ध्येयवेडा
तो जाताजाता थबकला, त्याने खिशातून सिगारेट केस बाहेर काढली, थोड्या वेळापूर्वी अर्धवट ओढलेली सिगारेट काढून लायटरने पेटवून शिलगावली. मोठा कश घेत तो घसा खरवडून खोकला. पुन्हा दम मारत त्यानी तोंडाचा चंबू करत धुराच वलय आकाशात सोडलं. “मादरचोद साला! आजही कामावर घेतलं नाही. स्वतःच्या बापाची कंपनी समजतो. पंचवीस वर्षे आय घातली, दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही. मॅनेजर थांब म्हणाला की आपण थांबायचो. प्रोडक्शन सुरळीत होईपर्यंत मर मर मरायचो. आपण मशीन ऑपरेटर असुनही पूर्ण मेंटेनन्स करायचो. का?, का स्वतःची आय घालत होतो? मशिन चालू तर रोजगार चालू, मालकाचा धंदा बंद म्हणजे आपलं कुटुंब उपाशी म्हणूनच ना! ती अँटोमँटीक मशीन आणली तेव्हा मॅनेजर म्हणाला होता, “माने आता तुम्हाला पहिल्या सारखा त्रास होणार नाही. एकदा प्रोग्रॅम सेट केला की आराम. प्रोडक्शन होत राहील, तुम्ही फक्त लक्ष द्यायच. टेंपरेचर, प्रेशर, कुलींग यावर लक्ष ठेवलं की झालं.” शंकरने ठरवलं काय होईल ती मेहनत करू पण हे इंजेक्शन मोल्डींग मशीन शिकून घेऊ.
“शंकर ह्या मशीन इंन्स्टाँलेशन करायला इंजिनिअर येतील त्यांना मदत करायची.” मॅनेजरचं ऐकून तो जाम खूश झाला होता. त्या नवीन मोल्डींग मशीन विषयी आणि त्याचा प्रोग्रॅमर याबद्दल उत्सुकता होती. मालकांवर विश्वास होता. एवढे वर्षे नोकरी केली होती. मशीन आली तेव्हा मशीन इंस्टॉल होईपर्यंत पँंधरा दिवस कंपनीच्या माणसासोबत तो मर मर राबला होता, त्याला वाटलं मालकाने नवीन मशीन मागवल्याय आता श्रम कमी होतील आणि प्रोडक्शन वाढलं तर मालक पगारही वाढवतील. मशीन सुरू होऊन ट्रायल घेई पर्यंत मॅनेजर सतत मागेपुढे असायचे, तो मशीन इंन्स्टाँल करायला आलेल्या इंजीनियर मागे मदतीसाठी तयार असायचा. “शंकर अरे स्टोअर मधून हे आण, ते आण, कुलींग टेंपरेचर बघ. एअर प्रेशर बघ.”
कधी चहा कॉफी तर कधी कॉल्डड्रिंक मागवत होते. वाटायचं मॅनेजरला आपली कदर आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर मालक-मालकीणबाई आल्या आणि नवीन मशीनच त्यांच्या हातून पुजन करून, बटन दाबून प्रोडक्शन सुरू झालं. त्या दिवशी सर्व वर्करना बाहेरून जेवण आँर्डर केलं होतं. कंपनी इंजिनिअरने कामचलाऊ प्रोग्रामिंग दाखवलं होतं. इंजिनिअर मॅनेजरला बोलला होता याला automatic machine ऑपरेटर लागेल या मामांना नीट समजणार नाही. भ्यानचोद ते त्याचे controller समजण अवघड होतं. प्लास्टिक ग्रेनसाठी वेगळी gun,त्या गनसाठी हिटर कॉईल त्याच्यासाठी water compressor, mold jig साठी वेगळी मोटर, मशीनसाठी आँईल कुलींग, दोन तीन कंट्रोल बोर्ड ,पण त्या इंजिनिअर ने दाखवलं तस आपण केलं. दोन तीन वेळा वेगळ्या साईजवर ट्रायल घेतली. त्या मशीनचे ऑपरेटिंग कोड समजण थोड अवघड होत पण आपण प्रयत्न करत होतो. इंजिनिअर सांगेल तस जमवत होतो.
