नका रे असा जीव उधळून देवू
८४ लक्ष योनीतून फिरल्यानंतर मनुष्य देह मिळतो असं आई म्हणायची, या चौऱ्याशी लक्ष योनी कोणत्या,तर वेगवेगळे कीटक,साप, श्वापदे, विविध प्रकारचे जीवजंतू, झाडे वगेरे.
‘मनुष्य जन्म अति थोर,त्याचा मोठा अधिकार’, का ? तर प्रगत मेंदू आणि शरीराचा ताठ कणा आणि आंगठ्याची विशिष्ट हालचाल करण्याची क्षमता फक्त मानावाकडे आहे म्हणून. तेव्हा मनुष्य जन्माला आल्यानंतर देवाचे आभार मानून त्याने दिलेला जन्म उत्तम कर्म करून भोगायचाआहे. फुका फुकी मरण्यासाठी हा देह नाही. दुर्दैवाने याची आपल्याला जाणीव नाही.
स्वतःच्या कुटुंबासाठी, कुळासाठी, गावासाठी, राज्यासाठी किंवा देशासाठी काहीतरी उत्तुंग कामगिरी करताना देह ठेववा लागला तर देहाचे चंदन झाले असे म्हणतात. मग एखाद्या युद्धात वीरमरण आले, एखादे उद्दिष्ट गाठताना मरण आले किंवा एखाद्या निर्वाणीच्या प्रसंगी कुटुंबाला,
लोकांना अपघातातुन वाचवताना मरण आले तर देहाचे सोने झाले असं म्हणण्याचा प्रघात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच गावातील मुले सैन्यात भरती होतात केवळ नोकरी म्हणून नाही, तर त्या घराची ती परंपरा आहे. बऱ्याचदा ती आपल्या कामगिरीवरच देह ठेवतात. इथे त्यांचे शव आणतात तेव्हा गावातील वातावरण शोकाकुल असते तरीही त्याची वाजत गाजत मिरवणूक निघते. जयजयकार होतो आणि तिरंग्यात लपेटून देह जातो. ११ किंवा २१ गोळ्यांची सलामी दिली जाते. हे भाग्य कोणाच्याही वाट्याला येत नाही. त्यासाठी तेवढीच अजोड कामगिरी करावी लागते. कोंढाणा घेतांना तानाजी गेला म्हणून कोंढाणा सिंहगड म्हणून अजरामर झाला. कोंढाणा सर करतांना तानाजी कामी आला.
पण उगाचच एखादं धाडस करून जीव गमावण्यात काय मतलब? ओहोटीच्या वेळी, समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत जाते अन भरती सुरू झाली की तितकेच बाहेरही येते. आपल्याला या सीमा रेषा माहिती नसतांना समुद्राच्या आत उगाच जाण्यात काय अर्थ? रिल करण्यासाठी उगाचच मोटरसायकलवर स्टंटबाजी करण्यात किंवा फुकाचा स्टंट करत रोरावत खाली कोसळणाऱ्या प्रपातात उडी घेणाऱ्या सैनिकाला काय म्हणावं? छुप्या शत्रूच्या तुकडीवर हल्ला करून गेला असता तर विरचक्राने गौरव झाला असता. प्रपातात कोसळून कुटुंबावर दुःखाचा आघात झाल्याने काय मिळाले?
कमी गुण मिळाले म्हणून विष प्राशन करण्यापेक्षा, स्ट्रगल करून इंजिनिअर, डॉक्टर, आयएएस, आयपीएस, नामवंत मुसद्दी वकील, शत्रूची खडानखडा माहिती मिळवणारे गुप्तहेर होऊन भारतीय भुमीची सेवा कराल तर स्वर्गात स्वागतासाठी सात पिढ्या वाट पाहतील आणि पृथ्वीवर पुढील पाच पिढ्यात नाव गाजत राहील. तेव्हा स्वतःला खजील करून घेऊ नका, तुमच्या पालकांना खजील करण्याची पाळी येऊ देऊ नका. झुंझुन यशाची गोडी चाखणारे बना, संकटात ढुंगणाला पाय लावत पाळणारे पळपुटे होऊ नका.
