दात खायचे आणि दाखवायचे

दात खायचे आणि दाखवायचे

दंताजींचे ठाणे उठले ,फुटले दोन्ही कान
डोळे रूसले काही न बघती नन्ना करते मान।
या वात्रटिकेने दातांच दुखण किती असह्य असत ते कवी व्यक्त करतो. पण दात तर हवेच, बोळकं तोंड किंवा कवळी नसलेलं तोंड आणि चेहरा आपण पाहिला असेल, दंतपुराण वाचलही असेल म्हणून दाताविषयी बोलू काही.

सुंदर दात चेहऱ्याच्या सौंदर्यात भरच घालतात, त्यामुळे ज्यांच्या दातांची ठेवण आकर्षक त्यांचा चेहराही आकर्षकच. ज्यांचे दात सुंदर दिसतात त्यांना काय काय विशेषण लावली जातील सांगता येत नाही. कोणी शुभ्र दंत पंक्ती म्हणतं तर कोणी मोत्याची माळ म्हणतं. कुणाला कोंदणात बसवलेले माणिक वाटतात. अर्थात हे कौतुक फार थोड्या व्यक्तींच्या नशिबी असत. मौसमी चटर्जीचा एक दात इतर दातांपेक्षा थोडा छोटा आहे, हसते तेव्हा ती छान दिसते. स्वच्छ सुंदर दात हे चेहऱ्याचं भुषण आहे . काही जणं अगदी मोठ्या वयातही हे वैभव जपतात तर काही व्यक्तीच्या तोंडाच वयाच्या चाळीसाव्या वर्षीच बोळकं होतं. काही महिलांचे दात छोटे आणि प्रमाणबद्ध असतात आणि ते त्यांच्या सौंदर्यात भर घालतात तर काही व्यक्तींचे दात हे मोठे मोठे असतात आणि नांगराच्या फाळाप्रमाणे दिसतात.

दूधाचे दात, पटाशीचे दात, दाढा, अक्कल दाढ असं आपण भले वर्गीकरण करो पण कौतुक होत ते फक्त बाळाला आलेल्या पहिल्या दाताचं. घरातील मोठा मुलगा, मुलगी किंवा मित्र विचार न करता निर्णय घेत असेल किंवा वागत असला तर कोणीतरी सुनावतं, ‘वाढलाय पण अक्कल दाढ आलेली दिसत नाही.’ तर आताच दात येणाऱ्या बाळाच निरागस हसणं पहा तो बाळ गणपती सारखा एकदंती दिसतो.

बाळ नजरेसमोर येईल ते ईर्षने चावू लागलं की समजायच हिरडीतून दात डोकावण्याची वेळ आली आहे. फार पूर्वी दात येऊ लागताच त्याला लाकडी किंवा रबरी खेळण दिलं जात असे, याला शास्त्रीय आधार नसावा. लहान बाळाला दात येण्याची आपण सगळेच पण विशेषतः आई प्रतिक्षा करत असते आणि पहिला दात आला की त्याच प्रचंड कौतुक होतं. साधारण सहाव्या महिन्यात दात येण अपेक्षित असत आणि ज्योतिष शास्त्रानुसार लवकर दात येण किंवा त्यापेक्षा फार उशिरा देत येणं शुभ मानलं जात नाही. दात येण्यापूर्वी बाळ त्याच्या तोंडात येईल ती वस्तू जोराने चावण्याचा प्रयत्न करते आणि घरातली मोठी माणसं गंमत म्हणून त्याच्या तोंडात बोट घालताच बाळ कडाडून चावा घेत. आईच्या खांद्यावर हा प्रयोग ते खूप वेळा करत. दात येणं हा बालवयातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लहान वयात खरे तर दुधातून त्याला सर्व अन्नघटक मिळत असतात पण दात आणि हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम ची गरज असते ती फळे तसेच पोषक आहार देऊन भागवली पाहिजे.