या मशीन ऑपरेट करणं लय सोप्प होतं. फीड, थिकनेस, टेम्प्रेचर, प्रेशर सगळं स्क्रीनवर दिसत होतं. पयल्या मशीनची लय कटकट होती. डाय नीट बसवून दोन चार पीस बाहेर निघेपर्यंत जीवात जीव नसायचा. कधी कॉम्प्रेसर डाऊन व्हायचा तर कधी कूलिंग प्रेशर, प्रोडक्शनची वाट लागायची. डाय स्वच्छ करून पुन्हा ट्रायल घेई पर्यंत दिवस उजडायचा.
आता बरं झालं होतं. प्रोडक्शन रेट वाढला होता. आधीच्या मशीनवर तासाला चाळीस ते साठ बकेट बनायच्या या मशीनवर चारशे ते सहाशे बकेट बनत होत्या. प्रोडक्ट एकदम क्लीन होतं. थिकनेस लिनिअर होता. प्रोडक्ट चमकदार होतं. मटेरिअल वेस्टेज कमी होता. सेल वाढला होता. दर आठवड्याला माल मुंबई ,गुजरात, कोल्हापूर, पुणे जात होता. तिन शिफ्ट मध्ये कंपनी चालू होती.
मालकांनी जुन्या मशीन टप्प्या टप्प्याने काढून टाकयच ठरवल होतं. शंकरच म्हणला, मालक एकदम अशी घाई करू नका, सध्या दोन तीन जुन्या मशीनपण राहू दे, एकदा ह्या सुरळीत चालू झल्या की मग बदला. आयत्या वेळेस या इंजेक्शन मोल्डींग मशीनने घात केला तर सगळं प्रोडक्शन ठप्प होईल, पण नवीन मशीनचा प्रोडक्शन स्पीड मालकाला मोहात टाकत होता. उगाच जुन्या मशीनवर ऑपरेटर पोसत बसण्यापेक्षा ऑटोमॅटिक मशीन आणली तर एक ऑपरेटर दोन मशीन सहज सांभाळू शकत होता म्हणजे एक ऑपरेटरचा पगार वाचणार होता. प्रोडक्शन किंमत कमी होणार होती. त्यांनी शंकरच म्हणणं ऐकून सोडून दिलं. दोन महिन्यांनी दुसऱ्या दोन पेटीपँक मशीन आल्या. प्रोग्रामिंग शिकलेल एक नवीन पोरगं मालकाने बोलवून घेतलं, शंकरला म्हणाले, “शंकर दुसऱ्या दोन सेम मशीन आणल्या आहेत. आपल्याला त्या इंस्टॉल करायच्या आहेत जमेल ना?” तो हां प्रयत्न करतो म्हणाला, मालकाला नकार कसा देणार? त्या नवीन ऑटोमॅटिक मशीनसाठी, मुलाला सोबत घेऊन त्याने फाऊंडेशन प्लँन तयार केला. त्याला लागणारा फिड पंप कुठे बसवायचा ते ठरवलं. महिन्याभरात दोन्ही मशीन प्रोडक्शनसाठी तयार झाल्या. त्याचं इन्स्पेक्शन करायला कंपनीची माणसं आली. काही सुधारणा करत आलेल्या इंजिनिअरने उत्सुकतेने विचारले, “मशीन इन्स्टाँल कोणी केली?” मालकांनी शंकरकडे बोट दाखवून सांगितले, “आमचा जुना माणूस आहे. खूप मेहनती, आमच्या जुन्या मशीनचं मेन्टेनन्स तोच करतो. एखादी गोष्ट त्याने एकदा पाहिली की त्याच्या डोक्यात फिट बसते” त्या कौतुकाने शंकर हुरळून गेला. या वेळेला मालकांनी शकंरच्या हातून नवीन मशीनची पुजा केली. शंकर सुखावला.आपल्या मालकाला आपल्या कष्टाची जाण आहे असं मनात म्हणाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन आलेला पोरगा त्या नव्या मशीनच्या बाजूला घुटमळताना दिसला. शंकरने त्याला विचारलं, “प्रसाद अरे मशीन शुरू नही की, क्या बात है?”
