इलात, बरो हा मा?” ते दाद देत हसत, “बरो हा, त्याका वायच घराकडे काम हा.” तर अशी ही जोडी.
दाजी अक्षर शत्रू तर सुर्यकांत मामा शिकलेला तरी त्यांची मैत्री झाली हे थोड विचित्रच होत. खरं तर दाजी हे मामाचे कुळ होते. सुर्यकांत मामाकडे भरपूर शेती होती. एवढी शेती एकट्याला करण शक्य नव्हतं म्हणून आजोबांनी काही कुटुंबांना शेत खंडाने दिले होते त्यापैकी ते एक. कोकणी रिवाजाप्रमाणे सुर्यकांत मामा जमीन धनी होते, पण मैत्रीत त्यांनी हा विषय आणला नाही.
सत्तरच्या दशकात ‘कसेल त्याची जमीन कायदा’ आला आणि सरकारने या कुळांना आणि त्यांच्या मालकांना खरेदी-विक्रीच्या नोटीसा काढल्या. यास लेखी जबाब देऊन या जमीनी पुन्हा ताब्यात घेणे शक्य होते पण मामाने मोठ्या मनाने जमिनीची सरकारी दराने विक्री मान्य केली. विक्री कसली एक एकर जमीन दिडशे, दोनशे रूपयांना. बर हे पैसै देण्याची ऐपतही कुळांकडे नव्हती म्हणून रोख रक्कम समक्ष मिळाली अस तलाठी भाऊंसमोर लिहून दिलं आणि पंचांच्या सह्या घेतल्या.
अर्थात तेव्हा कुळ असणाऱ्या लोकांना याची जाणीव होती. ही कुळे वेळे काळाला मालकाच्या हाकेला धावून येत. “खाल्या अन्नाला जागणारी माणस होती.” आताची पिढी आपल्या मालकाला ओळखत नाहीत. जमीन मालकाचे आपल्यावर उपकार झाले असे मानत नाही. आता असणाऱ्या जमीनजुमल्यावरून घरातच तु तू मे मे होते. सख्खे भाऊ एकमेकांच्या विरूध्द कोर्टात जातात. हाताच्या शिराच उलट्या असल्यावर दुसऱ्याला दोष कसा देणार?
तर मुद्दा असा, ह्या दाजीना खेडवळ असूनही सुपारीच्या खांडाचे देखील व्यसन नव्हते. अगदी साधा, सरळ माणूस. ना छक्के पंजे ना कुणाशी वैर. नेहमी दुसऱ्याच्या मदतीस धावून जाण्याची वृत्ती. त्यामुळे त्यांना येता जाता लोक हाक मारत. कधी बाजाराला एसटीने निघाले तरी त्यांच तिकीट त्यांना कधी काढावं लागत नसे. अगदी बाजारातही कितीतरी ओळखी पाळखीची माणसे दिसत, ती प्रेमान विचारत, “रे दाजी, चाय घेतस काय? प्रेमाने खाऊ घालत. माणसाच्या आणि जनावरांच्या अनेक आजारावर काही गावठी औषध माहिती होती म्हणून या अशिक्षित माणसाला लोक आदराने, “दाजी डॉक्टर” म्हणत. बऱ्याचदा त्यांनी दिलेल्या गावठी औषधांचा गुण येत असे. गाई गुरे आजारी पडली की लोक त्यांना बोलावून नेत. धोतर आणि शर्ट अशा अवतारातील दाजींच्या बोलण्यावागण्याचं आरंभी हसू येई.
दाजी दिसायला अगदीच साधे होते, शिक्षण नसले तरी चौकस बुद्धी, धिरोदात्तपणा, हजरजबाबी पणा हे उपजत गुण होते. ग्रामसभा असेल किंवा कुणी सरकारी अधिकारी भेट द्यायला आले की ते धिराने आणि सभ्यता राखून आपली शंका विचारत, “सायबानू, येक प्रश्न विचारुचो होतो,आपली परवानगी हा काय?”