दुधाचे दात ठराविक वयानंतर हलू लागतात आणि नकळत पडतात. कधीतरी लक्षात न आल्यामुळे लहान मुलं दात गिळुन टाकतात, नंतर आईला नको तो प्रश्न विचारतात. आईला त्याचही कौतुकच वाटतं. त्या जागी नवीन पक्के दात येतात. लहान वयात बाळ दात घासून घेण्यास उत्सुक नसत त्यामुळे पालकांनी सक्तीनेच त्या दातांची काळजी घ्यावी लागते अन्यथा दात किडतात. लहान मुलांना मुळातच साखर, फुटाणे खडीसाखर अशा गोड पदार्थांची आवड असते याच बरोबर येणारे पाहुणे याच वयात मुलांना चॉकलेट किंवा कॅडबरी गिफ्ट म्हणून देतात. प्रत्येक घरात हल्ली एकच लहान मेंबर असल्याने आणि त्याचे अति लाड झाल्यामुळे तो किंवा ती एकटाच कॅडबरी खातो आणि ती दातांच्या फटीत ठाण मांडून बसते. मुलांनी जर स्वच्छ चूळ भरली नाही तर नंतर ठणाणा करण्याची पाळी येते. या वयात चांगल्या सवयी लावल्या नाहीत तर दातात कॅवेटी निर्माण होतात, काही दात अर्धवट तुटतात आणि असे वेडे वाकडे दात घासण अवघड होऊन बसतं.तुम्ही पाहुण्या म्हणून कोणाकडे गेलात की तुमच्या लहान बाळाला प्रश्न असतो अरे राजू दात कुठे गेले? उंदरानी खाल्ले का? पालक म्हणून वाईट वाटलं तरी काही बोलता येत नाही.जे पालक आपल्या बाळाची योग्य काळजी घेतात त्यांचा प्रश्न नाहीच.

बऱ्याच कंपन्या आपल्या टूथपेस्टची जाहिरात करण्यासाठी स्वच्छ दात स्पर्धा भरवून, ज्या बाळांचे,किंवा लहान मुलांचे दात स्वच्छ आणि सुंदर दिसत असतील त्या बाळाच्या नावे त्यांच्या आईला बक्षीस देऊन उत्तेजन देतात. अर्थात हा सगळा त्यांच्या प्रॉडक्टचा जाहिरातनामा असतो. तेव्हा या स्पर्धा अनेक मातांना माहिती असतात. म्हणजेच दात स्वच्छ आणि सुंदर असणं ही बाळाचे आरोग्य चांगले राखण्याची गरज आहेच पण त्याच बरोबर मातेला समाजात मिसळण्याची एक नामी संधी ही आहे. मग ही संधी त्यांनी का म्हणून दवडावी. अशी काही स्पर्धा आहे असे कळले की कॉलोनी मधील सर्व आया आपल्या मुलाचे दात स्वच्छ दिसावे म्हणून शक्य होईल ते करण्यास सुरवात करतात. पण हीच गोष्ट वेळीच केली तर?

खाण्याचे दात मजबूत असतील तर अक्रोडही सहज खाता येतो या अर्थाची जाहिरात दूरचित्रवाणीवर अनेकदा दाखवली जाते. अर्थात ज्याला या विषयी आत्मविश्वास असेल त्यांनी जरूर अक्रोड खावेत पण फाजील आत्मविश्वासाने अक्रोड किंवा बदाम खाण्याचा प्रयत्न केला तर कोणी थोबाडीत न मारताही दात हातात येण्याची शक्यता अधिक. दात हा विषय कोणी गांभीर्याने घेतला नसता तर टूथपेस्ट बनवणाऱ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या असत्या. तेव्हा जसे सुदंर कपडे घालावे असे वाटते तसे अनेकांना आपले दात चांगले असावे,चांगले राखावे असे वाटते. का वाटू नये? ज्या मुलांचे दात जन्मता किंवा अपघाताने वेडेवाकडे असतात त्यांचे पालक त्यावर सर्जरी करून योग्य करतात. अर्थात या गोष्टीला बराच कालावधी लागत़ो. मुलाच व्यक्तीमत्व खुलून दिसाव यासाठी ती शस्त्रक्रिया गरजेची असते. मुलाचे दात एका रेषेत नसतील तर लहानपणी त्या़ची काळजी घेतली तर मोठ्या वयात होणारा खर्च आणि कालापव्यय टळेल. आपल्या मुलांचा दात दुखत असेल तर खर्च परवडत नाही म्हणूनआपण डॉक्टरांना तो काढून टाकायला सांगतो पण ते चुकीचं आहे. दात वाचवण्यासाठी तो खर्च एकदाच आणि आवश्यक आहे.

तुमचे दात हे निरोगी शरीराचं शोरूमच नव्हे तर ताकदवान अस्त्र आहे. दात चांगले तर पचन उत्तम आणि आरोग्य सुरक्षित.एक घास बत्तीस वेळा चावून खावा म्हटले आहे, अर्थात आपण खरंच घास बत्तीस वेळा चावतो की कसे हा संशोधनाचा विषय असला तरी चांगले चावल्यास घासाचे चर्वण होते आणि पाचकरस उत्तम प्रकारे मिसळतात, म्हणून अरे घासावरघास मारू नको, चांगले चावून चावून खा अस घरातील जेष्ठ मुलांना सांगतात. मुलांच्या लहान वयातच त्यांना दातांची काळजी घ्यायला शिकवल पाहिजे.

आज दात आणि त्याची निगा या विषयी,खरे तर एकंदर आरोग्यविषयी जेवढ काही वाचनात येतं,तेवढं पन्नास वर्षापूर्वी येत नव्हतं. दात किंवा दाढ दुखू लागली की कानात तेल घाल, मिठ-हिंगाने दात घास, कापूर भुकटी दाढेखाली धर, लवंगाचं तेल लाव असे घरगुती उपाय केले जात. तेव्हा दांताचे डॉक्टर आणि वर्तमानपत्र हे माध्यम आमच्या घरात पोचल नव्हतं अस म्हणू.

सकाळी शेणकुंडाची मशेरी हातावर घेऊन पटापट चार बोटं फिरवली की आम्ही चहा घ्यायला मोकळे, अहो घरात चार पाच मुलं असतांना कोणी काय केलं? आणि कोणी नाही केलं? लक्ष ठेवायला पालकांना, विशेषतः महिलेला वेळ तर हवा, असो तर तेव्हाची परिस्थिती तशी होती खरी. त्याला आमचा हलगर्जीपणा म्हणा. जेव्हा तिसाव्या वर्षी दात फिलिंग करण्याची आणि पुढे, कॅप लावण्याची आणि त्या पुढे जाऊन इंप्लान्ट करण्याची पाळी आली तेव्हा पूर्वी झालेल्या चुका की खिळे लक्षात आले पण हे उशीराने आलेल शहाणपण काही कामाचं नव्हतं, म्हणून सल्लागाराच्या भूमिकेत सांगतो. स्वतःच्या दातांची आणि आपल्या पिल्लांच्या दातांची काळजी घ्या.

एकदा का दातांचे दुखणे पाठी लागले की पहिली तपासणी, मग एक्स रे, अशा वाऱ्या सुरू होतात. बर दात किंवा दाढ अचानक दुखायला लागते, तिला वेळा काळाच बंधन नाही आणि दुखायला लागलु की ती बोंब न मारता आय मीन शांतपणे घरात दहा मिनिटे थांबणे शक्यच नाही. त्याच वेळेस डॉक्टर उपलब्ध होतीलच असही नाही. एकदा का डॉक्टरकडे पोचल की मग त्यांच्या उपचार लेव्हल तयार होतात आणि प्रत्येक लेव्हल गणिक खर्च वाढतो. तेव्हा खिसा रिकामा करून घ्यायचा नसेल तर बत्तीशी सांभाळायला हवी. अहो अशीही आपली जिव्हा नको तेव्हा घसरते आणि त्यातून जर भांडण उद्भवले तर एकमेकांच्या बत्तीशा उध्वस्त होतात म्हणून कदाचित म्हणत असावेत बत्तीशी सांभाळून बोल. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या सौंदर्याविषयी,संपत्ती विषयी असुया असेल तर ती माझ्यावर दात खाते अस दुसरी व्यक्ती म्हणते तशी म्हणही प्रचलीत आहे. मात्र काही व्यक्ती झोपेत स्वतःचे दात खातात.
जर त्या व्यक्तीच्या मनात, भिती,दुसऱ्या विषयी राग,व्देष असेल किंवा तिच लैंगिक शोषण झालं असेल तर ती व्यक्ती झोपेत स्वतः नकळत दात खाते, अशा वेळेस दात ऐकमेकांवर घासले जातात.

अहो एकदा का, ‘दंताजींचे ठाणे उठले’, की आपल्याला ज्या काही माकडचेष्टा कराव्या लागतात त्या आठवून पहा, आधी डॉक्टर अपॉइंटमेंट घ्या, मग दोन तास प्रतीक्षा करा, सगळा पेशन्स संपलेला असतो. त्या दात दुखण्याची वेदना किंवा कळ म्हणा हवं तर, कानात, मस्तकात अशी भिनते की त्राही माम्, अगदी जगणे नको वाटते. डॉक्टरांकडे गेल्यावर ते मदारी आणी आपण आज्ञाधारक माकड असतो. त्या मऊ खुर्चीवर पडायला सांगताच थोड रिलॅक्स वाटत पण समोर ठेवलेली हत्यारे पाहिली की पोटात गोळा येतो हो, वाटतं आता काही आपल खरं नाही, बहुतेक खुर्चीतच निरोप घ्यावा लागणार. लहानपणी ज्या पध्दतीने एक दात स्थानिक डॉक्टरने उपटला होता त्याचा अनुभव पाठीशी होता म्हणून एवढी हत्यारं पाहून धडकीच भरली होती. त्या नंतर मोठा ‘आ’ करायला सांगितला, तोडं पूर्ण उघडल तर म्हणतात अजून थोड मोठ करा,काय म्हणाव? तोंड आहे की पिशवी, एका डोळ्याने पाहिले तर भल मोठ इंजेक्शन,हे राम म्हणायचीच पाळी की हो! आपलाच दात उपटून काढायला ही डॉक्टर मंडळी पैसे घेतात आणि वरून घरी दाखवायला दात छोट्या पिशवीत टाकून आपल्याला देतात, वाटतं सांगावं, आता उपटला आहातच तर तुम्हालाच ठेवा आणि काय येतील ते पैसे द्या की तेवढच दुखण सुसह्य़ होईल पण कुठलं काय? उलट ढीगभर औषधे लिहून देऊन अजून खड्यात घालतात.

त्या एवढ्याश्या दातावर दातांचे डॉक्टर जी हत्यारे चालवतात, कुठे ड्रील कर, तर कधी घासून काढ तर कधी त्या दाढेत काड्या भर, स्टड टाक, तोंडात थोड्या थोड्या वेळाने पाण्याचे फवारे मार असा तो छळवाद असतो पण तो नाईलाजाने स्विकारावा लागतो. कधीकधी भिती वाटते खराब, दुखरा दात काढण्याऐवजी भलताच दात उपटला तर काय करणार? बर एकदा लोकल अँनास्थाशीया दिला की काय उपटलं आणि काय ठेवल बिलकुल कळत नाही म्हणजे मोठी पंचायत.

शेवटी दात असतील तरच काही तरी चविष्ट खाता येणार मग चकली असो की डिंकाचा लाडू, चणे असो की खडखडे लाडू. शिवाय निमिषाहार घेणाऱ्या आमच्या सारख्या खवय्याला हाडक तोडता येणार नसतील तर जगण कसलं? काय म्हणावं या दातांच्या डॉक्टरांना? आधी हालहाल करणार आणि नंतर भल मोठ बिल समोर ठेवणार, बिल पाहताच पुन्हा दात ठणकू लागतो. “आई आई गं, पस्तीस हजार, कसले?” तर म्हणे इंप्लान्ट केलं, ब्रीज टाकला किंवा फलाणा केल. म्हणजे तुमच्या दोन तीन दाढा खराब झाल्या असतील तर लाख,दीड लाख असेच जातात. ईश्वरा वाचव रे या दातांच्या संकटातून.एकंदरीतच दाताच दुखण शरीराला आणि खिशाला न परवडणारच,आता भुल देऊन दात काढतात म्हणाव की पाडतात अजून ठरवता आलेल नाही. पण आता दाढ काढतांना थोडं बर वाटत, निदान तेव्हा तरी रडून तमाशा करण्याची पाळी येत नाही.

भुल दिली की न दुखवता डॉक्टरांना दात उपटता येतो हे खरं असलं तरी ती भुल उतरली की तोंडाचा मारूती होतोच की, घरी गेल्यावर बराच वेळ तोंड नीट उघडता येत नाही. ओठ कमालीचे सुजतात,आरश्यात पाहिलं तर आपलं ध्यान दिसत, शिवाय ढीगभर गोळ्या गिळाव्या लागतात त्या निराळ्याच. या गोळ्यांचा साईड इफेक्ट मागाहून कळतो. तेव्हा दात काय सुंदर दिसायचे ते भले दिसो वा न दिसो पण दात मजबूत हवेत हे मात्र एकशे एक टक्के खरं.

गावी एकदा अचानक दाढ ठणकू लागली, गावात डॉक्टर तो ही दातांचा म्हणजे दुर्मीळ गोष्ट, आमच्या गावाकडच्या भावाला मी माझ्या दाता बद्दल सांगितले तर म्हणाला ‘माझे वय वर्षे पंचाहत्तर,अजून बत्तीशी शाबूत आहे. तू अजून पन्नासी पार केली नाही तो तुझ्या दातांना झाल तरी काय? काय सांगणार कप्पाळ! मिठाने अनेकदा दात घासले तेव्हा कुठे थोडं बर वाटलं. गावाकडे बरीच मंडळी तंबाखूच्या मशेरीने दात घासतात, त्यांचे दात वयस्कर झाले तरी मजबूत असतात अस म्हणतात. खरं, खोट त्यांनाच ठाऊक.

आज दंतशास्त्र फार विकसित झालं आहे,दातावर हवे ते उपचार करून मिळतात फक्त कनवटीला सॉरी तुमच्या वॉलेटमध्ये पैसे असले की झालं. काय दुर्दैवी आहे पहा मेडिक्लेम वाले दातांच्या उपचाराची हमी घेत नाहीत. तो शरीराचा महत्वाचा अवयव आहे हे त्यांना पटलेलं दिसत नाही, कुणी तरी त्यांची बत्तीशी फोडल्या खेरीज त्याची उपयुक्तता त्यांना पटणार नाही.

लहानपणी आमच्या गावात, बाहेरच्या गावातून भोळी भाबडी दाढ दुखणारी माणस यायची, काही आदिवासी मंडळी दाढेवर उपचार करतो असा दावा करायची. उपचार करणारे आवळ्याच्या बारीक काठीने दाता मधील किढ काढण्याचा बेमालूम ड्रामा करायची आणि चलाखीने चक्क कीड त्यांच्या समोर टाकायचे. ही कीड आवळ्याच्या फांदीवरील गाठीतून काढून त्यांनी बोटात बेमालूमपणे लपवलेली असे. हे आदिवासी रोग्याला सफेद विखऱ्याची मुळे आणि कात याची गोळी दाढेत ठेवायला सांगत. या गावठी औषधामुळे दाढेचा ठणका कमी होत असे.दाढेत किड कशी जाईल? पण तेव्हा तेवढही शहाणपण कुणी वापरत नव्हतं.

तर आज डेंटिस्ट्री ही दातांच्या सौंदर्य जपण्याची एक विशेष शाखा आहे आणि त्यात पारंगत डॉक्टर खोऱ्याने पैसे कमवत आहेत. चांगल्या, अनुभवी डेन्टींसची अपॉइंटमेंट मिळणं कर्मकठीण. मोठ्या शहरात दातांच्या डॉक्टरचा दवाखाना म्हणजे त्यांचा स्टुडिओ असतो. चकाचक फर्निचर, त्यावर विविध कंपन्यांची दातांची पोस्टर, मंद संगीत आणि निशब्द शांतता. एखादे टीपॉय त्यावर दातांच्या उपचारावरील अनेक मासीके. तेथील त्या शांततेचा भंग होतो तो पेशन्ट विव्हळला तर किंवा डॉक्टर दाताला ड्रीलिंग करत असतील तर. नवखा पेशंट मात्र थोडा भांबवलेला असतो. ज्या आजी,आजोबांच्या दातांची पूर्ण रवानगी करून कवळ्या बसवायच्या असतील त्यांना पंढरीची वारी केल्या प्रमाणे डॉक्टर वारी करावी लागते.असो तर खायचे दात आणि दाखवायचे दात एकाच जबड्यात बसत असले तरी वयानुसार त्यांची स्थिती बदलत जाते हे सत्य स्विकारावेच लागते.

एखादी वक्ती तोडांवर किंवा समोरासमोर गोड बोलते पण प्रत्यक्षात ती तशी वागत नाही तेव्हा आपण म्हणतो त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.राजकारणात हे नेहमीच घडत पण सामाजिक जीवनात आपल्याला प्रत्यय आला की आपण म्हणतो, ‘तो दिसतो तसा नाही तर आतल्या गाठीचा आहे’ ,ही आतली गाठ फार धोकादायक असते. आज महाराष्ट्रात जे राजकरण चाललं आहे ते पाहता आपल्याला दाखवायच्या दातांचा प्रत्यय आलाच असेल.सुनील तटकरे, पटेल यांनी मोठ्या पवार ना दात दाखवले आणि त्यांची नेमणूक महत्त्वाचा पदावर करून पवार साहेब तोंडघशी पडले.

शेजारच्या दोन महिला तिसऱ्या महिले विषयी गॉसिप करत असतील तेव्हा अगदी सहज म्हणतात, ‘तिचे दाखवायचे दात वेगळे आहेत.’ तुमच्या समोरच तिचं बोलण आणि तुमच्या पाठीमागून तुमच्या विषयी बोलण यात नक्कीच तफावत असते. दात घशात घालणे हा शब्दप्रयोग तितकाच सहज वापरला जातो. कधीकधी हाणामारी झाली तर किंवा स्कुटर अपघात झाला तर प्रत्यक्षात दात पडतात तेव्हा शोचनीय अवस्था होते.

जेव्हा आपल्या घरातील व्यक्तीच्या दुर्गुणा विषयी दुसऱ्या व्यक्तीजवळ संतापाने आपण मन उघड करत असतो तेव्हा दुर्गुण सांगणार तरी किती आणि कसे? असे वाटून ती व्यक्ती आपल्या मैत्रीणीला किंवा घराबाहेरील व्यक्तीला म्हणते जाऊ दे बाई, ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ .काय गंमत आहे दातांच सौंदर्य वर्णन करणारी एकही सुंदर म्हण, एकही सुंदर वाक्यप्रचार नाही मात्र त्याचे अवगुण सांगणाऱ्या अनेक म्हणी आहेत. दात वेडेवाकडे असतील तर ओठाआड लपवता येतात पण जर दात सुंदर असतील तर ते नक्कीच ओठांची शोभा वाढवतात. सुंदर चेहऱ्यावर, त्याहून सुंदर दंतपक्ती असणारी तरूणी हसली तर दिवसा चांदणे फुलल्याचा भास होतो. दाखवायचे दात सुंदरच असावेत पण ते दात सुंदर राखले तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदतच करतील.जे आपले आरोग्य चांगले राखतात त्याचा उपमर्द करू नये हे खरे पण तोंड उघडू नको असे कोणी म्हटलें तरी आपण बोलल्या शिवाय रहात नाही हेच खरे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “दात खायचे आणि दाखवायचे

  1. मिलिंद चव्हाण
    मिलिंद चव्हाण says:

    मस्त ,लय भारी

  2. Mangesh Kocharekar
    Mangesh Kocharekar says:

    मिलींद धन्यवाद.

Comments are closed.