“चाचा ये दोनो मशीन मॅनेजर ने आजसे मेरे को दियेला है। इनपर मै प्रोडक्शन देखुंगा, वैसे भी इसके उपर बकेट नही कुच नया आयटम बनेगा. वे बोले कुच प्रॉब्लेम आया तो अपकी मदद लेने को बोला है। “पागल हुवा है क्या,अरे वो जुना मशीनपे तू काम कर रहा था ना, मॅनेजर तुझे नया मशीन काय कु देगा?” “चाचा,ओ अपनेको नही पता. आज जैसेही मै कंपनी आया ओ रोझी मॅडम मेरे को बोला, साब तुमको बुलाया करके, मै साब को जाकर मिला तो बोले, “प्रसाद आज से नये दोनो मशीन तुम्हे देखने है।” मै भी हैरान था। फिर बोले, “जमेगा ना?” ” मै क्या करता. मुझे कोई शौक नही. पर साब बोला तो सुनाना पडेगा.आपके जैसी मेरी थोडी ना परमनंट नोकरी है।
शंकर काय समजायच ते समजला, गेल्या पंचवीस वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेले. तो जुन्या आटोमॅटिक मशीनकडे गेला आणि त्यांनी मशीन सुरू केली. पाच मिनिटांत पॅरामीटर ऍडजस्ट करून शंकरने काम सुरू केलं. नेहमी प्रमाणे कंपनीचा चहा आला पण त्यांनी नको सांगितलं. कॅन्टीनचा पोरगा डोळे मोठे करत म्हणाला, “अरे चाचा रोज चारपाच गिलास चहा तुमी पितात आज काय झालं?” दुपारी तो लंचला गेला नाही. नेहमी प्रमाणे टॉयलेटमध्ये दम मारायला नाही गेला. फक्त काम आणि काम करत राहिला. थोड्या वेळाने मॅनेजर आला, “शंकर तुम्ही जेवायला नाही गेलात,काय भानगड आहे? घरी वहिनी सोबत भांडण करुन आलात का?” त्याने काही उत्तर दिले नाही. मॅनेजर अगदी जवळ आला,त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, शंकर तुम्ही कोणावर रागावला आहात का?” त्याचा संताप अनावर झाला, तरीही तो शांतपणे काम करत राहिला, मॅनेजरने मशीन मधून बाहेर आलेले दोन तीन बकेट पीस पाहिले आणि शांतपणे ते निघून गेले. संध्याकाळी सहा वाजता तो काम संपवून मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला.” सर आता येऊ?” मॅनेजर, संख्येने त्याच्याकडे पहिलं, डोळ्याच्या खुणेनेच इशारा केला. “सर मी नोकरी सोडायची ठरवली आहे.” संख्येने चष्म्याच्या वरून त्याच्याकडे पाहिलं,”कारण?” “सर तुम्ही जाणूनबुजून माझा अपमान करत आ्हात. मी सिनियर असूनही त्या नवीन मशीन्स त्या नवख्या प्रसादकडे दिल्या,माझ्यावर विश्वास नाही का तुमचा?” “शंकर तो पोरगा ट्रेंड आहे, दोन दोन मशीन पहाणे तुम्हाला जमणार नाही तुम्ही हँडल करताय तीच मशीन तुम्ही पहा. एक एक मशीन दिड दोन कोटी रूपयाची आहे. दोन्ही नवीन मशीन बिनधास्त तुमच्या ताब्यात देऊ शकत नाही. आता तुमचं वय ही झालय तुम्हाला दोन्ही मशीनवर लक्ष देण शक्य होणार नाही. जर मशीन बिघडली तर केवढ्याला पडेल.”