त्यांचा तो निरागस,साधा भोळा चेहरा आणि अगदी सामान्य धोतर आणि नेहरू शर्ट असा पेहराव पाहून साहेब होकार देई, मग ते आपला प्रश्न विचारत, “गेले दोन वर्षा पाऊस येरे मेरे पडता, चार अणे पिक येवक नाय आणि तरी शेतीचो दस्त मागूक कोतवाल आणि तलाठी भाऊ फिरतत, त्यांका आमी गरिबांनी दस्त खैसून देवचो? आमच्या परिस्थीतीचो विचार सायेब करतीत काय?”
प्रश्न रास्त असायचा, साहेबाला प्रश्न पडायचा, मुद्दाम भेटीसाठी आलेले साहेब उत्तर न देता गेले अशी चर्चा होणार यात वाद नव्हता. ते म्हणत “तुमचे म्हणणे लेखी द्या मी प्रांत साहेबांकडे पाठवून देतो.”
दाजी हुशार, ते म्हणत, “सायबानू, आमचा शिक्षण नाय, आमका तुमची सरकारी भाषा इली असती तर शेतीत कित्याक मेलो असतव? आमचे मायबाप तुमीच, तुमच्या खात्याक कळवलास तर काय, तुमका नाय म्हणतीत? तुमी लिवलास तरी चलात. आम्ही आंगठो उठवतव”
त्यांच्या म्हणण्याला सगळे दुजोरा देत, “होय,होय, ह्या बरोबर आसा दाजी म्हणता तसा करूया, आमी आपलो अंगाठो देव.” मग तो अर्ज साहेब आपल्या कारकूनाला लिहायला सांगत आणि त्याच्यावर सह्या होऊन तो अर्ज मार्गी लागे. साहेब मुद्दाम त्यांना बोलावून घेई त्यांची वास्तपुस्त करे त्यामुळे लोकांना त्यांचा आदर वाटे.
त्यांचा आजूबाजूच्या गावात परिचय होता, तसेच ह्या त्यांच्या सभाधीट स्वभावामुळे लोक त्यांचा आदर करीत. कधी कुठे दिसले तरी बोलावून चहा, दुपार असेल तर पेजपाणी किंवा जेवणाचा आग्रह करीत. दाजीही त्यांचं मन राखत कधी चहा तर कधी पेजेसाठी थांबून त्यांचा मान राखत.
ते अशिक्षित असले तरी कधी काळी मुंबईत गिरणगावात त्यांची पानपट्टी होती तिथ पोटापूरते ते कमवत होते. मुंबईत लोकांचा व्यवहार कसा चालतो, लोक कसे वागतात, कसे जगतात याविषयी त्यांचं बारीक निरीक्षण होतं. त्यांचे वडील वारले तेव्हा ते नाईलाजाने मुंबई सोडून गावी आले तेव्हा अवघे वीस बावीस वर्षाचे होते. बरेच वर्ष त्यांनी शेती केली, जमेल तशी लोकांना मदत केली. कोणाची गाय,म्हैस अडली अगर प्राण्याला काही इजा झाली तर अगदी रात्री उशिरा पायी जाऊन ते निशुल्क उपचार करत. लोक प्रेमाने काही भेट देत पण आपणहून त्यांनी कधी कोणाकडे काही मागितले नाही.
आता त्यांच वय झालं होतं, शरीर साथ देत नव्हतं. घरी शेती असली तरी वेळेवर अन्न नव्हतं. घरी अगदी उल्हास,त्यांची पत्नी अगदीच धीमी. मुलींची लग्न झाली नव्हती तेव्हा त्या मदत करत. त्यानंतर सारच अवघड झाल, बायको कितीही लवकर उठली तरी दुपारी दोन तिन वाजेपर्यंत जेवणाचा पत्ता नसे त्यामुळे पूर्ण कुटुंबाची कुचंबणा होत असे. पण तिला काही विचारले तर तोंडाचा पट्टा सुरू होई. एखादे काम झटापट आवरणे तिला कधी जमले नव्हते. या विषयी ते काही बोलले की ती एकेरी उल्लेख करी आणि तिला आवरणे कठीण होई म्हणूनच घरी त्यांची हुशारी कामी येत नव्हती. दाजी तिच्या या वागण्याला कंटाळले होते. “पदरी पडले आणि पवित्र झाले.” अशी त्यांची स्थिती होती. आता तिनेही साठी पार केली होती. त्यांच्या भाषेत “तिची लाकडा म्हसणात गेलीहत, आता बोलान काय उपयोग.”. मुलींची लग्न होईपर्यंत त्यांना संसाराला आधार होता. त्या शेतीच्या कामाला जात, चार पैसे मिळवत. मुलींची लग्न झाली आणि त्या आपल्या घरी गेल्या आणि कुटुंबाची अडचण वाढली.