काही अतिशहाण्यांना समुद्राच्या आत एखादा कातळ असेल तर तिथेच जाऊन सूर्यास्त किंवा इतर वेळेस स्वतःचा किंवा ग्रुप फोटो घेण्याचा मोह आवरत नाही मात्र, कधीकधी विचित्र घटना घडते. भरती किंवा ओहोटीची वेळ माहिती नसताना तिथे जाऊन पाण्यात खेळता खेळता मती गुंग होते. वेळेचं भान रहात नाही आणि हळूहळू तो कातळ पाण्यात बुडायला लागतो. तो पर्यंत बराच उशीर होतो आणि परतायचे कसे ते कळत नाही. लाटांची उंची आणि जोर वाढू लागतो, सोबत कुणी पोहणारा आणि खमक्या माणूस नसतो. आता समोर मृत्यू नाचत असतो. प्राण वाचवण्यासाठी ओरडले तरी लाटांच्या आवाजामुळे कोणाला नीट ऐकू येत नाही.
कोणाला चुकूनमाकून कळले तरी भरतीच्या वेळेस तो तिथे तो पोचू शकेल की नाही याचा भरोवसा वाटत नाही. आपल्या डोळ्यासमोर एखादी मोठी लाट येते आणि त्यांना पाण्यात फेकून देते. आधीच घाबरलेल्या अवस्थेमुळे सावरणे कठीण होते आणि तोवर ओहोटीची लाट परतु लागते. पाय समुद्रात ओढले जातात आणि क्षणात माणूस त्या लाटेसोबत आत जातो. एक सेल्फी किंवा ग्रुप व्हिडिओ च्या मोहापायी मित्र किंवा कुटुंब संकटात पडते. काय घडले सांगायला कोणी मागे उरत नाही.
खरेच या सेल्फीची गरज होती का? असे अति साहस अंगलट येण्याची जिवावर बेतण्याची शक्यताच जास्त, क्षणाचा अवकाश, होत्याचे नव्हते होते म्हणून आग, पाणी, विज यांच्याशी खेळू नये. आपली वेळ खराब असेल तर आपल्या जवळून घडलेली छोटी चूक आपले प्राण घेऊ शकते.
३०जून २०२४ चा काळा दिवस, लोणावळा भूशी डॅम परिसरात पुण्यातील आठ मोठ्याव्यक्ती आणि दोन लहान मुले या धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या ओढ्यात थांबून वाहत्या पाण्याचा आनंद घेत होती पण त्या दरम्यान धरण परिसरात पाऊस पडला आणि ओढ्यातील प्रवाह अचानक वाढत गेला आणि त्याच्या पात्रात उभे असलेले सर्व कुटुंबीय सर्वांसमोर वाहत गेले. मुले आणि बायकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले. निर्णयाचा अभाव आणि पाण्याची भीती, अपुरे सामुहिक प्रयत्न यामुळे वेळीच मदत न मिळाल्याने ते वाहून गेले.त्यातील काही वाचले पण या धाडसामुळे फुलण्या आधीच काही कळ्या कोमेजून गेल्या, मलूल झाल्या त्यांचं काय? यात नुकतच लग्न झालेली वधू होती, लग्नापूर्वी दोघांनी अनेक स्वप्ने पाहिली असतील, त्याचं काय?
पावसाळ्यात तेथील परिस्थिती माहित नसतांना त्या कुटुंबाने किंवा मित्रांनी केलेले साहस त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. ‘नका रे वेड्यांनो असा जीव धोक्यात घालू’ तुमच्या आईने नऊ महिने पोटात गर्भ वाढवताना भोगलेल्या याताना तिलाच माहिती. तुमच्या वडिलांनी तुमच्या जन्मा नंतर तुमचे पोषण करण्यासाठी घेतलेले कष्ट तरी आठवा, त्याने गाळलेला घाम, जागवलेल्या रात्री याला काहीच का मोल नाही? तुम्ही असे अचानक हे जग सोडून गेलात तर त्यांचं काय होत असेल? कसे जगतील ते? तुम्हीच जर त्यांचा आधार असाल तर!
दर पावसात असे प्रसंग ठिकठिकाणी घडतात, तर कधी एखाद्या ठिकाणी जसे वरळी समुद्र मार्गावर मुले ब्रीजवर चढून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात समुद्रात पडतात, किंवा एखाद्या मोठ्या खदानात किंवा डबक्यात पोहतांना गाळात रुतून बुडून मरतात. कशासाठी असले साहस करायचे? एवढा का तुमचा जीव वर आला आहे? हे साहस किती महागात पडते याची तुम्हाला कल्पना नाही का?