“म्हणजे मी काल आलेल्या त्या पोराच्या हाताखाली काम करायच का?” शंकर मानेने चिडून विचारलं “मी कुठे तस म्हणालो? माझं म्हणणं, तुम्ही पाहताय तिच मशीन पहा या नवीन मशीन प्रसाद बघेल, त्याच्या हाताखाली काम करायचा प्रश्नच नाही. तुम्ही तुमचं प्रोड्कशन पहा तो त्याच पाहिल.” “साहेब,या मशीन इंन्स्टाँल करायला मी महिनाभर राबलो आणि आता तुम्ही त्या मुलाला देताय हा माझ्यावर अन्याय नाही का?” “शंकर तुमच्याशी वाद घालत बसायला मला वेळ नाही. हा माझा एकट्याचा निर्णय नाही. तुम्ही डोक्यातला राग काढून टाका मग तुम्हाला पटेल की आमचा निर्णय योग्य आहे. मी कामात आहे या तुम्ही.” तो बाहेर पडला.रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवरून त्यांनी सिगारेट घेतली. “भिकारचोट साला, मला अक्कल शिकवतो, म्हणे दोन मशीन हँडल करण मला जमणार नाही. एवढाही मी थकलो नाही. आता कुठे पंचावन्न संपलं. अजुन आठ दहा वर्ष सहज जमेल. ठिक आहे उद्या मालकांना भेटून पाहू नाहीतर अपमान करून घेण्यापेक्षा लात मारू नोकरीवर. काल त्यांनी बायको, स्मिताला काय काय स्वप्न दाखवली होती. सांगितले होतं. आता मालक पगार वाढवतील अशी शक्यताही त्याने सांगितली होती आणि आज अगदी उलट घडत होतं. तो घरी येताच बायकोने त्याला चहा ठेवला हातपाय पुसायला टाँवेल आणून ठेवला. ती चहासाठी त्याची स्वयंपाक खोलीत वाट पहात होती पण तो आलाच नाही. तिने बाहेरच्या खोलीत डोकावून पाहिलं. “अहो चहा ठेवलाय, येता ना?” तो काहीच बोलला नाही तसं तिच्या लक्षात आलं, नवऱ्याचं आज कंपनीत काही तरी बिनसलं. ती त्याच्या जवळ येऊन बसत म्हणाली, “कंपनीत आज कोणाशी भांडण झालं का?” तो एकदम उसळून बोलला, “तो मादरचोद संख्ये, मला म्हणतो तुम्हाला दोन नवीन मशीन हँडल करायला जमणार नाही, मी, मी मशीन इंस्टॉल केल्या आणि आता मलाच हुशारी दाखवतो साला.” “अहो मग मालकांशी बोलायचं,त्यांनी काय तो योग्य निर्णय घेतला असता ना? जरा शांत व्हा आणि आधी चहा घ्या.”
“अगं इथ संपूर्ण शरीराला आग लागल्याय आणि तू शांत रहा म्हणतेस, मालक पण काही बोलले नाहीत तर? त्यांनाही कदाचित तसच वाटत असावं. संख्ये म्हणाला हा माझा एकट्याचा निर्णय नाही म्हणून चिंता वाटते.” “मग तुम्ही तरी त्या नवीन मशीनचा अट्टाहास का धरता? तुमचा पगार तर काही कमी होत नाही ना ?” “तुला त्यातल काही नाही कळायचं नाही, आता मिसरूड फुटलेल पोरग दोन मशीन सांभळंल आणि मला न जमायला काय झालय? मला पंचवीस वर्षांचा अनुभव आहे.” “बरं, बरं हे बघा, आधी एकदा मालकांना भेटा, उगाच राग डोक्यात घालून काय करणार? आपली पोर अजून शिकतात.” “तुला तुझ्या मुलांच पडलयं, इथ माझं रक्त जळतय, वाटतं सोडून द्यावी नोकरी.” “अहो, या वयात नोकरी सोडली तर दुसरी मिळेल का? काहीतरी वेडेपणा करू नका. जरा शांत पडून रहा मग तुम्हाला बरं वाटेल, मी तुमच्या डोक्यावर तेल घालून मालीश करते.” तो काहीच बोलला नाही. तिने त्याच्या डोक्यावर तेल घालून खसाखसा चोळलं. त्याने काँटवर डोक टेकलं आणि पडून राहिला. अर्धवट झोपेत त्याला मॅनेजर बरोबर झालेलं बोलण आठवलं. झोपेतच तो ओरडला “भ्यानचोद आपली लायकी काढतो, स्वतःला मशीन मधलं काही कळतं तरी का?” त्याला जाग आली. तो कुस बदलून पडून राहिला. त्याने डोळे उघडून पाहिले. बायको बाजूला बसली होती आणि मुल कावरीबावरी होऊन त्याच्याकडे पहात होती. तो उठून बसला, “तुम्ही असे माझ्याकडे का बघता, मी काही बोललो का?” ती म्हणाली, “झोपेत तुम्ही मोठ्यामोठ्याने संख्येला शीवी देत होता. हे संख्ये कोण? त्यांनी तुमच काय बिघडवलं?” “स्मिता Sorry मी अस वागयला नको होतं. ते आमचे मॅनेजर, त्यांचं, माझं कामावरून भांडण झालं मला राग आला होता म्हणून मी.. मला माफ करं” मग तिने काही न विचारता त्यांना जेवायला वाढलं. ते झोपले.