लोक त्यांना डॉक्टर म्हणत, या खोट्या मोठेपणापाई त्यांनी कधी कुणाची मजूरी केली नाही. आता वय झाल्याने ते शक्य नव्हतं. महागाई मर्यादित होती आणि खाणारी तोंड कमी होती तोवर ठिक होत. आता फक्त शेतीत भागवणे कठीण होई. भात कापणी झाल्यावर कुळीथ, चवळी, उडीद अस परड केलं तरी त्यातून येणार कडधान्य जेमतेम घराची नड भागवी. रोजच्या व्यवहाराला लागणारे पैसे भागवणे जड जाई. घरात तांदूळ असत पण तेल,मीठ,मिरची, किराणा भागवण जड जाई. ते स्वयंपाकासाठी हव नको ते एका बंद खोलीतून तिला काढून देत, त्यामुळे त्यांची बायको चिडचिड करे. तिची चिडचिड अगदी योग्य होती. कमाईचा पत्ता नसल्याने सढळ हाताने खर्च करणे त्यांना जमत नव्हते. त्यांनी पैसा आणि दिडक्यात व्यवहार केला होता पण महागाई मी म्हणत होती. जे लोक औषधासाठी येत ते फुल ना फुलाची पाकळी या न्यायाने दाजींना देऊनच जात. हे पैसे घेणं त्यांना जड जाई,नाईलाज म्हणून ते स्विकारत.
कधी तरी गप्पा मारतांना म्हणत “आमच्या काळी रूपयाक दोन शेर गुळ मिळा, एक आण्याक नारळ होतो, तीन रूपयाक नव वारी पाताळ येय,आणि रूपयाक लिटरभर तेल येय, नाय गे बाई.” आपल्या म्हणण्याला दुजोरा म्हणून ते साक्ष काढत.
त्यांनी काळा कुडा, मुरुड शेंग, हरडा, हळदी प्रमाणे दिसणारी कचर, व्हेळा, पळसाची फुले, किरायत, सातवीण वेल, गोड बिब्बा, कोरफड, जेष्ठमध,गूळवेल, मुरुड शेंग, वावडिंग, सागर गोटा, अशा कितीतरी वनस्पती वाळवून आपल्या बटव्यात ठेवल्या होत्या. कोणी गरजू आला की त्याला काय होत हे ऐकून ते हे औषध देत, कधी काढा बनवून देत. अर्थात ही औषधें झटपट आराम देत नसत म्हणून काळ बदलला तसा दाजींकडे येणाऱ्या माणसांचा ओघ कमी झाला. आधी दिवसात दोन चार माणसे हमखास येत,गावी डॉक्टर नव्हते तेव्हा दाजी सारख्या गावठी औषध देणाऱ्या व्यक्तींना मान होता.
मी लहान असताना कधी दवाखाना गाठल्याचे आठवत नाही, आईचा बटवा हाच दवाखाना. दर रविवारी काळा कुड्याची साल, किरायत, सागर गोटा, मुरुड शेंग यांचा काढा घेतल्याशिवाय सुटका नसे. ठेच लागली रक्त आल तर हळद किंवा आलं ठेचून ते जखमेवर वडील बांधत. जखम चिघळू नये म्हणून त्यावर लवंग तुपावर भाजून त्याची पेस्ट करून आई बांधे किंवा काजरा बी साहाणेवर उगाळून त्याचा लेप जखमेवर लावी. डोके ठणकू लागले तर वेखंडाचा लेप कपळावर लावे. खेड्यातील बऱ्याच माणसांना पाळा मुळांची आणि औषधी वनस्पतींची माहिती होती आणि त्याचा प्रभावी वापर ते करत. आता खेडोपाडी डॉक्टर पोचल्यानंतर अशा व्यक्ती आणि त्यांचे औषधांचे बटवे कोनाड्यात पडले.”कालाय तस्मे नमः हेच खर.”