दिनांक १७ जुलै या एकाच दिवशी रिल बनवतांना तीन अपघात घडले पहिला अपघात माणगाव येथील कुंभे धबधब्यावर घडला. अवनी कामदार ही तरूण चार्टर्ड अकाऊंट मुलगी आपल्या मित्रांसह वर्षा सहलीला आली असता रिल बनवतांना पाय घसरून ३०० फुट खोल दरीत पडली तर दुसरा अपघात औरंगाबाद, दौलताबाद येथे एक २३ वर्षांची मुलगी उंच ठिकाणी आपल्या फोर व्हिलर सह रिल बनवतांना चुकीने रिव्हर्स गिअर टाकला गेल्याने दरीत पडून वारली त्याच दिवशी बिड येथील एक मुलगा धुळे सोलापूर नॅशनल हायवे वर आपल्या बाईकवर मित्रासह सेल्फी रिल बनवताना वेगवान बाईक वरून पडून गंभीर जखमी झाले. रिल बनवतांना ठीकठिकाणी वारंवार अपघात होऊनही यांना शहाणपण का येत नाही तेच कळत नाही. घरी आई, वडील, भाऊ,बहीण वाट पहात असतील हा विचार मनात का येत नाही? तुमच्या डोक्यातील भन्नाट कल्पनेने त्यांच्यावर कोणता आघात होईल याचा विचार का येत नाही? मुलांनो नका रे अस जीव भलत्या डावाला लावू. पालकांनो खरंच विचार करा, मुलांच हे अस भन्नाट वागणं तुम्हाला मान्य आहे का? नंतर पश्चातापात करण्यापेक्षा त्यांच्या वागण्यावर वेळीच आवर घाला.
एखाद्या दिवशी तुमच्या बिल्डिंग मधील किंवा तुमच्या मुलाच्या कॉलेज मधील मुले पिकनिकला जायचं म्हणतात तेव्हा, ती तुमची जबाबदारी आहे, तुमचा मुलगा/मुलगी कोणत्या मित्रांसोबत आणि कशासाठी जात आहेत ? याची शहानिशा करून घ्या. मुलं म्हणतात, I am old enough to take care. मुलगा / मुलगी कितीही आज्ञाधारक असला/ असली तरी मित्रांसोबत असतांना तो/ती कसे वागतील? हे कोणीही सांगू शकणार नाही म्हणूनच मुलांवर फाजील विश्वास नकाच टाकू. माझा एकुलता एक,ठिक आहे, पण एकुलता आहे म्हणूनच काळजी घ्या, काहीही खपवून घेऊ नका, त्याची परिणीती काय याचा विचार नको का?
काही मुले ट्रेकिंग संबंधी पुरेसे ज्ञान, योग्य साधने, योग्य मार्गदर्शक वातावरणाची साथ नसतांना ट्रेकिंगसाठी उतरतात. तर काही पोहायला, चक्क प्रवाहीत नदी पार करण्याचे आव्हान म्हणून स्विकारतात. एखाद्या उंच कड्यावर किंवा झाडावर चढण्याचे आव्हान स्विकारतात.
खरच अशा गोष्टींची गरज आहे का?
दहीहंडी नक्कीच चांगला सहसी खेळ आहे पण दहीहंडी खेळतांना कोणताही प्रसंग उद्भवू शकतो, ती करमणूक आहे, त्या पराक्रमाची नोंद देशाच्या इतिहासात कधीच होणार नाही ना समाजाला काही फायदा होणार मग सुरक्षितता न बाळगता दहीहंडीत भाग घ्याच का? दहीहंडी फोडण्याचा उत्साह आणि थरार कितीही मोठा असला तरी त्याचा ना तुमच्या कुटुंबाला उपयोग किंवा फायदा, ना देशाला.