दुसऱ्या दिवशी तो उशीराने उठला, स्मिता म्हणाली, “मी डबा तयार करून ठेवलाय.आंघोळीला पाणी तापवू ना ?”
“नाही, आज मला नाही जायला जमणार, मी आराम करतो.” ती बरं म्हणाली. तो उशीराने उठला. चार रस्त्यापर्यंत फिरून तासाभराने आला. दुपारी त्याने टिव्ही लावून पाच दहा मिनिटं कार्यक्रम पाहिला. पुन्हा टिव्ही बंद केला. त्याला काही सुचत नव्हतं. वेळ जात नव्हता. सारख अस्वस्थ वाटत होत. थोड्याथोड्या वेळान मोबाईल काढून तो पुन्हा खिशात ठेवत होता. दिवसभरात कोणाचाही फोन आला नाही.
दुसऱ्या दिवशीही तिने डबा बनवला, “अहो उठा! कामावर जाताय ना? बघा साडे सात वाजयला आले,नाहीतर म्हणाल उठवल का नाही?” तो म्हणाला,”माझा मुड नाही, वाटेल तेव्हा जाईन. पाहू कंपनीला माझी गरज आहे की नाही.” तिने समजावून पाहिले. तो काही बोलला नाही. कधी नव्हे तो त्याने घरी सिगारेट प्यायली. स्मिताला त्या वासाने खोकल्याची उबळ आली तसं त्याने सिगारेट पायाखाली चिरडून टाकली. स्मिता रोज डबा बनवून तो कामावर जाण्याची वाट पहात असे. तो कामावर जात नाही पाहून स्वतःशी त्रागा करे. “कमाल आहे या माणसाची,आपण कामगार माणूस, एवढं मॅनेजरवर किंवा मालकावर रागावून चालेल का?” रागावून रागाने तो चार पाच दिवस कामावर गेलाच नाही. त्याला वाटलं होतं कोणीतरी चौकशी करायला येईल. त्याच दुर्दैव ना कोणी फोन केला ना कोणीही विचारपूस करायला आलं.
एक दिवस तो सकाळीच उठला कामावर जायला निघाला, नेमका त्याच दिवशी तिने डबा बनवला नव्हता. त्यांनी चहा घेतला आणि तो बाहेर पडला, तिने त्याच्या हाती दोनशे रुपयांची नोट ठेवली. “हे घ्या, बाहेर जेवून घ्या आणि कामावर उगाच तापातापी करू नका, शांततेत घ्या.” तो हं म्हणाला. वेळेवर तो कंपनीत पोचला. गेटवरून आत शिरताच शेरसींग त्याला म्हणाला, शंकरभाऊ रोझी मॅडम तुमारे वास्ते मेसेज रखा है, वो मिलनेको बोला है।
त्यांनी रोझीच्या केबिनकडे पाहिलं ती अजूनही आली नव्हती. तो वाट पहात असताना संख्ये साहेब आले, त्याला पाहताच म्हणाले, “या, इथे गेटवर काय करताय?”