ग्रामीण भागात शेती हेच जीवनाचं साधन. भातशेती सोडली तर दारात झालेली भाजीची केळी, केळफुल, घेवडा, शेवग्याच्या शेंगा, पालेभाजी ही विकून किंवा गाईम्हशी पाळून आपली उपजीविका चालवतात. माकड मोठ्या संख्येने खाली उतरू लागल्यामुळे लोकांनी परड करण बंद केल होत. रम्याने कोंबड्या पाळल्या होत्या, त्यामूळे वर्षात दोन,चार वेळा या कोंबड्या बाजारात विकून व्यवहार भागवता येई तर कधी उकडे तांदूळ बाजारात विकून नड भागे.
कधीकधी बाजारात खुप उकडे तांदूळ विकायला येत मग पडेल भावात तांदूळ विकून यावे लागे. एप्रिल मे महिन्यात कोकम दोडा, घुल, काजी, तिरफळ,वावडिंग अस काहीना काही विकून चार पैसे मिळत. दरमहा नक्की मिळतील असे दाजींजवळ घरखर्च चालवण्यासाठी ठोस साधन नव्हते. मुंबईत कुणी जवळचे नव्हते ज्याच्याकडे मदतीची अपेक्षा करता येईल त्यामुळे खर्चाची बाजू मोठी आणि उत्पन्न तोकडे अशी स्थिती होती.
पहाता पहाता महागाईने उच्चांक गाठला. मुलाच लग्न करतांना त्यानी ग्राम विकास पतपेढीतून काढलेल्या कर्जाचं व्याजही भरणं अवघड झालं. किरकोळ व्यवहारातून आलेले पैसे आणि मुलाच्या मजूरीचे पैसे, दुकानात किराणा खरेदी करण्यासाठी गेलं की संपून जात. कधी कधी आधीची उधारी भागवून हाती पैसे उरत नसत.
त्यांना झालेल्या कर्जाची आणि त्यांच्या ओढग्रस्त आर्थिक परिस्थितीची माहिती चाणाक्ष आप्पा परूळेकर बामणाने पतपेढीतून मिळवली. आप्पा तसा बोलायला गोडबोल्या, त्याचा व्याजाचा धंदा होता. महिना रूपयाला पाच पैसे व्याजावर पैसे देई. गरजवंताला अक्कल नसते हेच खरे. एका रूपयाचे वर्षाला लोक साठ पैसे व्याज देत. ज्याला देण जमत नसे त्यांच्या जमीनी तो गहाण ठेवी,त्यावर कर्ज देई आणि पहाता पहाता ती जमीन खरेदी करून घेई. दाजींना त्यांनी एक दिवस गाठलं.
“दाजी,कसा काय चललाहा? हल्ली गावात दिसणस नाय.”
“गावात कशाक शिरा पडाक जाव, नजरेक धड गमणा नाय. झिलाक धाडतय बाजार करूक. ता मरांदे तू कसो काय इलस गुरा वासरा ठीक मा? माझ्याकडे काय काम नाय मा? आता चलवणा नाय म्हणान खयं जाणय नाय.”
“नाय रे ! सहजच जाईत होतय रस्त्यान, म्हटला तुका साद घालूया म्हणान इलय, चार दिवसापाठी झील गमलो, अगदीच रया झाली हा, शिक होतो की काय?” आप्पाने उगाचच विचारले.
“तो शिक बिक काय नाय, पण कामान थकून जाता, मिया थकलंय त्याकाच गुरा वासरा बघूची लागतत. शेताची कामा करूची लागतत, कोणाचे कामाक जाता, विसाउक अगदी फुरसत नाय. ह्या शेतीत राम रवलो नाय. वेळेवर जेवणखाण नाय म्हणान जरा आवळलो.ता मरांदे तुका चाय ठेव काय? फुटी आसा तिका सांगू काय?” दाजींनी विचारलं.
“चाय नको, मी फुटी नाय खाणय, देतलस तर पान दी. पण काय म्हणतंय ता ध्यानात घे. झिलावर लक्ष दी . साफ झालोहा. म्हातारो दिसाक लागलो. त्याचा काय वय झालहा.अंगावरची कापडा अगदी विरलीहत. तु पक्को स्वाभिमानी तरी पण काय नड असात तर सांग, तुझ्या मदतीक मी नाय येवचा तर कोणाच्या?”
