नंदलाल मुरलीधर

नंदलाल मुरलीधर

सावळे ते रूप, काळा मेघ शाम
यशोदेचा कान्हा, कृष्ण त्याचे नाम
गोपिकांचा कान्हा, यशोदेचा तान्हा

नट खट बाई हरी, कोणा आवरेना
देवकीचा बाळ, करी यशोदा सांभाळ
यशोदा नंदन मोहन, तो त्राटिकेचा काळ

वसुदेव पुत्र कृष्ण, जीवनाचे खरे सुत्र
चालेना मात्रा त्यावरी, कंसाचा दुष्ट मंत्र
पेंद्याचा तो सखा, सुदाम्याचा शाळा मित्र

संकटात येई धावून, नको त्याला पत्र
मेघशाम घननीळा, जलात उतरे अवसेची रात्र
वेद, पुराणे ज्ञात हरीला, तोच एक स्वयंभू शास्त्र

पार्थाचा सारथी, युध्द सुत्र त्याच्या हाती
तोच शास्त्र तोच गती, त्याची वर्णावी महती
अहंकाराचा करिता त्याग, तोच देईल सद्गती

आज कान्हाचा जन्म, दिन भाग्याचा जन्माष्टमी
जडितांचा मुकुट मस्तकी, येईल मोरपीस खोऊनी
छेडेल बसरीची धून, जमतील गोकुळच्या गौळणी

ओढील कुणाची वेणी, चोरेल तो कुणाचे लोणी
गोपीका नदीत न्हाता, झाडा आडूनी पाहे चोरुनी
त्याचा चाळा कुणा न कळे, वस्त्रे घेऊन जातो पळुनी

बासरीची ऐकता तान, गोकुळाचे हरपे भान
तल्लीन होई मन चरणासी, तृप्त होती सुराने कान
असा निराळा मुरलीवाला, यशोदेस त्याचा अभिमान

काय म्हणावे या चाळ्याला? वाट अडवे मित्र जमवूनी
सख्या म्हणती धडा शिकवुया, यशोदेस सांगू जावूनी
लबाड हा पोचे झटपट, म्हणे आळ घेती सान म्हणूनी

अशा या लबाड हरीला, आज बाई बांधून ठेवा
चोरेल कुणाचे दहीदूध, खाईल शिंक्यातील मावा
खोटे खोटे अश्रू याचे, उगाच करील मातेचा धावा

चला सजवू पाळणा याचा, सुवासिनीनो अंगाई बोला
चला सख्यांनो गोफ विणूनी, आनंदे आज नाचू चला
धन्य घन्य तो मुरलीधर, आज त्याचा जन्म सोहळा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “नंदलाल मुरलीधर

 1. Archana Kulkarni
  Archana Kulkarni says:

  खूपच छान. काव्यरचना छानच आहे पण त्यात हे दिसले की कृष्ण तुम्हाला समजला आणि तो शब्दात गुंफलाय अचूक..!
  खूप खूप अभिनंदन..!

 2. Mangesh Kocharekar
  Mangesh Kocharekar says:

  धन्यवाद मॅडम

Comments are closed.