दुर्गा

दुर्गा

सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे, भारतात वेगवेगळ्या रूपातील दुर्गांची पूजा केली जाते, शैलपुत्री, ब्रह्मचारीणी चंन्द्रघंटा,कधी कात्यायनी कुष्माण्डा,स्कंदमाता,कालरात्री, महागौरी वगेरे. या नवरात्रीत रोज रंगीबेरंगी साड्या आणि ड्रेस घालून महिला आनंदी जीवन जगत असतील तेव्हा एखादी महिला आपल्या पिल्लांना जगवण्यासाठी स्वतःच्या किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात जुनेर नेसून राबत असेल. जीवनात तिने एकच रंग पाहिला, मातीचा. या मातीत काम करायचं तर साडीही मळकट रंगाची हवी तरच ती सोईची होईल. या गावातील आपल्या संसारासाठी झगडणाऱ्या दुर्गेची आठवण करा. तिला ना रास माहिती ना गरबा. तिच्या आयुष्यात घामेजले अंग आणि त्या नंतर मिळणारी मजुरी हाच तर सोहळा. म्हणून म्हणतो या दुर्गेची
आठवण ठेवा.

महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहेत. कोल्हापूर येथील महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणूका माता. या शक्तीपीठांशी इतिहास जोडलेला आहे. शिवाजी महाराज मोठ्या मोहिमेपूर्वी नेहमी भवानीमातेचा आशिर्वाद घेत. या साडेतीन शक्तीपीठांची महती नक्कीच आहे. ग्रामीण भागातील कष्ट करणाऱ्या महिलांमध्ये अशी अनेक शक्तीपीठं असावी ज्यांचा शोध अजूनही अपूर्ण आहे.

नवदुर्गांचा जयघोष करतांना आपण आपल्या घरातील, आपल्या आजुबाजूच्या दुर्गांना सोईस्कर विसरतो. आपल्या घरातील महिलेला प्रसंगनुरूप वेगवेगळी रूपे घेत हा संसार भवसागर पार करावा लागतो. वेगवेगळ्या प्रसंगात त्यांना आपल्यातील माया,ममता, करूणा, क्रोध या गुणांचा अविष्कार दाखवावा लागतो. म्हणूनच आपल्या घरातील प्रत्येक महिला ही एक दुर्गेचं रूप आहे. तिलाही समजून घेण गरजेचं आहे. लोकसत्ता किंवा दूरदर्शन या माध्यमातून समाजातील नवदुर्गांचा शोध घेतला जातो परंतु त्यांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असतात.

ज्या महिला आपले व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, घरातील पाठिंब्यावर काही उद्योग किंवा व्यवसाय सुरु करतात त्यांचे कौतुक आहेच. केवळ भांडवल असुन व्यवसाय उभारता येत नाही. योग्य निर्णयक्षमता आणि चिकाटी हवी, परिस्थिती अनुकूल नसताना न डगमगता मार्ग काढण्याची इर्षा हवी. सहकाऱ्यांना सोबत घेऊन पूढे जाण्याची जिद्द हवी. पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांना अधिकार पदावर जास्त विरोध होतो तरीही त्या खंबीरपणे आपले काम करून पदाला न्याय देतात. मिरा बोरवणकर यातीलच एक. सर्व गुण एका व्यक्तीत असणे म्हणजे दुर्मिळ योग, म्हणूनच लोकसत्ता अशा नव दुर्गांचा शोध घेऊन त्यांचा मोठ्या व्यासपीठावर कौतुक सोहळा घडवून आणते. या मुळे केलेल्या कामाचे कौतुक होऊन या कामात झोकून देण्यासाठी उर्जा मिळते. या महिलांना पाहून इतर महिलांना प्रेरणा मिळते.

आज ग्रामीण भागात महिला बचतगट माध्यमातून अशी चळवळ उभी रहात आहे. घरगुती उद्योग सुरु करून महिला एकत्रीतपणे विविध उत्पादने बनवून स्थानिक बाजारात विकत आहेत. भविष्यात त्याचे ब्रँडिंग झाल्यास त्यांना विक्रीसाठी मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. कदाचित त्यातून एखादी आंतरराष्ट्रीय उद्योजक बनेल.