तरी दाजींनी आपली अडचण सांगीतली नाही. तस म्हणाला, “रे दाजी, तुमची आमची मेर धार एक, तू माझो सख्खो शेजारी, भावासारखो, म्हणान इलय, गरज कोणाकव लागता, हे शंभर रूपये ठेव, आणि हो काय नड इली तर लाजा नको,येऊन भेट.”
“रे आप्पा, रे भल्या माणसा हे पैसे घेऊन जा, मी कसे फेडतलय?
आदीच ते सोसायटीचे नोटीशी येतत, म्हणतत जप्ती आणतलव नायतर पैसे भरून टाका. ती बिलामत आसाच आणि तुझ्या पैशाचा कर्ज नको. आमचा रडगाणा कधी सरलहा.”
“दाजी, तु निवात रव मी कर्ज म्हणून देवक नाय, मदत समज. गरज कोणाकव लागता, तुका गावतीत तेवा दी, व्याज नाय मागणय, काळजी करू नको. गरजेक मी उपयोगी नाय पडलय तर शेजारपण काय बांधाक घालूचा हा”, एवढ म्हणून तो वाटेला लागला. तो गालात हसलाच असणार, नवीन मासा गळाला लागला होता. असे गरजवंत शोधून काढणं त्याचा उद्योग होता. अडचणीत असलेल्या लोकांची त्यांने बरीच जमीन खरेदी केली होती.
सुन गरोदर होती तिला अधून मधून ताप येत होता. त्यांची औषधे कामी येत नव्हती. ती जास्त आजारी पडली तेव्हा मामी रागावली.
“ओ दाजी! सून आजरी पडली त्याका आठवडो उलाटलो, तुमच्या औषधांचो गुण येणा नाय, तिका काय घरात मारुक ठेवलास? हे धा रुपये घेवा आणि तिका डॉक्टरकडे नेवा.” ते अगदी काकूळतीला आले, “गे तुझे पैसे नको, काल आप्पा बामण इललो तो रुपये शंभर देऊन गेलो. म्हणालो,रमल्याक बगलय आणि वाईट वाटला, त्याच्यावर लक्ष देवा म्हणान सांगून गेलो.”
मामी उपहासाने हसली, “दाजीनो म्हणजे तुमी त्याचे पैशे घेतलास? तुमका त्याचो स्वभाव ठाऊक हा ना? तुमची जमीन घशात घातल्या शिवाय तो रवाचो नाय, बघीत रवा.” “मी त्याचे पैशे घेय नाय होतय, तो जबरदस्तीन देऊन गेलो त्याका काय करू?” ते अजिजीने म्हणाले. ती चिडून म्हणाली,”आता तुमका काय एक करूक नको, काय करुचा ता तोच करतलो. तुमची जमीन खाल्यानं म्हणून समजा. काय झाला ता झाला आता आदी तिका चांगल्या डॉक्टराक दाखवा, तुमची गावठी औषधा पुरे झाली.”
ते सुनेला मालवणला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. उपचारासाठी पैसे हवे म्हणून नाईलाजाने त्यांना बामणाची पायरी चढावी लागली. वर्ष दोन वर्षात दाजींनी गरज लागेल तसे त्याच्याकडून पैसे आणले. हिशोब फक्त त्याच्याकडेच, ते हुशार असूनही अंगठा उठवत गेले. सोसायटीच्या घेतलेल्या कर्जाची नोटीस येत राहीली.
एक दिवस जप्तीसाठी साहेब घरी आले. “चिंदरकर, आमचो नाईलाज हा पण गेल्या दोन वर्षात व्याजाचो एक पैसो तुम्ही भरूक नाय. पाच हजार कर्जाचे आणि आठ हजार व्याज, तुमच्या खात्याक तेरा हजार निघतत. एखादो दागीनो असलो तर घाण टाका, नाय तर विका, तुमचे बैल जप्त करून त्यांचो लिलाव केल्याशिवाय उपाय नाय, आज आमी कायतरी वाशील केल्याशिवाय जाऊ शकणव नाय.” साहेबांच ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही सूचेना, त्यांचा नाईलाजा झाला. पून्हा आप्पा मदतीला धावून आला. सोसायटीचे कर्ज आप्पाने एक रकमी भरले आणि अंगठा घेतला. त्यांच्या मनात आले,”असा होतला ह्या माका कळाक व्हया होता, इतको कसो मी नादावलय?”आता पश्चात्ताप करून काहीच उपयोग नव्हता.