“साहेब रोझी मॅडम ने भेटायचा निरोप ठेवला होता,म्हणून वाट पहात होतो.” साहेब खुर्चीवर मागे रेलून बसले, “मला वाटल तुम्ही रागानं नोकरी सोडलीत की काय? गेले पाच दिवस काही न कळवता तुम्ही गैरहजर राहिलात,बरोबर आहे का?”
“चुकलं साहेब,नोकरी सोडून कस चालेल? मुल शिकत आहेत. तुम्ही मला, त्या नवीन मशीन ऑपरेट नका करू म्हणालात त्याचा राग आला होता.” “मग आता का आलात? तुम्ही काही न कळवता इतके दिवस गैरहजर राहिला म्हणून मालकांनी तुमचा हिशोब करायला सांगीतलाय. तेव्हा रोझीला भेटा.” “साहेब चुकल माझं मला माफ करा. मी तुम्हाला कळवायला हव होत,पण रागाच्या भरात नाही कळवलं. अजून माझी मुलं शिकतात. या वयात कुठे जाऊ?” “ते मी कस सांगू? तुमच्या जागेवर एक गरजू काम करतोय, तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्लास्टिक लाईनमध्ये मशीन बंद ठेवण शक्य नसते, तरी तुम्ही दांडी मारलीत, ती ही मला न सांगता” “साहेब,मी पंचवीस वर्षे इमानदारीत नोकरी केली.एक चूक माफ करा.” “शंकर, आता ते माझ्या हातात काही नाही. साहेब येतील तेच निर्णय घेतील. तुम्ही या आता. मला काम आहे. उगाच माझा वेळ घालवू नका.” “साहेब गरीबावर दया करा, पुन्हा या हातुन ती चूक नाही घडणार विश्वास ठेवा.” “माने, No excuses ,मी म्हटलं ना, माझ्या हातात काही नाही. साहेब आले की भेटा त्यांना. दोन मशीन इन्स्टाँल केल्यापासून तुम्हाला आपण सुपर पॉवर आहोत असं उगाचच वाटत होतं त्याचा हा परिणाम.” नाही साहेब, तसं काही नाही, तुम्ही संधी दिलीत म्हणून डेरिंग केली. यापुढे अस नाही होणार.”
“शंकर, वेळ निघून गेली. अस सलग दांडी मारण्यापूर्वी विचार करायला पाहिजे होता. आता खूप उशीर झाला आहे.” तो निराश, हताश कंपनी बाहेरच्या गेटजवळ बसला. कंपनीचा सिक्युरिटी शेरसींग त्याच्या जवळ येत म्हणाला. “बाबुजी अपना शाहाब बिलकुल हरामी है, अपने गामं से आदमी लाया है, उसको आपरेटर बनाया है। अब आपकी उनको जरूरत नही है।” “अरे शेरसींग पचीस साल कंपनीके लीये खून बहाया है। अपने मालीक को तो मालुम है ना।”
“बाबुजी, पचीस साल हो या पचास साल उनको फरक नही पडता, आपसे गलती हो गयी ना बस अब वही पकडके चलेंगे. बाबुजी क्या बिडी पीयेंगे आप ?” शेरसींगने दिलेली विडी तो फकापका प्यायला. एका दगडावर बसून राहिला. वाट पाहूनही मालक आलेच नाहीत. निराश होऊन तो उठला, “संख्ये साहेबांनी मालकांना मी आल्याच कळवलं असावं नाहीतर मालक आल्या शिवाय राहिले नसते. “तो स्वताशीच म्हणाला.
“बाबुजी धुप बड गया है, बिमार हो जाओगे, घर जावो, शायद आज बडा शाब नही आयेगा.” दुसऱ्या दिवशी पुन्हा तो मॅनेजरकडे गेला.”साहेब काल दिवसभर गेटवर बसून काढलं, प्लिज मालकांना सांगा, हवं तर लिहून घ्या पण गरीबाच्या पोटावर नका मारू.” संख्ये साहेब म्हणाले,”मी मालक आले की बोलून पहातो. तुम्हाला निरोप देतो,उगाच चकरा काटू नका.” “साहेब, दया करा,पोरगी कॉलेजमध्ये शिकतात, मी कमावले नाही तर त्यांचं शिक्षण कसं होईल? प्लिज एक संधी द्या.” शंकर घरी रोज तापातापी करू लागला. जेवणात निट लक्ष नव्हते, झोप नव्हती. स्मिताला कळेना, हा बाप्या कामावर जातो की अजून कुठे?” शेवटी तीने कंपनीत जाऊन छडा लावायचा ठरवलं. ती कंपनीच्या गेटवर पोचली तर तो मान खाली घालून बसलेला दिसला. ती थेट कंपनीच्या आवारात शिरली, सिक्युरिटीने तिला अडवले. ती त्याच्याशी भांडली. मालकांना भेटायच म्हणाली. योगायोगाने तिच्या मागोमाग मालक आले.त्यांनी शेरसींगला खुणेने गप्प रहायला सांगीतले. मालकांना शंकरची केस माहिती होती. त्यांनी थोड्या वेळाने स्मिताला ऑफिसमध्ये बोलावले तिचे म्हणणे ऐकून घेतले. नवऱ्याचे वागणे कसे बदलले आहे त्याबद्दल सांगितले.
त्यांनी शंकरला बोलावून घेतले, त्याच्या स्वभावामुळे कुटुंबाची कशी परवड झाली ते सांगितले. शंकरने, आपण नवीन मशीन इन्स्टाँल करायला किती मेहनत घेतली? काय अडचणी आल्या होत्या? त्या विषयी सांगितले,आणि आपण त्या मशीन ऑपरेट करायला का? आणि कसे ? उत्सुक आहोत या बाबत सांगितले. स्मिता मालकांना हात जोडून म्हणाली, “साहेब, माफ करा लहान तोंडी मोठा घास घेते, माझे मिस्टर दोन्ही मशीन चालवून दाखवतो अशी हमी देत असतांना तुम्ही त्यांना नकार दिलात. कोणता कामगार मी अधिकची जबाबदारी घेतो असे म्हणेल? पण ते म्हणाले. गेले पंचवीस वर्ष तुमच्या कंपनीत काम करत आहेत. कुटुंबात लग्न असलं तरी दांडी मारत नाहीत, म्हणतात मी अचानक दांडी मारली तर मालकांच, मशीनच नुकसान होईल. अजून किती प्रामाणिक असला पाहिजे? गेले चार पाच दिवस ते रोज वेळेवर कंपनीत हजर राहतात. उन्हातान्हात बसतात. तरी मॅनेजर त्यांना कामावर घेत नाहीत. गेले अनेक दिवस त्यांनी माझ्याकडे या विषयी एकही शब्द काढला नाही. नीट जेवले नाहीत की झोपले नाहीत. त्यांची तडफडत पहावे ना म्हणून मी आले. साहेब तुम्ही त्यांना नोकरीत नाही ठेवले तर मी चार घरची भांडी घासून मुलांना शिकवीन पण तुम्ही माझ्या नवऱ्यावर अन्याय करत आहात. मी आधीच तुमची क्षमा मागितली होती. अधिकच बोलले तर माफ करा.येते मी.”
शंकर मालकांना हात जोडत म्हणाला, “साहेब, माझी बायको अशिक्षित आहे. रागाने जे काही बोलली त्याबद्दल मी क्षमा मागतो,आम्हाला माफ करा.” स्मिता बाहेर जाता जाता म्हणाली “चला हो,अजूनही मनगटात ताकद आहे, एवढे वर्ष तुम्ही आमची काळजी घेतलीत यापुढे मी तुमची आणि कुटुंबाची काळजी घेईन. ती जायला निघाली तस मालकांनी हाक मारली, “माने बाई,या, बसा, या तुमचा राग मी समजू शकतो, मी तुमचं सगळ ऐकले आता तुम्ही माझं ऐका.” तुमचे मिस्टर गैरहजर राहिल्याने एक दिवस मशीन बंद राहिली, डाय मशीनवर अडकली आणि सोळा तासाचे कंपनीचे नुकसान झाले. मटेरिअल वाया गेले .हा कंपनीचा तोटा कोण भरून देणार? तुमच्या नवऱ्याला विचारा, नाही नाही तुम्ही विचाराच, मी म्हणतो ते खोटे आहे का?”
“साहेब त्यांनी तुमच्या मॅनेजर साहेबांकडे आगोदरच माफी मागितली. कंपनीचे नुकसान झाले या बद्दल मी दिलगीर आहे. पुन्हा एकदा मी माफी मागतो पण एवढी मोठी शिक्षा आपण देऊ नये ही विनंती.” तिची तळमळ ऐकून ते पाझरले.ते म्हणाले, “तुम्ही बाहेर थांबा, मी तुमच्या नवऱ्याशी बोलतो.पाहूया काय करता येते.” ती बाहेर थांबली, मालकांनी तिच्यासाठी पाणी आणि चहा पाठवला.
शंकर, मी तुमच्या वागण्याचे त्रिकाली समर्थन करू शकणार नाही पण तुम्ही इतके वर्ष माझ्या कंपनीत नोकरी केली आहे तेव्हा तुमची मिसेस म्हणते म्हणून मी तुमच्यावर नवीन दोनही मशीनची जबाबदारी देत आहे. आपण प्रामाणिकपणे काम करून कंपनीच्या उत्पादनात भरीव वाढ कराल हीच अपेक्षा. त्यांनी मॅनेजर संख्येना बोलावून त्याच्या कामाची विचारपूस केली आणि त्यांना दोन्ही नवीन मशीनची जबाबदारी. सोपवली. तो मालकांच्या पाया पडण्यासाठी उठला तसं मालक त्याचे दोन्ही हात धरून म्हणाले, “शंकर तुझ्या बायकोने माझे डोळे उघडले. तुझे मागील योगदान लक्षात न घेता एका चुकीसाठी तुला शिक्षा करून मी कंपनीचे नुकसान करून घेत आहे. ये, उद्या पासून तू नवीन दोन्ही नवीन मशीन वापरु शकतोस.” त्यांचे शब्द ऐकून शंकर भारावून गेला. क्षणभर त्याला काय बोलावे ते सूचेना. साहेब मी आपला आभारी आहे.गेले पाचसहा दिवसाची तगमग आपण शांत केली.
ती दोघ मालकांच्या भेटीला येऊन माफी मागून गेली त्याला पहाता पहाता, महिना सरला. रोज उत्साहाने तो कंपनीत काय घडल ते सांगत होता. पगाराचा दिवस उगवला, दहा तारखेला पगार पाकीट हाती घेऊन त्यांनी सही केली. त्यातील पेमेंट स्लीप पाहून तो भारावून गेला. पाच रजा घेऊनही मालकांनी एकही रुपया कापला नव्हता उलट त्याचे पेमेंट एकरकमी पाच हजार रूपयांनी वाढवले होते. त्यांनी मालकांचे आभार मानले. असाच परफॉर्मन्स दाखवलात तर अजूनही पगारात वाढ होईल मालक म्हणाले.
त्याने घरी स्मिताला ते पाकीट नेवून दिले तेव्हा त्यातील धनादेश रक्कम पाहून ती गोंधळली तस तो मान डोलवत म्हणाला “होय स्मिता तुझ्या शब्दांनी जादू झाली. मला कामावरून कमी करण्याऐवजी माझा पगार. मालकांनी वाढवला. ती मुकपणे त्याच्या खांद्यावर मान ठेवून रडत होती. थोड्या वेळाने सावरली तस म्हणाली ही तुमच्या मेहनतीची कमाई आहे. ईश्वराला सांगा पुन्हा रागाने माझ्याकडून चूक होऊ देवू नको. दोघ जोडीने देव्हाऱ्यासमोर नतमस्तक झाले. स्मिताच्या मोजक्या शब्दांनी मालकाचे मन पाझरले आणि लक्ष्मी घरी आली. तिने मुलाला पेढे आणायला पाठवले आणि देवासमोर पेढे ठेऊन देवाला साकडे घातले. बा देवा माझ्या धन्याला चांगली बुध्दी दे आणि मालकांना उदंड आयुष्य दे.आज त्यांचा संसार सुखाचा आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.