आदिवासी भागात महिला एकत्र येऊन एखादा पडीक प्लॉट लिझवर घेऊन भाजीपाला किंवा फुलबाग निर्माण करून विक्री करू शकतात. आरंभी फार मोठा नफा झाला नाही तरी आत्मविश्वास निर्माण झाला की हळूहळू चूका टाळून पिके घेता येतील. उत्पन्न वाढले की उत्साह वाढेल आणि फायदाही. शहरी भागातही समुहाने घरगूती उत्पादन बनवून विक्री करून नफा कमवता येईल. काय खपेल? याचा अंदाज येणे महत्त्वाचे. कोणतेही खाद्य उत्पादन छोट्या प्रमाणात बनवून ते ग्राहकांच्या पसंतीस उतरते का? याचा डोळस अभ्यास केल्यास माघार घ्यावी लागणार नाही. सध्या बचतगटास सरकार कमी व्याजदरावर भांडवल देते. योग्य वेळेत परतावा केला तर व्याजात सवलत आणि अनुदान देते. पुढाकार घेऊन जर स्वावलंबनाचा विचार आपल्या मैत्रीणींमध्ये रूजवला आणि सर्व मैत्रीणींना सोबत घेऊन विश्वासाने पाऊल टाकले तर यश नक्की मिळेल.

ग्रामीण भागात मसाला डंका, पिठाची चक्की,शेवया यंत्र,अस युनिट किंवा मग भाड्याने शेत अवजार देणे असा व्यवसाय हात देऊ शकेल. सामुहिक कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करता येईल.

व्यवसाय हा त्याच पातळीवर करावा लागतो तिथे नाते संबध, मित्रपरिवार , उधारी याला थारा नको.आज लिज्जत पापड नाव घरोघरी झाल आहे अगदी ग्रामीण भागातही एखादे लिज्जत पापड बनवण्याचे सेंटर असते. जसवंतीबेन पोपट आणि त्यांच्या चार सहकारी यांनी हा गृहउद्योग सुरू केला ज्याच्या शाखा आज सर्वत्र आहेत. लग्न समारंभ किंवा अन्य मोठ्या कार्यक्रमासाठी भोजन तयार करून देण्याचे कंत्राट घेता येईल. तुमच्या डोक्यात येईल त्या योजनेवर विचार केल्यास तांत्रिकदृष्ट्या शक्य होईल आणि नफा होईल अशा योजनेवर काम करता येईल. तुमच्या बरोबर सहकारी म्हणून निवड कराल त्या गृहिणी समजूतदार हव्या. शिकण्यास उत्सुक हव्या. समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद देणाऱ्या हव्या. नवरात्रीचा उत्सव हा खरे तर अशा दुर्गांचा आहे. या दुर्गानी खेड्यात जाऊन महिलांना विचार दिले पाहिजे. माझं काम झालं म्हणून शांत न राहता इतरांना प्रेरित केल पाहिजे. कोणती महिला कोणत्या क्षेत्रात काम करते ते महत्त्वाचे नाही तरी स्वतःला विसरून झोकून देण्याची तयारी असेल तर त्या क्षेत्रात एक दिवस ती सर्वोच्च पदी असेल यात शंका नको.

तिने निर्माण केलेल्या रस्त्यावर चालणाऱ्या भविष्यात असंख्य निर्माण होतील पण पहिली ठिणगी आपण स्वतः होण गरजेचं आहे. ज्योत से ज्योत लगाते चलो या वाक्यात तो अर्थ इथेण दडला आहे. एक प्रेमा पुरव अन्नपूर्णा विषय डोक्यात घेऊन एखाद्या शहरात, बस स्टँडवर कॅन्टीन सुरू करून ग्राहकांना ताजे,स्वच्छ,गरम अन्न देऊन नफा कमावू शकतात.तेव्हा प्रत्येक स्त्री मध्ये एक दुर्गा आहे.तिला शोधण्यासाठी दूर जायला नको. तुमच्याकडे दुसऱ्या व्यक्तीची कदर करण्याची दृष्टी असेल तर या दुर्गा सहजच दिसतील. या दुर्गा आपल्या घराला उभारी देतात.
कुटुंबाला मी आहे ना? विश्वास देतात आणि समाजाला प्रेरणा देतात.