घेतलेले कर्ज आणि त्यावरील दामदुप्पट व्याज, असाहाय्य दाजी समजून गेले. जमीनीची विक्री करण्या पलीकडे उपाय नव्हता. अवघ्या तीस पस्तीस हजार रूपयात चांगल पिक देणारी दोन एकर जमीन बामणाला विकावी लागली आणि ते खचले. त्यांनी अंथरूण धरल.
रमेशने त्यांच्यासाठी खूप धावपळ केली पण आधी ते फक्त शरीरानेच थकले होते आता मनाने थकले. ज्या जमीनीने काही पिढ्या पोसल्या ती कसदार जमीन हातून गेल्याचे दुःख सहन करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांची तब्बेत ढासळत गेली. मामी सहानुभूतीपोटी कधी गरम पेज तर कधी सणावाराला जेवण मुलाकडे देत होती. त्यांच्या परिचयाचे समवयस्क मित्र भेटून जात होते पण त्या वृक्षाची मुळेच कमकुवत झाली होती. वयामुळे आणि वेळेवर जेवणखाण नसल्याने शरीरात रक्त कमी कमी होत गेलं. एक दिवस श्रावणात अगदी पंचमी दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दूर दिलेल्या मुली आल्या, त्यांनी आकांत केला. त्यांची आठवण काढून मन पिळवटून टाकेल अशा त्यांच्या शवावर पडून रडल्या. त्यांच्या ओसरीची आंबोली लाकडासाठी तोडली. आजूबाजूच्या गावातून लोक अंत्ययात्रेला आले. सहानुभूती व्यक्त करून गेले. रमेशला तेराव होईपर्यंत कामावर जाणं शक्य नव्हते. त्यांच्या ओळखीच्या काही मित्रांनी ही अडचण लक्षात घेऊन रमेशच्या हातावर पैसे ठेवले. आप्पा बामण भेटून गेला. त्यानेही त्याच्या हातावर सर्वांसमोर पाचशे रूपये ठेवले. लोकांना कळायला नको की आप्पा किती दिलदार आहे. रमेश मात्र अप्पाला पाहून सुन्न झाला, त्याच्या कारनाम्यामुळे दाजी खचून लवकर गेले होते. अचानक पूर्ण घराची जबाबदारी पडली होती. तो सुन्न झाला. थोडेफार पैसे ठेवले होते पण रितीरिवाज कुणाला चुकले.
त्यांच्या दिवसकार्यात खर्च झाला. रमेश या नव्या जबाबदारीने खचला.
दाजी, म्हटलं तर आर्थिक व्यवहारशुन्य पण प्रामाणिक माणूस. मनाने साधे भोळे. या दाजींचा निरोप घेण्याची वेळ वाडीवर आली होती. जो तो त्यांच्यीआठवण काढून हळहळत होता. त्यांनी आपल्याला कशी मदत केली आणि वाचवलं त्याची चर्चा लोक करत होते. वाढत्या वयाला उत्तर नसते. त्यांची जीवनयात्रा “भडगाळवात” संपली. लोक दाजी साठी हळहळले. आज नवीन पिढीला दाजी डॉक्टर ऐकूनही माहिती नाही. कोकणातच नव्हे तर भारतातील अनेक ग्रामीण खेड्यात फक्त म्हातारे तितकेच उरले आहेत, तरुण पिढी आपले भविष्य घडवायला शहराकडे गेली आहे. नशिबाने वर्षातून एकदा दोनदा का होईना उत्सवाच्या निमित्ताने शहरातील लोक आपल्या गावी जातात आणि ह्या वृद्ध पिढीची विचारपूस करतात पण हे वृद्ध गेल्यानंतर त्यांची जागा घेणार कोण? म्हणून खेडी स्वयंपूर्ण आणि आधुनिक केली पाहिजे. खेड्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे तरच आजोळ राहील.
m9ll41