लोकलच्या पुढच्या लेडीज डब्याच्या मागील डब्यास, किंवा मधल्या लेडीज डब्याच्या मागील दारावर लटकून प्रवास करणारी दळभद्री पोरं मुलींना पटवण्यासाठी एक हात सोडून डब्या बाहेर हातवारे करत असतात. कधी खांबावर लटकवलेल्या पत्र्यावर जोराने हात मारतात तर कधी झाडाची डहाळी खेचतात. हे कारनामे करत असताना कधी कधी हात सुटून तर कधी रेल्वे ट्रॅक ला लागून असणाऱ्या खांबावर आदळून खाली पडतात. कधी जागीच प्राण जातो तर कधी हॉस्पिटलमध्ये यातना सहन करत प्राण जातो. लोकल थांबते. जेथे अपघात घडला असेल तेथे पंचनामा होतो. कधीकधी ज्या डब्यात ते कारटं उभ असेल त्यांना नाहक चौकशीसाठी बोलवतात. सर्वच प्रवाशांचा वेळ वाया जातो. या अपघातात व्यक्ती वाचण्याची शक्यता फारच कमी असते. असले पुचाट पराक्रम काय कामाचे? कोणत अवार्ड त्याने कमावलं? पण लक्षात घेत कोण. काही वर्षापूर्वी मी प्रवास करत असलेल्या डब्यात दोन मुलं असलाच पानचटपणा करत होते. त्या डब्यात सुट्टीवर आलेला मिल्ट्री ऑफिसर होता. त्याने त्या दोघाना डब्यात घेऊन धुलाई केली. पण असं नेहमी करणार कोण?
जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काही खेळत असता, विशेषतः धावणे, घोडेस्वारी, पोहणे, फुटबॉल वगेरे तेव्हाही अपघात होऊ शकतो पण ते आव्हान तुम्ही देशासाठी स्वीकारलेले असते. देशाच्या पद तालिकेत त्यामुळे भर पडणार असते, तुमचा वैयक्तिक ग्राफ उंचावणार असतो. त्यामुळे ते साहस चुकीचे किंवा अवाजवी ठरत नाही.
तुम्ही जी गोष्ट करत आहात त्याने तुमच्या आयुष्यात किंवा देशाच्या वैभवात फरक पडणार असेल तर ती गोष्ट जरूर करा. त्या आव्हानाचा पाठलाग करून यश मिळवले तर उदोउदो होणारच आहे.
हल्ली आठवीनववीची मुले क्लाससाठी घरापासून दूर जातात. तेथेच त्यांची मैत्री इतर मुलामुलींशी जमते मग कधीतरी क्लास बंक करून मॉल किंवा कुठेतरी फिरायला जातात, बाहेरील चमचमीत पदार्थांसोबत सिगारेट, गांजा,चरस किंवा ड्रग्ज यांचा आस्वाद घेतात. नवीन गोष्ट करून पाहण्याचे आकर्षण त्यांना असतेच आणि तिथेच ती फसतात. पाहता पाहता ते त्याच्या विळख्यात सापडतात. यामुळे मुलं या गोष्टी करायला सरावतात. आता या गोष्टी केल्यावाचून त्यांना राहवत नाही. त्या गोष्टी मिळाव्यात यासाठी अधीर बनतात. यासाठी लागणारे पैसे घरातून चोरतात. घरातून पैशांची सोय होत नसली तर मुले बाहेर चोरी करू लागतात. अमंली फदार्थाच्या ने आण तस्करीत मदतही करतात. ही मुले कोणाच्याही घरातील असू शकतात. कधीकधी ती इतक्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातील असतात की त्याच्या घरातीलच काय, पण शेजारच्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही.
याचा अर्थ व्यसन कोणत्याही घरातील आणि स्तरातील व्यक्तीला लागू शकते. हळूहळू ती व्यक्ती सराईतपणे गुन्हेगारी बनतात, म्हणून त्याच्या वाढत्या वयातच आई बाबांनी त्याचा / तिचा जीवलग मित्र होणे गरजेचे आहे. केवळ आई किंवा बाबा या नात्यापलीकडे जाऊन त्याची भावनिक गरज समजून घेतली तर तो कदाचित तुमच्या पासून काही लपवणार नाही अशी शक्यता आहे.
मुलांवर नेहमीच वडिलगीरीचा हक्क न दाखवता त्यांचे मित्रमैत्रीणी कोण आहेत? घराबाहेर ती कोणत्या मित्रांसोबत वाढत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला त्याच्या वयाचे होऊन विचार करावा लागेल तरच समस्येच निराकरण करणे शक्य होईल.
Drug Addict मुला मुलींकडून, समाजकंटक चुकीची कामे करून घेतात. ही मुले हळूहळू अभ्यासापासून दूर जातात. त्यांचा परफॉर्मन्स घसरतो मग निराशेच्या गर्तेत जातात, या निराशेतच आत्महत्या करतात. आपल्या मुलांचे मित्र बनून त्याच्याशी सतत संवाद साधला तर तुम्ही त्याला व्यसनांपासून दूर ठेऊ शकाल. नशा करणे समाजात जोमाने फोफावत आहे. मोठ मोठ्या कॉलेज बाहेर असणाऱ्या पान सिगारेट टपऱ्या याचा वापर अमली पदार्थ विकणारे करतात आणि कॉलेजमधील एखाद्या टपोरी मुलाला किंवा हुशार, स्मार्ट मुलीला हाताशी घेऊन जाळे पसरतात. विशेषतः वैद्यकीय कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज येथे मुले अभ्यासाच्या तणावात असतात. हा ताण दूर व्हावा म्हणून आधी सिगारेट, किंवा बिअर मग हळूहळू मद्य आणि त्यानंतर अमंली पदार्थ. हे कसे घडले किंवा या नशेच्या डोहात आपण कधी बुडालो ते त्यांना कळतही नाही,यात मुली सुद्धा मोठ्या संख्येने असतात. एकदा त्यात अडकल्या की नैराश्याने आत्महत्या प्रयत्न करण्यासही सहज धजावतात.या गर्तेत मुलांनी शीरूच नये वाटत असेल तर You have to be a watchDog.
विशेषतः आय टी क्षेत्रात काम करणारी तरुणाई ही वीस ते तीस वयाची मुले कामानिमित्ताने घरापासून दूर एकटी राहतात. Hangout म्हणून किंवा थ्रील म्हणून शहराबाहेर एखाद्या पब किंवा हुक्का पार्लरमध्ये वीकेंड साजरा करतात. नशा येणारी द्रव्ये किंवा इंजेक्शन घेऊन ती एखाद्या संगीतावर बेधुंद नाचत असतात. पुणे, मुबंई, बेंगलोर अशा शहराबाहेर असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी आयोजित केली जाते. त्याचा कुणीतरी एक निमंत्रक किंवा होस्ट असतो आणि तोच मेसेज देवाणघेवाण करून हे सर्व जुळवून आणतो.हळूहळू मुले मुली जमतात आणि संगीताच्या तालावर नाचू लागतात. या मुलांना मद्य आणि त्याच्या बरोबर ड्रग पुरवले जातात. एकदा का याची चटक लागली की पावले त्याच दिशेला वळतात. मग ही मुले शनिवार, रविवारची वाट पाहत असतात.अशा वेळेस कोणा चुकीच्या मित्राच्या सानिध्यात आले तर त्यांच्यावर अतिप्रसंगाची वेळ येऊ शकते.म्हणून मित्र पारखून घ्या. तो तुमच्या स्वभावाचा फायदा घेत नाही ना हे पाहा.
काही मुले आपल्या पित्याला कॉलेजमध्ये जाण्यासाठी बाईक हवी म्हणून वेठीस धरून त्यांची ऐपत नसतांना महाग मोटरसायकल भले हप्त्यावर विकत घेऊन द्यायला भाग पाडतात. मोटारसायकल चालवण्याचा पुरेसा सराव नसतांना ही मोटरसायकल घेऊन इतर मित्रांच्या नादी लागत मोठया रस्त्यावर सुसाट वेगाने आणि स्टंट बाजी करत ट्रॅव्हल करतात. वेग आटोक्यात न आल्याने रस्ता दुभाजक किंवा इतर वाहनावर आदळून अपघातात गंभीर जायबंदी होतात. कदाचित प्राणही जातो. खरेच हा अतिशहाणपणा करण्याची गरज होती का? ऐवढा जीव कवडीमोल आहे का?
हल्ली अनेक पालकांना फक्त एकच मुलगा किंवा मुलगी असते आणि ती लाडावलेली असतात. ही मुले पालकांना वेठीस धरून आपल्या खर्चिक मागण्या मान्य करून घेतात. एखाद्या वेळेस पालकांनी त्यांच्या मागणीस नकार दिला तर शाळा कॉलेजमध्ये न जाणे, पालकांसोबत न बोलणे असा मार्ग अवलंबतात. साहजिकच त्यांचे अभ्यासावरील लक्ष कमी होते. मग परीक्षेत अपयश आले म्हणून,मित्र किंवा मैत्रीणींनी मैत्रीला नकार दिला म्हणून किंवा पालकांनी महागडा मोबाईल, घड्याळ मोटरसायकल किंवा कंप्यूटर अथवा लॅपटॉप तातडीने विकत घेऊन द्यायला नकार दिला म्हणून आत्महत्या करतात. हे करताना या हुशार मुलांची बुध्दी कुठे गहाण पडते कोणास ठाऊक ? बिचारे पालक त्यांना कळत नाही नक्की आपलं चुकलं काय?
मुलांसमोर सर्वच आर्थिक व्यवहार आणि तुमची आर्थिक गणित बोलू नका. आहे ते सर्व तुझेच आहे असा चुकूनही त्यांच्या समोर उल्लेख करू नका. मुले फार हुशार असतात, या गोष्टी ऐकूनच त्यांची अपेक्षा वाढत जाते. तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी ब्लॅक मेल करण्यास ती धजावतात त्याचे कारण हेच असते की तुम्ही त्याला नको तेवढं महत्व देता. त्याच्यासाठी काहीही करायला तयार असता. मौजमजेसाठी पैसे हवे म्हणून अपहरणाचा खोटा डाव रचून मुले आपल्याच आई वडिलांना ब्लॅक मेल करतात. म्हणूनच आपल्या संपत्तीच प्रदर्शन मुलांसमोर मांडू नका. अन्यथा या माहितीचा वापर करून मुलेच तुम्हाला भिकेला लावतात.
ज्या पालकांनी महत्प्रयासाने मुलांना वाढवले त्यांच्या कष्टाची जाणीव मुलांच्या का बरे होत नाही? ‘आज,आत्ता, ताबडतोब’ वस्तू मिळावी असा अट्टाहास किती योग्य? आपण करत असलेल्या गोष्टींचा परिणाम आपल्या कुटुंबावर किती विपरीत होईल ही जाणीव का होत नाही? मित्रांनो यासाठी अशा हट्टी आणि आग्रही मुलांसाठी समुपदेशन वर्ग चालवणे गरजेचे आहे. अगदी त्यांच्या पालकांसाठीसुध्दा समुपदेशन हवे म्हणजे मुलांनी मागितले की झटपट दिले ही प्रवृत्ती कमी होईल. एक दिवसात हे घडणार नाही हे मान्य पण नकार पचवायला मुले शिकली की छोट्या मोठ्या कारणावरून आत्महत्या करणार नाहीत.
वयाने मोठ्या मुलांकडून पालकांच्या त्यांच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आणि योजना असतात,त्याने चांगले शिकून नोकरी करावी आणि आपल्या वडिलांचा भार कमी करावा. मात्र मुलांची स्वप्ने वेगळीच असतात. त्यामुळे त्यांच्याशी मोकळा संवाद साधा.
एखाद्या विद्यार्थ्यांला खेळात किंवा संगीतात रस असतो, एखाद्या मुलाला अभ्यासाची रुचीच नसते तर त्याला कारागिरी आवडते. तर एखादा नाट्य अभिनय क्षेत्रात हरवून जातो. म्हणूनच त्याचा कल समजून घ्या. आपल्या मुलांकडून अपेक्षा बाळगताना, त्याची क्षमता आणि आवड तपासा अन्यथा तुमची अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण त्याला पेलले नाही तर तो आपण आई बाबांना तोंड दाखवायला लायक नाही समजून काहीही करू शकतो.
काही मुले मित्रमैत्रिणींच्या नादी लागून स्वकमाई नसतांना घरातील पैशांवर डल्ला मारून हॉटेलिंग,मॉल मध्ये मोठी खरेदी करणे, पैसे कमावता येतील म्हणून कंप्युटर गेम खेळणे अशा प्रकारात अडकून पालकांचे आणि स्वतःचे नुकसान करून घेतात.कुणी अतिशहाणा चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे कुणा अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करून दोघे पळून जातात आणि मज्जा म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. मग त्या गोष्टींची चटक लागते. परिस्थिती हाताबाहेर गेली की मुली घाबरतात, काही उपाय दृष्टीपथात नसल्याने हतबल होतात. मुलीच्या पालकांकडून कारवाई होईल या भितीने दोघेही आत्महत्या करतात. तेव्हा वाढत्या वयातील मुले ही जोखीम आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे दोन्ही पालकांचे काम आहे. मुलांना पॉकेट मनी म्हणून अतिरिक्त पैसे देऊन बाहेरच्या गोष्टीची चटक लावू देऊ नका.
मित्र सांगतो म्हणून किंवा कोणी माहिती दिली की मुले भरपूर पैसे कमावता येतील असे समजून खोट्या प्रचाराला बळी पडतात. त्या खेळांच्या मोहात अडकतात. त्यासाठी त्याला एखाद्या प्रोडक्टची फ्रांचायसी घ्यायची असते,पण त्या धंद्यातील त्याला पुरेसे ज्ञान आहे की नाही हे ही तो पहात नाही. या धंद्यासाठी तो पालकांजवळ भांडवल मिळावे म्हणून आग्रह धरतो आणि ते मिळाले नाही तर टोकाचा मार्ग अवलंबतो. जास्त दराने कुणाजवळून कर्ज घेणे आणि ते फेडता न आले तर आत्महत्या करतो किंवा लापत्ता होतो. यातून समस्या सुटण्या ऐवजी गुंतागुंत वाढते आणी त्याचा त्रास पालकांना होतो म्हणूनच विचारपूर्वकच आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच पाय पूढे टाका.
मुलांनी स्वतः तील कौशल्ये आणि मर्यादा ओळखणे शिकले पाहिजे. पालकांनीही आपल्या मुलांना अतिरिक्त तणावात वाढवू नये. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा बाळगू नये. त्यांच्यावर फाजील विश्वास टाकू नये. उच्च शिक्षण असो की व्यवसाय वा नोकरी त्यातील फायदे अथवा तोटे लक्षात घेऊनच पाय टाकावा. कोणीतरी सांगते म्हणून फारसा विचार न करता उत्साहात पाऊल पुढे टाकणे धोक्याचे ठरू शकते.काही मुलांना परदेशी शिक्षणाचे वेध लागलेले असतात मात्र पालकांची क्षमता, तेथे नोकरी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा.
बरेचदा, परदेशातील उच्च शिणासाठी योग्य संस्था मिळाली नाही तर नोकरीची शक्यता मावळते आणि पालकांनी ऋण काढून दिलेले पैसे वाया जातात. कधीकधी विद्यार्थ्यांना खोटा पासपोर्ट किंवा व्हिजा दिलेला असतो त्यामुळे त्यांची परदेशात परवड होते. तेव्हा पालकांनी मित्राचा मुलगा किंवा मुलगी यांच्या शिक्षणाशी, त्यांच्या कमाईशी आपल्या मुलाची तुळना करणे टाळावे. मुलगा किंवा मुलगी म्हणते म्हणून तिच्या हट्टा खातर बाहेर पाठवण्यातील जोखीम ओळखावी. उगाचच जोखीम स्वीकारून आपला मुलगा किंवा मुलगी गमावू नये.
तेव्हा तळमळीने सांगतो, पालकांनी आपल्या मुलाला Asset समजून अपेक्षा करू नये. तसेच अति लाड किंवा कौतुक करून बिघडवू नये. तुमचं मुलं हे यंत्र नाही, त्याची बौद्धिक क्षमता तुम्ही सुधारू शकता, पण अमर्याद वाढवू शकणार नाहीत. रबर अतिरिक्त ताणला तर तुटतो हे लक्षात घ्या. मुलं तुमचं आहे त्याला आकार तुम्हीच देणार आहात फक्त करायला गेलो गणपती आणि झाला माकड अशी स्थिती नकोच नको. मुलांच करिअर करिअर करून उगाच चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्याच्यावर डोळस लक्ष ठेवा तो आपली जबाबदारी नक्की पार पाडेल.
छान.
Eu simplesmente não consegui sair do seu site antes de sugerir que realmente gostei das informações padrão que uma pessoa fornece aos seus visitantes. Estarei novamente de forma constante para verificar novas postagens
Wow wonderful blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is great as well as the content