मला वेळोवेळी अशा दुर्गा दिसतात, त्यातील काही एल आय सी एजंट, काही पोस्टाच्या विविध योजना घरोघरी जाऊन विकणाऱ्या तर काही घरघुती व्यवसाय करून आपल्या कुटूंबाला उध्दरणाऱ्या आहेत.

या दुर्गां आपल्या आसपास असतात,त्यांना प्रेरणा देण, योग्य वेळी कौतुक करणं इतकीच आपली भुमिका आणि त्यांची अपेक्षा असते. माझ्या माहितितील, नव्हे नात्यातील अवघ्या पंचवीस वर्षांच्या एका विवाहित तरुणींने आपली नोकरी सोडून सासरच्या पड असलेल्या शेतात प्रयोग सुरू केले. यासाठी आरामदायी जीवनाला फाटा देऊन गावाच्या बाहेर दूर शेतात जाऊन तेथील सुविधा नसणाऱ्या घरात राहणं स्वीकारलं. संध्याकाळी कितीतरी कीटक घरात वस्ती करण्यासाठी येत होते. अंगावर खुणा सोडत होते तरी न डगमगता ती राहिली. गाईचे शेण काढणे,जीवामृत तयार करणे यात कमीपणा न मानता ती स्वतः काम करत आहे. स्वतः रोपे तयार करण्याचे तंत्र शिकत आहे.प्रतिकूल परिस्थितीत आणि चिखल तुडवत पालेभाजी, कलिंगड, पपई, झेंडू फुले, शेगव्याच्या शेंगा आणि आता हळद असा हा प्रयोग सुरू आहे.पाणी व्यवस्थापन शिकत आहे.

पिकांवर शक्य तो किटकनाशक, बुरशीनाशक यांची रसायन फवारणी करायची नाही तर लिंबोणी किंवा गोमूत्र याव्दारे उपाय करण्याचा तिचा आग्रह आहे. यासाठी तिने गिर गाई पाळल्या आहेत. पिकाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आव्हान आहेच पण तिचा आत्मविश्वास यावर मात करेल याची तिला खात्री आहे. पालक किंवा कोथिंबीर जुड्या बाजारात नेऊन विकणं किती अवघड आहे ते तिने अनुभवलं आहे. हळूहळू तीच अनुभव विश्व प्रगल्भ होत आहे.हसतमुख चेहऱ्याने हे सगळं करते तेव्हा तिच्यासाठी मनातून आनंद लहरी आशीर्वाद देत असतात. ती त्या पडीक जमिनीत विश्वासाने स्वतः चे स्वप्न पेरत आहे आणि त्याला फळे येणारच याची तिला खात्री आहे.

बाजारपेठेतील मागणी आणि दर ही अशाश्वत गोष्ट आहे. बागेत कलींगण पिक चांगले आले तरी जोपर्यंत त्याला मागणी येत नाही तोपर्यंत ती जोखीम आहे. योग्य वेळी फळ तोडले गेले नाही तर बाजारात उठाव नसेल. फुल तोडणी किंवा पालेभाजी काढणी ही वेळेत केली नाही तर पीक वाया जाते. अशा वेळी पहाटे अंधार असताना काढणी करावी लागते.पायाखाली विषारी जनावर, विंचू येण्याचा धोका असतो. सकाळी तोडणी केलेली फुले किंवा भाजी वेळीच बाजारात घेऊन जावे लागते. बाजारातील रागरंग बघून विक्रीचा निर्णय घ्यावा लागतो. कधीतरी तोटा स्वीकारून विक्री करावी लागते. ही दिव्य पार करत ती आज पुढे जात आहे.

पदरी लहान मूल असतांना, ज्या वयात मौजमजा करायची त्या वयात हे आव्हान तिने स्विकारले याचे कौतुक आहे.ग्राहकांना हवे तेव्हा वस्तू पुरोवठा करण्यासाठी वेळेशी झुंजावे लागते.मुलावरील प्रेमाला आवर घालावा लागतो. बागेत काम करण्यासाठी माणसं मिळत नाहीत.अगदी घरी जाऊन बोलवावे लागते,गरजवंताला अक्कल नसते हे पटते. शारीरिक कष्ट आहेतच पण मानसिक ताण असतोच. हे कष्ट करतांना तब्येतीवर परिणाम होतो पण गेलेली वेळ परत येणार नाही म्हणून खंबीरपणे उभे राहून ती मी जींकेन या विश्वासाने उभी आहे.अर्थात कुटुंबाची साथ आहे म्हणूनच तिला हे शक्य आहे.

मागील मे महिन्यात कलिंगड बाग तिने केली होती.बागेत हिरव्यागार वेलीवर शेकडो, हजरो कलिंगडे बघून माझे मन आनंदून गेले.यातील एक कलींगड कापून तिने तो केशरी लाल गाभा दाखवला तेव्हा तोंडाला नकळत पाणी सुटले, पण या कलींगडाला किलोला अवघा अठरा ते विस रूपये भाव मिळाला ऐकून आश्चर्य वाटले.ती मात्र तरीही आनंदी होती. पपईच्या प्लॉटवर तयार झालेले लंपिवळे केशरी पपई पाहून मला असाच आनंद झाला.यातूनही तिने नफा कमावला.

एकच पिकावर विसंबून न राहता ती प्रयोग करून पाहते आहे. या पावसाळ्यात तिने शिराळा, गलका असा मांडव उभारला होता. वेल उत्तम वाढली होती. मांडवावर सगळीकडे पांढरी,पिवळी फुले बहरली होती.फळ पडता पडता एका सोसाट्याच्या वाऱ्यात मांडव खाली बसला आणि स्वप्नं स्वप्न राहील. तेव्हा कितीही काळजी घेतली तरी कधी काय घडेल हे ओळखणं तस कर्म कठीण.

या पट्ट्यात यापूर्वी कोणी हळद घेतली नव्हती तिने तो प्रयोग केला आहे. हळदीची वाढ उत्तम आहे. रात्रंदिन आम्हा कष्टाचा प्रसंग,अस जीवन ती जगत आहे.सुखाची नोकरी सोडून तिने या जोखीम व्यवसायात उडी मारली त्यामागे नक्की काही सकारात्मक विचार असावा. तिच्या कष्टांना सलाम.चांगली उदाहरण आपल्या आसपास असतात पण आपण मात्र अशा दुर्गांच्या शोधात इतस्ततः फिरत असतो. आपल्याला Larger than life शोधायची सवय असते म्हणून जवळचे दिसत नाही हीच ती शोकांतिका.

खूप मोठे यश संपादन केल्यावर गौरव होतोच पण अशा छोट्या यशाचं कौतुक झालं तर वेगळी उभारी मिळते. त्यातुन झुंजण्याचं सामर्थ्य प्राप्त होत. तेव्हा आपल्या आसपास अशा दुर्गा असतील त्यांचे आपणच कौतुक केले तर त्यांचे मनोधैर्य वाढेल,उत्साह वाढेल आणि त्यांच्यातील दुर्गा प्रगट होईल. सफाळे गावात, लोडखड पाड्यावर आमची नातसुन दुर्गा , इशा कोचरेकर आपल्या ध्येय धोरणावर ठाम आहे. शिकली सवरली असुनही शेतातील कामात कमीपणा न मानता झोकून देऊन काम करत स्वतःला सिध्द करण्यासाठी झटते आहे. म्हणूनच तिचे कौतुक. ज्याला शक्य होईल त्यांनी भेट देऊन तिचं हिरवगार शेत आणि जोमाने वाढणरी हळद पहावी. नक्की मन प्रसन्न होईल.

समाजाने स्वतः पुढे येऊन अशा दुर्गाचं कौतुक केलं तर या दुर्गाचं जीवन सफल होईल आणि त्या अन्य कोणाचं जीवन उजळवून टाकतील यात शंकाच नाही.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar